त्रास

शिरीष फडके's picture
शिरीष फडके in जनातलं, मनातलं
18 Nov 2014 - 8:56 am

कलमनामा – १२/१०/२०१४ – लेख ७ - त्रास
त्रास
२५ माळ्यांची इमारत. आठवड्यासाठी या इमारतीमधील लिफ्ट बंद. कारण नवीन लिफ्ट बसवण्याचा निर्णय सोसायटीने घेतलेला आहे. बरं, पर्यायी लिफ्ट किंवा पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे सगळ्या फ्लॅटधारकांची, आठवड्यापुरती का होईना गैरसोय होणार आहे.

आपण आता २५व्या माळ्यावर राहणार्या चार घरांमधील एक-एक प्रतिनिधिची या आठवड्यातील (म्हणजेच ज्या आठवड्यात लिफ्ट बंद होती किंवा नवीन लिफ्ट बसवण्याचं काम सुरू होतं) प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. प्रत्येक व्यक्ती रोज अनेकदा अनेक कारणांसाठी पायर्यांवरील प्रवास करत होती. पण त्या प्रवासात फरक हा होता की पहिली व्यक्ती विशेष करून पायर्या चढताना एकावेळी एकच पायरी चढायची. म्हणजे थोडक्यात प्रवास निवांत असायचा. दुसरी व्यक्ती एकाचवेळी दोन पायर्या, तिसरी व्यक्ती तीन पायर्या आणि चौथी व्यक्ती एकावेळी एका दमात चार पायर्या चढायची. चौथ्या व्यक्तिला दरवेळी घरी जाण्याची का आणि कसली घाई होती कुणास ठाऊक? पण एकाच वेळी चार-चार पायर्या चढत गेल्याने त्या व्यक्तिची खूप दमछाक व्हायची.

मुख्यत्वे करून आपण पहिल्या आणि चौथ्या व्यक्तिची प्रतिक्रिया विचारात घेऊया. कारण दुसर्या आणि तिसर्या व्यक्तिच्या प्रतिक्रिया या पहिल्या वा चौथ्या व्यक्तिच्या प्रतिक्रियेच्या जवळपास जाणार्या आहेत. त्या पूर्ण आठवड्याबद्दल चौथ्या व्यक्तिला विचारलं तेव्हा ती व्यक्ती म्हणाली अहो, काय सांगू तुम्हाला, आम्हालाच माहितीये आम्ही गेले सात दिवस कसे काढले ते. या गेल्या आठवड्यात काय आणि किती त्रास झालाय हे न विचारलेलंच बरं. खूप त्रास सहन केलाय/भोगलंय या गेल्या आठवड्यात इत्यादी… अशी विचारसरणी किंवा असं बोलणारे अनेकजण आपल्याला भेटतात. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर खरं सांगू मला खूप गंमत वाटते अशा लोकांची. अर्थात मी कधी तसं व्यक्त करत नाही. कारण एखाद्वेळी त्यांना वाटेल की मी त्यांच्या So-Called त्रासावर किंवा एकंदरीत वाईट अनुभवांवर हसतोय. वरचंच उदाहरण, म्हणजे चौथ्या व्यक्तिच्या प्रतिक्रियेबद्दल बोलायचं तर पहिला मुद्दा हा की चार-चार पायर्या घाईघाईत चढण्याचा निर्णय हा त्या चौथ्या व्यक्तिचा सर्वस्वी स्वतःचा होता. दुसरा मुद्दा त्या व्यक्तिवर कुणीही तसं करण्यास जबरदस्ती केली नव्हती. तिसरा आणि शेवटचा मुद्दा असा की त्या व्यक्तिला असं केल्याने एखाद्वेळी दमछाक होईल किंवा त्रास होईल हेदेखील माहीत होतं. म्हणजेच निर्णय घेताना पुढच्या परिणामांची पूर्ण जाणीव त्या व्यक्तिला होती. तरीदेखील ती व्यक्ती स्वतःच्या त्रासाचा उदो-उदो करत होती. बरं, अशा व्यक्तिंची गंमत का वाटते मला? आता ही व्यक्ती एक तर २५ माळ्यांच्या किंवा मजल्यांच्या इमारतीत राहत आहे. अशी इमारत (Building / Tower) ही शहरात असते. बरं, कमीत कमी २ ते ३ खोल्यांचं तरी घर असणार या व्यक्तिचं. म्हणजेच दोन वेळच्या जेवणाचीदेखील सोय होत असणार. तरीदेखील अशा व्यक्ती स्वतःच्या त्रासाचं एवढं भांडवल जेव्हा करतात तेव्हा खरंच हसू येतं. जगात आजही दोन वेळचं जेवण न मिळणार्या व्यक्ती असंख्य आहेत. जगात आजही ज्यांच्या डोक्यावर छत नाही अशा असंख्य व्यक्ती आहेत. जगात आजही असंख्य व्यक्ती आहेत

ज्यांना अंग झाकायला कापड नाही आणि अशा मोठमोठ्या इमारतीत राहणार्या व्यक्तिंना या सगळ्याचं भान नसणं ही खरी तर लाजिरवाणी गोष्ट आहे. पण आपल्याकडे या व्यक्तिंवर हसण्यापलीकडे काही पर्याय आहे का? म्हणून गमतीत या गोष्टींकडे बघावं लागतं. बरं, अशा व्यक्ती असा विचार का करतात? याचं उत्तर आपल्याला त्या पहिल्या व्यक्तिकडून मिळेल जी व्यक्ती एक-एक पायरी एकावेळी चढायची. (आपण या पायर्यांकडे वर जाणार्या, उत्कर्षाकडे जाणार्या किंवा प्रगतीच्या वाटेवर जाणार्या किंवा यशाकडे वाटचाल करणार्या पायर्या म्हणूनदेखील बघू शकतो.)

पहिल्या व्यक्तिने आधी हे Accept केलं की आपल्या इमारतीतील आपली लिफ्ट, जिचा आपण अनेक वर्षं उपयोग करत आहोत, काही काळापुरती दुरुस्तीच्या कारणास्तव बंद आहे. त्यामुळे यापुढे आपल्याला केवळ आठवडाभर जीना चढावा किंवा उतरावा लागणार आहे. थोडंफार का होईना पण त्रास होणार आहे. पण तो तात्पुरताच होणार आहे आणि आपण ठरवलं तर तो होणारा त्रासही आपण कमी करू शकतो. ती व्यक्ती निवांत पायर्या चढायची आणि उतरायची, त्या व्यक्तिने वेळेचं नियोजन केल्यामुळे हे शक्य झालं. त्या प्रवासात कुणी भेटलं तर त्यांची चौकशीदेखील नेहमीप्रमाणे त्या व्यक्तिकडून केली जायची. त्यामुळे मध्ये थोडासा ब्रेकदेखील मिळायचा. एखाद्या मजल्यावर एखादी वृद्ध व्यक्ती आहे किंवा एखादी व्यक्ती जी आजारी आहे किंवा एखादी स्त्री जी गरोदर आहे अशा व्यक्तिंना बाजारातून किंवा अन्य ठिकाणाहून काही वस्तुंची गरज असेल तर ती व्यक्ती प्रत्येकाला त्यांच्या-त्यांच्या गरजेनुसार मदत करायची. अशा व्यक्तिंनी चहा प्यायला बोलावलं तर चहाच्या निमित्ताने घटकाभर विश्रांतीदेखील मिळायची आणि कुणासाठी काही केल्याचं समाधानदेखील मिळायचं. या पायर्या चढण्यात कुठेही घाई नव्हती किंवा कुठेही आळशीपणादेखील नव्हता. परंतु तरीदेखील निवांतपणे आठवडाभर या पायर्यांचा प्रवास सुरू होता. मुळात नवीन बसवल्या जाणार्या अत्याधुनिक लिफ्टविषयी थोडीफार जाण असल्यामुळे आताचा आठवड्याभराचा किंचितसा त्रास लक्षातदेखील येणार नव्हता. हा पूर्ण आठवडा, सगळे परिणाम माहीत असल्यामुळे, त्या पहिल्या व्यक्तिसाठी अतिशय सुखावह होता. कारण कुणासाठी काही करण्याची विचारसरणी असल्यामुळे त्या व्यक्तिला त्रासाची दखल घेण्याइतपत जाणीवदेखील झाली नव्हती.

मूळ मुद्दा असा आहे की जर चौथ्या व्यक्तिप्रमाणे केवळ स्वतःचा विचार केला तर कितीही चांगलं घडलं तरी त्रासाचाच हिशेब ठेवला जातो. जेव्हा कुणासाठी काहीही न केल्याने किंवा कुणासाठी स्वतःच्या सोईनुसार काही केल्याने जेव्हा समाधान मिळत नाही तेव्हा प्रत्येक व्यक्ती आपला स्वतःचा त्रास वाढवते किंवा आपलं दुःख मोठं करते आणि असा काही भास निर्माण करते की, मी जीवनात खूप काही केलं आहे किंवा खूप काही भोगलं आहे किंवा खूप काही सहन केलं आहे. जेणेकरून काहीतरी केल्याचं समाधान (जे फसवं आहे) मिळवता येईल.

समजा एखादा भिकारी एका नाण्यासाठी हात पसरत असेल, गयावया करत असेल, तर एखाद्वेळी एखाद्याला त्याची दया येईल. पण जर तोच भिकारी तेच सगळं जर एका मर्सिडीज् बेन्झमध्ये बसून करत असेल तर बघणार्याला गंमत वाटेल ना…? तशीच मला गंमत वाटते अशा लोकांची. एका हातात महागडं घड्याळ असतं, दुसर्या हातात महागडा मोबाइल असतो, डोक्यावर ३-४ खोल्यांचं छप्पर असतं, अंगात उंची वस्त्रं असतात, पोट यथेच्छ भरलेलं असतं आणि तरीदेखील अशा व्यक्ती म्हणत असतात अहो, काय सांगू तुम्हाला, आम्ही कसे दिवस काढतोय हे आमचं आम्हाला माहीत, इत्यादी… खरंच गमतीपलीकडे असतात अशी वाक्यं. बरं, असे हे सगळे त्रास किंवा अशी परिस्थिती ही मानवनिर्मित म्हणजेच कृत्रिम असते, नैसर्गिक नसते.

जगात अडचणी कुणाच्या आयुष्यात नसतात? अगदी गर्भश्रीमंतांपासून ते दारिद्र्यरेषेखाली असलेल्या गरिबांपर्यंत सगळ्यांच्याच आयुष्यात अनेक अडचणी असतात. परंतु त्याचं किती आणि का भांडवल करायचं हे ज्याने-त्याने ठरवायचं असतं. स्वार्थ बाजूला ठेवून जर आपण जे काही करू ते जर कुणासाठी केलं तर कुठलीही परिस्थिती ही आपोआपच/नैसर्गिकरित्या समाधान देणारी म्हणजेच सुखावह असते. त्याचवेळी प्रत्येक कठीण परिस्थितीला किंवा कुठल्याही त्रासाला सामोरं जाण्यास आपण हसतमुखाने तयार होतो आणि त्या परिस्थितीतून मार्गदेखील काढतो. आपल्या आयुष्यात काय आणि किती आपण भोगलंय, त्रास सहन केलाय, दुःख भोगलंय या सगळ्याचा हिशेब ठेवण्यापेक्षा आपण इतरांचं आयुष्य सुखावह होण्यासाठी काय करायला हवं याची यादी करून त्याचा वरचेवर आढावा घ्यायला हवा. हे असं करणं जरुरी असतं. कारण स्वतःसाठी काही केलं तर आनंद मिळतो. परंतु समाधान मिळत नाही. समाधान हे नेहमी इतरांसाठी निःस्वार्थीपणे काही केलं तरच मिळतं.

स्वतःचा त्रास वाढवण्यापेक्षा किंवा स्वतःचं दुःख मोठं करण्यापेक्षा सगळ्यांच्या आयुष्यातील आनंद वाढवण्याकडे लक्ष दिलं तर समाधान देणारी भीतीमुक्त निद्रा अवश्य मिळते.

शिरीष फडके

जीवनमानलेख

प्रतिक्रिया

स्वीत स्वाति's picture

18 Nov 2014 - 9:08 am | स्वीत स्वाति

तुम्ही परीक्षण चांगल्या प्रकारे मांडले आहे . समस्यांकडे दुसर्या नजरेतून पाहण्याचा पैलू चांगला …

शिरीष फडके's picture

18 Nov 2014 - 11:27 am | शिरीष फडके

धन्यवाद

मदनबाण's picture

18 Nov 2014 - 9:16 am | मदनबाण

ह्म्म... लिफ्ट { उद्वाहन } बंद पडली की सगळ्यात जास्त त्रास वॄद्ध लोकांना होतो, गुढघेदुखी किंवा तत्सम आजाराने ही मंडळी आधीच त्रस्त असतात ! त्यामुळे त्यांना या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास होतो. बाकीच्या मंडळींचे म्हणायचे झाले तर साधारण ३ माळे चढले की ह्यांची फेफे उडते, कारण इतके कष्ट पायांना घ्यायची सवय नसते !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेरा ध्यान किधर है ? तेरा हिरो इधर है... ;) { Main Tera Hero }

शिरीष फडके's picture

18 Nov 2014 - 11:27 am | शिरीष फडके

धन्यवाद

खटपट्या's picture

18 Nov 2014 - 9:30 am | खटपट्या

तुमचा लिहीण्याचा झपाटा जबरदस्त आहे. फटाफट लेख येतायत.
येवुद्या.
विश्लेषण आवडले..

शिरीष फडके's picture

18 Nov 2014 - 11:27 am | शिरीष फडके

धन्यवाद

आनन्दा's picture

18 Nov 2014 - 8:03 pm | आनन्दा

आज काही पटले नाही.. ४ पायर्‍या एका वेळेस चढणार्‍या माणसाला काही महत्वाची कामे असू शकतात.. आणि तो जर समान स्तरावरच्या माणसाला आपले रडगाणे सांगत असेल तर ते जस्टिफाईड आहे.
आपण त्याला उगाच क्रिटिसाईझ करतोय असे वाटते.

बाकी ४ पेक्षा एका वेळी एक पायरी चढणे केव्हाही चांगले. मी जेव्हा पुण्यावरून बंगलोरला गेलो तेव्हा अजिबात ओव्हरस्पीडिंग केले नाही, कारण अश्या गोष्टींमध्ये मानसिक ताण खूप येतो, ज्यामुळे इतरवेळेपेक्षा जास्त एनर्जी खर्च होते असा माझा अनुभव आहे.

शिरीष फडके's picture

20 Nov 2014 - 12:24 pm | शिरीष फडके

धन्यवाद

तुषार काळभोर's picture

20 Nov 2014 - 10:33 pm | तुषार काळभोर

धन्यवाद..

शिरीष फडके's picture

22 Nov 2014 - 10:11 am | शिरीष फडके

धन्यवाद

तुषार काळभोर's picture

22 Nov 2014 - 9:43 pm | तुषार काळभोर

धन्यवाद

संजय क्षीरसागर's picture

22 Nov 2014 - 10:32 am | संजय क्षीरसागर

समाधान हे नेहमी इतरांसाठी निःस्वार्थीपणे काही केलं तरच मिळतं.

असं काही नाही. मुळात आपण आनंदी असलो तरच दुसर्‍यासाठी काही करु शकतो. म्हणजे आनंदी माणसाला दुसर्‍यासाठी काही करायचा `विकल्प' उपलब्ध असतो.

लेखाचं कन्क्लूजन असंय की इतरांसाठी काही केलं तर (च) समाधान मिळेल. हे एका प्रकारे (समाधानासाठी) परावलंबी असणं आहे.

या मार्गानं गेल्यास पुढे सॉलिड लफडं होत जातं, सगळे तुमच्याकडून मदतीची अपेक्षा करतात आणि कधी तुम्ही चुकारपणा केला की त्याचाच गवगवा (केलेल्या कामापेक्षा) जास्त होतो.

तस्मात, लेख चुकीच्या गृहितकांवर आधारित आहे.

काय बोल्ताय सर हे? समाधान हे इतरांसाठी काहीतरी करण्यातच आहे हे आपण समजून घेतलं पाहिजेत. करा बघू लेखकाला समाधानी, म्हणा की हा लेख म्ह्णजे जीवनाचे खरे खरे सार आहे!

जे आपल्याला पटतंय तेच खरं असं तर काय कुणीही म्ह्णतं! त्याने थोडीच दुसरा समाधानी होतो! जे आपल्याला पटत सुद्धा नाहिये तेही खरं असं म्हणा आणि बघा तो दुसरा किती अफाट समाधानी होतो....

संजय क्षीरसागर's picture

22 Nov 2014 - 12:28 pm | संजय क्षीरसागर

आपल्याला `परोपकारी गोपाळ' असं नांव पडतं (ते मात्र कायमचं!)

सर, आपण ना काही करायचंच नाही. आपण फक्त सतत दुसर्‍याला टोचणी लावत रहायची. 'माझ्यासाठी काहीतरी कर, त्याशिवाय तुला खरे समाधान कधीच मिळणार नाही.' आपण बसून खायला मोकळे! मग कशाला होतोय आपण परोपकारी गंपू?

आपण पोपट नाही का होणार?

सर आपण त्याला हा लेख दाखवू की मग! बघ म्हणावं खरं समाधान कशात असतं ते स्वतःच्या डोळ्यांनी! कसं? मला वाटतं तेवढ्यानी काम होइल नक्कीच!

संजय क्षीरसागर's picture

22 Nov 2014 - 9:36 pm | संजय क्षीरसागर

एक फादर चर्चमधल्या ब्रदर्सना शिकवण देत असतात; `तुम्ही नेहेमी दुसर्‍याला मदत करा, त्यांची सेवा करा, त्यानं सगळे सुखी होतील'
त्यावर एकजण विचारतो `मग आम्ही केंव्हा सुखी होणार?'
फादर उत्तरतात, `ज्यांना तुम्ही सुखी केलंय ते (यथावकाश) तुम्हाला सुखी करतीलच. सेवा आणि सबुरी हे आपलं तत्त्व आहे'
त्यावर ब्रदर म्हणतो, `इतका रिबाऊंड मारण्यापेक्षा, प्रत्येकानं आपापल्या जवाबदारीवर सुखी होणं सोपंय की फादर!