माझे साईपदयात्रेचे अनुभव - ४

कविता१९७८'s picture
कविता१९७८ in भटकंती
4 Aug 2014 - 10:09 pm

माझे साईपदयात्रेचे अनुभव - १ - http://misalpav.com/node/28447

माझे साईपदयात्रेचे अनुभव - २ - http://misalpav.com/node/28457

माझे साईपदयात्रेचे अनुभव - ३ - http://misalpav.com/node/28464

माझे साईपदयात्रेचे अनुभव - ४

आजचा ५ वा दिवस होता. दुपारच्या थांब्यापर्यंतचं अंतर जास्त होतं. नेहमीप्रमाणे सकाळी १.३० च्या दरम्यान मंडळाचे सभासद सर्वांना हाका मारुन उठवु लागले. सर्वांनी प्रातःविधी उरकुन , बॅग्ज पॅक करुन, चहा नाश्ता करुन रोडवर गर्दी केली. मी निशाणीवालाच्या बाजुला राहुन चालायला सुरुवात केली. नेहमी प्रमाणे सगळ्यांच्या मागे पडले. पाय दुखु लागले. तरीही चालत होते. रस्त्यावर अंधार असायचा , आजुबाजुचे काही दिसायचे नाही , सुर्य लवकर उगवु नये असं वाटायचं कारण सर्य उगवल्यावर उन खुप लागायचं आणी चालण्याचा वेग खुप कमी व्हायचा. साधारण ६.३० ला सुर्योदय होत असे. ७.३० वाजेपासुन उन्हाचे चटके लागायला सुरुवात होते. रात्री गारवा असल्याने प्रसन्न वाटायचं भराभर चालल्याने बरेचसे अंतर कापले जायचे. ४थ्या दिवसापासुन लवकर उठुन पुढे ४ वाजताच्या दरम्यान रोडवरच एखादया ठिकाणी थांबा घेउन ४५ मिनिटे ते १ तास विश्रांती घ्यायचो. ४ थ्या दिवशी मला उशीर झाल्याने १५ मिनिटांची विश्रांती मिळाली होती पण नंतर खुप उशीर होत असल्याने मी विश्रांतीशिवाय चालत होते आणी माझ्यामुळे माझ्याबरोबर चालणार्यांना सुद्धा विश्रांती मिळत नव्हती. रोज बरोबर सकाळी ५ वाजता टेम्पोत सी.डी. प्लेयर वर साईबाबांची काकड आरती लावली जाते. टेम्पोला मागे लाऊडस्पीकर लावल्याने निदान थोड्या दुरवर असुनही आवाज ऐकु यायचा पण नंतर तोही ऐकु येत नसल्याने आपण कीती मागे राहीलोत याचा अंदाज येत नसे. मला आश्चर्य वाटायचे की माझे भाउ जे डीसेंबर मध्ये पदयात्रा करतात आणि ते हि ६ व्या दिवशी शिर्डीत दाखल होतात ते कसे जात असतील. उन्हाचा तडाखा इतका जास्त नसला तरीही थंडी भरपुर असते आणी दिवसाला ते ५० कीमी अंतर कापतात, शेवटी आपल्या शरीराचं वजन तर आपल्यालाच उचलायंच असतं. कीती त्रास होत असेल त्यांना.

बर्याच वेळाने रोडवरच्या थांब्यावर पोहोचलो तेव्हा सगळे उठुन निघण्याच्या तयारीत होते. आज आराम मिळाला नाही, ५ वाजता काकड आरती सुरु झाली. पुन्हा मागे पडलो. पाय आणी अंगं अतिशय दुखत होते. साधारण ६ वाजेच्या दरम्यान त्र्यंबकेश्वर पार केलं , अंजनेय पर्वत असं काहीसं नाव असलेल्या ठीकाणी मारुतिची खुप मोठी मुर्ती बसवली आहे. पुर्वी हे मारुतीचे जन्मस्थळ आहे असे सर्व मानत व तसा बोर्डही लावला होता. आता बोर्ड बदलुन टाकलाय. जाउन दर्शन घेतले. त्यापुढे ५ मिनिटांवर चहा-नाश्त्याचा थांबा होता. तेथे द्राक्षांचा मळा होता, घरे होती आणि अंगणातच गाईं - म्हशींचा गोठा होता. गेल्या वर्षी गोठा व घरे तोडुन बिल्डींग बांधलीये. नाश्ता करुन थोडावेळ आराम केला. प्रवासाला सुरुवात केली. रस्ता अरुंद व सरळ होता. आता कुठे वाहनं दिसायला सुरुवात झाली. ह्यावारीला गेलो तर त्र्यंबकेश्वरपासुन ते नाशिक ह्या रस्त्याचे एक्स्पांशन होत असल्याने पुर्ण रस्ता खोदल्याने चालायला खुपच त्रास झाला. धुळीच्या लोटांमुळे समोरचे बर्याचदा दिसतही नव्हते. एकेरी रस्ता चालु होता तो पण खडबडीत त्यात वाहनांची ये-जा चालु होती. दुपारचा थांबा मेहरावणी तलावाजवळ नाईक मळ्यात होता. उन चढलं होतं. पायाचे तुकडे पडले होते. अंग दुखत होतं , सुजलं होतं. सगळयात शेवटी १२.३० च्या दरम्यान नाईक मळ्यात जाउन पोहोचलो.

बायका आधीच तळ्यावर गेल्या होत्या. जेवणाची तयारी चालु होती. पुरुषांनी पेरुच्या झाडांखाली आरामासाठी जागा पकडल्या होत्या. २-३ बायका मळ्याच्या राखणदाराच्या घराच्या ओसरीवर बसल्या होत्या. तिथेच बाहेर उन्हात चटई टाकली होती. मी ईतकी थकले होते की सुर्य डोक्यावर होता खुप कडक असुन सुद्धा त्या चटईवर झोपुन गेले. १ तास झोप काढल्यावर उठले, थोडंसं बरं वाटलं . आंघोळीचा स्पॉट लांब होता आणी तितकं चालण्याची माझ्यात ताकद नव्हती मी आजही आंघोळीला सुट्टी द्यायचे ठरवले पण बाजुला बसलेल्या बायकांनी सांगितले की राखणदाराच्या घराच्या मागे छोटं बाथरुम आहे त्याठीकाणी आंघोळ करुयात. घराच्या पाठीमागे कमरेपर्यंत उंचीचे बाथरुम होते वाडीत जरा लांब बाकीचे पुरुष पदयात्री पहुडले होते. मग बसुनच आंघोळ केली तो पर्यंत बायकांनी बाहेर लक्ष ठेवले. एकेकीने अशीच आंघोळ केली तोपर्यंत आम्ही बाहेर लक्ष ठेवले. आता प्रत्येक दिवसाच्या आंघोळीसाठी मी एक एक घर शोधुन ठेवले आहे पण ह्याच थांब्याला कुणी नाही म्हणुन दरवर्षी याच थांब्याला मी आंघोळीला सुट्टी देते कारण जो तलाव आहे तो खुप लांब ही आहे आणी काठावर मिलीटरी कॅम्प असतात, प्रायव्हसी नसते. थोड्या वेळाने बायका तळ्यावरुन आंघोळ करुन आणी कपडे धुवुन येउ लागल्या. आल्यावर सावलीची जागा पकडण्यासाठी भांडाभांड झाली. सगळे बसल्यावर मी सुद्धा एक जागा पकडुन बसले. अंग दुखत होतं पाय कसेबसे टेकवत टेकवत चालत होते. जेवण झाल्यावर कॉम्बिफ्लेम घेउन पुन्हा झोपले. ३ वाजता निघालो, साधारण १० की.मी. चालल्यावर नाशिक मधे प्रवेश करणार होतो. नेहमी प्रमाणे ६.३० - ७ च्या दरम्यान कसे बसे नाशिकच्या सातपुर फायर ब्रिग्रेड स्टेशन वर पोहोचले.

आजचा थांबा तिथेच होता. हातपाय धुवुन थोडा आराम केला. आरती सुरु झाली , आज साईबाबांच्या फोटोत २ महीन्यांपुर्वी वारलेल्या आजीचा चेहरा दिसत होता. मी तिची लाडकी होते. आठवुन आठवुन डोळ्यात पाणी येत होते. जेवणाची तयारी झाली. ५ व्या दिवशीचे जेवण दरवर्षी फायर ब्रिग्रेड वाले देतात. छान भजीचा बेत असतो. १०.३० ला झोपले.

रात्री १२.३० ला सर्व उठलो. आजचा ६ वा दिवस , आज खुप जास्त चालायचं होतं, नाशिक पार करायलाच जवळपास ५-६ तास लागतात. दिवसभराचं अंतर खुप नेहमी खुप जास्त होतं. नेहमी प्रमाणे सुरुवात केली. अगदी १५ मिनिटातच नवीन जोडप्यातील मुलगी जी माझ्यागी मागे चालत होती ती गाडीत बसली. मलाही विचारले गाडीत बसण्यासाठी विचारण्यात आले. मी नकार दिला आणी चालु लागले. चालुन चालुन पाय फूटायची वेळ आली होती. अंग पण ठणकत होतं औषध घेतल्यावर जितका वेळ आराम केला तितका वेळ थोडंसं बरं वाटायचं पण जसं चालायला सुरुवात करायचे तसं दुखणंही चालु. पुर्ण नाशिक झोपलेलं असल्याने रस्ता मोकळा होता,, स्ट्रीटलाईटस असल्याने उजेड होता. खुप चालल्यावर साधारण ४.००-४.१५ ला फुटपाथवर आराम करायला मिळाला. मंडळी आधीच पोहोचली होती. मला ३० मिनिटांचा आराम मिळाला पण दुखण्यामुळे गाढ झोप नव्हती. पुन्हा उठुन चालायला लागलो. नाशिकचा शेवटचा फ्लायओवर पार केला, खाली रेल्वे स्टेशन होतं आणी सर्वांना नाशिक पार केल्याचा आनंद झाला. आजचा रस्ता सपाट असल्याने आणी गमछाचा सपोर्ट असल्याने आज मी नेहमीपेक्षा थोडं लवकर चालत होते , तरीही सगळ्यांच्या मागे होते, जवळपास अर्धा तास मागे होते. पुढे चहा नाश्त्याच्या थांब्यावर ७.३० वाजता पोहोचले. नाश्ता केला आणी झोपुन गेले, तेवढ्यात पदयात्री पुरुषांमधे भांडण जुंपले तेही एका अति क्षुल्लक कारणावरुन. थोड्यावेळाने निघालो. दुपारचा थांबा सिन्नर घाटाखाली होता. तो पर्यंत खुप (जवळपास १८ की.मी.) चालायचे होते. सुरुवात केली. खुप उन होतं, खुप वाईट अवस्था झाली. जवळपास बाकी मंडळींपासुन १.३० ते २.०० तास मागे पडले. सरळ रोड होता. रस्ता खुपच अरुंद होता. दोन्ही बाजुंनी वाहनांची खुप वर्दळ होती. वोल्वो बसेस, साध्या बसेस , कार व दुसरी पदयात्री मंडळे सगळे एकत्र आल्याने चालणे कठीण वाटत होते. उन्हाचाही खुप त्रास व्हायला लागला. शेवटी १२.३० ला सिन्नर घाटाजवळ पोहोचलो. आधीची लोकं १०.३०-११.०० लाच पोहोचली होती.

मी पोहोचल्या पोहोचल्या झोपुन गेले. बर्याच वेळाने उठुन आंघोळीला गेले. आंघोळीचा स्पॉट इथुन अजुन अर्धा की.मी. लांब होता. आंघोळ करुन परतले. तो शिर्डी संस्थानची अॅम्ब्युलन्स आली, डॉक्टर्स होते. सर्वांना मोफत गोळ्या, ऑईंटमेंट, ईलेक्ट्रालच्या पाउडरचे सॅशे मिळाले, स्प्रे मारला. थोड्यावेळाने जेवण सुरु झाले. उन खुप होते पण संध्याकाळ्चे अंतरही जास्त असल्याने ३ वाजता निघण्याचे ठरले. उन खुप असल्याने मी टोपी पाण्यात भिजवुन घातली आणी चालु लागलो. लगेचच सिन्नरचा घाट लागला, सर्वांच्या मागे होते पण मंडळी दिसत होती. सिन्नरचा घाट लागल्यावर थोडं पुढे जाउन थांबलो इथे कुणीतरी पदयात्रींना नाश्ता देत होते. बसलो, बरे वाटले. नाश्ता झाल्यानंतर चालु लागलो. बर्याच वेळाने सिन्नर बसस्टॉप जवळ आलो. इथंनं मार्केटमधुन शॉटकर्ट मारला तेवढंच अर्धा कीमी अंतर कमी झाले सिन्नर सोडुन लगेचच एका मंदीराचे बांधकाम चालु होते तिथे चहा - नाश्त्याचा थांबा आला. थांबलो , थोडा पायाला आराम मिळाला, थोड्या वेळाने निघालो. मंदीराचे बांधकाम आजही पुर्ण झालेले नाही.

खुप वेळ चालत होतो. बाकीची पदयात्री मंडळे ही बरोबर होती. माझी अवस्था खुप वाईट होती. तरीही चालत होते. खुप वेळाने मुसळगाव इथे रात्रीच्या थांब्यावर पोहोचलो. सर्व आधीच पोहोचुन फ्रेश झाले होते. मी पोहोचले थोडा आराम केला. मग फ्रेश झाले. रात्रीचे जेवण ज्यांच्या अंगणात थांबतो त्यांच्या तर्फे होते. जेवुन झोपले. ६ दिवस पार पाडल्याचा आनंद होता. आता फक्त ७ व्या दिवशी सकाळी भरपुर चालायचे होते. आणी ८ व्या दिवशी फक्त १४ कीमी चालुन सकाळी ९.३० ते १०.०० वाजेपर्यंत शिर्डीत पोहोचणार होतो. पण सगळे सांगत होते कि हा ७ वा दिवसच खुप कठीण आहे.

प्रतिक्रिया

राजेश घासकडवी's picture

4 Aug 2014 - 11:13 pm | राजेश घासकडवी

चारही लेख वाचले. वाचून काहीशी निराशा झाली. कारण सर्व लेखांत चालण्याच्या प्रक्रियेबद्दलच्या तक्रारींपलिकडे काही हाती लागलं नाही. अशा प्रकारची वारी/पदयात्रा/परिक्रमा करणाऱ्या अनेकांना त्या प्रवासाच्या वातावरणातून काही तरी हाती लागतं. दिवसभर भजनं म्हणत, विठ्ठलाचं नाव गात, दररोजचं आयुष्य विसरून देवाचा ध्यास घेतलेल्या इतर समरस लोकांबरोबर वेळ घालवणं हाच एक आध्यात्मिक अनुभव असू शकतो. काहींना नर्मदेच्या प्रवाहातून काहीतरी मानसिक शक्ती मिळते. माझा स्वतःचा देवावर विश्वास नसला तरी अशा भाविकांंचा भाव कुठेतरी मनात पोचतो, आणि त्याचं कौतुक वाटतं.

या सर्व लेखनात असं काहीच तुमच्या हाती लागल्याचा उल्लेख नाही. पायाचे फोड, भरपूर अंतर, उन्हाचा त्रास, जास्त वेगाने चालणं न जमणं, प्रवासात होणारी कुचंबणा... एवढंच फक्त आलेलं आहे. त्याबद्दल सहानुभूती वाटतेच. पण त्यापलिकडे काय? ही पदयात्रा तुम्ही खरोखरच करायला हवी होती असं वाटतं का? ती करून तुमच्या पदरी काय पडलं याचा उल्लेख आला नाही, तर वाचकाच्याही पदरी फार काही पडणार नाही असं वाटतं.

पदयात्रा करणं किती अवघड आहे हे कळलं पण ह्या सगळ्या त्रासातून जाण्यामागची भावना / इच्छाशक्ती अजून दिसत नाही.

प्रभाकर पेठकर's picture

5 Aug 2014 - 12:45 am | प्रभाकर पेठकर

मागच्या तिन भागांपेक्षा हा भाग जास्त मुद्देसुद वाटला. पुढील भागांच्या प्रतिक्षेत आहोत.

आत्ता एकदम सगळे भाग वाचले.

रामपुरी's picture

5 Aug 2014 - 3:36 am | रामपुरी

उद्देश अजूनही समजला नाही. गमछाचा उल्लेख समजला नाही. जर बाजूची माणसे ओढत नेतात असा अर्थ असेल तर सरळ गाडीत बसून जायला काय हरकत आहे? जर उद्देश फक्त मानसिक शक्ती, आत्मबळ वगैरे वाढवायचे असेल तर शिर्डीच का? जर एवढा त्रास होत असेल तर हे पदयात्रा वगैरे नक्की कशासाठी?

कवितानागेश's picture

6 Aug 2014 - 10:56 pm | कवितानागेश

मी १३ वर्षाची असताना जेंव्हा पहिला ट्रेक केला तेंव्हा मलापण बरोबरच्या दादा लोकांनी असंच ओढून नेलं होतं! :)

खटपट्या's picture

5 Aug 2014 - 5:45 am | खटपट्या

हाही भाग आवडला.

पण घासकडवी साहेब म्हणतात त्याप्रमाणे परिश्रम आणि त्रासाशिवाय अजून काही अनुभव असतील तर सांगावेत. तुम्ही चालत जात असल्यामुळे आजूबाजूच्या गावातील जीवन जवळून बघण्याची संधी मिळाली असेल. रस्त्यात कोणी मदत केली असेल. बरे वाईट अनुभव वगैरे…
फोटो काढले असल्यास ते डकवा, त्यामुळे लेख अजून वाचनीय होईल. हे थोडे रोजनिशी सारख होतंय…

लिहिताय तेही छानच आहे.

कविता१९७८'s picture

5 Aug 2014 - 10:42 am | कविता१९७८

मला लेखनाचा अज्जिबात अनुभव नाही , हे माझे आयुष्यातील पहिलेच लेखन आहे जे मी पहिल्यांदा जुन २०१४ मधे मायबोली या आंतरजालावर प्रकाशित केले. तसेच हे माझ्या पहिल्या पदयात्रेचे अनुभव आहेत जी मी २६ मार्च २००९ ला केली त्यावेळ मला त्रासच इतका झाला होता की आजुबाजुचे जीवन कसे आहे हे पाह्ण्याचे मला सुचलेही नव्हते. अनुभव आहेत ते जसे आलेत तसे लिहिलेत पुढेच्या भागातही आहेत, फोटो मी ह्या ६ वारीला काढले आहेत म्हणुन ते सर्वात शेवटी डकवणार आहे.

तुम्हाला लेखन आवडतेय , तुम्ही आणि सर्वच जण इतक्या गोडीने वाचतायत त्याबदद्ल आभारी आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Aug 2014 - 7:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या साईपदयात्रेचा प्रवास वाचतोय. असा प्रवास आपल्याला समाधान देतो. खूप आनंद देतो. दररोजच्या पिडा सोडून, विसरुन परमेश्वराच्या नामस्मरणात,भजनातअ देहभान हरपून एक उच्चकोटीचा आनंद अशा प्रवासातून मिळतो असे म्हणतात.

आपला प्रवासही उत्तम सुरु आहे, पण वर प्रतिसादात उल्लेख आलाय तसा आपल्या प्रवासात काही तरी साईच्या अनुभूतीची, चमत्काराची, आणि आपल्याला मिळालेल्या आनंदाचे वर्णन यायला हवे होते असे वाटले. आपला प्रवास अजून तरी त्रासाचाच जास्त वाटतोय. अर्थात पुढे काही वळण या प्रवासात येईल असे वाटते.

भौतिक सुखाचाच विचार करुन असा काही प्रवास एखाद्याचं आयुष्य बदलून टाकतो. नव्याने जगण्याची एक उर्मी आत फुलून येते, एक चैतन्य सळसळतं ते व्हावं. अर्थात, अशा आध्यात्मिक अनुभवात खुप वाहुनही जाऊ नये, असे मला वाटते. असो, तो वेगळा विषय.

आपल्या प्रवासाला शुभेच्छा. लेखनही सलग वाचून होते लिहिताय तो अनुभव वाचनीय आहे. लेखावरच्या काही प्रतिसादांचा आदर करुन, आपल्या प्रवासाच्या निमित्तानं आपला अनुभव इथे वाचकांना देत आहात आभार. लिहित राहा.

-दिलीप बिरुटे

स्पंदना's picture

6 Aug 2014 - 9:19 am | स्पंदना

चमत्कारालाच नमस्कार करावा का?
मला तर साध्याभोळ्या गोष्टींनाच नमस्कार करावासा वाटतो सर.
तुळजापुरच्या मंदिरात पालखी गेल्यावर एका शेतकरी जोडप्याने खाली प्रांगणात उतरुन त्या पालखी गेलेल्या ठिकाणचा भंडारा उचलुन ज्या श्रद्धेने कपाळी लावला तो पाहून माझ्या मनात ज्या भावना उफाळल्या त्याच वर्णन मी कोणत्याही शब्दात करु शकत नाही. अन कदाचित त्या जोडप्याप्रति माझी भावना पाहूनच मला अनुभुतीही लाभली.

कविता१९७८'s picture

5 Aug 2014 - 7:54 am | कविता१९७८

धन्यवाद

कविता१९७८'s picture

5 Aug 2014 - 10:07 am | कविता१९७८

आपला प्रवासही उत्तम सुरु आहे, पण वर प्रतिसादात उल्लेख आलाय तसा आपल्या प्रवासात काही तरी साईच्या अनुभूतीची, चमत्काराची, आणि आपल्याला मिळालेल्या आनंदाचे वर्णन यायला हवे होते असे वाटले. आपला प्रवास अजून तरी त्रासाचाच जास्त वाटतोय. अर्थात पुढे काही वळण या प्रवासात येईल असे वाटते.

मी ६व्या दिवसापर्यंतचे रोजचे अनुभव जसे आलेत तसे मांडलेत पुढे मला प्रचिती आली ती त्या दिवशीच्या भागात नक्की लिहिलीये. पहिल्यांदा प्रवास हा सर्वच पदयात्रींना त्रासाचा असतो , कुणी त्रासाबद्द्ल सांगतो कुणी सांगत नाही इतकंच , त्यात २००९ साली माझे वजन ही खुप जास्त होते, भर उन्हाळयात निघाल्याने उन्हाचा त्रास तसेच सतत घाट चढुन चढुन त्रास होतोच. आता खुपच कमी त्रास होतो, शेवटी थोडाफार त्रास तर कुणालाही होणारच कारण वर्षातुन एकदाच ८ दिवस असा प्रवास होतो सलग २५० की.मी चालण्याचा तो पण सर्व सुख सुविधा सोडुन. ह्यावेळेस म्हणजे ६ व्या वारीला ६ व्या दिवशी सकाळच्या नाश्त्याच्या ठीकाणापासुन ते दुपारी सिन्नरच्या घाटाच्या पायथ्यापर्यंत १८ की.मी. आम्ही ९ लेडीज नी नाचत नाचत आणि दोन - दोन जणींनी आलटुन पालटुन पालखी उचलुन अशी नेली (पालखीचे वजन १०-१२ किलो आहे).

कृपया लिहिणे थांबवू नका.
वरच्या काही प्रतिक्रिया वाचून मला अशी भीती वाटली की आपण पुढे लिहावे /प्रकाशीत करावे की नाही असा विचार करताल.
म्हणून विनंती.

कविता१९७८'s picture

5 Aug 2014 - 10:28 am | कविता१९७८

नक्की लिहिन , वरचे प्रतिसाद किंवा एकुण प्रतिसाद ही प्रत्येकाची वैयक्तीक मते आहेत आणि मी त्यांचा आदर करते. पदयात्रा करावी असे पदयात्रींना वाटते तसे ती करु नये हे देखील बाकीच्यांना वाटणे स्वाभाविक आहे. नाण्याच्या दोन बाजु असतातच. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या कारणातुन आत्मिक समाधान मिळतं आणि ते प्रत्येकाच्या आपापल्या मतांवर अवलंबुन असतं त्यामुळे मी प्रत्येकांचा आदर करते.

प्रतिसाद अत्यंत आवडला.आपलीच बाजू कशी योग्य आहे हे तावातावात लिहिणार्‍यांनी जरूर वाचावा! *acute*

स्पंदना's picture

6 Aug 2014 - 9:15 am | स्पंदना

आहे हे अस आहे.
आता तुम्हाला वाद घालायचा, नावे ठेवायची तर जरुर ठेवा हा अ‍ॅटीट्युड आवडला.
लिहीत रहा.

स्पंदना's picture

6 Aug 2014 - 9:15 am | स्पंदना

दृष्टीकोण..

रामपुरी's picture

7 Aug 2014 - 3:19 am | रामपुरी

दृष्टीकोन..

प्रभाकर पेठकर's picture

6 Aug 2014 - 11:09 am | प्रभाकर पेठकर

वादे वादे जायते तत्व बोधः असे संस्कृत वचन आहे. म्हणजेच चर्चेतून, वादातून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं असा सर्वमान्य विचार आहे. पण आता तुम्हाला वाद घालायचा, नावे ठेवायची तर जरुर ठेवा हा अ‍ॅटीट्युड आवडला. म्हणजे तुमच्या वाद घालण्याच्या ईच्छेशी मला कांही देणं-घेणं नाही, अशी जर आपल्या संवेदनांची कवाडं बंद करून घेतली तर ज्ञान कसे प्राप्त व्हावे? असो. ही प्रत्येकाची स्वतःची धारणा असते आणि त्यावर फक्त त्यांचा स्वतःचाच अधिकार असतो. तेंव्हा वाद घालू इच्छित नाही पण 'मला काय त्याचं?' ही वृत्ती खटकते. तशी ती नसावी असे वाटते. एखाद्याला हतोत्साहित करण्यासाठी मुद्दामहून मुद्द्यांना सोडून घातलेला वाद तसेच समोरच्याच्या मतांचा आदर न करता आपलीच मते लादण्याचा प्रयत्न आणि सकारात्मक विचारांनी, विनम्रतेने घातलेला वाद ह्यात फरक करावा आणि त्या नुसार वितंडवाद टाळत, आपली मते मांडत अथवा समोरच्याची मते स्विकारत संवाद चालू ठेवावा.

कविता१९७८'s picture

6 Aug 2014 - 10:45 pm | कविता१९७८

सहमत

सामान्यनागरिक's picture

18 Aug 2014 - 12:27 pm | सामान्यनागरिक

पुढच्या वर्षी कदाचित काही आश्चर्यकारक अनुभव येतील ! पुढच्या वर्षीच्या लेखमालेचा वाट पाहु या !