वंचना - १

पहाटवारा's picture
पहाटवारा in जनातलं, मनातलं
23 Aug 2014 - 5:10 am

आदित्यवर्मन आपल्या घोड्यावरुन पायऊतार झाला. कित्येक योजने तुडवलेल्या आपल्या टाचां झाडत वातायन, आदित्यवर्मनाचा अश्व, ऊभा ठाकत विश्रांती घेउ लागला. संध्यासमयी पसरलेल्या लालिमेने पश्चीमेकडचे आसमंत जणू काहि पेटून ऊठले होते.. आदित्यवर्मनची अवस्थाही काहि वेगळी नव्हती.

त्या लालिमेला अडवत, आसमंताला जणू आव्हान करत बेदरकारपणे एक पाषाण ऊभा ठाकला होता.आदित्यवर्मनने त्या पाषाणाकडे एक नजर टाकली अन कसल्याशा आवेगाने धाव घेत तो त्यावर जाउन ऊभा राहिला.. तिथुन खाली पसरलेल्या अथांग, हिरव्यागार अरण्याकडे नजर टाकत त्याची नजर कसलातरी शोध घेत, भिरभिरत राहिली. मध्येच मागे वळून वातायनाकडे पाहताना त्याच्या मनी कृतज्ञता दाटून येई. पण तोच एखाद्या हिंस्र श्वापदांच्या चाहूलीने कुण्या सावध वानराने मारलेल्या आरोळीने सैरभैर झालेल्या पक्ष्यांचा थवा झर्र्कन ऊडून जाई अन त्याचे मन अजूनच सैरभैर होउन जाई.

कसलातरी शोध ..काहितरी हरवल्यासारखे .. जणू जीवन त्याविना ध्वस्त झाल्यासारखे .. अनेक भावना अन अनेक प्रश्न नुसते त्याच्या मनात गर्दि करत होते. मध्येच एकदम हतबल होत, ह्या घनघोर अरण्यात स्वत:ला झोकून, श्वापदांचे भक्ष्य बनावे असे वाटत असतानाच, पुन:पुनः झालेल्या वंचनेचा आठव त्याला होई अन मन सूड्भावनेने एकदम पेटुन ऊठे. मनाच्या अशा दोलायमान अवस्थेत किती पळ तो तिथे ऊभा होता याचे भान त्याला राहीले नाहि.

वातायनाच्या अनोख्या खिंकाळण्याने त्याच्यी तंद्री भंग पावली. त्याने मागे वळून खाली ऊभ्या वातयनाकडे पाहिले. पूर्वेवर नुकत्याच प्रवेश करत्या झालेल्या चंद्राच्या प्रकाशात वातायनाची शुभ्र कांती झळाळत होती. त्या शीतल वातावरणात, धष्ट्-पुष्ट अशा आपल्या अश्वश्रेष्ठाला पाहून आदित्यवर्मनच्या मनात का कोण जाणे एक अनाहूत असा आशेचा शिड्कावा झाला अन तो झरझर खाली उतरून पुनश्च आपल्या सुह्रुदाकडे परतला.

***

अवंतीकेच्या खळाळत्या हास्याने त्या मध्यान्हपूर्व घटिकेच्या तापलेल्या सूर्यकिरणांना जणू सौम्य करुन टाकले. कूर्मगतीने हात चालवणार्या दंतकारांच्या हातातील आयुधे, नजरखिळी झाल्याने अजूनच थंड पडली. सर्वदूर पसरलेल्या त्या संगमरवरांच्या राशींमधुन चालताना अवंती़केची श्यामल कांती अजूनच तजेलदार दिसत होती. आदित्यवर्मनच्या बरोबर असताना अवंतीकेच्या चालीमधे एक अनोखासा डौल येई. का न येवो .. अत्यंत संपन्न, सुविख्यात अन दैदीप्यमान अशा आरव-देशाच्या एकुलत्या एका देखण्या राजकुमाराबरोबर खान्द्याला खान्दा लाउन फिरण्याचा मान, हा काहि साधा नव्ह्ता. अर्थात अवंतीकेने तो आपल्या कुशल बुद्धीमत्तेने अन अफाट कष्टाने मिळवला होता.

राजा मेरूवर्मन ने जेव्हा आपल्या वाढत्या साम्राज्याचे प्रतीक म्हणून एक रणस्तंभ बांधण्यासाठि आपल्या पुत्राला निर्देश दिले तेव्हा त्याला या होउ घातल्या परिणामांची पुसटशी देखील कल्पना नव्हती. आदित्यवर्मन आपल्या पित्याच्या हातून , आरव-देशाच्या सम्राटाकडून शाबासकी मिळवण्यासाठि रणस्तंभाच्या कामावर झटून लागला. देशोदेशी फिरुन नव्-नवीन ठिकाणे पाहून , नीर्-निराळ्या तज्ञांना भेटून, त्यातील काय आपल्याला प्रत्यक्शात करता येइल याच्या योजना करू लागला.

अशातच एके दिवशी शेजारच्या मत्स्य देशातून परतीच्या वाटेवर येताना ऊशीर झाल्याने एका छोट्याशा गावात विश्रामकरता झाला. रात्रीच्या मिट्ट काळोखात जेव्हा अचानक नदीकिनार्‍यावर एक प्रकाशमान आकृती दिसली, तस तो विस्मयचकीत झाला. त्याची पावले आपोआप ति़कडे वळाली. कुणीतरी नदीकिनार्‍यावर वाळूचा एक महाल बांधला होता. अन त्या महालाच्या कडांवर अनेक काजवे बसून त्याची एक रोषणाईच झाली होती. निसर्ग अन मानवाच्या या अनोख्या संगमावर तो भलताच खूश झाला. दुसर्‍या दिवशी जेव्हा त्याला त्या महालाच्या कर्त्याचा नव्हे कर्तीचा, अवंतीकेचा, शोध लागला तेव्हा त्याचा विस्मय शतगुणीत झाला.

अवंतीका हि मालव-देशच्या प्रख्यात स्थापत्यशास्री, कात्यकुमाराची कन्या होती. ती स्वत्: देखील एक निष्णात स्थापत्य-विशारद होती. पित्याच्या निधनानंतर त्याची कार्यशाळा सांभाळणे अन फावल्या वेळात त्या वालुका-महालासारख्या कलाकृती करणे यात मग्न होती.
शिकारीच्या मिषाने आदित्यवर्मन वारंवार अवंतीकेच्या स्थानाजवळील अरण्यात जाई अन येता-जाता एक्-दोन दिवस तिच्या सहवासात घालवी. हळूहळू आदित्यवर्मन अवंतीकेवर अन तिच्या स्थापत्यशास्राच्या ज्ञानावर इतका प्रभावीत झाला की त्याच्या मनाने पक्के ठरविले कि रणस्तंभाची कार्यधुरा हि अवंतीकेच्या हातीच द्यायची. त्यायोगे तिच्याबरोबर जास्त काल व्यतीत करण्याची एक आयती संधीच त्याला मिळणार होती.

परंतू एक राजकुमार जरी झाला तरी एका अल्लड अशा युवतीस एवढी मौल्यवान कामगिरी सोपवण्यासाठी सर्व राजमंडळास तयार करणे हे कठिण होते. परंतू प्रेमाच्या फुलणार्या अंकुराने आदित्यवर्मनाला मदत करत आपल्या पित्यास राजी करायला भाग पाडले. त्याच्या अन अवंतीकेच्या सततच्या होणार्या भेटी हा राजदरबार्‍यांचा मोठाच चर्चेचा विषय होता. त्यात आता ह्या रणस्तंभाच्या वार्तेने अजूनच तेल पडले.

***
क्र्मशः

कथा

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

23 Aug 2014 - 5:35 am | कवितानागेश

आयला! परीकथा?!!
....
मीच पयली. :)

पहाटवारा's picture

23 Aug 2014 - 6:02 am | पहाटवारा

आगे आगे देखो .. होता है क्या .. :)

प्रभाकर पेठकर's picture

23 Aug 2014 - 11:10 am | प्रभाकर पेठकर

ठिक आहे. देखते है। बादमे देंगे प्रतिक्रिया....

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Aug 2014 - 1:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुरुवात आवडली. पुभाप्र.

प्यारे१'s picture

23 Aug 2014 - 11:09 pm | प्यारे१

वाचतोय

आदूबाळ's picture

24 Aug 2014 - 3:05 am | आदूबाळ

गो ना दातार. वाचतोय ...

एस's picture

25 Aug 2014 - 5:41 am | एस

पुभाप्र

आञला चक्क नाथमाधवी थाट आहे.

अनुप ढेरे's picture

25 Aug 2014 - 11:40 am | अनुप ढेरे

सुरुवात आवडली.

शेखर's picture

25 Aug 2014 - 1:33 pm | शेखर

छान सुरवात आहे. पुढचे भाग लवकर येऊ द्या.

पैसा's picture

25 Aug 2014 - 8:03 pm | पैसा

अशा गोष्टी हल्ली कुठेवाचायला मिळत नाहीत. पुढील भागाची उत्सुकतेने वाट पहात आहे.

कपिलमुनी's picture

25 Aug 2014 - 8:24 pm | कपिलमुनी

छान सुरुवात !
आवडला .

सस्नेह's picture

25 Aug 2014 - 8:30 pm | सस्नेह

नाथमाधवी थाट याबद्दल बॅमॅशी सहमत.
शुद्धलेखनाकडे जरा लक्ष द्यावे अशी नम्र विनंती.

प्यारे१'s picture

25 Aug 2014 - 8:55 pm | प्यारे१

>>> नाथमाधवी थाट
ही काय भानगड नेमकी?

प्रचेतस's picture

25 Aug 2014 - 9:02 pm | प्रचेतस

नाथमाधव नावाचे एक दिग्गज लेखकू होते जुन्या काळात. ऐतिहासिक, पौराणिक पार्श्वभूमींवर आधारीत कादंबर्‍या लिहिण्यात त्यांचा हातखंडा.

प्यारे१'s picture

25 Aug 2014 - 9:06 pm | प्यारे१

ओक्के.

बाकी द मा मिरासदारांची एक (नाव आठवत नाही) आणि जी ए कुलकर्णींची एक (बहुतेक विदूषक) अशा दोन कथा वरच्या भाषाशैलीत वाचल्याचं आठवतंय.

मिरासदारांची ती कथा म्हणजे 'कोणे एके काळी'.
मिरासदारांनी लिहिलेली बहुधा ती बहुधा एकमेव अद्भूतरम्य कथा.