पाठलाग..

बोबो's picture
बोबो in जनातलं, मनातलं
12 Nov 2014 - 10:22 am

पाठलाग..
*****************************************************
बराच वेळ आम्हा दोघांपैकी कुणीही एकसुद्धा शब्द बोललं नाही. दोघेही शांत,चिडीचूप. पण मग मलाच राहवेना. विचारू की नको असा विचार मी करत होतो. कारण निर्णय मनाविरुद्ध गेला तर मी ते कसं पचवणार याची भीती वाटत होती. या आधीचा माझा एक अनुभव अतिशय वाईट होता. त्या अनुभवानंतर आलेल्या डिप्रेशनमधून मोठ्या मुश्किलीने मी स्वतःला सावरलं होतं. आणि आता पुन्हा एकदा विषाची परीक्षा घ्यायची वेळ आली होती. मनाशी देवाचा धावा केला. म्हटलं,"देवा महाराजा, या वेळेस सुद्धा जर निर्णय माझ्या मनासारखा लागला नाही तर ते सहन करण्याची शक्ती मला दे.
आणि एकदाचा मनाचा हिय्या करून मी विचारले,"तर मग कशी वाटली तुला माझी मुव्ही?" आणि दुसऱ्याच क्षणी मी स्वत:ची जीभ चावली. हा प्रश्न विचारून आपण घोडचूक (की गाढवचूक?) केली हे मला जाणवले, पण आता काही उपयोग नव्हता. बाण धनुष्यातून सुटला होता. गिरीशने प्रश्न व्यवस्थित ऐकला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर त्याचं ट्रेड मार्क कुत्सित हास्य परतलं. तो याच प्रश्नाची वाटच पहात होता. मी हा प्रश्न त्याला विचारल्याशिवाय राहू शकत नाही याची त्याला पुरेपूर खात्री होती. आणि मी त्याचा विश्वास नुकताच सार्थ ठरवला होता.
"बकवास. अतिशय भिक्कार.तुझा आधीचा पिक्चर परवडला असं म्हणायची तू वेळ आणलीस." माझा चेहरा अर्थातच पडला होता. गेल्या काही महिन्यांच्या माझ्या मेहनतीवर गिरीशने एका वाक्यात बोळा फिरवला.
"पण… पण तुला त्यात नेमकं काय आवडलं नाही?",मी अजूनही धीर सोडला नव्हता.
"काहीच नाही",गिरीश निर्विकारपणे बोलला. "नाही म्हणायला एक गोष्ट मात्र आवडली",तो पुढे बोलला.
"क… कोणती?",माझ्यामध्ये थोडीफार धुगधुगी मला जाणवली.
"चित्रपटाच्या शेवटी दाखवलेली 'दी एंड' ची पाटी. ती पाटी मला जाम आवडली",गिरीशने शेवटचा घाव घातला.
गिरीशचं हेच वैशिष्ट्य होतं. त्याची जीभ हे त्याचं अमोघ शस्त्र होतं. आणि चित्रपट ही त्याची आवड आणि भक्ष्य दोन्ही होतं.त्याला चित्रपट पाहायला आणि फाडायला भरपूर आवडत असे. एकत्र चित्रपट पहातच गिरीश आणि मी मोठे झालो होतो. म्हणजे चित्रपट पाहीले नसते तरी आम्ही मोठे झालोच असतो म्हणा.
मी बरीच शर्थ करून कसातरी चित्रपट सृष्टीत घुसलो. पडेल ती कामे करत एके दिवशी डायरेक्टरसुद्धा बनलो. माझा आदर्श होते प्रसिद्ध डायरेक्टर श्री मृदुल भांडारकर. त्यांच्या वास्तववादी चित्रपटांनी माझ्या मनावर परिणाम केला होता. त्यांच्या ‘बंदिनी बार’,’रेल्वे सिग्नल’,’पॅशन’,’प्लॅटफॉर्म’ या चित्रपटांची मी पारायणं केली होती. गिरीशलासुद्धा माझ्याइतकंच चित्रपटांचे प्रचंड वेड होतं. पण सेफ गेम म्हणून त्याने नोकरीचा धोपट मार्ग स्वीकारला. कुठल्यातरी कंस्ट्रक्शन कंपनीमध्ये चिकटला. वेगवेगळ्या कंस्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट्ससाठी आपल्या कंपनीसाठी टेंडर्स बनवू लागला. आयुष्यभर त्याने चित्रपटातला सस्पेन्स, थ्रील अनुभवलं होतं. आता तो टेंडर्स, बीड्स च्या निकालातलं सस्पेन्स, थ्रील अनुभवू लागला. चित्रपटातल्या सस्पेन्स, थ्रील पुढे कामा मधलं थ्रील, सस्पेन्स त्याला साहजिकच मिळमिळीत वाटे. पण आता त्याचा नाईलाज होता. हा मार्ग त्यानेच निवडला होता. पण याची भरपाई तो सुट्टीच्या दिवशी चित्रपट पाहून करत असे. आणि त्या चित्रपटांची यथेच्छ खिल्ली तो माझ्यासमोर उडवत असे. चित्रपटातला कुठला प्रसंग ,कुठले गाणे, कुठला डायलॉग कुठून उचलले आहे हे तो बरोब्बर सांगत असे. त्याची चिरफाड ऐकली असती तर बॉलीवूडमधल्या निम्म्याहून अधिक डायरेक्टर्सची दुसरा चित्रपट काढायची छाती झाली नसती.
तर हाच गिरीश आज माझ्यासमोर माझ्या चित्रपटाची यथेच्छ खिल्ली उडवत होता. विषय बदलायचा म्हणून मी सहज विचारलं, "काय,बाकी जॉब कसा चाललाय?"
गिरीशचा चेहरा पडला,"जाऊ दे ना यार. तू पण कसला विषय काढतोस."
"का रे काय झालं? काही प्रॉब्लेम?",मी न राहवून विचारलं.
"तुला ती सापार्जुन कंस्ट्रक्शन कंपनी माहित आहे?",गिरीशने विचारलं.
सापार्जुन कंस्ट्रक्शन कंपनी गिरीशच्या गबन इंडियाची कट्टर प्रतिस्पर्धी होती. दोन्ही कंपन्यांमध्ये प्रोजेक्ट्स मिळवण्यासाठी कायम चढाओढ चालत असे.
"काय झालं तरी काय?",मी पुन्हा विचारलं.
गिरीश निरुत्साहाने सांगू लागला. गेली काही महिने काही तरी विचित्र घडत होतं. जिथे जिथे गबन इंडिया टेंडर भरत होती, तिथे तिथे सापार्जुन सुद्धा टेंडर भरत होती आणि कसे कोणास ठाऊक, पण सापार्जुन दर वेळेला गबन इंडिया पेक्षा कमी "कोट" करत होते. प्रोजेक्ट साहजिकच सापार्जुनला मिळत होते. या प्रकारामुळे गबनची मॅनेजमेंट अस्वस्थ झाली होती. आपल्या कंपनीतलं कुणीतरी सापार्जुनला सामील आहे असा त्यांना संशय आला होता. साहजिकच गिरीशच्या टीमवर संशयाची सुई फिरत होती. या प्रकाराने कंपनीतलं वातावरण काहीसं बिघडलं होतं.
"मला फक्त सापडू दे तो माणूस, जो हे प्रकार करतो आहे. मी त्याला गोळीच घालेन. ", गिरीश चिडून म्हणाला.
"जाऊ दे रे. तू कशाला स्वतःला त्रास करून घेतोस.",मी म्हटलं,"तू कधी कुणाचं वाईट केलं नाहीस, त्यामुळे तुझं चांगलंच होईल."
"तुझ्या तोंडात साखर पडो.",असे म्हणून गिरीशने वेटरने समोर आणून ठेवलेल्या वाटीतली खडीसाखर माझ्या हातात ठेवली. एव्हाना बराच वेळ आम्ही गप्पा मारल्या होत्या. बिलाचे पैसे आणि टीप ठेऊन आम्ही हॉटेल मधून बाहेर पडलो. त्याच वेळी आणखी एक माणूस हॉटेलमधून बाहेर पडला.त्याचा धक्का चुकून गिरीशला लागला. पटकन “सॉरी” म्हणून तो पुढे निघून गेला. का कुणास ठाऊक, गिरीश त्याला पाहून एक क्षण विचारात पडल्यासारखा वाटला.
"तू त्या माणसाला पाहिलंस?", त्याने मला विचारलं.
"का काय झालं?तो सुद्धा आताच हॉटेलमधून बाहेर पडला.पण त्यात काय विशेष?",मला गिरीशच्या प्रश्नाचा रोख कळला नाही.
"तो कुठे बसला होता ते तुला आठवतं?"
मी नकारार्थी मान डोलावली.
"तो आपल्या मागच्याच टेबलवर बसला होता. ",गिरीश म्हणाला.
"बरं मग?", मला अजूनही काही उलगडा होत नव्हता.
"आपली हॉटेलमधली जागा ठरलेली आहे,बरोबर?",गिरीश म्हणाला.
"अगदी बरोबर", मी मान्य केलं.
"आता त्याचा चेहरा बघितल्यावर मला जाणवलं की गेले कमीतकमी तीन-चार दिवस तरी हा माणूस दर वेळेला आपल्या मागच्याच टेबलवर येऊन बसतो "
यावर मी विचारात पडलो.
"पण हा योगायोग सुद्धा असू शकतो.",मी म्हटलं. पण गिरीश आपल्या मतावर ठाम होता.
"नाही. मला तर खात्री वाटते की तो आपल्या मागच्या टेबलावर बसून आपलं बोलणं ऐकत असणार."
"माझ्याकडे या प्रकाराचं एक सोपं स्पष्टीकरण आहे",माझी एव्हाना ट्यूब पटली होती. "काय?",गिरीशने विचारले.
"तो ज्या टेबलावर बसतो त्याच्यावरच पंखा आहे, म्हणून तो तिथे बसत असेल."
माझ्या या तर्कावर गिरीश एक क्षण गप्प झाला, पण लगेचच तो म्हणाला,"पण हॉटेलमध्ये इतरही बऱ्याच टेबल्सवर पंखे आहेत, तो तिथे का नाही बसत. आपल्याच मागे का येऊन बसतो?", गिरीशचा हा युक्तिवाद अगदी बिनतोड होता.
"शिवाय तुला आठवतं, दोन आठवड्यांपूर्वी मी हॉटेलमध्ये माझी टेंडरची फाईल विसरलो होतो. ती घ्यायला मी परतून आलो तर ती गायब होती. तुला ठाऊक आहे त्या टेंडरचं काय झालं?"
"काय झालं?"मी विचारले. "ते टेंडरसुद्धा सापार्जुनला मिळालं",गिरीश चिडून म्हणाला, "आणि योगायोग असा की त्यांच्या टेंडर मधली कोट्स माझ्या टेंडर मधल्या कोट्सच्या खूप जवळची निघाली."

" बरं मग पुढे काय?", मी गिरीशला विचारले.
"मला वाटतं, आपण त्याचा पाठलाग करावा. पाहूया तो काय करतो, कोणाला भेटतो.कदाचित काहीतरी सुगावा लागेल."
मी म्हटलं,"मला हे थोडं फिल्मी वाटतं. पण… पण मी यायला तयार आहे"
एव्हढ्यात त्या माणसाने आपली बाईक चालू केली होती. आम्ही दोघे गिरीशच्या बाईकवर बसलो आणि काही अंतर राखून त्या माणसाचा पाठलाग करायला सुरुवात केली. बऱ्याच गल्ल्या फिरून शेवटी आम्ही अंधेरीच्या एका कॉर्पोरेट पार्कजवळ आलो. त्या माणसाने बाईक गेटच्या आत घेतली. आम्हीसुद्धा आत शिरणार तोच वॉचमनने अडवले.
"आय कार्ड?," त्याने विचारले. आम्ही काही तरी थातूर मातुर कारण द्यायचा प्रयत्न केला, पण तो वॉचमन बधला नाही. त्याने आम्हाला प्रवेश नाकारला. चडफडत आम्ही मागे फिरलो.
"छ्या, एक चांगली संधी गमावली. आता नेमकं कळलं असतं इथे तो कुणाला भेटतो ते.",मी चडफडत म्हटले.
पण गिरीशच्या चेहऱ्यावर मात्र अचानक स्मित आलं,"आता त्याची काही गरज नाही."
"म्हणजे?",मी चक्रावून विचारलं.
गिरीशने त्या बिल्डींगच्या दिशेने बोट केलं. मी त्या दिशेने मान वळवली आणि पाहतो तर काय? दुसऱ्या मजल्यावर कंपनीच्या नावाची एक पाटी होती - ‘सापार्जुन कंस्ट्रक्शन कंपनी’
आम्ही बराच वेळ बिल्डींगच्या बाहेर थांबलो. रात्र व्हायला आली. पण तो माणूस काही बाहेर आला नाही. आम्ही पुन्हा गेटजवळ गेलो, तर वॉचमन बाजूच्या पानाच्या टपरीकडे जाताना दिसला. पण त्याच्या जागेवर दुसरा कुणीतरी, बहुधा त्याचा मित्र बसला होता.
आम्ही जाऊन त्याला विचारले, “आमचा एक मित्र बऱ्याच वेळापूर्वी आत गेला, पण अजून बाहेर आला नाही. जरा त्याला बघून येतो."
त्यावर गोंधळून तो म्हणाला,"पण साहेब, एग्झीट गेट तर पलीकडच्या बाजूला आहे. तुमचा मित्र तिथून केव्हाच बाहेर पडला असेल."
हे ऐकून गिरीश आणि मी दोघांनी कपाळावर हात मारला. आम्ही मुर्खासारखे एन्ट्री गेटला वाट पहात बसलो, पण तो माणूस दुसऱ्या गेटने केव्हाच बाहेर पडला होता. सावज हातातून निसटले होते. आम्ही नशिबाला दोष देत आपापल्या घरी परतलो.
दुसऱ्या दिवशी आम्ही नेहमीच्या वेळेला हॉटेलमध्ये शिरलो. मी नेहमीच्या टेबलाकडे वळलो. पण गिरीशच्या मनात काही वेगळंच होतं.
तो म्हणाला, "आज आपण वेगळ्या टेबलावर बसू."
"कशाला?", मला काही ही कल्पना फारशी आवडली नाही.
"इट्स एलीमेंटरी, डीअर वॉटसन",गिरीश शेरलॉक होम्सच्या थाटात बोलला,"मला बघायचं आहे तुझी कालची पंख्याची थियरी कितपत बरोबर आहे ते. जर तो त्याच्या नेहमीच्या टेबल वर बसला तर तुझी पंख्याची थियरी बरोबर, पण जर तो पुन्हा आपल्या बाजूच्या टेबलवर येऊन बसला तर..."
पण आज बराच वेळ झाला तरी तो माणूस काही आला नाही. आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आम्ही त्याचा पाठलाग केला हे त्याच्या लक्षात तर आलं नसेल ना? आता काही तो येत नाही, असे म्हणून आम्ही उठणार, तेवढ्यात गिरीशचे डोळे चमकले. मी दाराच्या दिशेने पाहीले. तो आला होता. प्रथम तो नेहमीच्या टेबलजवळ गेला. पण आम्ही दुसऱ्या टेबलवर बसलो आहोत हे लक्षात येताच तो चक्क आमच्या दिशेने आला आणि आमच्या बाजूच्या टेबलवर बसला. आता थक्क व्हायची पाळी माझी होती. मी डोळे फाड-फाडून गिरीशकडे पाहू लागलो. इथे गिरीश संतापाने धुमसत होता. त्याचा अंदाज खरा ठरलेला पाहून तो भयानक चिडला होता.
"आताच कॉलरच पकडतो साल्याची. ",असे म्हणून तो उठणार तेवढ्यात आक्रीत घडलं. तो माणूस त्याच्या जागेवरून उठला आणि आमच्या बाजूला येऊन उभा राहिला आणि बोलला,"एक्सक्यूज मी"
आम्ही प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं.
तो माणूस गिरीशला म्हणाला, "मी जरा तुमच्याशी बोलू शकतो का?"
गिरीश आणि मी दोघेही गोंधळून एकमेकांकडे पाहू लागलो. कसाबसा स्वतःला सावरून गिरीश म्हणाला, "जरूर.जरूर. बसा ना."
थोड्या वेळापूर्वी त्या माणसाची कॉलर पकडण्याची वार्ता करणारा गिरीश चक्क त्याला आदराने खुची ऑफर करत होता. त्याच्यातला हा बदल पाहून मी चक्रावलो.
"पहिल्या प्रथम मी तुम्हा दोघांची माफी मागतो.",तो म्हणाला.
"माफी? ती कशाबद्दल?" ,आम्ही दोघांनी एकदम विचारलं.
"त्याचं काय आहे की गेले काही दिवस मी तुमचं बोलणं चोरून ऐकत होतो."तो म्हणाला.
आम्ही दोघांनी एकमेकांकडे अर्थपूर्ण नजरेने पाहिलं. पण हे सारं आता असं कबुल करण्यामागचा त्या माणसाचा हेतू आमच्या अजूनही लक्षात येत नव्हता.
"पण तुम्ही असं चोरून का ऐकत होता?", मी काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं.
"चोरून ऐकलं कारण मला वाटलं की तुम्ही(गिरीश कडे पाहून) माझ्या उपयोगी पडाल असं मला वाटलं.", तो माणूस म्हणाला.
"म्हणजे? मी तुला विकाऊ वाटलो की काय रे भाडखाऊ?", गिरीश असं म्हणत रागाने उठून त्याची कॉलर पकडेल अशी मला भीती वाटली.
म्हणून तो काही करण्यापूर्वीच मी पुन्हा पटकन विचारलं,"नक्की काय म्हणायचय तुम्हाला?"
तो म्हणाला, "मला तुमच्या - विशेषतः यांच्या..." तो गिरीशकडे पहात म्हणाला.
"गिरीश.. गिरीश आहे त्याचं नाव",मी त्याला बहुमुल्य माहिती पुरवली.
"तर मला तुमच्या चित्रपट विषयक गप्पा फार आवडल्या. त्यात गिरीशरावांनी चित्रपटांची जी चिरफाड केली जी तर केवळ लाजवाब.मी चित्रे. फिल्म-पेअर मासिकाचा संपादक. आमच्या मासिकात चित्रपट रिव्यू लिहिणारा सोडून गेला. म्हणून मी नवीन समीक्षकाच्या शोधात होतो आणि योगायोगाने त्या दिवशी हॉटेलमध्ये तुमच्या मागच्या टेबल वर बसलो असताना तुमच्या गप्पा ऐकल्या. तुमच्या गप्पांतून हेही कळले की तुम्ही रोज ठरलेल्या वेळेला या हॉटेलमध्ये भेटता. म्हणून काही दिवस तुमच्या गप्पा ऐकल्या. आणि आता माझी खात्री झाली की तुम्ही चित्रपट समीक्षा चांगली करू शकता. तुम्हाला यापूर्वी काही लिखाणाचा अनुभव?"
"हो, आहे की तो आमच्या कॉलेजच्या मासिकाचा स्टार रायटर होता. शिवाय काही नॉन-फिल्मी मासिकांमध्ये त्याने हौस म्हणून लिखाण केले आहे", मी घडाघडा माहिती ओकली.
"उत्तम", चित्रे साहेब हे ऐकून खुश झाले, "तर मग गिरीश राव तुम्हाला हा जॉब स्वीकारायला आवडेल?"
गिरीशने माझ्याकडे पाहीले. त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती.
मी म्हटले, "अरे विचार कसला करतोस. गो फॉर इट. मला तर वाटते तुझ्यासाठी आदर्श जॉब आहे हा. भरपूर चित्रपट पाहायला मिळतील. आणि त्यांची चिरफाड करायचं काम आहे. अगदी तुझ्या आवडीचं. आणि वरून चित्रपट पहायचे तुला पैसे मिळतील." "मला आवडेल असा जॉब", गिरीशने चित्रेंची ऑफर आनंदाने स्वीकारली.

****** एका आठवड्यानंतर ******

चित्रेंच्या केबिनमध्ये चित्रे आणि मी बसून गप्पा मारत होतो. त्यांचं ऑफिस अंधेरीच्या कॉर्पोरेट पार्कमध्ये तिसऱ्या मजल्यावर अर्थात सापार्जुन कंस्ट्रक्शन कंपनीच्या ऑफिसच्या वरच्या मजल्यावर होतं.
चित्रेंनी मधेच विचारलं,"पेंढारकर, मी गिरीशला सरळ भेटून त्याचा इंटरव्यू घेऊ शकलो असतो. तुम्ही मला आठवडाभर हॉटेलमध्ये तुम्हा दोघांच्या मागच्या टेबलवर बसायचं नाटक कशाला करायला लावलंत?"
"चित्रे साहेब, मी असले चित्रपट क्षेत्राशी संबंधित पर्याय गिरीशला आधीसुद्धा सुचवले होते, पण माझं बोलणं त्याने मी मित्र म्हणून असेल कदाचित, पण कधी सिरीयसली घेतलं नाही. पण तुम्ही सुचवल्यावर त्याने सिरीयसली घेतलं. शेवटी काय, सोनारानेच कान टोचावे लागतात. शिवाय त्याच्यासारख्या अंतर्बाह्य फिल्मी माणसासाठी असा फिल्मी इंटरव्यूच आवश्यक होता."

गिरीश कणेकरच्या चित्रपट क्षेत्राशी संबंधित करियरची सुरुवात ही अशी झाली. फिल्लमबाजीच्या या क्षेत्रात गिरीश आपल्या तुफान फटकेबाजीने धुडगूस घालणार हे सांगायला कुणा ज्योतिष्याची गरज नव्हती.

==================== समाप्त =======================
( इतरत्र पूर्वप्रकाशित )

कथाविनोदलेख

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

12 Nov 2014 - 10:40 am | दिपक.कुवेत

आवडली. शेवटचा ट्विस्ट एकदम अनपेक्षीत होता. पण हे खरेच आहे का? कणेकरांची सुरवात अशीच झालेली?

खटपट्या's picture

12 Nov 2014 - 10:51 am | खटपट्या

हि कथा शिरीष कणेकरांबद्द्ल आहे का ?

अनन्त अवधुत's picture

12 Nov 2014 - 10:54 am | अनन्त अवधुत

अच्छा , म्हणजे कणेकरांच्या लेखातला तो जाड चष्मेवाला मित्र म्हणजे तुम्हीच का?

भारीच विनोदी ब्वा तुम्ही :)

पिवळा डांबिस's picture

13 Nov 2014 - 12:34 am | पिवळा डांबिस

फिस्सकन हसू आलं!!
:)
बाकी कथाही उत्तम!!

आनन्दा's picture

12 Nov 2014 - 11:00 am | आनन्दा

मस्त!

ते काहेही असल तरी त्या गिरीश रावांनी तुमच्या चित्रपटाची अशी फाडाफाड करायला नको होती राव.
कथा असेल तर भारी, सत्यकथा असेल तर लयभारी.

ओ ताई - दोन मित्रांमध्ये(माझ्यात आणि गिरीशरावांमध्ये) भांडण लावायचा विचार दिसतो तुमचा :)

यश राज's picture

12 Nov 2014 - 11:28 am | यश राज

आवडली

hitesh's picture

12 Nov 2014 - 2:22 pm | hitesh

छान

इरसाल's picture

12 Nov 2014 - 2:49 pm | इरसाल

बोल्ताना शिरीष कणेकरांचा (माझी फिल्लमबाजी) जो टोन आहे तो फारच "मी म्हणजे कोण" असा वाटतो.

इरसाल भौ - शिरीष कणेकरांनी विनोदनिर्मितीसाठी तसं बेअरिंग घेतलं असेल. प्रत्यक्षात ते तसे असतीलच असं वाटत नाही.

कपिलमुनी's picture

12 Nov 2014 - 3:06 pm | कपिलमुनी

मस्त टीपी कथा आहे . आवडली

अभिप्रायाबद्दल धन्यवाद - दिपक.कुवेत,अनन्त अवधुत ,आनन्दा,aparna akshay,यश राज,hitesh,कपिलमुनी :)

काय वो बोबो माझं नाव का म्हुन नाय घेतलं आँ ?
ह. घ्या. (तसंही माझं नाव टंकायला कठीणच आहे.)

बोबो's picture

13 Nov 2014 - 2:46 am | बोबो

ओ स्वारी खटपट्या भौ. तुमालापन थ्यांक्यू बर्का :)

बोबो's picture

12 Nov 2014 - 10:24 pm | बोबो

दिपक.कुवेत,अनन्त अवधुत - कथा काल्पनिक आहे.
कोणत्याही व्यक्तीशी साधर्म्य हा केवळ योगायोग समजावा ;-)

अर्धवटराव's picture

12 Nov 2014 - 11:00 pm | अर्धवटराव

मस्त वाटला पाठलग.

बोका-ए-आझम's picture

13 Nov 2014 - 12:13 am | बोका-ए-आझम

मस्त!

मनोरंजक कथा आहे. सापार्जून हे नाव वाचून हसू आले. इतर नावेही जमलीयेत, उदा. फिल्म पेयर, पॅशन वगैरे

मुक्त विहारि's picture

13 Nov 2014 - 2:57 am | मुक्त विहारि

आवडली...

अभिप्रायाबद्दल धन्यवाद - बोका-ए-आझम,अर्धवटराव :)

बोबो's picture

13 Nov 2014 - 3:25 am | बोबो

:) ते सापार्जुन कन्स्ट्रक्शन सुचलं नागार्जुन कन्स्ट्रक्शनवरून आणि गबन इंडिया सुचलं गॅमन इंडीयावरून. बादवे गबन चा हिंदीत अर्थ अफरातफर असा होतो :)

बाकीच्या नावांची गंमत/संबंधसुद्धा लक्षात आला असेलच :)

आदूबाळ's picture

13 Nov 2014 - 8:55 am | आदूबाळ

झक्कास!

टेंडर कोण फोडतो ते राहिलं की....

अावडली कथा.नावांमुळे मजा आली वाचायला!

चिगो's picture

13 Nov 2014 - 3:39 pm | चिगो

फर्मास, खुमासदार कथा..

अभिप्रायाबद्दल धन्यवाद - आदूबाळ, अजया,चिगो :)

अभिप्रायाबद्दल धन्यवाद - रेवती ,मुक्त विहारि :)

आतिवास's picture

15 Nov 2014 - 12:31 am | आतिवास

कथा आवडली.

अभिप्रायाबद्दल धन्यवाद - आतिवास :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 Nov 2014 - 2:35 am | निनाद मुक्काम प...

झकास

धन्यवाद निनाद मुक्काम प... :)

विजुभाऊ's picture

18 Nov 2014 - 3:46 pm | विजुभाऊ

बोबो मावशी
स्वतःच्याच लेखावर स्वतःच दिलेल्या प्रतिसादांच्चा उच्चांक मोडणार बहुधा तुम्ही

हं… अंमळ तसं झालंय खरं. पण विजू भौ कथेबद्दल काहीच सांगितलं नाहीत.
आवडली… नाही आवडली. मनात येईल स्पष्ट सांगावं माणसानं. :)