वाचनीय 'सायकॅमोर रो'

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
28 Aug 2014 - 2:49 pm

नुकतीच जॉन ग्रीशम यांची 'सायकॅमोर रो' ही कादंबरी वाचून संपवली. ही कादंबरी बहुधा २०१३ साली प्रकाशित झाली. मी एका-दोघांच्या हातात ही कादंबरी पाहिली होती. आधी याच लेखकाचं 'अ टाईम टू किल' वाचलं होतं. आवडलं होतं. 'किल' मध्ये अमेरिकेतल्या सुप्त वर्णभेदाचे दाहक चित्रण अतिशय सुंदर आणि ओघवत्या शैलीत केले होते. कादंबरीचा नायक जेक ब्रिगेन्स हा एक तरुण वकील आहे. स्वतः गोरा असूनदेखील माणसांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद असता कामा नये हे त्याचे तत्व असते. त्याच्या फर्मचा दारुडा मालक वैयक्तिक आयुष्यात स्वच्छंदी असला तरी त्याला कृष्णवर्णींयांविषयी आपुलकी असते. 'किल' मध्ये जेक एका कृष्णवर्णीय बापाची बाजू न्यायालयात हिरीरीने मांडतो. हा दुर्दैवी कृष्णवर्णीय एका दुर्दैवी मुलीचा बाप असतो. गुन्हेगारी प्रवृत्तीचे दोन गोरे अतिशय क्रूर पद्धतीने त्या लहानग्या मुलीला करकचून बांधून ठेवून तिच्यावर अनेकदा बलात्कार करतात आणि नंतर तिला फेकून देतात. अतिशय हलाखीत जीवन जगणारे ते कृष्णवर्णीय कुटुंब हादरते. त्या मुलीचा बाप संतप्त होतो. इतक्या वर्षांचा मनात खदखदत असलेला राग उफाळून येतो. गोर्‍यांनी कित्येक दशके कृष्णवर्णीयांवर केलेल्या अनन्वित अत्याचारांमुळे आधीच त्यांचे जगणे कवडीमोल झालेले असते. एखाद्या हिंस्त्र श्वापदासारखे त्या गोर्‍यांनी त्या कोवळ्या मुलीचे लचके तोडलेले असतात. कृष्णवर्णीय माणसे म्हणजे जणू गोर्‍यांची मालमत्ता असून त्यांचा जन्मच गोर्‍यांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्यासमोर लाचारी पत्करण्यासाठी झालेला आहे हा सुप्त संदेशच त्या दोन गोर्‍यांनी त्यांच्या या कृत्यातून दिलेला असतो. मुलीचा बाप पेटून उठतो आणि आरोपींना न्यायालयात घेऊन जात असतांना तो त्यांचा खून करतो. अर्थातच त्याला ताबडतोब अटक होते. जेक ब्रिगेन्स हा एक साधारण वकील असतो. ही कहाणी ऐकून तो अस्वस्थ होतो आणि त्या बापाचा खटला चालवतो. ज्युरींसमोर तो बापाची बाजू भक्कमपणे मांडतो. दरम्यान कट्टर गोर्‍यांची एक छुपी संघटना (क्लॅन) जेकचा मोठा बंगला जाळून खाक करते. जेक, त्याची बायको, आणि त्यांची गोड मुलगी हना यांना सतत धमक्या दिल्या जातात. पण न डगमगता जेक खटला जिंकतो आणि त्या दुर्दैवी मुलीला आणि तिच्या बापाला न्याय मिळवून देतो. वर्णभेदाचे नेमके आणि वास्तवाच्या जवळ जाणारे प्रभावी चित्रण म्हणून 'किल' ची प्रशंसा करावी लागेल.

'सायकॅमोर रो' ही कादंबरी 'किल' चा दुसरा भाग (से॑क्वेल) आहे. कथानक संपूर्णपणे वेगळे असले तरी गाभा तोच आहे, वर्णभेद! 'सायकॅमोर रो' ही १९८७-१९८८ च्या कालखंडात रचण्यात आलेली कादंबरी आहे. म्हणजे आजपासून जेमतेम २५-२६ वर्षे आधी! आणि त्या काळातही वर्णभेद किती तीव्र होता हे या कादंबरीच्या माध्यमातून लक्षात येते. 'किल' चा कालखंड १९८५ मधला आहे. अमेरिकेतले वर्णभेदाच्या समूळ उच्चाटनासाठी घडवले गेलेले यादवी युद्ध १८६१ च्या कालखंडातले आहे. 'गॉन विथ द विंड' या कादंबरीमध्ये लेखिका मार्गारेट मिशेल या वर्णभेदाचा आणि त्यावर आधारलेल्या यादवी युद्धाचा विस्तृत पट मांडतात. पण 'गॉन विथ द विंड' ही कादंबरी प्रामुख्याने स्कारलेट या अल्लड नायिकेच्या वैयक्तिक आयुष्याचा धांडोळा घेते. अमेरिकेतल्या दक्षिण भागात राहणार्‍या कृष्णवर्णीय लोकांवर 'गॉन विथ द विंड' आणि 'किल' आणि 'सायकॅमोर रो' या कादंबर्‍या परस्परविरोधी भूमिका मांडतात. 'गॉन' मध्ये दक्षिणेतील राज्यांमधील गोरे संस्थानिक कृष्णवर्णीयांना (गुलाम असले तरीही) कुटुंबातील समान घटक मानून त्यांच्याशी आपुलकीचे संबंध ठेवतात असे म्हटले आहे. आणि त्यामुळे उत्तरेतील राज्यांनी गुलामगिरीची प्रथा मोडून काढण्यासाठी दक्षिणेतील राज्यांवर केलेले आक्रमण निरर्थक आहे अशी भूमिका 'गॉन' मध्ये दिसून येते. 'सायकॅमोर रो' आणि 'किल' मध्ये मात्र अमेरिकेतील दक्षिणेकडची राज्ये कृष्णवर्णीयांना किती तुच्छ, हीन, आणि क्रूर वागणूक देत असत याचे चित्रण आढळते. आश्चर्य वाटावे अशी गोष्ट अशी की १८६१ पासून अगदी अलिकडे म्हणजे १९८८ पर्यंत वर्णभेद शाबूत होता. किंबहुना तो अजूनही शाबूत आहे. १००-१२५ वर्षे उलटून गेल्यानंतरही हा भेदभाव पूर्णपणे लोप पावलेला नाही. कायद्याने बरीच बंधने आणली असली तरी मनाच्या कुठल्यातरी कोपर्‍यात हा भेदभाव अजूनही धगधगतो आहेच. एक-दोन आठवड्यांपूर्वी फर्ग्युसन या मिसोरी (उच्चार बरोबर आहे की नाही कल्पना नाही) राज्यातल्या वर्णभेदावरून उसळलेल्या दंगलीतून हे स्पष्ट होते. अजूनही अमेरिकेत मोठ्या कंपन्यांमध्ये कृष्णवर्णीय लोकं कमी प्रमाणात आढळून येतात. त्यांची जगण्याची शैली गोर्‍या लोकांपेक्षा अगदी निराळी आहे. एक अदृष्य भिंत अजूनही जाणवते. शिक्षण कमी, गुन्हेगारी जास्त आणि म्हणून कृष्णवर्णीयांची दहशत अमेरिकेत अजूनही जाणवते. एकटे फिरत असतांना कृष्णवर्णीयांचा एखादा गट हल्लागुल्ला करत येत असेल तर धडकी भरतेच. माझा ज्या मोजक्या कृष्णवर्णीयांशी अगदीच नगण्य असा संबंध आला तो मला चांगला अनुभव देऊन गेला. जिथे गरज होती तिथे त्यांनी मला मदतच केली. पण त्यांच्या वागण्या-बोलण्यामध्ये अजूनही रांगडेपण जाणवते. कदाचित त्यामुळे त्यांची भीती वाटत असावी. इतक्या वर्षांमध्ये त्यांच्या देहबोलीमध्ये फारसा फरक पडल्याचे जाणवत नाही. पण हा भेद इतक्या वर्षांनंतरही पूर्णपणे नष्ट झालेला नाही हे वास्तव खरोखर खेदजनक आहे. भारतात जातीव्यवस्थेवर आधारित भेदभाव अगदी संपूर्णपणे नष्ट झालेला नसला तरी सामाजिक आयुष्यात एके काळी जोरकस असणारी भेदभावना बर्‍यापैकी बोथट झाल्याचे जाणवते. वागणे, बोलणे, शिक्षण, सामाजिक आणि आर्थिक स्तर, आरोग्य, सुरक्षा अशा सगळ्याच बाबतीत भारतातील जातीधर्मावर केला जाणारा भेदभाव बर्‍याच अंशी कमी झाल्याचे जाणवते. अलिकडच्या काळात काही प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांनी विषारी फुंकर घालून या भेदाचा वणवा वैयक्तिक लाभासाठी पसरवला आहे हे देखील एक वास्तव आहेच. जातीवर आधारित राजकारण हे भारतातले कटू वास्तव आहे आणि त्यासाठी भारतातले आपमतलबी राजकारणी सामाजिक शांतता आणि सलोखा वेठीस धरतात हे दुर्दैवी आहे. अर्थात अमेरिकेत मुद्दा वर्णभेदाचा आहे आणि भारतात जातीधर्माचा! दोहोंमध्ये फरक असणारच. भारतात वर्णभेद नाही. अमेरिकेत जातीभेद तसा कमीच आहे. मूळ अधोरेखित मुद्दा एकच आहे आणि तो म्हणजे विशिष्ट समुहाने संपूर्ण समाजावर वर्चस्व मिळवण्यासाठी निर्माण केलेल्या भिंती! माणसाने माणसाला माणूस म्हणून वागवणे ही झाली माणूसकी आणि वैयक्तिक मह्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी भेदभावाला खतपाणी घालून समाजाला अस्वस्थ करून सोडणे हा झाला स्वार्थ! दोन्ही माणसाच्या मनात जन्मलेल्या भावना. एक सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी आणि दुसरी माणसामाणसात फूट पाडणारी. जी नि:संशय बरोबर आहे तिचा विजय होणे महत्वाचे. 'सायकॅमोर रो' मध्ये (आणि 'किल' मध्येदेखील) हेच अधोरेखित केले आहे.

'सायकॅमोर रो' ची सुरुवात होते जेकच्या पडझड झालेल्या आयुष्याने. घर जळून खाक झालेले असते. तीन वर्षांपूर्वी जिंकलेल्या एका मोठ्या खटल्याने जेकचे नाव झालेले असते पण आर्थिक आघाडीवर जेक मेटाकुटीला आलेला असतो. विम्याचा खटला सुरुच असतो आणि जळून खाक झालेल्या घराच्या विम्याचे पैसे देण्यासाठी विमा कंपनी टाळाटाळ करत असते. एका अगदी छोट्या अपार्टमेंटमध्ये जेक आणि त्याचे कुटुंब कसेबसे राहत असते. हाती खटले जास्त नसल्याने जेकची आर्थिक आवक खूपच कमी झालेली असते. जेक या ओढगस्तीला वैतागलेला असतो. असेच निराशेने भरलेले दिवस जात असतात आणि एका दिवशी जेकच्या कार्यालयात एक पत्र येते. त्याच्या गावातल्या एका विक्षिप्त गोर्‍या माणसाचे ते पत्र असते. त्या माणसाचं नाव सेथ असतं. सेथ सत्तरीच्या पुढचा असतो. एक-दोन दिवसांपूर्वी सेथने एका झाडाला गळफास अडकवून आत्महत्या केल्याची बातमी जेकच्या लक्षात असते. कँन्सरच्या तीव्र वेदनांना कंटाळून सेथने आत्महत्या केल्याचे त्याने लिहिलेल्या पत्रातून स्पष्ट होते. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या हस्ताक्षरातले हे पत्र आपल्याला यावे याचे जेकला आश्चर्य वाटते. जेक ते पाकिट उघडतो. त्यात एक पत्र आणि सेथचे एक स्वहस्ताक्षरातले दोन पानी मृत्यूपत्र असते. त्यानुसार सेथने त्याच्या संपत्तीचा ९०% हिस्सा त्याची तीन वर्षे अतिशय निरपेक्ष वृत्तीने उत्तम अशी देखभाल करणार्‍या कृष्णवर्णीय लेटी या मध्यमवयीन गरीब मोलकरणीला देण्याची सूचना असते. राहिलेल्या १०% संपत्तीपैकी ५% त्याच्या लहानपणीच पळून गेलेल्या धाकट्या भावाला आणि राहिलेले ५% त्याच्या चर्चला देण्याची सूचना असते. सेथने आपल्या मुलांना म्हणजे एक मुलगा आणि मुलगी यांना एक कपर्दिकही न देण्याची सूचना केलेली असते. त्याच्या पत्रात त्याच्या संपत्तीची त्याच्या इच्छेनुसार वाटणी करण्याची जबाबदारी त्याने जेकवर टाकलेली असते. आपल्या मुलांना एक छदामही देण्यात येऊ नये ही त्याची इच्छा त्याने मोठ्या उद्वेगाने लिहिली असते. इतर कुठलाही वकील या इच्छापत्राच्या अंमलबजावणीच्या कारवाईत सहभागी असू नये असेही त्याने नमूद करून ठेवलेले असते. याशिवाय मृत्यूनंतर त्याचे अंतिम संस्कार कुठे आणि कसे करावेत या सूचनादेखील त्याने लिहून ठेवलेल्या असतात. जेक सेथला कधीच भेटलेला नसतो. एक विक्षिप्त, अतिशय आजारी गोरा म्हातारा म्हणून त्याची गावात ओळख असते. जेकने आधीच्या बलात्काराच्या खटल्यात सर्वस्व पणाला लावून एका कृष्णवर्णीय कुटुंबाला न्याय मिळवून दिला असल्याने सेथचा जेकच्या प्रामाणिकपणावर आणि न्यायबुद्धीवर विश्वास असतो. तसे सेथने त्याच्या पत्रात नमूद केलेले असते. जेक कर्तव्यबुद्धीने सेथच्या संपत्तीचा वकील म्हणून काम सुरू करतो. त्याची अंतिम इच्छा पूर्ण करणे हे आपले कर्तव्य आहे अशी जेकची भावना असते. साधारण एक वर्षापूर्वी सेथने एका नामवंत वकीली फर्ममधून एक टाईप केलेले मृत्यूपत्र तयार करवून घेतलेले असते. त्यात सगळी संपत्ती सेथने आपल्या मुलांना मिळावी अशी तजवीज केलेली असते. कायद्याने स्वहस्ताक्षरातले आणि मृत्यूच्या एक-दोन दिवस आधी केलेले मृत्यूपत्र ग्राह्य असणे तर्काला धरून असते. सेथची दोन्ही मुले त्याच्या या मृत्यूपत्राला न्यायालयात आव्हान देतात आणि आधीचे मृत्यूपत्र दाखल करतात. त्यांचा युक्तिवाद असा असतो की मरतांना सेथला खूप औषधी आणि वेदनाशामके सुरू असल्याने सेथ बहुतांश काल गुंगीत होता. त्यामुळे लेटीने त्याच्या या परिस्थितीचा फायदा घेऊन आपल्याला हवे तसे मृत्यूपत्र त्याच्याकडून करवून घेतले; म्हणजेच सेथचं स्वहस्ताक्षरातलं मृत्यूपत्र हे 'अनड्यू इन्फ्ल्युअन्स' खाली तयार झालेले आहे आणि तो ते मॄत्यूपत्र तयार करतांना सारासार विचार करण्याची क्षमता हरवून बसला होता. म्हणजेच सेथकडे हे मृत्यूपत्र तयार करतांना 'टेस्टामेंटरी कपॅसिटी'चा (म्हणजे पूर्ण विचार करून निर्णय घेण्याच्या क्षमतेचा) अभाव होता.

लेटी ही एक अत्यंत गरीब कृष्णवर्णीय बाई असते. नवरा दारुडा असतो. घरी आई, दोन बहीणी, त्यांची मुले, तिच्या स्वतःच्या मुली, तिच्या मुलींची मुले असा मोठा पसारा असतो. एका अत्यंत छोट्या घरात हे सगळे राहत असतात. अतिशय तुटपुंज्या कमाईवर हा सगळा गाडा लेटी ओढत असते. सेथची काळजी मात्र ती खूप आत्मीयतेने घेत असते. त्याच्या घरातली सगळी कामे करणे, त्याला आंघोळ घालणे, त्याला वेळोवेळी बाथरूमला घेऊन जाणे, सगळी औषधी वेळच्या वेळी देणे, अशी सगळी कामे लेटी पार पाडत असते. हे सगळं इतकं मन लावून करण्यात तिचा अंतस्थ हेतू दूषित असतो असा युक्तिवाद सेथच्या मुलांचा वकील करतो.

न्यायालयात खटला उभा राहतो. साक्षी-पुरावे गोळा करण्याचे कठीण काम सुरु होते. दोन्ही गटातले वकील आपापल्या परीने माहिती गोळा करण्यास सुरुवात करतात. जेकचा हेतू स्वच्छ असतो. त्याला सेथच्या अंतिम इच्छेचा मान ठेवायचा असतो. सेथच्या मुलांचा हेतू अर्थातच सेथची संपत्ती मिळवण्याचा असतो. एका विक्षिप्त आजारी म्हातार्‍याची संपत्ती असून असून किती असणार असा प्रश्न सगळ्यांना पडतो. त्याची संपत्ती मोजण्याचे काम एका निरीक्षकावर सोपवले जाते. दोन घटस्फोटांमध्ये सेथ कफल्लक झालेला असतो हे गावातल्या सगळ्या लोकांना माहित असतं. त्यामुळे जे काही कीडूक-मिडूक असेल ते गाजावाजा न करता वाटून घ्यावे असे बर्‍याच लोकांचे मत असते. एका कृष्णवर्णीय गरीब बाईला ९०% हिस्सा मिळणार म्हणून गोर्‍या लोकांना राग आलेला असतो. आणि शेवटी सेथच्या संपत्तीचा आकडा समोर आल्यानंतर भले भले थक्क होतात. सेथकडे २४ मिलियन डॉलर्सची संपत्ती रोख स्वरुपात असते! शिवाय ८० एकर जमीनदेखील असते! इतकी अमाप संपत्ती त्या संपूर्ण कांऊंटीमध्ये कुणाकडेच नसते. आणि या संपत्तीचा ९०% हिस्सा लेटीसारख्या क्षूद्र कृष्णवर्णीय बाईला मिळणार हा विचार वर्णद्वेशाची एक ठिणगी पाडतो. नंतर सुरू होतो ज्युरी निवडण्याचा खेळ. दोन्ही गटातले वकील जिंकण्यासाठी अनुकूल अशी ज्युरी निवडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. गावात बहुसंख्य गोरे असल्याने ज्युरीत जास्त गोरे येणार आणि ते गरीब लेटीच्या विरोधात मत नोंदवणार म्हणून जेक अस्वस्थ होतो. ज्युरीमध्ये जास्तीत जास्त गोरे आणण्यासाठी विरोधी पक्षाचा वकील अफाट कष्ट घेतो. मग सुरू होतो वर्णभेदावर आधारलेला थरारक खेळ! पुढे काय होतं, कोणती कोणती रहस्ये बाहेर पडतात, खटला कुठली कुठली वळणे घेतो, लेटीला संपत्तीचा ९०% हिस्सा खरोखर मिळतो का, सेथची मुले या खटल्यात विनाकारण भरडली जातात का, या सगळ्या खटल्यामागे षडयंत्र असते का, कुणाची बाजू खरी असते, इत्यादी प्रश्नांची उकल लेखक खुबीने करतो.

जॉन ग्रीशम यांचा कायद्यावर आधारित कथानके रचण्यात हातखंडा आहे. प्रत्येक शब्दाला वाचकांची उत्कंठा वाढवत नेण्याचे त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. बर्‍याच प्रसंगात कथानक अपेक्षित वळणे घेते पण वाचतांना वाचकांना खिळवून ठेवण्यात लेखक खासच यशस्वी होतो. प्रसंगा-प्रसंगाला अनपेक्षित वळणे घेत जाणारे घटनाक्रम, प्रसंगाची नाट्यपूर्ण आणि रहस्यमय पेरणी, पात्रांचे जिवंत वर्णन, आणि डोळ्यासमोर प्रसंग उभे राहतील इतके जिवंत लिखाण ही या कादंबरीची वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. भाषा खूपच ओघवती आणि समर्थ आहे.

असाच एका रस्त्यावरून मी चालत जात असतांना एका जुनी पुस्तके विकणार्‍या विक्रेत्याकडे मला हे पुस्तक दिसले. पुस्तक हाताळल्याने तसे जुनाट वाटत होते. 'किल' वाचले असल्याने उत्सुकता चाळवली गेली. मी पुस्तक विकत घेतले आणि वाचायला सुरुवात केली. जसा वेळ मिळेल तसा मी वाचत गेलो. साडेपाचशे पानांची ही कादंबरी मला आठवणीत ठेवावा असा वाचनानंद देऊन गेली. काहीतरी चांगले वाचल्याचे समाधान ही कादंबरी देऊन गेली.

काही काही पुस्तके पुन्हा पुन्हा वाचावीत अशा दर्जाची असतात. 'गॉन विथ द विंड' ही कादंबरी अशीच आहे. 'सायकॅमोर रो' मी काही वर्षांनी कदाचित पुन्हा वाचू शकेन. 'गॉन' चा पट खूप विस्तृत आहे. एका अल्लड नायिकेचा यादवी युद्धाच्या पार्श्वभूमीवर घडत जाणारा जीवनप्रवास 'गॉन' अतिशय समर्थपणे मांडते. 'गॉन' मध्ये वर्णभेदाची किंचित पार्श्वभूमी आहे. 'गॉन'चे लिखाणदेखील समर्थ आणि जिवंत आहे. १९३६ सालची कादंबरी असल्याने भाषा किंचित क्लिष्ट आणि आजकाल फारशी वापरात नसलेली असली तरी वाचनाचा जो आनंद 'गॉन' देते तो अवर्णनीय आहे. 'सायकॅमोर रो' चे कथाबीज तसे सोपे आणि छोटे आहे; पण लिखाणाचा दर्जा वाचनाचा अपेक्षित आनंद देऊन जातो. 'द गॉडफादर' ही कादंबरी देखील असाच आनंद देऊन जाते.

'सायकॅमोर रो' माणसाच्या मनातील पाशवी प्रवृत्तींवर झगझगीत प्रकाश टाकतांना वाचकाला विचार करण्यास भाग पाडते. आणि हा विचार केवळ एका सामाजिक प्रश्नाच्या अंगाने येत नाही तर एका खटल्याच्या रोमांचकारी वर्णनातून देखील हा विचार डोकावत राहतो. आणि हे बेमालूम मिश्रण वाचकाला खिळवून ठेवते. माणसांमाणसात कुठल्याच कारणाने भेदभाव असू नये हा विचार बळकट करणारी ही कादंबरी अवश्य वाचायला हवी असे सुचवावेसे वाटते.

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

28 Aug 2014 - 3:49 pm | कपिलमुनी

जॉन ग्रीशम च्या कांदबर्‍या वकिली डावपेचांवर असतात .. पूर्वी द क्लायंट वाचली होती आणि आवडली होती.
ही कांदबरी मिळवून वाचण्यात येईल.
बादवे 'गॉन विथ द विंड' चा चांगला मराठी अनुवाद कोणास ठाउक आहे का?

स्वप्नांची राणी's picture

1 Sep 2014 - 8:20 pm | स्वप्नांची राणी

वर्षा गजेंद्रगडकर यांनी केलाय गॉन विथ द विंड चा अनुवाद...चांगला आहे.

कपिलमुनी's picture

2 Sep 2014 - 8:33 am | कपिलमुनी

लौकरच मिळवून वाचायचा प्रयत्न करतो.

कंजूस's picture

28 Aug 2014 - 4:13 pm | कंजूस

चांगले परिक्षण आणि नवीन पुस्तकाची ओळख .छान !

अनुप ढेरे's picture

28 Aug 2014 - 4:18 pm | अनुप ढेरे

अ टाईम टू किल वाचली आहे. आवडली होती. ही नक्कीच वाचीन. 'टाईम टू किल'वर आलेला सिनेमा पण छान आहे. त्याच नावाचा. एकदम तगडी स्टारकास्ट

धर्मराजमुटके's picture

28 Aug 2014 - 4:23 pm | धर्मराजमुटके

जॉन ग्रीशमच्या बहुतेक कादंबर्‍यांचे अनुवाद वाचलेयत. एकदम जबरा. वरील पुस्तकाचा मराठी अनुवाद आलाय का बाजारात ?

सौंदाळा's picture

28 Aug 2014 - 4:31 pm | सौंदाळा

हेच विचारायचे होते.
'द असोसिएट' मराठी अनुवाद वाचला होता मस्तच होता.

प्रमोद देर्देकर's picture

28 Aug 2014 - 5:09 pm | प्रमोद देर्देकर

THE CLIENT
THE FIRM
TIME TO KILL
THE PELICON BRIEF
ह्या सर्व कादंबर्‍या वाचल्यात पण अनुवादित.
म्हणुन ही पण कादंबरी आवर्जुन वाचणार फक्त अनुवादित झाली आहे का तेवढं सांगा. तसेच त्यांच्या इतर कादंबर्‍यांची ही नावे सांगा.

आदूबाळ's picture

28 Aug 2014 - 5:06 pm | आदूबाळ

आभारी आहे.

ग्रिशॅमच्या गेल्या काही कादंबर्‍यांत तोचतोचपणा जाणवत होता, म्हणून बाजूला टाकलं होतं. आता ही वाचतो.

ग्रिशॅम प्रामुख्याने लीगल थ्रिलर्स लिहीत असला तरी त्याच्या नॉन लीगल कादंबर्‍याही छान आहेत. चटकन आठवणार्‍यांमध्ये:

द पेंटेड हाऊस - आजोबा आणि नातवाच्या नात्याची तरल गोष्ट
स्किपिंग ख्रिसमस - ख्रिसमस आणि त्याच्या दिखाऊ तोचतोचपणाला कंटाळलेलं एक दांपत्य ख्रिसमस साजरा करायचा नाही असं ठरवतं. आणि त्यातून उडणारी धमाल. (त्या पुण्याच्या गणेशोत्सवाच्या धाग्यावर जो राडा चालू आहे त्याला अगदी सुसंगत ही कादंबरी आहे.)

एस's picture

28 Aug 2014 - 6:58 pm | एस

लेखकाचे आणि तुम्हां सर्वांनाही धन्यवाद या पुस्तकांची ओळख करून दिल्याबद्दल.

राजाभाउ's picture

29 Aug 2014 - 4:31 pm | राजाभाउ

आहा !! हे माहीत नव्हते कि ग्रिशॅमने नॉन लीगल कादंबर्‍याही लिहील्या आहेत ते.

ब्लीचर्स म्हणून अजून एक आहे. पण ती तितकी आवडली नव्हती.

रेवती's picture

28 Aug 2014 - 5:40 pm | रेवती

वाह! छान लेखन.

सस्नेह's picture

28 Aug 2014 - 7:03 pm | सस्नेह

सध्या ग्रिशॅमची ' द फर्म ' वाचते आहे. सायकॅमोर पुढचे टार्गेट .

सखी's picture

28 Aug 2014 - 9:55 pm | सखी

' द फर्म ' हा सिनेमाही चांगला होता असं आठवतयं.
अजुनही नविन नावे कळत आहेत म्हणुन वाखु साठवत आहे. समिरसुर नेहमीप्रमाणे उत्तम लिखाण, 'सायकॅमोर' मिळाली की वाचेल.

धर्मराजमुटके's picture

28 Aug 2014 - 8:07 pm | धर्मराजमुटके

राम पटवर्धनांचे "पाडस" कुठे विकत मिळेल काय ? मी छापील किंमतीपेक्षाही जास्त किंमत द्यायला तयार आहे.

राजाभाउ's picture

29 Aug 2014 - 5:00 pm | राजाभाउ

ते अत्रे सभाग्रहात नेहमी प्रद्र्शन चालु आसते तिथे पहा. मी आत्ता २/३ महीन्यांपुर्वी पाहिले होते.

मेहता कडूनच जास्त झाल्या आहेत.

क्लायंट पासूनच मी ह्या लेखकाच्या प्रेमात पडलो.

द रन अवे ज्युरी

द रेनमेकर

द चेंबर

ह्या पण जमल्यास वाचा...

फार येडपट लेखक आहे.

आदूबाळ's picture

28 Aug 2014 - 10:04 pm | आदूबाळ

येडपट लेखक? का हो?

मुक्त विहारि's picture

28 Aug 2014 - 11:45 pm | मुक्त विहारि

ज्या लेखकाचे लेख वाचता-वाचता वेळ कसा निघून जातो, ते कळत नसेल, तो लेखक येडपट....

शाण्या लेखकांपेक्षा हे येडपट लेखकच आमच्या सारख्या माणसांसाठी उत्तम...

आदूबाळ's picture

29 Aug 2014 - 12:17 am | आदूबाळ

वा: मुवि

असे अजून येडपट लेखक सुचवा की...

दशानन's picture

28 Aug 2014 - 11:20 pm | दशानन

>>>अमेरिकेतल्या सुप्त वर्णभेदाचे दाहक चित्रण अतिशय सुंदर

याबद्दल मी जरा शाशंक आहे.

ही कादंबरी अजून वाचलेली नाही आहे, पण आता वाचावी असे वाटत आहे, याचे श्रेय नक्कीच तुम्हाला.

द चेंबर -- हे ग्रीशमचे पुस्तक थोडे उलट्या बाजुने लिहीले आहे. तरुणपणात वर्णभेदी संघटनेचा सभासद असलेला एकजणावर आत्ता तो म्हातारा झाल्यावर खटला चालू आसतो आणि त्याला त्यात फाशी होते तेंव्हा त्याचा नातू त्याला वाचण्याचा कसा प्रयत्न करतो असे कथानक आहे (अर्थात तो नातू वर्णभेदी असतो असे नाही)

खालील पुस्तके सुध्दा अतिशय वाचनीय आहेत
द फर्म
द पार्टनर : हे तर फारच सुंदर आहे, मी हे लगोलग म्हणजे शेवटचे पान संपल्यानंतर लगेच पुन्हा पहिल्यापासून असे वाचले आहे.
द क्लायंट
रेनमेकर
द टेस्टामेंट
द ब्रेथ्रेन
द पेलिकन ब्रीफ
द असोसिअट

समीरसूर's picture

1 Sep 2014 - 12:16 pm | समीरसूर

बर्‍याच नव्या पुस्तकांची नावे कळली. मला शक्यतो विकत घेऊनच पुस्तके वाचायला आवडतात. आणि इतकी पुस्तके विकत घ्यायची म्हणजे घरातलं अर्थकारण गढूळ होतं. बघू कसं जमतंय ते...सध्या 'शांताराम' सुरु केले आहे. १५-२० पाने झालीत वाचून. खूप आवर्जून वाचावं अशा दर्जाचं हे पुस्तक नक्कीच नाहीये. भाषा थोडी दुर्बोध वाटतेय. नशीब जुनंच घेतलं. :-( पण वाचत राहणार आहे. वर नमूद केलेली पुस्तके वाचण्याचा प्रयत्न नक्कीच करेन.

एखादं जबरदस्त रहस्यमय आणि थरारक कादंबरी वाचण्याची बर्‍याच दिवसांपासूनची इच्छा आहे. सध्याचं पावसाळी वातावरण अशा पुस्तकवाचनासाठी अगदी योग्य आहे. सुटीच्या दिवशी अंथरुणात पडून गरमागरम चहाचे घोट घेतांना नजर न हलवता एखादं मती गुंग करणारं जबराट रहस्यमय पुस्तक वाचावं. बायकोला 'प्यार का रंग है मीठा मीठा प्यारा' किंवा 'ससुराल सिमर का' किंवा 'जावई विकत घेणे आहे' मध्ये खुशाल रमू द्यावं. सलग ३-४ तास असं पुस्तक वाचून एका वेगळ्याच विश्वात गुंग होऊन जावं असं वाटतंय. तसं अ‍ॅगाथा ख्रिस्तीचं 'द मर्डर अ‍ॅट द विकरेज' वाचलं होतं पण मझा नही आया. तेव्हापासून ही पुस्तके बाद केली. 'द डे ऑफ द जॅकल' देखील वाचलं पण ते ही मला इतकं खास नाही वाटलं. असं कुठलं तगडं पुस्तक असेल तर कृपया इथे सांगा. एक यादीच दिली तर बेष्टच होऊन जाईल...

अगाथा ख्रिस्तीच्या पुस्तकाची निवड चुकली राव. "टुवर्डस झीरो", "अँड देअर वेअर नन", "अ‍ॅट बर्ट्रामस हॉटेल" वगैरे वाचा. असो.

भारतीय पार्श्वभूमीवरच्या रहस्यकथा तुम्हाला आवडतील असा कयास आहे:
- सत्यजित राय यांच्या फेलूदा कथा (पेंग्विनने दोन खंड प्रकाशित केले आहेत)
- मधुलिका लिडल या लेखिकेच्या मुगल साम्राज्यातल्या डिटेक्टिव कथा आहेत. "अ‍ॅन इंग्लिशमन्स कॅमिओ" हे आवडलं होतं
- तार्किन हॉल या लेखकाने "विश पुरी मिस्ट्रीज" लिहिल्या आहेत
- "अ केस ऑफ एक्स्प्लोडिंग मँगोज" हे हनिफ महोंमद या पाकिस्तानी लेखकाचं थ्रिलर जरूर वाचा
- "किलिंग आशिष कर्वे" - सलील देसाई या पुणेकराचं पुस्तक (हे पूर्वी सीआयडी मालिकेच्या कथा लिहीत असत)
- "अ सर्कल ऑफ वाईस" - सुचरित राजाध्यक्ष (हे माझे गुरुजी)

या जॉनरमध्ये न बसणार्‍या पण तरीही खिळवून ठेवणार्‍या कादंबर्‍या:
- अ बेंड इन द गँजेस - मनोहर माळगावकर
- कलकत्ता क्रोमोसोम - अमिताव घोष

रहस्यकथा मला लई म्हंजे लईच आवडतात. कधीपण विचारा.

समीरसूर's picture

1 Sep 2014 - 4:58 pm | समीरसूर

खासच यादी! धन्यवाद! :-) जसे जमेल तसे सुरू करावे म्हणतो. :-)

"अ‍ॅण्ड देअर वेअर नन्" मस्त आहे. त्यावरच आधारलेला भारतीय सिनेमा म्हणजे गुमनाम. अ‍ॅगाथा ख्रिस्तीवर थोडा वंशविद्वेषीपणाचा आरोप झाला त्याला हे पुस्तक आणि त्याचे इंग्लिश नर्सरी र्‍हाइम कारणीभूत ठरले. नंतर त्यातील 'टेन लिट्ल निगर्स' बदलून 'टेन लिट्ल इंडियन्स्' असे केले गेले. आताच्या आवृत्तीत टेन लिट्ल इंडियन्स् असेच दिसते.

प्रचेतस's picture

2 Sep 2014 - 4:25 pm | प्रचेतस

ड्रॅक्युला - ब्रॅम स्टोकर
फ्रॅन्केनस्टाइन - मेरी शेली
वुदरिंग हाईट्स - एमिली ब्रोन्ट

तिन्ही कादंबर्‍या अभिजात, गूढ, रहस्यमय आणि खिळवून ठेवणार्‍या.

प्रमोद देर्देकर's picture

1 Sep 2014 - 3:27 pm | प्रमोद देर्देकर

हायला अदुबाळ सही रे.
बरं मला कोणी JONATHAN LIVINGSTON SEAGUL हे RICHARD BACH चे पुस्तक मराठीत अनुवादित झाले आहे का ते सांगाल काय?

हो. छात्र-प्रबोधन नावाच्या ज्ञानप्रबोधिनीच्या मासिकात "समुद्रपक्षी जोनाथन" या नावाने क्रमशः येत असे. ज्ञानप्रबोधिनीत फोन करुन विचारल्यास अधिक माहिती कळू शकेल.

वॉल्टर व्हाईट's picture

2 Sep 2014 - 7:41 am | वॉल्टर व्हाईट

बाबा भांड यांनी हा अनुवाद केला आहे. इथे पाहिल्यास त्याची ई कॉपी मिळेल, अरविंद गुप्तांच्या संकेतस्थळावर असल्याने साकेतची पुर्वपरवानगी घेतली असावी असा कयास आहे.

वॉल्टर व्हाईट's picture

2 Sep 2014 - 7:42 am | वॉल्टर व्हाईट
सानिकास्वप्निल's picture

3 Sep 2014 - 1:15 am | सानिकास्वप्निल

मीसुद्धा हे पुस्तक खूप दिवसांपासून शोधत आहे, मला इंग्रजी पुस्तक अ‍ॅमेझॉनवर अव्हेलेबल दिसतय पण अनुवादित मिळे ना.

माझ्या विशलिस्ट्मध्ये हे पुस्तक आहेच, तुमचे लिंक दिल्याबद्दल अनेक आभार :)

एस's picture

3 Sep 2014 - 12:53 pm | एस

अरविंद गुप्तांच्या संकेतस्थळावर असल्याने साकेतची पुर्वपरवानगी घेतली असावी असा कयास आहे.

माझ्या माहितीनुसार अरविंद गुप्ता स्वतः कॉपीराइट वगैरे गोष्टी मानत नाहीत. दिसले पुस्तक की कर स्कॅन आणि टाक आंतरजालावर म्हणजे ज्ञान मुक्त होते असे काहीसे त्यांचे आहे. त्याबद्दल या विलक्षण माणसावर खटलेही चालू आहेत. :-) (ह्या माहितीचा स्रोत एका मित्राचे त्यांच्याशी प्रत्यक्ष झालेले बोलणे)

वॉल्टर व्हाईट's picture

4 Sep 2014 - 10:38 pm | वॉल्टर व्हाईट

माझे वरचे प्रतिसाद कसे डिलीट होतील ?

कवितानागेश's picture

1 Sep 2014 - 4:17 pm | कवितानागेश

मस्त. वाचनखूण साठवतेय

प्रमोद देर्देकर's picture

2 Sep 2014 - 9:08 am | प्रमोद देर्देकर

@वॉल्टर व्हाईट-आदुबाळ धन्स तुम्हा दोघांनापण.

जॉन ग्रिशम ची पुस्तके इंग्रजी मध्ये ऑन लाइन वाचण्यासाठी हि घ्या लिंक

http://www.ebook2u.org/author/740.html

स्पंदना's picture

2 Sep 2014 - 10:04 am | स्पंदना

अ टाइम टु किल वाचल्यावर १५ दिवस डोक ठिकाणावर नव्हत.
तुमचा धागा अतिशय सजला राव. मौलिक प्रतिसाद!!
अन पब्लिक मनमुराद रमलय इथे.

समीरसूर's picture

2 Sep 2014 - 10:25 am | समीरसूर

हो, माझंही काहीसं तसंच झालं होतं 'अ टाईम टू किल' वाचल्यावर. माणसाच्या विकृतीला सीमा नाही हेच खरे. 'सायकॅमोर रो' मात्र इतकी भीषण नाहीये. एका म्रुत्यूपत्रावर आधारित खटला एवढाच या कादंबरीचा आवाका असल्याने 'किल' सारखा भीषण प्रकार या कादंबरीमध्ये नाहीये. पण खटला, ज्युरी, साक्षी, भावनांचे हिंदोळे, त्यांचा खटल्यावर होणारा परिणाम, खटला चालवतांना वकीलांना लावावे लागणारे डोके, इत्यादी सगळे खूपच वाचनीय आहे. एकदा वाचाच.

सगळेच प्रतिसाद वाचनानंदाची किल्ली आहेत. खूप नवीन पुस्तकांची माहिती देणारे प्रतिसाद आहेत.

धन्यवाद!

सानिकास्वप्निल's picture

3 Sep 2014 - 1:11 am | सानिकास्वप्निल

पुस्तक मिळवून वाचेन.

जॉन ग्रीशमची मी काही वाचलेली पुस्तकं जी आवडून गेली

द रेनमेकर
अ पेंटेंड हाऊस
द पार्टनर
द क्लायंट

'सायकॅमोर रो' बद्दल छान लिहिले आहे, धन्यवाद
नक्कीच वाचायला आवडेल.

पैसा's picture

4 Sep 2014 - 10:57 pm | पैसा

ग्रीशॅमची पुस्तके आवडतात. या एका मस्त पुस्तकाची तेवढीच छान ओळख करून दिलीत. प्रतिसादही छान आहेत. धन्यवाद सर्वांना!

तुमच्या या धाग्यामुळे नुकतेच वाचून संपवले.

To be honest, I was underwhelmed. कादंबरी म्हणून चांगली आहे, पण ग्रिशॅमची कादंबरी म्हणून सोसोच आहे.

एक तर याला टाईम टू किलचा सीक्वल बनवायची काहीच गरज नव्हती. जेक ब्रिगन्स ऐवजी दुसरा कुणी नायक असता तरी फारसा फरक पडला नसता.

दुसरी खटकलेली गोष्ट म्हणजे "स्टॉक कॅरेक्टर्स"चा सुकाळ. टाईम टू किलमध्ये आलेली पात्रं वगळता इतर पात्रांबाबत वेगळेपण दाखवायची संधी होती, पण ग्रिशॅमने ती सोडली आहे. स्टॉक कॅरेक्टर्स यायला लागली म्हणजे लेखकाची नवीन द्यायची क्षमता संपत आली आहे हे ओळखावं. (उदा. जेफ्री आर्चर, शेवटशेवटची अगाथा ख्रिस्तीची पुस्तकं, वगैरे.)

तिसरी खटकलेली गोष्ट म्हणजे कथानकाची बांधणी. कथानक अपेक्षित (प्रेडिक्टेबल) वळणं घेत जातं. त्यातले चढ-उतार हे अपेक्षेप्रमाणेच आहेत. शेवटचा ट्विस्ट तर इतका अपेक्षित होता की लईच वैताग आला. हाही "ग्रिशॅम संपला" हेच दर्शवणारं चिन्ह आहे.

पण काय माहीत. टाईम टू किल, पेंटेड हाऊस, द क्लायंट सारख्या कादंबर्‍या, थिओ बूनसारखा सशक्त कथानायक दिलेल्या माणसाला अजून एकदोन चान्स द्यायला पाहिजेत.

समीरसूर's picture

5 Sep 2014 - 9:45 am | समीरसूर

वा, तुमचा वाचनाचा वेग अफाटच आहे. :-)

मी या लेखकाची ही दुसरीच कादंबरी वाचली. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कादंबरी म्हणून मला ती चांगलीच रंजक वाटली आणि अगदी 'अनपुटडाऊनेबल' जरी नाही तरी मस्त रंगतदार वाटली. हो, मी लेखात नमूद केलंच आहे की कथानक खूपच प्रेडिक्टेबल आहे म्हणून पण प्रेडिक्टेबल असले म्हणून रंजकता किंवा दर्जा कमी होतात असे मला तरी वाटत नाही. 'शोले' प्रेडिक्टेबल असला तर त्याचा दर्जा आणि रंजकता वादातीत आहेत. कथानक कसे रंगवले आहे यावर हे अवलंबून असावे असे वाटते. अर्थात कुठली कलाकृती रसिकांना कशी वाटते हा मुद्दा सापेक्ष आहे. आपल्या मताचा आदर आहेच. :-)

कोणा नवख्याचा कव्हर ड्राईव्ह थोडा हवेत उडून मग सीमापार गेला तर आपण म्हणतो: नया है वह - चला, चौकार तर गेला ना? पण द्रविड/गांगुलीचा कव्हर ड्राईव्ह हवेत उडाला तर वाईट वाटतं. तसं आहे हे.

समीरसूर's picture

5 Sep 2014 - 3:28 pm | समीरसूर

तुम्ही म्हणता तसं शक्य आहे. अर्थात साहित्याचा आणि साहित्यिकांचा आपल्याएवढा अभ्यास नसल्याने मला एवढे कळणे जरा अवघड आहे. :-) माझी धाव "वाचली, वाचतांना मजा आली, आणि आवडली" इतपतच. :-) पण आपले परिक्षण आणि निरीक्षण आवडले. अशा अँगलने साहित्याचा विचार करणे जमले पाहिजे.