गणपती पूजेच्या मागची अवधारणा

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
29 Aug 2014 - 12:27 pm

आज गणेश चतुर्थी, आज बाप्पा आपल्या घरी येतात. १० दिवस आपण बाप्पाची पूजा अर्चना करतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन करतो. आपण बाप्पाची पूजा का करतो या मागची अवधारणा काय? हा प्रश्न मनात येतोच.
ganesh moorti
गणपती किंवा गणाध्यक्ष याचा अर्थ गणांचा अधिपती सोप्या शब्दात म्हणावे तर कुळ, जाती, बिरादरी, राज्याचा किंवा देशाचा प्रमुख म्हणजे गणपती ज्याला जनतेने आपले प्रतिनिधी म्हणून निवडले आहे. वैदिक युगात प्रत्येक गण (कबीला) प्रजातान्त्रिक पद्धतीने आपल्या प्रमुखाची निवड करायचे. विभिन्न गणांचे प्रमुख मिळून इंद्राची निवड करायचे. असो.

आपल्या देशात गणराज्यांचे अस्तित्व बुद्धाच्या काळापर्यंत टिकून होते. मगधच्या राजा अजातशत्रू ने समस्त गणराज्यांच्या विनाश करून मगधचे विशाल साम्राज्य उभे केले. १९४७ मध्ये भारताला स्वतंत्रता मिळाली आणि पुन्हा गणराज्य भारतात पुनर्जीवित झाले. आज देशात प्रधानमंत्रीच्या स्वरूपात आणि राज्यात मुख्यमंत्री गणाध्यक्ष- गणपती कार्यभार संभाळतात.

देशावर/ राज्यात शासन करणाऱ्या प्रमुखाच्या अंगी काय गुण असावे त्याचे स्वरूप म्हणजे बाप्पाची मूर्ती. बाप्पाची मूर्ती शासकाच्या अंगी काय गुण असावे याची आठवण आपल्याला करून देते. बापाचे विशाल मस्तक बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. शासक हा बुद्धिमान असावा. परिस्थितीचे विश्लेषण करणे आणि त्यानुसार निर्णय घेण्याची क्षमता शासकात असावी. अन्यथा काय होते, हे आपण गेल्या ५-७ वर्षांत आपण बघितलेच आहे. बाप्पाचे कान लांब आहेत आणि मुख लहान. अर्थात शासक मितभाषी अर्थात कमी बोलणारा असावा पण ऐकण्याची क्षमता त्याच्या अंगी असावी. वाचाळ लोक दुसर्याचे ऐकत नाही. अश्या लोकांना निवडण्यात काहीच अर्थ नाही. कारण ऐकण्याच्या क्षमतेशिवाय जनतेचे विचार आणि मनोगत काय आहे शाश्काला कसे कळणार? समर्थांनी ही म्हंटले आहे, ‘श्रवणें होये कार्यसिद्धीl श्रवणें लागे समाधीl श्रवणें घडे सर्व सिद्धीl समाधानासीl’(दा.बो. ७-८-८). बाप्पाला लंबोदर ही म्हणतात. बाप्पाचे उदर मोठे आहे. याचा अर्थ शासकाच्या अंगी सर्व काही पचविण्याची क्षमता असायला पाहिजे. एकी कडून मिळालेली बातमी दुसरीकडे सांगितली नाही पाहिजे. अन्यथा सहयोगी मध्येच आपसांत भांडणे होतील. आपले मनोगत मित्र असो वा शत्रू कुणाच्या ही समोर उघड केले नाही पाहिजे. प्रजेच्या कल्याणासाठी स्वत:चे मान-अपमान सर्व पचविण्याची क्षमता असली पाहिजे. बाप्पाची सोंड हत्तीच्या सोंडीप्रमाणे मोठी आहे. आपल्याला माहितच आहे, हत्तीची सोंड मोठ्या मोठ्या वृक्षांना धाराशायी करू शकते त्याच प्रमाणे ती एक छोटी सुई सुद्धा उचलू शकते. तिची वास घेण्याची क्षमता ही अदभूत असते. राज्य प्रमुखाला देश्यात होणाऱ्या लहान-मोठ्या सर्व घटनांची, कुठे काय चालले याची माहिती असायला हवी. शिवाय शेजार-पाजारच्या देशांत आणि जगात काय चालले याची इत्यंभूत माहित ही असायला पाहिचे. अन्यथा केंव्हाही दगा होऊ शकतो. शिवाजीचे राजांचे गुप्तचर विभाग त्या काळी देशात सर्वश्रेष्ठ होते म्हणून ते आग्याांहून सहज परत येऊ शकले. समर्थांनी म्हंटले आहे: ‘जो दुसर्यांचे अंत: कारण जाणे l देश काळ प्रसंग जाणेल त्या पुरुषा काय उणे l भूमंडळीl’ (दा.बो.१४-७-२७).

येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात निवडणूक होणार आहे. प्रजातान्त्रिक पद्धतीने महाराष्ट्रातील जनता राज्याचा प्रमुख निवडणार आहे. श्री गणेशाची पूजा करताना, गणेशाचे किती गुण निवडणूकीत उभे राहणाऱ्या नेत्यांमध्ये आहे याचा विचार करून जनतेने राज्याचा प्रमुख निवडला पाहिजे. असे केल्यास राज्याची भरभराट होईल. प्रजा सुखी आणि समृध्द होईल. पुन: सर्वाना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

समाजआस्वाद

प्रतिक्रिया

कंजूस's picture

29 Aug 2014 - 12:44 pm | कंजूस

पटतंय.

आयुर्हित's picture

29 Aug 2014 - 8:39 pm | आयुर्हित

प्रसंगानुरुप उत्तम विवेचन आणि सर्वांनी नक्किच बोध घ्यावा असे मार्गदर्शन!

धन्यवाद.

vikramaditya's picture

29 Aug 2014 - 8:53 pm | vikramaditya

विवेकजी,

उत्तम विवेचन. गणेशोत्सवाच्या हद्रिक शुभेछा.

विलासराव's picture

29 Aug 2014 - 8:54 pm | विलासराव

लोक यातुन बोध घेतील अशी अपेक्षा.

अविनाशकुलकर्णी's picture

29 Aug 2014 - 9:35 pm | अविनाशकुलकर्णी

हुच्च भ्रु लोक्स मोदकाला "स्वीट मोमोज" म्हणतात...

प्रचेतस's picture

30 Aug 2014 - 10:39 am | प्रचेतस

वैदिक युगात प्रत्येक गण (कबीला) प्रजातान्त्रिक पद्धतीने आपल्या प्रमुखाची निवड करायचे.

गण ही वैदिक संकल्पना नसून अनार्यांची होती.

विभिन्न गणांचे प्रमुख मिळून इंद्राची निवड करायचे

इंद्र म्हणजेच पर्जन्याची शक्तीला दिलेले देवतास्वरूप.

आपल्या देशात गणराज्यांचे अस्तित्व बुद्धाच्या काळापर्यंत टिकून होते.

ह्याला कसलाही पुरावा नाही. उलट बुद्धपूर्व काळचा इतिहास हा बराचसा अज्ञात आहे. आणि अजातशत्रूच्या काळात गणराज्ये नसून जनपदे आणि महाजनपदे होती.

अवतार's picture

30 Aug 2014 - 6:30 pm | अवतार

तसेच वेदांमधील "गणपती" आणि आज पुजला जाणारा गणेश हे वेगवेगळे आहेत. गणेश ही देवता भारत आणि आशिया खंडात कशी प्रसिद्ध होत गेली याचा इतिहास आपल्याला ज्ञात असल्यास जाणून घ्यायला आवडेल.
धन्यवाद .

विवेकपटाईत's picture

30 Aug 2014 - 6:55 pm | विवेकपटाईत

मी एवढेच म्हणेल एकदा ऋग्वेद वाचा. आर्य आणि अनार्य हा प्रकार ही फक्त आंग्ल लोकांची खुळी कल्पना आहे. आर्य नावाची कुठल्याच जातीचा उल्लेख वेदात नाही आहे. ही एक प्रवृत्ती होती. चूक काम करणारे ब्राह्मणांना ही अनार्य/ राक्षस म्हणून संबोधित केले आहे. सर्वाना सभ्य आणि सुशिक्षित बनविणे म्हणजेच कृण्वन्तो विश्वं आर्य.

प्रचेतस's picture

30 Aug 2014 - 8:37 pm | प्रचेतस

वेदांमधला गणपती म्हणजे ब्रह्मणस्पती म्हणजेच बृहस्पती. काही लोक ह्यालाच ब्रह्मा असेही मानतात. गणपती अथर्वशीर्ष जे आहे ते ह्या मूळ ब्रह्मणस्पतीलाच उद्देशून आहे.

५००० वर्षापूर्वी जेव्हा आर्य भारतात आले त्यापैकी काही सिंधू नदीच्या खोर्‍यात वसती करून राहू लागले. तर काही इथल्या मूळच्या आदिवासींमध्ये मिसळून गेले. कालांतराने नदीचा प्रवाह आटल्याने किंवा तत्सम नैसर्गिक आपत्तींमुळे सिंधू संस्कृती नष्ट झाली. अर्थात संस्कृती नष्ट झाली म्हणजे त्यातले जनजीवन नष्ट झाले असे नव्हे. जगण्याच्या आदिम प्रेरणेमुळे (survival instincts) हे लोक दुसरीकडे भ्रमण करत गेले व एक नवीनच वैदिक संस्कृती निर्माण झाली. उत्तरसिंधू काळात साधारण इ.स. २००० वर्षांपूर्वी ऋग्वेद निर्माण झाला. (माझा 'आर्यन इन्व्हेजन थियरी'वर विश्वास नाही.).

हे जे ५००० वर्षांपूर्वी आर्य भारतात आले तेव्हा त्यांनी भारतात हत्ती हा प्राणी पाहिला. ह्यालाच त्यांनी मृगहस्तिन अर्थात 'प्राण्याचा हात' असे नाव दिले. मृग म्हणजे प्राणी किंवा हरिण तर हस्तिन म्हणजे हात. हत्तीची सोंड त्यांना हातासारखीच वाटली.

इथल्या मूळच्या आदिवासींमध्ये पूर्वीपासून प्राणीपूजा प्रचलित होतीच. हत्ती, वानर, व्याघ्र इत्यादींचे मातीचे मुखवटे इथल्या उत्खननांमध्ये सापडलेलेही आहेत. जसे इथले मूळचे अनार्य रूद्र आदि देवता वेदांमध्ये समाविष्ट झाल्या तसेच हत्तींसारखे प्राणीही पुजिले जाउ लागले. अर्थात हत्तींचा समावेश खूप उशिराने म्हणजेच जवळपास इसवी सनाच्या आसपास दैवतांमध्ये होऊ लागला व साधारण चौथ्या ते पाचव्या शतकात गणेशपूजा (आजचे गणेशस्वरूप) अस्तित्वात आली असे रा. गो. भांडारकरांसारख्या साक्षेपी संशोधकाचे मत आहे. पण तेव्हाही गणेश हा विघ्नकर्ताच होता. विनायक ह्या त्याच्या दुसर्या एका नावाचा अर्थही विघ्न आणणारा (obstacle अथवा इmpediment) असाच आहे. ह्याच सुमारास गणेश ही देवता मुख्यतः इथल्या तांत्रिक उपासकांमध्ये अतिशय लोकप्रिय झाली होती ते बहुधा त्याच्या वक्रतुंड, गजमुख अशा स्वरूपामुळेच. सप्तमातृकांसोबत गणेश हमखास आढळतोच.

महाराष्ट्रापुरते पाहायचे झाल्यास कालांतराने गणेश हळूहळू मुख्य देवतांत येऊ लागला. वेरूळच्या लेण्यांमध्ये गणेश हा मातृका तसेच स्वतंत्र अशा दोन्ही स्वरूपात आढळतो तो राष्ट्रकूटांचा काळ. नंतरच्या शिलाहारकाळात कोकणात सुवर्णगणेशाचा मुखवटा घडवला गेला. (दिवेआगरचा सुवर्णगणेश) नंतरच्या यादवराज्यात गणेश मुख्य देवतांत यायची प्रक्रिया घडतच होती. कारण ह्या काळातील कुठलेही मंदिर पूर्णपणे गणेश देवतेला वाहिलेले दिसत नाही. स्वतंत्र गणेश मंदिरे निर्माण झाली ती नंतरच्या काळात. शिवकाळात मात्र गजाननाची मंदिरे दिसतात. पेशव्यानंतर मात्र गणेशाचे प्रस्थ प्रचंड वाढले. अष्टविनायक ह्याच काळातले व तीच परंपरा आजही सुरु आहे.

किसन शिंदे's picture

30 Aug 2014 - 9:18 pm | किसन शिंदे

क्या बात है वल्ली.!

यातले थोडेबहूत माहीती होते आधी, पण आणखी विस्तृतपणे तुझ्या प्रतिसादामुळे कळाले. पेशव्यांच्या काळापासूनच गणपतीची अनेक मंदिरे बांधली गेली आणि गणपतीचे प्रस्थ वाढले याच्याशी सहमत.

अवतार's picture

30 Aug 2014 - 9:46 pm | अवतार

विस्तारपूर्वक आणि अत्यंत नेमकी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !

छान विस्तरुत प्रतीसाद

विवेकपटाईत's picture

31 Aug 2014 - 12:35 pm | विवेकपटाईत

हिस्ट्री चनेल वर आफ्रिकेतून माणसांचा प्रवासावर आधारित मालिका पहिली होती त्यानुसार ५०,००० -६०,००० वर्षां पूर्वी माणूस आफ्रिकेतून आंध्र आणि केरळ तटावर पोहचला. तेथून नदी काठी प्रवास करून महाराष्ट्र किनारपट्टी आणि मग सप्त -सिंधू पोचला. तेथून पुढे एक ब्रांच केस्पिअन पार करून मध्य आशियात आणि युरोप कडे. दुसरी कडे काही लोक इजिप्त मार्गे युरोप आणि मध्य आशिया कडे निघाले. अर्थातच संकृत भाषेतील शब्द युरोपेअन भाषेत सापडतात याचे कारण हे होय. सुमार ११,००० काही लोक पूर्वे कडे प्रवास करत बेरिंग जलसंधी पार करून (त्या वेळी तिथे बर्फ होती). गेल्या वर्षी प्रधान मंत्री मेक्सिकोत गेले होते. त्यांच्या सोबत गेलेल्या एक माझ्या एका सहकर्मीने तिथले काही फोटो मला दाखविले. पहिले तिथे गेल्या वर त्यांना असे वाटले नाही ते भारताच्या बाहेर आहे. दुसरे हॉटेलच्या बाहेर पद्मासन मध्ये बसलेला एका स्त्रीची मूर्ती. तेथील संग्रहालयात सोंड असलेले भारतीय हत्ती. इतर पुराण काळातल्या मूर्त्या पाहून भारतीय प्रभाव जाणविला. निश्चित भारतातून मध्य आशिया - पूर्व सैबेरिया मार्गे अमेरिकेत पोहचलेल्या लोकांनी आपल्या जुन्या स्मृती तिथल्या कलाकृतीत उतरवल्या यात आश्चर्य काय. जसदेव सिंगचे (हॉकी कमेंट्री करणारा) पुस्तक वाचले होते, त्यात मक्सिको ओलम्पिकचे वर्णन करताना त्यांही ही महाभारतावर आधारित एक चित्र ज्यात एक माणसाच्या हातात धनुष बाण आहे, तो एका झाडावर बसलेल्या एक पक्ष्यावर नेम धरीत आहे आणि काही अन्य त्याच्या शेजारी उभे आहे. जसदेव सिंगला ही हे चित्र पाहून आश्चर्य वाटले होते.

ऋग्वेदात येणारा दाशराज्ञ यज्ञ ज्यात राजा सुदास ने इंद्राच्या मदतीने दहा गणांच्या ज्यात इक्वाक्षु वंशीय ही होते. पराजित करून त्याना सप्त-सिंधू प्रदेश सोडून गंगा-यमुनेच्या दिशेने पलायन करण्यास भाग पाडले.
नंतरच्या कळत हे वंश गंगा यमुना तटावर आढळून आले.

ऋग्वेदात सरस्वती नदी दक्षिणी समुद्रात जाऊन मिळते याचे वर्णन आहे याचा अर्थ ऋग्वेदीय काळ १५,००० हजार वर्ष पूर्वीचा नक्कीच आहे. जर आर्य नामक जातीची संकल्पना आपण करतो तर आर्य हेच पहिले आफ्रिकेतून भारतात आलेले पहिले मानव ज्यांनी सप्त सिंधू प्रदेशात निवास केला. सिंधू सभ्यतात ही आपल्याला यज्ञवेदी मिळतात, तेही लोक बैलाची पूजा करणारे होते. फरक एवढाच काही लोक आधी पोहचले काही नंतर. पण सभ्यता एकच होती.

बाळ सप्रे's picture

1 Sep 2014 - 1:29 pm | बाळ सप्रे

गणपती किंवा गणाध्यक्ष याचा अर्थ गणांचा अधिपती सोप्या शब्दात म्हणावे तर कुळ, जाती, बिरादरी, राज्याचा किंवा देशाचा प्रमुख म्हणजे गणपती ज्याला जनतेने आपले प्रतिनिधी म्हणून निवडले आहे. वैदिक युगात प्रत्येक गण (कबीला) प्रजातान्त्रिक पद्धतीने आपल्या प्रमुखाची निवड करायचे

या म्हणण्याप्रमाणे गणपती हे एक पद आहे. मग शंकराच्या हत्तीचे शीर असलेल्या पुत्राची पूजा कशाबद्दल.
गणपती (शंकराचा पुत्र) याची प्रजातान्त्रिक पद्धतीने प्रमुख पदी निवड झाल्याची कुठलीही कथा ऐकिवात नाही.

तसेच डोकं मोठं म्हणजे बुद्धी जास्त, कान मोठे म्हणजे ऐकण्याची क्षमता जास्त, तोंड लहान म्हणजे कमी बोलणारा हे बाळबोध वाटत नाही का??

काहिही बादरायण संबंध जोडून जे चालू आहे ते कसं चांगलं हे दाखवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न !!

काळा पहाड's picture

2 Sep 2014 - 12:44 am | काळा पहाड

तेथून नदी काठी प्रवास करून महाराष्ट्र किनारपट्टी आणि मग सप्त -सिंधू पोचला. तेथून पुढे एक ब्रांच केस्पिअन पार करून मध्य आशियात आणि युरोप कडे.

पराजित करून त्याना सप्त-सिंधू प्रदेश सोडून गंगा-यमुनेच्या दिशेने पलायन करण्यास भाग पाडले.
नंतरच्या कळत हे वंश गंगा यमुना तटावर आढळून आले.

म्हणजे माणूस आफ्रिकेतून निघून व्हाया भारत युरोप मध्ये पोचला आणि मग हाच युरोपियन वंश आर्य म्हणून परत भारतात पोचला? तुमचा काहीतरी गोंधळ होतोय. जर हे लोक वस्ती करत करत वायव्य दिशेने गेले, तर याचा अर्थ इथे गंगा यमुनेच्या तीरावर पण ते अगोदरच असणार. मग आर्यांनी आक्रमणाच्या थियरी चे काय?

विवेकपटाईत's picture

8 Sep 2014 - 11:20 am | विवेकपटाईत

हिस्ट्री चेनेल वर जे दाखविले होते त्यानुसार टिप्पणी होती:

भारतीय गुलाम आहेत आणि त्यांच्यावर विदेशी लोकांनीच राज्य केल आहे ही थियरी आंग्ल लोकांना खपवायची होती. लक्षात ठेवा सर्व भारतीय देवता राम असो वा कृष्ण काळ्या रंगाचेच होते.

२. लोक सौप्या रस्त्याने प्रवास करतात सतपुडा, विध्याचाल, दंडकारण्य सारखे वन असल्यामुळे कदाचित हा प्रवास सप्त सिंधू प्रदेशातून मग उत्तर भारताकडे झाला. वेदांमध्ये तेथील नद्यांना अधिक महत्व आहे.

३. आर्य(भारतीय) लोक कुबड असलेल्या गायी पाळायचे युरोपियन गायींना कुबड नसते, शेतीकामी ते बैल येत नाही. असे बैल फक्त आफ्रिका आणि भारतात सापडतात.(पुढे आशियात) स्पष्ट आहे आफ्रिकेतून भारतात आधी आणि मग युरोप मध्ये केस्पियन सागर ओलांडताना लोक आपल्या बरोबर इथले बैल घेऊन नाही गेले. युरोप आणि मध्य आशियात असले बैल मिळत नाही अर्थात आर्य नावाची कुठली जात भारतात येणाच्या प्रश्नच येत नाही.

पैसा's picture

7 Sep 2014 - 10:12 pm | पैसा

लेख आणि चर्चा वाचली. आर्य भारतात बाहेरून आले की ते आणि द्रविड भारतात आधीपासून एकत्र होते याबद्दल बरीच मते वाचनात येतात, याबद्दल ठामपणे काही सांगता येणार नाही एवढंच आपण ठामपणे म्हणू शकतो!

लेखातील रूपके आवडली.