किल्ले तिकोना उर्फ वितंडगड !

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in भटकंती
5 Aug 2014 - 8:03 am

सुधागड ट्रेक जवळ जवळ ठरलेला होता. सगळं सेट होतं, पावसाने अप'सेट' करेपर्यंत. जुलै च्या अखेरीस जाग्या झालेल्या पावसाने सुधागड ट्रेक धुक्यात ढकलला. पण दोन महिन्यांचा ट्रेकुपवास सोडायचा मुहूर्त आम्हाला सोडायचा नव्हता. केवढा पाऊस पडतोय, दरडी कोसळतायत, अशात सुधागड.... नको ना!... मग?.... मग तिकोना ! अशा प्रकारे तिकोना ट्रेक ठरला. त्यानुसार क्रिपया ध्यान दे; पाली जानेवाली गाडी आज पवना जाएगी. अशी सूचना घुमली.
a
a
शिवभक्त अनिकेत, स्वानंद (कुरकुरे), नवा गडी अनुप आणि मी असा आमचा चमू होता. सकाळी साडेपाच वाजता आमची एक्सप्रेस कळवा नाक्यावरून सुटली ती थेट आठ वाजता तिकोनापेठेत पोचेपर्यंत नॉनस्टॉप. सुजीत मोहोळ यांचा संपर्क आम्हाला एका ब्लॉगवरून मिळाला होता. त्यांच्या घरी आम्ही पोचलो. लवकर निघाल्यामुळे सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडत होतेच. त्यांना शांत करण्याचं काम सुजीतने दिलेल्या चविष्ट पोह्यांनी आणि चहाने चोख केलं.
a
a
तिकोना पेठ गाव सुमारे सातशे आठशे वस्तीचं आहे. गावापासून गडापर्यंत जायला गाडीरस्ता आहे. पायवाट जिथून सुरू होते तिथे आम्ही आमची गाडी पार्क करून, बॅगा घेऊन सज्ज झालो. चाकांची लाल माती चाखून झाली होती आता आमच्या बुटांचं काम सुरू झालं होतं. ट्रेक छोटा, सोप्पा असल्याची कल्पना होतीच, त्यामुळे यावेळी आम्ही एरवीपेक्षा जास्त निवांत होतो.
a
a
पावसाच्या झालेल्या भरपूर कृपेमुळे जिकडे बघावं तिकडे हिरव्या रंगाच्या छटेछटेची पखरण झालेली होती. झाडं डवरलेली होती, दवबिंदूच्या मोतीमाळांनी सजलेली होती. सावकाश गतीने, फोटो काढत आमची वाटचाल सुरू होती.
थोडंसं अंतर चढल्यावर आम्ही एका डोंगरसोंडेवर येऊन पोचलो. ही सोंड डावीकडे एका डोंगरास जाऊन मिळते. इथे थोडे फोटो काढून मग उजवीकडे वळून पुन्हा गडाच्या पायवाटेला लागलो. पुढे गेल्यावर हनुमानाचं दगडात कोरलेलं एक विशाल शिल्प लागतं. पनवतीला आपल्या पायाखाली घेतलेलं हे शिल्प विलक्षण सुंदर आहे. इथून पुढे एक गुहा लागते. ही अतिशय सुरेख जागा आहे. इथे एक गुहा, गुहेच्या बाजूला देवीचं देऊळ, त्याला लागून एक ध्यानमंदिर आहे. देवळाचे पुजारी तिथेच राहतात. या गुहेच्या समोर एक मोठं पाण्याचं कुंड आहे. ती जागा इतकी अवर्णनीय होती की ध्यानमंदिरात न जाताही काही क्षण आम्ही ध्यानस्थ झालो.
a
a
a
पुढे वाटेत एक चुन्याचा घाणा लागतो. किल्ल्याच्या बांधकामासाठी त्याचा उपयोग नक्कीच झाला असावा. काही वेळातच बालेकिल्ल्यापर्यंत येऊन ठेपलो. बालेकिल्ल्याला जायला सुमारे ३०-३५ खड्या चढणीच्या पाय-या पार करायच्या होत्या. ट्रेकमधला त्यातल्या त्यात आव्हानात्मक भाग म्हणजे या पाय-या. इथे दगडावर आधाराला एक वायर लावून ठेवलेली आहे जिचा पावसाळ्यात निसरडं झाल्यामुळे नक्कीच उपयोग होतो. त्या पाय-या पार करून आम्ही बालेकिल्ल्यावर पोचलो. इथे एक महादेवाचं देऊळ आहे. देऊळ अतिशय सुरेख आहे, समोर नंदीची प्रतिमा आहे. देवळाजवळच आम्हाला सुजीत मोहोळ भेटले.
a
a
a
सुजीत मोहोळांबद्दल लिहिणं जरूरीचं आहे. सुजीत हे या गडाचे गडपाल आहेत. त्यांची ही ओळख त्यांनी आम्हाला चहा पोहे दिले तेंव्हाच झाली होती. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारायला आम्ही उत्सुक होतो. खरं तर आम्ही गडावर कचरा दिसल्यास तो उचलायचा, थोडासा का होईना, गड स्वच्छ राखण्यात आपला हातभार लावायचा असा बेत करून आम्ही आलो होतो. परंतु गडावर येईपर्यंत एकही प्लॅस्टिकची पिशवी, बाटली, इत्यादी कचरा आम्हाला दिसला नाही. देवळाजवळ सुजीत मोहोळांशी गप्पा मारताना त्यांच्या कामाचा अंदाज आला. दररोज गडावर जाणे, साफसफाई करणे, गैरप्रकार घडताना दिसल्यास त्यास रोखणे, असं काम ते गडपाल या नात्याने करतात. त्यांना येणा-या अडचणी अनेक आहेत. घरगुती ते कॉर्पोरेट अशा सर्व प्रकारच्या पर्यटकांच्या गर्दीत शिवरायांचा, गडकिल्ल्यांचा, आपल्या संस्कृतीचा मान राखणारे, पावित्र्य जपणारे लोक कमीच असतात. त्यामुळे अविरत साफसफाई अनिवार्य ठरते. असं असतानाही अतिशय सुस्थितीत, आणि स्वच्छ ठेवलेला हा गड बघून मन सुखावतं. त्याबद्दल सुजीत मोहोळांचे अनेक आभार आणि फेसबुकावर म्हणतात तसं, #आदर. (तुम्हाला किल्ले तिकोना ला जायचं असल्यास सुजीत मोहोळ यांच्याशी जरूर संपर्क साधा. मो. 9545863824)
a
देवळाच्या मागे एक ध्वजस्तंभ आहे. तिथला जीर्ण झालेला भगवा आम्हाला बदलता येईल का, अशी आम्ही सुजीतना विचारणा केली असता, त्यांनी संमती दर्शविली. आम्ही नवीन भगवा झेंडा घेऊन गेलो होतो. मग त्यांच्या मदतीने तिथे तो नवीन भगवा चढविला. सोसाट्याच्या वा-यावर जेंव्हा ती केशरी पताका फडकली, त्या क्षणीचे मनात दाटलेले भाव अविस्मरणीय होते. अंगावर एकच काटा आला, आणि मुखात घोषणा, जय भवानी... जय शिवाजी...
a

हा किल्ल्याचा सर्वोच्च भाग होता. इथे पावसाच्या शिडकाव्यासोबत भन्नाट वेगाने गार वारा वाहत होता. दहा एसींचा एकत्र झोतही जितकं सुख देणार नाही तितकं सुख इथे मला मिळत होतं. शुद्ध हवा, स्वच्छ हवा, अँड द साउंड ऑफ विंड... That awesome moment when you find what you are alive for, and what you can die for.
a
a
a

परतीच्या वाटेवर सुजीतशी पुन्हा जरा गप्पा मारून गड उतरायला सुरुवात केली. थंडगार हवेने कुडकुडलेलं असताना चुलीवरची गरमागरम पिठलं भाकरी समोर असेल तर नाही म्हणेल तो केवळ मूर्ख. वरती म्हटलेल्या चुन्याच्या घाण्याजवळ एका छोट्याश्या झोपडीत चहा, पिठलंभाकरी, भजी अशी लज्जतदार मेजवानी मिळते. सुजीतच्या आईंचाच हा स्टॉल आहे. इतकं चविष्ट पिठलं, आणि इतकी सुरेख आमच्या समोर भाजलेली भाकरी खाऊन जी तृप्तता मिळालीय राव !... स्वर्गसुख म्हणतात ते हेच. तिथे पोटं भरून उरलेला गड उतरलो. एव्हाना आमच्या गाडीसोबत सात आठ अधिक गाड्या, अनेक दुचाकी उभ्या होत्या. एक मिनिबसही होती. सुजीत मोहोळांचं काम वाढणार होतं.
a
a
a
a

आम्ही परतीच्या वाटेला लागलो. वाटेत लोणावळ्याजवळ सन्नीज ढाबा ('तो' सन्नी बरं का) मधे व्हेज हंडी आणि रोटी खाल्ली हे सांगायला खरं तर आवडत नाहीये, कारण पिठलं भाकरी समोर खरंच ते झक मारेल असं होतं. पण इलाज नव्हता, सॉलिड भूक लागली होती. सहाच्या ठोक्याला बॅक टू पॅव्हिलियन पोचलो होतो. एक छोटा, सोपा पण सुंदर, डोळ्यांचं पारणं फिटवणारा, गार वा-याने आम्हाला शहारवणारा ट्रेक झाल्याचा आनंद होता. पण एसीला लाजवेल असा तो थंडगार वारा सोबत घेता न आल्याची एक बालिश नाराजीही होती.
a
a

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

5 Aug 2014 - 8:46 am | खटपट्या

सर्व फोटो मस्त !!!

चौकटराजा's picture

5 Aug 2014 - 9:03 am | चौकटराजा

सर्व चित्रे झ्याक पण जरा खाली तपशील दिला तर काय होईल रे . भावा ?.

वेल्लाभट's picture

5 Aug 2014 - 10:50 am | वेल्लाभट

मी आपलं परिच्छेदानुसार चित्र टाकलियत... पण नक्की. नेक्स्ट टाईम.

प्रचेतस's picture

5 Aug 2014 - 9:04 am | प्रचेतस

मस्त फोटो आणि वर्णन.
बाकी तिकोन्याचं दुसरं नाव 'वितंडगड' आहे.
समोरच्या तुंगला 'कठीणगड' म्हणतात.

वेल्लाभट's picture

5 Aug 2014 - 10:48 am | वेल्लाभट

बदल केला :)

प्रभाकर पेठकर's picture

5 Aug 2014 - 9:15 am | प्रभाकर पेठकर

छान लिहीलं आहे. प्रत्यक्ष गडाची, बालेकिल्याची अजून छायाचित्र असती तर गडाचं चित्र मनांत नीट उभं राहिलं असतं. गडावरून दिसणार्‍या निसर्गाची, डोंगरदर्‍यांची छायाचित्र मस्तंच आहेत.
'सनी'ज धाबा म्हणजे तोच का जिथे प्रसिद्ध गरमागरम जिलेबी मिळते?

वेल्लाभट's picture

6 Aug 2014 - 10:17 am | वेल्लाभट

होय तोच तो

गुहेच्या समोरचा फोटु निव्वळ अप्रतिम.
बघता बघता आम्हीच ध्यानस्थ झालो म्हाराजा

झक्कास !!! मस्त फोटो आहेत राव.

कंजूस's picture

5 Aug 2014 - 9:17 am | कंजूस

फोटो छान आहेत .
मी २००४ मार्चमध्ये गेलो होतो तेव्हा वरती कोणीच राहत नव्हते .वरती संध्याकाळी पवना धरणातल पाणी छान चमकते .त्यात तुंगि पाय सोडून बसल्यासारखा वाटतो .देवळाखालच्या टाकीतलं पाणी पिण्याचं आहे .त्यावेळीही गडावर कचरा नव्हता .गडांवर वस्ती करायला आसरा असला की कचरा फार होतो .( कचऱ्याचा राजगड पाहा ) जातांना तिकोनापेठ गावातल्या वाटेने गेलो होतो .रात्री आकाशदर्शन जेमतेम झाले .एक्सप्रेसवेचा उजेड भयानक येतो .सकाळी झेंड्याखालच्या घसरड्या वाटेने थेट गव्हणे गावात(नाक्यावरचे) वीस मिनीटात आलो .
पवना धरणातले गाव गव्हणे गावात पुनर्वसित झाल्यावर तिकोनापेठेतले लोकही इकडे आले .तिकोनाची तिसरी धार उजवीकडे मागच्या एका गावात उतरते .कॉलनीतली एक वाट विसापूरकडे जाते .

स्वत:चे वाहन नसल्यास कसे जावे :

मुंबई-(पनवेल ०७.४५)-लोणावळा-कामशेत-पवनानगर कॉलनी/काळे कॉलनी -गव्हणे( तिकोना नाका ११.००) -पौड बस उपयोगी आहे .
परतीसाठी सकाळी सवाआठ आणि दुपारी दोनची कामशेत बस आहे .कामशेत ते लोणावळा जाऊन कोयना गाडी ५.२०ला आहे .

वेल्लाभट's picture

6 Aug 2014 - 10:18 am | वेल्लाभट

वा.. माहितीत भर !
थँक्स

सुहास झेले's picture

5 Aug 2014 - 9:56 am | सुहास झेले

सहीच :)

वेल्लाभट's picture

6 Aug 2014 - 10:18 am | वेल्लाभट

@ सगळे
धन्यवाद्स

किसन शिंदे's picture

6 Aug 2014 - 11:13 am | किसन शिंदे

मस्त फोटो रे.. गेल्या वर्षी जूनला गेलो होतो तिकोनाला. गडाचा एकुण आकार त्रिकोणी आहे म्हणून त्याला तिकोना नाव पडलं असावं कदाचित.

>> गेल्या वर्षी जूनला गेलो होतो तिकोनाला.
तेच आठवलं.

स्वाती दिनेश's picture

7 Aug 2014 - 12:19 am | स्वाती दिनेश

धुक्यात लपेटलेला हिरवाकंच तिकोना आवडला,
स्वाती

एस's picture

11 Aug 2014 - 11:52 am | एस

अगदी असंच.

आम्ही पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा हा किल्ला अपेक्षेपेक्षा खूपच सुंदर आणि देखणा निघाला होता. नंतर तुंग-तिकोण्याच्या अगणित वार्‍या झाल्या!

छायाचित्रे अप्रतीम आहेतच. वर्णनेही छान. धन्यवाद!

प्यारे१'s picture

7 Aug 2014 - 12:38 am | प्यारे१

खूप मस्त फोटो.

जबराट आले आहेत सगळे फोटो व वृत्तांत पण मस्तच.

तिमा's picture

11 Aug 2014 - 1:01 pm | तिमा

तुंग-तिकोन्याला जायचे राहूनच गेले होते. आज, तुमचे फोटो बघितले आणि डोळ्याचं पारणं फिटलं!

लोणावळा -घुसळखांब रस्त्याने तुंग -मोरबि -तिकोना असे कोणी गेले आहे का ?