नरकचतुर्दशी

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 8:14 am

दिवाळी किंवा दीपावली चे महोत्सवात रुपांतर कधी झाले कदाचित कोणीच सांगू शकणार नाही. वसुबारसेपासुन सुरु होउन भाऊबीजेला (किंवा देवदिवाळीला) संपणार्‍या या उत्सवाचे बीज कशात याचे मला नेहमीच कुतुहल वाटत आले आहे. उत्सव फार जुना खरा. स्कंद आणि पद्म पुराणात दिवाळीचे संदर्भ सापडतात. नवरात्रातल्या अष्टमीपासुन ते आश्विनातल्या अमावस्येपर्यंत पार्वतीने शिवाची आराधना केली आणि प्रसन्न होउन शिवाने पार्वतीला स्वत:मध्ये एकरुप करुन घेतले. हाच तो अर्धनारिनटेश्वराचा अवतार. आश्विनातल्या अमावस्येला हा अवतार अस्तित्वात आला म्हणुन हा दिवाळीचा उत्सव महत्वाचा. पण या अमावस्येला आपण पुजा करतो ती मात्र लक्ष्मीची म्हणजे विष्णुच्या पत्नीची. लक्ष्मीपुजनामागची कथा मात्र मी कधी ऐकलेली नाही. दिवाळीच्या ५ - ६ दिवसातला हा सगळ्यात महत्वाचा दिवस असे मनात बिंबवले गेलेले आहे.

वसुबारसेला पहिला दिवा लावायचा हे ठरलेले असायचे. अजूनही आहे. वसुबारसेपुर्वीच आकाशदिवा लावला गेला नसेल तर या दिवशी तो हमखास लावला जायचा, दिवाळीचा फील यायला सुरुवात व्हायची. धनत्रयोदशीचा दिवस जरी दिवाळीचा असला तरी आपल्याकडे धनत्रयोदशीला काही नसते. हा दिवस व्यापार्‍यांच्या दृष्टीने महत्वाचा असे म्हणून बोळवण व्हायची. समुद्रमंथनातून निर्माण झालेल्या धन्वंतरी आणि लक्ष्मीच्या या २ रत्नांच्या प्राप्तीचा हा उत्सव. तो बहुतेक वेळेस फार तर आपटबार फोडून (बंदी आली नंतर यावर. अरेरे) किंवा दगडाने टिकल्या चेचून किंवा बंदुकीतून टिकल्यांचे रोल शेजार्‍यापाजार्‍यांचे कान किटतील इतक्या वेळा वाजवून साजरा केला जायचा. ( दिवाळीतून उरलेल्या टिकल्या आणि फटाक्यांची दारु कागदावर ओतून पेटवून द्यायचाही एक खेळ असायचा. पण हा दिवाळीच्या आधी नाही, बहुतेक वेळा नंतर खेळला जायचा. उरलेले शेवटचे एक दोन सुतळी दिवाळीच्या किल्ल्यात लावून तो उडवून द्यायचाही एक खेळ शेवटच्या काही दिवसात असायचा. एकदा इमारतीच्या बांधकामात वापरले जाणारे एक घमेले देखील २ सुतळी बाँब लावून असेच उडवले होते. हे नक्की कोणी केले यावर सोसायटीत बरेच दिवस चर्चा चालू होती. कोणी केले ते कोणालाच कधीच कळले नाही कारण सोसायटीतील सगळीच कार्टी या कारस्थानात गुंतली होती ;). असो. मूळ विषयाकडे वळूयात)

पण या सगळ्या दिवसांत दिवाळीचा खरा आनंद पहिल्यांदा मिळायचा नरकचतुर्दशीला. नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि बलिप्रतिपदा चार वेगवेगळ्या दिवसात येणे हा त्याकाळचा एक सर्वोच्च आनंद होता. या आनंदाची नांदी नरकचतुर्दशीच्या आदल्या रात्री व्हायची. कारण सगळ्यांना झोपायची घाई असायची कारण मुळात दुसर्‍या दिवशी म्हणजे नरकचतुर्दशीला पहाटे उठायची घाई असायची. पहिला फटाका मीच फोडणार अशी सुप्त स्पर्धा असायची. त्यापायी एकदा मी आईला पहाटे ३ वाजताही उठवले आहे. पहाटे पावणेचारला पहिला फटाका उडवला आणि मग थोड्यावेळाने घरी येउन सुखाने झोपलो ;).

पहिला फटाका उडवण्याआधी आंघोळ करणे अतीव गरजेचे असायचे. अभ्यंगस्नान सूर्योदयापूर्वी केले नाही तर माणूस नरकात जातो म्हणून याला नरकचतुर्दशी म्हणतात असा त्याकाळी एक भाबडा समज होता. बहुतेकवेळेस तो पहिला फटाका उडवण्याची इतकी घाई असायची की अभ्यंगस्नान सूर्योदयाच्या बर्‍याच आधी (पहाटे ३ - ३.३० म्हणजे आता रात्रच असते) व्हायचे. तो पहिला फटाका उडवण्याची इतकी घाई असायची की त्या दिवशी जी काही आंघोळ व्हायची त्याला अभ्यंगस्नान म्हणता येइल की नाही शंका आहे. तेल लावून घेणे हा प्रचंड मोठा त्रास वाटायचा. फार तर डोक्याला आणि शास्त्रापुरते हातापायांना दोन बोटे लावली की आंघोळीला उठायचे. तव्यावर तिखटाची फक्की मारावी त्याच वेगाने आणि थोडेफार तसेच उटणे अंगाला लावायचे. २-४ तांब्ये अंगावर घेऊन आंघोळ उरकायची. तेवढ्या वेळात इतर कोणी फटाका लावला तर चरफडायचे. नाहीतर लगेच पहिला फटाका लावण्यासाठी पळायचे. कधीकधी २ - ३ जण एकाच वेळेस पोचले तर सामंजस्याने एकाच वेळेस एकाच प्रकारचा फटाका पहिल्यांदा लावला जायचा. ते अर्धरात्रीचे अभ्यंगस्नान, पहाटेचे फटाके उडवणे मग सात वाजताच दही चकली (आणि तोंडी लावायला म्हणुन चिवडा लाडु करंजी शंकरपाळे वगैरे) खाणे आणि मग मित्रांबरोबर उंडारयचे, ते करताना अजून २-४ ठिकाणी हादडून यायचे या सगळ्याच गोष्टी आता खूप पूर्वीच्या आठवणी असल्यासारखे वाटते. अजूनही नरकचतुर्दशीचे अभ्यंगस्नान पहाटेपूर्वी करायची इच्छा असते. नाहीच जमले तर नंतर इतरांना फोनवर हसत हसत आता बहुधा मी नरकात जाणार (किंवा यावर्षी नरक चुकला) असे सांगण्यात मजा वाटते.

परंतु कालौघात आजही नरकचतुर्दशीने आपला रुबाब टिकवला आहे. आजही कुठेतरी पहाटे साडेचार पाचला पहिला फटाका उडवल्याचा आवाज येतो. पूर्वीसारखी धडामधूड नसते अगदी पहाटेची (ती सातला सुरु होते आणी साडेसातला संपते आजकाल. आता कानावर सर्वाधिक अत्याचार लक्ष्मीपूजनाच्या रात्री होतो). आताशा नरकात जाण्याचीही भिती वाटेनाशी झालेली आहे. एकतर स्वर्गात जाण्यासारखी पुण्यकर्मे केलेली नाहित आणि कुकर्मे करण्याची सध्या पृथ्वीतलावर स्पर्धा सुरु आहे त्यात आम्ही लैच मागे आहोत त्यामुळे हाऊसफुल्ल नरकातही जागा मिळायची नाही. पण तरीही नरकचतुर्दशी मला कैक अर्थाने महत्वाची वाटते. आजही. नरक नावाच्या असुराचा नाश श्रीकृष्णाने केला तोच हा मंगलमय दिवस.

आजच्या आसामातल्या प्रागज्योतिषपुरामध्ये किंवा कामरुपनगरीमध्ये नरकासुराचा वास होता. हा तिथला सर्वशक्तीमान राजा. त्याच्या विषयलोलुपतेचे चोचले पुरवण्यासाठी त्याने दशदिशांमधुन सुंदर स्त्रिया आणि तरुणींची अपहरण करुन आपले अंतःपुर भरुन टाकले होते. कृष्णाने त्याला मारले तोपर्यंत त्याने १६१०० स्त्रियांना पळवुन आपल्या आपल्या अंतःपुरात डांबले होते. नरकासुर म्हणजे भूदेवीचा मुलगा. काही पुराणांनुसार हा भूदेवी आणि विष्णुचा मुलगा. याला म्हणे ब्रह्मदेवाकडुन अजेयत्वाचे वरदान होते ज्यामुळे सर्व देव, दानव आणि मानव यांच्याकडुन त्याला कुठलाही धोका नव्हता. त्याच कारणाने मनुष्यरुपातील विष्णुकरवी (म्हणजे कृष्ण) त्याचा अंत होऊ शकला. शक्तीच्या मदाने अंध झालेल्या नरकासुराने थेट स्वर्गलोकावर हल्ला केला आणि आदितीची दैवी कुंडले हरण केली. या नरकासुराचा कृष्णाने वध केला आणि अदितीची कुंडले आणि १६१०० स्त्रियांना मुक्त केले. अश्वमेधात ज्या अश्वाचा बळी द्यावा लागतो त्याच्या जागी नरकासुराचा बळी देउन कृष्णाने त्याचा पहिला अश्वमेध यज्ञ केला. नरकासुरापूर्वी त्याच्या मुरा नावाच्या बलाढ्ञ सेनापतीला मारल्यामुळे त्याला मुरारी हे नाव मिळवले. याच नरकासुराला मारल्यामुळे त्याला त्याचे सांरग नावाचे अजेय धनुष्य मिळाले.

नरक चतुर्दशीची कथा नरकासुराच्या मृत्यूने समाप्त होत नाही. त्याला त्याहून व्यापक अर्थ आहे. आणि केवळ धर्माच्या अधर्मावरील विजयापेक्षा माझ्या मते तो अधिक व्यापक आहे. भारतीय पुराणांमध्ये आपल्याला बरेच विरोधाभास दिसतात. त्यातला एक विरोधाभास नरकासुराच्या कथेने अधोरेखित होतो. रामाने त्याच्या पत्नीचा त्याग केला केवळ एका धोब्याच्या संशयापायी. एक अजोड राजा आणि एक वीरपुरुष असूनही राम समाजाच्या नीती अनीतीच्या संकल्पनांना छेद नाही देऊ शकला. त्याने स्वतःला पोकळ समाजनियमांनी बद्ध केले आणी एकीकडे कृष्ण होउन गेला ज्याने नरकासुराच्या तावडीतून सोडवलेल्या त्या १६१०० स्त्रियांना समाजात मानाचे स्थान मिळवुन देण्यासाठी त्यांच्याशी लग्न करुन त्यांना मानाचे स्थान दिले. रामाला किंवा इतरांना माहिती नव्हते की सीतेच्या शीलावर कलंक लागला आहे की नाही. त्या १६१०० स्त्रियांना नरकासुराने तत्कालीन समाजमान्यतेनुसार कलंकित केले आह हे सर्वांना ज्ञात होते. योनीशुचितेच्या, नीती अनीतीच्या आणि शीलाच्या अस्थायी कल्पनांना सुरुंग लावत कृष्णाने एक क्रांतिकारी निर्णय घेतला.

नरक चतुर्दशीचा तो दिवस अनेक अर्थांनी वेगळा ठरतो कारण त्या दिवशी किंवा त्या दिवसामुळे कृष्णाने शोषितांवरचा अन्याय दूर करण्यासाठी प्रतिगामी विचारसरणीला तिलांजली देउन एक नविन पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला. अनाठायी साचेबद्ध अन्याय्य संकल्पनांमध्ये अडकलेल्या एका समाजाला चाकोरीबाहेर डोकावून बघून शोषितांसाठी न्याय आणि समानतेच्या चौकटी खुल्या करण्याचे उदात्त कार्य करणारा कृष्ण हा एक आद्य पुरोगामी होता. समाजाची धारणा, मूल्ये आणि नितीनियम त्रिकालाबाधित आणि चिरंतन आहेत या भूमिकेला कृष्णाने छेद दिला. हजारो वर्षापुर्वीच्या समाजाने त्याच्या विचारसरणीला अनुसरुन लिहिलेल्या कागदाच्या तुकड्यांवरील ज्ञानापेक्षा न्याय आणि प्रगती जास्त महत्वाची आहे हे कृष्णाने शिकवले. समाज, संस्कृती आणि विचार स्थल कालाच्या चौकटीत बद्ध नसून ते प्रवाही आहेत हे कृष्णाने समजावले. रामाच्या आचरणाच्या अगदी विरुद्ध आचरण करुन कृष्णाने हेच दाखवून दिले की समाजाचे नीतिनियम स्थल कालानुसार प्रवाही राहतील तरच न्याय आणि समतेच्या संकल्पनांना खरा अर्थ प्राप्त होईल. अन्यथा ती केवळ एक विचारसरणी राहील. कृष्णाने हे ही दाखवून दिले की समाजाने स्वतःच्या आचरणावर स्वतःच काही मर्यादा घालून घेतल्या आहेत आणि त्यातील काही काळाच्या प्रवाही वाटचालीत निरुपयोगी, निरुद्देश किंवा अन्य्याय्य ठरत जातात. माणसाने या मर्यादांचा वेळोवेळी पुनर्विचार करणे खूप गरजेचे आहे. कृष्णाने ते करण्याचे धैर्य दाखवले. अश्या कृतींमधुनच समाज शिकत जातो, घडत जातो, बदलत जातो.

कृष्णाने योनिशुचितेच्या आणी स्त्रीच्या अब्रुच्या जुनाट संकल्पनांना आव्हान दिले. स्त्रियांच्या मानसन्मानाचा आणि स्वत्वाचा आदर करण्यासाठी तत्कालीन समाजमान्यतेला छेद देणारा एक क्रांतिकारी निर्णय घेतला. त्याने स्त्रीत्वाचा आदर केला. दुर्दैवाने आज हजारो वर्षांनंतरही स्त्रीला केवळ एक भोग्य वस्तु मानणारी एक नरकासुरी प्रवृत्ती आज अस्तित्वात आहे. न्याय, बंधुता आणि समानता या तत्वांवर चालणारा समाजच केवळ एक पुरोगामी आणी प्रगतीशील समाज असु शकतो आणि ते करण्यासाठी केशवसुतांच्या खालील ओळी प्रत्येकाने लक्षात ठेवाव्यात अश्या आहेत:

"जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळूनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध ऐका पुढल्या हाका "

साचलेल्या पाण्याचे नेहमी डबकेच होते. प्रवाही पाण्याच्याच केवळ पेयजल म्हणुन उपयोग होऊ शकतो. नरकासुराच्या वधाने आणि त्या १६१०० स्त्रियांच्या उद्धाराने कृष्णाने नेमका हाच संदेश दिला आहे. या दिवाळीला आपणही अयोग्य , अस्थायी, अन्याय्य रुढी परंपरांना तिलांजली देऊन तिमिराचा नाश करणार्‍या दीप आवलींचा अंगिकार केल्यास एक आख्खा समाज घडण्यास मदत होऊ शकेल. नरकचतुर्दशी याच कारणासाठी मला आजकाल जास्त महत्वाची वाटते कारण ती एका बदलत्या युगाची नांदी असू शकते

मृत्युन्जय

*****************

तळटीपः
1. काही पुराणांनुसार नरकासुराला असे वरदान होते की तो कुठल्याही देव, दानव अथवा पुरुषाकडुन मृत्यु पावणार नाही. ऐन युद्धात कृष्णाचे सारथ्य सत्यभामेने केले आणि तिच्याच हातून नरकासुराचा मृत्यु झाला. अश्या प्रकारे एका स्त्रीच्या हातून त्याचा मृत्यु झाला. कुठली स्त्री आपल्याला मारु शकेल अशी शंका नरकासुराला न आल्याने त्याचा घात झाला. थोडक्यात त्याने स्त्रीशक्तीला कमी लेखण्याची चूक केली जी त्याला भोवली. स्त्रीतत्वाचा अनादर करणारा नरकासुर नाश पावला आणि स्त्रीशक्तीला मानाने वागवणार कृष्ण देवत्वाला पोचला हा या कथेचा अजून एक गाभा.

2. काही पुराणांनुसार कृष्णाने १६१०० स्त्रियांना नरकासुराच्या तावडीतुन मुक्त केले तर काही पुराणांनुसार १६००० स्त्रियांना. शोषित स्त्रियांचा आकडा इथे महत्वाचे नसल्याने ते संदर्भ गाळले आहेत.

3. काही पुराणांनुसार सत्यभामा भूदेवीचा अवतार होती आणि कृष्ण विष्णुचा. नरकासुर विष्णु आणि भूदेवीचा पुत्र होता पण त्याच्या कृत्यांमुळे तो असुररुपाला पोचला. या संदर्भाचा अर्थ असाही लागतो की केवळ जन्माने मनुष्याचे स्थान ठरत नाही तर त्याच्या कृत्याने ठरते. अगदी याच कारणाने ब्राह्मण पित्याचा पुत्र रावण राक्षस म्हणुन ओळखला गेला.

4. उपरोक्त लेख मी माझ्यापुरता नरकासुराच्या वधाचा अर्थ लावुन लिहिलेला आहे. पुराणांतील् संदर्भ देताना काही चुका राहिलेल्या असल्यास क्षमस्व. पण त्यामुळे मूळ तात्पर्याला धक्का लागत नाही / लागणार नाही अशी माझी प्रामाणिक समजूत आहे.

दिवाळी अंक २०१४

प्रतिक्रिया

माम्लेदारचा पन्खा's picture

21 Oct 2014 - 2:11 pm | माम्लेदारचा पन्खा

"बालपणीचा काळ सुखाचा" आठवला.... ध न्य वा द !

जेपी's picture

22 Oct 2014 - 9:49 am | जेपी

लेख आवडला.

सौंदाळा's picture

22 Oct 2014 - 10:00 am | सौंदाळा

लेख आवडला.
दिवाळी साजरी करण्यामागे काही कारण, कथा आहे का असे मला एका किरीस्तांव मित्राने विचारले होते तेव्हा मला काही ठोस सांगता आले नव्हते.
आंघोळीचे वर्णन मस्तच. लहानपणी अंगाला तेल, उटणे लावायाला ज्याम वैताग यायचा राव.
नरकचतुर्दशीची अजुन एक खासीयत म्हणजे सकाळी ४/४.३० ला अभ्यंगस्नान, ६ ला फराळ वगैरे झाल्यामुळे ११/११.३० लाच प्रचंड झोप यायची. आज पण येईल ;). पाउण्-एक तास झोपुन उठलो की फ्रेश वाटायचे.

...तर त्याच्या कृत्याने ठरते.

+ १...

ह्याचेच अजून एक उत्तम उदाहरण म्हणजे वाल्मिकी ऋषी...

स्वाती दिनेश's picture

23 Oct 2014 - 12:14 am | स्वाती दिनेश

लेख आवडला. फटाके, किल्ल्याचे उल्लेख वाचताना नॉस्टॅल्जिक करुन गेले.
स्वाती

मस्त लिहिलाय लेख.लहानपणीच्या आठवणी अहाहा.

अनुप ढेरे's picture

23 Oct 2014 - 5:17 pm | अनुप ढेरे

कृष्णाने हे ही दाखवून दिले की समाजाने स्वतःच्या आचरणावर स्वतःच काही मर्यादा घालून घेतल्या आहेत आणि त्यातील काही काळाच्या प्रवाही वाटचालीत निरुपयोगी, निरुद्देश किंवा अन्य्याय्य ठरत जातात. माणसाने या मर्यादांचा वेळोवेळी पुनर्विचार करणे खूप गरजेचे आहे. कृष्णाने ते करण्याचे धैर्य दाखवले. अश्या कृतींमधुनच समाज शिकत जातो, घडत जातो, बदलत जातो.

ही वाक्य आवडली. पूर्ण सहमत. आपली गृहितकं सारखी तपासून पाहून त्यातली कालबाह्य टाकून देणं आपल्या हिताचं असतं.

लेख आवडला. दिवाळीची महती उजळ करणारी माहिती.

मृत्युन्जय's picture

7 Nov 2016 - 1:24 pm | मृत्युन्जय

मला हा लेख माझे लेखन या टॅब खाली दिसत नाही. काही करता येइल काय?

चावटमेला's picture

7 Nov 2016 - 8:33 pm | चावटमेला

सुंदर लेख. नरकचतुर्दशीकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन आवडला

nanaba's picture

8 Nov 2016 - 3:16 pm | nanaba

Avadala

पाटीलभाऊ's picture

8 Nov 2016 - 3:39 pm | पाटीलभाऊ

बालपणीची नरक चतुर्दशी आठवली.