उत्तरभारतीय व्यक्ती नावांचे लेखन पद्धतीच्या निमीत्ताने

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
23 Oct 2014 - 8:15 am
गाभा: 

उत्तरभारतीय व्यक्ती नावांचे लेखनात वडीलांचे नाव नमुद करण्याची प्रथा कमी असावी. एक उदाहरण म्हणून हरयाणाचे नवे मुख्यमंत्री त्यांचे नाव मनोहर लाल खट्टर असे लिहितात. संदर्भ त्यांचे संकेत स्थळ http://manoharlalkhattar.in/ मराठी/महाराष्ट्रीय लेखन परंपरेने मनोहरलाल असे एकत्र न लिहिता, मनोहर आणि लाल हे शब्द वेगवेगळे लिहून नंतर आडनाव लिहिलेले आढळले जसे की मनोहर लाल खट्टर असे लिहिले तर आपण सर्व साधारण पणे मनोहर हे त्यांचे स्वतःचे नाव लाल हे मध्ये आले म्हणून वडलांचे नाव आणि मग आडनाव असे आपण सर्व साधारणपणे समजतो.

प्रत्यक्षात मनोहर लाल खट्टर यांच्या वडलांचे नाव हरबन्स लाल खट्टर असे आहे. (संदर्भ )

म्हणजे महाराष्ट्रीयन पद्धतीने त्यांचे नाव सहसा मनोहरलाल हरबन्सलाल खट्टर असे लिहिले गेले असते. एकतर हिंदी पंजाबी बेल्ट मध्ये होणारे व्यक्ती नावांची प्रचलीत लेखन पद्धती आणि ती तशी का आहे, हे मी समजून घेऊ इच्छितो आहे. जाणकारांनी कृपया या विषयावर प्रकाश टाकावा हि विनंती.

दुसरे असे की, व्यक्ती नावांबद्दल मिपावर इतर चर्चा झाल्यात आहेत. खरे म्हणजे व्यक्तीच स्वतःच नाव आणि कतृत्व महत्वाच व्यक्तीच खानदान आणि वडील कोण आहेत या बाबी माझ्याही दृष्टीने तश्या गौण आहेत. तथापी दक्षीण भारतीय पद्धत असो वा ही उत्तर भारतीय पद्धत असो काही वेळा अडचणीच्या होतात. पोस्ट ग्रॅजूएशनच्या वेळी माझा एक मीत्र नाव नरेश एका दक्षीण भारतीय खेड्यातून माझ्या सोबत होता. वर्षाच्या शेवटी त्याने रिझल्ट लागल्यावर पत्राने कळवण्यास सांगितले आणि पत्ता म्हणजे केवळ त्याचे नाव आणि गावाचे नाव, अर्थातच मी त्याला गावात किती नरेश आहेत हे विचारले आणि त्याने सहा हे उत्तर दिल्या नंतर मी चक्क उडालोच, मग माझ पत्र तुझ्याकडेच पोहोचेल याची गॅरंटी काय ? या प्रश्नाला त्याने हसून पुहुंच जाता है एवढेच उत्तर दिले. मी तेवढ्या उत्तरावर समाधानी नसल्याने त्यास पत्र काही पाठवले नाही. त्या नंतर त्याची एकदा उभ्या उभ्या भेट झाली नंतर भेट काही होऊ शकली नाही. नंतर फेसबुकवर लिंकड्न इत्यादीवर ते नाव शोधण्याचा असंख्य वेळा प्रयत्न केला हजारो नरेश असलेल्या भारतातला माझा मित्र मला अद्याप शोधता आलेला नाही.

या अनुभवावरुन अती छोट्या नावाच्या वापरामुळे बँकींग, पोलीसदले यांच्या समोर कोणत्या समस्या उपस्थीत होत असतील याची मी केवळ कल्पनाच करू शकतो. समजा मिसळपाव संकेतस्थळावर सगळ्यां सदस्यांना खाते क्रमांक दिले. प्रवेश करताना खाते क्रमांकाने करा पण खाते क्रमांक इतरांना दिसणार नाही आणि प्रत्यक्षात एकमेकांसारखी नावे/टोपणनावे वापरता येतील अशी व्यवस्था करुन दिली नेमकी काय परिस्थिती होऊ शकेल. समजा बँकेत चेक डिपॉझीट करताना अकाऊंट नंबर लिहिण्यात चुकला आणि चुकलेल्या क्रमांक खात्यासही त्याच नावाची व्यक्ती असेल तर नेमके काय होत असते ? केवळ नामसाधर्म्याने पोलीसांकडून चुकीच्या व्यक्तीचा पाठपुरावा केला गेला किंवा योग्य व्यक्ती शोधण्यात वेळ गेला असे होत असेल का ?

ज्या प्रदेशात अशी कन्फ्यूजींग नावे असतात तेथील इतिहास संशोधनात आणि इतिहास लेखनात नेमक्या काय अडचणी येत असतील. उदाहरणार्थ मराठी विकिपीडियावर संभाजीराजे भोसले असे नाव आले की डोळे झाकून दुवा छ. शिवाजी महाराजांचे सुपूत्र संभाजीराजे यांच्या नावाकडेच जोडला जातो. छ. संभाजीराजांच्या काकांच म्हणजे छ. शिवाजी महाराजांच्या थोरल्या बंधूंचही नावसुद्धा संभाजीराजे भोसलेच होत ह्याची बहुतेकांना कल्पनाच नसते, काहींना असली तरीही विस्मरण झालेले असते.

अलिकडे व्ही.गीता या नावाने स्त्रीवादी लेखीके बद्दल मराठी विकिपीडियावर एक लेख अर्धवट लिहून सोडून दिला गेला. अधिक माहितीने लेख पुर्ण करावा म्हणून आंतरजालावर शोध घेतला तर किमान डझनभर व्ही.गीता आंतरजालावर होत्याच पण त्यातील किमान तीन केवळ स्त्री विषयक कामे करत होत्या आंतरजावर तिघींच्याही कार्याची माहिती आढळते, पण कोणती माहिती कोणत्या व्ही.गीताच्या लेखात टाकायची हा प्रश्न शिल्लक राहतोच. माझ्यासारखी व्यक्ती कन्फर्म होत नाही तो पर्यंत कोणतीच माहिती लेखात जोडणार नाही. परंतु सर्व सामान्य विकिपीडियन एवढा शोधही घेत नाही फक्त माहिती भरत सुटलेला असतो.

असो. सध्यातरी उत्तरभारतीय व्यक्ती नावांचे लेखन पद्धतीतही मला त्याच समस्या दिसतात एकाच नावाच्या दोन व्यक्ती काळाच्या ओघात प्रसिद्ध झाल्या त्यांच्या कार्याची वृत्तपत्रातून शोधून नोंद घ्यावयाची झाली तर संभ्रम आणि गोंधळ टाळून माहितीची वस्तुनिष्ठता कशी जपावी (माहितीचा नेमके पणा कसा जपावा) हा माझ्या पुढील एक मोठा यक्ष प्रश्न आहे.

प्रतिक्रिया

काय मोठ्या मोठ्या जिलब्या पाडता हो तुम्ही
हॅट्स आॅफ

माहितगार's picture

23 Oct 2014 - 11:07 am | माहितगार

माहितगार= मोमोजिवा = मोठ्या मोठ्या जिलब्या वाले
मोठी मोठी दिलीए तर गुमान खावा की (ह>घ्या>)
:)

गप रांव रे!! वशाड मेलो!!

सुनील's picture

23 Oct 2014 - 9:41 am | सुनील

{स्वतःचे नाव} + {वडिलांचे नाव} + {आडनाव} ही नाव लिहिण्याचे पद्धत बहुधा फक्त महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकीतील उत्तरेकडील भाग एवढ्यापुरतीच मर्यादित असावी.

उत्तरेत {स्वतःचे नाव} + {स्वतःचेच उपनाव (जसे की लाल, चंद्र, कुमार इ.)} + {आडनाव} अशी पद्धत वापरतात.

दक्षिणेत बहुधा वडीलांचे आणि गावाचे नावदेखिल वापरतात पण नेमके कसे याबद्दल ठाऊक नाही. खेरीज, दक्षिणेतील सर्व प्रांतात एकच एक पद्धतही नसावी.

एकाच नावाच्या दोन व्यक्ती काळाच्या ओघात प्रसिद्ध झाल्या त्यांच्या कार्याची वृत्तपत्रातून शोधून नोंद घ्यावयाची झाली तर संभ्रम आणि गोंधळ टाळून माहितीची वस्तुनिष्ठता कशी जपावी (माहितीचा नेमके पणा कसा जपावा) हा माझ्या पुढील एक मोठा यक्ष प्रश्न आहे

गोष्ट खरी. पण आवर्जून दखल घेण्याजोगे किती मनोहर लाल (वा अन्य कोणी) एकाच वेळी, एकाच क्षेत्रात अस्तित्वात असणार आहेत? आणि समजा असलेच तरी त्या त्या वेळी काहीतरी मर्ग काढला जाईलच!

अवांतर १ - तुम्ही संभाजी महाराजांचे उदाहरण दिले आहे. माझ्या माहितीप्रमाणे भारतीय इतिहासात चंद्रगुप्त नावाचेदेखिल दोन सम्राट (निरनिराळ्या काळात) होऊन गेले (चु भु द्या घ्या)

अवांतर २ - ब्रिटिश राजघराण्यातील पुरुषांना जॉन, जॉर्ज, चार्ल्स, हेन्री आणि विल्यम याखेरीज अन्य नाव घेण्यास बहुधा बंदी असावी! त्यामुळे त्यांच्यात अनुक्रमांक देऊन भागवतात!

अवांतर ३ - जॉर्ज डब्ल्यू बुश (थोरले) यांच्या मुलाचे नावदेखिल जॉर्ज डब्ल्यू बुश असेच होते. तेव्हा त्यांना ४१ आणि ४३ अशा अध्यक्षपदाच्या अनुक्रमांकानुसारे ओळखले जाते.

अवांतर ४ - नावात काय आहे, असे संत तुकाराम म्हणून गेलेच आहेत! ;)

माहितगार's picture

23 Oct 2014 - 11:00 am | माहितगार

उत्तरेत {स्वतःचे नाव} + {स्वतःचेच उपनाव (जसे की लाल, चंद्र, कुमार इ.)} + {आडनाव} अशी पद्धत वापरतात.

हि त्यांची स्वतःची उपनाव त्यांनी स्वतः ठेवलेली असतात का पॅरेंट्स वगैरे पैकी कोणी ठेवते ? म्हणजे असे की शाळेत नाव घालतानाही ते उपनावा सोबतच असते का शालेय कालावधीत उपनाव घेतले जाते का नंतर, कि केव्हाही. विचारण्याचा मुख्य उद्देश ओरीजनल बर्थ सर्टीफिकेट शैक्षणीक दस्तएवजापासून हि उपनावे कंटीन्यू असतात आधे मध्ये केव्हातरी घेतली जातात आणि आधी मधी घेतली जात असतील तर कन्फ्यूजन कशी टाळतात

पण आवर्जून दखल घेण्याजोगे किती मनोहर लाल (वा अन्य कोणी) एकाच वेळी, एकाच क्षेत्रात अस्तित्वात असणार आहेत? आणि समजा असलेच तरी त्या त्या वेळी काहीतरी मर्ग काढला जाईलच!

एकाच नावाच्या व्यक्ती पुर्वी कदाचित कमी असतील एक तर प्रश्न वाढत्या लोकसंख्येमुळे आहे. आपण म्हणता तसे नावात काय आहे, असे संत तुकाराम म्हणून गेलेच आहेत! हे मान्य केले की कै फरक पडत नाही.

मराठी कवी होऊन गेले वामन पंडीत नावाचे. या वाक्याचा अर्थ एकवचन लावायच का बहुवचनी ते माहीत नाही कारण वामन पंडीत नावाची व्यक्ती एकच होती, दोन होत्या का पाच ते माहीत नाही. तुम्ही म्हणाल हे इतिहासात होऊन गेल टाकान सगळ एकाच्याच नावावर. तर एकविसाव्या शतकातही हे एक कवी वामन पंडीत झाले आहेत हे कदाचीत सहावे वामन पंडीत.

मराठी विकिपीडियावर प्रकाश इनामदार या नावाचा लेख लिहिला जात होता. आपणही मदत करावी म्हणून प्रकाश इनामदार यांच्या नावाने बुकगंगा डॉटकॉमवर एक पर्सनालिटी डेव्हेलपमेंटवर पुस्तक आढळले. सर्वसामान्य पणे मीही ते अभिनेते प्रकाश विठ्ठल इनामदार यांच्या क्रेडीटवर नोंदवून मोकळा झालो असतो. "द येस फॅक्टर" पुस्तक लिहिणार्‍या प्रकाश इनामदारांच नशीब थोडक्यात बर असाव अभिनेते प्रकाश इनामदार यांच्या सुकन्या मराठी विकिपीडियावरच भेटल्या आणि त्यांनी निश्चीतपणे सांगितल की "द येस फॅक्टर" हे पुस्तक त्यांच्या पिताश्रींच नव्हे नाहीतर नावात काय म्हणून जवळपास अभिनेते प्रकाश इनामदारांना पर्सनालिटी डेव्हेलपमेंटचे मार्गदर्शकही उपाधी दूर राहिली नसती. असो.

बोका-ए-आझम's picture

23 Oct 2014 - 11:28 pm | बोका-ए-आझम

जाॅर्ज बुश (थोरले) यांचे नाव जाॅर्ज एच्.डब्ल्यू. बुश असे होते - जाॅर्ज हर्बर्ट वाॅकर बुश.

बोका-ए-आझम's picture

23 Oct 2014 - 11:33 pm | बोका-ए-आझम

चंद्रगुप्तांपैकी पहिला हा चंद्रगुप्त मौर्य होता आणि दुसरा राजा समुद्रगुप्ताचा मुलगा चंद्रगुप्त विक्रमादित्य हा होता. दोघांची नावे जरी सारखी असली तरी घराणी आणि कालखंड वेगळे होते. आणि मला वाटतं राजधान्याही वेगळ्या असाव्यात - पहिल्याची पाटलीपुत्र (आजचे पाटणा) आणि दुस-याची अवंती (आजचे इंदौर).

नावातकायआहे's picture

27 Oct 2014 - 5:59 pm | नावातकायआहे

:-)

मजेदार गोष्टी. व्ही गीता या नावाचा संभ्रम कळला.
१)फारपूर्वी गावे, शहरे लहान होती आणि संपर्क क्षेत्रेही संकुचित होती. २)मालकी तत्वाचेसंबंधाने व्यक्तिपरत्वे फरक करण्याचा प्रश्न कमी वेळा निर्माण होत असावा. या दोन मुख्य कारणाने नावे अगदी स्पष्ट (discreet) वेगळी असण्याचा आग्रह नसावा.

{जिलब्या पाडण्यालाच आक्षेप आहे का लहान मोठ्या आकाराला आहे का कोणत्या पिठाच्या कोणत्या तेलात वगैरे ते कळले तर बरं होईल -हलकेच घ्या.}

खटपट्या's picture

23 Oct 2014 - 10:30 am | खटपट्या

माझ्या मित्राचे नाव - संदीप केलोथविठेल
त्याचा सख्खा भाऊ - प्रवीण नायर
वडील - उन्नी कृष्णन

आहे कि नाही मजा. नावावरून याचं नातं आहे हे अजिबात कळणार नाही.

माझ्या उत्तर भारतीय मित्राचे नाव आहे रमेश कुमार शर्मा. यात रमेशकुमार हे त्याचे स्वत:चे नाव आहे. पण तो लिहिताना स्वत:चे नाव आर के शर्मा असे लिहितो. आपल्याला वाटेल के म्हणजे त्याच्या वडिलांचे आद्याक्षर असेल पण त्याच्या वडिलांचे नाव भवरलाल आहे. आणि ते बी एल शर्मा असे नाव लावतात. एक तास वाद घातला आणि विषय सोडून दिला. अशा लोकांचा पासपोर्ट ला हमखास प्रोब्लेम होतो. मग बसतात रडत.

माझ्या एका दाक्षिणात्य मित्राचे नाव' के एन लोकेश (K N LOKESH)'
यातील लोकेश(LOKESH) त्याचे नाव.एन(N) हे नटराजन आडनावासाठी.
के (K) वडिलांसाठी नायतर तर तो जिथे जन्मला त्या कडप्पा गावाच्या नावातील के (K).

माझ्याकडे साधारण साडेसहा ते सात हजार पेशंटचा डाटा आहे,त्यात २०% हे आण्णा / आप्पा आहेत्,यांच्या नावांच्या घोळामुळे लय कुटाणा होतो राव.

पाषाणभेद's picture

23 Oct 2014 - 2:46 pm | पाषाणभेद

नाव अन पुढे किंवा मागे पॅन/टॅन/ आधार आणखी एखादा नंबर या पैकी एक जोडावा म्हणजे गोंधळ होणार नाही.

>>>> उत्तरभारतीय व्यक्ती नावांचे लेखनात वडीलांचे नाव नमुद करण्याची प्रथा कमी असावी.
अशी प्रथा कधीपासून अन का अस्तिवात आली काही अंदाज करताय का मंडळी????

श्रीरंग_जोशी's picture

23 Oct 2014 - 9:23 pm | श्रीरंग_जोशी

माझ्या माहितीप्रमाणे विंध्य पर्वताच्या उत्तरेला वडिलांचे नाव न लावण्याची परंपरा पाळली जाते अन विंध्य पर्वताच्या दक्षिणेला वडिलांचे किंवा पतीचे (स्त्रियांच्या बाबततीत) नाव मध्य नाव म्हणून वापरण्याची परंपरा पाळली जाते. अपवाद दोन्हीकडेही आहेतच. द्रविडी परंपरा तर खूपच वेगळ्या आहेत.

उत्तर भारतात पुरूषांसाठी कुमार हे मध्यनाव म्हणून वापरले जाण्याचे प्रमाण खूपच अधिक आहे.

उ०भा०लोक वडिलांचे नाव का लावत नाहीत स्वतःचे नाव अधिक आडनाव का लिहितात? उदा० अमुक मिश्रा ,तमुक यादव इत्यादी तर कधी नावापुढे लिहिलेले लाल, कुमार, चंद्र, शरण हेच आडनाव अथवा वडिलांचे नाव होते. उदा० भवरलाल मिश्र{मिश्रा} या नावाचे भवर हे नाव, लाल हे मधले नाव अथवा वडिलांचे नाव आणि मिश्र आडनाव समजले जाते तर कधी भवर हे नाव आणि लाल हे आडनाव होते.याचे उत्तर अथवा संदर्भ हवा आहे ?
उत्तरभारतात कोण कोणत्या वंशात जन्मला हे फार महत्त्वाचे वाटत असावे नंतर त्याचे नाव. उदा०चंद्रवंशिय राजा चंद्रसेन, सूर्यवंशिय सूर्यसेन, यदुवंशिय यादव, कुरूवंशिय कौरव इत्यादी. काही जातिवाचक सूतपुत्र, नदीकाठचे गौतम, गांगेय इ०.एकाच राजाचे वेगळ्या राण्यांकडून कौंतेय, माद्र, सौमित्र इ०.ऋषिंची वंशावळ काश्यप, अत्रेय, वसिष्ठ इ०.
वंश, जात नंतर नाव एवढे झाल्यावर कोणाचे (बापाचे) संतान हे नाव गौण झाले असेल.
आर्याँनी वंश,जात आणली आणि आर्य गांधार प्रांतातून उ०भारतातल्या गंगा- यमुना नद्यांच्या खोऱ्यांत येऊन राहिले या संदर्भाने उ०भारतीयांच्या नावांचा प्राधान्य क्रम अपेक्षित वाटतो.(द०भारतातली नावे नंतर.)

या पेक्षाही येडपटपणा म्हणजे बरेचसे उत्तरभारतीय लोक त्यांच्या नावापुढे कुमार असे लिहीतात. ते त्यांचे नाव आहे की आडनाव हेच कळत नाही. उदा: नितीशकुमार.
माझ्या ओळखीचा एक रवी दत्त आहे त्याच्या वडिलांचे आडनाव कौशीकदत्त असे आहे. तो इसम म्हणे की वडिलांच्या आडनावातील कौशीक हे आडनाव मोठा भाउ लावतो आनि तो स्वतःफक्त दत्त असे आडनाव लावतो.
हे उत्तर भारतीय स्वतः येडे असतात आणि दुसर्‍यांचे कन्फ्युजन करुन ठेवतात

यसवायजी's picture

27 Oct 2014 - 10:21 pm | यसवायजी

'कुवेंपु' या कन्नड कवीचे नाव आहे- "कुप्पळ्ळी वेंकटप्प पुट्टप्पा"
याचा अर्थ असा होतो- कुप्पळ्ळी(य) वेंकटप्प(इवर मगा) पुट्टप्पा.
म्हणजेच- कुप्पळ्ळी(च्या) वेंकटप्प (यांंचा मुलगा) पुट्टप्पा.

आशु जोग's picture

27 Oct 2014 - 11:05 pm | आशु जोग

माहीतराव बहुधा मिपावर येऊन स्वत: स्वतःशी संवाद साधत असतात

बाळ सप्रे's picture

4 Nov 2014 - 12:13 pm | बाळ सप्रे

वडिलांचे आडनाव आणि मुलाचे आडनाव एकच असावे असेही नसते म्हणे..
माझा एक मध्यप्रदेशातील मित्र 'महेश्वरी' असे आडनाव लावतो तर त्याच्या वडीलांचे आडनाव 'चांडक' असे आहे.
तसेच आडनाव लावणेही वैकल्पिक असते.. एक मित्र नारंग असे आडनाव असताना सगळीकडे फक्त 'नवीन कुमार' एवढेच लिहितो..

एकजण तर मधले नाव आणि शेवटचे नाव कधीच लावत नसे त्याचे बँक स्टेटमेंट 'Venkaiah unknown unknown' अशा नावाने घरी आले ..

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Nov 2014 - 12:59 pm | ज्ञानोबाचे पैजार

माझ्या एका आंध्रप्रदेशातील मित्राचे नाव :- नकुल सत्य सुर्य वेंकट विवेकानंद राव असे आहे.

आम्ही त्याला विवेक म्हणुनच ओळखतो आणि हापिसातील नोंदी प्रमाणे त्याचे नाव एन.एस.एस. व्ही. राव असे आहे.

बाहेरुन कुणाचा फोन आला की लै कन्फुजन होते राव.

पैजारबुवा,

आर्य's picture

5 Nov 2014 - 12:12 pm | आर्य

भारतात केवळ स्वत:चे आणि वडीलांचे नाव सांगण्याची / लीहण्याची प्रथा होती असे दिसते.
त्या वेळी केवळ गोत्रे / कुळातील प्रसिद्ध व्यक्तीचे नाव सांगायचे/ देवाचे नाव हिच आडनावे होती, हेच आजही उत्तर आणि दक्षिण भारतात आधळते.
सिंह / सिंग / राव / चंद्र / लाल / हे प्रेमाने वा आदराने लावले जाते.
मान्य पद्धत - आडनाव / गोत्र प्रथम + स्वत:चे नाव [ + वडीलांचे नाव / पतिचे नाव असे लावण्याची पद्धत आहे अथवा गावचे नाव ]

महारष्ट्र, गुजरात, कर्णाटक प्रांतात आडनाव लावण्याची प्रथा अगदी ४००-५०० वर्षा पुर्वीचीच असावी
वाढती लोकसंख्या, आंतरजाल (इंटरनेट), संपर्कसाधने यामुळे हे घोटाळे होत आहेत, पुर्वी फ़ार थोडे लोक पंचक्रॊशीतुन बाहेर पडत, काशी यात्रेला वगैरे....
बहुतांश मराठी आडनावे कामावरुन /पद /गाव/ उपाधी /हुद्द्यारुन रुढ आहेत्.
हुद्दा- देशपाडे, देशमूख, देसाई, खोत, कुलकर्णी, फ़डणवीस, चिटनीस, प्रधान, गडकरी, किल्लेदार पाटील /पटेल, धर्माधिकारी इ.
गाव - वाईकर, सातारकर, नागपुरकर, सांगलीकर, इंदूरकर, कोल्हापुरकर पाटणकर इ.
काम - सोनार, गवळी, कुंभार, शिंपी, लोहार, सुतार, गवंडी, उपाध्ये, वेदपाठक, गुरव, मंत्री, पंतप्रतिनिधी, पेशवे,
प्राणी - वाघ , बकरे , कोल्हे , लांडगे , बोके , ससे इ.
उपाधी - पंडीत, राव, वीर इ.
आता नाव सांगायचे नाही - इमेल / आधार नंबर वगैरे सांगावा लगणाय जसेकी ००७
मला वाटतय आडनाव हि पद्धत आद्याप सुसुत्र नाही काहि वेळ द्यावा लागणार......

सुनील's picture

5 Nov 2014 - 3:34 pm | सुनील

वाघमारे अणि डोईफोडे ही आडनावे हुद्द्यावरून आलीत की कामावरून? ;)

यसवायजी's picture

5 Nov 2014 - 3:54 pm | यसवायजी

प्राणी - वाघ , बकरे , कोल्हे , लांडगे , बोके , ससे इ.
यावरुन कशी आडनावे आली?
पाळणारे?/ खाणारे?/ त्याच वंशातले? ;) / त्याच गल्लीतले? / का अजुन काही?

बाळ सप्रे's picture

5 Nov 2014 - 3:56 pm | बाळ सप्रे

का स्वभावावरुन ??

टवाळ कार्टा's picture

11 Nov 2014 - 10:26 am | टवाळ कार्टा

त्याच गल्लीतले? >> =))

दुश्यन्त's picture

5 Nov 2014 - 2:56 pm | दुश्यन्त

आपल्याकडे बायकांनी आधी आपले नाव आणि नंतर नवऱ्याचे नाव / नवऱ्याचे आडनाव लावणे हि पद्धत ब्रिटीशांपासून उचलली असे कुठे तरी वाचल्याचे स्मरते. बाकी कुणी काय नाव/आडनाव लिहावे हे हे आता ऐच्छिक आहे. त्यामुळे एकाच घरात पती/पत्नी किंवा सख्खी भावंडे यांचे आडनाव किंवा मधले नाव पण वेगवेगळे असू शकण्याचे स्वातंत्र्य आहे.वडलांचे आणि मुलांचे आडनाव वेगवगळे अशी बरीच उदाहरणे मी उत्तर भारतीयांत पाहिली आहेत तर १-२ उदाहरणे मराठी कुटुंबात पण पाहिली आहेत. (मराठी कुटुंबातील एका मुलाने स्वतःचे आडनाव लगेच जात उघडी होते म्हणून सरकार दफ्तरी बदलून घेतले मात्र त्याचे आई- वडील आणि इतर भावंडे जुनेच आडनाव वापरतात.) आता कायद्याने हा सगळा ऐच्छिक मामला आहे ते बरेच आहे.एकदा सज्ञान झाल्यावर माझे नाव काय असावे हे मलाच ठरवू द्यावे हे अत्यंत योग्य आहे.

माहितगार's picture

11 Nov 2014 - 9:44 am | माहितगार

मोदी सरकार मधी भाजपाचे मंत्री "रवी शंकर प्रसाद" यांच्या नावाकडे लक्ष गेले. मराठी विकिपीडियावर त्यांच्या "रवी" नावातील "वी" दीर्घ आहे, हिंदी विकिपीडियात "वि" र्‍हस्व दिसतो आहे. आणि ते स्वतः हिंदी लेखन कसे करतात ते ऑनलाईन पहाण्यास मिळाले नाही.

ऑनलाईन मिळत असलेल्या माहितीनुसार त्यांच्या वडीलांचे नाव "ठाकूर प्रसाद" असे दिलेले दिसते. त्यांच्या पत्नीचे नाव डॉ. (श्रीमती) माया शंकर असे लिहिलेले दिसते. आईचे नाव श्रीमती बिमला प्रसाद असे दिसते आहे. संदर्भ , , ,

मला पडलेल्या नावलेखन विषयक शंका "ठाकूर प्रसाद" मध्ये पहिल नाव कोणत आणि आडनाव कोणत. प्रसाद हेच निश्चितपणे आडनाव आहे का ठाकूर हे आडनाव आहे. बिमला प्रसाद मध्ये व चे लेखन ब ने होते मग रवी शंकर प्रसाद स्वतःच्या नावाचे हिंदी लेखन व च्या एवजी ब ने करत असण्याची शक्यता आहे का ? आणि त्यांच्या पत्नी रवी शंकर यांच्या माया शंकर नावात पहिले नाव माया आहे दुसरे नाव शंकर आहे, हे जरासे गोंधळात टाकते शंकर हे श्रीमती माया यांचे उपनाव आहे का पतीच्या नावाचा भाग म्हणून येते आहे का माहेरच्या नावातील भाग आहे हे जरासे गोंधळात टाकते..

सुनील's picture

11 Nov 2014 - 9:52 am | सुनील

शी. सा. न.

माहितगार's picture

11 Nov 2014 - 9:56 am | माहितगार

? नेमके समजले नाही .

जेपी's picture

11 Nov 2014 - 10:18 am | जेपी

शी. सा. न.
सुनील - Tue, 11/11/2014 - 09:52
नवीन

शी. सा. न.

उत्तर द्या

? नेमके समजले नाही .
माहितगार - Tue, 11/11/2014 - 09:56
नवीन

? नेमके समजले नाही .

तुमच्या चिकाटिला दाद देत आहेत.

तुमच्या चिकाटिला दाद देत आहेत.

अहो इंग्रजी विकिपीडियावर कुणीतरी "रवी शंकर प्रसाद" यांचे वडील Thakur Prasad यांच्या नावाने हे शीर्षक असलेला लेख बनवला आहे. तो लेख बनवणार्‍या व्यक्तीने त्या नावाची एकच प्रसिद्ध व्यक्ती असेल ह्या हिशेबाने लेख बनवला असेल. हिंदीत बरेच वेग वेगळे पण वृत्तपत्रात नाव/संदर्भ येऊ शकेल ठा(कु|कू)र प्रसाद केवळ ठा(कु|कू)र प्रसाद एवढेच नाव लावतात. त्या शिवाय अजून आडनाव वापरुन ठा(कु|कू)र प्रसाद अमुकतमूक बरेच आहेत. विकिपीडियात चुकीची माहिती दिसली की आक्षेप घेणे सोपे असते. माहिती शोधताना आणि भरताना होऊ शकणार्‍या गफलती कुणी लक्षात घेत नाही म्हणून चिकाटीने मागे पडलो आहे.

मुस्लीम अरेबीक नाम लेखन शैलीचेही काहीसे वेगळे प्रकार आहेत त्यातही आमच्या अनभिज्ञतेने गोंधळ होतात त्याची चर्चा करण्यासाठी तो धागा वेगळा सवडीने काढणार आहे.

"ठाकूर प्रसाद" वर गूगल केल्या नंतर असे नाव असलेली बरीच मंडळी दिसताहेत. ठाकूर हे पहिले नाव असेल प्रसाद हे उपनाव असेल तर विशीष्ट पहिल्या नावा सोबतचे उपनावही विशीष्ट स्वरुपाचेच असते असे काही असते का ?
ठाकूर प्रसाद
ठाकूर प्रसाद सिह
ठाकूर प्रसाद यादव
ठाकूर प्रसाद मुर्मु- अद्भुत प्रयास
ठाकूर प्रसाद वसंत
ठाकूर प्रसाद त्यागी
ठाकूर प्रसाद मंडल
ठाकूर प्रसाद पान्डे
ठाकूर प्रसाद न्यौपा
ठाकूर प्रसाद शर्मा

ठाकुर प्रसाद थारू
ठाकुर प्रसाद काफ्ले
ठाकुर प्रसाद ज्ञवाली
ठाकुर प्रसाद गंगवार
ठाकुर प्रसाद मिश्र
ठाकुर प्रसाद सक्‍सेना
ठाकुर प्रसाद अग्रवाल
ठाकुर प्रसाद चौबे
ठाकुर प्रसाद धर
ठाकुर प्रसाद वैद
ठाकुर प्रसाद तिवारी
ठाकुर प्रसाद साव
ठाकुर प्रसाद श्रीवास्तव
ठाकुर प्रसाद राही

झी न्यूजवर रविशंकर प्रसाद यांची ओळख "उंची जाति के कश्यप परिवार में 30 अगस्त 1954 को जन्मे रविशंकर ने पटना विश्वविद्यालय से स्नातक, स्नातकोत्तर और फिर कानून की पढ़ाई की।" अशी दिली आहे. यात कश्यप परिवार म्हणजे आडनाव असेल का गोत्र वगैरे का हा व्यक्ती ओळखीच्या बिहार मधील अजून काही वेगळा प्रघात आहे.

माहितगार's picture

11 Nov 2014 - 10:55 am | माहितगार

अवांतर: या पायोनीयर मधील लेखात त्यांची जातच नव्हे उपजात सुद्धा नोंदवली आहे.

सुबोध खरे's picture

11 Nov 2014 - 10:40 am | सुबोध खरे

उत्तर भारतीय नवे आणी आडनावे यात भयानक घोळ आहेत. ठाकूर हे बर्याच वेळेस जातीवाचक नाव (राजपूत लोकांमध्ये) म्हणून सुरुवातीला लावले जात आसे . आमचे एक प्राध्यापक अजय प्रताप सिंग होते यात अजय प्रताप हे त्यांचे नाव आहे सिंघ हे आडनाव आहे ( तशा त्या आडनावाला काही अर्थ नाही कारण प्रत्येक उच्च जातीतील माणूस आपल्या नावाच्या पुढे सिंग लावत असतो.) त्यांच्या वडिलांचे नाव महेंद्र प्रताप सिंग होते. यात ते स्वताला आणी लोक त्यांना आदराने ठाकूर अजय प्रताप सिंग म्हणवत असत. आपले एक माजी पंतप्रधान ठाकूर विश्वनाथ प्रताप सिंग होते.
राजपूत लोक लावतात हे पाहून यादव लोकांनी सुद्धा स्वतःला मध्ये सिंग नाव धारण करण्यास सुरुवात केली. उदा मुलायम सिंग यादव.
ब्राम्हण जातीमध्ये सहसा सिंग हि उपाधी लावत नाहीत तेथे कुमार लावले जाते उदा अवधेश कुमार मिश्र.
बर्याच वेळेस आडनाव हे जातीदर्शक असते उदा अगरवाल, गुप्ता हि बनिया लोकांची आडनावे आहेत म्हणून हे लोक आपली आडनावे टाकून देतात आणी आपल्या नावाच्या पुढे फक्त कुमार लावतात. उदा. अनुराग कुमार (अगरवाल) राजीव कुमार (गुप्ता)
काही लोक ठाकूर हे नाव म्हणून पण वापरायला लागले जसे वर वर्णन केले आहे.
पंजाबी लोकांच्या तर नावातच नव्हे तर लिंगातही भयानक घोळ आहे ऊदा. कमलेश हे खरं तर पुरुषाचे नाव असायला पाहिजे पण ते स्त्रीचे आहे तसेच संतोष परमजीत करमजीत सुरिंदर(सुरेंद्र चा अपभ्रंश) महिंदर(महेंद्र) आणी असे अनेक
शिवाय शक्ती(कपूर) कीर्ती(आझाद) अश्वनी(गुजराल) हि स्त्रियांची नावे पुरुषांना दिलेली आढळतात. पंजाबी लोकांचे मुलीला सुद्धा पुत्तर(पुत्र) म्हणून हाक मारणे तर डोक्यातच जाते. करण हे नाव खर तर कर्ण असं आहे. मुळात गुरमुखी मध्ये जोडाक्षर नाहीच त्यामुळे ते लोक स्टार आणी स्टाईल ला सटार आणी सटाईल म्हणतात (आणी ऊ. प्रदेशातील भय्ये इस्टार आणी इस्टाईल म्हणतात)
हिंदी भाषेची जितकी वाट पंजाब्यानी आणी हरियाणवी जाटानि लावली आहे तितकी कुणीही लावली नसेल.
असे असंख्य किस्से आहेत. यावर दोन चार पी एच डी होतील इतके साहित्य उपलब्ध आहे.

माहितगार's picture

11 Nov 2014 - 10:57 am | माहितगार

या धाग्यास प्रतिसादातून बरिच माहिती मिळते आहे, आपले आणि इतरही प्रतिसाद देत असलेल्या मिपाकरांचा आभारी आहे.

सुनील's picture

11 Nov 2014 - 11:44 am | सुनील

पंजाबी लोकांच्या तर नावातच नव्हे तर लिंगातही भयानक घोळ आहे ऊदा. कमलेश हे खरं तर पुरुषाचे नाव असायला पाहिजे पण ते स्त्रीचे आहे

हे विधान सरसकट सर्व पंजाब्यांबाबत करणे योग्य ठरणार नाही. शिख धर्मियांबाबतीत मात्र हे खरे आहे. त्यांच्यात नावामध्ये स्त्री-पुरुष भेद नसतो. पुरुष नावानंतर 'सिंग' हे उपनाव लावतात तर स्त्रीया 'कौर'.

म्हणून जगजीत सिंग जसा असतो तशीच जगजीत कौरदेखिल!

एक करेक्शन- गुरमुखी लिपीत क्क, च्च, ट्ट, इ. द्वित्तवाली जोडाक्षरे दाखवता येतात, पण क्र, च्य, इ. वाली नाही. उदा.

दिल्ली हा शब्द गुरमुखीत ਦਿੱਲੀ असा लिहितात. तो चंद्र म्हणजे द्वित्त झाल्याची खूण आहे.

त्यातही एक करेक्शन. द्वित्त सोडूनही जोडाक्षरे दाखवता येतात, पण ती फक्त तीन प्रकारची. कुठले ते खालील लिंकेत दिलेले आहे.

http://en.wikipedia.org/wiki/Gurmukh%C4%AB_alphabet#.22Subjoined.22_letters

बाळ सप्रे's picture

11 Nov 2014 - 1:37 pm | बाळ सप्रे

ब्रार, प्राजी.. पण असतात की ?

सुनील's picture

11 Nov 2014 - 1:43 pm | सुनील

प्राठा विसरलात?

(आत्ताच खाऊन आलो!) ;)

विकिपीडिया वाचकाचा होऊ शकणारा घोळ अधीक स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. इंग्रजी विकिपीडियावर एक अभारतीय वाचक आहे समजा त्याने आधी लेख उघडला "अशोक शंकर(राव) चव्हाण" हा त्याला मधल नाव वडलांच असत असा समजा अंदाजा आला आणि त्याने नंतर "रवि शंकर प्रसाद" हा लेख उघडला तर सहाजिक त्याला या नावातही दुसरे नाव वडलांचे असल्याचा चुकीचा भ्रम होऊ शकतो. दुसर्‍या बाजूला दुसरा परकीय व्यक्ती आहे त्याने "रवि शंकर प्रसाद" हे नाव आधी पाहील यात शंकर हे उपनाव असल्याची माहिती मिळण्याची विकिपीडियावर सध्यातरी काही व्यवस्था नाही पण समजा त्याने कुणाला विचारल त्या शंकर हे उपनाव आहे हे लक्षात आल नंतर त्याने अशोक शंकर(राव) चव्हाण हे नाव पाहील तर तो शंकर(राव) हे अशोकरावांचे उपनाव असल्याचा चुकीचा भ्रम तयार होतो.

आधी मी परकिय लोकांच म्हणून उदाहरण दिल पण अशा प्रकारची चर्चा न वाचलेल्या बहुसंख्य मराठी लोक जे रवि शंकर प्रसाद हे नाव वृत्तपत्रादी ठिकाणाहून वाचत असतील ते शंकर हे त्यांच्या वडलांचे नाव असल्याच्या भ्रमात असतील. दुसर्‍या बाजूला जे हिंदी लोक केवळ अशोक शंकर(राव) चव्हाण हे नाव वाचतील आणि त्यांना शंकरराव चव्हाण माहित नसलेला नवीन पिढीतील हिंदी माणूस असेल तर त्याच्यासाठी शंकरराव हे अशोकरावांचे उपनाव असेल. आता हे अशी अर्धी कच्ची माहिती असलेली मंडळी वेगवेगळ्या नावाच्या व्यक्ती नावांच्या मराठी हिंदी आणि इंग्रजी विकिपीडियातील लेखात शोधून माहिती लिहितील लेखनवांचे दुवे एक दुसर्‍या व्यक्तीस जोडले जात असतील तेव्हा काय काय घोळ होत असणार याची कल्पनाच केलेली बरी.

अण्णा हजारेंच नाव दिल्लीतील आंदोलनात पुढे आल तेव्हा इंग्रजी विकिपीडियातील त्यांच्या गावाच्या नावाचा दुवा विदर्भातील एका गावाच्या नावावर उघडत असे. हनुमान माता अंजनीच्या नावाचा दुवा कुणा आमेरीकन (नृत्यांगना) स्त्रीच्या नावावर जात असे आमेरीकन अंजनीचे (पंखे)भक्त मराठी आणि इतर भाषी विकिपीडियात आमेरीकन अंजनीची छायाचित्रे लावत असत हा घोळ पुन्हा पुन्हा होत असे (हनुमान माता अंजनीच्या नावाचा दुवा चुकीच्या ठिकाणी उघडू नये व छायाचित्र लावणार्‍या पंख्यांचा घोळ होऊ नये दुसरीकडे भारतात गैरसमज होऊ नयेत म्हणून इंग्रजी विकिपीडियावर मला बर्‍या पैकी डोकेफोड करावी लागली होती). असो

माहितगार ,एखाद्या नावाचा शोध विकिवर घेतला की त्याचे पर्याय लगेच येतात. उदा॰डकवर्थ शोधणाऱ्यास १)या नावाच्या माणसाची माहिती /२)क्रिकेटमध्ये पावसाने खेळ अर्धवट सोडल्यावर घेण्याचा निर्णय हवा असेल.
तुम्हाला रवी शंकर प्रसाद यांचे जितके पर्याय मिळतील तितके टाका. आपण काही त्यांना आधारकार्ड नंबर मागू शकत नाही अथवा त्यांचे नाव बदलण्यास भाग पाडू शकत नाही.

माहितगार's picture

12 Dec 2014 - 2:50 pm | माहितगार

'कैलाश' या केवळ पहिल्या नावावर अवलंबून राहून, मध्यप्रदेशच्या विधानसभा आमदारांनी नोबेल प्राईज मिळाल्याचे अभिनंदन आणि टिका चक्क चुकीच्या व्यक्तीला उद्देशून केल्याची बातमी येते आहे. हा बातमी दुवा