पुनःप्रकाशितः गुणामामा

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जनातलं, मनातलं
13 Oct 2014 - 11:34 am

(डिस्क्लेमर: काही काळापूर्वी अन्य एक संकेतस्थळ नवीनच जन्माला आलं असतांना त्या स्थळाला शुभेच्छा म्हणून हे व्यक्तिचित्र तिथे प्रसिद्ध केलं होतं. पण त्या स्थळाला दुर्दैवाने म्ह्णावी तितकी लोकप्रियता लाभली नाही. मध्ये बराच काळ ते स्थळ बंदच होतं, आता सुरू झालंय. पण मला तिथे जुन्या पानांत हे व्यक्तिचित्र आढळलं नाही, कदाचित डीलीट केलं गेलं असावं. त्यावर कडी म्हणजे मला आता त्या स्थळावर लॉग-इन देखील करता येत नाही. दुर्दैव!
मुद्दा असा की हे व्यक्तिचित्र तिथे प्रकाशित केलं होतं. आणि एकच साहित्य चार ठिकाणी प्रकाशित करायची पद्धत मला अनुचित वाटत असल्याने या व्यक्तिचित्राला मिळावा तितका प्रकाश मिळाला नाही याची कुठेतरी एक रुखरुख मनात होती. आपल्या सगळ्या लेकींना चांगली स्थळं मिळावीत पण एकाच लेकीला तिची काहीच चूक नसतांना प्रकाश मिळू नये असं झालं की एका बापाला वाटते तशीच रुखरुख!
म्हणून खूप विचार करून आज हे व्यक्तिचित्र इथे पुनःप्रकाशित करतोय. ज्यांनी कोणी हे पूर्वी वाचलं असेल त्यांनी पान उलटावं आणि मला क्षमा करावी. पण बाकीच्यांना सादर प्रणाम!!!)

खूप सालांमागली गोष्ट. मी त्यावेळेस कालेजात जात होतो. बोरीबंदरावरचं सेंट झेवियर कालेज! किरीस्तांव मिशनर्‍यांनी चालवलेलं! त्यातही गोव्याच्या मिशनर्‍यांचा भरणा जास्त!!! कालेजाच्या दुसर्‍या वर्षाची परीक्षा संपलेली. दुसर्‍या वर्षाचा निकाल घेऊन भायेर पडतेवेळी वर्गाच्या व्हरांड्यात पाद्री प्रिंन्सीपलसायबांची गाठ पडली....

"कायरे रिझल्ट कसो लागलो?"
"बरो आसां!"
"मग आता सुटीतलो काय बेत?"
'काय नाय, जरा गावांकडे जावंन येयन म्हणतंय!!"
"आसां? छान, छान! गावाकडे जातलंय तर माझां एक काम कर मारे!"
"काय?"
'मी तुका एक पार्सल दितंय, जरा पिलाराक जावंन पोहोचव मारे!"

गोव्यात पिलार गावात किरिस्तांव पाद्र्यांची धर्मगुरू तयार करायची शाळा आहे. बाकी हे सगळे पाद्री तसे सडेफटिंग! त्यांना बायकोपोरांचा काय त्रास नाय! पण मैत्री करण्यामधे एकदम पटाईत! बहुदा जुन्या दोस्तमंडळींसाठी मुंबयहून कायतरी पाठवायचं असेल!!

"चलांत! द्या तुमचां पार्सल!!", मी. बाकी आणिक मी काय म्हणणार? कालेजाच्या प्रिन्सीपलसायेबाला नाय म्हणायची काय बिशाद आमची?

त्यांचं पार्सल घेऊन घरी आलो तर घरी आईबरोबर तेच संभाषण......

"काय? आता सुटी लागली तर कायतरी कामाचा करशीत का मेल्या अख्खो महिनाभर उगीच भिंतेक तुमड्यो लावंन बसतलंय?", आईच असल्याकारणाने संवाद जरा जास्त लडिवाळ!!!
'कायतरी करीन पण आत्ता नाय, थोड्या दिवसांन!"
"मगे आत्ता काय करतलंय?"
"जरा आजोळाक जावंन येईन म्हणतंय!", मी.

आईने जरा नवलाने माझ्याकडे बघितलं.....
"आसां म्हणतंय? जा बाबा, जावंन ये. तुझ्या आजी-आजोबाक बरां वाटांत! माका तर काय या रगाड्यात्सून उठून जावंक उसंत गावणा नाय, जरा तू तरी जावंन ये. तेंका म्हणा तुमची खूप आठवण येतां...." आईने आपल्या आई-बापाच्या आठवणीने डोळ्याला पदर लावला.....

माझं काम फत्ते!!!! एकदा आजोळी जायला मला आईची परमिशन मिळाल्यानंतर "नको जाऊ" म्हणण्याची चूक करण्याइतके बाबा खुळे नव्हते!!! त्यांची आपली एकच मागणी....

"जातंय तर जा, पण येतेवेळी माकां थोडो काजीचो सोरो घेवंन ये! औषधी असतां!!!!!"
"अहो लहान पोर तो, तेका कशाक आणूक सांगतास? खंय काय गोंधळ झालो मगे?", कनवाळू मातृदेवता.
"काय होवूचां नाय! रे, तुझ्या गुणामामाक सांग वस्तू पॅक करूक!!! तो सगळां बरोबर जमवून आणतलो!!!"
"हो! आणतलो!!! काय पण मेव्हण्या-मेव्हण्यांची जोडी आसां जमलेली!!!! तेवेळी माझ्याऐवजी गुणाजीबरोबरच लगीन करूंचा होतांत!!", आईचा त्रागा.....
"अगो तां सुचलांच नाय ते वेळेक!! आणि तुझ्यासारखी फिगर खंय आसा त्याची?", बाबांचं म्हटलं तर चिडवणं, म्हटली तर आईची समजूत घालणं!! त्यांचं प्रेम हे असंच! जवळ असले म्हणजे वादावादीला ऊत आणि जरा लांब गेले की एकमेकांच्या काळजीने हैराण होणार!!! कुठूनही काय, आम्हां पोरांच्या डोक्याला ताप करायचा!!!!

दुसर्‍या दिवशीच सांजेच्या टायमाला परळ-सावंतवाडी एष्टीची आरामगाडी पकडली! आरामगाडी नुसती म्हणण्यासाठीच हो!!!! आराम तर सोडाच पण एष्टीवाल्याने मेल्याने तीन घंटे उशीराने पोचवली वाडीला (सावंतवाडीला स्थानिक लोकं नुसती वाडी म्हणतांत). महाडच्या जवळ मेल्याचा टायरच बसला. ते सगळं क्रियाकर्म यथासांग पूर्ण होइपर्यंत आम्ही तिथेच!!! तिथून निघाल्यावर सावंतवाडीपासून गावाची एष्टी तासाभराच्या प्रवासासाठी! त्या बसगाडीला मात्र आरामगाडी म्हणायची एष्टीवाल्यांचीसुद्धा हिंमत नव्हती!!!!

गावाच्या बसष्टँडावर उतरलो आणि नेहमीप्रमाणे मुंबयकराच्या भोवती पोरांसोरं जमा झाली. त्यातल्याच येका मुलग्याला पुढे धाडलं....
"जा रे! धावत जावंन गुणामामाक सांग त्येचो भाचो आयलोसा म्हणान!!", त्याला 'कोण गुणामामा' हे सांगायची गरज पडली नाय...

दुसर्‍या मुलग्याच्या डोकीवर बॅग देऊन रस्त्याने दोन फर्लांग चालून आलो तर पाणंदीच्या तोंडाशी गुणामामा हजर!!!!

"अरे आयलो रे, मुंबयचो सायेब आयलो!!! शिंदळीच्या तुझ्या आजोळाक तू इतको विसारलंस!!! शिरां पडो तुजे तोंडार!!!!!" मला आपल्या मिठीत घेत अस्सल इरसाल कोकणी स्वागत!

घरात येऊन पोहोचलो. आजी-आजोबांच्या पाया पडून आणि त्यांच्याकडून कुरवाळून घेऊन झालं. मी त्या बॅग उचलून आणलेल्या पोराला किती पैशे झाले ते विचारलं....

"तू थेट आत जा", गुणामामा गुरगुरला.
"अरे पण तेची हमाली?"
"तू मुकाट आत जा! धू म्हटल्यावर धूवूचा, लोंबता काय म्हणान विचारू नको!!!!! आणि काय रे सावळ्या, मेल्या माझ्या भाच्याकडे पैशे मागतंय, साल्या उपाशी मरत होतंय तेंवा तुका रोजगाराक कोणी लावलो रे? तुज्या आवशीक खावंक व्हरान......"

पुढला संवाद ऐकायला मी तिथे थांबलो नाय.....

दुसर्‍या दिवसापासून माझा कोकणी दिनक्रम सुरू झाला. रोज सकाळी उठल्यावर घरच्या दुधाचा चहा, दहा-साडेदहाला न्याहारी! उकड्या तांदळाची पेज, आजीने केलली फणसाच्या कुयरीची नायतर केळफुलाची मस्त काळे वाटाणे घालून भाजी आणि सोबतीला सुक्या बांगड्याचा घरचं खोबरेल लावलेला तुकडा!!!! अमृत गेलं झक मारत!!!

न्याहारी उरकल्यावर मी आंघोळ करूयां म्हणतोय तर गुणामामाने हाळी दिली....
"रे भाच्या, काय येतंय काय माझ्यावांगडा (सोबत) बाजारात? की पडतंय हंयसरच अजगर होवंन?"
"बाजारात?"
"हां, काय नुस्ते (मासळी) गांवतंत बघूया! आज सोमवार म्हणान माकां काय फारशी आशा नाय, पण तरी बघंया!!"
"अरे पण आज्येचो सोमवार नाय आज? आज नुस्ते कशे चलतीत?", माझी शंका.
"अरे खुळ्या, हंयसर काय तुझ्या मुंबयसारखी एकच गॅसची चूल नाय! तुझ्या आज्येक करां देत तिचा शिवरांक (शाकाहारी) सोवळां स्वयपाकघरात! आपण सुशेगाद (आरामात) परसातल्या चुलीवर नुस्त्याची भट्टी पेटवयांत!!!"

मला ही आयडिया बेहद्द आवडली! साली मुंबयेतपण एक कोळशाची शेगडी आणून ठेवायला हवी, सोमवारी बांगडे भाजायला!!!!

आम्ही बाजाराच्या रस्त्याला लागलो. आमचं घर पुळणीच्या अगदी जवळ आहे. इतकं, की समुद्राची गाज घरात आयकू येते. घरापासून दोन फर्लांगाची वाळूने भरलेली पांदण त्यानंतर मग दोन फर्लांगाचा तांबड्या मातीचा आता खडी टाकून दाबलेला रस्ता आणि मग शेवटी बसथांब्याजवळ बाजार. पाणंदीतून जाताना गुणामामा आमची चौकशी करत होता. माझं कालेज, आई-बाबांची तब्येत, धाकट्या भावंडांचं कौतुक, मुंबयची हाल-हवाल इत्यादि. मी आपला त्याला माहिती पुरवीत होतो. जसे आमी तांबड्या रस्त्याला लागलो तशी रस्त्यावरची वर्दळ वाढली. रस्त्यावरचा प्रत्येक माणूस गुणामामाची विचारपूस करत होता आणि गुणामामा आता प्रत्येकाशी काय ना काय संवाद करत होता. शिव्यांचा जणू नैऋत्य मोसमी मान्सून बरसत होता. मी आपला निमूटपणाने त्याच्यापाठोपाठ जात होतो. त्याचं माझ्यावरचं लक्ष उणावलेलं बघून त्याचं निरिक्षण करीत होतो....

साडेपाच फूट उंची, शेलाटी कोकणी शरीरयष्टी, अंगात एक निळसर हाफ शर्ट आणि मुळातला सफेद पण आता मातीने तांबडा पडलेला पायजमा! गोरा सफेद वर्ण आणि हिरवे डोळे. मुळातले तपकिरी केस कोकणच्या उन्हाने आणखी भुरे झालेले. मनात विचार आला की जर ह्याला सूट टाय चढवला आणि फाडफाड इंग्रजी बोलायला लावलं तर हा युरोपीयन नाय असं म्हणायची कोणाची हिंमतच होणार नाय!!!! शिक्षण तसं फक्त मॅट्रिकपर्यंतच पण वाचनाची तुफान हौस!! सगळ्या मराठी संतमंडळींच्या आणि लेखक-कविंच्या ओळी (त्यातही जास्त शिव्यागाळी!) ह्याला पाठ!!!!! ह्याला कुणाची भीड पडत नाय आणि कुणाला ह्याच्या शिव्या अंगाला टोचत नायत! सगळ्या गावाला माहिती की गुणामामा म्हणजे तोफखाना!!!! अगदी स्वतःच्या बनवलेल्या शिव्यागाळी आणि काव्यपंक्ति!!!!

मला एक जुना प्रसंग आठवला. त्यावेळी आम्ही लहान असतांना एकदा आजोळी आलो होतो. मी सात-आठ वर्षाचा आणि धाकटा भाऊ अगदी तीन-चार वर्षांचा. तेंव्हा गावात संडास झाले नव्हते. सगळी माणसं माडाच्या मुळाशीच बसत. आमी मुंबैत वाढणारी मुलं! आम्हाला त्या रानाचं आणि माडाच्या झावळ्यांच्या वार्‍यावर होणार्‍या आवाजाचं भय वाटे. तेंव्हा परसाकडे जायची पाळी आली की आजी गुणामामाला आमच्या सोबतीला धाडी. तिथेसुद्धा मी तांब्या घेवंन माडाच्या मुळाशी बसलोय आणि ह्याची शिकवणी आपली चालूच!!!

"रे मेल्या, ह्या आत्ता तू काय करतसंय? जरा वर्णन कर!!!!", गुणामामा.
"परसाकडे बसलसंय!!!", माझं लाजून थोडक्यात उत्तर.
"अरे असां नाय! शाळेत जातंस मा तू? मग काव्यात वर्णन कर बघू?" मी गप्प! आता अगदी चांगल्या शाळेत गेलो म्हणून काय झालं? मलविसर्जनाच्या क्रियेचं काव्यात वर्णन कसं करणार मी?
"नाय येणां?", गुणामामा वदला, "अरे असली कसली रे शाळा तुझी? काय्यच शिकवणां नाय पोरांक!!!! आता ऐक...

"सडा शिंपला,
शंख फुंकीला,
दशरथ राजा
घसरत आला......"

मी जोराने हसायला लागलो! इतक्या जोराने की माझा धक्का लागून पाण्याचा तांब्या कलंडला!!! सगळं पाणी त्या वाळूच्या जमिनीत झिरपून गेलं!!!!!

"गुणामामा, माझो तांब्यो उलाटलो! आतारे काय करू मी?", माझा केविलवाणा प्रश्न....
"काळजी करा नुको! ही घे नागवेलीची दोन पानां!!", पोफळीवर चढलेल्या नागवेलीची दोन विडयाची पानं माझ्या हातात देत मामा म्हणाला,
"रोज आमी गाववाले तांबडो विडो बनवतोंव, आज तुमचो मुंबईकरांचो पिवळो विडो!!! जा, तुझ्या आजोबाक नेऊन दी!!!"

मला त्या आठवणीने आताही हसू आवरेना. तोवर आम्ही बाजारात पोचलों. बाजार नुकताच भरत होता. कोकणातले मासळीबाजार साडेदहा-अकराच्या आत भरतच नाय. नुस्ते नुकतेच रापणीवरून येत होते. कोळणी बायकामाणसां ते पाण्याने साफ करून फळीवर मांडत होती. गुणामामाने एक चक्कर टाकून अवघ्या बाजाराचा अंदाज घेतला आणि मग एका कोळणीसमोर जाऊन उभा राहिला......

"काय गो शेवंत्या! काय ताजे नुस्ते हाडलंस आज की सगळो आयतवाराचो (रविवारचा) शिळो माल?", सगळ्या बाजाराला ऐकू जाईल अशा आवाजात गुणामामा विचारता झाला.....

"कायतरी काय गुणामामा! बघ सगळो ताजो माल आसां"
"काय देतंस?"
"बघ खापी आसंत, बांगडे आसंत, सौंदाळे आसंत....."
"अगो माझो हो भाचो मुंबयसून इलो आसां." मामा गरजला, "तेका काय हो कचरो खावंक घालू? मगे परत गावाचां तोंड तरी बघात काय तो?"
"थांब हां जरा, पाटयेत बघान सांगतय!...... ही बघ विसवण (सुरमई) असां! चलांत?"
"हां चलात! नशीब, माशे पागणार्‍या घोवाची लाज राखलंय!!! काय भाव घेतलंय?"
"पन्नास रुपये!!!"
"पन्नास रुपये? आगो काय विसवणीचो भाव सांगतंय की तुझो?"

अरे माझ्या देवा मंगेशा! मला वाटलं की हिथे आता महाभारत पेटणार!!!! एका कोळणीला हा प्रश्न? आता ही कोयता काढून भर बाजारात गुणामामाला खापलणार!!! मी तर भीतीने पार गारठून गेलो.......

पण तसं कायच घडलं नाय......

"काय मेल्या गुण्या, तुज्या तोंडाक काय हाड? अरे मेल्या त्या धाकल्या झिलग्यासमोर बोलतांना तरी काय जरा लाज बाळग!", शेवंत्या कोळीण मग मला म्हणाली,
"काय बाबा, मुंबयच्या शाळेत जातंस?"
"हां, कालेजात जातंय", माझं काळीज अजून धडधडत होतं.......
"जा बाबा जा! भरपूर शीक! तुज्या या इकाळ्या पावसाच्या मामाच्या वळणावर जाव नको!! तो मेलो आसलोच आसां, शिंदळीचो!!! आवशी-बापाशीन लगीन नाय केला हेचा वेळेवर आनि आता आमकां तरास आणतां!! गावउंडगो मेलो!!!

मला वाटलं की ब्रम्हचारी मामा आता याच्यावर कायतरी स्वत:चा पावशेर ठेवील, पण तो नुसताच हसला......

आम्ही बाजार घेऊन घरी येतेवेळी मी मामाला म्हटलं,
"रे मामा, कित्याक रे उगाच त्या कोळणीक असो बोललंय? तिणां तुजावांगडा भांडाण केला असता भर बाजारात मगे?"
"अरे तसां नाय!", मामा हसून म्हणाला, "अरे माझ्या ओळखीची आसां ती शेवंता! आमी प्राथमिक शाळेत एकाच वर्गात होतोंव!! तेची आउस आन तुजि आजी, जुनी ओळख आसां!! पुढे ती तिच्या धंद्यात गेली कोळणीच्या!!"
"आणि तुमी तुमच्या धंद्यात!! बामणकीच्या!!!" मी.
"बामणकीचो कसलो धंदो?"
"होच! गावभर फिरान शिवेगाळी करूचो!!!" मी.
माझ्या डोक्यावर टप्पल देत गुणामामा खळखळून हसला, "व्वा!! माझो भाचो शोभतंस बघ!!!!"

कर्म माझं!!!!! या गाववाल्यांच्या भानगडीमधे जो मुंबयकर पडेल ना तो येडझवा!!! मी मनात खूण बांधली.....

थोड्या दिवसांनी मी माझा पिलारला जायचा प्लान जाहीर केला. गुणामामाला जरा बाजूला घेऊन बाबांची फर्मायशही सांगितली.....

मामा कधी नव्हे तो गंभीर झाला.....
"तुजो बापूस म्हणजे जरा चक्रमच आसां रे!!! तुका लेकराक ह्या काम करूक सांगितलां? आणि ताई बरी तयार झाली!!!"
"नाय म्हणजे आई नुको म्हणा होती. तेंव्हा जर केलां नाय काम तर काय घरी जास्त ओरडो बसूचो नाय!!"
"तसां नको, बघू कायतरी मार्ग काढतंय!!", मामा म्हणाला....

दुसर्‍या दिवशी गुणामामा मला म्हणाला,
"अरे आसां कर, तुजो पिलाराक जावचो प्लान अगदी शेवटांक ठेव. मी तुका माझ्या फटफटीवरून घेवंन जातंय. तुझां पिलारचा काम करूयात, तुझ्या बापसाचो नेवेद्यही घेवयांत आणि मग मी तुका थंयसूनच लग्झरी गाडियेत बसवून दितंय थेट मुंबयसाठी!!! निदान एष्टीचे धक्के तरी बसूचे नाय तुका, जरा आरामाचो प्रवास होयत!!!"

मग सुट्टीच्या शेवटी आम्ही दोघं मामाच्या मोटारसायकलवरून पिलारला जायला निघालो.....

नेहमीचा मुंबय-पणजी हायवे सोडून गुणामामा तेरेखोलच्या दिशेन निघाला. मला रेडीचं बंदर दाखवून झालं. तिथून मॅगनीजचं खनिज वाहून नेणारी जहाजं दाखवून झाली. तेरेखोलचा किल्ला दाखवून झाला. मामा आणि त्याच्या सौंगड्यांनी (गुणामामा स्वातंत्र्यसैनिक होता!) तो किल्ला पोर्तुगीजांकडून लढून कसा मिळवला ती गोष्ट मला हजाराव्यांदा सांगून झाली.....

"पळाले रे शिंदळीचे, पळाले!!! साल्यांनी पाचशे वर्सां राज्य केलांन पण आमच्याबरोबरच्या एका दिवसाच्या लढाईत पळाले!!!", मामाच्या आवाजात सार्थ अभिमान होता.....

"पण आपल्या भारत सरकारान या किल्ल्याची कायसुद्धा काळजी घेवंक नाय रे!", मामा विषादाने म्हणाला, "बघ कसे चिरे ढासळतसंत समुद्राच्या पाण्यान!!! ह्यां नेव्हीचां एक चांगला आऊट्पोस्ट होवू शकलां नसतां काय? अरे पोर्तुगीज काय खुळे नाय होते या जागी किल्लो बांधूक! सात समुद्रविजेते ते!! म्हटलो तर समुद्रावर पण खुल्या समुद्रापासून सुरक्षित अशी जागा असां रे ही! पण आपले राज्यकर्ते सुक्काळिचे दिल्लीवाले!! तेंका समुद्राचा महत्त्व काय माहिती?"

"चल जावंदे!!"
"जावंदे तां झालांच!! कधीकधी आपल्या सरकाराची अशी करणी बघून असां वाटतां कि आमी ह्याच्यासाठीच लढलो काय?"

मी विषय बदलून मामाला परत मोटारसायकलीवर बसवलं. आमी पिलारला पोहोचलों! मी प्रिंन्सिपलसायबांचं पॅकेट त्यांच्या मित्राच्या हवाली केलं. त्यांना खूप आनंद झाला. आम्हाला जेवूनच जायचा आग्रह करीत होते. पण मामाचं मन काही तिथे लागेना.

"काय नायतर काय तरी बैल-डुकरां खावंक घालतीत आमका!!!", बाहेर पडल्यावर मामा मला म्हणाला....
"कायतरी काय मामा! किरिस्तांव झाले म्हणान काय झालां? तुझ्याइतकेच ते पण कोकणी आसंत!!! नुस्ते खावंक घातले आसते फक्त!!" मामा हसला....
"चल आता पणज्येक माझ्या मित्राकडे जावंया!! तुकां अशी मस्त मासळी खावंक घालतंय की तुझां कालिज झाल्यावर तू गोव्यातच येवंन रवशीत!!!"

आमी पिलाराहून पणजीला आलो. वाटेत पणजीच्या बाजारपेठेत मामा थांबला.

"ऊन बरांच झालांसा, जरा थोडी लिंबा घेवंन जावयां, मस्त लिंबाचा सरबत पिऊ जेवच्याआधी!" आम्ही एका लिंबवाल्याच्या गाडीकडे आमचो मोर्चा वळवला. मामाने एकेका हातात चार अशी आठ लिंबं घेतली. निरखून बधितली. नाकाशी धरून मस्त वासबीस घेतला.......

"काय हो? चांगली आहेत का ही लिंबं?", मागून आवाज आला. उच्चार अगदी स्वच्छ शहरी आणि सानुनासिक!! बघतों तो शर्ट-पँट घातलेला एक मधमवयीन माणूस. बहुदा मुंबय किंवा पुण्यातला चाकरमानी असणार. गोव्यात टूरिस्ट म्हणून आलेला!!! गुणामामाला लिंबाच्या क्वालिटीबद्दल विचारीत होता....

"त्यालाच विचारा", लिंबवाल्याकडे निर्देश करून मामा उत्तरला......
"त्याचं सोडा हो, मी तुम्हाला विचारतोंय, तुम्ही सांगा!!", ह्या शहरी लोकांना कुठे थांबायचं ते कळतच नाय!!!!!

मी गुणामामाकडे नजर टाकली, त्याचा चेहरा हिंस्र झालेला.....

"ही लिंबं ना! मस्तच आहेत!", दशावतारातल्या रावणाचा आवाज काढत मामा म्हणाला, "मूठ मारण्यासाठी मला फारच उपयोगी आहेत ही!!!! हॉ, हॉ, हॉ, हॉ, हॉ!!!!"

तो चाकरमानी जागच्या जाग्यावर झेलपाटला. त्याच्या धक्क्याने ती लिंबाची रास ढासळली.......
सगळी लिंबं रस्ताभर पसरली....
तो लिंबावाला त्या चाकरमान्याच्या पाठीमागे लागला....
आधी तो चाकरमानी त्या लिंबावाल्याचा मार खाणार, आणि नंतर त्याची बायको त्याचं बिरडं बनवणार.....

लिंबवाल्याच्या अंगावर घेतलेल्या लिंबांचे पैशे टाकत आणि पुन्हा दशावतारी हसत आम्ही आमच्या रस्त्याला लागलो.......

मामाच्या मित्राच्या घरी गेलो. लिंबाचं सरबत झालं, वहिनीने केलेलं मासळीचं जेवण झालं......
माऊलीच्या हाताला काही निराळीच चव होती. आजतागायत विसर नाय पडला त्या चवीचा!!!!

जेवण करून मुंबयची बस पकडण्यासाठी आम्ही बेतीच्या बसस्टँडावर आलो. आता पूल पडल्यापासून पणजीहून मुंबयच्या बसेस सुटत नायत, मांडवी नदी पार करून बेतीला यावं लागतं....
मामाच्या एका ओळखीच्या लग्झरीवर माझं तिकीट काढलं. बस सुटायला वेळ होता म्हणून जवळच एका झाडाखाली मला बसवून मामा "आत्ता येतंय!" म्हणून कुठेतरी गेला....

मासळीचं जड जेवण माझ्या डोळ्यांवर येत होतं! मी तिथेच जरा लवंडून डोळे मिटले......
मधेच जाग येऊन जरा डोळे किलकिले करून बघितलं तर दूरवर गुणामामा एका गावड्याच्या पोराशी कायतरी बोलत होता....

मी परत डोळे मिटले....

तासांभराने बसची वेळ झाली म्हणून मामाने मला जाग आणली. खिडकीच्या सीटवर बसवून दिलं आणि आपण बसच्या बाहेर उभा राहून माझ्याशी गप्पा मारू लागला....

"पुन्हा लवकर ये, आमकां विसरां नको! पुढल्या टायमांक तुझ्या आवशी-बापाशीकपण घेवंन ये!!!"
"हां मामा! अरे पन मामा, तां बाबांचा काम रवलांच!"
"हां तां नाय जमूक! तुझ्या बापाशीक सांग यावेळेस नाय जमूक म्हणां!! नंतर कधीतरी बघंया!!!!"

तितक्यात बस सुटली....

खिडकीतून येणार्‍या गार वार्‍यावर मी पुन्हा डोळे मिटले. प्रायव्हेट गाडी ती!!! सगळया एष्टी गाड्यांना धडाधड मागे टाकत पहाटेच्या वेळेसच मुंबईत येवून पोचली......

घरी पोहोचलो. आईला तिच्या माहेराची खबरबात दिली. आजीने धाडलेले सोलं, सुके बांगडे, तिरफळं वगैरे वस्तू तिच्या ताब्यात दिल्या. बाबांना त्यांचं काम जमलं नाय म्हणून सांगितलं. ते थोडेसे हिरमुसले पण काय बोलले नाय....

स्वच्छ आंघोळ करून आणि आईने केलेलं सांबारा-भात खाऊन जरा आराम करायला म्हणून पलंगावर आडवा झालो.....
तर तितक्यात दारावरची बेल वाजली.....

धडपडत उठुन दार उघडलं आणि माझ्या डोळ्यावर माझा विश्वासच बसेना.......

तो पणजीला दिसलेला गावड्याचा पोर दारात उभा!!!!!

"गुणामामांन ह्या औषध दिलानीत पोचवूक!!!" माझ्या हातांत एक पिशवी देत तो आल्यापावली परतला...
"अरे जरा बस तरी!"
"नाय, माकां दमणाक जावंक व्हया!!!"
"काय रे, कोण आंसा?" चाहुल लागून बाबा पण बाहेर आले....

"गुणामामांन कायतरी पाठवल्यानीत!!", मी पिशवी उघडू लागलो तर काचेवर काच आपटल्याचा किण्-किण्ण आवाज आला!!!! बाबांचा चेहरा आनंदाने फुलला!!!!

"माकां वाटलांच! गुणा माकां निराश करूचो नाय!!! माझो भरवंशाचो वाघ आसा तो!!! मेव्हणो असूचो तर असो!!!" बाबांचा आनंद सोड्यावरच्या बुडबुड्यांसारखा ओसंडून जात होता.....

"वाघ तर खरोच", मी मनात म्हंटलं, "असल्या कामाचो आपल्या भाच्याक काय त्रास होवू नये म्हणान त्या वस्तूच्या किंमतीच्या दसपट गाडीभाडा भरून त्या गावड्याक एस्टीन (म्हणून तर तो माझ्यापेक्षा उशीरा मुंबईला पोहोचला!!!) पाठवून वस्तू तर घरपोच केली. एकीकडे आपल्या भावजींचो, थोरल्या बहिणीच्या घोवाचो, मान तर राखलो पण त्याचबरोबर आपलो भाचो सुखरूप पण राखलो....

"तुमचो मेव्हणो घाला आकाबायच्या चुलीत," मी बाबांना उघड म्हंटलं, "माझो मामा खरो भरवंशाचो वाघ आसां!!!!"
:)

(अजून एक डिस्क्लेमरः या लिखाणातली सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत. कुणाला इतर हयात वा मृत व्यक्तिशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.)

साहित्यिकविरंगुळा

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

13 Oct 2014 - 11:46 am | मृत्युन्जय

मस्तच जमले आहे. फक्त ते " काजीचो सोरो " म्हणजे काय ते कळाले नाही

नन्दादीप's picture

13 Oct 2014 - 12:54 pm | नन्दादीप

अल्प ज्ञानानुसार कदाचित काजू फेणी चा खंबा असावा....

रघुनाथ.केरकर's picture

13 Oct 2014 - 1:29 pm | रघुनाथ.केरकर

काजीचो सोरो म्हणजे काजुची फेणी

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Oct 2014 - 11:57 am | बिपिन कार्यकर्ते

खणखणीत! तेव्हाही वाचले होते.

पिडांकाका, तुमचं नाव बोर्डावर बघून आनंद झाला हे अंडरस्टेटमेंट आहे. :ड

विनायक प्रभू's picture

13 Oct 2014 - 4:53 pm | विनायक प्रभू

:तथदधन

इरसाल's picture

13 Oct 2014 - 12:11 pm | इरसाल

कमीत कमी जुने का होईना पण वाचायला मिळाले हे कमी नाही.
बरं ते मागच्या विनंत्यांचे काय झाले.

सौंदाळा's picture

13 Oct 2014 - 12:12 pm | सौंदाळा

मस्तच. तुम्ही लिहीलेल्या सगळ्या गावातुन बर्‍याचदा गेलो आहे.
सुरुवातीला वाटल पिलारला जाउन पार्सल देताना गुणामामा काहीतरी मज्जा करकरणार.
एकंदरीत खुप धमाल आली गुणामामाची करामत वाचुन.
मासळीमधे माझे सदस्यनाम आल्यामुळे तुम्हाला पेश्शल धन्यवाद.
देव करो आणि लवकरच तुम्हाला कोकणचा सौंदाळा, मुडदुशे, शतकं खायला मिळो ;)

एस's picture

13 Oct 2014 - 12:14 pm | एस

परवाच पुन्हा एकदा वाचले होते. मस्त. आता नवे काहीतरी लिहा इथे. प्रतिसाद देण्यासाठी आवर्जून लॉगइन करावे असे लेख कमी असतात. हा त्यातला एक.

जेपी's picture

13 Oct 2014 - 12:30 pm | जेपी

असच बोलतो.
दोन दिसापुर्वी खव उचकत फिरत असताना मनतंरग सापडल आन आज पुर्नवाचनाचा आनंद मिळाला.
ह्यो लेख आवडला.

प्रभाकर पेठकर's picture

13 Oct 2014 - 12:35 pm | प्रभाकर पेठकर

रसाळ कोंकणी (गोव्याची) भाषा, मायेने ओतप्रोत गणगोत आणि वाक्यावाक्याला उत्कंठा वाढवणारे, माशांच्या कालवणाच्या वर्णानाने तोंडास पाणी आणणारे धावते कथानक (काजू फेणी आवडत नाही). लेखकाबरोबर प्रत्यक्ष त्यांच्या आजोळात फिरुन आल्याचा अप्रतिम आनंद झाला. अभिनंदन.

विटेकर's picture

14 Oct 2014 - 5:32 pm | विटेकर

तुडुम्ब खूष !!!!!

अति खणखणीत. दाद देण्यापुरती तरी कोंकणी यावयास पाहिजे होती असे वाटायला लावणारे.

रघुनाथ.केरकर's picture

13 Oct 2014 - 1:32 pm | रघुनाथ.केरकर

विशेषता तळ्कोकणा बोलली जाते....

मज्जा अाहे लेखणीत तुमच्या,पिडांकाका!!
बिकांच्या प्रतिसादाशी शंभर वेळा सहमत!!

शिद's picture

13 Oct 2014 - 2:01 pm | शिद

मस्तच लेख. आवडला.

"रोज आमी गाववाले तांबडो विडो बनवतोंव, आज तुमचो मुंबईकरांचो पिवळो विडो!!! जा, तुझ्या आजोबाक नेऊन दी!!!"

=))

कृपया लेखणी आता थांबवू नका. और आने दो.

मदनबाण's picture

13 Oct 2014 - 2:13 pm | मदनबाण

सुरेख ! फार आवडले ! :)

आपले राज्यकर्ते सुक्काळिचे दिल्लीवाले!! तेंका समुद्राचा महत्त्व काय माहिती?"
जबराट ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारण

प्रभो's picture

13 Oct 2014 - 2:44 pm | प्रभो

मस्त!!!

पिवळा डांबिस बघान धागो उघडलो, सार्थक झाला !! ;)

यशोधरा's picture

13 Oct 2014 - 7:16 pm | यशोधरा

मस्त!

दिपक.कुवेत's picture

13 Oct 2014 - 7:39 pm | दिपक.कुवेत

कथानक अगदि समोर घडतय असं वाटतं होतं. मस्तच.

बोका-ए-आझम's picture

13 Oct 2014 - 8:47 pm | बोका-ए-आझम

अप्रतिम. अंतू बर्वा नंतर हे एक अस्सल व्यक्तिचित्र! अशांची series का नाही चालू करत? फार मस्त होईल!

आदूबाळ's picture

13 Oct 2014 - 9:27 pm | आदूबाळ

जबरीच की हो!

एक खऊट सूचना करू का? उद्गारचिह्नांचा अतिवापर खटकला. टाळलं तर चार चांद आणखी लागतील.

बहुगुणी's picture

13 Oct 2014 - 9:38 pm | बहुगुणी

पुन्हा वाचून तितकाच आनंद मिळाला, धन्यवाद!

श्रीरंग_जोशी's picture

13 Oct 2014 - 11:34 pm | श्रीरंग_जोशी

असं काही अनेक वर्षांनंतर पुन्हा वाचायला मिळालं की वेगळंच आंतरिक समाधान मिळतं.

नंदन's picture

14 Oct 2014 - 11:17 pm | नंदन

आधी वाचलं होतंच, पुन्हा वाचून तितकाच आनंद मिळाला, धन्यवाद!

तंतोतंत!

बाकी गोव्यातून महाराष्ट्रात येताना सीमेवर, मुंबयला जाणार्‍या लक्झरी गाड्या थांबवून दारूतपासणी होत असे ते आठवलं.

मुक्त विहारि's picture

13 Oct 2014 - 11:09 pm | मुक्त विहारि

छान व्यक्तिचित्रण...

खटपट्या's picture

14 Oct 2014 - 1:31 am | खटपट्या

मस्तच रें डांबीस झीला !!
अजुन येवदेत गजाली !!

मालवणी की कोंकणी काय असेल ती समजत नसली तरी प्रत्यक्ष चित्र उभं राहीलं.
खूपच छान लिहीलंय. आरामात -सुशेगात वाचायचं म्हणून येगलं ठेवलेलं. सार्थ ठरलं.

नवं नवं लिहा की पिडां मालक.

किसन शिंदे's picture

14 Oct 2014 - 3:04 am | किसन शिंदे

अप्रतिम उतरलंय व्यक्तिचित्र, पहिल्यांदाच वाचलं. गुणामामासोबत, ते गाव, तो मासळी बाजार सगळं अगदी डोळ्यासमोर उभं राह्यलं. भाषाही फार रसाळ!!

सखी's picture

14 Oct 2014 - 11:52 pm | सखी

जबराट पिडां काका. अप्रतिम उतरलंय व्यक्तिचित्र,हे आणि असच म्हणते.

रामपुरी's picture

14 Oct 2014 - 4:13 am | रामपुरी

भाषा आवडली

पहाटवारा's picture

14 Oct 2014 - 5:45 am | पहाटवारा

आधीहि वाचले होते .. आता परत फुरसतीने वाचले, चाखत चाखत !
पिडांकाकां, येत र्‍हावा बाबानू बोर्डांवरं..
-पहाटवारा

पैसा's picture

14 Oct 2014 - 2:08 pm | पैसा

पुन्ना वाचलां. तितक्याच मस्त!

पिलीयन रायडर's picture

14 Oct 2014 - 2:22 pm | पिलीयन रायडर

कोंकणी बोलता यायला पाहिजे हो... काय गोड भाषा आहे...
लेख तर फक्कडच!!

हो अगदि बरोब्बर...शीव्या घातल्या तरी त्या कानांना गोड वाटतात. ईनफॅक्ट शीव्यांमधे पण एक आपूलकि जाणवते.

तात्पुरती कोकणी शिकायला हे, हे आणि हे वाचा...आणि क्लासेस पुन्हा सुरु करायचा जोरदार आग्रह करा. ;)

बॅटमॅन's picture

14 Oct 2014 - 3:02 pm | बॅटमॅन

अन त्याचबरोबर मालवणी आणि कोकणी यातला फरक सोदाहरण स्पष्ट करा किंवा तसे करणारा एखादा धागा काढा असे सुचवतो. कोकणी ही मराठीची बोलीभाषा नसून स्वतंत्र भाषा आहे हे माहितीये. पण मालवणी ही बोली की भाषा? बरे ते एक असो, किमान मालवणी अन कोकणी या दोन व्हर्जनमधला फरक नक्की कसा ते सांगा अशी रिक्वेष्ट हाय.

पैसा's picture

14 Oct 2014 - 5:25 pm | पैसा

या शन्वारी नक्की लिहिते.

बॅटमॅन's picture

14 Oct 2014 - 5:29 pm | बॅटमॅन

वाहवा! वाचायला मजा येणार निश्चित.

नंदन's picture

14 Oct 2014 - 11:14 pm | नंदन

इलियडचा पुढचे भाग लवकरात लवकर लिहिण्याचे कबूल केल्याशिवाय बॅटमॅन यांना कोणतेही भाषाविषयक लेखन वाचायला देऊ नये, अशी मी संपादक मंडळाला विनंती करतो! :)

शिद's picture

14 Oct 2014 - 11:41 pm | शिद

अनुमोदन. :)

बॅटमॅन's picture

16 Oct 2014 - 4:21 pm | बॅटमॅन

अगायायो....रहम सर्कार रहम!

लिहितो नक्कीच.

चिगो's picture

15 Oct 2014 - 4:54 pm | चिगो

पिडांकाका, खुप सुंदर व्यक्तिचित्रण.. अगदी पुलंच्या "पिकल्या फणसासारखी माणसं ही.."चे प्रत्यय देणारं..

छान छान हो, आणि सुरवातीला मारलेले टोमणे पोचले बरं का ;)