फाइंडिंग माय !!!

सूड's picture
सूड in जनातलं, मनातलं
14 Sep 2014 - 2:19 am

नुकताच रीलीज झालेला फाइंडिंग फॅनी चित्रपट आणि त्यावर बरंचसं चांगलं ऐकलं होतं. आता हा चित्रपट बघायचाच हे नक्की केलं. सकाळ सकाळ मल्टिप्लेक्स गाठलं, तिकीट मिळेल की नाही ही शंका होती. पण तिकीट मिळालं तेही अगदी वरच्या रो चं!!

राष्ट्रगीत झालं आणि मुव्हि सुरु झाला, दिपीका पदुकोन ने साकारलेल्या अँन्जीने तिच्या सासूला, रोझेलिनाला माय म्हणून हाक मारली आणि मन सपसप मागे गेलं. मागे म्हणजे अगदी बालपणात आणि डोळ्यासमोर आली माय..आता ही माय म्हणजे ईल्डा आत्या आणि बेप्टिस अंकलची आई. माय चा मोठा मुलगा रिचर्ड, संबोधन रिचा!! पण हा रिचर्ड फार कुणाच्या अध्यात मध्यात नाही. बेप्टिस आणि ईल्डा तेवढं लोकांच्यात मिळून मिसळून असत. बॅप्टिस्टचंही संबोधन बेप्टिस. ईल्डाआत्या ही एकच तिचं उच्चारी आणि कागदोपत्री नाव एकच बाळगून होती.

तर ही माय म्हणजे चार साडेचार फूटाच्या आत बाहेरची उंची, एक डोळा थोडा तिरळा आणि त्याने थोडं कमी दिसत असे म्हणून वेगळंच मान वाकडी करुन बघण्याची लकब आणि आजूबाजूंच्या तीन चाळींमध्ये कोणाकडे काय चाल्लंय याची इत्यंभूत माहीती!! गोवा कर्नाटका बॉर्डरवरची कोकणी घरी बोलण्यात. तिला कन्नड पण बर्‍यापैकी येत असे. मराठी बोलण्यावर या दोन्ही बोलींची छाप पडलेलं बोलणं. मला आठवतं तेव्हा पासून मायने कधी स्वयंपाक केलाय किंवा त्याचा कधी तिच्या बोलण्यात उल्लेख आलाय असं दिसलं नाही. आधी पप्पा, म्हणजे तिचे यजमान नोकरी करुन घर सांभाळत असत आणि नंतर सून आली तशी ती जबाबदारी सूनेची झाली.

मायची खास ओळख म्हणजे नवीन जन्मलेल्या मुलांना मालीश करणं, आंघोळ घालणं वैगरे करायला अगदी घरचंच कोणी असल्यासारखं आवर्जून जाणं!! मायने मालीश केली म्हटल्यावर मूल नंतर काटक होणारच असा लोकांचाही समज, त्यामुळे मायने आवर्जून आलेलं सगळ्यांना चालत असे!! पण कधीकधी याबाबतीत माय जरा जास्तच धाडसी होत असे. आमच्या घरातलाच प्रसंग म्हणजे, भाऊ लहान असताना माय त्याचं सगळं करुन घरी निघून गेली आणि नंतर पाह्यलं तर उजव्या पायावर चटका लागल्यासारखं काहीतरी दिसत होतं. नंतर कळलं की धूप घालून धुरी देताना, मायच्या हातूनच ते झालं होतं. लक्षात नाही आलं की कसं सांगावं म्हणून गप्प बसली देव जाणे पण हे कळल्यावर इल्डा आत्या तिला किती बडबडली होती ते ऐकलेलं होतं.

मायची आणखी एक ओळख म्हणजे तिची तपकिरीची डबी, आणि मायच कशाला पप्पांचंही तपकिरीशिवाय पान हलत नसे. माय आणि पप्पा दोघांपैकी कोणीही एक का आजूबाजूला येईना तपकिरीचा एक विशिष्ट दर्प, वास काहीही म्हणा जाणवत असे.

मीपण 'म्हणे' अगदी तीनसवातीन वर्षाचा होईस्तवर रिचर्ड अंकलसोबत सकाळ सकाळ 'कॉफी आणि पोळी' खायला मायच्या घरी जात असे. पुढे रिचर्ड अंकलची बायको, आयरिन आली आणि त्या घरात मी जाणं सोडलं ते जवळजवळ कायमचंच. नंतर दहावीचा निकाल, बारावीचा निकाल असं काही असलं की पेढे द्यायला तेवढं जाणं होई. बेप्टिस अंकल केव्हाच वेगळा झाला होता, त्यामुळे अशी काही बातमी ऐकली की रिचर्ड अंकल तेवढा असे. आयरिन आंटीला काही घेणं देणं आहे का नाही ते कळतच नसे. वर्षासहामहिन्यांनी माहेरी आली की आमच्या घरी पण हजेरी लावणार्‍या इल्डा आत्याचं येणं जाणं पण जवळपास कमी झालं होतं. नंतर कधी काळी माय वारल्याची पण बातमी आली.

माय ची माझ्यापुरती ओळख इतकीच!! बेप्टिस अंकल , इल्डा आत्याशी त्यामानाने जास्त बोलणं चालणं, गप्पा वैगरे झालेल्या. पण आज चित्रपटातल्या पहिल्या पाचेक मिनीटात अँजीने रोझेलिनाला मारलेली माय ही हाक; ह्या माय आणि तिच्या सबंध कुटुंबाशी संबंध असलेल्या ज्या काही आठवणी दडलेल्या होत्या त्या पुन्हा वर आणून गेली. फार दु:ख म्हणता येणार नाही, माय तर गेलीच म्हणा पण आता इतक्या लांब आल्यावर ह्या बाकीच्या हयात व्यक्ती पुन्हा भेटतील का आणि भेटले तरी आम्ही एकमेकांना ओळखू तरी का असे नसते प्रश्न उगाचच उभे राह्यले. माय हयात असेपर्यंत आमच्या घरी पोच होणारा ख्रिसमसचा केक आणि इतर काही पदार्थ हूरहूर लावून गेले म्हणता येणार नाही, पण मनात काहीतरी हललं एवढं मात्र खरं!!

*अत्यंत विस्कळीत लिहीलंय हे मलाही पटतंय. आता विचारच इतके सैरभर आले की तो विस्कळीतपणा लिखाणात पण उतरला.

मुक्तक

प्रतिक्रिया

आता विचारच इतके सैरभर आले की तो विस्कळीतपणा >> पोहोचला.

एस's picture

14 Sep 2014 - 10:34 pm | एस

पोहोचला. असेच म्हणतो.

सस्नेह's picture

14 Sep 2014 - 10:56 pm | सस्नेह

विस्कळितपणातूनही जे काही पोचायचं ते पोचलं.

श्रीरंग_जोशी's picture

14 Sep 2014 - 4:01 am | श्रीरंग_जोशी

तुम्ही गोयंचे का?

नोप!! :) पण काल मुव्ही बघून ही कोंकणीं 'उलय'णारी माय आणि तिच्या घरातली माणसं इतकी आठवली की लिहील्याशिवाय राहावलं नाही.

प्रीत-मोहर's picture

14 Sep 2014 - 7:39 am | प्रीत-मोहर

आवडल.

खटपट्या's picture

14 Sep 2014 - 7:52 am | खटपट्या

आवडल !!!

मुक्त विहारि's picture

14 Sep 2014 - 8:07 am | मुक्त विहारि

असो,

काही तरी हिंदी सिनेमा विषयी असावे, इतकेच समजले.

(निदान इतके तरी समजले, हेच खूप झाले.)

पैसा's picture

14 Sep 2014 - 8:10 am | पैसा

लहानपणच्या आठवणी बहुधा अशाच असतात. कोणाचंच पुरतं चित्र आपल्या मनात तयार होत नाही. आणि त्यामुळेच बहुधा नंतर ही अशी अर्धी राहिलेली चित्रं जास्तच चुटपूट लावून जातात.

धन्या's picture

14 Sep 2014 - 9:14 am | धन्या

सुंदर लिहीलंय.

पिच्चरने बोअर मारल्यामुळे मी मोबिलेशी खेळत असताना आणि वल्ली पिच्चर "अंगठ्याचा देव" नसल्यामुळे चक्क झोपा काढत असताना पडद्यावर जे काही चालू होतं ते पाहून तुझ्या डोक्यातही बरंच काही चालू होतं तर. :)

प्रचेतस's picture

14 Sep 2014 - 9:40 am | प्रचेतस

अगदी अगदी.

म्हणुनच कदाचित मनाचे टाईम ट्रेवलिंग उठून दिसतय.

इनिगोय's picture

14 Sep 2014 - 7:09 pm | इनिगोय

लहानपण हे असंच अनेक तुकड्यांचं बनलेलं मस्त चित्र असतं. छान झालंय. थोडे स्थळकाळाचे तपशील अजून आले असते तर पटकन समजलं असतं.

पुढचा सिनेमा पाहिलास की नाही?

लहानपणातले हे कोलाज अनुभव आवडले,विस्कळीत पणामुळेच प्रभावी वाटलं पण अजुन खुलवता आलं असतं असंवाटताय

अवांतर : बाकी ईतका भिकार पिक्चर दिडक्या मोजुन पहायला गेलात त्याबद्दल दंडवत्स !!!!

वरील अवांतराशी १००% सहमत. अतिशय टुकार चित्रपट.

कविता१९७८'s picture

15 Sep 2014 - 9:37 am | कविता१९७८

सुंदर लेखन,

अनुप ढेरे's picture

15 Sep 2014 - 10:26 am | अनुप ढेरे

चांगल लिहिलय.
चित्रपट थर्ड क्लास. पंकज कपूर अधून मधून स्पार्क दाखवतो तेवढच काय ते चांगलं.

दिपक.कुवेत's picture

16 Sep 2014 - 7:00 pm | दिपक.कुवेत

आवडलं

समीरसूर's picture

17 Sep 2014 - 10:04 am | समीरसूर

आवडला. असे बरेच लोकं असतात. जे सतत आठवणीत राहतात, तेवढ त्यांच्याशी थेट संबंध आलेला नसतो. त्यांचं काय होतं हे खूप नंतर कळतं. काहीही झालं तरी वाईट वगैरे वाटत नाही पण आठवणींच्या अगणित धाग्यांपैकी एक तट्टकन तुटतो हे खरं.

बाकी 'फाईंडिंग फॅनी' मी पण हौसेने बघायला गेलो होतो. शनिवारचा सिटी प्राईडचा रात्री ९ चा शो. २५० तिकीट. बुकमायशोचे ५६ रुपये वेगळे. टोटल ५५६ रुपये. ६० रुपयांच्या लाह्या!!! आणि पिक्चर अत्यंत भिकार, टुकार...काय चाललंय काहीच कळत नव्हतं. कोण कुठे कशासाठी काय करतंय काहीच पत्ता नाही. पेट्रोल काय संपतं, तिथेच चित्र काय काढतात, तिथेच 'जंगल मे दंगल' काय होते, इकडे डिंपल झाडाखाली पसरते काय, पंकज कपूरला गोळी लागून तो कारमधून तलावात थेट तळाशी काय जातो, त्याचा पत्ता कुणालाच नसतो, मध्येच प्रेतयात्रा काय्...लै म्हणजे लैच उच्छाद! कशाचा कशाला संबंध नाही. सगळं असंबद्ध आणि रटाळ...

दीपिका सही दिसली पण! काय तिचे डोळे, काय तिची मान... हसते तेव्हा डोळ्यांमधून चांदणं सांडतं, गालाच्या खळ्या मधाचा मधूर शिडकावा करतात...मन प्रसन्न करणारा तिचा वावर....बाकी सगळं 'होल वावर इज आवर्स, गो अँड डू' असाच पिक्चर होता...

>>दीपिका सही दिसली पण! काय तिचे डोळे, काय तिची मान... हसते तेव्हा डोळ्यांमधून चांदणं सांडतं, गालाच्या खळ्या मधाचा मधूर शिडकावा करतात...मन प्रसन्न करणारा तिचा वावर....बाकी सगळं 'होल वावर इज आवर्स, गो अँड डू' असाच पिक्चर होता...

आता कसं बोल्लात!! कधी नव्हे ती दीपिका आवडली. ;) बाकी मुव्हीत असंबद्ध काही वाटलं नाही हो. बाकी परिक्षण लिहीलंत की बोलू, या धाग्यावर ती चर्चा अयोग्य होईल. असो. :)

कधी नव्हे ती दीपिका आवडली.

ऐसा नक्को बोलो रे, ॐ शान्ति ॐ मध्येही लय आवडली होती.

समीरसूर, ह्या सिनेमावर तुमच्या स्टाईलीत एखादं खंग्री परीक्षण लिहा राव. आमची नम्र विनंती.

काउबॉय's picture

17 Sep 2014 - 11:31 pm | काउबॉय

Being Sirus ने आधीच डोक्याला इतका शॉट लागला होता की हां चित्रपट पहावा हां विचार स्वप्नातही आला न्हवता. आता परिक्षण येउदेच.