कहां गये वो लोग?--रणशूर

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
16 Aug 2014 - 4:08 pm

http://www.misalpav.com/node/28220 कहां गये वो लोग?--बाबूकाका

http://www.misalpav.com/node/28221 कहां गये वो लोग?--आजीबाई

http://www.misalpav.com/node/28230 कहां गये वो लोग?--नाथा

http://misalpav.com/node/28237 कहां गये वो लोग?--मंग्या

मित्रांबरोबर एकदा असाच कट्टा जमलेला असतांना विषय तब्येतीवर घसरला. कोणी कोणाकडुन कसा मार खाल्लाय , कोण काडीपैलवान आहेत,कोणाच्या हाडांच्या काड्या आणि xxx तुणतुणा आहेवगैरे थट्टामस्करी करता करता सगळे माझ्यावर घसरले आणि माझ्या नसलेल्या तब्येतीची यथासांग चेष्टा सुरु झाली. बोले तो विषय माझ्या मनाला फारच लागला. त्यातही मित्र अठरापगड जातीचे त्यामुळे "साला तसेपण नुसत्या भाज्या खौन काय होणारे बे तुझे?" हे पालुपद होतेच. शेवटी मी वैतागुन उठलो आणि दुसर्‍याच दिवशी पारनाक्यावरच्या रिक्रिएशन व्यायामशाळेत नाव दाखल केले.

ही व्यायामशाळा फार जुनी म्हणजे म्हणजे एकेकाळी आखाडा ,मल्लखांब वगैरे असलेली. पण ४-५ वर्षांपुर्वी नुतनीकरण करुन तिकडे बरीच नवीन साधनसामुग्री आली होती. फी सुद्धा परवड्ण्यासारखी होती. आणि घराजवळच असल्याने कधीही जाता येत होते.बरोबर अजुन २-३ मित्र यायला तयार झाले.

व्यायाम सकाळीच चांगला होतो वगैरे डोस ऐकल्याने आम्ही पहाटे ५ वाजताच जायचे ठरवले. मी ठरल्याप्रमाणे मित्रांना बोलवायला गेलोसुद्धा पण एकेकाची तर्‍हा बघुन शेवटी एकट्यानेच पुढे व्हायचे ठरवले. दार लोटुन आत शिरलो. मला वाटले होते की ईतक्या पहाटे कोण मरायला येत असेल ईकडे.पण तो समज खोटा ठरेल एव्हढी गर्दी होती आतमध्ये.कोणी उघड्या अंगाने तर कोणी बनियनवर,कोणी सलमान छाप स्लीव्हलेस घालुन तर कोणी पुर्ण टी शर्ट घालुन व्यायाम करत होते.माझी तब्येत लक्षात घेता मी पहीले काही दिवस पुर्ण टी शर्ट घालुन यायचे ठरवले आणि चुपचाप एका कोपर्‍यात डंबेल्स मारत बसलो.

थोडाच वेळ गेला असेल आणि दारातुन एक बुटकेला पण पीळदार अंगाचा माणुस आत शिरला.ओठावर भरघोस मिश्या, मनगटावर आणि उजव्या पायात काळा गंडा आणि हसतमुख चेहरा. लवकरच व्यायाम करायचे कपडे घालुन तो थेट माझ्याईथे आला आणि "जरा जागा दे रे भाऊ " असे त्याने ईतक्या मवाळपणे म्हटले की क्षणभर मला वाघाने "म्यांव" केल्यासारखा भास झाला. बाकीची मुले जरा अंगावर मांस चढु लागताच शेफारतात,त्यामानाने हा माणुस अजबच होता. लवकरच त्याचे नाव कळले रणशुर.

रणशुर खात्यापित्या घरचा होता. घरी शेतीवाडी होती. उंबर्डे गावातुन रोज सायकल हाणत व्यायामाच्या आवडीपायी
ईथवर यायचा. ईतर मुलांना लवकरात लवकर आर्म्स,चेस्ट,शोल्डर,विंग्स,बायसेप,ट्रायसेप बनवायची घाई असायसा,तर रणशुर मात्र आला की पहीले हजार बैठका मारायचा,मग स्कॉटिंगची सर्कीट,आणि शेवटी स्कॉट्बार लावुन स्कॉटस डेड्लिफ्ट आणि बेंचप्रेसची प्रॅक्टीस.नंतर मला कळले की हा बॉडी बिल्डींग नाही तर पॉवरलिफ्टींग करणारा खेळाडू आहे. त्यामुळे त्याचे तंत्र वेगळे दिसते.
आमच्या व्यायानशाळेत मारामार्‍या रोजच्याच.आपल्याला पाहीजे ते मशीन दुसर्‍या कोणीतरी फार वेळ अडवुन धरले
की आवाज चढायचे आणि प्रकरण हातघाईवर यायचे. रणशुर अश्या मारामार्‍या सोडवायला नेहमीच पुढे असे.एकतर त्याची शरीरयष्टी पाहुन लोकांना त्याचे ऐकावेच लागे.दुसरे म्हणजे यातील बरीचशी मुले त्याच्या गावची किंवा आसपासची असत. त्यामुळे रणशुर व्यायामशाळेत असला की शक्यतो शांतता नांदायची किंवा छोट्यामोठ्या कुरबुरींवरच
निभवायचे.
खरी मजा यायची जेव्हा कुठली स्टेट लेव्हल किंवा डिस्ट्रिक्ट लेव्हल स्पर्धा जवळ यायची.व्यायामशाळेचा एक कोपरा रणशुर आणि टीमसाठी राखीव असायचा.तिकडे स्कॉटबार लावलेले असायचे. ती छाती दडपणारी वजने पाहुनच डोळे विस्फारायचे.स्कॉटींग,डेड्लिफ्ट आणि बेंचप्रेसमधे उचललेल्या वजनाचे बेरीज ज्याची जास्त ,तो खेळाडु जिंकणार. त्यामुळे जीवापाड वजने उचलायची कसरत चालायची. यामागे अजुन एक कारण होते. रणशुरला खेळाडु कोट्यातुन पोलिसात भरती व्हायचे ईच्छा होती.कमरेला सपोर्टर लावलेला,दोन स्कॉटबारच्या मध्ये पाय फाकवुन उभा असलेला रणशुर जेव्हा खांद्यावर बार घेउन खाली बसायचा तेव्हा आक्ख्या व्यायामशाळेचा श्वास रोखला जायचा, आणि तो जसजसा वर उठायचा तसतसे सरस,घेउन टाक,शाब्बास अशा आवाजांनी व्यायामशाळा दुमदुमुन जायची.
बक्षीस जिंकुन आल्यावर तर रणशुरला कुठे ठेवु आणि कुठे नको असे सरांना व्हायचे. त्याने जिंकलेली ट्रॉफी दरवाज्यासमोरच ठेवलेली असायची. जो यायचा तो रणशुरबद्दलच बोलायचा.व्यायामशाळेत एक वेगळाच उत्साह जाणवायचा.

२-३ वर्षे मी नियमितपणे व्यायामशाळेत जात राहीलो.पण हळुहळु कॉलेज, क्लासचा अभ्यास वाढत गेला आणि व्यायामशाळेत जाणे बंद झाले.त्यातच नंतर रस्ता रुंदीकरणात व्यायामशाळेचा एक भाग कापला गेला आणि ती दुसर्‍या जागेत स्थलांतरीत झाली.परवाच एक रणशुरचा गाववाला भेटला आणि जुन्या आठवणी निघाल्या.रणशुरला ठाणे शहर पोलिसात पोस्टींग मिळाली असे समजले.कोणास ठाऊक पण मला मात्र पोलिसी गणवेष घातलेला रणशुर काही डोळ्यापुढे येईना.

मनावर कोरला गेलाय तो खांद्यावर बेसुमार वजने घेउन स्कॉट मारणारा रणशुरच !!!

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

16 Aug 2014 - 7:27 pm | बहुगुणी

तुम्ही थोडे मोठे भाग का टाकत नाही? वर्णन पकड घ्यायला लागता लागताच मध्येच गुंडाळलं असं वाटतं.

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Aug 2014 - 11:38 am | राजेंद्र मेहेंदळे

खरेतर या लेखात मी २ पॅरा टाकायला विसरलोय..पण संपादन करता येत नाहीये आता

स्पंदना's picture

16 Aug 2014 - 10:34 pm | स्पंदना

रणशुर!
शेवटी त्याला हवं ते साध्य झाल तर!