उस्ताद ग्यासुद्दिन शमसुद्दिन : एक शापित गंधर्व

परवाच बोलताना कुणीतरी म्हणालं, सगळ्या पेट्रोलपंपांचा संप आहे, म्हणून. आणि माझं मन सुमारे वीस वर्षांपूर्वीच्या भूतकाळात एखाद्या चुकार वासरासारखं ओढलं गेलं. मंडळी, आपलं मन म्हणजे अजब रसायन आहे, बरं का ? कितीही दावणीला बांधलं तरी जिथे जायचं तिथे जातंच. असो, माझ्यापुढे तो हरवलेला काळ उभा राहिला, आणि मन:चक्षूंसमोर प्रतिमा उभी राहिली, ती एक मळकट बनियान, साधारणत: त्याच रंगाचा पायजामा, तोंडात रंगलेलं पान, आणि "अमां मियां, ये गाना वाना तुम्हारे पंडतोंके बसकी चीज नहीं. हमारे बडे अब्बू का गाना सुनो, वो पंडत सब पैर छूते थे उनके." हे पेटंट वाक्य.

मंडळी, गोंधळलात ना ? पेट्रोलपंपाच्या संपातून हे संगीत वगैरे कसे काय आठवले बुवा ? हा तुम्हाला भेडसावणारा प्रश्न तुमच्या बावळट चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय मला. मंडळी, आपली अभिजात संगीताची परंपरा आहेच तशी थोर. पण उस्ताद ग्यासुद्दिन शमसुद्दिन, हे ह्या परंपरेचे एक शापित पाईक होते, आणि तसंच अजब रसायन होतं. त्याचं काय आहे, की पेट्रोलंपंप, ग्यास सिलिंडरे, वगैरे आम्हा खेड्यातल्या लोकांनी जेव्हा पाहिली देखील नव्हती, तेव्हा आमच्या गल्लीच्या कोपऱ्यावर "ग्यास एंड ष्टो रिपेर शाप, ७८६" असा हस्तलिखित बोर्ड असलेली एक टपरी होती. त्याखाली "प्रोप्रा. ग्यासुद्दिन शमसुद्दिन" असे खरडलेले होते. आमच्या घरी दोन रॉकेलचे ष्टोव्ह होते. त्यातला एकतरी नेहमीच बिघडलेला असायचा. पण आम्हाला ग्यासुची आठवण यायची, ती दुसराही ष्टो बिघडल्यावर.

"सर्क्या, जा त्या ग्यासूकडून आण ष्टोला पीन मारून, नायतर आज गिळायला काय नाय तुला." आमची म्हातारी तशी सुगरण. तिच्या हातचा अर्धाकच्चा भात आणि घासलेटचा सुगंध येणारी कढी पिऊन येणाऱ्या ढेकरेची आठवण मला आजही प्रत्येकवेळी पेट्रोल भरताना येते. (ही ढेकर देताना, मी नेहमीच आजूबाजूला विस्तव नाही, ह्याची खात्री करून घेतो.) ष्टोचा पंप आणि माझी पाठ ह्या दोन्ही भगवंताने तिला खास बडवण्यासाठी बहाल केलेल्या वस्तू आहेत, अशी तिची अमाप श्रद्धा होती. त्यामुळे ष्टो दुरुस्ती ताबडतोब व्हावी, म्हणून ग्यासूकडे मी पूर्ण सकाळ घालवत असे.

पण संपाचा काय संबंध ? अजूनही तुमचा चेहरा तसाच बावळट आहे, मंडळी !

अहो, सोपे आहे. घासलेट-पंपांचा संप दर दोन दिवसांतून एकदा असायचा, तेव्हा हमखास घासलेट मिळण्याचे स्थान, म्हणजे ग्यासुद्दिन. दुरुस्तीला आलेल्या ष्टोमधून थोडे थोडे घासलेट ग्यासू बाजूला काढतो, असा एक प्रवाद होता. आणि संप असला, की डब्बल किमतीला विकायचा. काही लोक चांदीचा चमचा चोखत जन्माला येतात, त्यांच्या घरी रॉकेलचे पंपवाले रोज चक्कर मरतात. पण आमचे नशीब असे, की आमच्या ष्टोमधले घासलेट संपायचे, ते नेमक्या संपाच्या दिवशी. आणि मग छोटेसे पात्र घेऊन आम्ही पुन्हा ग्यासूला शरण जात असू.

ग्यासूला ष्टो रिपेर करताना बघणे, किंवा "मियां रुको, अब्बी लाता हूं घासलेट" म्हणून लगबगीने टपरीमागे जाताना बघणे, हे माझ्या बालपणी माझ्या मनावर खोल परिणाम करून गेले. पण त्यापेक्षाही खोल परिणाम म्हणजे, ष्टो रिपेर करताना ग्यासूचे तत्वज्ञान ऐकण्यामुळे झाले. त्याच्या नावापुढे "प्रोप्रा" असल्याने, मला तो प्रोफेसर, प्राध्यापकांपेक्षा काही वेगळा नव्हता. तसे त्याचे खरे नावही ग्यासुद्दिन नव्हते. त्याचे खरे नाव होते "शरीफुद्दिन वल्द शमसुद्दिन वल्द अल्लाउद्दिन वल्द करीमुद्दिन वल्द रहीमुद्दिन." पण हे सर्व लिहिणे त्या छोट्याशा बोर्डावर शक्य नव्हते. परिस्थितीप्रमाणे आपली जनमानसातली प्रतिमा आपल्याला आपल्या खऱ्या ओळखीपेक्षा वेगळी ठेवावी लागते, हा माझ्या बालपणात मी ग्यासूकडून घेतलेला पहिला धडा. आमच्या छोट्याशा गावात धनिकांकडे नुकत्याच ग्यासच्या शेगड्या येऊ घातल्यावर, त्याचेही रिपेर काम स्वत:ला मिळावे म्हणून शरीफुद्दिनचा ग्यासुद्दिन झाला.

पण ते होणे नव्हते. त्या ग्यासच्या शेगड्या ग्यासूपर्यंत कधीच पोहोचल्या नाहीत. ग्यासबत्त्या मात्र चिक्कार पोहोचल्या. म्यांटल जळले, की ग्यासूची सर्वांना आठवण यायची. आमची आजी तर त्यांना ग्यासूद्दिवेच म्हणायची. पण असे असले, तरी ग्यासूच्या चेहऱ्यावर मला कधी विषाद दिसला नाही. शिलिंडरातला ग्यास चोरून वेगळा काढता येत नाही, हे कळल्यावर त्याने ग्यास रिपेरिंगकडे ढुंकूनही बघितले नाही. उलट तोंडातील पानाची भरभक्कम पिंक टपरीपासून रस्त्यावर उडवून ते प्रकरण त्याने कधीच निकालात काढले होते.

ग्यासबत्तीच्या त्या मिणमिणत्या प्रकाशात टपरीसमोर बसून ग्यासूचे रिपेरकाम बघत, त्याच्याकडून आजवर मी जे काही शिकलो आहे, ते कुठल्याही विद्यालयात किंवा महाविद्यालयात शिकवले, तर आज तरुणांना बेकारीची समस्या भेडसावणार नाही. ग्यासूचे जीवनविषयक तत्वज्ञान, गीत, संगीत, कविता, गझला, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान ह्या सर्व विषयातले ज्ञान, आणि ष्टो रिपेर, हे सर्व शिकताना कृष्णाला सांदीपनीच्या आश्रमातदेखील इतके चौफेर ज्ञान मिळाले नसेल, ह्याची मला खात्री आहे. ष्टोला वाती चढवताना, यमन आणि शुद्धकल्याण ह्यातला फरक समजवून देताना, ग्यासुद्दिन चा संगीतशिक्षणविषयक दृष्टिकोण किती व्यापक आहे, ह्याची खात्री पटते.

"अब ऐसा देखो मियां, ये तुम्हारे ष्टोमें कितनी वात हय ?"

"१२" मी.

"तो ऐसा समझो, की हमने उनमेसे सिरफ ७ ही वात उपर की, बाकी सब निकाल दी. अब ये वातको सा बोलो. तो ये जलाई, तो बाकी एक के बाद एक जलेगी के नही ? अब जो वात ऊपर है, वोईच जलेगी. बस ऐसेहि है अपना आयमान. अब ये बीच वाली वात को ले जाव नीचे, और उस्के बाजूवाली को करो ऊपर. तो ये कैसे जलेगी. बस वैसे सुदकलियान. दोनो एकही ष्टो की वाती, लेकिन जलनेका आर्डर अलग है."

मंडळी, भातखंडे पलुस्करांपासून आपल्या संगीतशिक्षणाच्या क्षेत्रातील मोठी परंपरा अशी ष्टोमधून जळणाऱ्या वातींतून पुढे चालू ठेवणारे ग्यासुद्दिन सारखे संगीतशिक्षक मला लाभले, हा मी माझा बहुमान समजतो.

कधीकधी ग्यासूच्या दुकानात ममद्या नावाचा एक दहा-बारा वर्षाचा पोर असतो. "हमारे चच्चीजान के बुवाजानका नाती." अशी ममद्या ची ओळख ग्यासूने करून दिली असते. ममद्याला आपले अभिजात संगीत आवडत नाही, ही ग्यासूची मुख्य तक्रार. ग्यासूची तोडी सुरू असते, तेव्हा हा पोऱ्या नवीनच कुठलेतरी रफीबिफीचे गाणे गुणगुणत असतो, तेव्हा चिडून एक ष्टो ममद्याच्या अंगावर फेकलेला मी स्वत: पाहिला आहे.

"अमा, ठीक है के गा नही सकते. लेकिन थोडा सुन तो लो ! ये आजके लडके."

तसे ग्यासुला कौटुंबिक सुख वगैरे मिळत असावे. पण पोटचे पोर नाही, म्हणून कधी कधी ग्यासू खिन्न असायचा. एकदा भलताच खूष दिसला. "शिरनी लो मियां." मी प्रसाद खाऊन चच्चीजान चे अभिनंदन करायला निघालो. "अरे उस्को मत बोलो, मियां. उधर गावबाहार ग्यासूका चिमत्कार है. अल्लाउद्दिन के जमानेसे हमारी लैन ऐसी टूटी नही थी कब्बी, अब कैसे टूटेगी?" पुढे त्या "चिमत्काराने" गावातील एका धनिकाशी सूत जमवले, आणि लैन तुटलीच.

तसे ग्यासुद्दिनचे दादे परदादे गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात आहेत. पण आजही हैदराबादेचे नाव निघाले, की चारमिनारच्या मागे सलीमभाईच्या दम बिर्याणीच्या आठवणीने ग्यासू कळवळतो.

"क्या बताऊ मियां, वो हड्डीभी ऐसी पकती थी, की उस्को चूसते वक्त जैसे वो पंडत चौरासिया की बासुरी के सुर निकलते थे. हमारी बेगम तो छोडो, बडी अम्मीभी ऐसी बिरयानी कब्बी बना नही सकती."

एकदा मी ग्यासूला भाईकाकांचे "माझे खाद्यजीवन" वाचून दाखवले.

"अमां मियां, ये बम्मन लिखता अच्छा है. ये खाने खिलाने के बजाय और क्या करता है?"

मग मी त्याला "व्यक्ती आणि वल्ली" वाचून दाखवले.

"मियां, बडे होने पर तुम भी ऐसेच हमारे उप्पर लिखना."

आजही कुणाचा यमन ऐकताना, कुठल्या वाती वर आणि कुठल्या खाली ते आठवतात. हसूही येतं. रडूही. परमेश्वराने आपल्या आयुष्यात आणलेले हे ष्टो. वाती जळल्या आणि रिपेरला गेले.

संदर्भ

http://www.misalpav.com/node/2904

- सर्किट

एकूण गुण साडे पाच.

मिळवलेले गुणः

१. व्यक्ती निवड: गुण २

शहरातल्या काकू-मामी न निवडता गावातली, परधर्मीय व्यक्ती निवडून धर्मनिरपेक्षता दाखवल्याने २ गुण.

२. आपल्या व्यक्तिमत्त्वाशी त्या व्यक्तीची सांगडः गुण १

तुम्ही आणि ग्यासु पीना मारण्यात एकमेकांचे गुरू शिष्य शोभत असावेत. पूर्ण गुण : १

३. भाईकाका: गुण १
भाईकाका चिमूटभर पडलेले आहेत. त्यांना बामण बनवून जात-पात आणल्याने अर्धा गुण कट करावा अशी जबरदस्त इच्छा झाली होती पण यावेळेस ढील देण्यात आल्याने पूर्ण गुण.

४. छायाचित्रे: गुण १
भडकमकरमास्तर फोटोशॉप वापरून चांगले प्रयोग करतात. शिकवणी लावून टाका. फोटो स्कॅन करायचे राहिले असेल तर घाटपांड्यांची शिकवणी लावा. गुणः०

५. नर्मविनोदः गुण २
आपल्या मातोश्रीही आपल्याला सर्क्या म्हणत. मुन्ना-सर्किट भेटणार ही गोष्ट त्यांना तेव्हाही माहित असावी आणि ते घाटपांडे बघा जगात ज्योतिष नाही सांगत फिरतात. पण खळखळवून हसवणारे विनोद आले नाहीत. परंतु हे माझे व्यक्तिगत मत असू शकेल. गुण: २

६. खाण्यापिण्याचे उल्लेखः गुण २
मराठी चित्रपट आणि कथा यांत खाण्याचा उल्लेख यायलाच हवा. व्यक्तिचित्रांत तर मश्ट. तसा तो दमबिर्याणीचा उल्लेख वगैरे आलेला असल्याने एक गुण. परंतु, ग्यासू तुमच्या आई/आजीच्या हातचे धपाटे (खाण्याचा पदार्थ) खाऊन "आहाहा! जन्नत इसीको कहते है मामू" असं काहीसं म्हणाला असता तर एक गुण अधिक दिला असता.

७. गुप्तता: गुण १
गुप्तता पाळल्याचे कळले नाही. (कंसातील गुप्त वाक्ये चालली असती) गुण: ०

आता काही गुण कापण्यात आले ते असे -

१. व्यक्तिचित्र वाचणारे वाचक हे भावूक आणि निरागस असतात. त्यांना बावळट म्हणू नये. त्यांना मंडळी, मित्रहो वगैरे संबोधावे. मैत्रही चालेल. गुण : -१/२ Wink
२. व्यक्तिचित्र लिहिताना अहाहा!, वा!, काय सांगू तुम्हाला! वगैरे उद्गारवाचक शब्दांची पेरणी हवी ती नसल्याने अर्धा गुण कट. गुण: -१/२
३. व्यक्तिचित्राचा शेवट कसा चटका लावणारा हवा. लोक हळहळले पाहिजेत. म्हणजे -
का रे असा माझ्या आयुष्यात वाती पेटवायला आलास तू ग्यासू? अशी ढांसू वाक्ये हवीत. Wink अर्धा गुण कटः -१/२

लेख आवडला. Smile पण व्यक्तिचित्र लिहिण्याची ज्यांना हातोटी आहे त्यांच्या जवळपास जाण्यात अद्याप काही पायर्‍या चढणे आहे. तेव्हा आणखी प्रयत्न करा. आणखी व्यक्तीचित्रे येऊ देत!

खल्लास!

हेडमास्तरीण बाईंचे प्रश्नपत्रिकेचे (अव)गुणमेलन आवडले! Wink

चतुरंग

कितीपैकी?

कितीपैकी?

१० पैकी.

५.५/१०

पुनर्गुणांकनाची गरज !

पण व्यक्तिचित्र लिहिण्याची ज्यांना हातोटी आहे त्यांच्या जवळपास जाण्यात अद्याप काही पायर्‍या चढणे आहे. तेव्हा आणखी प्रयत्न करा. आणखी व्यक्तीचित्रे येऊ देत!

अहो, ते कुठे आणि आम्ही कुठे ?

(नाही, खरेच, "ते" कुठे आहेत सध्या ?)

बाकी, अवगुणांकन आवडले.

पण काही बाबतीत असहमत.

त्यामुळे पुनर्गुणांकनाची अपील.

- सर्किट

(स्वगतः यू हॅव्ह नो डिसेन्सी. गेट ओव्हर इट!)

बढीया...

मलाही माझ्या घरच्या स्टोवची आठवण झाली. पुश्कळदा मी सुद्धा माझ्या आईला स्टोवमद्धे पंप मारुन देत असे....
मला तर स्वप्नातही भुक लागते....

मस्तच

झकास Smile

-आजही कुणाचा यमन ऐकताना, कुठल्या वाती वर आणि कुठल्या खाली ते आठवतात. हसूही येतं. रडूही. परमेश्वराने आपल्या आयुष्यात आणलेले हे ष्टो. वाती जळल्या आणि रिपेरला गेले.

अगदी भाईकाकांच्या (पु. लं. च्या नव्हे बरंका) रावसाहेबांची आठवण झाली.

हा हा हा..

सर्किटशेठ,
_/\_
काल दिलेली पाक कृती आणि आज लगेच त्याचे प्रात्यक्षिक.. वा वा.. हहपोदु.. Rolling On The Floor
(वाचक)केशवसुमार..
स्वगतः आम्ही विडंबनाची निवृत्ती घेतली आता बरेच जण व्यक्ती चित्रांची निवृत्ती घेणार असे दिसते.. Nerd

घी शक्कर

स्वगतः आम्ही विडंबनाची निवृत्ती घेतली आता बरेच जण व्यक्ती चित्रांची निवृत्ती घेणार असे दिसते..

मियां, तुम्हारे मुंह मे घी शक्कर !

- सर्किट

अ श क्य

"घिसापिटा"चा अर्थ घासलेटाने घासूनपुसून लख्ख केला आहे. वातीच्या काजळीचा तीट काढून लावावा या व्यक्तिचित्राला.

मागे मी एका साहित्यप्रकाराच्या पायजम्याची नाडी अशीच ओढायचा प्रयत्न केला होता, पण ते होते घरगुती बोक्याने सोफा खरवडल्यासारखे. या इथे मात्र गंडस्थळ फोडणारे नख सिंहाचे आहे असे स्पष्ट कळते - "tanquam ex ungue leonem".

धन्यवाद

धन्यवाद धनंजय शेठ.

आपल्यासारख्या विद्वानाच्या संगतीने हे गंडस्थळ वगैरे शब्द कळलेले आहेत. आधी आम्हाला ते अश्लील वाटायचे.

सिंह वगैरे सोडा, हत्तीच्या गंडस्थळावर रांगणारी ती एक मुंगी दिसते आहे आपल्याला ? जरा जवळून पहा. तेच आम्ही.

- सर्किट

नमामि


मागे मी एका साहित्यप्रकाराच्या पायजम्याची नाडी अशीच ओढायचा प्रयत्न केला होता, पण ते होते घरगुती बोक्याने सोफा खरवडल्यासारखे.


तव्हा मी एकटाच हसत होतो. नमामि मोद मंगलम| चे स्वर कानात घुमत होते. आन ललालला लला लला ......

प्रकाश घाटपांडे

सही है! पण...

फोटू कुठे आहे?

कमीतकमी शेरनी खातानाचा फोटू तरी टाकायचा...

क्षमस्व, पण

ग्यास च्या शेगड्यांच्याही आधीचा काळ, क्यामेरे कुठे होते तेव्हा ?

- सर्किट

अहो काय सांगता राव..

कोणीतरी पिनहोल क्यामेर्‍याने किंवा मॅग्नेशियम जाळून काढले असतीलच की..

पण मग चित्र काढून तरी लावाच .. Wink

शोधावा लागेल

माझ्याकडे स्क्यानर नाही, तेव्हा त्या फोटूचाच फोटू काढावा लागेल. Wink

- सर्किट

ग्यासुद्दीन आवडला

तुम्ही जिंकलात सर्कीटराव.. व्यक्तीचित्र काय सुरेख रंगवले आहेत.... मजा आली.
भाईकाकांची आठवण तर आलीच .. शेवटच्या वाक्याने तर डोळ्यात पाणी उभे राहिले.
धन्य तो ग्यासुद्दीन आणि धन्य त्यांचा सहवास लाभणारे तुमच्या सारखे नशिबवान.

ठ्ठ्ठो .....

खो खो खो !!!!!

- सर्किट

क्या मिया

क्या सर्किट मिया .. २४ साल से चारमिनार पे बैठा हु ..आज तक कोई भाईकाका हमको बिर्याणी जैसा पकाया नही रे .. क्या तो बी समझे ? फोकट के व्यक्तिचित्रा... फोकट के पाकृ पढवाके .. बंबू घुसेडतेरे तुम लोगा मेरे कु .. आवो रे तुम लोगा आओ .. तयखाना पढवाते रे तुम लोगा मेरे से ... (संदर्भ - द अंग्रेज)

अवांतर (होय अवांतर) :
ती एक मळकट बनियान, साधारणत: त्याच रंगाचा पायजामा, तोंडात रंगलेलं पान, आणि "अमां मियां, ये गाना वाना तुम्हारे पंडतोंके बसकी चीज नहीं. हमारे बडे अब्बू का गाना सुनो, वो पंडत सब पैर छूते थे उनके." हे पेटंट वाक्य.
वाह !! वाह वाह !! आम्हाला आमचे ते हे आठवले .. आणी डॉळ्यात पाणी ऊभ राहीलं ते असं Rolling On The Floor

तिच्या हातचा अर्धाकच्चा भात आणि घासलेटचा सुगंध येणारी कढी पिऊन येणाऱ्या ढेकरेची आठवण
वा वा क्या बात है !! वा वा !! ... थोर तुम्ही भाग्यवान .. अगदी सदेह स्वर्गी गेलेल्या तुकारामांएवढे ..आता ही डिश करून पाहीलीच पाहीचे...

आजही कुणाचा यमन ऐकताना, कुठल्या वाती वर आणि कुठल्या खाली ते आठवतात. हसूही येतं. रडूही. परमेश्वराने आपल्या आयुष्यात आणलेले हे ष्टो. वाती जळल्या आणि रिपेरला गेले.
जियो सर्किट राव .. तुम्ही अलका (पाठीत) बुकल ला डारवलं .. "डॉळेपुसा" रुमालांच्या जाहिरातींच काँट्राक्ट तुम्हालाच

आयला हासून हासून बेड च्या स्प्रिंगा तुटायला आल्या
Rolling On The Floor Rolling On The Floor Rolling On The Floor
-- ( टारझन ऊर्फ खवीस )

+१ अगदी असेच म्हणतो

आता पंप स्टो ह्यावरुन ग्यासुद्दीनचीच आठवण येणार.

त्यातला एकतरी नेहमीच बिघडलेला असायचा. पण आम्हाला ग्यासुची आठवण यायची, ती दुसराही ष्टो बिघडल्यावर.

मराठी माणसाच्या मानसिकतेवर काय अचूक बोट ठेवलेय! सर्कीटराव तुमचा संगीत, लेखन, सर्व परिक्षेत प्रथम येणे, कवितांचे समिक्षण, आंतरजालीय स्पर्धा आयोजन, इतिहासाचा गाढा अभ्यास, सातासमुद्रापारचे पराक्रम व मराठी जनाचे मानसशास्त्र हे सगळे नोकरी सांभाळून कसे काय जमते बॉ. मानले तुम्हाला. तुमच्या मुळे आमचे वाचनविश्व अतिशय समृद्ध झाले आहे. तुमचे आभार मानावे तितके कमी.

ष्टोला वाती चढवताना, यमन आणि शुद्धकल्याण ह्यातला फरक समजवून देताना, ग्यासुद्दिन चा संगीतशिक्षणविषयक दृष्टिकोण किती व्यापक आहे, ह्याची खात्री पटते

ओहोहो क्या बात है!!

चारमिनारच्या मागे सलीमभाईच्या दम बिर्याणीच्या आठवणीने ग्यासू कळवळतो.

अन्न हे पुर्णब्रम्ह म्हणजे काय हे कळायला अशी बिर्यानी खायचे भाग्य लागते महाराजा!!! परदेशातील हॉटेलचे बील पाहून ब्रम्हांड आठवणार्‍यांना काय कळणार म्हणा.

उत्कृष्ट व्यक्तिचित्र!! सर्वोत्कृष्ट!!

असेच..

तुम्ही जिंकलात सर्कीटराव.. व्यक्तीचित्र काय सुरेख रंगवले आहेत.... मजा आली.
भाईकाकांची आठवण तर आलीच .. शेवटच्या वाक्याने तर डोळ्यात पाणी उभे राहिले.
धन्य तो ग्यासुद्दीन आणि धन्य त्यांचा सहवास लाभणारे तुमच्या सारखे नशिबवान.

असेच म्हणते,कोलबेर यांच्यासारखेच,Wink
स्वाती

सलाम सर्किटमियां,

अमां मियां, आज तो तुम पूरे हटेले हो गये! 'भाईकाका' मिला था क्या रे सपने में कल रात? :>
चारमिनारा देखते देखते हमारी टोपी गिराते क्या रे तुम! Smile)
हसहसके पूरी वाटा लगा दीं रे! इसको क्या हुवा बोल के पब्लिक मेरे हाफ़िस के बाहर खडा होके तमाशा देख रहा रे! Big Grin
वापस ऐसा कभ्भीभी नक्को बोलू तुम!

(खुद के साथ बातां - कित्ता सुकून मिला रे ये सोचके के ये ऐसा मैं नहीं लिखता नहीं तो मेरी भी ऐसीच वाट लगती रें!)

चतुरंग

बातां

खुदके साथ बातां भोतीच पसंदीदा चीज हय रंग्यासेठ !

तुमारी वाटा कायकु लगती मियां, लगेंगी तो हमारीच Wink

- सर्किट

ह्या ह्या ह्या

सर्कीट, आधी तो कर्न टल्ली झाला आता तूम्ही पन. लई भारी. हसून खूर्चीवरून खाली पडलो. परत खूर्चीवर बसून हा प्रतीसाद लीहीला आहे.

(जूना) फूरकान वल्द इब्राहीम वल्द असगर वल्द रफीक मोमीन अली

उमाळा गोळा

सर्किटशेठ,

पण हे तिकडे आरामात परदेशात बसून लिहिणं कितपत योग्य आहे? स्टोव्हचे निमित्त्य करून असे काहीबाही लिहिणे कितपत योग्य आहे हे सांगा बरं!

आणि एवढीच जर कळकळ असेल तर तुम्ही थोड्या खस्ता खाऊन ग्यासूला शापमुक्त करायला काय हरकत आहे.

असो मनावर घेऊ नका.... (दूरदेशी असले की मधूनमधून उमाळे यायचेच)

चालायचचं - एकलव्य

खरे आहे

आणि एवढीच जर कळकळ असेल तर तुम्ही थोड्या खस्ता खाऊन ग्यासूला शापमुक्त करायला काय हरकत आहे.

श्टो रिपेर वाल्यांसाठी ज्या समाजसेवी संस्था आहेत, त्यांच्या भगिनीफंडात मी नेहमीच देणगी देत असतो.

दूरदेशी उमाळे येणार्‍या लोकांना आणखी काय शक्य आहे, सांगा !

- सर्किट
ग्यासु शापमुक्ती संघटना,
हिरव्या नोटांचा देश.

ख्या ख्या ख्या

>>श्टो रिपेर वाल्यांसाठी ज्या समाजसेवी संस्था आहेत, त्यांच्या भगिनीफंडात मी नेहमीच देणगी देत असतो.

ठ्ठोssss .. !! Rolling On The Floor

जियो !

मस्त टुकारी ... एखादे आभासी संमेलन भरवुन तुम्हाला 'आद्यटुकार' अशी पदवी बहाल करावी वाटते ! Smile

(संगणक विषयक पण सदरहु लेखक नवनविन गोष्टी लिहायचे अशी पुसटशी आठवण येते, असो गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी Wink )

इचिभनं !

"आयच्यान" सांगतो , इथल्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्स ना हालवून सोडलाय बॉ ! Big Grin

फार फार वर्षांपूर्वी पुरुषराज अळूरपांडे नावाची घटना तत्कालीन सारस्वतात होऊन गेली. आज त्याच घटनेचे दर्शन आपल्याला "विसोर्कीटखान पिवळखेचर" या नावाने चालू एपिसोडमधे पडताना दिसते आहे ! कुठल्याही गोष्टीची यथास्थित टिंगल उडवायची , तर आधी आपल्या 'आराध्य'विषयाचे सांगोपांग ज्ञान हवे . केशवसुमार नावाचे मोठे विडंबक येथे होऊन गेले , ते मोठे होते ते याच अर्थाने ! Smile कोण म्हणतो ठणठणपाळ संपला म्हणून ? त्याचाच पणतू , आज इथे अवतरलाय ! ज्या बड्याबड्या साहित्यिकांची ठणठणपाळाने रेवडी उडवली , झाडून सारे जण त्याच्या प्रेमात पडलेले होते. माझी खात्री आहे , सर्कीटरावांचे प्रस्तुत लिखाण वाचून सारे भाईकाकांचे पुतणे, डांबिसखानाचे सुलेश, आणि आम्हा सर्व पुतण्यांचे काका यांना गुदगुल्या झाल्या असतील...

एखाद्या कलंदर माणसाबद्दल म्हणतात : "उसके दुश्मन बहोत थे. शायद आदमी बहुत अच्छा होगा !" मिसळपावबद्दल सांगायचे तर , "उसको हँसने-हँसाने वाले बहुत थे, शायद साईट बहुत सही होगी...." कसे म्हणता ! Wink

ओ हो हो !!!

विसोर्कीटखान पिवळखेचर

दोन दिवस वाट पहा, ह्या नावाचा आय डी इथे उघडतो की नाही बघा !

आराध्य'विषयाचे सांगोपांग ज्ञान हवे

कुठले ही विषय असो, एकदा ते "विषय" आहेत असे ठरले, की मग ते आमचे "आराध्य" !

उसको हँसने-हँसाने वाले बहुत थे, शायद साईट बहुत सही होगी...."

ये हुई ना बात !!!!

- सर्किटखान पिवळखेचर

लै भारी लिहिलं !!!

उस्ताद ग्यासु लिहिला लै भारी, त्याला शुद्ध यमन, भूप, मल्हाराबरोबर भिमपलास,मालकंस, ही येतच असेल, तरी त्या मानानं तुम्हाला त्यांनी गाण्यातले बारकावे सांगितले नाही आणि शिकवले नाही.Smile पुन्हा वेगवेगळ्या घराण्यांच्या गायकीबद्दल, आलापीबद्दल, गाणं कसं मांडावं, राग कसा मांडावा, घराण्याची गायकी कुठे अन् कशी दिसली पाहिजे, हे काही सांगितलं नाही बॉ तुमच्या ग्यासुनं Smile

बाकी, शुद्धकल्याण आणि ष्टोच्यावातीचा संबध दाखवणारा संगीत शिक्षक दुर्मिळच.

आमच्याबी गावात ष्टो वाला होता,पितळी ष्टो लीक झाल्यावर रिपेरींगला घेऊन जायचो डाग द्यायला. त्याची सुरेख आठवण झाली. लेखन कोणाची स्टाइल जरी असली तरी सुंदर झाले, हे वेगळे सांगणे न लगे. लिखते रहो मिया, लिखते रहो !!!

बाकी सर्किटसेठ तुम नही सुधरोगे !!!

-दिलीप बिरुटे

हे आता आपल्या पदरी

घराण्याची गायकी कुठे अन् कशी दिसली पाहिजे, हे काही सांगितलं नाही बॉ तुमच्या ग्यासुनं

बिरुटे शेठ, आमच्या पापांचा घडा आता भरला आहे. आता स्वतःहूनच जालियनवाला बागेतील विहिरीच्या कठड्यावर जाऊन उभा राहतो.

आता उरलेली पापे तुमच्या शिरी.

- (हुतात्मा) सर्किट

मस्त

लेख, आवडला. पाककृतीतील आणि प्रात्यक्षिकातल्या काही ओळींवरून पुलंची आठवण आली Smile

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

पुलं ?? हे कोण ?

पुलंची आठवण आली

पुलं ?? हे कोण ? ओ हो हो ! भाईकाका होय ?

अच्छा अच्छा !

- (पुतण्या) सर्किट

पाककृती

पाककृती सर्कीट स्टाईलने एकदम विदर्भी खरडा झाली आहे. एकदम १००० वोल्टचा झटका देणारे सर्कीट आहे. पण सर्कीटराव, लीहीण्याच्या ओघात दुसरा एक लाख कीलो वोल्टचा महा झटका एका ओळीत लपलेला वाटला. कदाचित माझा वहम असेल. म्हणून इथे चर्चा न कर्ता व्यनी. पाठवला आहे.

आपले शुभ चिंतणारा मनापासून विदर्भी .......

ह्म्म्म्म्म्म

खरेच, ते लक्षात आले नाही. हे शब्द एका बंदिशीतले आहेत. संपादकमंडळाला विनंती करतो त्यात सुधारणा करण्या विषयी.

धन्यवाद.

- सर्किट

हाहाहा

जबरी!!!

+१!

आवडले.
आता पुढले व्यक्तिचित्र कधी?
(स्वगत: वा! काय बरं वाटलं!! कधीपासून हा प्रश्न विचारायला तडफडत होतो!!!!!Smile)

आपला,
पिवळा डांबिस

प्राध्यापक ?

आता पुढले व्यक्तिचित्र कधी?

डिपेण्ड्स. तुमचे अजून काही प्राध्यापक उरले आहेत का ? त्यांचे चित्रण आल्यावर, मग आमचा कल्हईवाला तयार आहे. (रसायनशास्त्राशी जवळचा संबंध, दुसरे काय ?)

- सर्किट

नकोरे बुवा!

तुमच्यापुढे आम्ही काय लिहिणार!
तुम्हीच लिहीत चला, आम्ही वाचत राहू....
Smile

छान

पाककृती आवडली.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

वाह! वाह !! वाह!!!

जियो सर्किटराव जियो !

जिंकलत तुम्ही...जिंकलत.
क्या बात है!
एक अन् एक प्रसंग अगदी डोळ्यापुढे उभा केलात.

"क्या बताऊ मियां, वो हड्डीभी ऐसी पकती थी, की उस्को चूसते वक्त जैसे वो पंडत चौरासिया की बासुरी के सुर निकलते थे.

वा वा...अशीच एक से एक वाक्यं ह्या लेखाला, चित्रातल्या त्या व्यक्तीला आणि एकुणातच व्यक्तिचित्राला एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवतात.

आजही कुणाचा यमन ऐकताना, कुठल्या वाती वर आणि कुठल्या खाली ते आठवतात. हसूही येतं. रडूही. परमेश्वराने आपल्या आयुष्यात आणलेले हे ष्टो. वाती जळल्या आणि रिपेरला गेले.

अरेरे...
हलक्या फुलक्या व्यक्तिचित्राचा शेवट मात्र तरल करायचं कसब काय जमलंय. आपल्या शिष्यगणांवर भाईकाका काय बेहद्द खुष झाले असतील. वा !!!

(स्वगतः प्रतिसादांचं गणित काय शॉल्लेट आहे बॉ सर्किट गुर्जींचं ! च्यायला, लिहावं का आपणही एखाद्या ईराणी चहावाल्याचं व्यक्तिचित्र ? Thinking )

- (व्यक्तिचित्र लेखकांच्या नव्या फळीतला 'दम'दार शिपाई) ध मा ल.

निव्वळ छळ.....

अरे देवा....काय करावे ह्या माणसाचे?? वाचतांना तर हसून, हसून पोट दुखलेच, पण नंतर आठवून, आठवून हसू येते आहे!!! Rolling On The Floor

(क्रमशः)

विसोर्कीटखान पिवळखेचर
क्रमशः ल्ह्यायचं इसरालात तुम्ही.
पुढच्या भागातः
आवो शेठ बैठो... बौत दिन इदर फिरकेच नै तुम . ग्यासुद्दीन शिवणीत हरवलेली लेंग्याची नाडी शोधत बाहेर आला.
तुमारे वास्ते मै आम्मी के हात की बिर्याणी कलसे रख्खी थी.
ती कोणे एके काळी पिवळ्या रंगाची खानदानी हैद्राबादी असावी आणि कालौघात रंग विरला असावा तशी दिसणारी बिर्याणी
तो खानदानी ऍल्युमिनियम च्या काळसर पांढरट थाळीत घेउन आला.
बैठो शेठ आज खाये बिगर छोडुंगाच नै
आणि मी बिर्याणी खायला बसलो. एक जोरदार खोकल्याची उबळ आली आणि
(क्रमशः)

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

ही

ही बिर्याणीपण पोचली...
... Smile
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मस्त विजुभाऊ..पुढे...

बैठो शेठ आज खाये बिगर छोडुंगाच नै

कोण कुठला हा ग्यासुद्दीन माझ्या ना नात्याचा ना गोत्याचा, ना जातीतला ना धर्मातला पण तरीही मला किती आत्मियतेने आग्रह करत असलेला पाहुन मी गहिवरलो. मंडळी जात धर्म ह्यांना खूप महत्व असलेल्या सनातन ब्राम्हण घरातील मी वाढलो, एका मुसलमानाघरी जेवलो तर काय संकट येईल ह्याची मला चांगली कल्पना होती. पण त्या दिवशी ठरवले साले लोक गेले बा***, आज ग्यासुद्दीनच्या अम्मीच्या हातची बिर्याणी नारींगीचे दोन दोन घोट घेत सर्क्या खाणार! बस्स!!! आणि मग त्यानंतर ग्यासुद्दीनने गायलेला यमन ओहोहो.. मंडळी ग्यासुद्दीनचा तो यमन, त्याच्या अम्मीची बिर्याणी,आमच्या म्हातारीची कढी आणि ह्या सगळ्याला छेद देउन जाणारे ममद्याचे रफीचे स्वर... जीवन जीवन म्हणजे तरी दुसरे काय आहे हो?

जीवन जीवन !!!

जीवन जीवन म्हणजे तरी दुसरे काय आहे हो?

कोलबेरपंत,

ह्या पाककृतीचा आपला अभ्यास किती सखोल आहे, ह्याची जाणीव होते. येऊ द्या !

- (कोलबेरचा चमचा) सर्किट

विजुभौ !

अहो वाट कसली पाहताय ? आता सुटाच !!!!

- सर्किट

पुढे

बैठो शेठ आज खाये बिगर छोडुंगाच नै
आणि मी बिर्याणी खायला बसलो. एक जोरदार खोकल्याची उबळ आली आणि
कोण कुठली ही माणसं. नात्याची ना गोत्याची. कोणते धागे कुठे विणतील कोणते कुठेजोडतील कुठे उडवतील तोडतील काही सांगता येत नाही
धाग्या धाग्यात असतो तो हाच फरक.
उभे आडवे असतात तेंव्हा वस्त्र बनवतात आणि तिरपे असतात तेंव्हा जाल बनवतात.
ग्यासुद्दीनची अम्मी प्रेमळ होती. मला नेहमी म्हणायची रे बमन्या. तुमकु देख्येच मै पैलीच बार बोली थी ये पोट्टा कुच अलग है.
लोगोपे जाला डालके उन्से कामा करवाता है.
देक ना ग्यासा ने किसकु बी फुकट का राकील/घासलेट दिया नै कब्बी.तुमकु कैसा देताहै क्या मालुम.
ले खा और थोडा खारे. बाहर फेकनेसे अच्चा है किसीके पेट मे जाये.
असे म्हणुन ती मला प्रेमाने आग्रह करुन खायला घालायची.
मला ग्यासुद्दीन च्या अम्मीच्या हातच्या बिर्याणीची आठवण झाली.
पोटात मळमळुन आले .त्यावेळी बिर्याणी खाल्यानन्तर यायचेतसे आत्ताही बिर्याणी न खाताच नुस्त्याच आठवणीनेही ढवळुन आले. म्हणतात ना लहानपणच्या आठवणही आपण जगत असतो.
ग्यासुद्दीनला अम्मी कडुनही गाण्याची परंपरा होती.
ती आळसही सुरात द्यायची.
सकाळ चा आळस भटियार मध्ये कधी कधी उशीर झाला तर भटियार च्या ऐवजी भूप
दुपारच्या झोपेच्या वेळचा आळस वृंदावनी सारंग , कौशी कानडा
आणि रात्री लवकर झोपायचे असल्यास मारव्या त आळस द्यायची
मधुनच ग्यासुद्दीन ला ती हाका मारायची
"मेल्या किदर है रे तू. काना है के भिंताडं" ही तीची हाक साक्षात गौहर जानची ठुमरी ची याद यायची
आम्मी गेली तेंव्हा ग्यासुद्दीन ने अम्मे हः हः हः हः म्हणत फोडलेला गुजरी तोडी तला हंबरडा मला अजून आठवतो.
त्याने वासलेला आ पाहुन अंगावर काटा आला होता.
ग्यासुद्दीन आणि त्याची नेहमी शिवणीत हरवणारी लेंग्याची नाडी आर के लक्ष्मण ने पाहिली असती तर त्याच्या कॉमन मॅन च्या चित्रात दिसणारे ते भुवयांवरचे आणि कानावरचे केस या बरोबर त्याच्या हातात लेंग्याची नाडी ही दाखवली असती.
म्हणतात ना ज्याच्या हाती लेंग्याची नाडी तो जगाते नाडी बरोबरच आहे ते.
एकदा असेच ग्यासुद्दीन शिवणीत हरवलेली लेंग्याची नाडी शोधत होता.
घड्याळात अकराला पाच मिनिटे कमी वाजले होते.
रस्त्यावरुन ग्या......सु अशी रामकलीमधली तीव्र पंचमामधली हाक ऐकु आली.
ग्यासुद्दीन चपापला. त्याच्या कानावर बसलेली माशी सात इंच उडाली.
कोण बोलवते आहे हे पहायला ग्यासुद्दीन पुढे सरकला.
(क्रमशः )

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

आता प्रतिसादही ?

विजुभौ !!

जियो !

आता प्रतिसादही क्रमश: ??

धन्य आहात.

- सर्किट