चेतन भगत आणि त्याची पुस्तकं

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
25 Oct 2014 - 9:57 pm

रेल्वे स्टेशनवरची पुस्तकांची दुकानं हा एक वेगळाच प्रकार आहे. नेहमीची वर्तमानपत्रं आणि नियतकालिकांशिवाय इतरही बरीच ' इंटरेस्टिंग ' पुस्तकं तिथे दिसतात. स्पर्धा परीक्षांची पुस्तकं; काॅमिक्स; ' हाऊ टू ' प्रकारातली पुस्तकं; वशीकरण, इंद्रजाल, लाल किताब असले डोक्याला शाॅट असणारे प्रकार; पाककृती; चाणक्यनीती; अकबर-बिरबल वगैरे भरपूर मालमसाला या स्टाॅल्सवर बघायला मिळतो. एकाच ठिकाणी मुन्शी प्रेमचंद आणि सुरेंद्र मोहन पाठक सारख्या दोन टोकाच्या लेखकांच्या कादंब-या तुम्हाला रेल्वे स्टेशन स्टाॅलवरच सापडतील. ज्याला टाईमपास लिटरेचर म्हणून अभिजनवादी नाकं मुरडतात, त्यातलं बहुतांशी वाङ्मय इथे मिळतं. गेली दहा वर्षे चेतन भगत नामक माणसाची पुस्तकं ही या दुकानांमधल्या सर्वात खप असलेल्या पुस्तकांपैकी आहेत. त्याच्या २००४-०५ मध्ये प्रकाशित झालेल्या ' फाइव्ह पाॅइंट समवन ' पासून ते आत्ता आलेल्या ' हाफ गर्लफ्रेंड ' पर्यंत सगळी पुस्तकं या स्टाॅल्सवर मिळतात.
शाळा-कॉलेजच्या मुलांना त्याची पुस्तकं आवडतात. ज्यांचं शालेय शिक्षण भारतीय भाषांमध्ये झालेलं आहे अशी बरीचशी मुलं इंग्रजी वाचायला सुरुवात करताना चेतन भगतच्या एखाद्या कादंबरीपासून सुरुवात करतात असं निरीक्षण अाहे.
पण त्याच वेळी समीक्षकांची मतं पाहिली तर त्यांनी या पुस्तकांना फाडून खाल्लं आहे. पहिल्या ' फाइव्ह पाॅइंट समवन ' ला समीक्षकांनी थोडा बरा प्रतिसाद दिला होता पण त्याच्यानंतर आलेल्या प्रत्येक पुस्तकावर टीका झालेली आहे. किंबहुना मी एका आंग्लाळलेल्या, उच्चभ्रू, दक्षिण मुंबईतल्या महाविद्यालयात मुलांना बिघडवण्याच्या कामावर होतो (पु.लं.ची क्षमा मागून) तेव्हा माझ्या काही सहका-यांनी या पुस्तकांबद्दल व्यक्त केलेली मतं ऐकूनच मी ती वाचायला सुरुवात केली.
सर्वात प्रथम मला जाणवलेली एक गोष्ट म्हणजे त्याची भाषा ही साधीसरळ, फार जास्त अलंकारिक वगैरे नसलेली अशी आहे. कोणालाही पटकन समजण्याएवढी. त्याची पात्रं ही कोणी असामान्य वगैरे नसतात. मध्यमवर्गीयच असतात. त्यांच्या आयुष्यात काही घटना घडतात आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य बदलतं. बहुतेक वेळा त्याची मुख्य पात्रं ही महाविद्यालयीन तरुण असतात. त्यांची नेहमीच्या वापरातली भाषा चेतन बरोबर पकडतो. काही कादंब-यांमधली त्याची पात्रं ही भारतातल्या काही अत्यंत नावाजलेल्या शिक्षणसंस्थांमधले विद्यार्थी आहेत. तिथलं वातावरण उभं करण्यात तो ब-यापैकी यशस्वी होतो.
त्याच्यावर घेतल्या जाणा-या आक्षेपांपैकी एक म्हणजे त्याची प्रत्येक कादंबरी ही प्रथमपुरूषी आहे. प्रत्येक कादंबरीत मी हा निवेदक आहे. काही कादंब-यांमध्ये चेतन स्वतःपण असतो. त्याला निवेदक भेटतो आणि आपली कथा ऐकवतो. स्पष्टपणे सांगायचं तर यात खटकण्यासारखं काय आहे तेच मला अजून कळलेलं नाही. तृतीयपुरूषी निवेदन श्रेष्ठ आणि प्रथमपुरूषी कनिष्ठ असे काही समीक्षकांचे निकष असल्यास मला माहीत नाहीत.
दुसरा आक्षेप म्हणजे सेक्स. चेतनच्या प्रत्येक कादंबरीत सेक्सचं वर्णन आहे. मला हाही आक्षेप कळलेला नाही. त्याच्या कादंब-यांमधले नायक-नायिका हे तरुण आहेत, त्यांना एकमेकांविषयी शारीरिक आकर्षण वाटणं स्वाभाविक आहे. कदाचित हा आक्षेप घेणारे आपलं तारुण्य विसरले असावेत किंवा आजकालच्या तरुणांमध्ये लैंगिक अनुभव घेण्याचं वय काय आहे हे त्यांना माहीत नसावं.
मी माझ्या एका ज्येष्ठ सहकारी प्राध्यापिकेला तिने चेतनला यथेच्छ शिव्या घातल्यावर तो लेखक म्हणून न आवडण्याचं कारण विचारलं. तिने मुख्य कारणं म्हणून जी दोन कारणं सांगितली त्याने मला जी झीट आली, त्यातून मी अजून सावरलेलो नाही.
तिच्यामते पहिला आक्षेप हा आहे की त्याची पुस्तकं ही कुठल्याही गंभीर विषयाला हात घालत नाहीत आणि पात्रांच्या आयुष्यातला संघर्ष हा फार वरवरचा आहे. आणि दुसरा आक्षेप - ही पुस्तकं लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांना वाङ्मयीन मूल्य नाही.
मी इंग्रजी किंवा मराठी, कोणत्याच वाङमयाचा शास्त्रीय अभ्यास केलेला नाही. समीक्षालेख वाचलेले आहेत. त्यातले बरेचसे न समजल्यामुळे त्या फंदात परत पडलो नाही. पण मला एकच समजतं - कथेच्या किंवा कादंबरीच्या पहिल्या पानापासून जर लेखकाच्या भाषेने तुमच्या मनाचा ताबा घेतला नाही, तर पुढे ती कथा किंवा कादंबरी वाचनीय असण्याची शक्यता फार कमी असते. उदाहरणार्थ श्री.ना.पेंडशांच्या ' रथचक्र ' ची सुरूवात काहीशी अशी आहे (चूभूद्याघ्या) - ' तिच्या पोटात गर्भ वळवळत असताना तो घरातून पळून गेला होता.' ही मनासारखी सुरुवात मिळेपर्यंत आपण कादंबरीला सुरुवात केली नव्हती असं मी खुद्द श्री.नां. च्या तोंडून त्यांच्या मुलाखतीत ऐकलं आहे.
इथे कुठलीही तुलना करायची नाही पण वाचनीयता हा चांगल्या लेखनाचा किंवा लेखनाला चांगलं म्हणायचा निकष असायलाच हवा. दोन पानांच्या पलिकडे वाचवता नाही पण लिहिलंय फारच उत्तम - याला काही अर्थ आहे?
अजून एक आक्षेप चेतन भगतच्या लिखाणावर हा आहे की तो सगळ्या कादंब-या या पुढे त्यावरून चित्रपट निघेल अशा पद्धतीनेच लिहितो. मला यातही काही तथ्य वाटत नाही. चित्रपट हे अत्यंत ताकदवान माध्यम आहे आणि आजच्या तरूण लेखकांपैकी कितीजणांनी आयुष्यात एकही चित्रपट पाहिलेला नाही? असं कोणीच सापडणार नाही. म्हणजे आज जेव्हा एखादा लेखक लिहायला सुरूवात करतो तेव्हा त्याच्या मनावर चित्रपटांनी केलेला संस्कार पुसून लिहिणं त्याला शक्य आहे का? चेतन हा एक व्यावसायिक लेखक आहे त्यामुळे अमूर्त किंवा अॅबस्ट्रॅक्ट लिहिणं हे त्याच्यासाठी आर्थिक दृष्ट्या तोट्याचंच ठरेल.
मुळात त्याच्यासारख्या लेखकाकडून एखाद्या क्लासिकची अपेक्षा ठेवणं हेच मला चुकीचं वाटतं. पाथेर पांचाली आणि आवारा हे वेगळे आणि वेगळ्या हेतूंनी निर्माण केलेले कलाविष्कार आहेत. आणि रसिकांना दोन्हीही आवडू शकतात. अबक हा यरलवश सारखा लिहित नाही म्हणून मला तो आवडत नाही हे म्हणणं, माझ्यामते तरी, हास्यास्पद आहे.
असो. या सगळ्या लेखनकामाठीचे प्रयोजन म्हणजे मी आजच हाफ गर्लफ्रेंड ही चेतन भगतची नवी कादंबरी वाचली. नाशिक ते मुंबई या रेल्वेच्या साडेतीन ते चार तासांच्या प्रवासात मी ती अखंड वाचून काढली. मला आवडली. गाडी मुंबईत आल्यावरच माझं लक्ष बाहेर गेलं (विंडो सीट असूनसुद्धा). वाचून झाल्यावर सहज म्हणून मी माझी प्रतिक्रिया मित्रांना आणि ओळखीच्या अनेक वाचकांना सांगितली. त्यावर त्यांनी जे म्हटलं त्यामुळे हा लेख लिहावासा वाटला. मिपावरचे वाचक नक्कीच चोखंदळ आणि साक्षेपी आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया काय असतील याची मला उत्सुकता आहे.

वाङ्मयमत

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

25 Oct 2014 - 10:16 pm | कवितानागेश

मला एकदा वाचायला नक्की आवडली त्याची पुस्तके. पण परत मुद्दम वाचेन असे नाही. पण हे इतरही पुष्कळ पुस्तकान्चे होते. त्यात चेतन भगतला दोष द्यायला नकोय.

चेतन भगत ची पुस्तक छान असतात. त्याची भाषा प्रवाही असते विषय समकालीन व सेन्सीबीलीटीज शहरी असतात. मजा येते सेन्स ऑफ ह्युमर ही सुरेख आहे त्याचा. आटोपशीर लिहीतो मस्त पाल्हाळ लावत नाही. पण पण मित्रा चेतन भगत हा दिर्घ वाचन प्रवासातलं सुरुवातीच्या स्टेशन्स पैकी एक आहे. तिथेच उतरलास तरी हरकत नाही आवडल तेच स्टेशन तिथली वेटींग रुम तिथला चहा एकंदरीत वातावरण आवडल पुढच्या प्रवासाला जायचच नाही म्हणालास तर तरी काय नाही पण मग मोठे मोठे स्टेशन्स आहेत रे पुढे तुलना नाही करतोय फक्त मजा मग राहुन जाइल इतकच म्हणतोय. प्रवास कसा सतत चालु रहावा नाही का त्याच्यात मजा है
जॉय लाइज इन जर्नी नॉट इन डेस्टीनेशन
चलते रहो बोका तुम्हे तुम्हारी माउ जरुर मिलेगी

बोका-ए-आझम's picture

26 Oct 2014 - 12:04 am | बोका-ए-आझम

हाहाहा! मी स्वतः चेतन भगतची पुस्तकं कुतूहल म्हणूनच वाचली. इन फॅक्ट मी वाचलेला पहिला इंग्रजी लेखक चार्ल्स डिकन्स होता. पण मला चेतन भगत पण आवडला आणि तो ज्यांना आवडत नाही त्यांनी दिलेली कारणं अनाकलनीय आणि तर्कदुष्ट वाटली.

१- तु बाबा आझम के जमाने का बोका है म्हणजे तु पहीला बोका आहेस. (आद्य पुरुष अ‍ॅडम/बाबा आझम सारखा आद्य बोका )
२- तु म्हणतोस तु वाचलेला पहीला लेखक चार्ल्स डीकन्स होता" व्हॉट ग्रेटर गिफ्ट दॅन द लव्ह ऑफ कॅट" म्हणणारा डिक्न्स च तु निवडलेला पहीला इंग्रजी लेखक ज्याने आपल्या प्रिय माउ च्या निधनानंतर तिचा टॅक्सीडर्मीस्ट कडुन लेटर ओपनर बनवुन घेतला होता.
http://www.slate.com/blogs/the_vault/2012/12/18/charles_dickens_cat_the_...
३- मी हे सर्व निव्वळ योगायोग समजुन ही विसरुन गेलो असतो मात्र तुझ्या लेखावर पहीला प्रतिसाद यावा तो ही एका
माउ चा च
धिस इज टु मच हं

बोका-ए-आझम's picture

26 Oct 2014 - 10:23 am | बोका-ए-आझम

आद्य बोका हे आवडलं. डिकन्सला मांजरं आवडत असत एवढं माहीत होतं पण ही taxidermy बद्दल माहिती नव्याने कळली. त्याबद्दल धन्यवाद!

सतिश गावडे's picture

25 Oct 2014 - 11:13 pm | सतिश गावडे

चेतन भगतने लिहायला सुरुवात करेपर्यंत मी कथा, कादंबरी असं काल्पनिक प्रकारातील वाचन बंद केलं होतं. त्यामुळे चेतन भगतने लिहिलेलं काहीही वाचलेलं नाही.

नाही म्हणायला त्याच्या दोन कादंबर्‍या अप्रत्यक्षपणे चित्रपटांमार्फत पाहण्यात आल्या. एक "वन नाईट अ‍ॅट कॉल सेंटर" आणि दुसरे "थी इडीयटस" ज्या कांदबरीवर आधारीत आहे ती.

माझ्या ओळखीतले खुप जण आहेत जे इंग्रजी कादंबर्‍या जरुर वाचतात मात्र चेतन भगतच्या कादंबर्‍यांना हातही लावत नाहीत. अर्थात तो त्यांचा प्रश्न आहे. तसेच "आम्ही चेतन भगत वाचतो" असा स्टेटस सिंबॉल असणारा एक नव-इंग्रजी वाचकांचाही वर्ग आहेच. :)

चेतन भगतने लिहायला सुरुवात करेपर्यंत मी कथा, कादंबरी असं काल्पनिक प्रकारातील वाचन बंद केलं होतं. त्यामुळे चेतन भगतने लिहिलेलं काहीही वाचलेलं नाही.

नाही म्हणायला त्याच्या दोन कादंबर्‍या अप्रत्यक्षपणे चित्रपटांमार्फत पाहण्यात आल्या. एक "वन नाईट अ‍ॅट कॉल सेंटर" आणि दुसरे "थी इडीयटस" ज्या कांदबरीवर आधारीत आहे ती.

माझ्या ओळखीतले खुप जण आहेत जे इंग्रजी कादंबर्‍या जरुर वाचतात मात्र चेतन भगतच्या कादंबर्‍यांना हातही लावत नाहीत. अर्थात तो त्यांचा प्रश्न आहे. तसेच "आम्ही चेतन भगत वाचतो" असा स्टेटस सिंबॉल असणारा एक नव-इंग्रजी वाचकांचाही वर्ग आहेच. >>

+१

एकच वाचलं, त्यानंतर हात जोडले !! ज्यांना तो आवडतो वगैरै, त्यांनी महेन्द्र राव ही वाचावेत हि विनंती :)

मृत्युन्जय's picture

6 Nov 2014 - 5:22 pm | मृत्युन्जय

सेच "आम्ही चेतन भगत वाचतो" असा स्टेटस सिंबॉल असणारा एक नव-इंग्रजी वाचकांचाही वर्ग आहेच.

चेतन भगत?? छ्या.. आम्ही असले काही वाचत नाही. असा म्हणणारा एक उच्चभ्रू इंग्रजी वाचक वर्गही आहेच की. ;)

टवाळ कार्टा's picture

25 Oct 2014 - 11:49 pm | टवाळ कार्टा

five point someone भन्नाट आहे...विंजिनेर लोकांच्या डोस्क्यातून मनात लगेच उतरते...विंजिनेर नसलेल्या लोकांना ते नाही तितके जवळचे वाटणार....

भृशुंडी's picture

26 Oct 2014 - 12:13 am | भृशुंडी

भगतावरचे दोन मुख्य आक्षेप :
१. पुस्तकं - मला तो डॅन ब्राउनसारखा लेखक वाटतो. त्याच्या कथेतील विषय खरंच उत्तम असतात. चित्रपटाची पटकथा म्हणून हे नक्कीच १००% हिट आहेत.
पण लेखक म्हणून ज्या काही अपेक्षा आहेत त्यावर मला भगत वाचनीय वाटला नाही.
शैली: माझ्या दृष्टीने तरी शून्य मार्क.
वाचनीयता : खूप गोष्टींची पुनरावृत्ती होते. ३ मित्र, त्यांची जवळपास तशीच व्यक्तिचित्रं, तोंडी लावायला थोडा रोमान्स वगैरे. (पहिली ३ पुस्तकं) नंतर पुन्हा मुलगा-मुलगी ह्या टायपात तशीच पुनरावृत्ती.

२ भगतगिरी- ह्यात त्याचा लेखक म्हणून काहीही दोष नाही. पण एकूणच कारण नसताना ज्यात त्यात तोंड घालून, किंवा उपदेशपर सुभाषितं बरळून वात आणलेला आहे.

खटपट्या's picture

26 Oct 2014 - 12:31 am | खटपट्या

ही पुस्तकं लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांना वाङ्मयीन मूल्य नाही.

खपल्या गेलो आहे

बोका-ए-आझम's picture

26 Oct 2014 - 12:36 am | बोका-ए-आझम

मी पण हे ऐकल्यावर जो आ वासला तो अजून मिटायचे नाव घेत नाही!

साहित्यिक मूल्यं वगैरे जाऊ द्या, पण निव्वळ कथावस्तु आणि शैली या दोन्हीसाठी भगत डोक्यात जातो.

तो ओढूनताणून गोष्ट "उबवतो". (याबद्दल मिपावरच एक प्रतिसाद दिला होता. सापडला तर डकवतो.) उदा. टू स्टेट्स मध्ये नायिकेच्या तमिळ आईबापांना पटवण्यासाठी कंपनीच्या कार्यक्रमात गायची संधी देतो. नायकाच्या मार्गात आलेल्या अडचणी आपोआप, योगायोगाने दूर होतात. हे म्हणजे आधी भिंतीवर बाण मारायचा, मग त्याभोवती वर्तुळ रंगवायचं, आणि "कसा नेम मारला" म्हणून 'जितं मया' म्हणून नाचायचं - याला अर्थच नाही.

कथेतला तिढा सोडवण्यासाठी "देवाने केलेला फोन" असला निर्बुद्ध plot device वापरणे हेही त्यातलंच.

तरीही - फाईव पॉइंट समवन आवडलंच होतं. अगदी निर्विवादपणे.

कवितानागेश's picture

26 Oct 2014 - 10:16 am | कवितानागेश

फाईव पॉइंट समवन आवडलंच होतं. अगदी निर्विवादपणे.- सहमत
मला सिनेमापेक्षा पुस्तक आवडले. वास्तवाच्य जवळ जाणारे वाटले. सिनेमा स्वप्नाळू आहे.

जेपी's picture

26 Oct 2014 - 6:31 am | जेपी

who is this chetan bhagat ?

THANK YOU.

खटपट्या's picture

26 Oct 2014 - 6:53 am | खटपट्या

ए असं नाही हा करायचं !!!

जेपी's picture

26 Oct 2014 - 7:22 am | जेपी

गपं राव रे ! वशाड मेलो.

चेतन भगतची सर्व पुस्तकं मीही वाचली आहेत.तो एक टाईमपास लेखकु आहे हे निर्विवाद सत्य आहेच.पण तो ज्या अाॅड्यंससाठी लिहितो,ते त्याची पुस्तक वाचतात,मनोरंजन करुन घेतात.तो पुस्तकाची राॅयल्टी आणि सिनेमाचे हक्क विकुन पैसे कमावतो.थोडक्यात त्याचे जिलब्यांचे दुकान आहे.आवडत असतील तर खा नाहीतर वाङमयिन मूल्यवाल्या जिलब्या इंग्रजीतही कमी नाहीतच!
फाइव पाॅइंट,२स्टेट्सने मात्र मनोरंजन केलेलं.त्यातले काही पंचेस मस्त होते.रिवाॅल्युशन २०२०बकवास!नवी जिलबी वाचुन मग सांगु कशी आहे ती!

पिंपातला उंदीर's picture

26 Oct 2014 - 11:03 am | पिंपातला उंदीर

वयाच्या एका टप्प्यावर चेतन भगत आवडला होता . आता नाही आवडत . बाय द वे चेतन भगत ला विंग्रजी साहित्याचा व . पु. काळे म्हाणावे का ? बरीच साधर्म्य आढळतात . अगदी गोड मिट्ट शैलीपासून ते फेबु वर दोघांची पण सुभाषित फिरू लागली आहेत तिथपर्यंत .

मित्रहो's picture

26 Oct 2014 - 11:34 am | मित्रहो

मी एकदा चेनैला गेलो असताना तिथल्या एका मॉलमधे हे पुस्तक विकत घेतले. भन्नाट आवडले. दुपारी दोन अडीचला घेतलेले पुस्तक संध्याकाळी साडेसहाला फ्लाइट पकडेपर्यंत संपले होते. घरी आल्यावर बायकोला सांगितले मग तिनेही ते संपविले. त्यातला रायन ओबेरॉय जास्तच आवडला आणि आजही तो रँच्योपेक्षा अधिक वास्तवातला आणि जवळचा वाटतो.
मग थ्री मिस्टेक्स, टू स्टेट्स वाचले आणि हळूहळू भगतामधला इंटरेस्ट संपला. त्याची पुढची पुस्तके मी वाचली नाही. त्याचा दोनही पुस्तकातला सेंस ऑफ हु्युमर जबरदस्त आहे. "तो एचआरचा वाटत होता. त्याच्या चेहऱ्यावरच दिसत होते की त्याने आयुष्यात कुठलाही निर्णय घेतलेला नाही." त्याच्या पुस्तकात एक प्रेडीक्ट्याबेलेटी वााटायला लागली. आता काय घडनार याची उत्सुकात संपत गेली. तोचतोचपण जाणवायला लागला. थ्री मिस्टेक्सचा शेवट तर सिनेमाला लाजवेल असा होता.
FPS मधे काही तरी वेगळे होते. कुठेतरी शिक्षण पद्धतीविषयी चीड होती, त्यावर हलकीफुलकी का असेना रास्त अशी टिका होती. रायन ओबेरेयला पडनारे प्रश्न आम्हालाही पडले होते. त्यामुळे तो जवळचा वाटत होता. नंतरच्या पुस्तकात असे काहीच नव्हते. दू स्टेटसमधे तामीळ विरद्ध पंजाबी हा संघर्ष अजूनही चांगला फुलवता आला असता. कदाचित ते त्याचे पहीले पुस्तक असते तर त्याने वेगळे लिहीले असते.

सतिश गावडे's picture

26 Oct 2014 - 11:41 am | सतिश गावडे

आता Five point someone वाचणे आले. ;)

टवाळ कार्टा's picture

26 Oct 2014 - 12:51 pm | टवाळ कार्टा

विंजिनेर आहेस ना...फुल्टू नॉस्टॅल्जिक वाटेल :)

सतिश गावडे's picture

26 Oct 2014 - 1:13 pm | सतिश गावडे

विंजिनेर आहेस ना...

कधी कुणी असा प्रश्न विचारेल असे वाटले नव्हते. :(

असो. नियमाला अपवाद करुन पुस्तक वाचल्या गेल्या जाईल. कुणाकडून वाचण्यापुरते मिळाल्यास उत्तम. :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Oct 2014 - 4:30 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

नको वाचूस. तू स्मरणरंजनात्मक लिहितानाही चांगलं लिहितोस म्हणून मुद्दाम सांगावंसं वाटलं, चेतन भगत वाचू नकोस. अगदीच इंग्लिश सुधारण्याची इच्छा असेल (ज्याची गरज असेल असं वाटत नाही पण तरीही) तर एकवेळ बिन्डोक, हॉलिवूडी मारधाड सिनेमे बघितलेस तरी चालेल, पण चेतन भगत नको.

टवाळ कार्टा's picture

29 Oct 2014 - 8:17 am | टवाळ कार्टा

नक्की कसली भिती वाटते??
स.गा.चा चे.भ. होईल की चे.भ.चा स.गा. होईल =))

सतिश गावडे's picture

29 Oct 2014 - 8:22 am | सतिश गावडे

चे. भ. माहिती नाही. मात्र मी पुर्वी खुप चारोळ्या पाडत असे. पण मग माझा चं. गो. होईल या भीतीने मी चारोळ्या पाडणे बंद केले.

पुण्यातील एक भटजी चंगो स्टाईलने मात्र गमतीदार चारोळ्या पाडतात असे ऐकून आहे. त्यांचा "मी माझा... तर माझा कुणाचा" नावाचा चारोळीसंग्रह वाचनात आला होता.

टवाळ कार्टा's picture

29 Oct 2014 - 8:51 am | टवाळ कार्टा

"मी माझा... तर माझा कुणाचा"

=))

खटपट्या's picture

30 Oct 2014 - 11:00 am | खटपट्या

ते उडनमांडी वाले ना ?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

29 Oct 2014 - 1:15 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मी म्हणतो, तू जरुर वाच आणि स्वत: मत बनव. पहिल्या ५० पानांत नाही आवडले तर सोडून दे. हाय काय आणि नाय काय.

पद्मश्री चित्रे's picture

26 Oct 2014 - 1:36 pm | पद्मश्री चित्रे

चेतन भगतचं फक्त FPS आवड्लं .. बाकी तोच तोच पणा वाटला.. वर लिहिलं आहे तसा व पु काळे टाईप लेखन वाटलं.. गोष्ट छोटी पण मोठा उपदेश दिल्याचा भाव वाटतो लिखाणात...

विशाखा पाटील's picture

26 Oct 2014 - 6:04 pm | विशाखा पाटील

काळाच्या कसोटीवर उतरणं, सर्वव्यापकता, मानवी स्वभावाचे विविध रंग, नैतिक मूल्यांबद्दल भाष्य, नवनिर्मितीचं वैशिष्ट्य आणि सुंदर भाषेच्या माध्यमातून वाचकांपर्यंत भिडणं असे उत्तम साहित्याचे मुख्य निकष मानले जातात. लोकप्रियता हा निकष फार काळ टिकत नाही. असंच चित्रपटाचंही होतं. एखादा चित्रपट लोक डोक्यावर घेतात, एकदोन वर्षांनतर तो कुणाला आठवत नाही की पुन्हा बघावासा वाटत नाही.
चेतन भगत हा उत्तम कारागीर आहे, पण कारागिरी हा एक भाग झाला, एकमेव नव्हे. त्याच्या लेखनात तोचतोचपणा दिसतोय, originality नाही.

काळाची कसोटी
सर्वव्यापकता
मानवी स्वभावरंग
नैतिक मुल्यांबंद्दल भाष्य
नवनिर्मीतीच वैशिष्ट्य
सुंदर भाषेतुन भिडण
वरील सर्व ६ गुण असलेली एखादी कलाकृती च उदाहरण दिल व त्यात वरील घटक कसे समाविष्ट आहेत हे सोदाहरण दाखविल्यास आनंद वाटेल.
त्यातही सर्वव्यापकता म्हणजे नक्की काय
व नवनिर्मीतीच वैशिष्ट्य म्हणजे नेमक काय
या दोन उदाहरणांसंदर्भात विस्ताराने उलगडुन दाखवल्यास आवडेल

मुक्त विहारि's picture

26 Oct 2014 - 7:50 pm | मुक्त विहारि

जमल्यास जरूर वाचा...

कदाचित तुम्हाला आवडून पण जाइल....

मुक्त विहारी जी
जोकर इन द पॅक विषयी प्लीज थोडा विस्ताराने लिहील तर बर होइल. कोणाची आहे काय विषय ?

मुक्त विहारि's picture

26 Oct 2014 - 11:33 pm | मुक्त विहारि

खरे तर ह्या पुस्तकाविषयी लिहायला फार आवडले असते... पण वेळ फार कमी पडतो...

आणि

अशा कलाक्रुतींचा आस्वाद व्यक्तीप्रमाणे बदलतो....

त्यामुळे मला हे पुस्तक आवडले त्यामुळे तुम्हाला ते आवडलेच पहिजे असे थोडीच आहे.

(जोकर इन द पॅक मुळे , माझ्या मुलाचा इंजिनियरिंगचा प्रवेश प्रश्र्न बर्‍याच प्रमाणात सुटला, हे सत्य.)

बादवे.... व्य.नि. करतो...

आदूबाळ's picture

26 Oct 2014 - 8:17 pm | आदूबाळ

To kill a mockingbird - Harper Lee

ही या सर्व कसोट्यांवर उतरते. हे एक उदाहरण.

अमेरिकेतल्या एका छोट्या शहरात घडणारी ही कादंबरी जगभर कुठेही तितकीच relevant आहे. (सर्वव्यापकता)

मिपाकर नंदन यांनी फार छान रसग्रहण केलं आहे.

मुक्त विहारि's picture

26 Oct 2014 - 8:43 pm | मुक्त विहारि

लिंक मिळेल का?

आदूबाळ's picture

26 Oct 2014 - 10:09 pm | आदूबाळ

शोधतो...

मुक्त विहारि's picture

30 Oct 2014 - 10:16 am | मुक्त विहारि

धन्यवाद...

विशाखा पाटील's picture

26 Oct 2014 - 11:40 pm | विशाखा पाटील

नवनिर्मिती म्हणजे जुन्याच गोष्टींना नव्या पध्दतीने सादर करण, जीवनाचा वेगळा अर्थ दाखवणं. उदाहरणार्थ शेक्सपिअरची नाटके. त्याच्या नाटकांमध्ये जुन्याच कथांना वेगळ्या पद्धतीने सादर केलं आहे. सर्वव्यापकता म्हणजे universality. स्थळ आणि काळ ह्यांच्या पलीकडे जाणारं साहित्य.

अशा अगदी महाभारत, सोफोक्लीसची नाटकं इथपासून अनेक कलाकृती आहेत. वर Dickensचा उल्लेख आलाच आहे तर David Copperfield चं उदाहरण बघू या. खाली महाभारतावर तुम्हीच उत्तम लिहिलंय :)

विस्तारभयास्तव थोडक्यात मांडते. त्यातल्या Davidची कथा व्हिक्टोरिअन काळातली. पण ती त्या काळाचा पट दाखवत असली तरी आजच्या काळातही तेवढीच ताजी आहे. हा David कुठल्याही समाजातल्या अशा धडपडणाऱ्या, टक्केटोणपे खाणाऱ्या व्यक्तीचं प्रतिनिधित्व करणारा आहे. त्यातली इतर पात्रही तशीच universal आहेत, मानवी स्वभावाचे विविध रंग दाखवणारी आहेत. कादंबरी समाजातले दोष दाखवताना नैतिक मूल्यांबद्दल भाष्यही करते. अशी कलाकृती काळाच्या कसोटीवर उतरते.

ही वैशिष्ट्ये चेतन भगतच्या कादंबऱ्यांमध्ये सापडतात का? हा खरा प्रश्न आहे :)

मुक्त विहारि's picture

26 Oct 2014 - 8:06 pm | मुक्त विहारि

फाइव्ह पॉइंट समवन, जास्त आवडले. "थ्री इडियटस" आणि "फाइव्ह पॉइंट" जवळ-जवळ सारखेच असून देखील आधी बोंबाबोंब करुन मग, "चेतन भगत" मागे का हटला? हे पण कोडेच आहे.

पण.... थ्री मिस्टेक आणि वन नाईट अजिबात आवडले नाही.... विशेषतः "गोध्रा हत्याकांडा" मागची पार्श्वभूमी विचारात न घेता, त्या घटनेचा सवंगपणे वापर केलेला आहे असे वाटते.

"वन नाईट" चा कथाबिंदू मस्त होता आणि तो अजून फुलवता पण आला असता.पण एक लेखक म्हणून "चेतन भगत" इथे कमी पडला, असे माझे मत आहे.

"चेतन भगत" आणि "जॉन ग्रिशॅम" ह्यांची नकळत तुलना होते आणि "जॉन ग्रिशॅम" जसा उत्तरोत्तर अधिकाधिक खुलत जात आहे, तसा "चेतन भगत" नाही असे मला वाटते.

असो,

पसंद अपनी-अपनी.....

कानडाऊ योगेशु's picture

26 Oct 2014 - 8:11 pm | कानडाऊ योगेशु

तसं पाहायला गेलं तर क्लासिक ह्या सदरात मोडण्यासारखे साहीत्य आजकाल लिहितो तरी कोण? जसे आधीच्या काळात चित्रपटांच्या होणार्या सिल्वर्/गोल्डन ज्युबिल्या ( चुकुन जिलेब्या लिहिणार होतो :) ) जश्या कालबाह्य झाल्या आहेत तोच प्रकार साहीत्याच्या बाबतीतही झालेला दिसतो.रोज रोज थोडा थोडा भाग वाचुन व डोक्यात एक किडा सोडणार्या कादंबर्या वाचायचा वेळ आजकाल खरेच आपल्याकडे आहे का? चेतन भगत सोबतच दुर्जोय दत्ता/ रविंदर सिंग वगैरेंच्या कादंबर्यावरचे अभिप्राय वाचले तर एक गोष्ट सर्रास आढळते कि बर्याच वाचकांनी ते एअरपोर्ट लाऊंज मध्ये वा अश्याच अन्य प्रवासात तीन-चार तासात वाचुन संपवलेले असते.त्यांचा तेवढा वेळ सत्कारणी लागला का नाही ह्यावरुन त्या त्या कादंबरीचे साहित्यिक मूल्य प्रत्येक जण आपापल्या पध्दतीने ठरवतो. ( ती तारांकन देण्याची प्ध्दत वगैरे.)

सतिश गावडे's picture

26 Oct 2014 - 9:06 pm | सतिश गावडे

अगदी अगदी.

अशा आयआयटीयन लेखकांचे पेव फुटलं आहे. या लेखकांची पुस्तकं Amazon आणि Flipkart वर शंभरच्या आत बाहेर मिळतात.

एकदा वाचा आणि विसरून जा.

चिगो's picture

30 Oct 2014 - 12:36 pm | चिगो

शंभरच्या आतबाहेर? अहो, फ्लिपकार्टवर १५० रुपयांत अशी १० इ-बुक्स घेतली मी.. त्यात अगदी २ रुपयांची पण होती.. ;-) पण त्याचवेळी दोस्तोवस्कीचं कलेक्शन आणि "ट्वेल इयर्स अ स्लेव्ह" पण स्वस्तातच मिळालं ह्याचाही आनंद होता.. :-)

तसं पाहायला गेलं तर क्लासिक ह्या सदरात मोडण्यासारखे साहीत्य आजकाल लिहितो तरी कोण? जसे आधीच्या काळात >>

योगेश, आहेत की बरेच जण !! लिस्ट देवु का ?

( लई दिवसांनी दर्शन _/\_ )

बोका-ए-आझम's picture

26 Oct 2014 - 8:21 pm | बोका-ए-आझम

मारवा यांच्या कसोट्यांवर उतरणारी माझ्या मते एकच कलाकृती आहे - महाभारत. इतकी जबरदस्त कथा, इतका व्यापक अवकाश, इतकी कालातीतता, इतकं सर्वसमावेशकत्व आणि वाचकांच्या मनावर इतक्या पिढ्या गारुड हे फक्त महाभारताने केलेलं आहे. अशी एकही भावना नाही जी महाभारतात सापडत नाही. प्रत्येक व्यक्तिरेखेला एक ठाम भूमिका आहे, एक आलेख आहे. महाभारताच्या जवळपास येईल असं जगातल्या कुठल्याही भाषेत असेल असं वाटत नाही.

महाभारत
प्रचंड सहमत
अप्रतिम कलाकृती अद्वितीय व्यापकता
मृत्यु च च उदाहरण घ्या कीती निरनिराळ्या रुपांत दाखवलेला आहे.
कुंती ला आलेला जंगलातल्या वणव्यातला भिष्मा ला आलेला बाणांच्या शय्येवरील द्रौपदी च्या मुलांना झोपेत गाठणारा क्रुष्णा ने स्वतः सामोरा गेलेला तर काव्यात्मतेचा कळस च गाठतो.
दुर्गा भागवत व्यासपर्व मध्ये भैरप्पा पर्व मध्ये इरावती कर्वेंनी युगान्त मध्ये उलगडुन दाखविल्यावर काय राहीले असेल महाभारतात बघण्यासारखे वाटत होते तर महाश्वेतादेवीं नी अजुन एक धक्का दिला लाक्षाग्रुहात जाळुन मारलेल्या आदिवासी स्त्री व तिच्या पाच मुलांच्या म्रुत्यु मागील आणखी एक क्रुर सत्य उलगडुन दाखवले

सतिश गावडे's picture

26 Oct 2014 - 9:43 pm | सतिश गावडे

धागा "चेतन भगत आणि त्याची पुस्तकं" या विषायावर आहे. त्यामुळे त्याच विषयावर चर्चा करावी. धाग्याचे महाभारत करु नये.

तुम्ही चेतन भगत बाजूला ठेवून जर महाभारताची चर्चा केलीत तर आम्ही आमचा "अँटी चेतन भगत" हुच्चब्रूपणा कसा दाखवणार?

माझ्या काही आवडत्या कादंबरी व त्यातील एक एक उतारा शाम्पल म्हणुन देण्याचा मोह आवरत नाहीये
१- one hundred years of solitude - gabriel garcia marquez मानवी प्रेमावर अनेक अप्रतिम उतारे यात आहेत त्यातील मला भावलेला हा एक अर्थात मुळ पुस्तक वाचण्याला उतारा हा पर्याय नाही च तरीही एक सहज

सदर उतारा या ठिकाणी ( http://www.misalpav.com/node/25565#comment-626458 ) योग्य धाग्यावर हलवला आहे.

मला ही उतारा टाकल्यानंतर बोका-ए-आझम च्या धाग्यावर अतिक्रमण केल्यासारखे वाटत होते. ती गिल्ट दुर केल्याबद्दल संपादक मंडळाचे अनेक आभार,
हा धागा ही बघुन ठेवलाय आता अस काही असेल तर इथेच टाकतो व मग जिथे द्यावीशी वाटेल तिथे अशी लिंक देतो. म्हणजे मग मुळ धागा ही सडपातळ राहतो ( तीन स्मायल्या वाचाव्यात मला इनसर्ट करता येत नाही )

प्रचेतस's picture

27 Oct 2014 - 9:42 am | प्रचेतस

चेतन भगत कधीच वाचला नाही.
आम्ही आपले गोनीदा, श्री.ना. दळवी, मतकरी, सिडने शेल्डन, ब्राउन, पुझो प्रेमी.

वेल्लाभट's picture

27 Oct 2014 - 10:24 am | वेल्लाभट

मला त्या लेखकाचं लिखाण मुळीच आवडत नाही. का? काय आवडत नाही? हे सांगत बसण्याचा उद्योग मी करु इच्छित नाही. उगा कीस पाडत बसण्यात अर्थ नाही. सम थिंग्स आर जस्ट फॉर मासेस इतकच.

सतिश गावडे's picture

27 Oct 2014 - 10:28 am | सतिश गावडे

सम थिंग्स आर जस्ट फॉर मासेस इतकच.

कुणीतरी उघडपणे चेतन भगत हा "मास"चा लेखक आहे हे बोलण्याचे धाडस दाखवले. अभिनंदन !!!

अन्या दातार's picture

27 Oct 2014 - 3:22 pm | अन्या दातार

"मास" चा लेखक म्हणजे जिलब्यापाडू ना रे? ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

27 Oct 2014 - 11:11 pm | विश्वनाथ मेहेंदळे

चेतन भगत न वाचताही तुझी त्याच्याबद्दलची काहीशी ठाम मते फॉर्म झालेली दिसतात.

सतिश गावडे's picture

28 Oct 2014 - 9:25 am | सतिश गावडे

चेतन भगतचं लेखन वाचलंच नाही तर मते कशी बनतील?

माझं "कुणीतरी उघडपणे चेतन भगत हा मासचा लेखक आहे हे बोलण्याचे धाडस दाखवले. " हे वाक्य उपहासात्मक होतं.

वेल्लाभट यांनी ज्या सहजतेने "सम थिंग्स आर जस्ट फॉर मासेस इतकच." असं लिहून ते (म्हणजे वेल्लाभट) "क्लास"मधले आहेत हे सुचवलं त्याने मी अवाक झालो होतो.

थॉर माणूस's picture

28 Oct 2014 - 10:05 am | थॉर माणूस

एखादा माणूस मी त्या मास चा भाग नाही म्हटलं की लगेच क्लासमधे कसा काय जातो बॉ? का एकापेक्षा जास्त मासेस नसतातच असं तुमचं म्हणणं आहे? चेतन भगत एका विशिष्ट माससाठी लिहीतो आणि त्या बाबतीत तो खूप यशस्वी लेखक आहे. आता हे कुणी म्हणत असेल तर लगेच त्याला क्लास मधे ढकलायची घाई कशाला? तुमच्या मासमधली नसली तरी ती व्यक्ती दुसर्‍या मासमधली असू शकते की...

माझ्या मते पाईव्ह पॉइंट समवन नंतरची पुस्तके फार काही खास नव्हती, माझ्या लेखी या पुस्तकांना प्रवासातला पास टाईम यापलीकडे फारशी किंमत नाही. रिव्होल्युशन २०२० तर तद्दन भिकार वाटलं मला. हाफ गर्लफ्रेंड वाचलं नाही अजून, पण फारशा अपेक्षा अशा नाहीतच. त्यामुळे आवर्जुन त्या पुस्तकाच्या वाटेला जाणं वगैरे अवघड आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

30 Oct 2014 - 7:57 pm | विश्वनाथ मेहेंदळे

ओके. उपरोध कळला नव्हता. बाकी मुद्दा मान्य :-)

@ सम थिंग्स आर जस्ट फॉर मासेस >>
ख्या ख्या ख्या :)) :))
का हसतोय हे सांगत बसण्याचा उद्योग मी करु इच्छित नाही. उगा कीस पाडत बसण्यात अर्थ नाही.

सतिश गावडे's picture

27 Oct 2014 - 8:16 pm | सतिश गावडे

कुणीतरी उघडपणे चेतन भगत हा "मास"चा लेखक आहे हे बोलण्याचे धाडस दाखवले तर तुम्ही चक्क ख्या ख्या ख्या करुन हसताय?

यसवायजी's picture

27 Oct 2014 - 8:31 pm | यसवायजी

आमालाच असं कुटं काय "उघडपणे" लिवता/सांगता येत न्हाई ह्योच प्राब्लेम हाए. ;)

वेल्लाभट's picture

27 Oct 2014 - 9:22 pm | वेल्लाभट

ख्या ख्या ख्या !

थॉर माणूस's picture

28 Oct 2014 - 10:11 am | थॉर माणूस

>>>अबक हा यरलवश सारखा लिहित नाही म्हणून मला तो आवडत नाही हे म्हणणं, माझ्यामते तरी, हास्यास्पद आहे.

माझ्यामते याचा अर्थ त्या वाचकाला यरलवशची लेखनशैली किंवा लेखनप्रकार आवडतो आणि अबकच्या लेखनशैली किंवा लेखनप्रकारात "वो बात" नसल्याने त्याला आवडत नाही इतकाच आहे, यात हास्यास्पद काय ते कळले नाही.

हे म्हणजे मला चहा आवडतो आणि समोरच्याला चहाऐवजी कॉफी आवडते म्हणून ते हास्यास्पद म्हटल्यासारखं वाटतंय.
शेवटी प्रत्येक रसिकाची अभिरुची, प्रगल्भता वेगळी आणि म्हणूनच आवड निवड वेगळी नाही का? त्याची आवड माझ्यासारखी नाही म्हणून तो हास्यास्पद कसे म्हणता येईल?

बोका-ए-आझम's picture

28 Oct 2014 - 2:08 pm | बोका-ए-आझम

यात हास्यास्पद हे आहे की मी एकाच शैलीला आदर्श समजतो आणि त्याव्यतिरिक्त जे इतर प्रयोग होतात त्यांना तुच्छ समजतो. हे असं समजणं, माझ्या मते, हास्यास्पद आहे.

थॉर माणूस's picture

28 Oct 2014 - 5:48 pm | थॉर माणूस

तो एकाच शैलीला आदर्श समजतो हा निष्कर्ष तुमचा आहे. समोरच्याने तुम्हाला सांगितले की अमुक एकाची शैली त्याला आवडते आणि चेतन भगतची शैली तशी नसल्याने त्याचे लिखाण आवडत नाही तर यावरून तुम्ही कुठल्या कुठे पोहोचलात. आवड आणि आदर्श वेगळे असतात मालको. मला पाणीपुरी आवडते आणि दहीपुरी आवडत नाही असं मी म्हणालो तर पाणीपुरी ही माझ्या दृष्टीने आदर्श चाट डीश आहे असं सांगत फिरणार की काय? :) का तुम्हाला दहीपुरी आवडते म्हणून मी हास्यास्पद ठरणार तुमच्या लॉजिकने?

एखाद्या व्यक्तीला एक शैली आवडते (किंवा एक खास शैली आवडत नाही) आणि म्हणून त्याला तुम्हाला आवडणारी गोष्ट आवडत नसेल तर त्यात हास्यास्पद वाटण्यासारखं काहीच नाही. उलट मला आवडतं ते जर इतरांना आवडत नसेल तर ते सगळे हास्यास्पद असं म्हणणं जास्त हट्टीपणाचं (हास्यास्पद म्हणा हवं तर. ;) ) वाटतं.

असो, तुम्हाला चेतन भगत आवडतो. मला त्याचं एक पुस्तक बर्‍यापैकी वाटतं आणि कुणाला तो बंडल लेखक वाटतो. माझ्यालेखी तिघेही आपल्या जागी बरोबर आहेत.

बोका-ए-आझम's picture

28 Oct 2014 - 11:10 pm | बोका-ए-आझम

कोणाला काय आवडतं हा प्रश्नच नाहीये इथे. एखाद्या व्यक्तीचा दुराग्रह हा हास्यास्पद आहे. अर्थात मला आहे. बाकी No accounting for taste.त्यामुळे तुम्ही जे शेवटी म्हणालात ते बरोबर आहे.

पिलीयन रायडर's picture

28 Oct 2014 - 1:45 pm | पिलीयन रायडर

चेतन भगत...
अगदीच सुमार लेखक आहे.. दिवाळीत टाईमपास म्हणुन "हाफ गर्लफ्रेंड" वाचलं... किती ते रटाळ आणि फिल्मी पुस्तक..
एकतर पात्र निर्मिती वगैरे काही नाहिच.. पात्राविषयी माहिती म्हणजे नायिकेने काय कपडे घातले आहेत ह्याची "प्रत्येक प्रसंगात" वर्णनं.. "तिने गुलाबी टॉप आणि निळी जीन्स घातली होती..".. "तिने अमुक कानातले आणि टमुक घातलं होतं.." अशी असंख्य वर्णंन आहेत.. कशाला नक्की? (मागे ते वन नाईट.. वाचलं होतं त्यातही हाच फालतुपणा होता.. कोण कुठल्या स्टॉपला गाडीत बसलं आणि जर ती मुलगी असेल तर तिनी काय घातलं होतं..)
वाचकाच्या नजरे समोर कथा जिवंत उभी राहिली पाहिजे म्हणजे अगदी कपड्याच्या रंगा सकट असं बहुदा त्याला वाटत असावं.. बरं ते ही असो..
नायक आणि नायिकेच्या वागण्याची काही कारणमीमांसा?
(जर पुस्तक वाचायचं असेल तर इथुन पुढे वाचु नका.)
नायिकेच्या वडिलांनी बहुदा तिला लहानपणी काही त्रास दिलेला असतो ज्यामुळे ती नायकाला शाररिक जवळीक करु देत नसते... साधारणपणे अशा केस मध्ये मुलींना एकंदरीतच पुरुषांची..विशेष करुन स्पर्शाची घृणा वाटायला लागते.. म्हणुन ती तसं वागत असेल असं म्हणावं तर ही पोरगी हिरोच्या गळ्यात पडणार.. भर कॉलेज मध्ये मांडीवर डोकं ठेवुन झोपणार.. त्याच्या हॉस्टेलवर चोरुन येऊन तोकड्या कपड्यात त्याच्या बेडवर लोळणार.. मग तो बाजुला येऊन झोपला तर त्याला अंगावर हात पाय टाकु देणार.. पण इथुन पुढे मात्र त्यानी "कंट्रोल" करावं अशी हिची अपेक्षा... आणि हो.. इतकं मोकळं वागुन.. पुन्हा अगदी जीवाभावाच्या गप्पा मारुनही.. "आपल्यात 'तसं' काहीच नाही हं.." अशी लडिवाळ सुचना पण करणार.. दिल्लीतले हाय फाय लोक असे असतात का? असतीलही.. माझ्या सारख्या डाऊनमार्केट व्यक्तीला हे वागणं अतर्क्य वाटलं...
हिरो तरी काय.. एकाच विचारानी पछाडलेला... ते ही असोच...
भाषा... सुमार...
साहित्यमुल्य... रियली???
कथा.. फिल्मी...
शेवट.. अतिफिल्मी...
म्ह्णजे जर हिरो तिला शोधाय्ला ३ महिन्यासाठी अमेरिकेत गेलाय तर शेवटच्या दिवसापर्यंत ती ह्याला न सापडणं... मग अगदी शेवटच्या १ तासात अनंत अडथळे पार करत तिच्या समोर "एंट्री" मारणं... शेवटी स्वतःच्या मुला समोर डायलॉग मारुन पुस्तक संपवणं... आणि सगळ्यात डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे कथेत स्वतःला घुसवणं.. नायकानी लेखकाला "चेतन सर.. तुम्ही खुप चांगलं लिहीता म्हणुन माझी गर्लफ्रेंड मला तुमची पुस्तकं वाचुन दाखवायची (माझं इंग्लिश सुधारायला!!!!!)" असं म्हणणं....काय बोलावं आता...
किती किती न काय काय सांगु... शेवटची ३०-४० पानं शेवटी वैतागुन पळवली...
थोडक्यात ही सुद्धा एक बॉलवुड पिक्चरची स्क्रिप्ट तयार आहे... अगदी टायटलसह...

थॉर माणूस's picture

28 Oct 2014 - 2:03 pm | थॉर माणूस

चला, माझा वेळ वाया जाण्यापासून वाचवलात. आता कुणी स्वतःहून दिलं तरी वाचायच्या फंदात पडणार नाही. :)

बोका-ए-आझम's picture

28 Oct 2014 - 2:57 pm | बोका-ए-आझम

पिराताई, नाही नाही म्हणता तुमच्या बरंच लक्षात आहे की पुस्तक! म्हणजे नकारात्मक दृष्टीने का होईना, लेखकाचा उद्देश साध्य झाला!

पिलीयन रायडर's picture

28 Oct 2014 - 3:01 pm | पिलीयन रायडर

लक्षात आहे की पुस्तक म्हणजे? वाचलय म्हणजे लक्षात रहाणार्च ना.. आणि अगदी ३ च दिवसा पुर्वी वाचलय...

फाइअव पॉइंट समवन आवडलं होतं.. पण लक्षात नाही फारसं आता...

नंदन's picture

29 Oct 2014 - 4:47 am | नंदन

म्ह्णजे जर हिरो तिला शोधाय्ला ३ महिन्यासाठी अमेरिकेत गेलाय तर शेवटच्या दिवसापर्यंत ती ह्याला न सापडणं... मग अगदी शेवटच्या १ तासात अनंत अडथळे पार करत तिच्या समोर "एंट्री" मारणं... शेवटी स्वतःच्या मुला समोर डायलॉग मारुन पुस्तक संपवणं... आणि सगळ्यात डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे कथेत स्वतःला घुसवणं..

सुभाष घईकाका आठवले :)

बोका-ए-आझम's picture

28 Oct 2014 - 3:07 pm | बोका-ए-आझम

त्यालाच साध्यासरळ शब्दांत लेखकाचा प्रभाव म्हणतात!विशेष म्हणजे जे तुम्हाला आवडलं होतं ते आठवत नाही आणि जे आठवतंय ते आवडलेलं नाही! हे जरा विचित्रच आहे, नाही?

पिलीयन रायडर's picture

28 Oct 2014 - 3:51 pm | पिलीयन रायडर

बरोबर.. लेखकाचा प्रभावच...

एक पुस्तक २ दिवसापुर्वी वाचलय आणि दुसरं अनेक वर्षांपुर्वी ह्या गोष्टीचा काही संबंध नाही...!

मोहनराव's picture

28 Oct 2014 - 5:54 pm | मोहनराव

मी त्याची आतापर्यंत ३-४ पुस्तके वाचली आहेत. साहित्यिक मुल्य वगैरे शोधायच्या भानगडीत न पडता वाचुन तात्पुरता आनंद घेतला. तो तरुण लोकांची नस पकडून लिहितो असे मला वाटते

आदूबाळ's picture

28 Oct 2014 - 6:29 pm | आदूबाळ

ती नस डोक्यातली असावी.

तो तरुण लोकांची नस पकडून लिहितो असे मला वाटते

मला वाटते , चेतन भगतच्या मते तरुणांची नस फक्त कमरेखालीच असते !!

चेतन भगत जे लिहितो त्याला नस पकडणं म्हणत असतील तर नसबंदी व्हायला पाहिजे एव्हाना.

पहिली दोन पुस्तके ठीक आहेत. ३ मिस्टेक्स नंतर त्याची पुस्तक वाचले गेले नाही. मात्र इंग्रजी सुधारण्यासाठी त्याची पुस्तके अनेकजणांना सुचवली आहेत.

अवांतर -
मॅनेजमेंट सेशन द्यायला एकदा हाफिसने याला बोलावला होता. "मी परराज्यातील बायकोसाठी घरी कशी निगोसिएशन्स केली" या विषयावर कंटाळा आणवला.

बहुदा त्या दरम्यान एकदा हर्षा भोगलेने आम्हाला मॅनेजमेंट आणि टीमवर्कचे ज्ञान दिले असल्याने लोकांच्या अपेक्षा वाढून भ्रमनिरास झाला असावा*

*तळटीपा
१) हर्षा भोगले आणि चेतन भगत दोहोंमध्ये फरक आहे हे सपशेल मान्य. मात्र हाफिसातले अशा सेशनचे स्वरूप "वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांकडून मॅनेजमेंट आणि टीमवर्क बाबत ट्रेनींग घेणे" असे होते.
२) दोघांच्याही प्रेझेंटेशनमध्ये जमीन आस्मानाचा फरक होता.

सुहास झेले's picture

29 Oct 2014 - 3:42 pm | सुहास झेले

चेतन भगतचे ट्विट छान असतात... टाईम्समधला कॉलम पण कधीकधी (?) वाचनीय असतो.

धन्यवाद !!

चिगो's picture

30 Oct 2014 - 1:04 pm | चिगो

चे.भ.चं फापॉस हे मला त्यावेळी आवडलं होतं. तेच " वनाअ‍ॅकॉसें" आणि "टू स्टेट्स" बद्दल.. त्याची पुस्तकं टाईमपाससाठी असतात आणि ती तशीच वाचावी.. उअगाच "हे आहे का त्यात" आणि "ते आहे का त्यात" विचारत बसण्यात अर्थ नाही. ही पुस्तके त्यानी कॉलेजातल्या पोरांसाठी, खासकरुन ज्यांना नवीनच इंग्रजी "साहीत्याची" खाज सुटायला लागलीय, त्यांना टार्गेट करुन लिहीली जातात, असे मला वाटते. म्हणूनच त्यांची किंमतपण शंभराच्या आतबाहेरच असते, एखाद्या बर्गरइतकी.. सुरुवातीची दोन-तीन पुस्तके वाचल्यानंतर तोचतोपना आणि वाढता रटाळपणा ह्यापायी त्याची पुस्तके आता वाचत नाही.. तेच त्याच्या "यशा"पासून प्रेरणा घेऊन लिहीणार्‍या नवतरुण कोवळ्या, आंग्लाळलेल्या, कॉलेजिएट, आयटीयन नवलेखकांबद्दल..

मला जास्त डोक्यात जातो तो चे.भ.नी स्वतःला अत्यंत विचारी असल्याच्या साक्षात्कारातून सुरु केलेला शहाणपणा.. वैचारीकतेची परिपक्वता नसलेली त्याची बाष्फळ बडबड एकदा ऐकायला मिळाली आणि का हा माणुस आपल्या डोक्यावर आणि स्वतःच्या पायांवर धोंडा मारुन घेतोय, हेच कळेना..

चिनार's picture

4 Nov 2014 - 5:35 pm | चिनार

मला जास्त डोक्यात जातो तो चे.भ.नी स्वतःला अत्यंत विचारी असल्याच्या साक्षात्कारातून सुरु केलेला शहाणपणा.. वैचारीकतेची परिपक्वता नसलेली त्याची बाष्फळ बडबड एकदा ऐकायला मिळाली आणि का हा माणुस आपल्या डोक्यावर आणि स्वतःच्या पायांवर धोंडा मारुन घेतोय, हेच कळेना..

पूर्ण सहमत !!!

श्रीगुरुजी's picture

6 Nov 2014 - 2:44 pm | श्रीगुरुजी

चेतन भगतचे आधी 'फाईव्ह पॉईंट समवन' वाचले होते. ते बरे वाटले. नंतर '३ मिस्टेक्स इन माय लाईफ' वाचले. ते अत्यंत भिकार होते. त्याची कथा एखाद्या थर्ड ग्रेड हिंदी चित्रपटाच्या कथेपेक्षाही जास्त वाईट होती. त्यानंतर त्याचे एकही पुस्तक वाचलेले नाही.