एक नाते - अनोखे

वैशाली हसमनीस's picture
वैशाली हसमनीस in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 8:15 am

एक नाते — अनोखे

     माणूस जन्मल्यापासून त्याच्या जीवनात अनेक नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरूवात होते. कोणतेही मूलभूत प्रश्न मनात येण्याआधीच ही नाती तयार होतात. पुढे ह्या नात्यांची दृढता किंवा कमजोरपणा व्यक्तिसापेक्ष ठरू शकते. आई-मूल, बाप-मूल, बहीण-भाऊ, पती-पत्नी, मित्र-मैत्रिणी, काका, मामा, मावशी, आत्या इ. अनेक नाती जन्माला येतात. आपल्या साहित्यात यातील अनेक नात्यांचे भरभरून गोडवे गायलेले ठिकठिकाणी दिसून येतात. परंतु ह्या सर्व नात्यांहून एक आगळेवेगळे, बोनस म्हणून पदरात पडलेले, तरीही अत्यंत गहिरे आणि हृद्य, तरीही थोडेसे उपेक्षित राहिलेले नाते म्हणजे आजी आणि नातवंडाचे नाते. ह्या नात्यासंबंधी कुठेही फारसे वर्णन केलेले आढळून येत नाही. असलेच तर अपवादात्मक आणि चित्रपटातून, कथाकादंबऱ्यांतून आईवियोगामुळे आईचाच रोल निभावण्याच्या भूमिकेत.

     वास्तविक हे नाते कोणतीच अपेक्षा नसलेले असते. आईचे आपल्या अपत्यावर कितीही प्रेम असले तरी ह्या नात्यावर उभयपक्षी अपेक्षांचे ओझे असतेच. आपल्याला म्हातारपणी मुलाने आर्थिक नको असेल तरीही प्रेमाचा मानसिक आधार द्यावा ही तर प्राथमिक अपेक्षा असतेच. पण आजी-नातवंडाच्या नात्यात भविष्यातील कोणतीच अपेक्षा नसते. असलीच तर वर्तमानात एखाद्या पाप्याची किंवा मिठीची. अपेक्षाविरहीत अश्या ह्या नात्यात म्हणूनच कधीही घुसमट होत नाही, एकाकीपणा जाणवत नाही. दोन्ही पक्षांकडून वागण्यात अत्यंत निर्मळपणा असतो. आजीच्या आयुष्याच्या उत्तरार्धात जेव्हा हा कोवळा, लहानगा जीव तिच्या मांडीवर ठेवला जातो तेव्हा तर ती क्षणभर सुन्न होऊन जाते, आनंदापेक्षा ती त्या लहानग्याच्या काळजीने गलबलून जाते आणि उत्तरायुष्यात पदरी पडलेले हे दान ती बोनस म्हणून स्वीकारते. जसा नियमित पगारापेक्षा बोनसचा आनंद अधिक, तशीच काहीशी आजीची मानसिक अवस्था असते. म्हणूनच ती अधिक आनंदाने कामाला लागते. पण नातवंडाचे करीत असताना ती आई असतानाच्या जगण्यापेक्षा अधिक निर्धास्त असते, कारण भविष्यात तिच्यावर कोणत्याही दोषारोपांची शक्यता नसते. आईप्रमाणे तिच्याकडे बोट दाखविले जाण्याची भीतीही नसते. म्हणूनच हे नाते अधिक गहिरे आणि हृद्य असते. आजीपण हे लांबविलेले आईपण असते (Extended motherhood) हे मान्य असले तरी त्या लहानग्यावर स्वतःच्या कोणत्याही अपेक्षा ती लादत नाही, कारण वयपरत्वे तिला तिच्याच अस्तित्वाची निश्चिती नसते त्यामुळे आलेला प्रत्येक दिवस ती आपल्या नातवंडासोबत "अजि सोनियाचा दिनु" म्हणून घालवू पहाते. आजीच्या प्रेमाला दुधाच्या सायीची उपमा दिली जाते हे खरे, पण तिला थोडीच इतरांप्रमाणे त्यापासून लोणी आणि तुपाची अपेक्षा असते? फक्त साय जपणे हेच काम ती करत असते.

     ह्या नात्याचे वर्णन आजोबा ह्या सदरात बसणाऱ्या समस्त पुरूष वर्गालाही तंतोतंत लागू पडते. पण आपल्याकडील पुरूषप्रधान संस्कृतीत पुरुषी दरारा थोडा जास्तच असल्यामुळे काही अपवादात्मक परिस्थिती सोडल्यास नातवंड आजोबांपेक्षा आजीलाच जास्त बिलगते हे खरे. हल्लीच्या कमावत्या स्त्रियांच्या काळात आजीची जबाबदारी थोडी वाढली आहे हे वास्तव आहे. एखाद्या पाळणाघरात मुलाला ठेवण्यापेक्षा धात्रीची भूमिका बजाविणे हे आजी आणि आई ह्या दोघींच्या दृष्टीने अधिक सोयीस्कर आणि मानसिक संतुलन राखणारे असते. आजीच्या दृष्टीने ती तारेवरची कसरत ठरू शकते. ती निभावून नेत असताना प्रतिपक्षांकडून (सून, जावई, प्रसंगी पुत्र व कन्याही) शाब्दिक मारही खाण्याची तयारी ठेवावी लागते. पण नातवाच्या एखाद्या मिठीत ती तो सल विसरून जाते आणि उरते ते फक्त शब्दांचे निर्माल्य. हे आजकालचे आजीपण संभाळताना तिला आपल्या नात्याच्या मर्यादांचे कसोशीने पालन करावे लागते. आजीपण सोडून आईपणाच्या भूमिकेत चुकून जरी पाऊल पडले तरी अर्थाचा अनर्थ ठरलेला. कर्तव्य चोखपणे बजावित असताना आपल्याला नातवंडाच्या बाबतीत कोणतेही अधिकार नाहीत ह्याचे तिला घरातील स्वास्थ्यासाठी सतत भान ठेवावे लागते.

     ह्या नात्याचा मला साकल्याने विचार करता आला ते आजीपण प्राप्त झाल्यावरच. यामध्ये कोणत्या एका नात्याला श्रेष्ठ-कनिष्ठ ठरविण्याचा हेतू नाही, पण ह्या नातेसंबंधाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पहाता आले. "संध्याछाया भिवविती हृदया" अश्या कातर अवस्थेत हाती आलेला हा कोवळा जीव आपले डोळे मिटण्यापूर्वी देवाने आपले मन गुंतविण्यासाठी पाठविलेला छोटा देवदूतच वाटावा इतके हे नाते सुंदर आहे. नातवंडाच्या बाबतीत विचार करता ऐकलेली एक गोष्ट आठवते. वाळवणाचे राखण करीत बसलेल्या आजीकडे पाहून नातू कावळ्याला म्हणतो, "ए कावळ्या, माझ्या आजीचा डोळा फोडू नकोस नाहीतर मलाच तिची काठी होऊन रहावे लागेल." यात आजीची काळजी आणि जबाबदारीची जाणीव दिसते. आजच्या काळात तर बंद दरवाजांच्या घरांत आजी ही त्यांची सर्वांत जवळची मैत्रीण असते. आईवडिलांशी शेअर न करता येणारी त्यांची सिक्रेटस ती आजीशी मनमोकळेपणाने सांगतात. आजी ही 'रम्य ते बालपण' असे म्हणत त्यांच्या लुटूपुटीच्या खेळांत सहभागी होते आणि मनमुराद आनंद लुटते. प्राजक्ताच्या फुलासारखे टवटवीत, आपल्या मंद सुगंधाने आसमंत भारून टाकणारे पण केवळ अल्पावधीतच मिटून जाणारे तरीही आठवणींचा मंद दरवळ कायम मनात झिरपत ठेवणारे हे आजी-नातवंडाचे अनोखे पण थोडेसे उपेक्षित नाते. म्हणूनच जेव्हा मला माझा मुलगा तक्रारीच्या सुरांत सांगतो "तू त्याला कधीच ओरडत नाहीस. तुझ्याकडे त्याला सगळेच माफ आहे," तेव्हा मी नुसतेच हसते, उत्तर देणे शक्य नसते कारण त्या हसण्यात असतो एक समाधानाचा आणि तृप्तीचा हुंकार..!

दिवाळी अंक २०१४

प्रतिक्रिया

माम्लेदारचा पन्खा's picture

21 Oct 2014 - 11:30 pm | माम्लेदारचा पन्खा

परत नाही भेटायला मिळणार तिला ह्याची प्रचंड खंत आहे मनात... आयुष्य किती कठोर आहे.... भेटणार्‍या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकात मी माझे आजी आजोबा बघतो....

पैसा's picture

22 Oct 2014 - 2:16 pm | पैसा

आजी नातवंडांना बिघडवते असं वाटतं खरं, पण त्या भूमिकेत शिरल्यावर कळेल नेमकं काय होतं ते! ज्यांना ज्यांना आजी मैत्रीण म्हणून मिळाली ते खरेच नशीबवान!

वेल्लाभट's picture

22 Oct 2014 - 3:04 pm | वेल्लाभट

सुरेख विचार ! आवडला लेख.

इनिगोय's picture

23 Oct 2014 - 6:15 am | इनिगोय

फार छान लेख. या नात्यावर क्वचितच काही लिहिलं जातं. हे साधं सरळ लेखन आवडलं.

बोका-ए-आझम's picture

25 Oct 2014 - 12:55 am | बोका-ए-आझम

आजी म्हणजे जशी।दुधावरली साय।
ती मायेचीही माय। होत असे॥

सानिकास्वप्निल's picture

25 Oct 2014 - 1:33 pm | सानिकास्वप्निल

आजीच्या मायेची ऊब ती वेगळीच, आजही ती हवी होती असे सारखे वाटत राहते....
लेख आवडला आहेच.

प्रभाकर पेठकर's picture

25 Oct 2014 - 3:07 pm | प्रभाकर पेठकर

सर्वात आधी 'आजी' पदाला पोहोचल्याबद्दल अभिनंदन.

लेख जरा एकांगी झाल्यासारखा वाटला.

ह्या नात्याचे वर्णन आजोबा ह्या सदरात बसणाऱ्या समस्त पुरूष वर्गालाही तंतोतंत लागू पडते.

ह्या एका वाक्यात बिच्चार्‍या आजोबा वर्गाला गुंढाळून टाकल्यासारखे वाटले. मुळात स्त्री म्हणजे 'कोमल भावनांचे प्रतिक' आणि पुरुष म्हणजे 'कठोरतेचे पुतळे' ह्या चुकीच्या गृहीतकावर वरील कांही निरिक्षणे बेतलेली आहेत त्यामुळे लेखाचा समतोल (जरा) ढळलेला आहे.

ह्या सर्व नात्यांहून एक आगळेवेगळे, बोनस म्हणून पदरात पडलेले, तरीही अत्यंत गहिरे आणि हृद्य, तरीही थोडेसे उपेक्षित राहिलेले नाते म्हणजे आजी आणि नातवंडाचे नाते.
आजी नातवंडांइतकेच आजोबा-नातवंडं हे नातंही तितकच अनोखं असतं. आजोबांना बिलगणारी नातवंडंही तेवढीच दृष्टीस पडतात.

आपल्याकडील पुरूषप्रधान संस्कृतीत पुरुषी दरारा थोडा जास्तच असल्यामुळे काही अपवादात्मक परिस्थिती सोडल्यास नातवंड आजोबांपेक्षा आजीलाच जास्त बिलगते हे खरे.

त्या पुरूषी दरार्‍यावर असलेला घरच्या स्त्रीचा दरारा चिमुकल्यांच्या नजरेतूनही सुटत नाही. वडिलांच्या भूमिकेतून आजोबांच्या भूमिकेत शिरल्याबरोबर पुरुषाच्या वागण्यात फरक पडतो. तो हळूवार होतो. म्हातारपणी (दोघांनाही) 'दूधापेक्षा साय जास्त महत्त्वाची आणि आवडीची वाटत असते.' स्वतःच्या मुलांना शिस्त लावायची असते पण मुलाच्या मुलांवर 'नुसते प्रेम उधळायचे असते' अशा विचारांप्रती दोघेही आलेले असतात. मुलांना शिस्त लावण्याच्या (आपलं प्रेम बाजूला ठेवून) कंटाळवाण्या प्रक्रियेतून बाहेर पडल्यावर उर्वरीत आयुष्यात त्यांना ही 'साय', हाच आयुष्यातला 'स्नेह', स्वतःची शारीरिक दु:ख आणि आयुष्याच्या अटळ शेवटाकडे होणारी वाटचाल सुसह्य करण्यासाठी मानसिक बळ आणि समाधान देत असतो. दोघांनाही त्याची अतीव गरज असते त्यामुळे त्यांच्याकडून ही प्रेमाची उधळण आणि नातवंडांमधील मनाची गुंतणूक वाढत जाते. एखाद्या दु:खद घटनेत, आपले आई-बाबा आजी आजोबांना कांही अप्रिय बोलले तर आजी लगेच डोळ्यांना पदर लावते. आजोबा तो आघात सोसून खंबीर राहण्याची भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे आजीला नातवंडांची सहानुभूती लगेच मिळते पण आजोबांचे (अश्रू लपविलेले) दु:ख समजून घेण्यासाठी त्यांना बालपणातून बाहेर पडेपर्यंत वाट पाहावी लागते. असो. विषय अत्यंत खोल आणि महासागरासारखा विस्तृत आहे. दोन-चार वाक्यात कवेत॑ येणारा नाही.

जाहिरातींमधूनही आजोबा आणि नातवंडांच नातं ह्याचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो. हे मला वाटतं 'आजोबा-नातवंडं' हे नातंही 'आजी-नातवंडांइतकच' प्रभावी असतं हे वास्तव अधोरेखित करतं.

लेखातील आजी-नातवंड ह्या नात्याचे गहिरे रंग चांगल्याप्रकारे उलगडण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल नक्कीच अभिनंदन.

प्रभाकर पेठकर's picture

25 Oct 2014 - 8:52 pm | प्रभाकर पेठकर

>>>> पण मुलाच्या मुलांवर 'नुसते प्रेम उधळायचे असते'

चुकीची दुरुस्ती.... 'मुलांच्या मुलांवर......

वैशाली हसमनीस's picture

25 Oct 2014 - 9:37 pm | वैशाली हसमनीस

आपले विचार मान्य.

आजी जिव्हाळ्याचा विषय खरचं मला तरी हे नाते उपेक्षित वाटले नाही उलट आजी-आजोबा पाहीजेतच असचं वाटतं. पण तरीही तुमच्या भावना पोचल्या, लेख आवडला.

परत नाही भेटायला मिळणार तिला ह्याची प्रचंड खंत आहे मनात... आयुष्य किती कठोर आहे.... भेटणार्‍या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकात मी माझे आजी आजोबा बघतो....इति : - माम्लेदारचा पन्खा
अगदी याच भावना आहेत माझ्यासुद्धा !

सविता००१'s picture

9 Nov 2014 - 3:59 pm | सविता००१

अतिशय छान आजी-आजोबा मिळालेल्या भाग्यवंतांमध्ये मी नक्की आहे म्हणून हा लेख आणखी आवडला.
शा़ळेतून घरी आल्यावर आजोबांबरोबर सागरगोटे, पत्ते खेळणे, त्यांच्या मित्रमंडळींमध्ये जाउन सगळ्याच आजोबांकडून हक्काने लाड करून घेणे हा एक आवडीचा छंद होता माझा. आजोबांबरोबर मंडईत जाणे म्हणजे तर भारी प्रकार होता. ते इतकी सुरेख भाजी आणायचे आणि आल्यावर आजी-आईला फ्रिजमधल्या जुन्या भाज्या बाहेर काढून, नवीन निवडून आत कशी ठेवायची म्हणजे चांगल्या रहातील हे सांगायचे की आजही फ्रिज मध्ये हे सगळं ठेवताना नकळत ते आठवतातच. आजी तर काय- आवडीचीच असते. एकूणच मस्तच असतात आजी आजोबा.