अस्तित्व नसलेला माणूस (दिर्घकथा) भाग - १

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
25 Sep 2014 - 8:24 pm

“कुठून सुरवात करावी?  कुठून ही सुरवात केली तरी तुम्हाला काय फरक पडणार म्हणा.  येथे फक्त फरक पडणारा एकच व्यक्ती आहे आणि तो म्हणजे मी.  कारण ते सगळे आठवून आठवून मला सांगावे लागणार प्रत्येक क्षण, मिनिट, तास, दिवस, महिने आणि वर्षे पुन्हा एकदा जगावे लागणार... तो आनंद, तो त्रास, ती यातना आणि ते अतीव सुख! आपल्या आपल्याच बद्दल खूप विचित्र अश्या कल्पना असतात आणि त्या विचित्र आहेत याची आपल्याला जाणीव देखील नसते.  प्रत्येकाला एक आरंभबिंदू असतो आणि एक त्याची ओळख असते. आणि ती ओळख आयुष्यभर त्याला सावली सारखी साथ देत असते. त्या सावली सोबत त्या व्यक्तीचा मान, सन्मान, त्याची पत जोडलेली गेली असते, सावली तो कोठून आला हे सांगत असते.  ती सावली म्हणजे त्या व्यक्तीने पूर्ण नाव,  अबक,  अमुकचा मुलगा.. आणि तमुक हे आडनाव. त्याचा आरंभबिंदू सांगत असते. पण ज्याला ही सावलीच नाकारायची असेल? ज्याला हे नाव गाव जोडायचे नसेल स्वत: सोबत? सुरवातीपासून सुरवात करतो.. अगदी आरंभबिंदू पासून.

कुठल्यातरी आडवळणाच्या गावातून, शहरात पैसे कमवावे व सुखाने रहावे म्हणून शहरात आलेल्या एका कुटुंबात माझा जन्म झाला. कळेल इतपत मोठा होऊ पर्यंत शहराच्या गर्दीत बाप हरवला, आई सरकारी रुग्णालयात हरवली. कळण्याची जी माझी पहिली आठवण आहे, ती म्हणजे सरकारी रुग्णालयाची कमान आणि त्याच्या शेजारी असलेल्या एका झाडाच्या पारावर मी उघडलेले डोळे. सर्व जग अनोळखी! आणि मी? स्वत:ला देखील अनोळखी! तेथेच राहू लागलो. जे कोणी देईल ते खाऊन, दिवसभर आई शोधणे हे एकच काम मी कित्येक महिने केले. कालांतराने बापाचा चेहरा अंधुक अंधुक होत स्मृतीतून नष्ट झाला व तसाच आईचा पण.  कुठल्याश्या संस्थेला दया आली आणि अंगावर कपडे, रहायला एका खोलीत जागा आणि शिक्षणासाठी म्हणून शाळा आली.

काय म्हणालात? माझे नाव?  नाही माहिती. तशी खूप नावे आहेत. पण खरं नाव मलाही माहिती नाही. आयुष्यभर वेगवेगळ्या नावाने मी सर्वत्र वावरत आलो आहे, एवढी नावे बदललीत की ती आठवून सांगू पण शकत नाही.  कधी बद्री, कधी राजन कधी महेश तर कधी कुमार!  त्यातल्या त्यात मी कुमार नावाने खूप वावरलो, कधी कधी वाटतं हेच माझे खरं नाव असावे का? कदाचित असेल ही.  मी एक बुद्धीमान व्यक्ती आहे! जेथे जेथे जे योग्य वाटेल ते नाव घेतले मी.  नाही, मी गुन्हेगार नक्कीच नाही आहे. मी कधी कुठलाच गुन्हा केला नाही. पोलीस खोटे गुन्हे माझ्या नावावर खपवत आहे. साले, बेहन... स्वारी! फॉर अब्युज लेग्वेज! प्लीज. पण मी कोणताच गुन्हा केला नाही आहे. मी फक्त भटका आहे, मला भटकायला आवडते. चार पैसे जमा झाले की मी शहर बदलतो, नव्या शहरात जातो. हे मला आवडतं! तुम्हाला नाही आवडत?  तुम्हाला पण आवडतं पण तुम्ही ते जमवून आणू शकत नाही मी ते जमवून आणतो एवढाच फरक.  मी नाही फसवले कोणाला. उलट मला माणसेच आवडत नाहीत. त्यामुळे माझे मित्रपण नाहीत ना शत्रू! मी गेल्या कित्येक महिन्यानंतर तर कोणाशी तरी बोलतो आहे. नाहीतर मी नेहमी स्वत:शीच बोलतो. मला माणसांची गर्दी नाही आवडत.

मी काय करतो?  काम! मिळेल ते काम. हवा तेवढा पैसा जमा झाला की पुन्हा तो खर्च करायचा व पैसा संपत आला की पुन्हा काम करायचे. कोणते ही काम.  अगदी गाड्या साफ करण्यापासून मी एखाद्या कंपनीत मेनेजर म्हणून देखील. त्या त्या वेळी जे जे काम मला करायला आवडेल असे वाटत असे ते मी करायचो. मी कुठलाच गुन्हा नाही केला कधी.. अं! एक शक्यतो केला होता.. लहानपणी मी सुधारगृहातून पळून गेलो होतो. त्याच संस्थेने मला सुधारगृहात पाठवले होते, त्यांचे म्हणणे होते की मी धोकादायक आहे म्हणे!  काय केले होते मी? काहीच नाही. मला बाहेर जायचे होते व गार्ड बाहेर जाऊ देत नव्हता. मला राग आला व रागारागाने त्या इमारतीच्या तिसऱ्या मजलावर असलेल्या टेरेसवर गेलो. तेथे वीट होती, मी  वीट त्याच्या डोक्यावर फेकली होती, तो मेला!  थांबू या म्हणता. बरं, मला ही थकल्यासारखे वाटत आहे. थोडे पाणी मिळेल का डॉक्टर?”  - असे म्हणून त्यांने आशेने माझ्याकडे पाहिले.  

******

मी बाजूला असलेल्या नर्सला त्याला पाणी देण्यासाठी सांगितले व  डॉ. पाटील यांच्याकडे सूचक नजरेने पाहिले. त्यांनी डोळ्यानेच बाहेर या असे खुणावले. मी डॉ. पाटील यांच्या मागे मागे त्या रूमच्या बाहेर आलो व दरवाजा बंद केला.“हे प्रकरण आपल्याला वाटते तेवढे, सोपे आहे असे दिसत नाही. पोलिसांनी दिलेले रिपोर्ट पाहिलेत ना, डॉ. अनंत?” डॉ. पाटील काळजीच्या स्वरात म्हणाले. “येस! हे प्रकरण काहीतरी निराळेच आहे. हा खरं बोलतो आहे की खोटे? याचा विचार करतो आहे, कारण पोलीस रिपोर्टमध्ये जे आहे, त्याच्या आसपास देखील याची स्टेटमेंट पोचत नाही आहे. हा तर आपली कथा वेगळीच सांगतो आहे.” डॉ. अनंत नेहमीप्रमाणे आपली मान दाबत म्हणाले.“डॉ. अनंत, आपल्याला अजून एक डॉक्टर लागतील, जे आपल्याला मदत करतील. मी फोन करू का? प्रसिद्ध डॉ. प्रमोद यांना?” डॉ. पाटील असे आपल्या खिश्यातून फोन काढत म्हणाले. डॉ. अनंत यांनी मानेनेच होकार दिला व सोबत पोलीस अधिकारी सूर्यवंशी यांना देखील बोलवा असे सांगून ते आपल्या केबीनकडे निघून गेले.  

दारावर टकटक झाली व दार उघडून दोन व्यक्ती आत आल्या त्याच्याकडे पाहून डॉ. अनंत म्हणाले, “ या या सूर्यवंशीसाहेब,  अरे डॉ. प्रमोद या! स्वागत आहे.” दोघांशी हस्तांदोलन करून त्यांना समोरील खुर्चीवर बसण्यास सांगितले व ते आपल्या खुर्चीवर बसत म्हणाले..“सूर्यवंशीसाहेब, तुमचा पेशंट जरा वेगळीच केस आहे, सायको केस आहे, असे मला वाटत आहे म्हणून डॉ. प्रमोद आणि तुम्हाला येथे बोलावले आहे.”“जरा मला त्याचा रिपोर्ट दाखवाल का?” डॉ. प्रमोदने आपल्या डाव्या हातातील घडाळ्याचा पट्टा जरा आवळून डॉ. अनंतकडे पाहिले व डॉ. अनंत यांनी ताबडतोब आपल्या टेबलावरील एक फाईल त्यांच्या हातात दिली.  डॉ. प्रमोद फाईल पाहू लागले व काहीवेळाने फाईल झाकत सूर्यवंशी यांच्याकडे पाहत म्हणाले.. “इंटरेस्टिंग केस! तुम्ही सुरवातीपासून सांगा, नेमके काय झाले व हा कसा सापडला.”

सूर्यवंशीसाहेबांनी आपला घसा थोडा खाखरला व म्हणाले “ सांगतो, सर्वात आधी म्हणजे आम्ही याला पकडला नाही आहे. तो स्वत:च माझ्या ऑफिसमध्ये येऊन माझ्या समोर उभा राहून मला म्हणाला की साहेब मला तुरुंगात पाठवा की असंख्य गुन्हे केले आहेत आणि शेकडो खून! त्या दिवशी असे झाले.....  “

****

साहेब, हेडऑफिस मधून मोठ्या साहेबांचा दोन वेळा फोन येऊन गेला. मी त्यांना म्हणालो पण की सूर्यवंशीसाहेब एका केसच्या तपासासाठी बाहेर गेले आहेत आल्या आल्या फोन करायला सांगतो.”  सल्युट मारत तो शिपाई बोलला व मी आता आपल्या केबीनमध्ये पोचल्या पोचल्या हेडऑफिसला फोन लावला.. फोनवर बोलत होतो तोच शिपाई धावत आला व म्हणाला “साहेब, बाहेर एक माणूस आला व म्हणतो आहे मी भरपूर खून केलेत मला साहेबांना भेटायचे आहे!”  मी हातातील फोन ठेवला व शिपायाकडे अविश्वासाने पहात म्हणालो “घेऊन या आत त्याला.” तो शिपाई सोबत आत आला, अदबीने मला हेल्लो म्हणून त्याने बोलायला सुरवात केली..“साहेब मला तुरुंगात पाठवा की असंख्य गुन्हे केले आहेत आणि शेकडो खून! तुम्हाला सगळे सांगायला मला वेळ लागेल व मी असा उभ्या उभ्या बोलू लागलो तर माझे पण पाय दुखतील, मी बसू का साहेब. नक्कीच तुम्ही नाही म्हणणार नाही, तर मी बसून घेतो.” असे म्हणून तो खुर्चीवर बसू लागला पण शिपायाच्या मनात काहीतरी शंका आली व तो तडक बाहेर गेला आणि सब कोन्स्तेबल जाधव यांना सोबत घेऊन आला व त्याची झडती घेतली. एक सिगरेटचे पूर्ण भरलेले पेकेट, एक झिप्पो लायटर, काही रक्कम आणि.. एक भरलेले पिस्तुल निघाले!  “साहेब, हेच तुम्हाला द्यायला आलो होतो, आता मी कंटाळलो आहे. एवढे गुन्हे केले, कोणी पकडणे सोडा, साधा माझ्यावर कोणी संशय देखील घेतला नाही आजपर्यंत. मी सरेंडर करतो आहे.” असे म्हणत तो खुर्चीवर बसला.

मी त्याच्याकडे पहातच राहिलो. चांगले कपडे घातलेला, रुबाबदार, वय फार फार तर ४०-४५ असेल, त्यांने कुठलातरी छानसा सेंट पण लावला होता, डोळ्यात एकदम चमक होती, क्लीन शेव्ह चेहर्यावरून सुसंकृत दिसत असलेला हा व्यक्ती माझ्या केबीनमध्ये येतो व मी खुनापासून अनेक गुन्हे केले आहेत असे निर्धास्त होऊन सांगतो आहे... आय एम शोक्ड! मग आम्ही बाकीचे सोपस्कार पूर्ण करायला घेतले, त्याने अनेक गुन्हे आणि त्याचे तपशील सांगायला सुरवात केली आम्ही त्याचा कबुलीजबाब घेत होतो, आणि हा मध्येच अचानक म्हणाला “तुम्ही कोण? आणि आणि.. मला येथे का घेऊन आला आहात?  डू यू नो मी?  मी येथे पोलीस स्टेशनमध्ये काय करतो आहे?  ओह, शीट, माझी आज ४ वाजता मिटिंग होती हॉटेल टेक्सासमध्ये.” आपले घड्याळ पहात तो म्हणाला.  आम्ही सर्व एकदम सपापलो. थोड्यावेळा पूर्वी मी अनेक गुन्हे केले आहेत असे म्हणून सरेंडर झालेला हा व्यक्ती आता एकदम मी येथे कसे म्हणत होता.  मग आम्ही डॉ. अनंत यांना फोन केला.  

******

“ह्म्म्म, सूर्यवंशीसाहेब, त्याचा कबुलीजबाब तुम्ही जो नोंदवून घेत होता. तो आहे की मागवावा लागेल तुमच्या ऑफिसमधून? “ असे म्हणत डॉ. प्रमोद यांनी पुन्हा ती फाईल हातात घेतली. डॉ. अनंत यांनी आपला टेबलाच्या डाव्या खणातून अजून एक फाईल काढली व त्यातील ४-५ पेपर काढत ते डॉ. प्रमोद यांच्या हातात देत म्हणाले “हा त्याचा कबुलीजबाब! म्हणजे त्यांने स्वत: सांगितलेला... कच्चा मसुदा” डॉ. प्रमोद यांनी तो कबुलीजबाब वाचायला सुरवात केली...  

क्रमश:

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

एस's picture

25 Sep 2014 - 8:28 pm | एस

वाचायला सुरवात केली...

आम्हीपण. मस्त जमला आहे हा भाग. पुभाप्र.

( मी पयला :-) )

टवाळ कार्टा's picture

25 Sep 2014 - 8:50 pm | टवाळ कार्टा

अक्षरे गायब कशी करतात?

एस's picture

25 Sep 2014 - 10:46 pm | एस

<font color="white" > इथे लिहा </font>

अर्थात डेप्रिकेटेड एचटीएमएल आहे, पण मिपाला चालतं.

आणि हे एचटीएमएल टॅग इथे पार्स न होता कसे डकवले ते नंतर सांगतो. ;-)

कवितानागेश's picture

25 Sep 2014 - 9:49 pm | कवितानागेश

अजून नीटसं कळत नाहीये.. पुढचा भाग कधी? :)

आदूबाळ's picture

25 Sep 2014 - 10:09 pm | आदूबाळ

जब्री. पुभाप्र.

काउबॉय's picture

25 Sep 2014 - 10:18 pm | काउबॉय

खिळवून ठेवले स्टार्ट टू एंड...

वा मल्टी पर्सनालिटी वा धारप स्टाइल दुसर्या मितितुन टपकलेला असतो

वगैरे क्लिशे टाळले असतिल अशी पेक्षा आहे. सीरियल किलर उन्लिश्ड !

खटपट्या's picture

26 Sep 2014 - 12:55 am | खटपट्या

असेच म्हणतो.
पु. भा. प्र.

पुढील भाग तुम्हीच लिहून टाका :D

संदीप डांगे's picture

25 Sep 2014 - 10:19 pm | संदीप डांगे

येउ द्या!

samandh's picture

25 Sep 2014 - 11:22 pm | samandh

लवकर येउद्या ...

सारिका होगाडे's picture

26 Sep 2014 - 12:32 am | सारिका होगाडे

पुढील भागाची प्रतिक्षा पण नाही करु शकत.

अनुप ढेरे's picture

26 Sep 2014 - 10:25 am | अनुप ढेरे

मस्तं. एखादी एकांकिका वाचतोय/ पाहतोय अस वाटलं.

जेपी's picture

26 Sep 2014 - 10:38 am | जेपी

आवडल.

सविता००१'s picture

26 Sep 2014 - 10:59 am | सविता००१

मस्त आहे. पु.भा.प्र.

कथेची सुरुवात चांगली झाली आहे.
कथेचे पुढील भाग वाचायची उत्सुकता आहे.

विटेकर's picture

26 Sep 2014 - 3:06 pm | विटेकर

असेच म्हन्तो

सौंदाळा's picture

26 Sep 2014 - 7:46 pm | सौंदाळा

+२
उत्कंठावर्धक
पुभाप्र

शिद's picture

29 Sep 2014 - 5:10 pm | शिद

+३

पुढचा भाग कधी?

मृत्युन्जय's picture

26 Sep 2014 - 11:16 am | मृत्युन्जय

दशानन परत लिहिते झाले हे एक उत्तम काम झाले. त्यात परत ही सुरुवात जबरदस्तच पकड घेणारी आहे. पुभाप्र.

प्रणित's picture

26 Sep 2014 - 3:51 pm | प्रणित

पुढील भागाच्या प्रतिक्षेत

आतिवास's picture

26 Sep 2014 - 7:09 pm | आतिवास

वाचते आहे.

बाबा पाटील's picture

26 Sep 2014 - 7:51 pm | बाबा पाटील

जबराट सुरवात..................

जबरी सुरवात...पुभाप्र....

उगा काहितरीच's picture

27 Sep 2014 - 9:19 pm | उगा काहितरीच

मस्त , आता जास्त वेळ न लावता पुढील भाग टाका .

दिपक.कुवेत's picture

28 Sep 2014 - 3:08 pm | दिपक.कुवेत

आता पटापट पुढिल भाग टाका.

जेनी...'s picture

29 Sep 2014 - 10:03 am | जेनी...

लव कर दस्शु काका .. पूढचं लिहा लव कर ...

सस्नेह's picture

29 Sep 2014 - 10:24 am | सस्नेह

रोचक सुरुवात.
पुभाप्र

सुहास झेले's picture

29 Sep 2014 - 1:55 pm | सुहास झेले

व्वा व्वा... जबरीच सुरुवात. लेका ह्यावर मस्त पुस्तक होऊ शकेल की !!

पुढचा भाग लवकर येऊ देत... :) :)

दादा पेंगट's picture

29 Sep 2014 - 5:40 pm | दादा पेंगट

" पुस्तक येऊ शकेल" ह्याला दुजोरा. दोन दीर्घकथा एकत्र करून किंवा एका कथेची छोटेखानी कादम्बरी करता येईल. मनावर घ्याच दशानन साहेब. कथासूत्र आवडले तर एखादा प्रकाशक लगेच तयार होईलही.

अनिल तापकीर's picture

30 Sep 2014 - 12:57 pm | अनिल तापकीर

अप्रतिम खुपच आवडला हा भाग