लिफ्ट

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
19 Oct 2014 - 11:11 am

"साब, दो पंक्चर है. निकालनेमें टाईम लगेगा!"
"दो पंक्चर?"
"हा साब! देखो!"

गॅरेजवाल्याने मला पाण्याच्या पिंपात बुडवलेली टायरची ट्यूब आणि दोन ठिकाणाहून येणारे बुडबुडे दाखवले.

"कितना टाईम लगेगा?"
"एक घंटा तो लगेगा साब कमसे कम!"

मी दुसरं काय करु शकणार होतो? कारच्या डिकीत नेमका एक्स्ट्रा टायर नव्हता. त्यामुळे पंक्चर काढून होईपर्यंत थांबण्यापलीकडे गत्यंतर नव्हतं!

आधीच माझा मूड खराब होता. एकतर ऑफीसमधून लवकर निघण्याच्या माझ्या बेताला नेहमीप्रमाणे माझ्या मॅनेजरने सुरुंग लावला होता. तरी दोन दिवसांपूर्वी मी आज लवकर निघणार असल्याचं त्याच्या कानावर घातलं होतं. दुसर्‍या दिवशी आगमन करीत असलेल्या गणपतीबाप्पांच्या तयारीसाठी मला लवकरात लवकर माझ्या गावी - हर्णैला पोहोचायचं होतं, पण आयत्या वेळी एका क्लायंटला प्रपोजल पाठवण्याच्या नावाखाली माझ्या खडूस बॉसने दोन तास अडकवून ठेवलं होतं! ट्रॅफीक चुकवण्यासाठी दुपारी निघण्याच्या माझ्या योजनेचा पूर्णपणे बोर्‍या वाजला होता! एकच्या ऐवजी चार वाजता माझी सुटका झाली आणि वाटेत वडखळ नाक्यावर लागलेल्या ट्रॅफीकमुळे आणखीनच खोळंबा झाला होता.

आणि आता जेमतेम माणगाव गाठलं तर गाडीच्या टायरने आSS वासला होता!

आठ वाजून गेलेले होते. घरी फोन करुन ही सगळी भानगड सांगितल्यावर वर तिकडून बोलणी बसली ती वेगळीच! त्यातच तो पंक्चरवाला त्याच्या टेपरेकॉर्डरवर हिमेश रेशमियाची गाणी बडवत आरामात पंक्चर काढत होता! शेवटी त्याला पंक्चरचं काम करण्यास सांगून मी बाहेर सटकलो आणि बाजूला असलेली चहाची ट्परी गाठली!

पावसाची सर नुकतीच येऊन गेलेली होती. हवेत मस्तं गारवा होता. अशा हवेत गरमागरम चहा आणि खरपूस भाजलेलं मक्याचं कणीस यातली मजा सांगून कळणार नाही! तो अनुभव स्वत:च घ्यायला हवा! सुमारे अर्ध्या फर्लांगावर माणगावचा स्टँड दिसत होता. हायवेला लागूनच असलेल्या स्टँडमधून सतत आतबाहेर करणार्‍या एस.टी.च्या बसेस आणि मुंबईकडे जाणार्‍या प्रवाशांना गाठण्यासाठी रस्त्यावरच उभे असलेले जीपवाल्यांचे एजंट हे इथे नेहमी दिसणारं दृष्यं! गणपती असल्याने उलट दिशेने कोकणात जाणार्‍या गाड्यांसाठीही अनेकांची झुंबड उडालेली इतक्या दुरुनही दिसत होती.

कणीस खाऊन आणि दोन कप चहा घेऊन मी पंक्चरवाल्याकडे परतलो तेव्हा तो आरामात विडी ओढत बसला होता! माझ्या टायरच्या ट्यूबवर दोन ठिकाणी ठिगळं लावून ती सुकत ठेवलेली होती! घड्याळावर नजर टाकली तर साडेनऊ वाजून गेलेले होते! एवढा वेळ हा प्राणी काय करत होता?

"आप बाहर चले गए, तो मैने सोचा खाना खाकर ही आएंगे! मैने सोचा मै भी खाना खा लेता हूं!"

यापुढे मी काय बोलणार कपाळ? गरजवंताला अक्कल नसते! शेवटी दहा वाजता माझी एकदाची सुटका झाली! घरी पोहोचायला कमीत कमी बारा तरी वाजणार होते!

अकराच्या सुमाराला मी मंडणगड गाठलं. सर्व गाव निद्रीस्तं होतं. बाप्पांच्या आगमनासाठीचे मांडव अनेक ठिकाणी घातलेले दिसले. अवघ्या काही मिनीटांत मी एस.टी. स्टँड गाठला. खरंतर एखादी टपरी उघडी दिसली तर पुन्हा कपभर चहा घेण्याचा माझा विचार होता, परंतु सगळं गाव चिडीचूप झोपलेलं होतं!

मंडणगडमधून बाहेर पडत असतानाच अचानक एका विचित्रं गोष्टं माझ्या दृष्टीस पडली....

काही अंतरावर रस्त्याच्या कडेला कोणीतरी उभं होतं!
आणि गाडी थांबवण्यासाठी हात करंत होतं!

मी गाडीचा वेग कमी केला. हेडलाईटच्या प्रकाशात गाडीला हात करणारी एक मुलगी असल्याचं मला दिसून आलं!

नेमकी काय भानगड असावी?

मिट्ट काळोख पसरला होता. रातकिड्यांची किरकीर सुरुच होती. मधूनच बेडकाच्या ओरडण्याचा आवाज येत होता. को़कणातल्या आडबाजूच्या रस्त्यावर दिवा असणं ही अपेक्षाच मुळात चुकीची होती. माझ्या गाडीच्या लाईटचाच काय तो उजेड पडत होता! त्यातच पावसाची रिपरीप सुरु होती. अशा परिस्थितीत गाडी थांबवणं कितपत शहाणपणाचं ठरणार होतं? एकट्या-दुकट्या गाडीवाल्याला थांबवून लुटण्याचा काही प्रकार तर नसावा ना अशी शंका माझ्या मनात आलीच! शेवटी कोणत्याही परिस्थितीत गाडीतून बाहेर पडायचं नाही असं पक्कं मनाशी ठरवून मी ब्रेक मारला!

गाडी थांबताच ती गाडीपाशी आली. काचेवर ट्कट्क केल्यावर काच खाली करणं मला भागच होतं.

"दादा, मला आंजर्ल्याला सोडतोस का?" तिने आर्जवी स्वरात विचारणा केली.
"आंजर्ल्याला? आता?"
"हो! माझं घर आहे तिथे!"
"मग इथे कशासाठी आली होतीस?"
"ते नंतर सांगते, पण मला सोड ना घरी!"

क्षणभर मी विचारात पडलो. नेमका काय प्रकार असावा हे काही ध्यानात येईना. मुलगी बोलायला तरी ठीकठाक वाटत होती, पण काही भलताच प्रकार असला तर काय घ्या?

"आधी मला सांग, तू इथे कशासाठी आली होतीस?" मी पुन्हा आधीचाच प्रश्नं केला.
"त्या तिथे माझे काका राहतात, त्यांच्याकडे आले होते. घरी जाण्यासाठी निघाले आणि शेवटची एस.टी. चुकली!"

तिने दाखवलेल्या दिशेला मी पाहीलं. रस्त्यापासून आत काही अंतरावर एक कौलारू घर होतं. घराबाहेर एक लहानसा दिवा लागलेला होता.

"रात्री काकांकडे राहून सकाळी घरी जा मग! आता रात्रीची कशाला जातेस?"
"दादा, माझ्या घरी पण गणपती आहे ना! मी इथे राहीले तर माझ्या आईला मदत कोण करेल?" तिने बिनतोड सवाल टाकला.

क्षणभर मी विचार केला. तिला आंजर्ल्याला सोडणं तसं मला फारसं अडचणीचं जाणार नव्हतं. आठ-दहा मैल जास्तं अंतर पडलं असतं इतकंच. ती सांगते ते खरं असेल तर अशा आडगावात रात्रीच्या वेळी एकट्या मुलीला असं रस्त्यावर सोडून जाणं कितपत संयुक्तीक होतं?

"ठीक आहे! बस!"

प्रथमच तिच्या चेहर्‍यावर स्मिताची रेषा उमटली. दार उघडून ती बाजूच्या सीटवर बसते न बसते तोच मी गाडी पुढे काढली! न जाणो अंधारात लपून राहीलेला आणखीन कोणी घुसला तर?

गाडी चालवताना मी अधून-मधून तिचं निरीक्षण करत होतो. ती सुमारे सतरा-अठरा वर्षांची असावी. केशरी रंगाचा पंजाबी ड्रेस तिने घातलेला होता. त्याची ओढणी अंगाभोवती लपेटून घेतली होती. भर पावसात छत्रीशिवाय बराच वेळ उभी असल्याने ती जवळपास पूर्ण भिजलेली दिसत होती. तिला दिलेली बिस्कीटं खाण्यास तिने नकार दिला. घरी जाणं हे एकमेव ध्येय असल्यासारखी ती रस्त्यावर नजर लावून बसली होती. एकाच गाडीत असं घुम्यासारखं गप्पं किती वेळ बसणार? शेवटी मी तिची चौकशी करण्यास सुरवात केली.

"नाव काय तुझं?"
"रत्ना!"
"आंजर्ल्याला कुठे राहतेस?"
"समुद्राशेजारच्या टेकडीच्या मागे, शेतातल्या घरी! गावात पण घर आहे, पण तिथे कोणी राहत नाही!"
"काकांकडे कशाला आली होतीस?"
"काकूचा पाय मुरगळला खळ्यात काम करताना. डॉक्टरने खाटेवर पडून राहयला सांगितलं. मग काकांना जेवण कोण करणार? म्हणून बाबानी मला पाठवलं!"
"पण मग इतक्या रात्रीची कशाला निघालीस? लवकर जायचं ना!"
"लवकरच जाणार होते! पण काकूचं सगळं आटपेपर्यंत उशीर झाला! त्यामुळेच माझी शेवटची दहाची गाडी चुकली! एखादी जीप नाहीतर रिक्षा येईल म्हणून मी वाट पाहत होते."
"तासभर वाट पाहत होतीस?" मी आश्चर्याने विचारलं.
"हो!" ती सहजपणे म्हणाली, "काही झालं तरी मला घरी जायचंच होतं!"

मनातल्या मनात मी तिला हात जोडले.

"शाळेत जातेस का?" मी विषय बदलण्याच्या हेतूने विचारलं.
"शाळेत?" ती खळखळून हसली. माझ्या या प्रश्नात हसण्यासारखं काय होतं मला कळेना.
"कॉलेजला जाते, दापोलीला!"
"काय शिकतेस?" जास्तीत जास्तं आर्टस् मी मनात विचार केला.
"बारावी सायन्स!"
"सायन्स! बारावी नंतर पुढे काय करणार आहेस?"
"काही नक्की नाही! पण पुढे शिकणार मात्रं नक्की!"

तिच्याशी बोलताना माझं रस्त्याकडे बारीक लक्षं होतं. मागून एकही गाडी येत नाही ना हे देखील मी मधून मधून पाहत होतो! पावसाने आता चांगलाच जोर पकडला होता. मधूनच विजाही चमकत होत्या. त्यातच घनदाट झाडीतून जाणारा वळणा-वळणाचा रस्ता असल्याने जास्तं वेग घेणंही शक्यं नव्हतं.

"घरी कोण कोण आहे तुझ्या?" मी पुढचा प्रश्न केला.
"आई-वडील, दोन मोठे भाऊ, आजी!"
"सगळे शेतातच राहता?"
"हो! माझ्या दोन्ही भावांनी शाळा सोड्ली आणि आता शेतावर काम करतात. मला मात्रं पुढं शिकायचं आहे!"
"शिक्षण आवश्यक आहेच!"
"पण हे माझ्या भावांना कोण सांगणार? त्यांना शाळेत जाण्याचा कंटाळा!"

मी काहीच बोललो नाही. पंधरा मिनीटांनी दूर अंतरावर दिवे दिसू लागले.

"केळशी!" तिकडे बोट दाखवत ती म्हणाली. मी होकारार्थी मान हलवली फक्तं.

"तू कुठे चालला आहेस दादा?" काही वेळाने तिने विचारलं
"हर्णैला! घर आहे माझं!"

एव्हाना केळशी ओलांडून आम्ही पुढे आलो होतो. पंधरा-वीस मिनीटांतच उजव्या बाजूने समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येऊ लागला. हेडलाईटच्या प्रकाशात मधूनच फेसाळणार्‍या लाटा दृष्टीस पडत होत्या. मंडणगडपासून आमची सोबत करणारा पाऊस मात्रं आता थांबला होता.

"बस दादा! थांब इथेच!" अचानक रत्नाचा आवाज आला!
"इथे?"
"हो! थांब!"

मी गाडी एका बाजूला घेतली. रस्त्याच्या उजव्या बाजूला जेमतेम शंभर-दोनशे फूट अंतरावर समुद्रकिनारा होता. पुढचा रस्ता किनार्‍याला समांतरच जातो हे अनेकदा या मार्गाने आल्यामुळे मला माहीत होतं. डाव्या हाताला एक टेकडी होती. या टेकडीच्या पलीकडेच तिचं घर असावं असा मी अंदाज केला.

गाडी थांबताच ती खाली उतरली.

"खूप उपकार झाले दादा! मला वेळेवर घरी आणून सोडलंस!"
"एक मिनीट थांब!" मी दार उघडून बाहेर पडलो. रस्ता पूर्णपणे काळोखात बुडालेला होता.
"चल, मी तुला घरापर्यंत सोडतो. अशा अंधारात एकटी कशी जाशील?"
"नको! मी जाईन एकटीच! माझ्या पायाखालची वाट आहे!"
"अगं पण..."
"पण-बिण काही नाही!" माझं वाक्यं अर्ध्यावर तोडत ती म्हणाली, "इथवर सोडलंस तेवढं बास झालं! याच्यापुढे नको! उगाच कशाला तुला त्रास?"
"काही त्रास होत नाही मला! अशा अंधारात..."
"माझी काळजी सोड! मी जाईन! मला सवय आहे! जा तू! निघ इथून!" तिच्या आवाजाला अचानक निराळीच धार चढली. मी एकदम चरकलोच!
"पण.."
"जरा समजून घे दादा!" एकदम तिचा आवाज बदलला, "अशा रात्रीच्या वेळी, एका अनोळखी माणसाबरोबर मला आलेली पाहून माझ्या घरचे काय म्हणतील?"
"इतक्या रात्री कशी आलीस म्हणून रागावणार नाहीत का? तेव्हा काय सांगणार आहेस?"
"सांगेन काहीतरी! बस उशीरा आली म्हणून सांगेन!"
"ठीक आहे! जरा थांब!" गाडीत मी नेहमी ठेवत असलेला टॉर्च मी तिच्यापुढे केला, "हे घे. याने रस्त्यावर काही साप वगैरे आला तर दिसेल! आणि पुन्हा अशी अपरात्री येऊ नकोस!"

तिने काही न बोलता टॉर्च घेतला.

मी कारमध्ये शिरुन इंजिन स्टार्ट केलं. ती अद्यापही तिथेच उभी होती! बहुधा मी पुढे निघून जाईपर्यंत रस्त्यावरुन हलायचं नाही असा तिचा विचार असावा! मी गाडी पुढे काढली. काही अंतर गेल्यावर मी मागे वळून पाहीलं तेव्हा मात्रं तिची आकृती मला दिसली नाही. बहुतेक तिने घरचा मार्ग धरला असावा.

घरी पोहोचलो तो रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते! इतक्या 'लवकर' आल्यामुळे माझा करायचा तो उद्धार सर्वांनी केलाच! येताना मी रत्नाला लिफ्ट दिली आणि त्यासाठी केळशी-आंजर्ल्यावरुन आलो हे सांगितलं असतं तर आगीत तेलच ओतलं गेलं असतं! खरंतर एकट्याने ड्रायव्हींग करण्यापेक्षा माझा तासभर चांगला टाईमपास झाला होता, पण हे घरी सांगण्याची सोय नव्हती!

घरच्या बाप्पांचं आगमन संध्याकाळीच झालेलं होतं. यावर्षी कधी नाही ते झाडून सारे काका आणि आत्या सहकुटुंब गणपतीला आल्या होत्या. त्यात प्रत्येकाची पोरं आणि काही नातवंडंही, त्यामुळे इतक्या रात्रीही घरी नुसता दंगा चालला होता! मात्रं दिवसभराच्या दगदगीमुळे माझ्यात त्राण राहीलं नव्हतं. कशीबशी आंघोळ करुन मी झोपेच्या आधीन झालो!

पुढचे चार-पाच दिवस नुसती धमाल सुरु होती. गणपतीच्या निमीत्ताने कित्येक वर्षांनी सर्वजण एकत्रं आलेले. नाहीतर दरवर्षी प्रत्येकाला सुटी मिळतेच असं नाही! यावर्षी तो योग जुळून आल्याने नुसता धुमाकूळ सुरु होता. प्रत्येक पिढीचे आपापले ग्रूप्स झाले होते! हर्णैचा परिसर म्हणजे भटकंतीला एकदम अनुकूल. एकदिवस सुवर्णदुर्गावर फेरी झाली. भर समुद्रात उभा असलेला हा अप्रतिम सागरदुर्ग म्हणजे मराठ्यांच्या आरमाराचा मानाचा तुराच! असंच एक दिवस कड्यावरचा गणपती आणि मग आंजर्ल्याच्या समुद्रकिनार्‍यावर जाण्याची टूम निघाली. वास्तविक हर्णैचा समुद्रकिनारा हा तसा प्रसिद्ध, पण भटकंतीला काहीतरी कारण हवं ना!

एकाच वयाचे - दोन-चार वर्ष पुढेमागे असलेला एखादा ग्रूप मोकळ्या समुद्किनार्‍यावर आल्यावर जो काही धिंगाणा सुरु होतो तेच आमचं सुरु होतं. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणं, मातीत वाळूचे किल्ले तयार करणं असे सगळे उद्योग करुन झाले. त्यानिमीत्ताने काही तास का होईना, पुन्हा लहान झाल्याचं समाधान! रोजच्या धकाधकीत असे बाल्यानुभवाचे क्षण विरळाच! ती निरागसता आणि तो भाबडेपणा याची जागा आपल्यात मुरलेला पक्का व्यवहारीपणा आणि चालुगिरी कधी घेते याचा पत्ताच लागत नाही.

आमचा असा धुमाकूळ सुरु असतानाच एका गोष्टीने माझं लक्षं वेधून घेतलं. आमच्यापासून काही आअंतरावरच एका बाजूला एक बर्‍यापैकी मोठा खडक समुद्रात घुसला होता. या खडकावर समुद्राकडे तोंड करुन कोणीतरी बसलं होतं. नीट निरीक्षण केल्यावर ती व्यक्ती एक स्त्री असल्याचं माझ्या ध्यानात आलं. किती वेळापासून ती तिथे बसली होती कोणास ठाऊक? आमच्या चालू असलेल्या गोंधळाकडे तिचं अजिबात लक्षं नव्हतं! ध्यानस्थं असल्यासारखी तिची नजर खुल्या समुद्रावर लागली होती!

"काय रे? काय झालं?"

अचानक माझ्या खांद्यावर हात पडला, तसा मी दचकलोच. मंदार, माझा आतेभाऊ मागे उभा होता. मी पाहत असलेल्या दिशेला त्याची नजर गेल्यावर त्याच्या चेहर्यावर स्मिताची हलकेच रेषा उमटली.

"ती अशीच आहे! कधीही बीचवर आली की तासन् तास नुसती समुद्राकडे पाहत बसते!"
"तू ओळखतोस तिला?" मी आश्चर्याने विचारलं.
"ओळखतो?" मंदार विचित्रं नजरेने माझ्याकडे पाहत म्हणाला, "अर्थातच! वृंदाची कझिन आहे! वैष्णवी!"

माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. गणपतीच्या दिवशी दुपारी मंदारच्या फॅमिलीबरोबर ती पुण्याहून आली होती. गेल्या तीन-चार दिवसात आमच्यात सहज मिसळून गेली होती. इथे समुद्रावर आल्यावर मात्रं एकटीच एका बाजूला निवांतपणे बसलेली असावी. कारण आमच्या कुठल्याच उद्योगात ती दिसली नव्हती!

सकाळभर धुमाकूळ घातल्यामुळे दुपारच्या जेवणानंतर बहुतेकजण वाळूत आडवे झाले होते! मला मात्रं निपचीत पडून राह्ण्यात काही इंटरेस्ट नव्हता. समुद्राच्या विरुद्ध बाजूला असलेली टेकडी मला खुणावत होती. त्या टेकडीवर एक चक्कर टाकण्याचा अनिवार मोह मला होत होता.

"तुमचं चालू दे! मी आलो त्या टेकडीवर चक्कर टाकून!" मी मंदारला म्हटलं.
"तुला डोंगर दिसला की त्यावर चढल्याशिवाय राहवत नाही का रे?" मंदारने खवचटपणे विचारलं. माझं ट्रेकींगचं वेड सगळ्यांनाच माहीत होतं. मी त्याला काही उत्तर देणार तोच मागून आवाज आला,
"इफ यू डोन्ट माईंड, मी येऊ?"

हा आवाज कोणाचा म्हणून मी वळून पाहीलं तर समोर वैष्णवी!

"चल!"

आम्ही टेकडीच्या दिशेने निघालो. रस्ता ओलांडून आम्ही टेकडीच्या पायथ्याशी पोहोचलो. एक पायवाट टेकडीच्या माथ्यावर गेलेली दिसत होती. त्याच वाटेने आम्ही वर निघालो.

"तू नेहमी ट्रेकींगला जातोस का?" तिने सहज स्वरात विचारलं.
"बर्‍याचदा जातो. ऑफीस सांभाळून जमेल तसं! का?"
"काही नाही.. सहजच! मला ट्रेकींगपेक्षा शांतपणे समुद्रावर बसून लाटांचा आवाज ऐकत बसायला जास्तं आवडतं!
"ते दिसलं मगाशीच! कधीपासून बसली होतीस त्या दगडावर?"
"आल्यापासून!"

पंधरा-वीस मिनीटातच आम्ही टेकडीच्या माथ्यावर पोहोचलो. नजर पोहोचेल तिथपर्यंत पसरलेला अफाट सागर, एखाद्या ठिपक्याप्रमाणे दिसणारी लहान-मोठी जहाजं आणि होड्या, अफाट सागरावर डौलाने मुक्त संचार करणारे समुद्रपक्षी, डाव्या हाताला असलेला सुवर्णदुर्ग आणि उजव्या हाताला पसरलेला कोकणकिनारा!

नि:शब्दपणे त्या निसर्गाच्या मुक्त अविष्काराचा आम्ही अनुभव घेत होतो. भर दुपारचे दोन वाजले असूनही ढगाळ वातावरणामुळे अजिबात उकडत नव्हतं.

"ते बघ!" अचानक वैष्णवीने माझं लक्षं वेधलं, "तिथे कोणाचं तरी घर दिसतं आहे!"

ती दाखवत असलेल्या दिशेने मी नजर टाकली. टेकडीच्या विरुद्ध बाजूला काही अंतरावर एक लहानसं कौलारू घर दिसत होतं. ते घर दृष्टीस पडताच चार-पाच दिवसांपूर्वीची ती घटना मला आठवली.

रत्ना!

त्या रात्री मी तिला टेक्डीच्या पायथ्याशीच रस्त्यावर सोडलं होतं. टेकडीच्या मागे आपलं घर असल्याचं तिने मला सांगितलेलं मला पक्कं आठवत होतं. हेच ते घर असावं.

"काय रे? काय झालं? कुठे हरवलास?"
"काही नाही! चल निघूया आता"

आम्ही टेकडीवरुन खाली उतरण्यास सुरवात करणार तोच मागून कोणाची तरी हाक ऐकू आली. मागे वळून पाहीलं तो त्या घरातून बाहेर पडून आमच्या दिशेने येणारा एक शेतकरी दृष्टीस पडला. टेकडीचा उतार चढून काही मिनीटात आमच्याजवळ येऊन पोहोचला. पन्नाशीचा असावा तो.

"मुंबैचे पाव्हणे काय?"
"हो!"
"गणपतीसाठी आलायसा?"
"हो!"
"चला की माझ्या घराला मग! वाईच च्या-पाणी घ्या!"
"नको, आम्हाला घरी जायचं आहे दादा" मी टाळण्याच्या हेतूने म्हटलं.
"चला वो दादा, जाल सावकाश!"

आता काय करावं? मी प्रश्नार्थक चेहर्‍याने वैष्णवीकडे पाहीलं तर ती माझ्याकडेच पाहत होती. शेवटी आम्ही त्याच्यामागोमाग त्याच्या घराकडे निघालो.

पाच मिनीटातच आम्ही त्याच्या घरी पोहोचलो. टेकडीवरुन वाटलं होतं त्यापेक्षा घर बर्‍यापैकी प्रशस्तं होतं. मागच्या बाजूला जनावरांचा गोठा होता. घरासमोरच्या व्हरांड्यात असलेल्या दोन पत्र्याच्या खुर्च्यांवर आम्ही बसलो. त्याने आम्हाला पाणी आणून दिलं. कारभारणीला चहा करण्याची सूचना देऊन तो आमच्या शेजारी येऊन बसला.

"कधी आलात मुंबैहून?" शेतकरीदादांनी विचारलं.
"झाले चार-पाच दिवस!"
"कुठे राहयला?"
"हर्णैला!"
"अन मग आज इथे कसे आला?"
"सहजच फिरत फिरत आलो. आमचे बाकीचे लोक खाली समुद्रावर आहेत!"

तेवढ्यात चहा घेऊन शेतकर्‍याची पत्नी बाहेर आली. आम्ही चहाचे कप उचलले.

"दादा, तुमच्या घरी कोण-कोण आहे?" काही तरी विचारायचं म्हणून वैष्णवीने प्रश्न केला.
"आम्ही दोघं आणि दोन पोरं! थोरला गेलाय जनावराना घेऊन आणि धाकला गेलाय खेडला! म्हातारी माझ्या धाकल्या भावाकडे गेली हाय!"

शेतकर्‍याचं बोलणं ऐकून मी क्षणभर स्तब्धं झालो.

"इथे आसपास दुसर्‍या कोणाचं घर आहे का?" मी विचारलं.
"इथे? नाही दादा! पार आंजर्ल्यापत्तर कोणाचंपण घर नाही!"
"असं कसं शक्यं आहे? टेकडीमागे माझं घर आहे असं तिने मला सांगितलं होतं!"

मी स्वत:शीच पुटपुटलो, पण शेतकरीदादाच्या तीक्ष्ण कानावर ते गेलंच.

"कोणी सांगितलं?"
"रत्नाने!"
"रत्ना?" शेतकरीदादा माझ्याकडे पाहतच राहीला, "रत्ना तुम्हाला भेटली दादा? कधी? कुठे?"

मी मुंबईहून येतानाचा सगळा प्रसंग त्याला वर्णन करुन सांगितला. मंडणगडला मी रत्नाला गाडीत घेतलं आणि रात्रीच्या अंधारात टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या रस्त्यावर आणून सोडलं, मी तिला घरापर्यंत पोहोचवण्याची दाखवलेली तयारी आणि तिने त्याला दिलेला नकारही मी त्याच्यापासून लपवला नाही.

मी बोलत असताना त्याच्या चेहर्‍यावरचे भाव क्षणाक्षणाला पालटत होते. माझं बोलणं मध्येच थांबवून त्याने आपल्या पत्नीला बाहेर बोलावून घेतलं. सगळी हकीकत सांगून संपेपर्यंत दोघं काहीच बोलले नाहीत, पण तिच्या डोळे भरुन आलेले मात्रं माझ्या नजरेतून सुटले नाहीत.

"पण,,, छे! कसं शक्यं आहे हे?" शेतकरी आपल्या पत्नीकडे वळून म्हणाला.
"अहो खरंच, मी तिला इथपर्यंत आणून सोडलं!" मी पुन्हा म्हणालो.

शेतकर्‍याची पत्नी घरात निघून गेली. काही वेळाने ती परत आली तेव्हा तिच्या हातात एक जुना फोटो होता. त्या फोटोत तीन-चार मुली दिसत होत्या. शेतकर्‍याने तो फोटो माझ्यासमोर धरला,

"यातल्या कोणत्या मुलीला तू आणलंस?" शेतकरीदादा एकदम एकेरीवर आले.

मी फोटोवर नजर टाकताच एका क्षणात रत्नाला ओळखलं. तेच निर्व्याज स्मित तिच्या चेहर्‍यावर विलसंत होतं.

"ही! हीच ती मुलगी!" मी फोटोवर बोट ठेवलं.

त्याने खिन्नपणे मान हलवली. ही काय भानगड होती मला काहीच समजेना. वैष्णवीतर पार गोंधळली होती.

"काय झालं दादा? वैनी?"

त्याने एकवार माझ्याकडे पाहीलं आणि दूर अज्ञातात नजर रोखत उद्गारला,

"रत्ना माझी मुलगी होती! दहा वर्षांपूर्वी खालच्या रस्त्यावर अपघातात गेली ती!"

कथालेख

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

19 Oct 2014 - 11:19 am | टवाळ कार्टा

ही गोश्ट आहे की वस्तुस्थिती??

किसन शिंदे's picture

19 Oct 2014 - 11:28 am | किसन शिंदे

जबरदस्त कथा!!

आता दोनच महिन्यांपूर्वी तो सगळा परिसर फिरून आल्यामुळे सगळं डोळ्यासमोर उभं राह्यलं.

जेपी's picture

19 Oct 2014 - 11:33 am | जेपी

चांगली कथा .
शेवट गुंडाळल्या सारखा वाटला.

माम्लेदारचा पन्खा's picture

19 Oct 2014 - 12:14 pm | माम्लेदारचा पन्खा

पण खूपच प्रेडिक्टेबल वाटली... वैष्णवीचे प्रयोजनही कळले नाही...

नेहेमी याच वर्णनाच्या, मुली किंवा पांढरी साडीवाली बाई कशा लिफट मागतात? बुवा लोकांचे आत्मे हायवेवर जात नसावेत काय? (पूजेला जातात का लिहायचा मोह आवरला आहे)

मुक्त विहारि's picture

19 Oct 2014 - 12:47 pm | मुक्त विहारि

मस्त

वेल्लाभट's picture

19 Oct 2014 - 1:31 pm | वेल्लाभट

_/\_ सॉलिड

एकदम ठराविक वळणाची कथा,हजारो चित्रपटात हा सिन येऊन गेलेला असेल. शिवाय त्या वॆष्ववीचे काय काम ते समजले नाही.

दशानन's picture

19 Oct 2014 - 9:19 pm | दशानन

+१

खूपच जुने व अनंतवेळा हाताळले गेलेले धक्कातंत्र.
अजून कथा नीट फुलवून काहीतरी वेगळा प्रयत्न नक्की करता येऊ शकेल.

पण लेखन मांडणी व फ्लो आवडला, थोडे एक तर पात्र अश्या कथेत कमी ठेवावेत, किंवा गरज म्हणून आलेले पात्र त्यात सूट होतीलच हे पहा, आगाऊ सल्ले आहेत.. मनावर घेणार नाही असे समजतो.

पुण्याच्या धाग्यांचा धुरळा डोळ्यात जाऊन डोळे अगोदरच पाणावलेले होते आता गहिवरून आलं. परोपकारी लोकं आहेत म्हणून वळणावळणावर मदतीचा हात मागायला कुणीतरी बिचारे उभे आहे. बाइ-द-वे पंक्चरवाला मल्लू आणि बॉस दोघांनाही धन्यवाद.वैष्णवीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.

प्रभाकर पेठकर's picture

19 Oct 2014 - 2:57 pm | प्रभाकर पेठकर

अपेक्षित वळणं घेत धावणारं कथानक. शेवटाची उत्सुकता नव्हतीच. जरा वेगळा मार्ग चोखंदळला असता तर बरं वाटलं असतं.

बोका-ए-आझम's picture

19 Oct 2014 - 3:43 pm | बोका-ए-आझम

अपेक्षित शेवट होता पण वाचनीय. वैष्णवीला धूम ३ मधल्या कॅटरिनापेक्षाही कमी स्कोप होता. ;)

पिंपातला उंदीर's picture

19 Oct 2014 - 4:10 pm | पिंपातला उंदीर

लिखाण शैली भन्नाट आहे पण अनेक क्लिशे एकत्र झाल्याने predictable झाली आहे असे वाटते

अपेक्षित शेवट. तरी कथा आवडली.

माझीही शॅम्पेन's picture

19 Oct 2014 - 8:40 pm | माझीही शॅम्पेन

एकदम ठराविक साच्यतील सरधोपट कथा शेवटा सकट, तुमच्या कडून खूप जास्त अपेक्षा आहेत !!!!

खटपट्या's picture

20 Oct 2014 - 7:55 am | खटपट्या

आवडली कथा !!

संजय कथले's picture

20 Oct 2014 - 11:47 am | संजय कथले

अहो तिचे पाय पहायला हवे होते. भूतांचे पाय उलटे असतात.

तुमचा अभिषेक's picture

26 Oct 2014 - 2:14 am | तुमचा अभिषेक

अपेक्षित कथानक पण शैलीमुळे वाचनीय.