त्यागासारखं ढोंग नाही

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
19 Nov 2014 - 12:34 am

सिनेमा पाहता? हिरो पाहता? मारामारी पाहता? काय उद्देश असतो? अन्यायाविरूद्ध लढा वगैरे. कधी? स्वतःवर शेकेपर्यंत तर हिरो हिरवीणीचे तळवे चाटण्यात वेळ घालवत असतो. अचानक काय होतं त्याला? गझनीत हिरवीण मरते. अग्निपथात बाप मरतो. क्रिशमध्ये बाप जिवंत असल्याचं कळतं. अजूनही बरीच उदाहरणं मिळतील. सारांश, वैयक्तिक पातळीवर काहीतरी चेतना मिळेपर्यंत आमच्या हिरोंना उर्वरित जगाशी काहीही घेणंदेणं नसतं. पण सगळा लढा वैयक्तिक पातळीवरच ठेवून कसं चालेल. तसं केलं तर लोकांना हिरो हा हिरो न वाटता सूडबुद्धीनं पेटलेला माथेफिरू वाटेल. म्हणून मग व्हिलनला जास्तीत जास्त व्हिलनीश करायचं. म्हणजे त्याच्या क्रूरतेसमोर 'पूरे देश का भवितव्य अब मेरे हात में है' असा पवित्रा घेऊन त्या नावाखाली हिरो आपला बदला घ्यायला मोकळा होतो. हृथिकच्या अग्निपथ मध्ये हा दांभिकपणा 'ब-यापैकी' टाळलाय.

पण म्हणजे केवळ आणि केवळ निस्वार्थी हेतूने पुढे आलेले, दांभिक नसलेले हिरो नसतातच का? सिनेमात काय किंवा आयुष्यात काय... असतात, दांभिक नसलेले हिरो असतात. पण ते निस्वार्थीपणाचं ढोंग करत नाहीत. किंवा वाईटाची प्रत्यक्ष झळ पोचल्यानंतर जागे होत नाहीत. ते परिस्थितीचा सावधपणे आढावा घेऊन वेळीच वाईटाविरोधात मोर्चेबांधणीला सुरूवात करतात. आपण केलं नाही तर आपल्यासाठी दुसरं कोणी उभं राहणार नाही हे जाणून जबाबदारी स्वीकारतात. आणि स्वतःचं, स्वतःच्या माणसांचं रक्षण करतात. त्यांना चुकीच्या, अन्यायी वातावरणाचा त्रास होतो आणि अशा वेळी स्वस्थ बसता येत नाही म्हणून ते पेटून उठतात. वैयक्तिक पातळीवर मुक्तपणे, कुठल्याही तत्वहीन मार्गाचा अवलंब न करता वावरता यावं म्हणून ते कंबर कसतात. त्यांची तयारी ही एकट्याने लढा देण्याची असते.

पण प्रवाहाविरूद्ध जाणारी माणसं लगेच ऊठून दिसतात - सगळ्यांना. मग त्यांना आयताच बकरा मिळतो.

'अरे समोरच्या चाळीत जातोयस का? अच्छा काम आहे तुझं? बरं येताना त्या जोश्याकडनं माझं पुस्तक घेऊन येशील? तेवढी माझी फेरी वाचेल.' ही किती साधी विनंती झाली ना?

'अरे व्हिलनशी पंगा घेतोयस? बरं मग माझ्यावतीने चार लगावून दे त्याला. म्हणजे माझं कामही होईल आणि मी अडचणीतही येणार नाही.' ही सुद्धा साधी विनंती वाटायला हरकत नाही. पण हिरो का म्हणून चार ज्यादा लगावेल? म्हणून मग 'अमूक तमूक आगे बढो, हम तुम्हारे साथ है' असं म्हणून आपलं काम साधून घ्यायचं. म्हणजे हिरोला कसं झुंडाच्या प्रभावाने बारा हत्तींचं बळ चढल्यागत वाटतं. आणि ज्यांनी आपल्याला बळ दिलं त्यांच्यासाठीसुद्धा लढायला हवं असं त्याला वाटतं. कारण त्यांच्या 'ऋणा'तून त्याला मुक्त व्हायचं असतं. लोकसुद्धा आपण याला चेव चढवून याच्यावर खूपच उपकार केल्यागत वागायला लागतात, अव्वाच्या सव्वा अपेक्षा ठेवतात. गोडीगुलाबीने आपल्याला हवा असलेला लढा लढवून घेतात. स्वतःचं सगळं राखून ठेवून त्याला नेता म्हटल्याबद्दल त्याच्याकडून त्यागाची अपेक्षा ठेवतात. वरकरणी पाठिब्यांच्या ऋणाखाली दबलेला हिरो त्याग करता करता मध्येच कोसळला, माघार घेऊ लागला तर लोक त्यालाच सगळ्यात मोठा दांभिक ठरवून मोकळे होतात. आणि त्याग करणं जर त्यानं थांबवलं नाही, तर त्याच्या अंतापर्यंत त्याचं शोषण करून तो संपुष्टात आल्यावर त्याचं नाव 'अमर' करून टाकतात. एकदा अमर केलेलं नाव हवं तेवढं वापरलं तरी लोकांची पोळी पिकत राहते. त्या नावाचं ब्रॅन्डिंग करून त्यांची दांभिक वृत्ती खपत राहते.

मग... आपल्या इच्छा आकांक्षांचा, स्वातंत्र्याचा, विचारांचा, माणसांचा, तत्वांचा, जगण्याचा त्याग करावा लागू नये यासाठी रिंगणात उतरलेल्या नेत्याला त्यागाचं प्रतीक म्हटलं जातं. तो त्याग जो त्याला कधी करायचा नव्हता, तो त्याग जो त्याला बळेबळे सहन करावा लागला, त्याच्या तत्त्वांच्या रक्षणासाठी. ती तत्त्वं ज्यांनी त्याला - गंमतीचीच बाब आहे - त्यागमुक्त जीवनाची स्वप्नं दाखवली होती.

मग त्याचं चुकलं काय? माणसानं स्वतःशी, स्वतःच्या तत्त्वांशी प्रामाणिक राहू नये का? वाईटाशी लढू नये का? जरूर लढावं, पण फक्त आपलीच लढाई लढावी... दुस-यांवर उपकार करायला जाऊ नये. त्यांना किंमत नसते त्याची. जितके जास्त उपकार कराल, तेवढी भिकारी प्रवृत्ती वाढवाल. आणि कितीही भीक मिळाली तरी भिकारी भुकेलाच राहतो हे पटवून देण्यासाठी मला वाटतं वेगळी मेहनत घ्यायला नको. उलट त्यांची लढाई त्यांनाच लढू देऊन त्यांच्यावर तुम्ही खरा आणि मोठा उपकार कराल. तुम्हाला स्वार्थी म्हटलं जाईल, आत्मकेंद्री म्हटलं जाईल. तुम्ही केवळ स्वतःचा विचार करणारे लोभी राक्षस असाल त्यांच्यासाठी. पण असं म्हणून कळत नकळतपणे ते तुमची स्तुती करतायत हे तुम्ही लक्षात ठेवा. तेवढं ध्यानात ठेवलं की तुमच्या आपोआप लक्षात येईल, की तुमच्याकडून त्यागाची अपेक्षा ठेवणा-या नालायकांना काय वाटतं याने तुम्हाला फरक पडत नाही. आणि स्वतःचं आयुष्य आनंदाने जगायला तुम्ही मोकळे व्हाल.

- कौस्तुभ अनिल पेंढारकर

धोरणवावरसमाजजीवनमानतंत्रराहणीविचारमत

प्रतिक्रिया

ह्म्म्म.. तुझे आहे तुजपाशी मधला आचार्य आठवला.

जेपी's picture

19 Nov 2014 - 4:19 am | जेपी

चांगला लेख.आवडला.

जयंत कुलकर्णी's picture

19 Nov 2014 - 9:55 am | जयंत कुलकर्णी

"No bastard has won the war by sacrificing his own life. He wins it by making the enmy to scarifice his'' Gen. Patton...

हाडक्या's picture

19 Nov 2014 - 5:47 pm | हाडक्या

पॅटनच्या या एका वाक्याने आमचे डोळे उघडले होते. 'मै भी दुश्मन की कम कर सकता हु इक गोली' असल्या गाण्यांच्या ओळींचा फोलपणा झटक्यात जाणवला होता.

आनन्दा's picture

19 Nov 2014 - 10:29 am | आनन्दा

ह्म्म.. खरे आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Nov 2014 - 10:51 am | ज्ञानोबाचे पैजार

त्यागा मधूनी पुण्य मिळे
सत्कर्माची गोड फळे

हे आमच्या मनावर लहान पणा पासुन ठसवले गेले आहे.

(त्यागी) पैजारबुवा,

hitesh's picture

19 Nov 2014 - 11:44 am | hitesh

कैकेयी .. दशरथ , कैकेयी .. राम , कैकेयी ... लक्ष्मण , सत्यवती ... भीष्म , द्कुंती ... कार्ण , ध्रुवबाळाची सावत्र आई ... ध्रुवबाळ ..

ही त्यागाची उदाहरणे आहत का लबाड लोकानी दुसर्‍याच्या बोकांडी त्याग बसवुन स्वतः मनसोक्त उपभोग कसे घेतले याच्या कथा आहेत ??

कंजूस's picture

19 Nov 2014 - 12:40 pm | कंजूस

मिपावर धार्मिक चानेल ?
त्याग ढोंग आहे का त्यागाची जाहिरात ढोंग आहे का त्यागामागचा अंतस्थ स्वार्थ ढोंग आहे ?

सुबोध खरे's picture

19 Nov 2014 - 1:36 pm | सुबोध खरे

लेखन आवडले
+१००

अत्रुप्त आत्मा's picture

19 Nov 2014 - 2:13 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११

स्वप्नज's picture

19 Nov 2014 - 5:17 pm | स्वप्नज

विचार आवडले..

रेवती's picture

19 Nov 2014 - 6:05 pm | रेवती

लेखन आवडले.

असंका's picture

20 Nov 2014 - 11:02 am | असंका

त्यागी, त्यागी म्हणून जो मोठेपणा मिळतो ना, तो बरेच वेळा सोडवत नाही या त्यागी लोकांना. त्या मोहाचा एकदा त्याग केला मी मग कसला वेगळा त्याग करायला लागतोय?

त्या मोहाचा एकदा त्याग केला मी की मग कसला वेगळा त्याग करायला लागतोय?

प्यारे१'s picture

20 Nov 2014 - 1:00 pm | प्यारे१

त्यागातून त्याग करणाराला स्वतःला आनंद मिळतो म्हणूनच त्याग केला जातो. हीच गोष्ट प्रत्येक कृतीबाबत आहे. स्वतःच्या नि फक्त स्वतःच्या सुखासाठी माणूस कुठलीही कृती करत असतो. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. कधीकधी माणसाला दु:खात राहूनच सुख मिळतं (असं त्याचं आतल्या आत मत असतं. कदाचित नकळत पण तेच खरं आहे.) ही त्याची सुखी होण्यासाठी केलेली कृती असते.

तिमा's picture

20 Nov 2014 - 3:24 pm | तिमा

'प्रकाश बाबा आमटे' बघितलात तर, सरसकट सर्व त्याग ढोंगी असतो असे म्ह्णण्यापूर्वी तुम्ही परत विचार कराल.

प्रकाश बाबा आमटे पाहिलाय. "आपण 'त्याग' केलाय" असं त्यांना वाटतही नसावं. त्याग हा स्वतःची मालकी असणा-या सर्वात प्रिय बाबीचा केला जातो. स्वतः भुकेलं राहून आपल्या बाळाला खाऊ घालणा-या आईच्या या कृत्यात कुठलीही त्यागाची भावना नसते, नसावी. पण स्वतःच्या मुलालाही भुकेलं ठेऊन शेजारच्याच्या मुलाला फक्त ते जास्त भुकेलं आहे म्हणून खाऊ घालणं, हा त्याग आहे आणि त्याचवेळी तो गाढवपणा सुद्धा आहे. जेव्हा एखादा त्याग करतो, तेव्हा कोणीतरी त्या त्यागातून उपभोग घेतो. 'गरज' हा पात्रतेचा/हक्काचा निकष नाही. दुस-याच्या त्यागावर जगणारा 'गरजू' हा तसं जगेपर्यंत, आणि त्याच्यासाठी करण्यात आलेल्या त्यागाची शक्य असल्यास परतफेड करेपर्यंत नालायक असतो.

प्रभाकर पेठकर's picture

20 Nov 2014 - 7:10 pm | प्रभाकर पेठकर

>>>>त्याग हा स्वतःची मालकी असणा-या सर्वात प्रिय बाबीचा केला जातो.

माणसाला स्वत:च्या आयुष्याशिवाय जास्त प्रिय काय असतं? पण बाबा आमटे, प्रकाश आमटें आणि त्यांच्या कुटुंबियांनी तेच आयुष्य सामाजिक कार्यात झोकून दिले आहे. वैयक्तिक सुखाच्या पलीकडे जाऊन.

>>>>पण स्वतःच्या मुलालाही भुकेलं ठेऊन शेजारच्याच्या मुलाला फक्त ते जास्त भुकेलं आहे म्हणून खाऊ घालणं, हा त्याग आहे आणि त्याचवेळी तो गाढवपणा सुद्धा आहे.

कुठलीच आई असं करणार नाही. जे अन्न उपलब्ध आहे ते ती दोघांमध्येही वाटून देईल. एकच पोळी असेल तर स्वतः उपाशी राहून अर्धी पोळी स्वतःच्या आणि उरलेली अर्धी शेजारच्या मुलाला देईल.

पैसा's picture

20 Nov 2014 - 6:41 pm | पैसा

काही काही लोकांना त्यागाचीही नशा चढते असं पाहिलं आहे.

'वैयक्तिक'या शब्दाची व्याप्ती त्यांच्यासाठी मोठी आहे.
मग उरलेली अर्धी पोळी जी दुस-याच्या मुलाला दिली तो त्याग आहे. जर त्या दुस-या मुलाबद्दलही आपल्या मुलाएवढीच आपुलकी असेल तर ठीक, मग तो त्याग नसेल. पण तेवढ्या प्रमाणात आपुलकी नसेल, तर जेवढे मनातल्या मनात ती आढेवेढे घेईल तेवढा ती त्याग करेल. मुळात त्या मुलाला भरवणं ही शेजा-याची जबाबदारी आहे. तो ती पाळत नाही म्हणून स्वतःच्या मुलाची शुश्रुषा तिला वाटून घ्यावी लागते. हाच मुद्दा आहे. आपली लढाई लढायला जाताना इतरांचा पाठिंबा हा ब-याचदा नुसता नावाला असून मुळात त्यांच्यामुळे विकतची दुखणी अंगावर घ्यावी लागतात ज्याने आपण जास्त अशक्त होतो.

फार गहन लिखाण आहे बुवा, मी तर शिंची रेल्वेत मी बसलेली सीट कधी कोणाला दिली नाय!! ;)