माझा कॅनव्हास.. अर्थात जोहॅनसची गोष्ट.

इनिगोय's picture
इनिगोय in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 4:17 pm

२०१२ सालचा जुलै महिना. ऑस्ट्रियामधल्या प्योर्टशाख इथे जगभरातले कलाकार जमले होते. तिथे उभारलेल्या मोठ्या मंचावर आमच्या सर्वांच्या कलाकृती सादर करून झाल्या होत्या. निकालाची वेळ जवळ येत होती. तिसर्‍या आणि दुसर्‍या क्रमांकाचं पारितोषिक जाहीर झालं आणि विजेतेपदासाठीची घोषणा करण्यात येऊ लागली.. "आणि यंदाचा आपला विश्वविजेता ठरला आहे... जोहॅनस स्टॉयटर!!"

JS1

सगळीकडे एकच जल्लोष सुरू झाला, मी धावत मंचावर गेलो, ट्रॉफी स्वीकारली.. डोळ्यांपुढून मात्र गेल्या एका तपाच्या आठवणी सरकून जात होत्या!

मी. एक आर्टिस्ट. निर्जीव कॅनव्हासवर रंगाचे फटकारे मारून चित्र जिवंत करणं हे कलाकाराचं काम. पण माझा कॅनव्हास निर्जीव नाही. जिवंत आहे. कारण मी आहे एक बॉडीपेंटिंग आर्टिस्ट!

इटलीमध्ये मी जन्माला आलो आणि ऑस्ट्रियामध्ये माझं औपचारिक शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण घेताघेताच वेगवेगळ्या कलाही शिकून घेत होतो. पण तरीही नेमकं कोणतं क्षेत्र निवडावं, हे अजून पक्कं ठरत नव्हतं. अशातच एक दिवस शारीर रंगलेपन हा कलाप्रकार मला पाहायला मिळाला. आतापर्यंत मी पाहिलेली चित्रं कागदावर, कापडावर, काचांवर काढलेली होती. पण सजीव मानवी शरीराचाच कॅनव्हास बनवायचा..! हे काही वेगळंच होतं. नवं होतं. आणि करून पाहायलाच हवं असं वाटायला लावणारं होतं. २००० साली मी पहिल्यांदा बॉडी पेंटिंग करून पाहिलं. अनेक तास खर्चून केलेल्या त्या रंगकारीने मला अखेर माझी दिशा दाखवून दिली.

मी नेमकं काय करतो, हे समजून घेण्यासाठी शारीर रंगलेपन नेमकं काय आहे हे थोडक्यात सांगतो. चेहरा आणि इतर अवयव वेगवेगळ्या रंगांनी रंगवणं ही कला माणसाने आदिम संस्कृतीपासून जोपासली आहे. विसाव्या शतकाच्या मध्यावर जेव्हा न्युडिटीचा प्रसार, प्रचार होऊ लागला तेव्हा हे शारीर रंगलेपन नागरी जीवनामध्येदेखील शिरलं. तर्‍हतर्‍हेचे रंग, आकृत्या वापरून शरीर सजवणं हे वाढत्या प्रमाणात दिसून यायला लागलं. सर्जनशीलता व्यक्त करण्यासाठी उत्सुक असलेल्या त्यावेळच्या तरुण पिढीला हा एक नवाच, अपारंपरिक मार्ग आकर्षक वाटला नसता तरच नवल! चेहऱ्यावर, शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर काढलेली मोजकेच तास टिकणारी शारीरचित्रं, थोडा अधिक काळ टिकणारे किंवा कायमस्वरूपी असलेले टॅटूज असे अनेक प्रकार तरुण मंडळी शरीरावर मिरवू लागली.

JS2

त्यापैकी बॉडी पेंटिंगमध्ये खूप प्रयोग होत गेले. मी या क्षेत्रात पहिल्यांदा शिरलो, तोवर संपूर्ण शरीर कॅनव्हाससमान मानून एखादी संकल्पना मांडण्यासाठी ते रंगवणं रूढ होत होतं. मीही अशीच सुरुवात केली. कसं करतो मी हे काम? तर सर्वप्रथम मला ज्या कल्पनेवर काम करायचंय ती सुस्पष्ट करून कागदावर मांडणं. दुसर्‍या टप्प्यात माझ्या कल्पनेला प्रत्यक्षात आणू शकेल अशा मॉडेलचा शोध घेणं, तिला/त्याला चित्रविषय योग्य तर्‍हेने समजावून देणं. आणि अखेर प्रत्यक्ष रंगकाम करणं. या सगळ्याला काही आठवड्यांपासून काही महिन्यांपर्यंतचा वेळ द्यावा लागतो.

सर्वसाधारण चित्र रंगवण्यापेक्षा हा प्रकार खूप वेगळा आहे. कारण माझं माध्यम आहे माणसाची त्वचा. जी संवेदनशील, मऊ आणि उष्ण असते. जिवंत असते... चित्रासाठी वापरलेले रंग हे अनेक तास त्वचेवर राहतात, त्यामुळे ते त्वचेला हानी पोहोचवणारे नसतील अशा तर्‍हेचेच निवडावे लागतात. रंग स्वच्छ करण्यासाठीही तशीच सुरक्षित द्रव्यं आम्ही वापरतो. अत्यंत महत्त्वाचा असा दुसरा भाग असतो मॉडेलची मानसिक तयारी. चित्र कसं दिसणार आहे हे आधी कागदावर पाहिलेलं असलं, तरी ते प्रत्यक्ष रंगवत असतानाचा अनुभव आणि शरीराच्या मितींवर काम केल्यानंतर दिसून येणारा परिणाम हे फारच वेगळे असतात. सतत आठ ते दहा तास न कंटाळता शरीराचा इंच न् इंच रंगवून घेणं हे अगदी कस लावणारं आहे. अर्थात या वेळात मॉडेलला कोणताही त्रास होऊ नये, शरीर आखडू नये, शरीराचे तापमान संतुलित राहून घाम येऊ नये अथवा शरीर थंड पडू नये ही सारी काळजी मी आणि माझे मदतनीस घेतच असतो.

JS3

आल्प्स पर्वतरांगांच्या सहवासात माझं लहानपण गेलं, तिथला निसर्ग माझ्यासाठी कायमच जवळचा.. त्यामुळेच माझ्या कलाकृतींमध्येही तोच मुख्य प्रेरणा राहिलेला आहे. त्यातूनच वेगवेगळे ऋतू, पंचमहाभूतं, खडक, वृक्ष अशा मध्यवर्ती कल्पना धरून मी अनेक शरीरचित्रं रंगवली. माझ्या डोक्यातल्या कल्पना प्रत्यक्षात आणता आणता केव्हातरी मला International Body-painting Community आणि World Championship चीही माहिती झाली. अधिकृत व्यासपीठावर आपली कला सादर करण्यासाठी, आणि इतर कलाकारांचं काम पाहता येण्यासाठी हे एक चांगलं व्यासपीठ होतं. २००९ मध्ये पहिल्यांदाच या स्पर्धेत मी भाग घेतला. माझा गट होता ब्रशेस आणि स्पंज. आश्चर्य म्हणजे पहिल्याच प्रयत्नात मी पाचवं स्थान मिळवलं. आणि तिथपासूनच एक नवंच आकाश माझ्या रंगांच्या फटकार्‍यांसाठी मोकळं झालं.

एव्हाना माझ्या या चित्रांची दखल जाहिराती, ध्वनिचित्रफिती, कॅटलॉग्जची मुखपृष्ठे, सीडीजची आवरणे, फॅशनशोज, कार्यशाळा अशा हरेक ठिकाणी घेतली जाऊ लागली होती. खरंतर यातून माझी आर्थिक कमाई व्हावी हा विचार मी कधीच केला नव्हता. माझ्यासाठी ते महत्त्वाचं नव्हतंच. वेगवेगळ्या स्पर्धांची तयारी आणि ही वेगवेगळी कामं करत असताना मी अनेक प्रकारचे अनुभव घेण्यात मग्न होतो. या प्रकारच्या अभिव्यक्तीला स्थळाचे बंधन नाही. साहजिकच माझं पुष्कळसं काम मी माझ्या स्टुडिओबाहेरच, कधी शेतात, कधी जंगलात, कधी टेकाडांवर तर कधी याहूनही भलत्याच ठिकाणी जाऊन केलेलं आहे. अशातच माझ्या कष्टांचं चीज करणारी एक घटना घडली - मला २०१२ साली बॉडीपेंटिंगच्या स्पर्धेमध्ये विश्वविजेतेपद मिळालं! हे या क्षेत्रातलं एक अत्यंत मानाचं शिखर आहे.. केवळ एक छंद म्हणून मनापासून जोपासलेल्या माझ्या कलेने मला मात्र प्रतिष्ठा आणि एक व्यावसायिक ओळखही मिळवून दिली होती! माझ्या आयुष्यातल्या अत्युच्च आनंदाच्या क्षणांपैकी हा एक क्षण होता. आज मागे वळून बघतो तेव्हा मला प्रकर्षाने एकच गोष्ट जाणवते ती म्हणजे कोणत्याही उत्तम कामाचे, त्यातल्या यशाचे एकमेव रहस्य असते... ते म्हणजे त्या कामावर मनापासून केलेले प्रेम. ते जेव्हा साधेल तेव्हा प्रसिद्धी आणि पैसाही आपोआप तुम्हाला शोधत येतोच.

या सूत्रानुसारच मी माझ्या क्षेत्रात नवनवे प्रयोग करत असतो. त्यातूनच मला छद्मवेषी किंवा दृष्टिभ्रम निर्माण करणार्‍या शारीर रंगलेपनाचा पुढचा टप्पा सापडला. "शरीराच्या घडणींचा आणि शरीर वेगवेगळ्या तर्‍हेने दुमडल्यामुळे दिसणार्‍या आकारांचा अचूक वापर करता येणं" हे छद्मवेषी रंगलेपनातलं सर्वात महत्त्वाचं कसब असावं. ते आत्मसात करण्यासाठी मी माणसाच्या अवयवांचं निसर्गामधल्या गोष्टींशी दिसून येणारं साधर्म्य यांचं निरीक्षण करू लागलो. इथेही पुन्हा एकदा निसर्गात आढळणारी चित्रकला आणि शिल्पकलादेखील माझी मार्गदर्शक ठरली. हा खाली दिलेला पोपटाचा फोटो तुम्ही यापूर्वी पाहिलेला असेलच.

JS4

ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मी नेमकं किती काळ काम केलं असेल असं तुम्हाला वाटतं? ...या एका चित्रासाठी मला जवळजवळ चार आठवडे लागले! त्यातला सर्वात जास्त काळ हे चित्र कागदावर रंगवण्यात गेला. कोणत्या छटा वापराव्या, मॉडेलची बैठक कशी असावी, छायाचित्र कोणत्या कोनातून काढावं यातले एकूणएक तपशील मी या काळात नक्की केले होते. मॉडेलचं शरीर प्रत्यक्ष रंगवण्यासाठी मला आठ तास लागले होते. त्यानंतर तिला अचूकपणे योग्य त्या बैठकीत बसवण्यासाठी संपूर्ण एक तास खर्ची पडला.. तेव्हा कुठे मी या कलाकृतीचे फोटो घेऊ शकलो. म्हणून मी म्हटलं की माझ्या क्षेत्रात मॉडेलची मानसिक तयारी हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. कल्पना करा... पूर्ण शरीराला रंग लावून घेतलेल्या स्थितीत न कंटाळता, नेटाने तासांमागून तास चित्रकाराने सांगितल्याप्रमाणे उभं अथवा बसून राहायचं, चित्रीकरण सुरू असताना पायाचं किंवा हाताचं बोटही हलवायचं नाही... हे सगळं अजिबातच सोपं नाहीय.

१४ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या माझ्या या प्रवासात आता मला सापडली आहेत समुहशारीरचित्रं. यात एकाहून अधिक व्यक्तींचे शरीर रंगवून त्यांच्या सुयोग्य मांडणीमधून मी एक आकृतिबंध साधत असतो. एका व्यक्तीसाठी चार आठवड्यांची पूर्वतयारी आणि आठदहा तासांचे प्रत्यक्ष रंगकाम... तर त्याहून अधिक व्यक्तींसाठी किती वेळ? हा हिशोब मी तुमच्यावरच सोपवतो. :) या खाली दिलेल्या छायाचित्रात किती व्यक्ती उपस्थित आहेत.. सांगू शकाल?

JS5

माझ्या या कलेने मला खूप समृद्ध केलंय, अजूनही करतेय. माझ्या मॉडेल्स, माझे मदतनीस, या कलाकृतींची छायाचित्रं काढणारी मंडळी या सगळ्यांसोबत अजूनही मी नवनवं काहीतरी शिकतोच आहे. या नव्या संकल्पनेतल्या सगळ्या शक्यता अजमावून झाल्या की पुन्हा नवे काहीतरी घेऊन तुमच्या भेटीला येईनच. तोवर.. Ciao!

JS6

(तळटीप: हा अनुवाद नसून जोहॅनसचं मनोगत वाटावं अशा तऱ्हेने केलेलं स्वतंत्र लेखन आहे. हे लिहिण्यासाठी Johannes Stoetter या कलाकाराची जालावर उपलब्ध असलेली माहिती, छायाचित्रं आणि ध्वनिचित्रफिती या सगळ्यांचा उपयोग झाला. काही ठिकाणी एकाच गोष्टीबाबत वेगवेगळे तपशील सापडले, तिथे त्यातल्यात्यात अचूक माहिती वापरण्याचा प्रयत्न केला आहे.)

दिवाळी अंक २०१४

प्रतिक्रिया

एस's picture

21 Oct 2014 - 8:43 pm | एस

लेख आवडला! काय अफाट कला आहे! बॉडीपेंटिंगमध्ये कलाकाराचा आणि त्याच्या 'कॅनव्हास'चाही पेशन्स पणाला लागतो. त्यात जे रंगवतोय ते रंगवताना कॅनव्हास वेगळ्या स्थितीत असतो. नंतर त्याची स्थिती बदलते. त्यामुळे हा बदल लक्षात ठेऊनच चित्र रंगवावे लागते. यात कल्पनाशक्तीची कसोटी लागते! जोहॅनस स्टॉयटरची ओळख करून दिल्याबद्दल अनेक आभार!

मधुरा देशपांडे's picture

22 Oct 2014 - 1:39 pm | मधुरा देशपांडे

खूप छान ओळख करुन दिलीस. एरवी हे असे अनेक चित्र नुसते इमेल्समधुन फिरतात पण त्यामागची मेहनत, ती करणारे चेहरे इत्यादी गोष्टी अनभिज्ञ असतात. एका वेगळ्या कलेविषयी आणि कलाकारावरील लेखासाठी धन्यवाद.

पिलीयन रायडर's picture

22 Oct 2014 - 4:27 pm | पिलीयन रायडर

+१

तो पोपटाचा फोटो पाहिला होता.. पण त्यामागे इतकी मेहनत असेल असा विचार कधीही आला नाही...

लेख उत्तम जमला आहे!

पैसा's picture

22 Oct 2014 - 9:11 pm | पैसा

नवीनच प्रकारच्या कलेची ओळख करून दिलीस, तीही आत्मवृत्त प्रकारात! जबरदस्त! प्रचंड मेहनत घेऊन लिहिलेला लेख आहे हे पदोपदी जाणवतं आहे! सलाम!

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Oct 2014 - 12:39 am | डॉ सुहास म्हात्रे

एक अनवट कलाप्रकार आणि कलाकार यांची प्रथमवचनी ओळख खूप आवडली ! *good*

नव्या कलाप्रकाराची वेगळी ओळख.

प्रास's picture

24 Oct 2014 - 6:36 pm | प्रास

मनोगताच्या माध्यमातून माहितीपूर्ण लेखनाचा प्रयत्न आवडला.

सुहास झेले's picture

26 Oct 2014 - 5:54 pm | सुहास झेले

मागे एकदा फेसबुकवर फोटो पहिले होते ह्यातालेच.. पण त्यात कलाकाराचे नाव दिले नव्हते. आज त्या कलाकाराची ओळख झाली... मनापासून धन्यवाद :)

सविता००१'s picture

26 Oct 2014 - 6:02 pm | सविता००१

एका वेगळ्या कलेची, कलाकाराची अगदी आगळ्यावेगळ्या पद्धतीने ओळ्ख करून दिल्याबद्दल.

मित्रहो's picture

26 Oct 2014 - 6:27 pm | मित्रहो

चित्रे बघितली होती पण कलाकाराचे नांव माहीती नव्हते सविस्तर ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद!!

स्पंदना's picture

27 Oct 2014 - 8:58 am | स्पंदना

धन्य त्या माणसाची!!
अग तो पेब्बल्सचा फोटो तर अजिबातच जाणवत नाही. वृक्ष सुद्धा.... काय कला आहे!!
अन इने तुझी सांगायची स्टायल सुद्धा अशीच मिसळुन गेली आहे हो, जणु अनुवादच!

खुप मस्त लिहले आहेस इनि. आवडले. :)

श्रीरंग_जोशी's picture

29 Oct 2014 - 11:46 pm | श्रीरंग_जोशी

या विषयावरचं लेखन आज प्रथमच वाचलं.

फारच सुंदर लिहिलं आहे.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

30 Oct 2014 - 11:56 am | मिसळलेला काव्यप्रेमी

कल्पनाच भन्नाट आहे, त्यात इनितै, तू खरचं मस्त मांडले आहेस हे मनोगत..
ब्राहो!!

बोका-ए-आझम's picture

31 Oct 2014 - 1:25 am | बोका-ए-आझम

क्या बात है! अप्रतिम कलाकृतींची आणि कलंदर कलाकाराची ओळख करुन देणारा तितकाच अप्रतिम लेख! कलाकाराचं व्यक्तिमत्त्व लेखात बरोबर पकडले आहे आणि प्रथमपुरूषी निवेदनामुळे त्याला वेगळीच उंची मिळालेली आहे. फोटोही लाजवाब!

जुइ's picture

2 Nov 2014 - 5:50 am | जुइ

ही छायाचित्रे अनेकदा ढकलपत्रांमधे पाहिली आहेत मात्र त्यामागे ईतकी मेहनत आहे हे माहित नव्हते. कालाकाराची आणि त्याच्या कलेची माहिती अनोख्याप्रकारे करुन दिल्याबद्ल धन्यवाद!

सगळ्या प्रतिसादकांचे मनापासून आभार.

इथे जोहॅनसचे काही व्हिडिओज पाहता येतील.

जोहॅनस काम करताना

लहान मुलांना घेऊन केलेली एक अप्रतिम जाहिरात

अगदी अलीकडे केलेलं एक प्रोजेक्ट - यातलं त्याचं काम म्हणजे स्वतंत्र परफॉर्मन्सच वाटतो...

आरोही's picture

3 Nov 2014 - 1:02 pm | आरोही

खूप सुंदर लेख ग .. खूपच माहितीपूर्ण ..किती मेहनत आहेत या कलेमध्ये ...

सानिकास्वप्निल's picture

3 Nov 2014 - 2:06 pm | सानिकास्वप्निल

उत्तम माहितीपूर्ण लेख.
जोहॅनस स्टॉयटरची ओळख आवडली.

छान लिहिलय..कलाकाराची छान ओळख झाली.