शिक्षण

शिरीष फडके's picture
शिरीष फडके in जनातलं, मनातलं
17 Nov 2014 - 9:20 am

शिक्षण
लहानपणी त्यांचा मुलगा काही केल्या शाळेत जायला तयार होईना. तो सतत नकार द्यायचा. अनेक प्रकारे वडिलांनी त्याला समजावलं पण तो काही केल्या ऐकेनाच. त्या मुलाचं म्हणणं होतं शाळेत अनेक तासांत जो माझा अभ्यास होतो तो मी घरी राहून काही वेळेतच करू शकतो. मग मी शाळेत का जाऊ? वडिलांनी मुलाला बरंच समजावलं. एक वेळ ओरडलेदेखील पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मग वडिलांनी बराच विचार केला आणि त्यांनी एक प्रयोग करायचं ठरवलं. एक प्रकारची जणू काही मुलाला त्याचं म्हणणं पटवून देण्याची संधी ते त्याला देत होते. त्यांनी मुलाला सांगितलं तू काही दिवस घरी बसून अभ्यास कर. मी शाळेतल्या मुख्याध्यापकांशी बोलून तुला केवळ परीक्षेला बसता येईल याची सोय करतो. वडील मुख्याध्यापकांशी सविस्तर बोलले आणि किमान एक परीक्षा त्याला अशाप्रकारे देण्याची विनंती केली. वडील स्वतः उच्चशिक्षित असल्यामुळे आणि गावातील मोठं प्रस्थ असल्यामुळे कदाचित मास्तरांनी त्यांची विनंती मान्य केली. मात्र हे झाल्यावर वडिलांनी आपल्या मुलाला एक अट घातली की शाळा सुटल्यावर शाळेतल्या मुलांबरोबर खेळण्याच्या वेळा मात्र पाळायच्या. मित्रांबरोबर गाव भटकावंसं वाटत असेल तर भटकायचं. आता मुलगा खेळण्यासाठी का बरं नाही म्हणेल? तो होच म्हणाला. मुळात अनेक विचारसरणी असलेल्या मुलामुलींबरोबर राहिल्याने अनेक अनुभव पदरी पडतात हे वडील जाणून होते. मुलगा शाळेत न जाता घरी बसूनच अभ्यास करू लागला. अगदीच काही अभ्यासात अडचण आली तर वडिलांच्या मदतीने ती अडचण दूर करू लागला. परीक्षा झाली. पठ्ठ्या त्यावर्षी आपल्या वर्गातच नव्हे, तुकडीतच नव्हे, शाळेतच नव्हे तर अख्ख्या तालुक्यात, जिल्ह्यात पहिला आला आणि हे असं एकदाच नव्हे तर पुढील सगळ्यावर्षी तो पहिला आला. पुढे तर तो मुलगा परदेशात जाऊन शिकून डॉक्टर झाला आणि गावात परतून गावाची सेवा करू लागला.

वडिलांप्रमाणेच, उच्चशिक्षित असूनही, गाव प्रगल्भ करणं हाच हेतू त्या मुलाचादेखील होता आणि तो हेतू साध्य करण्याचा तो प्रयत्न करू लागला.

वरील घटना लक्षात घेता कुणा अतिसाधारण विचारसरणी असलेल्या माणसांच्या आयुष्यात असं घडलं तर त्यांना एखाद्वेळी आनंदच होईल. आपला मुलगा शाळेत न जाता पहिल्या नंबराने पास होत आहे आणि दप्तर, जेवणाचा डबा, Water Bag/Bottle यांसारख्या अनेक गोष्टींचा खर्च वाचतो आहे मग का आनंद होणार नाही? पण आपण आता वरील घटनांचा सारासार किंवा व्यापक पातळीवर विचार करूया. खरं तर जे घडलं ते खूप चिंताजनक आहे. ही चिंता आताच्या शिक्षणपद्धतीबद्दलची आहे हे आपल्याला कळून चुकेल. वरील घटनांमधून बरेच प्रश्न उद्भवतात. शाळेची गरजच उरली नाही तर काय होईल? आता शाळेत नक्की कोणतं शिक्षण दिलं जात आहे? शाळा आणि शिकवणी (Tuition Classes) यांमधील शिक्षणाची पद्धत आणि त्यातील दरी वाढत चालली आहे का? शाळा हा एक केवळ दिखावा झाला आहे का? नक्की शाळेत जे दिलं जातं त्याला शिक्षण म्हणता येईल का? शाळेत होणारे बदल नेमके कुठल्या दिशेने जात आहेत? मुळात मुलांनी शाळेत नेमकं का जायचं हे पालकांपर्यंत, शिक्षकांपर्यंत आणि एकंदरीतच शिक्षण पद्धतीतील सगळ्या घटकांपर्यंत पोहोचलं आहे का? अशा अनेक प्रश्नांची आणि त्यांच्या उत्तरांची आता आपण चिकित्सा करण्याचा प्रयत्न करूया.

आपण मर्यादित स्वरूपातच बघूया म्हणजेच प्राथमिक पातळीवरचा विचार करूया. त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. असं उदाहरण ज्यामध्ये शिक्षण म्हणजे काय? या प्रश्नाचं सोप्या पद्धतीने मांडलेलं उत्तर आहे. हे उदाहरण भारतरत्न विनोबा भावे यांनी एके ठिकाणी मांडलं होतं किंवा नमूद केलं होतं आणि आपण त्याचाच आधार घेणार आहोत. अगदी प्राथमिक अवस्थेशी निगडित असं हे उदाहरण आहे. कारण जर सुरुवात योग्य झाली तर पुढे सगळंच योग्य होईल.

लहान मुलांसाठी वेगवेगळ्या चित्रांची पुस्तकं असतात. आजकाल चित्रांऐवजी फोटो असलेली पुस्तकंदेखील मिळतात. त्यातलाच एक फोटो किंवा चित्र आपण घेऊया. समजा पुस्तकातील चित्र आहे घोड्याचं. आईवडील, नातेवाईक, ओळखीचे लोक, Nursery, Playgroup, Preschool किंवा Day Care Centers मधील शिक्षक मुलाला किंवा मुलीला काय विचारतात बाळा या समोरील चित्रातील प्राणी कोणता? जर मुलांना माहीत असेल किंवा लक्षात राहिलं असेल तर ते उत्तरं देतात किंवा पहिलीच वेळ असेल तर त्यांना उत्तर सांगितलं जातं की याला घोडा म्हणतात. यानंतर अनेकदा याची उजळणी होते. मुलांच्या पक्कं डोक्यात बसतं आणि घोडा हा प्राणी सगळ्या चित्रांमध्ये नेमका कोणता ते मुलं ओळखू लागतात. असाच काहीसा इतर प्राण्यांविषयी किंवा वस्तुंविषयीचा प्रवास असतो.

आता आपण असं समजूया की, चित्रामध्ये असलेला घोडा हा तबेल्यात उभा आहे. म्हणजेच तबेल्यात उभ्या असलेल्या घोड्याचं चित्र किंवा घोड्याचा फोटो आहे. त्या चित्रात जर त्या घोड्यासमोर त्याचं खाद्य आणि पेयं असेल (गवत/चारा/पाणी वगैरे) किंवा त्याच्या पाठीवर खोगीर असेल किंवा त्याला बांधलेला लगाम असेल किंवा घोड्याची काळजी घेणारा आणि स्वारी करणारा घोडेस्वार त्याच्या बाजूला उभा असेल किंवा अशा काही मोजक्या गोष्टी ज्या घोड्याशी संलग्न असतील ज्या त्या चित्रात किंवा फोटोमध्ये जर दाखवल्या असतील तर काय होईल? असं चित्र असलं तर मुलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. त्यांच्या मनात प्रश्नांची साखळी निर्माण होईल. एखाद्वेळी प्रत्येक मुलगा किंवा मुलीच्याबाबतीत हे घडेलच असं नव्हे. परंतु बहुतेक किंवा बहुतांशी मुलांच्या मनात नक्कीच प्रश्न निर्माण होतील. जेव्हा मुलांना वर सांगितल्याप्रमाणे घोड्याच्याबाबतीत आणि त्याच्याशी निगडित गोष्टींची माहिती मिळेल तेव्हा त्याचे परिणाम पुढील चित्रांमध्येसुद्धा दिसतील. म्हणजे नेमकं काय? समजा पुढील चित्र हत्तीचं असेल तर मूल एखाद्वेळ विचारेल हत्ती काय खातो? हत्तीला कोण सांभाळतं? त्याची काळजी कोण घेतं? असे अनेक प्रश्न ते मूल विचारू लागेल.

थोडक्यात सांगायचं तर शोध घेण्याची प्रवृत्ती त्याच्यात निर्माण होईल. आणि पुढे जाऊन त्याचं रूपांतर चिकित्सा या संज्ञेत होईल. मुलांना प्राणी दाखवण्यासाठी जर जंगलात नेलं तर काहीशा प्रमाणात वर म्हटल्याप्रमाणे प्रचिती येईल. मग ते जंगल नैसर्गिक असो किंवा कृत्रिम असो. कृत्रिम जंगल म्हणजे एकप्रकारे मूळ जंगलाची छोटीशी प्रतिकृती जिथे प्राण्यांना माणसांची थोडीफार सवय झालेली असते. मुळात हा मुद्दा केवळ प्राण्यांपर्यंत सीमित नसून तो अन्य कुठल्याही विषयाशी निगडित असू शकतो.

आधी सर्वप्रथम प्रत्येक पालकाने किंवा शिक्षकाने हे प्रश्न स्वतःला विचारावे की सगळ्या प्राण्यांची, पदार्थांची, वस्तुंची किंवा अन्य कुठल्याही बाबींची ओळख करून देणारी अनेक किंवा सगळी पुस्तकं मुळात असतातच का? केवळ वाचता येणं, ओळख होणं एवढ्यासाठी पुस्तकं असतात का? जर एखादं निरक्षर/अशिक्षित मूल असेल तर त्याला कधीच कुठलाच प्राणी, पक्षी, पदार्थ ओळखता येणार नाही का? ज्यांना लिहिता, वाचता येत नाही त्यांच्याकडे ज्ञानाचा साठा असत नाही का? मग पुस्तकांवर खर्च का करायचा? शाळेचा खर्च कशासाठी? या पठडीतले अनेक प्रश्न आधी पालकांनी स्वतःला आपापल्या कुवतीनुसार विचारावे.

आता आपण वरील उदाहरणातील चित्रांच्या पुस्तकाकडे पुन्हा वळूया. आजकाल मिळणारी चित्रांची पुस्तकं जशी असतात ती तशी का बरं असतात? याचं साधं उत्तर आहे ते म्हणजे शिक्षणाचं झालेलं व्यवहारीकरण किंवा व्यावसायिकीकरण. चित्रात जर तबेल्यात उभा असलेला घोडा दाखवला तर पुस्तकाची दृश्य स्वरूपातील पात्रता (Quality) कमी होते आणि त्यामुळे त्या पुस्तकाची किंमतदेखील कमी होते. पुढे जाऊन म्हणायचं तर जास्त किंमत असलेलं पुस्तक जर पालकांनी खरेदी केलं नाही तर त्यांना मुलांसाठी काही केल्याचं समाधान मिळत नाही. यामागे मानसिकता अशी आहे की जर काही पालक मुलांसाठी वेळ खर्च करू शकत नसतील तर त्यांना गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च करून त्यात समाधान मिळवावं लागतं. त्यामुळे चित्र किंवा फोटो यांचा दर्जा हा शक्यतो दिसण्यावर अवलंबून असतो. मग यावर उपाय काय? उपाय सोपा आहे. जरी चित्रात अनेक गोष्टी दाखवल्या नसल्या तरी त्या गोष्टी आईवडील, आजी-आजोबा, शिक्षक वगैरे अशा सगळ्या मोठ्या व्यक्तिंना माहीत असतातच ना? किंवा मोठ्या व्यक्तिंनादेखील जरी माहीत नसलं तरी ते माहिती काढू किंवा मिळवू शकतात ना? चित्र जरी केवळ पांढर्या शुभ्र धावत्या घोड्याचं असलं आणि जरी ते मुलांनी ओळखलं तरी त्यात काय नाही किंवा काय हवं होतं ते आपण मुलांना विचारू शकतो ना? म्हणजेच,

बाळा हा प्राणी कोणता?

उत्तर, घोडा

शाब्बास, आता मला सांग घोडा काय खातो? किंवा घोडा काय पितो? वगैरे.

काही महाभाग म्हणजे प्रकाशक असेही आहेत जे घोड्याचं किंवा अन्य प्राण्यांचे चित्र किंवा फोटो हे समोरून काढलेले पुस्तकात दाखवतात. काय म्हणणार अशा लोकांना? पण मग अशावेळी मुलांना विचारावं बाळा सांग घोड्याला पाय किती असतात? घोड्याला शेपूट असतं का? वगैरे.

असं केल्याने मुलं स्वतःहून शोध घेऊ लागतात. हा शोध सुरुवातीला उपलब्ध असलेल्या ज्ञानाशी (Knowledge) निगडित असतो जो पुढे जाऊन नवीन शोध घेण्याकडे म्हणजेच उपलब्ध ज्ञानात भर टाकण्याकडे वाटचाल करू लागतो. समोरील प्राण्याला किंवा वस्तुला किंवा अन्य कोणत्याही गोष्टीला काय म्हणतात किंवा जे काही म्हणतात ते ओळखणं यास ज्ञान (Knowledge) संपादन करणं म्हणतात. परंतु ज्ञान (Knowledge) मिळवणं हा शिक्षणाचा केवळ एक भाग आहे. शिक्षणाचा खरा हेतू आहे तो म्हणजे शोध घेणं आणि घेतलेल्या किंवा लागलेल्या शोधाची चिकित्सा करण्याची प्रवृत्ती निर्माण करणं. आजकाल जे शिक्षण आहे ते पूर्णपणे व्यावहारिक किंवा व्यावसायिक शिक्षण आहे. ज्याचा पूर्ण भर हा निव्वळ ज्ञान (Knowledge), निव्वळ यश, निव्वळ पदवी, निव्वळ हुशारी, निव्वळ मोठेपणा मिळवण्यावर आहे.

अर्थात, शिक्षण हा विषय एवढाच मर्यादित नाही तर पुढे जाऊन खूप व्यापक आणि तितकाच गंभीरदेखील आहे. शिक्षणातील यश-अपयशाशी संबंधित असलेला ताणतणाव, मुलांमध्ये वाढत जाणार्या ताणतणावांमुळे होणार्या आत्महत्या, शिक्षणसंस्थेकडून मागितली जाणारी भरमसाठ फी/शुल्क वगैरे. एकंदरीत शिक्षणाचं झालेलं बाजारीकरण आणि त्या बाजारीकरणाला मिळालेलं अवास्तव महत्त्व याला आपण बळी तर पडत नाही ना याचा विचार प्रत्येक पालकाने करणं गरजेचं आहे.

आपण आता केवळ प्राथमिक पातळीवरती शिक्षणाची चिकित्सा केली आहे. या पुढील शिक्षण या विषयाशी संबंधित चिकित्सा प्रत्येक पालकाने आपापल्या पातळीवर समाजातील सर्व स्तरातील मुलांसाठी जरूर करावी ही विनंती.

शिरीष फडकेकलमनामा – ०५/१०/२०१४ – लेख ६ – शिक्षण

शिक्षणलेख

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

17 Nov 2014 - 9:41 am | खटपट्या

विचार चांगला आहे. पण सर्वांनाच असे पालक मिळाले पाहीजेत. अशिक्षित पालकांचे काय ? त्या मुलाने घरी अभ्यास केला म्हणून ठिक आहे. नसता केला तर मोठी पंचाईत होती.

शिरीष फडके's picture

17 Nov 2014 - 8:01 pm | शिरीष फडके

धन्यवाद