काही असे लोका नावडे...पण मज गमते मनोहर...

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
29 Oct 2014 - 2:47 pm

आजची (पुण्यातली) सकाळ मस्त आहे. हवेत सुखद गारवा आहे; कोवळे-कोवळे ऊन थंडीची लज्जत आणखी वाढवतेय. आज कार्यालयात कामदेखील कमी आहे. सकाळी कंपनीच्या बसमधून कार्यालयात येतांना 'आशिकी'चे "मेरा दिल तेरे लिये, धडकता हैं..." ऐकले. मस्त वाटले. या गाण्याचा ठेका मला खूप आवडतो. एकदम शाळेतल्या वयात गेल्यासारखे वाटले. दिल बाग बाग हो गया. नंतर एकदम "तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे..." वर उडी मारली. अल्ताफ राजाचा तो निराकार आवाज ऐकून कॉलेजचे दिवस आठवले. मध्येच मला बायकोचा फोन आला. मी असा गाण्यांमध्ये रममाण झालेला असतांना तिचा फोन हमखास येतो. काहीतरी महत्वाचे असेल म्हणून फोन उचलावा तर "रात्री जेवणात भोपळा चालेल का?" असा प्रश्न येतो. मग मी वैतागतो. सकाळी ८:३० ची वेळ "रात्रीच्या जेवणात भोपळा चालेल का?" हा गहन प्रश्न विचारण्याची आहे का असा भोपळ्याइतकाच सात्विक प्रश्न मी तिला विचारतो. "आज मला दिवसभर वेळ नाहीये भाजी आणायला आणि फ्रीजमध्ये फक्त भोपळा आहे म्हणून विचारलं." असं स्पष्टीकरण आल्यानंतर काय बोलणार? दिवाळीआधी मी एक दिवस कार्यालयात एका चर्चेत होतो. चर्चा महत्वाची होती की नाही माहित नाही. पण होतो, चर्चेतच होतो आणि काही माहिती मी देखील पुरवत होतो. तेवढ्यात बायकोचा फोन आला. महत्वाचा असेल म्हणून मी चर्चेतून बाहेर येऊन फोन उचलला. "लक्ष्मी रस्त्यावर आहे. दोन ड्रेस आवडले आहेत; एक निळा आहे आणि त्यावर गुलाबी फुलं आहेत आणि दुसरा पिवळा आहे आणि त्यावर लाल नक्षी आहे. कुठला घेऊ? तुझ्याकडे व्हॉट्सअ‍ॅप नाहीये नाहीतर फोटो पाठवले असते." व्हॉट्सअ‍ॅप नव्हते तेव्हा बायका कपडे विकत घेत नव्हत्या? व्हॉट्सअ‍ॅपमुळे आपण नाही नाही त्या गरजा निर्माण करून व्हॉट्सअ‍ॅप किती उपयुक्त आहे हे पटवून घेत आहोत. मी वैतागून म्हटलं "कुठलाही घे. पिवळा तुला बरा नाही दिसणार. निळा छान दिसेल. तुझ्याकडे तो गडद निळा ड्रेस होता तो तुला छान दिसायचा..." वैतागलो होतो तरीही मी माझे प्रांजळ मत दिलेच. माझे रंगज्ञान बायकोला माहित असल्याने माझा सल्ला ग्राह्य धरून तिने पिवळा ड्रेस विकत घेतला. असो. तर बायकोचा फोन आला. मी बायकोचा फोन कट करून माझ्या फोनवरून तिला लगेच फोन लावत असतो. सवयच झाली आहे. आता तिचे आणि माझे कॉल्सचे दर सारखे आहेत तरीही ही सवय सुटत नाही. हेडफोनवर फोन घेतांना माझी नेहमीच तारांबळ उडते म्हणून मी हेडफोन काढून फोन उचलत/करत असतो. यावेळेसही तसेच केले. तिचा फोन कट केला आणि पुन्हा फोन करण्यासाठी हेडफोन काढला. नेमके गाणे चालू असल्याने सगळ्यांना "तुम तो ठहरे परदेसी..." मोठ्या आवाजात ऐकू जाऊ लागले. या गोंधळात हेडफोन माझ्या हातातून खाली पडला. तो उचलावा की गाणे बंद करावे या गोंधळात गाणे चांगले १०-१२ सेकंद मोठ्या आवाजात वाजत होते. आजूबाजूची मंडळी हसून माझ्याकडे बघत होती. तोंड उघडे ठेवून झोपणारी एक नितांतसुंदर मुलगी तिच्या गहिर्‍या तपकिरी डोळ्यांमधून माझ्याकडे बघू लागली. मागे वळून पाहतांना तिचे रेशमी केस गिरकी घेऊन नितळ गोर्‍या मानेवर विसावले होते. हे जिवंत काव्य तशा परिस्थितीतही माझ्या नजरेतून सुटले नव्हते. गाणे चुकून मोठ्या आवाजात सुरू झाले याचे लोकांना काही वाटले नव्हते इतके मी कोणते गाणे ऐकतोय याचे आश्चर्य वाटले. "शी! काय घाणेरडी टेस्ट आहे याची!" असा लूक त्या 'काव्या'ने दिला. "दिसतोय तर चांगला थोराड घोडा आणि इतके चीप गाणे ऐकतोय" असा ही लूक मिळाला. मी थोडे दात विचकत गाणे बंद केले. फोन संपल्यावर मी विचार करू लागलो. आणि हाच विचार या लेखाचा विषय!

सर्वसाधारणपणे आपल्याला सगळ्या गोष्टींचं वर्गीकरण करण्याची खोड असते. ढोबळपणे दर्जेदार आणि कमअस्सल किंवा अभिरुचीहीन (चीप) असे दोन वर्ग आपण पाडतो. कला, साहित्य, रंग वगैरे गोष्टींचं असं सरळसोट वर्गीकरण सर्रास घडतं. आकाशी रंग उच्च दर्जाचा, पिवळा थोडा चीप; वीर दास दर्जेदार कॉमेडीयन पण राजू श्रीवास्तव अगदीच ड दर्जाचा; सलमान, अजय देवगण मासेसचे दर्जाहीन नायक पण नसीरुद्दीन शाह आणि शेखर कपूर अभिरुचीसंपन्न अभिनेते वगैरे वर्गीकरण सगळ्याच क्षेत्रात सर्रास दिसते. काही क्षेत्रात असे वर्गीकरण रास्त असू शकेल, उदा. आयसीएससी आणि महाराष्ट्र बोर्ड यांच्या दर्जात फरक आहे असे मी ऐकले आहे. शिकवण्याच्या पद्धती, अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून घेतले जाणारे उपक्रम वगैरे बाबतीत आयसीएससी वरचढ आहे असे मी ऐकले आहे. अशा वस्तूनिष्ठ फरकांमुळे दर्जामध्ये आपसूक येणारा फरक मी समजू शकतो पण जिथे वैयक्तिक आवड-निवड महत्वाची असते तिथे असा फरक करणं कितपत योग्य आहे?

माझ्यापुरतं म्हणायचं झालं तर खालील काही ठळक उदाहरणं मला आठवतायेत. या उदाहरणांमध्ये ढोबळ मानाने फारशा चांगल्या दर्जाच्या न समजल्या गेलेल्या पण मला काही प्रमाणात किंवा काही विशिष्ट केसेस मध्ये आवडणार्‍या गोष्टींचा समावेश आहे.

नदीम-श्रवणचे संगीत: मान्य, बर्‍याच चित्रपटांमध्ये या जोडगोळीने समीर नावाच्या महान गीतकारांकडून रचलेल्या साचेबद्ध गीतांना निरर्थक चाली चाली लावल्या पण असे बहुतेक सगळ्याच संगीतकारांच्या बाबतीत घडते. आर. डी. बर्मनची 'दीवार', 'गुरुदेव', 'शोले', 'ऊंचे लोग' वगैरे चित्रपटातली गाणी काही विशेष नव्हती. ए. आर. रहमानचे ऑस्कर-विजेते 'जय हो' देखील काही खास नव्हते. मग नदीम-श्रवण यांच्यावरच 'चीप'चा हा मनहूस शिक्का का? 'आशिकी', 'साजन', 'सडक', 'दिल का क्या कसूर', 'दीवाना', 'परदेस', 'राज' अशा कित्येक चित्रपटांना या दोघांनी लोकप्रिय आणि श्रवणीय संगीत दिले. 'आशिकी'ची गाणी ऐकायला अजूनही छान वाटतात. मग या जोडगोळीवर हा अभद्र शिक्का का?

"तुम तो ठहरे परदेसी": हे गाणे मला आवडते आणि कधी कधी मी ते मुद्दाम ऐकतो. अल्ताफ राजाचा आवाज तितकासा चांगला नाही हे मान्य पण या गाण्यात तो मस्त लागलाय. गाण्याची उडती चाल, दिलफेक शब्द, सोपे पण पंच असलेले थोडे विनोदाच्या अंगाने जाणारे शेर आणि मस्त ठेका ही या गाण्याची मला आवडलेली वैशिष्ट्ये. हे गाणं खासच जमून आलं होतं आणि म्हणून तूफान लोकप्रिय झालं होतं. तरी आमच्या (म्हणजे आमच्या बसमधल्या) 'काव्या'ने हे गाणं ऐकून तोंड का वेंगाडलं असावं?

चेन्नई एक्स्प्रेस: शाहरुख खान आणि दीपिकाचा हा चित्रपट मला आवडला होता. शाहरुख बर्‍याच वर्षांनी त्याच्या सुरुवातीच्या एनर्जीटिक फॉर्ममध्ये होता. दीपिका अफलातून दिसली आणि वावरली होती. कथा ठोकळेबाज होती पण सादरीकरण मस्त होते. पण बरेच जणांच्या 'चेन्नई एक्स्प्रेस' आवडतो म्हटलं की भुवया आक्रसतात. किं कारणे?

हाऊसफुल: साजिद खानचा हा चित्रपट जितक्या वेळा टीव्हीवर सापडतो तितक्या वेळा मी शक्यतो पूर्ण बघतो. इतकी निरर्थक पण मस्त हसवणारी कॉमेडी फार थोड्या चित्रपटांमध्ये दिसली. बम्मन इराणीचे होणारे गैरसमज, अक्षय कुमारचा भाबडेपणा, रणधीर कपूरला चुकवतांना होणारी त्याची दमछाक...मजा येते बघतांना. दीपिकाचे हलकेच कंबर उडवून 'पप्पा जग जायेगा...' म्हणणे फारच मोहक होते. गाण्याची चाल छान खट्याळ खोडकर होती. पण लोक्स या चित्रपटाला आचरटपट समजून बदडून काढतात. व्हाय? तुम्हाला आवडला नाही मान्य, पण 'चीप'चे लेबल कशासाठी?

हिमेश रेशमिया: हिमेश रेशमियाची काही गाणी मला आवडतात. 'प्यार किया तो डरना क्या'मधले "तेरी जवानी बडी मस्त मस्त है, ये भीगा मौसम काली घटायें, सुनी पडी है उल्फत की राहे, प्यार करने का यही वक्त वक्त है..." हे हिमेशचे गाणे मला कॉलेजला असतांना मला खूप आवडायचे; अजूनही आवडते. एक मदमस्त रांगडेपणा या गाण्यात खूप सही कॅप्चर झालाय. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. साबरी ब्रदर्सची पहाडी रागदारी आणि भक्कम बीट्स असलेली ही रचना ऐकायला मस्त वाटते. हिमेशचे "तखणा तखणा..." हे 'नमस्ते लंडन'मधले गाणे ऐकायला किती छान वाटते! त्याचप्रमाणे 'वेलकम'मधले "तेरा सराफा ऐसा है हमदम..." पण मस्त वाटते. त्याचा आवाज हा संशोधनाचा विषय आहे. त्याची हीरो होण्याची खाज हा अध्यात्माचा विषय आहे. सगळं मान्य! पण 'चीप'चे लेबल का बिचार्‍याच्या माथी?

"ऊई अम्मा ऊई अम्मा मुश्कील ये क्या हो गयी", "ऊ ला ला ऊ ला ला", "तोफा तोफा तोफा": ही गाणी मी शोधून शोधून ऐकली आहेत आणि अशी बरीच गाणी माझ्या लक्षात राहिली आहेत. अहाहा! काय ते खटकेबाज संगीत, काय तो किशोर कुमारचा रोचक आवाज (ऊ ला ला चा बप्पी लाहिरीचा आहे), काय त्या मनाला प्रसन्न करणार्‍या चाली...वा वा! "रेशम के रूप मे तन से मेरे लिपटा हुआ मन तेरा...ता ता ता...प्यार का तोफा तेरा, बना है जीवन मेरा..." काय अगाध शब्द! कबूल की या शब्दांमध्ये कवितेची कळा नाही, कुठल्याच प्रकारची प्रतिभेची झळाळी नाही; आहेत ते फक्त ओबडधोबड कल्पना मांडणारे शब्द पण गाण्याच्या चालीत गेल्यानंतर हे साधे शब्द किती आनंद देतात म्हणून सांगू! "चांदण्यात फिरतांना माझा धरलास हात, सखया रे..." किंवा "मर्मबंधातली ठेव ही..." किंवा "वक्त ने किया क्या हंसी सितम..." ही गाणी सुंदरच आहेत आणि मी असंख्य वेळा ऐकतो देखील; पण म्हणून "तोफा तोफा" किंवा "ऊंगली में अंगुठी, अंगुठी में नगीना" दर्जाहीन आहेत, असे का? सकाळी सकाळी वेगाने फिरतांना "तम्मा तमा लोगे" ऐकल्याने चालण्याचा वेग आपसूकच वाढतो हा माझा रोजचा अनुभव आहे. सुटीच्या दिवशी निवांत फिरतांना "दूर रहकर ना करो बात, करीब आ जाओ, याद रह जायेगी ये रात, करीब आ जाओ" किंवा "वो भुली दासतां, लो फिर याद आ गयी" अशी गाणी ऐकण्याचा मझा निराळाच!

'धनंजय'सारखे दिवाळी अंक आणि पुस्तके: 'धनंजय' हा माझा आवडता दिवाळी अंक आहे. दिवाळीच्या दिवसात रात्री 'धनंजय'मधल्या कथा वाचतांना जबरा मजा येते. यावर्षीच्या कथा तितक्या धमाकेदार नाहीत पण २०१२, २०११ च्या धनंजयमधल्या कथा मस्त होत्या. रात्रीची १-२ वाजताची वेळ, दुसर्‍या दिवशी सुटी, रात्रीचे मस्त जेवण झालेले आहे, सोफ्यावर लोळत लोळत धनंजयमधली एखादी गूढ कथा वाचणं सुरु आहे.

"सारिका घाई-घाईने ऑफिसमधले काम संपवण्याच्या मागे लागली होती. काम खूप असल्याने तिला उशीर झाला होता. सारंग, सारिकाचा नवरा ऑफिसच्या कामानिमित्त ३-४ दिवस हैदराबादला गेलेला होता. घरी कुणीच नव्हतं. शेवटी काम संपवून सारिकाने लॅपटॉप बंद केला आणि एक दीर्घ सुस्कारा टाकून घड्याळाकडे पाहिलं. बाप रे! १२:३०! तिने बाहेर एक नजर टाकली. सगळा आसमंत काळोखात बुडाला होता. एवढ्या उशीरा ऑफिसमध्ये बहुधा ती एकटीच होती. लॅपटॉप बॅगेत ठेवून सारिका जागेवरून उठली. काम संपवल्याचं समाधान तिच्या चेहर्‍यावर झळकत होतं. आठव्या मजल्याच्या लिफ्टजवळ ती येऊन पोहोचली. लॉबीमध्ये बर्‍यापैकी अंधार होता. दहा-पंधरा सेकंद वाट पाहिल्यानंतर लिफ्ट आली. सारिका लिफ्टमध्ये शिरली आणि तिने तळमजल्याचे बटण दाबले. लिफ्ट सुरु झाली. सातव्या मजल्यावर लिफ्ट थांबली. सारिकाला वाटलं कुणीतरी सोबत मिळेल तळमजल्यापर्यंत जायला. लिफ्टचा दरवाजा उघडला. कुणीच शिरलं नाही. सारिकाला थोडं विचित्र वाटलं. लिफ्ट पुन्हा सुरू झाली. पुन्हा सहाव्या मजल्यावर थांबली. दरवाजा उघडला. समोर मंद प्रकाश असलेली लांबलचक लॉबी दिसली. आत शिरणारं कुणीच नाही! आता मात्र सारिकाला थोडी भीती वाटू लागली. पाचव्या मजल्यावर लिफ्टचा दरवाजा उघडला आणि समोरचं दृष्य पाहून सारिका हादरली..."

अशी एखादी उत्कंठावर्धक कथा नुकतीच सुरू केली आहे...हा आनंद मी काय वर्णू? पण का कुणास ठाऊक अशा दिवाळी अंकांना नाके मुरडली जातात. आखिर क्यूं?

क्राईम पट्रोलः ही माझी अत्यंत आवडती मालिका! क्राईम पट्रोल बघतांना माझे अक्षरशः भान हरपून जाते. गुन्हा कसा घडतो, त्यामागची पार्श्वभूमी कोणती, गुन्ह्याच्या मागे असणारे विविध सामाजिक-आर्थिक संदर्भ कोणते इत्यादी सगळ्या पैलूंची चर्चा करणारी आणि रहस्य अतिशय रोमांचकारी पद्धतीने मांडणारी गुन्हेविषयक मालिका म्हणून क्राईम पट्रोल खूप लोकांना आवडते. या मालिकेतल्या सगळ्या कथा या सत्य घटनेवर आधारित असतात. अतिशय छोट्या छोट्या धाग्यांवरून संपूर्ण गुन्ह्याचा छडा लावण्याचे पोलिसांचे कसब वाखाणण्याजोगे असते. कधी शर्टावरचे लेबल, कधी एखाद्या अनोळखी क्रमांकावरून आलेला फोन, कधी मोबाईलचा ओळख क्रमांक, कधी आसपास असलेल्या पण सहजासहजी न दिसणार्‍या बारीक बारीक वस्तू अशा कित्येक साध्या साध्या दुव्यांवरून पोलिस मोठे मोठे गुन्हे ज्या पद्धतीने उघडकीस आणतात त्याचे चित्रण केवळ लाजवाब! या मालिकेतील सगळेच अव्वल दर्जाचा अभिनय करतात. कित्येकदा मी रात्री २-३ वाजेपर्यंत क्राईम पट्रोलचे भाग बघत बसलेलो आहे. पण पुन्हा तेच. "शी, काहीही आवडतं तुला. ती काय बघण्यासारखी मालिका आहे?" अरेच्चा! मग काय 'होणार सून मी त्या घरची' किंवा 'जुळून येती रेशीमगाठी' फार महान मालिका आहेत?

साधे नो-फ्रिल्स डायनिंग हॉल: 'जनसेवा' हा माझा पुण्यातला आवडता डायनिंग हॉल आहे. मुळात मला डायनिंग हॉल आवडतात. आरामशीर बसून १५-२० पदार्थांवर येथेच्छ ताव मारता येतो. 'जनसेवा' साधे आहे. कुठलाच तामझाम नाही. टेबलं, खुर्च्या, पंखे आणि जेवण याखेरीज तिथे फारसं काही नाही. जेवणदेखील साधंच! पण मला आवडतं. मी आणि बायको तिथे बर्‍याचदा जेवायला जातो. शनिवारी दुपारी तिथे जावं, पोळी, भाज्या, भात, आमटी, दहीवडा, थालपीठ, कोशिंबीर, मूगभजी, साबुदाणा वडा असं भरभक्कम जेवण मनसोक्त हादडावं, खाली येऊन दोन साधी पानं तोंडात कोंबावी आणि थेट घरी येऊन ताणून द्यावी हा माझा आवडता कार्यक्रम असतो. पण कार्यालयातल्या माझ्या मित्रांना असलं काही आवडत नाही. "अरे उससे अच्छा तुम 'कोपाकबाना' या फिर 'पोस्ट ९१' गये होते. अमेझिंग फूड! वैसे 'फोर सीझन्स' भी अच्छा है." असेल, या हॉटेल्समध्येदेखील जेवण छान असेल म्हणून 'जनसेवा' वाईट??? का? नाव 'जनसेवा' आहे म्हणून? नाव इंग्रजीमधलं नाहीये म्हणून? जेवण काय फक्त 'बार्बेक्यू नेशन'लाच मिळतं आणि बाकी ठिकाणी काय झुरळांची कढी आणि ढेकणांची उसळ मिळते? जळगांवमध्ये 'आर्यनिवास' नावाचा एक डायनिंग हॉल आहे. हादेखील माझा खास आवडीचा. जुलै २०१४ मध्ये जळगांवला ४-५ दिवस राहिलो होतो तेव्हा ३-४ वेळा मी 'आर्यनिवास'मध्ये जेवलो. काय सुरेख कढी! स्वर्ग! 'आर्यनिवास' खरं तर डायनिंग हॉल कमी आणि खानावळ जास्त आहे. आसपासच्या गावातली जळगांवला कामानिमित्त आलेली माणसं तिथे जेवायला जास्त येतात. विशेषतः लग्नाच्या खरेदीला आलेली माणसं. कुणीही कुठेही बसा पण आधी कुपन घ्यायला विसरू नका, झप्पकन ताट येतं, चटचट भाज्या, वरण, आमटी, कढी, कोशिंबीर वगैरे पदार्थ वाढले जातात. लगेच पोळी येते. गोड-बिड काही नाही. पाहिजे असेल तर निराळे पैसे मोजा. त्यातही फक्त श्रीखंड आणि गुलाबजाम! तळलेलं काहीच नाही. पण चव मात्र खूप छान असते. वाढणं मुबलक! मजा आ जाता हैं...

घरी जमवलेले पानः चांगल्या जेवणानंतर पान नसणं जेवणाचा आनंद कमीत कमी ३०% कमी करतं असं माझं मत आहे. बाहेरच्या पानांपेक्षा मला घरचे पान जास्त आवडते. आमच्या घरी महिन्यातून ७-८ दिवस तरी पाने असतात. काही कार्यक्रम असला तर सगळ्यांना पान बनवून देण्याची जबाबदारी माझी असते. काथ, चुना, सुपारी, बडिशेप, धनाडाळ, ओवा, आसमंततारा, इलायची, आणि एक बारीकशी लवंग घालून केलेला दोन मोठ्या पानांचा विडा शरीर आणि मन शुद्ध करून जातो असे माझे स्पष्ट मत आहे. मी तर ३-४ पानांचा विडा जमवतो. त्यात भरपूर सुपारी टाकतो. त्यासाठी एक मजबूत अडकित्ता मी घेऊन ठेवलेला आहे. तास-दीड तास पान चघळत एखादे आवडीचे पुस्तक वाचणे यातला आनंद अवर्णनीय असतो. पण घरी पान खाण्याला आता ग्लॅमर नाही. सुपारी फारसं कुणी खात नाही. ओवा सहजपणे तोंडात टाकणारा माझ्या पिढीचा माझ्या पाहण्यात कुणीच नाही.

एकपडदा चित्रपटगृहे: आजकाल यांना तर कुणी वालीच राहिलेला नाही. पण अजूनही पुण्यात नीलायम, अलका, किंवा प्रभातला चित्रपट बघणे हा एक वेगळाच अनुभव असतो. मी आणि बायको कधी-मधी एकपडदा चित्रपटगृहात जातो चित्रपट बघायला. 'तलाश आम्ही अलकामध्ये पाहिला; स्पेशल २६ लक्ष्मीनारायणला; देल्ही बेली नीलायमला, बालक-पालक प्रभातला...' असं म्हटलं की लोकांच्या चेहर्‍यावर दयेचे भाव येतात. एकपडदा चित्रपटगृहात चित्रपट पाहणे आणि ते ही बायकोसोबत ही कल्पनाच आता कित्येकांना अतिभयंकर वाटते. मी त्यांना सांगतो की बाबांनो पुण्यात चांगली एकपडदा चित्रपटगृहेदेखील आहेत. तिथला क्राऊड म्हणजे जनावरांचा कळप नसतो. "थोडा ऑड लगता है रे...फॅमिली के साथ जाना.." अरे बाबा, तुझी बायको ऐश्वर्या आहे की दीपिका की तिथली माणसे तिच्याभोवती गराडा घालतील! पण 'ई-स्क्वेअर मे देखा चेन्नई एक्स्प्रेस...वहीं पे डिनर खाया, कोल्ड कॉफी पिया...मजा आया...' हे कसं सांगता येईल मग चारचौघात? मला अगदीच मान्य आहे की मल्टिप्लेक्सला चित्रपट पाहणं हा एक सुखावह अनुभव असतो म्हणून पण म्हणून एकपडदा चित्रपटगृहे भिकार? डाऊनमार्केट? मराठी चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहणे हा अजून एक डाऊनमार्केट वाटणारा प्रकार आहे. घरी बसून 'चार दिवस सासूचे' पाहतील पण बाहेर गप्पा 'ई-स्क्वेअरमध्ये ग्रॅव्हीटी, अ‍ॅडलॅब्जमध्ये हंगर गेम्स'च्या!

तर अशा या काही गोष्टी ज्या डाऊनमार्केट समजल्या जातात पण मला मात्र मनापासून आवडतात. अजूनही बर्‍याच आहेत पण आता आठवणार्‍या इतक्याच. मला आवडतात म्हणून दुसर्‍यांना या आवडल्याच पाहिजेत असं माझं अजिबात म्हणणं नाही किंवा मला आवडतात म्हणून त्या चांगल्याच आहेत असादेखील माझा गैरसमज नाही. पण आवडतात तर आवडतात! अब कोई क्या कर सकता है? आपल्याला अशा काही गोष्टी आवडतात का ज्यांना 'चीप' किंवा 'डाऊनमार्केट' किंवा 'ओन्ली फॉर मासेस' किंवा 'अभिरुचीहीन' वगैरे लेबलं लागलेली आहेत? बघा बरं जरा आठवून...

समाजजीवनमानप्रकटनमत

प्रतिक्रिया

प्रसाद१९७१'s picture

29 Oct 2014 - 3:09 pm | प्रसाद१९७१

काही गोष्टी पटल्या नाहीत तरी चांगला लेख आहे आणि कळेल अश्या भाषेत लिहीलाय.
हल्ली मिपा वर अगम्य मराठीत लिहीण्याचा एक अपमार्केट ट्रेंड चालू आहे.

कलेच्या प्रांतात क्लास आणि मास असावे असे मला वाटते. "मास" कलाकृतीचा आनंद जरूर घ्यावा, पण ते बरेच अलिकडचे स्टेशन आहे प्रवासातले ह्याची जाणिव असू दे.

बादवे - हिमेश च्या पहील्या ५-६ सिनेमांची गाणी मला "क्लास" वाटली.

मटेरियल गोष्टींबाबत.

बर्‍याच वेळेला असे असते की आपली ऐपत असली एखादी गोष्ट करण्याची आणि ती जाहीर असली तर ती गोष्ट उघडपणे न करायचे टाळु शकतो. महाग हॉटेल मधे सारखे जाउन खाउ शकतो इतकी ऐपत असली आणि ती बाकीच्यांना माहीती असली तर मग आपण मला एखाद्या छोट्या हॉटेल मधे कसे जेवण चांगले असते आणि मला तिथेच जेवायला आवडते हे तोंड वर करुन सांगू शकतो. तसेच मल्टीप्लेक्स आणि जुन्या टॉकीज बद्दल आहे

विजुभाऊ's picture

29 Oct 2014 - 3:13 pm | विजुभाऊ

ई-स्क्वेअर मे देखा चेन्नई एक्स्प्रेस...वहीं पे डिनर खाया, कोल्ड कॉफी पिया...मजा आया...' हे कसं सांगता येईल मग चारचौघात?

या सगळ्या कोमेन्ट्स हिन्दीत आहेत ना.मग बरोबर आहे. हिन्दी....... नुसता वरवरचा आव.
माझे एक सर सांगायचे. "तुम्ही ५ तारांकितीत हॉटेल मधे जाता ते इतराना साम्गण्यासाठी ,दाखवण्यासाठी .जेवण्यासाठी नव्हे. तुम्हाला माहीत आहे सकाळी त्या ५ तारांकीत जेवणाचे काय फारसे वेगळे झालेले नसते. ते कुठे जाते हे सर्व जाणतातच."

येब्बात! तुमचां आणि माझा मत्त बराब्बर जमतां!

मला आवडणार्‍या पण डा.मा. समजल्या गेलेल्या गोष्टी:
१. पोलिस टाईम्स
२. "होम मिनिस्टर"
३. काडेपेट्यांचे छाप जमवणे
४. कागदाची विमाने आणि बाण करणे आणि उडवणे

अजून आठवल्या की टंकतो.

समीरसूर's picture

29 Oct 2014 - 4:49 pm | समीरसूर

होम मिनिस्टर मला पण आवडते. आणि सह्याद्री चॅनलवरचे चालता-बोलता पण भारी आहे. सोप्या सोप्या प्रश्नांना लोकं जी मजेदार उत्तरं देतात ती ऐकून कंप्लीट मनोरंजन होते. :-)

मोदक's picture

30 Oct 2014 - 9:29 am | मोदक

"दक्षता" ...?

पिंपातला उंदीर's picture

29 Oct 2014 - 3:31 pm | पिंपातला उंदीर

एक सुधारणा - 'तेरी जवानी बडी मस्त मस्त है ' हे गाण हिमेश च नसून साजिद -वाजिद यांच आहे . 'प्यार किया तो डरना क्या ' या चित्रपटाला जतिन -ललित , हिमेश आणि साजिद -वाजिद असे ३ संगीतकार होते त्यामुळे हा घोळ झाला असावा .

बाकी आवड अपनी अपनी . स्पष्टीकरण का देत बसायची लोकाना . ह. घ्या : )

समीरसूर's picture

29 Oct 2014 - 4:52 pm | समीरसूर

चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद! :-) मला वाटते "ओढ ली चुनरिया..." हिमेशचे आहे. ते पण आवडते मला.

समीरसूर's picture

29 Oct 2014 - 4:57 pm | समीरसूर

स्पष्ट सांगीतलं म्हणजे मग "आपलं हे असं आहे..." म्हणायला आपण मोकळे. ;-)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

29 Oct 2014 - 3:41 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

ज्याची त्याची आवड. लेख मस्त जम्लाय पण . पूर्वी हे कुर्ता-पायजमा घालून कलकत्ता पान तोंडात ठेवून कुमार्,भीमसेनांच्या मैफिलीला जात.खात्री आहे मला- काहीही कळत नसे त्यांना.'मस्तच गायले' ह्या पलिकडे काहीही
प्रतिक्रिया नाही.
दुसर्या दिवशी ये रे माझ्या मागल्या-रफी वा किशोर!

समीरसूर's picture

30 Oct 2014 - 1:45 pm | समीरसूर

आणि अल्ताफ आणि कुमार शानू

नितिन पाठे's picture

29 Oct 2014 - 3:42 pm | नितिन पाठे

............. जबराट लिहिलय की भाऊ...................

अविनाश पांढरकर's picture

29 Oct 2014 - 3:52 pm | अविनाश पांढरकर

ज्याची त्याची आवड. लेख मस्त जम्लाय पण "अरेच्चा! मग काय 'होणार सून मी त्या घरची' किंवा 'जुळून येती रेशीमगाठी' फार महान मालिका आहेत?" हे वाक्य आणि लेखाचा सुर यात विरोधाभास जाणवतो आहे.

समीरसूर's picture

29 Oct 2014 - 4:54 pm | समीरसूर

विरोधाभास वगैरे काही नाही हो; 'जुळून येती...' ज्यांना पहायचं त्यांनी पहावं पण दुसर्‍यांच्या आवडीला का नाकं मुरडावीत? त्यांनी मुरडली तर मग मला नाक नाही का? माझ्या नाकानेच काय घोडं मारलंय? ;-)

विजुभाऊ's picture

29 Oct 2014 - 4:02 pm | विजुभाऊ

माईसाहेबानी खूपच महत्वाचे मुद्दे सांगितले.
अर्थात रफी वा किशोर हे जी एम दुर्राणी किंवा आर सी बोराल अथवा पंकज मलीकपेक्षा खूपच चांगले गातात. देवीकाराणी चा सुद्धा आवाज चांगला होता. नव्यापैकी म्हणजे शारदा बरी होती. उगाच कशाला कोणाची कोणाशी तुलना करायची.
लोकानी मिफीलीला जाताना धोतर कोट घातले काय किंवा कुर्ता पैजामा घातला.अंग झाकणे महत्वाचे. आदिवासी बाम्धवाना तेवढे सुद्धा सूख मिळत नाही.

एक नंबर जबराट लेख. लय आवडला.

(प्राउड टु बी नीचभ्रू) बॅटमॅन.

नाखु's picture

29 Oct 2014 - 4:47 pm | नाखु

"एकपडदा चित्रपटगृहात चित्रपट पाहणे आणि ते ही बायकोसोबत ही कल्पनाच आता कित्येकांना अतिभयंकर वाटते." अशा भिकार कल्पना असलेल्या लोकांना मी तत्काळ फाट्यावर मारतो.
मी त्यांना सांगतो की बाबांनो पुण्यात चांगली एकपडदा चित्रपटगृहेदेखील आहेत. तिथला क्राऊड म्हणजे जनावरांचा कळप नसतो."
लेख मस्त जमून आला आहे.

बाबांनो पुण्यात चांगली एकपडदा चित्रपटगृहेदेखील आहेत. तिथला क्राऊड म्हणजे जनावरांचा कळप नसतो....
अनुमोदन

सस्नेह's picture

29 Oct 2014 - 4:17 pm | सस्नेह

पसंद अपनी अपनी खयाल अपना अपना..

मदनबाण's picture

29 Oct 2014 - 4:45 pm | मदनबाण

मस्त ! आपल्याला काय आवडतं त्यातुन आनंद घ्यावा ! लोक / इतर काय म्हणतील याचा विचार करण्यात देखील वेळ घालवु नये ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Global consumer confidence improves, India most bullish - Nielsen

बोका-ए-आझम's picture

29 Oct 2014 - 6:54 pm | बोका-ए-आझम

लोक आणि चपला सारखेच समीरभाऊ! कितीही चांगली चप्पल असली तरी आपण घरात घालून फिरतो का? तसंच. लोकांना फाट्यावर मारा आणि जे वाटतं ते करा. Never Explain. Your Friends don't need it, your enemies won't believe it. So who cares?

पगला गजोधर's picture

29 Oct 2014 - 7:26 pm | पगला गजोधर

शनिवारातल्ल रसोई पण ट्राय करा… कधी तरी ठीक ठाक, कढी अळूची भाजी आवडते तिथली आपल्याला …

जळगांवमध्ये 'आर्यनिवास' नावाचा एक डायनिंग हॉल आहे. हादेखील माझा खास आवडीचा. जुलै २०१४ मध्ये जळगांवला ४-५ दिवस राहिलो होतो तेव्हा ३-४ वेळा मी 'आर्यनिवास'मध्ये जेवलो. काय सुरेख कढी! स्वर्ग!
तुम्ही जो आर्यनिवास म्हणता तो तर मला माहीत नाही मात्र मागे एकदा जळगावला पहिल्यांदा च जाण्याचा योग आला होता. तर हे शहर मला खुप आवडले. इथे मी काही छान छान खाण्याचा आनंद घेतला व काही अड्डॅ हेरुन ठेवले
१- या शहरात जगातील सर्वात श्रेष्ठ प्रतीचे वांग्याचे भरीत मिळते. बस स्टॅन्ड जवळ च एक बी.जे. मार्केट नावाची जागा आहे त्यात एक फेमस हॉटेल आहे. तिथे अति उच्च दर्जाचे वांग्याचे भरीत नेहमी च मिळते. वा वा वा.
२- त्याच मार्केट च्या थोड च जवळ एक मिठाई चे दुकान आहे नाव आहे महालक्ष्मी स्वीट्स येथील मिठाई व चिवडा या दोन गोष्टींचा दर्जा तुम्ही विचार करु शकत नाही इतका उच्च आहे. अप्रतिम मिठाई खास करुन काजु कतली ओ माय गॉड तुम्ही चव चाखलीत तर पागल व्हाल गॅरंटी त्यात ही फ्लेवर आहेत स्ट्रॉबेरी,मँगो, चॉकलेट व रेग्युलर व्हाइट क्लासिक काजु कतली. ग्रेट मिठाई साठी येथे भेट द्यावी.
३- या शहरात शेव भाजी असामान्य चवीची भेटते कुठल्याही हॉटेलात खा इथली शेवभाजी वन ऑफ इटस काइंड
४- वयोमानाने मेमरी अंधुक लोकप्रिय मिसळ का काय असे एक दुकान पण या शहरात आहे तिथे मिसळ फार भन्नाट मिळते
५- वरील सर्व पदार्थ खाउन ( समजा महालक्ष्मी त नाही गेलात ) आणी पोटाचा जाळ जास्त झाला तर या शहराच्या मध्यवर्ती भागात रेल्वे स्टेशन जवळच एक मोठ मार्केट आहे आता पत्ता नाय सांगता येणार पण एक लस्सी मिळते गायत्री का काय नाव गाडी च आहे पण बॉस लस्स्सी जैसी कोई नही हे सिरीयल याच लस्सी च्या नावाने बनविले होते
खुप सुंदर शहर मी एकदाच गेलो इथे मात्र माझ्या ५ दिवसाच्या वास्तव्यात मला प्रचंड आनंद देणार शहर अजुनही माझ्या आठवणीत ताज आहे.

समीरसूर's picture

30 Oct 2014 - 9:22 am | समीरसूर

भरीत मिळण्याचे ते ठिकाण म्हणजे कृष्णा हॉटेल. तिथले अनेक पदार्थ प्रसिद्ध आहेत. भाकरी, भरीत, डाळगंडोरी, शेवभाजी, ठेचा, मटकी उसळ...जबरदस्त चव, मेंदूला कामाला लावणारी झणझण. मी जळगांवला गेलो की इथली भाकरी, भरीत, डाळगंडोरी एकदा तरी चापतोच.

बाकी मिठाईचा आणि माझा फारसा संबंध नसल्याने महालक्ष्मी माहित नाही. :-(

आर्यनिवास नटवर टॉकीजच्या जवळ आहे. फुले मार्केट भागात. कधी गेलात जळगांवला तर एकदा जाऊन या. ऐंशी रुपयात मजबूत जेवण. तिथेच जवळ एक नैवेद्य नावाचा नवा डायनिंग हॉल उदयाला आला आहे. तिथेही चांगले जेवण मिळते. ते थोडे गुजराती स्टाईलचे आहे पण चव छान आहे. पण आर्यनिवासची सर नाही त्याला.

जळगांव हे एक छान टूमदार शहर आहे. एकदम शांत आणि कोलाहल नसलेलं. :-)

यश राज's picture

30 Oct 2014 - 12:08 pm | यश राज

नटवर टॉकीज जवळ 'जोगळेकर' म्ह्णून उपहारगृह आहे. तेथील समोसा अगदी लाजवाब..

मनिष's picture

30 Oct 2014 - 4:12 pm | मनिष

मनमंदिर आहे का अजून? मस्त पाणीपुरी मिळायची तिथे आणि मोरॅक्को आहे का अजून? त्याच्या शेजारच्या बुक स्टॉल वरून कित्येक चाचा चौधरीची पुस्तके घेतलीत लहानपणी! तो कट्टा २ तारखेनंतर असेल तर मी पण येतो! :-)

विक्रान्त कुलकर्णी's picture

31 Oct 2014 - 12:11 pm | विक्रान्त कुलकर्णी

अगदी अगदी.. खरोखर मस्त भरित आणि बाजरीची भाकरी बरोबर शेवेची भाजी.. जळगावला गेलो की एक तरि फेरी ठरलेली.. छातीमध्ये आठवणीने कळ आली..

स्मिता.'s picture

18 Dec 2014 - 1:37 am | स्मिता.

मूळ लेखातला आणि या प्रतिसादातले जळगांवचे उल्लेख वाजून 'नोस्टॅल्जिक' झाले :)

बाकी लेखाशी सहमत. आपली आवड ही आपली असते, दुसर्‍याला आवडण्याकरता नसते!

बाबा पाटील's picture

29 Oct 2014 - 7:45 pm | बाबा पाटील

स्वतःला आनंद मिळतो तस माणसाने जगत जाव, त्या जगण्यात मजा आहे,मी ही असाच स्वच्छंदी जगतो,इतर कुठे रिकामे धंदे करण्यापेक्षा क्रिकेटच्या मैदानात मी जास्त मोकळा राहतो, दिवेआगारचा समुद्र मला भावतो,माझ्या राजाचे गड किल्ले मला बेधुंद करतात्,पण इथे मला प्रत्येक वेळी माझ्या लेकींची संगत लागते,का कुणास ठावुक बरीच लोक एकएकटे फिरतात मी मात्र बायको आणी लेकीसह सगळा गोतावळा घेवुन फिरतो, बर्‍याचदा तर माझ्या छोट्या सव्वा वर्षाच्या लेकीपासुन ते १०० वर्षाच्या आज्जी पर्यंत असे १५-२० लोक एकत्र भटकत असतो अगदी गडकिल्ल्यांवर देखिल,माझी माणस माझ जगण आहे.हा फक्त माझ्या हातात एखाद पुस्तक पडे पर्यंत्,कारण हातात जेंव्हा पुस्तक पडत तेंव्हा मात्र माझ्याशी संवाद साधायचा म्हटल की बायकोला मला चिमटे काढावे लागतात आणी लेक मात्र तेच पुस्तक माझ्या डोक्यात घालते. असो,प्रत्येकाच जगण वेगळ असत्,पण जे असत ते मनस्वी असाव एव्हडच वाटत.

समीरसूर's picture

30 Oct 2014 - 9:23 am | समीरसूर

प्रतिसाद आवडला :-)

बोबो's picture

31 Oct 2014 - 5:21 am | बोबो

प्रतिसाद आवड्या.. :)

मी-सौरभ's picture

29 Oct 2014 - 7:47 pm | मी-सौरभ

आपले बरेच विचार पटतात :)
बसणर्‍यातले असाल तर भेटूया कधीतरी पुण्यनगरीत...नसाल तर जनसेवा पण चालेल

समीरसूर's picture

30 Oct 2014 - 9:24 am | समीरसूर

तुम्ही सांगा कधी भेटायचं. कट्टाच करून टाकू एखादा. :-)

अविनाश पांढरकर's picture

30 Oct 2014 - 11:04 am | अविनाश पांढरकर

मी पण येणार!!!!!!

टवाळ कार्टा's picture

30 Oct 2014 - 11:21 am | टवाळ कार्टा

जमले तर मी पण :)

समीरसूर's picture

30 Oct 2014 - 1:30 pm | समीरसूर

जहां चार यार मिल जाये वही रात हो गुलजार...

कट्टा तर जमून राहिलाय असं दिसतंय... :-) बोला कधी आणि कुठे भेटायचे? अजून कोण कोण येतंय?

प्रसाद१९७१'s picture

30 Oct 2014 - 12:29 pm | प्रसाद१९७१

जनसेवा मधे "काम नसताना गप्पा मारत बसू नये" अश्या टाईप च्या पाट्या आहेत.
आणि मालक हाताला धरुन बाहेर काढण्याला पण मागेपुढे बघणार नाहीत.

समीरसूर's picture

30 Oct 2014 - 1:28 pm | समीरसूर

अशी कुठलीच पाटी नाहीये तिथे. आणि तिथला माहोलच असा असतो की जेवण झालं की माणसाला आडवं होता येत नाही म्हणून हात धुतल्यानंतर लोकं लगेच बाहेर पडतात. शिवाय जागेसाठी ताटकळत असलेली माणसं बघून जास्त वेळ थांबायला बरं नाही वाटत. ती जागा गप्पा मारण्यासाठी नाहीच. तिथे तोंड उघडायचं ते फक्त घास घेण्यासाठी. ;-) गप्पा काय, संभाजी पार्कात नाहीतर चौकात उभं राहून देखील मारता येतात. :-) तिथे फक्त जेवायचं. फाईन डायनिंग एक्सपीरियन्स वगैरे शब्दही तिथल्या कर्मचार्‍यांनी किंवा मॅनेजरने ऐकले नसतील. आनेका, खानेका, जानेका...और कुछ नही करनेका...

अर्धवटराव's picture

29 Oct 2014 - 9:11 pm | अर्धवटराव

अगदी मनातले विचार मांडले आहेत...
हिमेशचं "दिल कि सूर्ख दिवारोपे' लय भारी आवडते आपल्याला :)

एकदम मस्त लेख ..आवड आपली आपली !!

बाकी तुम तो ठहरे च मला आश्चर्य नाही वाटले , मी ही त्या एका आणि दुसरे ते यारों मैंनै पंगा ले लिया एकतोच !!

शिवाय खाण्यापिण्याच्या बाबतीत, मी थोडा ..नाही ..थोडा नाही..महाभयानक अडामन्ट आहे का काय माहीत ते स्टार होटेल अणि ते बसुन त्या, काय ते, साद्र संगीत, मध्ये रुबाब दाखविण्यापेक्षा ना , बियर शॉपीच्या आडबाजुला शेंगदाण्याची पुडी एका हातात आणि बाटली दुसर्‍या हातात अशीच आजवर प्यायला आवडली आहे ..पुनम मध्ये तर दोस्तोंकी खातीर ..

आणि खाण्याच म्हणशील तर टपरीच पाहिजे , तुला आजवर चायनीज न खाल्लेला माणुस बघीतला नसेल तर त्याला माझा फोटो दाखव ( हे खाण्यापेक्षा मी गवत खाईन ) , किंवा साध हॉटेल , त्या पुनमला ही मी दाल खिचडी च खाल्ली आहे ..एरवी, स्ट्रीट फुड च ..जिथे आणि जसे भेटेल :)

बाकी मस्त आठवणी निघाल्यात स्वता:विषयी या लेखामुळे ...धन्यवाद यार !!

समीरसूर's picture

30 Oct 2014 - 9:27 am | समीरसूर

पहले तो कभी कभी गम था...हे पण एक भारी गाणं. त्यात नौशीन सरदार होती.

चायनीज मला पण फारसं आवडत नाही. बाकी शिवाजीनगरच्या सिमला ऑफिसच्या मागच्या गल्लीत ज्या टपर्‍या आहेत तिथे वडापाव, मिसळ, वडा सांबार, मसाला डोसा वगैरे पदार्थ छान मिळतात. खरं म्हणजे तिथला माहोल आणि निवांतपणा मला जास्त आवडतो.

सतिश गावडे's picture

30 Oct 2014 - 1:03 pm | सतिश गावडे

पहले तो कभी कभी गम था

हे माझंही आवडतं गाणं आहे. याची एक फिमेल व्हर्जन आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणाजे हे गाणं रहीम शाह नावाच्या अफगाणी गायकानेही गायलं आहे.

गाण्याच्या सुरुवातीचं संगीत अफलातून आहे.

कौन है जो होणार सुन मी ह्या घरची या अभिजात मालिकेला नाव ठेवतोय ?
अरे हि माझी सर्वात आवडती मालिका आहे अतिशय अभिजात अशी मालिका. यात भावनांचे काय नाजुक रेशमी बंध दाखवलेय. तो मुलगा अनेक वर्षांनी घरी परतणारा, तो सपाट कपाळ असलेल्या कस्तुरबांचा करारी अभिनय, तो देखणा सरळमार्गी शहाणा तरुण सालस मुलगा आणि लास्ट बट नेव्हर द लीस्ट
ती ती आसमंताची परी, ती स्वप्नसुंदरी , ती चाफेकळी , ती सुलज्जा, ती म्रुगनयनी, ती कोमलांगिनी, ती सुकेशीनी, ती कामिनी तीच ती
जान्हवी !
एक अस्फुट आरूषी
काय अभिनय आहे तिचा ओहोहो माझ्या आवडत्या मालिके ला नाव ठेउ नका मला वेदना होतात

आदूबाळ's picture

29 Oct 2014 - 10:14 pm | आदूबाळ

एक अस्फुट आरूषी

"एक अस्फुट पुरूषी" असं वाचलं चुकून...

समीरसूर's picture

30 Oct 2014 - 9:30 am | समीरसूर

बरेच रसिक पुरुष प्रेक्षक केवळ जान्हवीसाठी ही मालिका बघतात असा मला दाट संशय आहे. ;-)

ती ती आसमंताची परी, ती स्वप्नसुंदरी , ती चाफेकळी , ती सुलज्जा, ती म्रुगनयनी, ती कोमलांगिनी, ती सुकेशीनी, ती कामिनी तीच ती

वा वा...क्या बात है! :-) ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला...

टवाळ कार्टा's picture

30 Oct 2014 - 9:37 am | टवाळ कार्टा

मी तरी ;)

कौन है जो होणार सुन मी ह्या घरची या अभिजात मालिकेला नाव ठेवतोय ?
अरे हि माझी सर्वात आवडती मालिका आहे अतिशय अभिजात अशी मालिका. यात भावनांचे काय नाजुक रेशमी बंध दाखवलेय. तो मुलगा अनेक वर्षांनी घरी परतणारा, तो सपाट कपाळ असलेल्या कस्तुरबांचा करारी अभिनय, तो देखणा सरळमार्गी शहाणा तरुण सालस मुलगा आणि लास्ट बट नेव्हर द लीस्ट
ती ती आसमंताची परी, ती स्वप्नसुंदरी , ती चाफेकळी , ती सुलज्जा, ती म्रुगनयनी, ती कोमलांगिनी, ती सुकेशीनी, ती कामिनी तीच ती
जान्हवी !
एक अस्फुट आरूषी
काय अभिनय आहे तिचा ओहोहो माझ्या आवडत्या मालिके ला नाव ठेउ नका मला वेदना होतात

सतिश गावडे's picture

29 Oct 2014 - 11:49 pm | सतिश गावडे

मस्त लेख. आवडला.
जनसेवा नेमकं कुठे आहे?

समीरसूर's picture

30 Oct 2014 - 9:32 am | समीरसूर

डेक्कनला चितळेंचं जे मोठं दुकान आहे त्याच्या शेजारी. गरवारे पुलाला लागून मागच्या ज्या गल्लीत डेक्कनचे पोस्ट ऑफिस आहे, तिथे!

सतिश गावडे's picture

30 Oct 2014 - 10:23 am | सतिश गावडे

धन्यवाद.

अमेरिकन त्रिशंकू's picture

30 Oct 2014 - 5:44 pm | अमेरिकन त्रिशंकू

वरिजिनल जनसेवा हे लक्ष्मी रोड्वर गोखले हॉलसमोर होतं. ते बंद पडलं का आहे अजून चालू?

वरीजनल जनसेवा मागेच बंद पडले :(
दुवा

खटपट्या's picture

30 Oct 2014 - 2:37 am | खटपट्या

शिकवण्याच्या पद्धती, अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून घेतले जाणारे उपक्रम वगैरे बाबतीत आयसीएससी वरचढ आहे असे मी ऐकले आहे.

खरंच ??

बाकी लेख आवडला !!

मी रात्री जेउन खाली फिरायला जाताना अर्धी विजार घालतो हे माझ्या बायकोला आवडत नाही कारण तिच्या मैत्रिणींना ते आवडत नाही. तीच्या मैत्रिणींना आवडावे म्हणून मी पुर्ण विजार का घालावी ? अर्धी विजार म्हणजे डाउन मार्केट बहूतेक !!!

समीरसूर's picture

30 Oct 2014 - 9:39 am | समीरसूर

पण रात्री तुम्ही फिरायला जातांना बायकोच्या मैत्रिणींना सोबत घेऊन जात नसणार ना? मग त्यांना आवडण्याचा प्रश्न येतोच कुठे? :-) बायकांना जे आवडतं ते आवडत नाही; जे आवडत नाही ते आवडतं; बायकांचा नकार म्हणजे होकार आणि होकार म्हणजे होकारच! असं काहीसं असतं असं म्हणतात बुवा. ;-)

यावरून "पुरानी जीन्स, और विजार, मुहल्ले की वो छत मेरे यार..." आठवलं. आम्ही गिटारऐवजी 'विजार' म्हणायचो...

अनुप ढेरे's picture

30 Oct 2014 - 9:47 am | अनुप ढेरे

मस्तं लेख, मलाही हिमेसची अनेक गाणी आवडतात आणि त्याची कबुली द्यायलाही लाज वाटत नाही.

आशिक बनाया आपने, २१९७ (२१९७ = १३*१३*१३) सुरूर ही हिमेशची गाणी माझीही अत्यंत आवडती आहेत.

वेल्लाभट's picture

30 Oct 2014 - 2:29 pm | वेल्लाभट

त्याचं जुनूं जुनूं जुनूं जुनूं ऐकून बघ..... खास गाणं !

बॅटमॅन's picture

30 Oct 2014 - 2:33 pm | बॅटमॅन

ऐकलंय की. पण ते इतकं आवडलं नाही.

बाकी, अल्ताफ राजाची खाली उल्लेखिलेली सर्व गाणी चिकारदा ऐकलीत. खास मुसलमान लग्नांत वाजणारी गाणी म्हणूनच मला खरे तर ही जास्ती प्रचलित आहेत.

बॅटमॅन's picture

30 Oct 2014 - 2:34 pm | बॅटमॅन

ऊप्स आय मीन्ट परिचित.

वेल्लाभट's picture

30 Oct 2014 - 2:44 pm | वेल्लाभट

चालायचंच.

टवाळ कार्टा's picture

30 Oct 2014 - 3:24 pm | टवाळ कार्टा

ऐसा कायकू बोल्ते मियां...हमारे हैद्राबादामे एकसू एक कव्वाली गातें लोगां

अरे हाओ रे, ऐसा कव्वाली गाते लोगां, नादिच खुला.

मुक्त विहारि's picture

30 Oct 2014 - 10:14 am | मुक्त विहारि

"माझे रंगज्ञान बायकोला माहित असल्याने माझा सल्ला ग्राह्य धरून तिने पिवळा ड्रेस विकत घेतला. असो. तर बायकोचा फोन आला. मी बायकोचा फोन कट करून माझ्या फोनवरून तिला लगेच फोन लावत असतो. सवयच झाली आहे. आता तिचे आणि माझे कॉल्सचे दर सारखे आहेत तरीही ही सवय सुटत नाही. हेडफोनवर फोन घेतांना माझी नेहमीच तारांबळ उडते म्हणून मी हेडफोन काढून फोन उचलत/करत असतो. यावेळेसही तसेच केले. तिचा फोन कट केला आणि पुन्हा फोन करण्यासाठी हेडफोन काढला. नेमके गाणे चालू असल्याने सगळ्यांना "तुम तो ठहरे परदेसी..." मोठ्या आवाजात ऐकू जाऊ लागले. या गोंधळात हेडफोन माझ्या हातातून खाली पडला. तो उचलावा की गाणे बंद करावे या गोंधळात गाणे चांगले १०-१२ सेकंद मोठ्या आवाजात वाजत होते. आजूबाजूची मंडळी हसून माझ्याकडे बघत होती. "

००००००

सहमत.... सेम हियर...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Oct 2014 - 10:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सही रे सही, मला पहिलाच उतारा आवडला. अजून फुलं टाकली असती तर तोच पुष्प गुच्छ मला खुप आवडला असता. इति...

-दिलीप बिरुटे

वेल्लाभट's picture

30 Oct 2014 - 11:01 am | वेल्लाभट

असं झालं होतं तुम्हाला.... बरोब्बर? :) असो.

आता प्रतिसादात काय काय लिहू असं होतंय मला.
बर मुद्द्यांनुसार जातो.

नदीम-श्रवणचे संगीत:

: खरं तर संपूर्ण नव्वदीच्या दशकातलं संगीत, अगदी २००३ २००४ पर्यंत... हे आताच्यापेक्षा कमालीचं श्रवणीय व मेलडीयस होतं असं मला वाटतं. मला वैयक्तिक हे संगीत अत्तिशय आवडतं, माझ्याकडे कलेक्शन आहे खास जमवून जमवून केलेलं. हवं असल्यास सांगा. त्यात रिक्शा साँग्स, किंवा खतरनाक साँग्स असा एक वेगळा फोल्डर असून, त्यामधे 'गादीवाल्या-गाणीवाल्या' (आमची टर्म) रिक्षांमधे वाजणारी खास गाणी आहेत. ढस्स्स्स्स ढस्स्स्स्स्स असा ट्रेबल हेवी आवाज .... आहाहा ! मझाच वेगळा. गाडीतल्या माझ्या पेन्ड्राईव्ह मधे न चुकता हे कलेक्शन असतं.

"तुम तो ठहरे परदेसी":

अल्ताफ राजा अफाट माणूस आहे आणी तीन-पाच गाण्यांनीच का होईना तो अमर झालेला आहे. आवारा हवा का... ची पारायणं झालीयत माझी.

चेन्नई एक्सप्रेस

बघितला नाही, सो नो कमेंट्स.

हाउसफुल

भारी आहे. ह ह पु वा. पण उत्तरोत्तर साजिद खान नामक इसम भावात गेला, वहावत गेला........ आणि मग डोक्यात गेला.

हिमेश रेशमिया

.... नाकगंधर्व ! (कानाला हात लावतो).... काय बोलावं हिमेश सरांबद्दल ! केवळ कमाल गायक, संगीतकार. मला, प्रामाणिकपणे त्याची गाणी ऐकायला आवडतात, मजा येते. आशिक बनाया.... पासून ते मन का रेडियो, तंदूरी नाईट्स पर्यंत. एक से एक. याचंही कलेक्शन आहे भलं मोठ्ठं. हवं असल्यास सांगणे.

उई अम्मा ते तोफा तोफा

..... हं सहमत

धनंजय

:) सहीच!

डायनिंग हॉल्स

.... पंजाबी-चायनिज पासून सुटका हवी असल्यास जरूर जाणे. 'सर्व्ह' केलेल्या खाण्यापेक्षा 'वाढलेलं' खाण्याची मजाच और. ती खरी मजा.

पान

घरी जमवलेलं छान लागतंच, पण बाहेरच्या कलकत्ता मसालाची चव न्यारी.

एकपडदा चित्रपटगृहे

माझा एक मित्र असा आहे की तो आणि मी आवर्जून पिक्चर बघतो आणि तेही एकपडदा मधेच. शक्यतोवर स्टॉल मधून. पान-तंबाखूचा भरून राहिलेला वास. खड्खड वाजणा-या खुर्च्या. पिक्चर सुरु झाल्यापासून संपेपर्यंत, शिट्या, टाळ्या, आणि चहूबाजूंनी कानावर येणारे 'फिलर्स' यांचा आनंद घेत पिक्चर बघून जी धमाल येते ती पुढच्या १० मल्टिप्लेक्स मधे बघितलेल्या पिक्चरांनी एकत्रितपणेही येत नाही.

असो.

लेख आवडला. त्यातल्या गोष्टीही आवडल्या. वर म्हटल्याप्रमाणे.

नोकरी लागल्यावर पहिलं शॉपिंग कुठे करायचं हा प्रश्न उभा राहिल्यावर सगळ्या मैत्रिणींसोबत, आयुष्यात पहिल्यांदाच मॉलची पायरी चढले.तिथे असलेल्या किमती बघून लगेचच स्ट्रीट-शॉपिंग हा एकमेव पर्याय निवडला.पण, मुंबईमधल्या स्ट्रीट-शॉपिंगची मी इतकी जाहिरात केली की त्या मैत्रिणी सुध्दा सुरूवातीला डाऊनमार्केट वाटणा-या त्या मार्केटमधे नंतर नेमाने घिरट्या घालायला लागल्या ;)

चिगो's picture

30 Oct 2014 - 12:23 pm | चिगो

हेच आणि हेच.. अत्यंत खुमासदार लेख.. खासकरुन बायको आणि 'काव्या'चं वर्णन खासच.. :-)

मलाही हेच एक पटत नाही. तुम्ही साला मार्केटात चालू असलेल्या सद्य फॅशननुसार किंवा जिला जनता उच्च अभिरुची मानते त्यानुसार आपली आवड सांगत असाल, पण म्हणून दुसर्‍यांच्या आवडीला हीन मानण्यात काय अर्थ?

मला अन्नू मलिकचीपण काही गाणी आवडतात. खासकरुन "अकेले हम अकेले तुम' मधली. तेच नदीम-श्रवण बद्दल

अल्ताफ राजाची "तुम तो ठहरे परदेसी" मधली जवळजवळ सगळीच गाणी आवडतात. त्यातल्या एका गाण्यातला "वो चाहती थी रुह भी उसें सौंप दे मगर उस आदमी की बस बदन पर निगाह थी.." हा पुर्ण शेर मी एका स्पर्धेतपण वापरला होता.. ;-)

चेतन भगतची काही पुस्तके मला आवडतात, हे म्हटलं की लोक लैच हेय दृष्टीनं बघतात पहा.. आणि मला "कोसला" आवडलं नाही, "मृत्युंजय" "युगंधर" लै शब्दबंबाळ वाटतात, मात्र सु.शि. माझे आवडते लेखक आहेत म्हटलं की तर कारुण्याचा माराच होतो माझ्यावर.. (मागे ती "बकेट लिस्ट"ची लाट आली होती त्यात तर कुणा मराठी पोरांच्या लिस्टमधे मराठी पुस्तक दिसणं, हेच दुर्मिळ होतं.. :-( )

पुन्हा एकदा, खुमासदार लेखासाठी धन्यवाद.. लोकांसमोर "उच्चभ्रु" दिसण्यासाठी बेगडी आवडी जपणार्‍यांना फाट्यावर मारा. प्रामाणिकपणे आपली आवड उपभोगत जगण्यातली मजाच निराळी असते राव..

वेल्लाभट's picture

30 Oct 2014 - 12:30 pm | वेल्लाभट

लोकांसमोर "उच्चभ्रु" दिसण्यासाठी बेगडी आवडी जपणार्‍यांना फाट्यावर मारा. प्रामाणिकपणे आपली आवड उपभोगत जगण्यातली मजाच निराळी असते राव..

या वाक्यासाठी टाळी घ्या ! क्या बात है!
हेच तर आहे ना.... कळत नाही दुनियेतल्या ९०% लोकांना....

आदूबाळ's picture

30 Oct 2014 - 12:52 pm | आदूबाळ

अल्ताफ राजाच्या त्याच अल्बममधलं महिन्यांचं गाणंही क्लासच होतं...

समीरसूर's picture

30 Oct 2014 - 1:33 pm | समीरसूर

ते "तुम तो ठहरे..." च आहे...

जब उनसे इत्तेफाकन...जब उनसे इत्तेफाकन मेरी नजर मिली थी
अब याद आ रहा है शायद वो जनवरी थी...

क्या नजाकत है...क्या अंदाज है...वा!

समीरसूर's picture

31 Oct 2014 - 2:20 pm | समीरसूर

'अकेले हम अकेले तुम'ची गाणी छानच होती. अन्नु मलिकची काही गाणी मला खूप आवडतातः

चोरी चोरी जब नजरे मिली...- करीब
ऐसा जख्म दिया है जो ना फिर भरेगा...- अकेले हम अकेले तुम
हाये मेरा दिल चुरा के ले गया...- जोश
तेरे दर पे सनम चले आये...- फिर तेरी कहानी याद आयी
वो तसव्वुर क आलम...- ऐतराज
ऐ मेरे हमसफर, ऐ मेरी जानेजा...- बाजीगर
किताबे बहुत सी पढी होंगी तुमने...- बाजीगर
चुरा के दिल मेरा गोरीया चली...- मै खिलाडी तू अनाडी
पास वो आने लगे जरा जरा...- मै खिलाडी तू अनाडी
तुम से मिलके दिल का है ये हाल क्या कहे...- मै हूं ना
ढोल बजने लगा, गांव सजने लगा, कई लौट के आया है...- विरासत
गेला गेला दिल गेला गेला...- ऐतराज
चंदा मामा सो गये...- मुन्नाभाई एम बी बी एस
एक एक हो जाये फिर घर चले जाना...- गंगा जमुना सरस्वती
बरसात मे जब आयेगा सावन का महिना...- माँ

टवाळ कार्टा's picture

31 Oct 2014 - 3:34 pm | टवाळ कार्टा

मला "ऊंची है बिल्डिंग..." आवडते...ते पण अन्नुच्याच आवाजात...चायना मोबाईलवाल्याबरोबर जुगलबंदीसाठी :)

योगी९००'s picture

31 Oct 2014 - 4:38 pm | योगी९००

जबराट लिहिलय की भाऊ...हाउसफुल आणि हिमेसभाई सोडले तर बाकी आवड बर्‍यापैकी मॅच होतायत...

अन्नू मलीक ची आणखी काही गाणी माझी ऑल टाईम फेवरेट आहेत..
पंछी नदीया पवन... रेफ्यूजी
ऐसा लगता है - रेफ्यूजी
छन छन.. -मुन्नाभाई एम बी बी एस
चले जैसे हवाये...मै हू ना
तुमसे मिलके दिल का - मै हू ना..

टवाळ कार्टा's picture

31 Oct 2014 - 4:44 pm | टवाळ कार्टा

संदेसे आते है????

जिन्क्स's picture

4 Nov 2014 - 8:23 pm | जिन्क्स

LOC Kargil चित्रपटातील "एक साथी और भी था" हे गाणं मला प्रचंड आवडतं. एक तर जावेद अख्तर चे शब्द जबरदस्त काळजाला भिडतात आणि त्यातुन आन्नू मलिक ने जी चाल दिली आहे ती लाजवाब आहे.

अविनाश पांढरकर's picture

30 Oct 2014 - 3:40 pm | अविनाश पांढरकर

हे म्हटलं की लोक लैच हेय दृष्टीनं बघतात पहा, पण जाऊदे लोकच ती!!!

सिरुसेरि's picture

30 Oct 2014 - 3:56 pm | सिरुसेरि

पुर्वी प्रभातला दादा कोंड्केंचे चित्रपट पाहणे , भरतला मराठी संगीत नाटक पाहणे , आणी अलका , विजयला ईंग्लिश मुव्हीस पाहणे यात मजा असायची .

बोबो's picture

31 Oct 2014 - 5:26 am | बोबो

लेख आवडेश :)

स्मिता श्रीपाद's picture

31 Oct 2014 - 11:24 am | स्मिता श्रीपाद

समीर मस्त लेख..
परवाच जनसेवात जाण्याचा विषय झाला...:-)..माझं न नवर्याचं खुप आवडतं....:-)
आता सोबत जाउ :-)

मला पण तुम तो ठेहेरे परदेसी जवळच वाटतं.....आवडतं असं नाही म्हणणार..कारण मी आवर्जुन ते ऐकायला जात नाही कधी....पण कुठे चालु असेल तर गाणं एन्जॉय करु शकते :-)
माझा अक्खा बारावी चा अभ्यास मी या गाण्याच्या बॅग्राएउंडला केलाय...
शेजारचे अस्लम्चाचा हे गाण दिवसभर लावायचे न मी त्याच्या तालावर अभ्यास करायचे रोज :-)

आवडी निवडी ही वैयक्तिक बाब आहे. आपल्याला काय आवडतं हे माहित असलं की झालं, ते इतरांना कसं वाटतं याने काय फरक पडतो? आपल्या सर्व लेखाचा सूर 'मला हे जे आवडतं ते फार विचित्र असल्याने बहुसंख्य लोकांना आवडत नाही आणि त्यांची मला पर्वा नाही' असा झाला आहे. हा काल्पनिक संवाद आहे, आणि ओढून ताणून आणलेला आहे. त्या काल्पनिक विरोधकांना आपण देत असलेले उत्तर हे आक्रस्ताळ्या पद्धतीचे आहे. एखादी गोष्ट आपल्याला आवडते आणि ती का आवडते हे सांगायचे राहिले बाजूलाच आणि आपल्यासकट वरचे सर्व प्रतिसाद देणारे पण कुठल्यातरी काल्पनिक विरोधकांना झोडपत बसले आहेत.

हे खालचं वाक्य आपल्या लेखात आहे हे आपण स्वतःच विसरलेले आहात का?

पण जिथे वैयक्तिक आवड-निवड महत्वाची असते तिथे असा फरक करणं कितपत योग्य आहे?

कारण वर आपण हा असा प्रतिसाद दिलेला आहे-

विरोधाभास वगैरे काही नाही हो; 'जुळून येती...' ज्यांना पहायचं त्यांनी पहावं पण दुसर्‍यांच्या आवडीला का नाकं मुरडावीत? त्यांनी मुरडली तर मग मला नाक नाही का? माझ्या नाकानेच काय घोडं मारलंय?

म्हणजे एकाने गाय मारली तर दुसर्‍याने वासरू मारावे असे झाले. आपल्याला नाही ना वाटत असं वागणं योग्य? मग का वागता तसं?

समीरसूर's picture

31 Oct 2014 - 1:56 pm | समीरसूर

चुकलंच खरं! :-(

ज्ञानोबाचे पैजार's picture

31 Oct 2014 - 2:31 pm | ज्ञानोबाचे पैजार

लेख प्रचंड आवडल्या गेला आहे.
उच्चभ्रुपणाचा बेगडी आव आणणार्‍यांना योग्य ठिकाणी मारावे.

चढता सुरज धिरे धिरे,
तुम तो ठहेरे परदेसी,
उलाल्ला उलाल्ला,
इक बगलमे चांद होगा,
ओ री दुनिया,

ही गाणी आणि दादा कोंडके आणि बाप्पीदांची सगळी गाणी
प्रचंड आवडतात.

प्रभात आणि लक्ष्मीनारायण मधे पिच्चर बघायला मला पण फार आवडते.

या शिवाय
- सुटीच्या दिवशी सकाळी किंवा इतर दिवशी संध्याकाळी पर्वती / तळजाई / सिंहगडावर भटकायला जाणे
- कर्वेनगर मधिल म्हसोबा डोसा सेंटर मधला डोसा खाणे
- माधुरी दिक्षीत आणि मधुबाला यांना पहात रहाण्यासाठी त्यांचा कोणताही चित्रपट पहाणे
- स्वारगेट एस.टी स्टँड किंवा बसस्टॉपवर तासभरतरी नुसते बसुन रहाणे
- किंवा कात्रज निगडी बसने निगडीला जाउन त्याच बसने त्याच सीटवर बसुन परत येणे
- रात्री उशीरापर्यंत बिल्डींगच्या पाण्याच्या टाकीवर बसुन तासनतास आकाशाकडे बघत रहाणे
- आणि सु.शि.चे कोणतेही पुस्तक उचलुन कोणत्याही पाना पासून सुरुवात करुन वाचत रहाणे

मला प्रचंड आवडते. हे असे काही करताना कोण काय म्हणते / म्हणेल याची मी मुळीच पर्वा करत नाही.

पैजारबुवा,

प्रसाद१९७१'s picture

31 Oct 2014 - 2:56 pm | प्रसाद१९७१

- किंवा कात्रज निगडी बसने निगडीला जाउन त्याच बसने त्याच सीटवर बसुन परत येणे
- रात्री उशीरापर्यंत बिल्डींगच्या पाण्याच्या टाकीवर बसुन तासनतास आकाशाकडे बघत रहाणे

हे खास आहे

तुम तो ठहरी परदेसी प्रवासात ऐकायला विशेष भारी आहे.
लवकर संपत नाही आणी मजाही येते.

सिरुसेरि's picture

31 Oct 2014 - 3:48 pm | सिरुसेरि

अल्ताफचे "थोडा ईन्तजारका मजा लिजिये " ऐकायला छान वाटते . हिमेशची "आपकि कशिश सरफरोश है" , "दिलकी गिरह्मे इक आगसी लगी है" , "लागी लागी लागी प्रेमधून लागी" ही गाणीपण माहोल बनवितात. या 'प्रेमधून' गाण्याची चाल तर एका मराठी भक्तीगीता सारखी वाटते. होणार सून मी मध्ये जान्हवीचे वडील तिला जानू , जानू अशी हाक मारतात , ते मात्र ऐकायला विचित्र वाटते . उगाचच "जानू मेरी जान मै तेरे कुर्बान" या गाण्याची आठवण होते .

बॅटमॅन's picture

31 Oct 2014 - 4:05 pm | बॅटमॅन

प्रेमधून आणि आपकी कशिश या दोहोंबद्दल अतिशयच सहमत.

अरे कोणाला "आवारा पागल दीवाना" नावाचा कहर शिणुमा आवडतो का?

टवाळ कार्टा's picture

31 Oct 2014 - 4:49 pm | टवाळ कार्टा

अरे येडा आण्णा आणि छोटा छत्रीचा फ्याण आहे मी...गुरु गुलाब खत्री पण जबरा...पहिल्यांदीच परेश रावलला कोणीतरी झाकोळले

आदूबाळ's picture

31 Oct 2014 - 5:44 pm | आदूबाळ

परेश रावलच्या पात्राची कल्पनाच जबरदस्त आहे.

- येडा आन्नाला खारा गन्ना
- छोटा छत्रीला ताडपत्री
- गुरूगुलाबला "मंगलभाई" (गुरू--> मंगळ या न्यायाने)

तेव्हा हसून हसून वाट लागते.

टवाळ कार्टा's picture

31 Oct 2014 - 5:52 pm | टवाळ कार्टा

पण परेश रावळने शेवटचा सीन खाल्ला आहे =))

अर्धवटराव's picture

1 Nov 2014 - 1:05 am | अर्धवटराव

अब्भि किसिने पुछा मणिलाल कहा जा रहे हो =))