बाउन्सर्स आणि यॉर्कर्स

फारएन्ड's picture
फारएन्ड in जनातलं, मनातलं
22 Jul 2014 - 9:40 am

क्रिकेट मधे दुर्मिळ होत चाललेला प्राणी. फास्ट बोलर. म्हणजे तो बोलिंग ला आला की "मिडीयम-फास्ट" दाखवतात, व बिचारा आपल्या लिमीट्स मधे राहून "ष्टम्पात" बोलिंग करतो, आणि मग कॉमेण्टेटर त्याला मिलीटरी मिडीयम वगैरे म्हणतात तसा नाही. फास्ट. रिअल फास्ट. डेनिस लिली, होल्डिंग, शोएब, ब्रेट ली, इम्रान, अक्रम, वकार, डोनाल्ड. कोणत्याही पिचेस वर इतर कसलाही सपोर्ट नसला तरी केवळ वेगामुळे सुद्धा बॅट्समनला त्रास देणारा. आणि जेथे स्विंग, बाउन्स आणि कॅरी मिळेल तेथे तर भल्याभल्यांना जमिनीवर आणणारा.

पहिल्या दिवसाचा सुरूवातीचा खेळ. दिग्गज, महान वगैरे फलंदाज खेळायला येतात. अजून बाउन्स किती आहे, स्विंग किती आहे, बोलर किती जोरात आहे याचा अंदाज यायचाय. खेळायला आख्खा दिवस पडलाय. पहिला तास बोलरचा. बॅट्समन स्ट्राईक घेतो, बोलर स्वेटर काढून अंपायर कडे देतो, स्टेप्स मोजत रन-अप आखतो, आणि खरी गेम सुरू होते.

खेळपट्टी 'जिवंत' असेल तर पहिला डावपेच ठरलेला. पहिले ३-४ बॉल्स बाउन्सर्स. त्यात बॉल टाकल्यानंतर फॉलो थ्रू मधे पुढे अर्ध्या पिचपर्यंत जाउन बॅट्समनकडे खुन्नस वाली नजर. "आपल्याशी पंगा घेऊ नको" हा पहिला संदेश. दुसरा म्हणजे फ्रंट फूट वर यायची डेअरिंग आहे का, हा. बॅट्समनला ही लगेच याला धुवायचा आहे म्हणून वाट्टेल तशी बॅट फिरवण्याची गरज नसते. गावसकर म्हणायचा तसा 'पहिला तास बोलरला दिला की उरलेला दिवस तुमचा'. मात्र या पहिल्या तासातच बोलर बरोबर जी गेम चालते त्यातून वाचलात तर. एकतर स्विंग, बाउन्स, किंवा कट होणार्‍या नवीन चेंडूला खेळणे सोपे नसते, त्यात ५-१० ओव्हर्स चा स्पेल असलेला बोलर तुमचे कच्चे दुवे हेरून तुम्हाला उडवू शकतो.

बरेचसे शांत बॅट्समन अशा वेळेस बॅक फूट वर ठाण मांडून बसतात. आणि अशात मग एक प्रचंड वेगात फुल पिच स्विंग होउन येतो किंवा यॉर्कर येतो, आणि बॅट खाली जायच्या आत स्टंप घेऊन जातो. क्लासिक फास्ट बोलर्स विकेट! टेस्ट मॅच मधल्या अनेक जिवंत, सुंदर सीन्स पैकी माझा अत्यंत आवडता. भारतीय बॅट्समन नसेल तर जास्तच. विकेट्स मधे काहीही सपोर्ट नसताना सुद्धा काही फास्ट बोलर्सनी नवीन चेंडू, स्वतःचा वेग व दबदबा यांच्या जोरावर अशा विकेट्स काढलेल्या आपण अनेकदा पाहिलेल्या आहेत. जेथे विकेट्स मधे सपोर्ट असतो तेव्हा तर हे आणखी जोरदारपणे होते.

या अशा काही क्लिप्स. यातील बहुतेक क्लिप्स मधे दोन्ही बाजू दिग्गज आहेत, आपापल्या टीममधले त्यावेळचे मुख्य खेळाडू आहेत आणि त्यांचे एकमेकांबरोबरचे द्वंद्व हे कधीकधी मॅचच्या पेक्षाही मोठे समजले गेलेले आहे.

पहिला होल्डिंग विरूद्ध बॉयकॉट
बॉयकॉट हा इतर तत्कालीन (व अनेक कालीन) इंग्लिश लोकांप्रमाणे स्विंग चांगले खेळणार पण जेन्युइन पेस पुढे बकरा, असा नव्हता. स्लो खेळणारा असला तरी तांत्रिकदृष्ट्या कायमच नावाजलेला होता व विंडीज विरूद्ध चे त्याचे रेकॉर्डही चांगले आहे. त्याविरूद्ध ऐन भरात असलेला "व्हिस्परिंग डेथ" होल्डिंग. त्याच्या तेव्हाचा रन-अप सुद्धा पाहण्यासारखा असे. गवतावरून तरंगत गेल्यासारखा तो जात असे. बहुधा तो जवळून बोलिंग करताना ज्या सहजपणे आवाज न करता पळत यायचा त्यावरून डिकी बर्ड ने ते नाव ठेवलेले होते त्याचे.

खच्चून भरलेले व मिळेल तेथून अजूनही लोक येत असलेले बार्बाडोस चे स्टेडियम. इंग्लंड विरूद्धचा सामना म्हणजे कायमच खुन्नस बाहेर काढायची संधी. होल्डिंग ने टाकलेली ही ओव्हर्स क्रिकेटमधली सर्वात भारी समजली जाते. यात इंग्लिश समीक्षकांची आतिशयोक्ती सोडली तरी ही क्लिप बघता ती सर्वात डेडली ओव्हर्स पैकी नक्कीच असेल. बॉयकॉट चा स्टंप ज्या पद्धतीने उडतो ते सध्याच्या हाय डेफिनिशन क्लिअर पिक्चर मधे, १५ कोनांतून बघायला व स्टंप मायक्रोफोन मधून ऐकायला काय मजा आली असती!

ही दुसरी क्लिप व्हिव रिचर्ड्स विरूध्द डेनिस लिली. या सिरीज चे महत्त्व इतके प्रचंड आहे की पुढच्या १०-१५ वर्षांत विंडीज ने जागतिक क्रिकेट मधे वर्चस्व गाजवले त्याची मुळे येथे होती. लिली, थॉमसन वगैरे प्रचंड वेगवान व आक्रमक बोलर्स नी वेस्ट इंडिज ला एवढे जेरीस आणले की रिचर्ड्सलाही म्हणे या सिरीजच्या मध्यावर मानसोपचार तज्ञ गाठावा लागला होता फॉर्म परत मिळवण्यासाठी (त्याबद्दल त्याचे मत येथे आहे). त्यावेळेस एकूणच लिली भयंकर जोरात होता. त्याचा रन अप बघताना नेहमी शिकार करण्याच्या शेवटच्या टप्प्यात एखादा चित्ता जसा एकदम वेग व इंटेन्सिटी वाढवत जातो तसे वाटायचे. येथे डावपेच तोच. पहिले ३-४ बॉल्स बाउन्सर्स आणि मग एक एकदम आत येणारा. रिचर्ड्स येथे बॉडी लॅन्ग्वेज मधे कितीही बेदरकारी दाखवत असला तरी लिली नक्कीच जिंकला.
(ही क्लिप या सिरीज मधली नाही, पण तरीही या लेखाशी संबंधित असल्याने देत आहे).

ते 'जागतिक वर्चस्वाची मुळे" वगैरे लिहीताना शाळेच्या इतिहासातील "दुसर्‍या महायुद्धाची मुळे व्हर्सायच्या तहात..." वगैरे आठवत होते. त्याचे कारण म्हणजे फास्ट बोलर्स चे महत्त्व क्लाइव्ह लॉईड ने येथे ओळखले व यानंतर लगेच स्वतःच्या टीम मधे त्याला प्राधान्य दिले. मग आधी क्रॉफ्ट, होल्डिंग, रॉबर्ट्स व गार्नर, नंतर क्रॉफ्ट च्या जागी माल्कम मार्शल आला. त्यापुढे वॉल्श व अँब्रोज निवृत्त होईपर्यंत विंडीज कडे कायमच किमान दोन जबरी फास्ट बोलर्स असत.

इम्रान वि ग्रेग चॅपेलः ८१ मधला इम्रान म्हणजे ऐन भरातला. तर चॅपेल थोडा उतरणीला लागलेला असला तरी अजूनही भारी. पुन्हा ठरलेला डावपेच. चॅपेल ला फ्रंट फूट वर येउ द्यायचे नाही. कारण कॉमेंटेटर ने अचूक टिप्पणी केल्याप्रमाणे "A Greg Chappell playing forward is a confident Greg Chappell".. हे पाह्ताना एक जाणवेल की २-३ बॉल्स चॅपेल जसे खेळला ते बघितल्यावर लगेच रिची बेनॉ ने इम्राने ने चॅपेलला 'वर्क आउट' केला आहे हे ओळखले होते. जाणकार कॉमेंटेटर्स जसे बराच काळ बघितलेल्या खेळाडूंचा आज किती फॉर्म आहे ते ओळखतात तसाच प्रकार. रिची बेनॉ ते म्हणतो आणि पुढच्या बॉल वर चॅपेल ची दांडी! चॅपेल म्हणजे वास्तविक प्रचंड "अ‍ॅनेलिटीकल" खेळाडू होता. त्याने स्वतःच त्याच्या प्रत्येक बॉल मधल्या "रिच्युअल" चे खूप वर्णन केलेले आहे. प्रत्येक बॉल नंतर क्रीजवरून बाजूला जाऊन आधीचा बॉल कसा होता, नंतरचा कसा असू शकतो याचे विश्लेषण डोक्यात करून, पुन्हा पुढच्या बॉल वर फोकस करून मग क्रीज मधे तो येत असे. त्यालाही या पेटंट डावपेचाने इम्रानने काढला यावरून प्रत्यक्ष पीच वर वेगळीच गेम चालू असते हे जाणवते.

'खडॅक!" त्याकाळात फक्त ऑस्ट्रेलियातील मॅचेस मधे ऐकू येणारा हा "बोल्ड" चा आवाज. भारतीय बोलर ने काढला तर अजूनच धमाल. १९९२ मधला कपिल म्हणजे खरे तर चांगलाच उतरणीला लागलेला. पण द आफ्रिकेतील व ऑस्ट्रेलियातील पिचेस मधल्या "ज्यूस" मुळे त्या एक दीड वर्षात तो जबरी फॉर्म मधे आला होता. या दोन्ही सिरीज मधे त्याने खूप विकेट्स काढल्या. त्यातही या ऑस्ट्रेलिया सिरीज मधे त्याने सातत्याने अ‍ॅलन बॉर्डर ला उडवला होता. बॉर्डर तेव्हाचा सर्वोत्कृष्ठ फलंदाज समजला जायचा. त्यात कॅप्टन व घरी खेळताना त्याला कपिल ने टारगेट करणे म्हणजे संघाच्या मुख्य बोलर ची जबाबदारी तो बरोबर घेत होता. या मॅच मधे नवा चेंडू घेतल्यावर कपिल कडे बॉल आला आणि तेव्हाचे हे तीन सलग बॉल्स किती डेडली होते ते पाहा. आधी बोर्डर ला लेट स्विंग होणार्‍या बॉल ने उडवला - प्रतिस्पर्धी कॅप्टनचा त्रिफळा काढणे हे बोलर्ससाठी नेहमीच मोठे यश असते- आणि मग फॉर्म मधे असलेल्या डीन जोन्स ला दोन 'ब्रूटल' आउटस्विंगर्स. पहिला जेमतेम हुकला पण दुसरा बरोबर ऑफस्टंपवर!

आणि ही इशांत शर्मा विरूद्ध रिकी पाँटिंग. इशांत शर्मा अजूनतरी वरच्या लिस्ट मधल्या बोलर्स एवढा भारी नसला तरी २००८-२०११ तो व झहीर ही पेअर खूप जबरी जमली होती व भारताच्या एकूण कसोटी क्रिकेट मधल्या तेव्हाच्या वर्चस्वात त्यांचा खूप वाटा होता. इशांत शर्मा ने २००८ च्या पर्थ टेस्ट मधे दोन्ही डावात पाँटिंगला जसा काढला त्यावरून त्याच्यात प्रचंड पोटेन्शियल आहे हे सिद्ध झाले.

"एक और करेगा?"
"हाँ, करूंगा"
२००८ च्या पर्थ कसोटीनंतर ही वाक्ये खूप फेमस झाली होती. त्याआधी पाच वर्षे जगातील सर्वात चांगला फलंदाज असलेल्या पाँटिंगला जवळजवळ तासभर आपल्या स्विंग व बाउन्स ने सतावल्यावर अनिल कुंबळे शर्माचा स्पेल बदलणार होता. पण असे म्हणतात की सेहवाग ने त्याला दिल्ली मधे सलग बर्‍याच ओव्हर्स बोलिंग करताना पाहिलेले होते व त्याने अनिल ला त्याला अजून एक देऊन पाहा म्हणून सुचवले. इशांतला ते अनिल ने विचारल्यावर तो लगेच तयार झाला, व त्याच ओव्हरमधे फायनली पाँटिंगने 'निक' दिली. द्रविड कडे बॉल गेल्यावर तो सुटणे शक्यच नव्हते. या कसोटीत दोन्ही डावात 'पंटर' ला इशांत अजिबात झेपला नाही. क्रिकइन्फोच्या या लेखातही त्याची आणखी माहिती मिळेल.

याही मॅच च्या आधी बरेच काही झाले होते या सिरीज मधे. मेलबर्न ला रीतसर हरल्यावर, दुसर्‍या टेस्ट मधे सिडनीला आपली बॅटिंग फॉर्मात आली, पण थोडे दुसर्‍या डावातील अपयश व बरेचसे ऑस्ट्रेलियन चीटिंग व अंपायर्सच्या चुका यामुळे सिडनीलाही भारत हरला. एकूणच आपली टीम भयंकर डिवचली गेली होती. अनिल कुंबळे सारख्या शांत खेळाडूनेही "या मॅच मधे एकच टीम खिलाडू वृत्तीने खेळली" असे म्हंटले होते. भारताचे (व पाकचेही) एक आहे - तुम्ही कितीही हरवा पण व्यक्तीशः कोणाला डिवचलेत तर काय होईल सांगता येत नाही. संदीप पाटील एरव्ही ब्याटी फिरवून आउट होईल. पण त्याला जखमी केलेत तर परत येउन त्याच बोलर्सना तुडवून १७४ मारेल. 'दादा' एरव्ही कंबरेवर बाउन्स होणार्‍या बॉल ला सुरक्षितरीत्या स्लिप मधे पाठवण्याचे काम आपल्या बॅटचे आहे अशा समजूतीत खेळेल, पण राग आला तर शोएब, अक्रम पासून फ्लिंटॉफ पर्यंत कोणालाही पुढे येउन भिरकावून देइल. जेन्युइन वेग विशेष खेळता न येणारा अझर जखमी व अपमानित झाल्यावर ओव्हरमधले पाच बॉल कोठेही पडले तरी एकाच बाजूला बाउंड्रीबाहेर काढेल, गावसकर एरव्ही ९४ बॉल्स मधे १० रन जेमतेम काढेल पण डिवचलात तर पुढच्या कसोटीत जगातील सर्वात भयंकर बोलिंग विरूध ९४ बॉल्स मधे शतक मारेल, असला प्रकार. येथे तर सगळा संघच डिवचला होता. त्यामुळे एरव्ही बघितले तर पहिल्या दोन टेस्ट हरल्यावर तिसरी 'पर्थ' ला म्हणजे शब्दशः दुष्काळात तेरावा महिना. पण येथे आपण ऑस्ट्रेलियाला धुवून काढले. जवळजवळ सर्व प्रमुख बॅट्समेननी थोडीफार कामगिरी केलीच पण मॅच काढण्यात इशांतचा ही खूप मोठा भाग होता.

आपापल्या जमान्यातील खतरनाक बोलर्स व नावाजलेले बॅट्समेन यांच्यातील हे द्वंद्व हे कसोटी क्रिकेट मधेच बघायला मिळते. बोलर्सना ५-१० ओव्हर च्या स्पेल मधे बॅट्समन कोणत्या बॉल ला कसा खेळतोय हे बघून त्याप्रमाणे त्याला आउट कसे करायचे हे ठरवता येते. नियमांनी जखडून टाकलेल्या व पाटा पिच वर दम नसलेल्या बोलिंग वर पट्टे फिरवून ३० बॉल्स मधे ६० धावा करणे हे बघण्यातही एक मजा आहे पण ती एकतर्फी आहे व बॅट्समन चे एकच कौशल्य त्यात कामी येते - कोणत्याही बॉल वर शॉट्स मारू शकण्याचे. खरा कस लागतो तो कसोटीत. हे आजकाल जरा कमी बघायला मिळत आहे. तरीही डेल स्टेन, मिचेल जॉन्सन सारखे लोक अजूनही थोडीफार कामगिरी करत आहेत. तुम्हालाही अशा काही क्लिप्स माहीत असतील तर द्या येथे.

क्रीडाआस्वाद

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

22 Jul 2014 - 9:50 am | मुक्त विहारि

एकदम वि.वि.करमरकर स्टाईल..

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Jul 2014 - 10:21 am | ज्ञानोबाचे पैजार

कालच इशांतचा भन्नट स्पेल पाहिला (२३-६-७४-७) आणि त्यानंतर हा लेख वाचताना डोळ्यासमोर इशांतच नाचत होता. ढोनी ने त्याच्यावर इतके दिवस दाखवलेला विश्र्वास सार्थ ठरवला.

पहिल्या इनिंग मधला भुवनेश्र्वर ची बॉलिंगही जबरा होती (३१-१०-८२-६)

लेखातल्या सगळ्या क्लिपा भन्नाट आहेत.

आपल्या व्यासंगाला त्रिवार मुजरा.

पैजारबुवा,

बेकार तरुण's picture

22 Jul 2014 - 10:32 am | बेकार तरुण

आवडला लेख. बर्‍याच आठवणि जाग्या झाल्या !
चॅपेल आणि इम्रान च द्वंद पाहिले नव्हते, आभारि आहे.

प्रचेतस's picture

22 Jul 2014 - 11:05 am | प्रचेतस

टिपिकल फारएण्ड स्टाईल.

बहुगुणी's picture

22 Jul 2014 - 11:08 am | बहुगुणी

मस्त लेख!

आणखी एकः
http://youtu.be/ZCqe1l5ar8o

खटपट्या's picture

22 Jul 2014 - 11:10 am | खटपट्या

आवड्ला !!

मृत्युन्जय's picture

22 Jul 2014 - 11:16 am | मृत्युन्जय

मिपावरचा एक नितांतसुंदर लेख

मूकवाचक's picture

4 Aug 2014 - 8:35 pm | मूकवाचक

+१

जे.पी.मॉर्गन's picture

22 Jul 2014 - 11:57 am | जे.पी.मॉर्गन

मस्त रे! झकास लेख. फास्ट बोलरनी कसलेल्या बॅट्समनची परीक्षा पाहणे ह्यासारखं सुंदर दृश्य नाही क्रिकेटमध्ये. असंच एक द्वंद्व अ‍ॅलन डोनाल्ड आणि माइक आर्थरटन मधलं.

सगळीच उदाहरणं भन्नाट! मस्त जमलाय लेख!

जे.पी.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jul 2014 - 1:04 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/aokay-hand-gesture-smiley-emoticon.gif

किसन शिंदे's picture

22 Jul 2014 - 1:31 pm | किसन शिंदे

जबरी लेख अन् यातल्या सगळ्या चित्रफितीही जबराच! क्रिकेटविषयक तुमचे लेख खत्तरनाक असतात याबद्दल आता दुमत नाही. प्रचंड मोठा व्यासंग!!!

vikramaditya's picture

22 Jul 2014 - 1:48 pm | vikramaditya

वेगाने धावत येणारा गोलंदाज आणि ४-५ स्लिप्स आणि गली. सोबत प्रेक्षकांचा कल्लोळ. खरे क्रिकेट.

फार छान लेख.

प्रमोद देर्देकर's picture

22 Jul 2014 - 3:03 pm | प्रमोद देर्देकर

+१११ हेच म्हणतो
तुम्ही क्रिकेट वेडे आहात.

वेल्लाभट's picture

22 Jul 2014 - 3:41 pm | वेल्लाभट

क्या बात! एके काळी हा खेळ अत्यंत आवडीने बघायचो. पुढे दादा ने एक्झिट घेतली (घ्यायला लावली) आणि क्रिकेटवरून मन उठलं. असो.

क्लिपा बघितल्या नाहीयेत अजून पण वर्णन खुमासदार ! नेहमीप्रमाणेच. शीर्षक बघून कंटेंट ची कल्पना आली आणि त्या आधी लेखक कोण ते ओळखलं. फर्स्टक्लासच लिहीलंयत.

पण मी वरील नावांपेक्षा, वसीम अक्रम, वकार युनुस (ही वर नमूद केलीयत), जवागल श्रीनाथ काका, वेंकटेश प्रसाद, मोहंती, झालंच तर पोलॉक, क्लूसनर, डीविलियर्स, चामिंदा वास, मॅक्ग्रा ही नावं ऐकलीयंत जास्त. त्यांच्याबद्द्ल डीटेल सांगणारा, क्लिप्स देणारा पुढचा भाग आला तर.... जरा.... बघा की.

टवाळ कार्टा's picture

22 Jul 2014 - 4:27 pm | टवाळ कार्टा

पण मी वरील नावांपेक्षा, वसीम अक्रम, वकार युनुस (ही वर नमूद केलीयत), जवागल श्रीनाथ काका, वेंकटेश प्रसाद, मोहंती, झालंच तर पोलॉक, क्लूसनर, डीविलियर्स, चामिंदा वास, मॅक्ग्रा ही नावं ऐकलीयंत जास्त. त्यांच्याबद्द्ल डीटेल सांगणारा, क्लिप्स देणारा पुढचा भाग आला तर.... जरा.... बघा की.

वासिम आणि वकारच्या बाजुला बसायला जवागल श्रीनाथ काका, वेंकटेश प्रसाद, मोहंती यांना २-३ जन्म घ्यावे लागतील

क्लूसनर, डीविलियर्स ठिकठक

पोलॉक, मॅक्ग्रा म्हणजे फक्त अचुकता

बेकार तरुण's picture

22 Jul 2014 - 4:45 pm | बेकार तरुण

विथ ऑल डयु रिस्पेक्ट टु व्यंकटेश प्रसाद.
कदाचित वकार च्या सर्वात वाईट दिवशी त्यानि टाकलेला स्लोवर पण व्यंकटेशच्या फास्टेस्ट बॉलहुन वेगवान असेल,
नंतर नंतर बहुतेक फलंदाज आता तरि हा स्लोवर वन सोडुन फास्ट टाकेल ह्या अपेक्षेनि बाद होत असावेत. ;)
श्रिनाथ नि (बहुतेक अहमदाबाद्ला) साऊथ अफ्रिका विरुद्ध टाकलेला स्पेल आठवतो, सुंदर गोलंदाजि करुन मॅच काढुन दिलि होति

टवाळ कार्टा's picture

22 Jul 2014 - 5:26 pm | टवाळ कार्टा

कुंबळेपण प्रसादपेक्शा फास्ट टाकायला शिकला =))

वेल्लाभट's picture

23 Jul 2014 - 10:36 am | वेल्लाभट

खरं आहे ते! पण आमिर सोहेल चा प्रसाद ने काढलेला त्रिफळा, आणि त्यानंतरची ती कचकचीत शिवी... किंवा श्रीनाथने विकेट काढल्यावर त्याचं ते अर्धांगाचं ताडासन करून धावणं, मोहंतीची विचित्र पण मस्त स्टाईल, क्लूसनर ची ती हवेतील उडी, हे त्याच्या त्याच्या जागी भारीच.
मॅक्ग्रा .... __/\_ शब्द नाहीत.
वसीम.... काल प्रतिसाद टाकल्यावर मुद्दाम अक्रम चे व्हिडियोज बघत होतो. डेड्ड यॉर्कर्स. त्यात रिव्हर्स स्विंग वगैरे मिळायचा. कैच्याकै. आणि जणु काही ती विकेट मिळणार हे रन अप च्या पहिल्य पावलापासून माहित असल्यागत बॉल टाकताच दोन्ही हात येशू क्रिस्तासारखे पसरून तोंडाचा मोठ्ठा आ वासून बॅट्समन कडे खुन्नस देत चालत येणं...

रो मां च !

बेकार तरुण's picture

23 Jul 2014 - 11:58 am | बेकार तरुण

मोहंतिनि सहारा कप मधे धमाल उडवुन दिलि होति. त्याकाळचा पाकिस्तानचा अव्वल फलंदाज असलेल्या सईद अन्वरला मोहंतिनि जबरदस्त स्विंग बोलिंगनि बेजार करुन सोडला होता ! पण त्याचा स्पीड फारसा नसावा. त्यावेळि स्पीड्गन्स नव्हत्या बहुधा.

चतुरंग's picture

22 Jul 2014 - 5:45 pm | चतुरंग

सुन्दर लेख. जुन्या आठवणी जागवल्यात फारेन्ड भौ!
होल्डिंग माझा फार आवडता बोलर. एखाद्या हरणासारखा तो अलगदपणे धावत येई आणि अतिशय स्मूथ अ‍ॅक्शनने बोलिंग करे. खतरनाक स्विंग्ज आणि तितकेच डेडली यॉर्कर्स हे त्याचे अस्त्र. आणि स्टंपमागे उभी असलेली सहा राक्षसांची भिंत हे त्याचे साथिदार. अशा अभेद्य तटबंदीतून कॅच सुटून खेळाडू वाचला तर नशीबच! :)

सौंदाळा's picture

22 Jul 2014 - 6:04 pm | सौंदाळा

मस्त आहे लेख.
काल कसोटी जिंकल्याच्या मुहुर्तावर आज हा लेख वाचायला अजुनच मजा आली.
प्रत्येक व्हीडीओसाठी केलेले वर्णन तर खासच.
वेल्लाभटांशी सहमत. अजुन पुढचे भाग अशाच शैलीत येऊ देत.

श्रीगुरुजी's picture

22 Jul 2014 - 9:46 pm | श्रीगुरुजी

सुंदर लेख! खूप आवडला. १९७५ मध्ये पहिली विश्वचषक स्पर्धा विंडीजने जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने विंडीजला ५-१ असे हरविले होते. लिली, थॉमसन पुढे विंडीजची भंबेरी उडाली होती.

भारताकडे सध्या उमेश यादव व वरूण एरॉन असे दोन खरेखुरे वेगवान गोलंदाज आहेत. दोघेही ताशी १५० किमी चा वेग गाठू शकतात. परंतु फारशी अचूकता व भेदकता नसल्याने त्यांना फारशी संधी मिळालेली नाही. वर्तमान काळात ऑस्ट्रेलियाचा शॉन टेट १५४-१५६ च्या वेगाने चेंडू टाकू शकतो. परंतु वेगाव्यतिरिक्त त्याच्या गोलंदाजीत काहीच दम नसल्याने तो संघात येऊ शकत नाही.

फारएन्ड's picture

23 Jul 2014 - 7:41 am | फारएन्ड

श्रीगुरूजी, त्या वरच्या पर्थ टेस्ट शीच शॉन टेट चा मोठा संबंध आहे. थोडी हिस्टरी म्हणजे १९९९ च्या मेलबर्न टेस्ट मधे स्टीव वॉ ने भारतीयांवर नवा ताज्या दमाचा ब्रेट ली सोडला होता आणि त्याने बर्‍याच विकेट्स काढल्या होत्या (वॉ ने त्याला त्या कसोटीत निवडणे वगैरे बद्दल बरीच माहिती त्याच्या "आउट ऑफ माय कम्फर्ट झोन" या पुस्तकात त्याने दिलेली आहे. २००८ च्या सिरीज मधे पहिल्या दोन टेस्ट्स जिंकल्यावर ऑस्ट्रेलियाने पुन्हा तशाच प्लॅन ने भारताला 'पेस' ने घाबरवण्याकरिता पर्थ ला शॉन टेट आणला. पण या वेळेस त्याला आपल्या लोकांनी भरपूर धुतला. एकही विकेट मिळाली नाही. त्यानंतर त्याने काही दिवस स्वतःहून विश्रांती घेण्याचे ठरवले व बाहेर गेला. (त्यानंतर तो फक्त वन डे, २०-२० वगैरेच खेळला आहे.).

श्रीगुरुजी's picture

23 Jul 2014 - 12:44 pm | श्रीगुरुजी

शॉन टेटने २००७ च्या विश्वचषकात ब्रेट ली च्या अनुपस्थितीत मॅक्ग्राला खूप चांगली साथ देऊन ऑस्ट्रेलियाला लागोपाठ तिसर्‍यांदा विश्वचषक मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. पण त्यानंतर तो पूर्ण ढेपाळला.

मेघवेडा's picture

22 Jul 2014 - 9:57 pm | मेघवेडा

Going off on a tangent - विंडीज वेगचौकडीचा धुव्वा उडवणार्‍या गावसकरवर रचलं गेलेलं हे अजरामर कॅलिप्सो आठवलं!

"It was Gavaskar
De real master
Just like a wall
We couldn't out Gavaskar at all, not at all
You know the West Indies couldn't out Gavaskar at all"

फारएन्ड's picture

22 Jul 2014 - 10:11 pm | फारएन्ड

थॅन्क्स लोकहो.

विंडीज बद्दल ज्यांना इंटरेस्ट आहे, त्यांनी 'फायर इन बॅबिलॉन' ही फिल्म जरूर पाहा.
http://www.youtube.com/watch?v=BVnQ8hYSJqM

अमेरिकेत असणार्‍यांना नेटफ्लिक्स वर स्ट्रीमिंग वरही बघायला मिळेल. नुसत्या होल्डिंगच्या रन अप करिता सुद्धा पुन्हा पाहायची आपली तयारी आहे :)
(त्यात गावसकर च्या एका सीन मधे गडबड आहे. बघा तुम्हाला सापडते का :) )

श्रीगुरुजी's picture

22 Jul 2014 - 10:29 pm | श्रीगुरुजी

होल्डिंगच्या रनअपमध्ये व कोर्टनी वॉल्शच्या रनअपमध्ये बरेच साम्य आहे.

वपाडाव's picture

22 Jul 2014 - 10:54 pm | वपाडाव

सध्याच्या काळात फक्त तेंडुलकरच्या चौकारांकरिता टेस्ट बघायचो...
जास्तीत जास्त लक्ष्मणच्या कलाइच्या उपयोगासाठी...
आता जरा Ashes वर लक्ष केंद्रित करावे लागेल असं वाट्टंय...

मैत्र's picture

23 Jul 2014 - 3:26 pm | मैत्र

वाचनखूण साठवल्या गेली आहे.

अतिशय नेमकं वर्णन प्रत्येक Dual चं(कसं ते मराठीत टंकलं आहे देव जाणे)

विंडीजचा तोफखाना (रॉबर्ट्स होल्डिंग गार्नर क्रॉफ्ट) किंवा लिली थॉमसन काही पहायला मिळाले नाहीत. मार्शलही फारसा नाही पाहिला.
या लिंकांवर भागवतो.
गेल्या बर्‍याच वर्षात त्यांच्याकडे असा बॉलर आलाच नाही नवा.

डोनाल्ड फार आवडायचा त्याच्या अतिशय सुंदर लयबद्ध रनअप साठी. आणि वॉल्श अ‍ॅम्ब्रोस त्यांच्या चिवट आणि भेदक मार्‍यासाठी. अर्थात हे दोन काही अगदी फास्ट मधले नव्हते. पण बेष्ट..

फास्ट बोलर बाप खरं तर एकच - अक्रम.

(बाकी अर्थात एम सी जी ग्राउंडवर एकाच बॉलरचा अप्रतिम पुतळा आहे रनअप च्या जंप मध्ये -- डेनिस लिली.)

फार एन्ड -- मजा आला या लेखामुळे

संदीप चित्रे's picture

23 Jul 2014 - 9:40 pm | संदीप चित्रे

क्रिकेटवर तुझा लेख म्हणहे वाचणे मस्ट असतं :)
मायकेल होल्डिंग आणि कपिलदेव माझे ऑल टाईम फेवरेट्स आहेत!

तुझा लेख यावा आणि मी कामाच्या रगाड्यात अडकाव , मग पुन्हा शोधुन त्यावर प्रतिसाद देउन वर काढणे , हे दरवेळी का होत असाव ?

असो ...लेख जाम आवडला !! तुझे लेख/उल्लेख मी ईन्फी त असताना इन्फी मधल्या ईन्ट्रनल साईटवर लिंकद्वारे भेटला होता, ते माझ तुझ्या लेखाच पहिल वाचन होतं , तेव्हापासुन वाचतोयच ....मस्त ...

आपला आख्ख एक दशक गाजविणारा, ओव्हर सहा च्या सहा बॉल यॉर्कर टाकण्यार्‍या, आणि त्याच्या विषयी जास्त बोलल्या न जाणार्‍या कपिलचा उल्लेख वाचुन लेखाला चा चांद लागलेत ...

झक्कास !!

श्रीगुरुजी's picture

11 Aug 2014 - 12:48 pm | श्रीगुरुजी

हा सामना अजून आठवतो. फॉलोऑन टाळण्यासाठी २४ धावा हव्या होत्या. ९ गडी बाद झालेले होते. कपिल खेळत होता. दुसर्‍या बाजूला नरेंद्र हिरवानी होता. कपिलने ३ र्‍या, ४ थ्या, ५ व्या व ६ व्या चेंडूवर षटकार ठोकून फोलॉऑन टाळला. पुढच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हिरवानी बाद होऊन भारताचा डाव संपला होता. अर्थात भारताने हा सामना नंतर गमावला. सध्या दूरदर्शनवर समालोचन करणारा माईक आर्थरटन त्यावेळी गूच बरोबर सलामीला यायचा. दोघेही त्या मालिकेत खूपच भरात होते.

शेवटची जोडी मैदानात आहे, आणि फॉलो ऑन टाळण्यासाठी २४ धावा हव्या आहेत, अशा वेळी हेमिंग्सच्या मायदेशी, लॉर्डसवर चार अप्रतिम षटकार खेचत ही कामगिरी पार पाडावी तर कपिलनेच!

सामन्याचा शेवटचा चेंडू, जिंकण्यासाठी फक्त दोन धाव हव्या आहेत अशा निर्णायक क्षणी अप्रतिम यॉर्कर टाकून 'सर' रिचर्ड हॅडलींना 'क्लीन बोल्ड' करावे तर ते ही कपिलनेचः