सलाम एसटी चालकांना

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
11 Aug 2014 - 1:41 pm

एखादी गोष्ट आपण अनेकदा केलेली असते, पण अशीच कधीतरी एकदा ती करताना विशेष भावते, त्यातून काहीतरी वेगळी अनुभूती होते. तसंच काहीसं त्या दिवशी झालं. एसटीतून इतके वेळा प्रवास केलेला आहे, पण काही प्रवास खास लक्षात राहिलेत त्यापैकी तो होता. बरेच दिवसांनी असं झालं की बसायला जागा नव्हती. त्यामुळे नेहमीच आवडती ठरलेली चालकाच्या बरोब्बर मागची स्टँडिंग सीट मी पकडली. वाहनाच्या समोरच्या काचेतून पुढचा रस्ता बघत बसायला मला प्रचंड आवडतं. त्यामुळे त्या वेळी बसायला न मिळाल्याचा मला आनंद झाला होता.

तिथे उभं राहून त्या अजस्त्रयंत्राला मी न्याहाळायला लागलो. चालकासमोरची बाजूची एकंदरीत परिस्थिती बघून ती बस चालते, यावरच एखाद्याचा विश्वास बसायचा नाही. धुळीचे थरच्या थर त्या डॅशबोर्ड नामक भागावर साचलेले होते. त्यातच ग्रीस इत्यादी पदार्थाची पुटं पडलेली होती. जणू काही तिथे कधीही साध्या फडक्याचाही स्पर्श झाला नसावा. मी जेलसारख्या भासणा-या त्या उभ्या गजांच्या फटींमधून चालकाकडे बघत होतो. खुद्द आरपार जाऊ शकेल इतक्या मोठया आकाराच्या स्टिअिरग व्हीलला दोन्ही हातांनी पकडून तो बस हाकत होता, जीव काढून ते व्हील वळवत होता. तिथल्या पॅनेलवर अनेक नॉब्ज होते, हा भूतकाळ झाला, कारण त्यातले तीनच शाबूत होते. बाकी कशाचे होते, त्यांनी काय व्हायचं, आता ते कसं होतं किंवा होत नसेल तर कसं चालतं, हे सगळं तो चालकच जाणे.

दर मिनिटभराच्या वेळाने एक खाडकन् आवाज व्हायचा. तो गीअर टाकण्याचा आवाज असे. गीअरचा दांडा साधारण चार साडेचार फुटी होता. तो टाकायला विलक्षण ताकद लागत होती. ड्रायव्हरची सीट म्हणजे इंजिनीअरिंगचा एक नमुनाच म्हणायला लागेल अशी होती की, जिला उपटून काढण्याव्यतिरिक्ततिच्या स्थितीत कुठलाही बदल करणं हे मानवाला अशक्य होतं. त्यात तो चालक खुजा होता. त्यामुळे त्याचे पाय खाली ब्रेक, अॅक्सिलरेटर, क्लचपर्यंत जेमतेम पोहोचत होते, पण जमिनीला टेकत नव्हते. मग त्याने त्यावर उपाय म्हणून रस्त्यावरचा एक पेव्हर ब्लॉक पायाखाली ठेवला होता. त्या प्रतिकूल परिस्थितीतही ही कल्पना सुचल्याबद्दल मला त्याचं विशेष कौतुक वाटलं.

माझ्या चेह-यावर थंडगार वारा येत होता. बस नक्कीच भरधाव असणार, असा समज करून मी स्पीडोमीटरकडे नजर टाकली. ते बंद होतं. तेच नव्हे, त्याच्या आसपास वसलेल्या सर्व डायल्स बंद होत्या. मला मोठा प्रश्न पडला की, स्पीड, डिझेलची पातळी, इंजिनचं तापमान आणि इतर काही गोष्टी या चालकांना कळतात तरी कशा?

चालक एका हाताने आपलीच पाठ चोळत असल्याचं नजरेस पडलं तेव्हा मात्र खूप वाईट वाटलं. त्या काटकोनी सीटला ना धड मऊपणा होता की, पाठीला कसला आधार. केवळ एखाद्या खाटेची जशी रचना असते तशी त्या सीटच्या पाठीची रचना होती. त्या बिचा-या चालकाने घरातलीच एक जुनी उशी आणून पाठीच्या मागे ठेवली होती. तेवढाच काय तो आराम.

एकंदरीतच जितक्या कठीण परिस्थितीत ही मंडळी काम करतात, त्याचा त्यांना काम करत असतानाच नव्हे, त्याव्यतिरिक्तही त्रास होतो हे उघड आहे. त्याबद्दल त्यांना वंदन करावं की त्यांचं कौतुक करावं, हे मला कळेनासं होतं. इतका त्रास असूनही तितक्याच नेमाने, प्रामाणिकपणाने ते आपली जबाबदारी असल्यागत हे काम करतात. त्यांची तुलना एखाद्या सनिकाशीच व्हायला हवी. त्यांच्या बस चालवण्याच्या कौशल्याबद्दल बोलण्यास खरं तर मी पात्रच नाही. इतकं मोठं धूड गर्दीच्या रस्त्यांवरून इतक्या अचूकपणे, तरीही वेळेवर या ठिकाणाहून त्या ठिकाणी नेणं, हे करायला दैवी देणगीच लागते.

इतक्यात माझा बस स्टॉप आला. माझी बॅग उचलून मी दाराकडे सरसावलो. कुठल्याही विचारांती नाही, पण मी त्या चालकाकडे बघून हसलो आणि त्याला हात उंचावून ‘बरंय’ म्हटलं. कदाचित इतकं सौजन्यही त्यांना दुर्लभ असेल.

हा लेख ९ ऑगस्टच्या प्रहार च्या पुरवणीत छापून आला होता त्याचा हा दुवा : http://prahaar.in/collag/238155

जीवनमानलेख

प्रतिक्रिया

माम्लेदारचा पन्खा's picture

11 Aug 2014 - 2:06 pm | माम्लेदारचा पन्खा

ही मंडळी मानवातीत आहेत.…………

सध्या रस्त्यावरची गर्दी ,पायात पायात येणाऱ्या उंदरासारख्या खासगी गाड्या, खड्डेयुक्त रस्ते,घाटातली धोक्याची वळणे यांना कुठेही धक्का न लावता ती एस्टी हाकणे हे मर्त्य मानवाचे कामच नाही …शिवाय चुकून गाडीखाली कुणाचे प्राणोत्क्रमण झालेच तर नोकरी जायची टांगती तलवार …. त्यांचे काम तेच करो जाणोत !! त्यांना शतश सलाम !

सौंदाळा's picture

11 Aug 2014 - 2:16 pm | सौंदाळा

एस्.टी ची अवस्था इतकी वाईट आहे?
मला तरी गेल्या पाच वर्षात पुणे ते सातारा, कोल्हापुर, मालवण, पणजी, मुंबई या मार्गांवर इतक्या दयनीय अवस्थेतील एस्.टी दिसली नाही.
तुम्हाला हा अनुभव कोणत्या मार्गावर आला?
अर्थात काहीही असले तरी एस्.टी चालकांचे नेहमीच कौतुक / दया वाटत आली आहे.
थांब्यांवर राहण्याची, आंघोळ, संडास यांची गचाळ व्यवस्था, निक्रुष्ट जेवण. मे महीना, दिवाळी, गणपती वगैरे प्रसंगी १० तास सलग ड्रायव्हींग.

एवढं लांब नाही इथे मुंबईतल्या मुंबईत मंत्रालय ला जाणारी बस होती.

सौंदाळा's picture

11 Aug 2014 - 2:39 pm | सौंदाळा

अच्छा,
लोकल बसच्या अवस्थांबद्दल बोलायलाच नको. पुण्यात पण तोच प्रकार आहे.
पण लोकल बस चालकांचा मला कळवळा येत नाही. कुठेही बस उभी करणे, लोक चढत/उतरत असतानाच बस चालु करणे.
बस जर स्पीडमधे असेल तर बिनदिक्कीतपणे मधले थांबे न घेणे असले प्रकार चालु असतात.

अल्पिनिस्ते's picture

18 Sep 2014 - 8:38 pm | अल्पिनिस्ते

हि महामंडळाची कृपा … मंडळ ठाणे ते मंत्रालय आणी पनवेल ते मंत्रालय अशा लोकल फेऱ्या करते … __/\__

बाकी पुण्याच्या लोकल बस अर्थात P.M.T. बद्दल बोलायलाच नको… BEST त्यामानाने बरे आहे

लेखातल्या भावनेशी सहमत. उत्तम नोंद.

प्रसाद१९७१'s picture

11 Aug 2014 - 2:38 pm | प्रसाद१९७१

मला ST आणि City Bus च्या ड्रायवर बद्दल नेह्मीच आदर वाटत आलेला आहे.
ST च्या ड्रायवर ना स्थानकावर विश्रांती साठी आणि Toilet च्या पण नीट सोई नसतात.

वेल्लाभट's picture

11 Aug 2014 - 2:47 pm | वेल्लाभट

तेच ना !

मी तर म्हणेन, की साला बसेसची अवस्था सुधारण्या आधी बस स्थानकांची अवस्था सुधारा. त्याने अर्धा प्रॉब्लेम सुटेल. नीट आराम नीट सुविधा मिळाल्या चालक वाहकांना की आपोआप सगळं नीट होईल. त्यांचं फ्रस्ट्रेशन कमी होईल, त्याने चालन नीट होईल, सौजन्य आपोआप वाढेल, फ्रेश झाल्यामुळे वेळा पाळल्या जातील, अपघात टाळले जातील आणि एकंदरितच समस्या अर्ध्या होतील.

स्थानकांची अवस्था सुधारण्या आधी लोकांना शिकवावं लागेल की उपलब्ध सुविधा वापराव्या कश्या आणि सांभाळाव्या कश्या

>>हा लेख ९ ऑगस्टच्या प्रहार च्या पुरवणीत छापून आला होता त्याचा हा दुवा : http://prahaar.in/collag/238155

ओके, वाचतो.

वेल्लाभट's picture

11 Aug 2014 - 3:18 pm | वेल्लाभट

दर एक रविवार आड लिहीतो प्रहारच्या पुरवणीत.

आता प्रहार 'विकत' घेणे आले. ;)

ऑनलाईन वाचू शकताच की. :)
:P

ब़जरबट्टू's picture

11 Aug 2014 - 3:31 pm | ब़जरबट्टू

लेखातल्या भावनेशी सहमत. पण हा मानसिकतेचा प्रश्न आहे, ती बदलायला हवी. अगदी हाच अनुभव आहे.. नुकतेच टाटा ने प्रिमा नावाचे ट्रक आणले बाजारात..हा ट्रक लांब पल्ल्याचा असल्याने प्रत्येक चालकाला सुविधा हव्या म्हणून यामध्ये वातानुकुलीत केबीन, झोपायला कुशन, संगीत सुविधा, थोडक्यात काय तर युरोपमधल्या सुविधा होत्या.. ट्रकमाल़कांनी किंमत कमी करण्यासाठी या सर्व सुविधांना फाटे द्या, असेच सांगितले. बाकी सर्व हवे...

चिगो's picture

11 Aug 2014 - 3:52 pm | चिगो

>> युरोपमधल्या सुविधा होत्या..

>> ट्रकमाल़कांनी किंमत कमी करण्यासाठी या सर्व सुविधांना फाटे द्या, असेच सांगितले. बाकी सर्व हवे...

हाच तर फरक आहे ना, राव.. आपल्याकडे बहुतांश ट्रकमालक / ट्रांसपोर्टकंपनी चालवणारे ट्रक्स चालवत नाहीत. ह्याउलट युरोप / अमेरीकेतले बहुतांश ट्रकवाले हे "चालक-मालक" प्रकारात मोडतात, म्हणून ते ट्रकचालकांना चांगल्या सुविधा देतात. तसेच "कामगार कायदे" पण आहेत मदतीला.. आपल्याकडे मात्र ह्याबाबतीत बरीच बोंब आहे..

वेल्लाभट's picture

11 Aug 2014 - 4:05 pm | वेल्लाभट

हेच गमक आहे. तो चालवतोय ना, मी तर नाही. नसेनाका एसी. नसेनाका गादीवाली सीट.

विटेकर's picture

11 Aug 2014 - 6:17 pm | विटेकर

अनेक वर्ष ट्रान्सपोर्ट धंद्याशी संबंधीत असल्याने त्यांची दु:खे माहीत आहेत. वोल्वो ने सुरुवातीला वातानुकुलीत केबिन चे ट्रक आणल्यावर सगळे ट्रक ड्रायवर / मालक खूष झाले होते पण एकोनोमिक्स च बसत नाही
१. आपल्या इथे ट्रान्सपोर्ट चे रेट अत्यंत कमी आहेत .
२. रस्ते इतके खराब आहेत की वर्षा -दोन वर्षात मालक मेण्टेनन्स ने घाईला येतो. दर सहा महिन्याला टायर दगा देतात. पावसाळा म्ह्टले की मालकाच्या अंगावर काटा येतो.
३. महामार्गावरील कायद्याचे रक्षक आणि त्यांचे हात ओले करणे.
४. त्या व्यवसायात असणारी माणसे - डिझेल न चोरणारा आणि शिटा न घेणारा ड्रायवर भारतात जन्माला यायचाय, ड्रायवर्स ची गुणवत्ता इतकी खालावलेली आहे की शेकडा ६७ ट्रक ड्रायवर्सना एच आय वी ची बाधा झाली आहे, अजून ही मालक लोक ड्रायवर्सना लाथा - बु़क्क्यानी मारतात आणि "भ"कारानी उद्धार करतात.
५. वाहनांची गुणवत्ता - आपल्याकडे ज्या प्रमाणात कार आल्या त्या प्रमाणात माल वाहतुकी साठी असनार्‍या वाहनांचे तंत्रज्ञान आले नाही कारण माल वेळेत आणि सुखरुप पोहोचवण्यासाठी आपल्याकडे ना रिवार्ड आहे ना पेनल्टी !
६. वारंवार होणारे अपघात. जिवीत हानी होते ते निस्तरणे परवडते पण सरकारी लोक भयंकर त्रास देतात. २-४ गाड्यांचा मालक , एखाद्या दुसर्‍या अपघाताने सुद्धा कायमचा बसतो..आपले विम्याचे नियमपण धन्य आहेत. ट्रकचा अपघात हा अनेकांसाठी पर्वणी असते ! सुरुवात होते स्पॉट सर्वे पासून !
याउलट , लोक पैसे देतात म्ह्टल्यावर खासगी आरामदायी बसेस चा सुळसुळाट झाला. पैसा असल्याने तिथे अशी परिस्थिती नाही, ९० लाखाची बस सर्व पैसे फिटून दुसर्‍या - तिसर्‍या वर्षी फायद्यात पडते .. अगदी महामंडळाला सुद्धा !
साध्या बसची हालत खराब आहे कारण महामंडळाचा अत्यंत ढिसाळ कारभार आणि प्रचंड खाबुगिरी !!!

धन्या's picture

11 Aug 2014 - 7:50 pm | धन्या

भयानक आहे हे सारं. :(

ब़जरबट्टू's picture

12 Aug 2014 - 9:54 am | ब़जरबट्टू

तुम्ही सांगितलेले मुद्दे पटताहेत.. पण एस. टी ला यापैकी फक्त मेण्टेनन्स लागु आहे, म्हणून तेथे तरी चालकाला चांगल्या सुविधा हव्या.. जोपर्यन्त त्या चालकाला ती एस. टी. व मंडळ स्वताचे वाटत नाही, तोपर्यन्त कठीण आहे..

विटेकर साहेबः तुम्ही लिहिलंयत की "याउलट, लोक पैसे देतात म्ह्टल्यावर खासगी आरामदायी बसेस चा सुळसुळाट झाला. पैसा असल्याने तिथे अशी परिस्थिती नाही, ९० लाखाची बस सर्व पैसे फिटून दुसर्‍या - तिसर्‍या वर्षी फायद्यात पडते .."

त्यावरून हे विचारावसं वाटलं - जवळजवळ सर्वच खाजगी बसेस बेकायदा प्रवासी वाहतूक करतात का?

माझ्या माहितीप्रमाणे सर्वच सरकारी स्थानकांवर ठळक अक्षरांत हे लिहिलेलं असतं की खाजगी वाहतूकदारांना फक्त "निघण्याचे गाव ते गंतव्य स्थान" अशी point-to-point प्रवासी वाहतूक करायलाच कायद्याने परवानगी आहे (उदाहरणार्थ, contract वर घेतलेली लग्नासाठीची बस). सरकारी बस सारखे मधल्या गावांचे टप्पे घेत ते जात असतील तर अशी वाहतूक बेकायदा आहे. पण मी पाहिलेल्या जवळजवळ सर्वच खाजगी गाड्या असे टप्पे घेत सर्रास जातात (आणि आपल्यासारखे प्रवासी ते अपेक्षितही ठेवतात!).

एस. टी. आणि वाहतूक पोलिस यांच्या संयुक्त भरारी पथकांनी अशी एखादी खाजगी गाडी मध्ये कुठे थांबलेली असलेली, तर अडवलेली क्वचित कधी तरी (खरं तर फार वर्षांपूर्वी) पाहिली होती.

अशी वाहतूक खरंच बेकायदा असेल तर हल्ली एस. टी. ला समांतर अशी ही बेकायदा यंत्रणा केवळ भ्रष्टाचाराने चालू आहे का?

विटेकर's picture

24 Oct 2014 - 9:52 pm | विटेकर

दुर्दैवाने ए स टी अधिकारी आणि खासगी बस वाले यांचे संगनमत आहे।
त्यात दूसरा एक वाईट प्रकार असा आहे की पुणे मुंबई चालणा-या शिवनेरी सरकारी मालकाच्या नाहित. तिथेही साटे लोटे आहे. दरवेळी महा मंडल तोट्यात जाते आणि हे सारे राजकीय आशीर्वादाने चालते.

बहुगुणी's picture

25 Oct 2014 - 12:06 am | बहुगुणी

महामंडळाच्या आधिकृत संस्थळावर तर MSRTC Operates Volvo buses service under brand name "Shivneri" between Dadar-Pune-Dadar असं धडधडीत दिलेलं आहे! ही 'service' जर कुणा उच्चपदस्थाच्या खाजगी उद्योगाचं सरकारी tentacle असेल तर त्यांची पोलखोल व्हायला हवी.

याच संस्थळावर: सेवा--> वातानुकुलित सेवा या दुव्याखाली खालील माहिती दिली आहे.

वाहतूक : वातानुकूलित बस सेवा

दादर-पुणे-दादर मार्गावर महामंडळाची वाहतूक सेवा १९८१ पासून चालू आहे. जसजशी ही वाहतूक लोकप्रिय होत गेली तसतसे या मार्गावर फेऱ्या वाढविण्यात आल्या दिनांक १६/७/१९९४ पासून डिलक्स बस सेवा व में १९९६ पासून वातानुकूलित बस सेवा चालू करण्यात आलेली आहे. डिलक्स बस सेवेसाठी रुपये १५५/- प्रमाणे भाडे आकारणी करण्यात येत आहे. दिनांक २८/१२/२००२ पासून या मार्गावर ५ वातानुकूलित व्होल्वो बसेसची वाहतूक चालू करण्यात आलेली असून प्रत्येक बसच्या प्रत्येकी दोन परतीच्या फे-या चालू करण्यात आल्या आहेत. या बसचे कमी हंगामातील कालावधी तिकीट (प्रवास भाडे) रुपये २००/- (दिनांक १/१२/२००५ पासून) ठेवण्यात आले होते. सदरचे बस भाडे गर्दीच्या हंगामात ( १ एप्रिल २००६ ते ३० जून या कालावधीसाठी) रुपये २३५/- करण्यात आले होते. शासनाने हंगामानुसार भाडे दर ठरविण्यास दिलेल्या परवानगीनुसार हे भाडे दर ठरविण्यात आले आहेत. बसची आसन क्षमता ४५ आहे. या गाडीच्या वाहतूकीस प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने सदर मार्गावर आणखी १० नवीन वातानुकूलित बसेस चालनात आणण्यात आल्या आहेत, तसेच ठाणे-पुणे मार्गावर ३ व्होल्वो बसेस व बोरिवली-पुणे मार्गावर २ व्होल्वो बसेस प्रवाश्यांची निकड पाहून चालनात आणण्यात आल्या होत्या. परंतु बोरीवली-पुणे मार्गावर अपेक्षित भारमान मिळत नसल्याने त्या दादर-पुणे या मार्गावर चालविण्यात येत आहेत. या सेवेचे नामकरण ‘‘शिवनेरी’’ असे करण्यात आले आहे

ही जर खाजगी (किंवा contracted) सेवा असेल तर तसा स्पष्ट उल्लेख आधिकृत सरकारी संस्थळावर न करणं हे न्यायालयात खटला दाखल करण्याला आमंत्रणच आहे!

विटेकर's picture

27 Oct 2014 - 4:28 pm | विटेकर

अगदी सुरुवातीला महामंड्ळाने पाच वोल्वो विकत घेतल्या होत्या. हा व्यवहार महामंडळ आणि वोल्वो कम्पनी असा सरळ झाला होता. या बसेस १३-१४ महिन्यातच ब्रेक-इवन ला आल्या होत्या. म्हणजे त्यावेळी ५०-५५ लाखाच्या बसने १३-१४ महिन्यात प्रवासी भाड्यापोटी ५०-५५ लाख ( प्रति बस ) वसूल केले होते. साधारण १३-१४ सीट भरल्या की ब्रेक- इवन त्या ट्रिप पुरता येतो. त्यापुढच्या सार्‍या सिट हा निव्वळ नफा !! महामंडळ दंगच झाले !!!
पण पुढे नेहमीप्रमाणे महामंडळाने खाजगी कंत्राटदाराकडून भाडे- तत्वावर बसेस घ्यायला सुरुवात केली. का ? माहित नाही ! यामध्ये कन्त्राटदाराने बस, मेन्टेनन्स आणि ड्रायवर द्यायचा आणि महामंडळाने ठराविक रक्कम प्रति किमी द्यायची अशी सुरुवात झाली. मग स्वाभाविकपणे कार्टेलिन्ग आले ! कंत्राटदारानी आणि काही अधिकार्‍यांनी आपले उखळ पांढरे करुन घेतले.
काही प्रामाणिक अधिकार्‍यांनी विरोध केला ही .. पण राजकीय दबावाने सारे काही शांत शांत .....! ही स्थिती २००९-२०१० पर्यन्त होती . माझ्या माहीतीप्रमाणे आजही महामंडळ कत्राटी बसेस वापरते आणि फार थोड्या बसेस विकत घेते.
याउलट, APSRTC आणि KSRTCने स्वतः बसेस चालविल्या आणि तूफान पैसे कमवले. आन्ध्रात साध्या गाड्यांचा तोटा या गाड्यांनी भरुन काढला हे मला पक्के माहीत आहे .

विटेकर's picture

27 Oct 2014 - 4:49 pm | विटेकर

कन्त्राटी बसेसचा असाच प्रयोग बिहार महामंडलाने केला पण फसला.
पंजाब आणि हरियाना ने स्वतः गाड्या विकत घेतल्या आणि उत्तम चालविल्या.
गोवा आणि गुजरात मध्ये कन्त्राटे आहेत पण तिथल्या सरकारी अधिकार्‍यांनी कंत्राट ( पीपीपी) आपल्या मनासारखे करुन सरकारचा फायदा केला. कन्त्राटदार नाखूष आहेत. तामिळनाडूचे महामंड्ळ बकवास आहे, तिथे खाजगी बसेस चालतात.
केरळ मध्ये सरकारी बसेसचा फारसा बोलबाला नाही ( बहुधा नावाच चालत असाव्यात ) दिल्लीचा अनुभव नाही, उप्र/मप्र/ उत्तराखंड महामंडळाकडे पैसा नाही.
पं बंगाल - मनरेगा मधून बसेस घेऊन कुजविल्या !!! युनियन प्रोब्लेम !
आन्ध्र महामंडळ ही आशियातील सर्वात मोठी वाहतूक कंपनी आहे. त्याखालोखाल कर्नाटक.
कर्णाट्क हे ट्रेन्डसेटर आहे. अतिशय पुरोगामी आणि नव्नवीन योजना आणतात.प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकारी ( अशा महामंडळालादेखील आपल्या कलमाडींच्या करोना कंपनीने गाळात घातले!)

बॅटमॅन's picture

27 Oct 2014 - 4:54 pm | बॅटमॅन

बाकीचं माहिती नाही पण कर्नाटकबद्दल अतिशय सहमत. बेंगळूरूमधील बशी पाहून चाट पडलो होतो. शिवाय धारवाड-बेळगाव-विजापूर इ. ठिकाणच्या बसेसही एकदम अपटुडेट आणि चकाचक असतात. बस ष्ट्यांडेही मोठी प्रशस्त व तुलनेने स्वच्छ असतात.

शिवाय इन जण्रल उत्तर भारतात बस शिष्टम लै खराब आहे दक्षिणेच्या तुलनेत. विदिन स्टेट बशी फारशा चालतच नैत तिथे.

विटेकर's picture

27 Oct 2014 - 5:24 pm | विटेकर

जवळजवळ सर्वच खाजगी बसेस बेकायदा प्रवासी वाहतूक करतात का?
दुर्दैवाने स्टेज क्यारीयर चा नियम पाळला जात नाही. गेल्या ३ वर्षात गोव्यात ४-५ वेळा बंदी आणली पण राजकीय आशीर्वादाने सारे सुरळीत आहे.
महाराष्ट्रात खासगी च्या सोयीसाठी स्टेज क्यारीयर काहीतरी पळवाट काढली आहे.

बहुगुणी's picture

27 Oct 2014 - 8:38 pm | बहुगुणी

धन्यवाद, विटेकर साहेब, आवर्जून स्टेज कॅरियर आणि शिवनेरीच्या संदर्भातल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिल्याबद्दल. एकंदरीत सर्वच राज्यांतील प्रवासी वाहतुकीचा गोषवाराही माहितीपूर्णच आहे (आणि तुमचा या क्षेत्रातला अनुभव किती दांडगा आहे ते दर्शवतो!)

महाराष्ट्रातील प्रवासी वाहतूकीचा बोजवारा थांबवण्यासाठी तुमच्यासारख्या अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेण्याची सुबुद्दी नव्या भाजप-शिवसेना सरकारला आली तर फार बरं होईल!

सह्यमित्र's picture

11 Aug 2014 - 3:46 pm | सह्यमित्र

वर्णनावरून हा प्रवास मुंबईत बेस्ट बस ने केलेला वाटतो. माझ्या मनात PMT च्या तुलनेत बेस्ट चे फारच चांगले चित्र आहे. स्वच्छ धुतलेल्या बस, वेळेवर मिळणारी बस, बर्यापैकी नम्र चालक आणि वाहक, बस ची चांगली देखभाल दुरुस्ती इत्यादी . ह्या तुलनेत PMT म्हणजेच सर्वच बाबतीत पूर्णपणे hopeless अशी आहे.

आपण वर्णन केलेली अशी कळकट जुनाट देखभाल न केलेली बस बेस्ट ची होती? असेल तर जर आश्चर्य वाटण्या सारखे आहे मुंबई बाहेरच्या माझ्या सारख्या माणसांना .

वेल्लाभट's picture

11 Aug 2014 - 4:03 pm | वेल्लाभट

वर म्हटल्याप्रमाणे मुंबईतल्या मुंबईत मंत्रालयास जाणारा लाल डबा होता तो. अनेकदा जातो मी त्याने.

लाल डब्याने जाणं बंद करा, असे त्रासदायक विचार येणार नाहीत मग ! ;)

वेल्लाभट's picture

11 Aug 2014 - 4:58 pm | वेल्लाभट

ब........रं !

सह्यमित्र's picture

11 Aug 2014 - 4:28 pm | सह्यमित्र

म्हणजे बेस्ट ची बस नव्हती तर. मग ठीक आहे. ST बसेस देखील बऱ्याच बऱ्या असतात हल्ली (खेडेगावातील जवळपास फेऱ्या करणाऱ्या सोडून ). PMT अथवा PMP बद्दल मात्र न बोललेलेच बरे.

बेस्ट एवढ्या भंगार कधीच नाहीत, नव्हत्या.

-७,११,२२,२५,६४,१६९,१७२,३४०,४११,५११ की ५२१ सगळ्या बसने प्रवास केलेला

वेल्लाभट's picture

11 Aug 2014 - 4:11 pm | वेल्लाभट

हे बाकी खरं आहे. वाद नाही त्यात.

रघुपती.राज's picture

11 Aug 2014 - 5:20 pm | रघुपती.राज

http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/kahihi/entry/st-driver

अलिकदेच हा लेख वाचणात आला. वादमय चौर्यआरोप होउ नये लिन्क देत आहे.

वेल्लाभट's picture

11 Aug 2014 - 5:28 pm | वेल्लाभट

आभार ही लिंक दिल्याबद्दल. आशयात चिकार साम्य. पण वर्णनात नाही. असो.

रघुपती.राज's picture

11 Aug 2014 - 5:44 pm | रघुपती.राज

अहो मी तो लेख येथे चिकट्वला नाही... कारण मटाचा लेख येथे आनणे माझे वाड्मय चौर्य झाले असते. तुमचा लेख आनि हा लेख पुर्नतः वेग्ळे आहेत.

वेल्लाभट's picture

11 Aug 2014 - 6:12 pm | वेल्लाभट

बर बर बर !
माझी समजण्यात गल्लत झाली मग. :)

पैसा's picture

11 Aug 2014 - 10:32 pm | पैसा

लिखाण आवडले. सरकारी महामंडळाचे बस ड्रायव्हर्स खाजगी बसगाड्यांपेक्षा बरेच सुरक्षित ड्रायव्हिंग करतात असा अनुभव आहे.

बर्‍याच वर्षांपूर्वी एकदा आम्ही गोव्यातल्या कदंबा महामंडळाच्या बसने बेळगावहून गोव्याला येत होतो. रात्र झाली होती आणि पाऊस खूप होता. अनमोडचा घाट सुरू होता होता काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि बसचे हेडलाईट्स आणि वायपर्स बंद पडले. दुरुस्त होण्यासारखी परिस्थिती नव्हती. खाजगी गॅरेजे पण नाहीत, कारण तो सगळा जंगलाचा भाग आहे. मात्र ड्रायव्हरने बस न थांबवता चालूच ठेवली. जंगल असलं तरी त्या रस्त्याला ट्रॅफिक बरंच असतं. निव्वळ येणार्‍या-जाणार्‍या गाड्यांच्या उजेडाच्या मदतीने २० किमी चा घाट त्या ड्रायव्हरने सहीसलामत पार केला. एकदा घाट उतरल्यावर गोव्यात सगळीकडे रोडलाईट्स आहेत, त्यामुळे पुढे फार प्रॉब्लेम वाटला नाही. मात्र घाट उतरेपर्यंत आम्ही जीव मुठीत धरून बसलो होतो. ड्रायव्हर कंडक्टर मात्र बिनधास्त होते. कदाचित त्यांना या प्रकारांची सवय असावी. आता कदंबाच्या बसेस सगळ्या चकचकीत दिसतात. तेव्हा मात्र एस्टीसारखेच डबे असायचे! या ड्रायव्हरांना खरंच सलाम!

वेल्लाभट's picture

12 Aug 2014 - 10:12 am | वेल्लाभट

_/\_
अगदी !

पोटे's picture

12 Aug 2014 - 8:39 am | पोटे

मुंबई पनवेल नवी मुंबईतील बस सेवेबद्दल आदर आहे

मार्मिक गोडसे's picture

12 Aug 2014 - 12:18 pm | मार्मिक गोडसे

वाजवी दरात शहर व ग्रामीण भागात सुरक्षित सेवा देणार्‍या एसटीच्या साध्या बसला कुत्सितपणे लाल डबा असे म्हटले जाते. मला तर एशियाड बसपेक्षा साधी बसच अधिक आरामदायक वाटते. खाजगी बसच्या तुलनेत एसटीचे अपघात कमी होतात. रस्त्यात एसटी बंद पडल्यास प्रवाशांना पर्यायी सेवा उपलब्ध केली जाते त्यामुळे एसटी बेस्टच.

वेल्लाभट's picture

12 Aug 2014 - 1:52 pm | वेल्लाभट

सहमत ! +१

नाव आडनाव's picture

12 Aug 2014 - 5:27 pm | नाव आडनाव

एस.टी. ला लाल डबा म्हणणं मला पण आवडत नाही. मी लहान असताना बरेचदा पेपर ला बातमी असायची कि एस. टी. चा कुणीतरी ड्रायवर निवृत्त झाला आणि त्याने एकही अपघात केला नाही म्हणून त्याचा सत्कार केला. असं किती खासगी गाड्यांच्या ड्रायवर बद्दल सांगता येईल? एवढंच नाही तर सणासाठी ज्यादा गाडी, विद्यार्थ्यांना सवलतीचे पास, अपंगाना सवलत, वृद्धाना सवलत कितीतरी चांगल्या योजना आहेत एस.टी. च्या. आधीच्या काळी (७०-८० जेंव्हा माझे वडील शिकायला होते) बाहेर शिकायला असलेल्या विद्यार्थ्यांचा डबा सुधा हे लोक विनामूल्य (अर्थात स्तंड पर्यंत) नेउन द्यायचे. दिवाळीच्या वेळी खासगी गाड्या वाले लोक दुप्पट / तिप्पट भाडं घेतात, एस.टी. चं भाडं अचानक कधीही वाढत नाही.

कवितानागेश's picture

12 Aug 2014 - 7:52 pm | कवितानागेश

आवडला लेख.

मधुरा देशपांडे's picture

13 Aug 2014 - 7:21 pm | मधुरा देशपांडे

लेखातील भावनेशी सहमत.

पाषाणभेद's picture

15 Aug 2014 - 10:26 pm | पाषाणभेद

एस टी अन त्यातील कर्मचारी हे सारे माझ्या मनाचे हळवे कोपरे आहेत. त्यांच्या हालाखीच्या परिस्थीतीची जाणीव ठेवून आहे. त्यातून त्यांचा उद्धार होवो.

खटपट्या's picture

15 Aug 2014 - 11:12 pm | खटपट्या

एसटी, बेस्ट बस चे चालक हे माझ्या दृष्टीने गौतम बुद्धाचा अवतार आहेत. डोकं शांत ठेवून मुंबईच्या बेशिस्त रहदारी मध्ये एवढे मोठे धूड चालवणे म्हणजे कर्मकठीण काम आहे. परत कोणाला धक्का लागला तर हमरी तुमरी वर येणार.

मागे एकदा वाचले होते कि, बेस्ट चालकाच्या हातून अपघात झाल्यास त्याला पुढील पाच दिवस प्रजापिता ब्रह्मकुमारी यांच्या केंद्रात/आश्रमात पाठवतात. त्याचे मन शांत झाले कि परत त्याला कामावर घेतात. आपल्या हातून कोणताही अपघात झाल्यावर तो लगेच विसरणे कोणत्याही संवेदनशील माणसाला कठीणच असते. आणि त्यात परत गाडी चालवणे म्हणजे अजून एका अपघाताला आमंत्रण….

आशु जोग's picture

16 Aug 2014 - 12:46 am | आशु जोग

कुणी मेंबर आहे का एस टी चालक

रेवती's picture

16 Aug 2014 - 4:20 am | रेवती

लेख आवडला.

गणपतीला घरी चाललो होतो. २२.३० ची कोल्हापुर बस रात्री १.३० ला स्वारगेटहून निघाली. कात्रज आणी खंबाटकी घाट पार करतानाच बसची आणी चालकाची परिक्षा होती. सातार्‍याजवळ बस बंद पडली. मी चालकाच्या मागच्या सीटवर होतो. माझ्या ऑटोमोबील इंजीनियर आणी त्या गाडीच्या ड्रायव्हरने इंजीनचे कव्हर खोलले. कुठला तरी नट्-बोल्ट तुटला होता की ज्यामुळे "अ‍ॅक्सलरेटर" काम करत नव्हता. शेवटी एक लांब वायर कुठेतरी बांधली त्यांनी. जेंव्हा अ‍ॅक्सलरेट करायचे आहे तेंव्हा, ड्रायव्हरने ती वायर ओढायची असे ठरले.
गाडी सुरु तरी झाली पण गियर बदलताना त्रास व्हायला लागला. शेवटी कंडक्टर त्या इंजीनच्या मागे बसला. आणी संकेत ठरवला गेला. "वड" म्हटलं की "ओढायचं", "सोड" म्हटलं की "सोडायचं". अशी सर्कस करत गाडी कराड डेपोत आणली. हे सगळं करताना दोघांचे विनोद चालले होते, मंडळाला शिव्या-शापसुद्धा चालले होते. पण कुठेतरी राग असणारच मनात. मग निघतो कधी कधी आमच्यासारख्या प्याशेंजरवर. :( पर्याय नाही.

असंका's picture

22 Sep 2014 - 9:22 am | असंका

__/\__

धन्य आहात आपण जे हे सगळं याची देही बघू शकलात!!!

(व्हिडीओ घेतलाय का हो?)

नाखु's picture

22 Sep 2014 - 12:58 pm | नाखु

म.रा.प.म. मध्ये.
लोकांच्या रोषाची फक्त वाहक आणि चालक यांनाच झळ पोहोचते (थोडीफार वाहनाला पण) पण केबीनवाले गेंडा-कातडी आणि मा*मंत्री-संत्री मात्र नामानिराळे राहून एष-आरामात राह्तात.
==
मा* चा अर्थ आपल्या वकूबानुसार घ्यावा.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Sep 2014 - 10:26 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मला एस.टी. वाल्यांविषयी सहानुभुती आहे. आजपर्यंत जेवढेवेळा एस.टी. नी प्रवास केलाय तेवढेवेळा कर्मचार्‍यांची वागणुक सौजन्याचीच राहीली आहे.

पी.एम.पी.एम.एल. मधे सौजन्य वाले लोकं भरती करायला बंदी असावी.

दुश्यन्त's picture

27 Oct 2014 - 5:32 pm | दुश्यन्त

एस टी आपली आवडती आहे.भरपूर प्रवास केला आहे महामंडळाच्या एसटीने!