मॅकीनॉ आयलंड आणि पिक्चर्ड रॉक्स - भाग २

सखी's picture
सखी in भटकंती
16 Jul 2014 - 7:52 pm

भाग १

दुस-या दिवशी सकाळी ऊठुन सगळ्यांनी आवरुन घेतले आणि हॉटेलच्या गेस्ट रुममध्ये नाष्टा करण्यासाठी गेलो. बहुतेक हॉटेलचे चेकआऊट सकाळी ११ वाजता असते त्यामुळे आम्ही सकाळचे आवरुन झाल्यावर झाल्यावर लगेच हॉटेल सोडले, बॅगा कारमध्ये नेऊन टाकल्या. आणि थोडा वेळ मॅकीनॉ सिटी बघायला बाहेर पडलो. आजही हवा छान होती. शहरात अजुन छोटीछोटी दुकानं होती, जागोजागी फुलं लावुन बेंचेस ठेवले होते, कारंजी होती. मध्येच एका ठिकाणी मुलांना खेळायला छोटे पार्क होते आणि आपल्याकडे जत्रेत असतात तसे गोल फिरणारे घोडयांचे चक्र होतं, मग त्या माणसाला विचारले आता चालु आहे का म्हणुन कारण दहा वाजले तरी तिथे अजुन कोणीच नव्हते. तर तो म्हणाला हो बसवा ना मुलांना, त्याला पैसे दिले आणि पूर्ण चक्र फक्त २ मुलांसाठी चालु करुन दिलं. तेवढ्यात गमंत झाली मुलाला एक शटल दिसली आणि त्याला ती ट्रेनच वाटली म्हणुन मग आम्ही ती बघायला तिच्या मागे गेलो. ती पुढच्या चौकात थांबल्यावर मी ड्रायव्हरला विचारलं की तुमची बस/शटल अमुक अमुक हॉटेलच्या लोकांसाठी असेल ना? तर तो मुलांकडे बघुन म्हणाला तुम्हाला राईड पाहीजे का? मी हो म्हणाल्यावर तो म्हणाला तुम्हाला पाहीजे तिथे बसा मी पुढच्या सिग्नलला वळुन परत माझ्या हॉटेलकडे जाणार आहे पण तुम्हाला बसता येईल. मग मुलांनाच काय मलाही ती राईड घ्यायला खूप छान वाटलं, नंतर त्याला विचारलं की मी तिकीट म्हणुन काही पैसे देऊ का तर तो नको म्हणाला. फक्त त्याने विचारले तुम्ही कोठुन आलात, त्याला आमच्या गावाचं नाव सांगितलं तर त्याने फक्त खंत व्यक्त केली की मी ही त्या बाजुला होतो काही वर्षे आणि तिथल्यासारखं चायनीज इथं मिळत नाही. म्हटलं तर अगदी साधा प्रसंग तो नाहीही म्हणु शकला असता पण त्यान मुलांच मन जाणलं आणि एक आनंदाची आठवण आम्हाला दिली. असा अनुभव अमेरीकेत वारंवार येतो, लोकं ९५% वेळेस मदत करतात किंवा कोण करु शकेल तिकडे तरी पाठवतात, फक्त आपण पुढं होऊन विचारलं पाहीजे.

साधारण अशी शटल होती पण बरीच मोठी ३०-४० लोक बसु शकतील आणि एकदम हवेशीर.

*

यानंतर मात्र आम्ही कारकडे वळलो आणि प्रवास सुरु झाला ताहकीमेननचे धबधबे बघायला. ही जागा तशी फार लोकांना परिचीत नसावी. साधारण दीड-एक तास कारने पोचायला लागला. यामध्ये पण दोन धबधबे आहेत लोअर आणि अपर ताहकीमेनन. प्रथम लोअर फॉल्स बघितले, हे म्हणजे ५ छोटे छोटे मिळुन धबधबे तयार झाले होते. तिथुनच पुढे चार मैल कारने गेल्यावर अपर फॉल्स लागले. दोन्हीकडचे पाणी आधी गढुळ वाटले, पण तो खरतर सिडर नावाच्या झाडाचा/पानांचा अर्क मिसळल्याने झाले असावे, म्हणुन याला रुट बीअर फॉल्स असेही नाव पडले आहे. इथे भरपूर पाय-या उतरुन खाली जावे लागले आणि परत चढाव्या लागल्या त्यामुळे बरेच व्हीलचेअरवाले किंवा गुडघेदुघीने त्रस्त लोक वरतीच बसुन राहीले. हा थोडासा डोंगराळ भाग होता, त्यामुळे लिफ्टसारख्या अधुनिक सोयी इथे नव्हत्या, दुकानही एकच सुविनिअर शॉप कम आवश्यक गोष्टींचेच होते. बाहेरुन येताना फारशी वस्तीही नव्हती त्यामुळे हॉटेल/फास्ट फुड वगैरे काहीच दिसले नाही. बरोबर आणलेले पदार्थ आम्हाला आजही पुरले. राज्याच्या या बाजुला उत्तरेला थंडी अजुन जास्त असते, म्हणजे आता उन्हाळा चालु आहे तरी बाकी ठिकाणांपेक्षा थोडे गारच होते त्यामुळे आम्ही गरम कपडे बरोबर ठेवले होते. थंडीमध्ये हे धबधबे गोठतात आणि हौशी फोटोग्राफर, स्किइंग करणारे यासाठी येतच रहातात.

आहे की नाही रुट बीअर फॉल्स?

*

*

*

इथुन बाहेर पडुन मग लागलो पिक्चर्ड रॉक्सच्या रस्त्याला, परत दीड-एक तास कारचा प्रवास. इथे आणि वरती धबधब्याकडे जातानाही स्पीड लिमिट कमी होतं, त्यामुळे पोचायला जरा वेळ लागला. हा रस्ता आता अगदी एक लेनचा आणि वळणदार होता, दुतर्फा भरपूर झाडं होती, ती ठराविक अंतराने बदलत असल्याचेही लक्षात आले. पानगळतीच्या ॠतुमध्ये इथे पानांचे रंग फार मोहक असतात त्या वेळेस हा फार छान ड्राईव्ह असेल असे वाटुन गेले. खाली नकाशात A जिथे दिसतयं ते परत मॅकीनॉ आयलंड आहे, आणि दोन्ही तळ्यांची नावं आणि ज्या स्थळांना आज भेट देणार होतो ते दाखवले आहेत.

*

जेव्हा आम्ही पिक्चर्ड रॉक्सच्या ग्रॅन्ड मॅरीअस या शहरात आलो, कार लगेच हॉटेलमध्ये घेण्याऐवजी आम्हाला इथे जी क्रुज घ्यायची होती त्या कंपनीच्या ऑफीसात गेलो. एकुण प्रवासात फक्त या क्रुजचे बुकिंग आधी केले नव्हते कारण आम्ही आधीच्या तिन्ही ठिकाणी नक्की किती वेळ घालवणार, तिथे किती आवडेल व एक दिवस मुक्काम तिथे वाढवायला लागेल का, गर्दीचा किती परिणाम होईल या सगळ्याचाच अंदाज येत नव्हता. तर ऑफीसात गेल्यावर कळलं की आजच्या सगळ्या क्रुजची तिकीटे आधीच गेलीत. बरेच लोक तिथे मुक्काम करणार नव्हते त्यांना तसच परत जावं लागलं होतं. मग दुस-या दिवशीचं सकाळी दहाच तिकीट घेतलं आणि हॉटेलवर आलो. आता संध्याकाळ झालीच होती तिथे मस्त स्विमिंग पुल होता दोन-तीन घसरगुंड्यासहीत, मग काय मुलांना तेवढच हवं होतं त्यांनी मस्त पाण्यात डुंबुन घेतलं. नंतर जेवायला गेलो, इथेही विशेष पर्याय नव्हते, टिपीकल अमेरीकन जेवण (सॅलड, बर्गर, स्टेक, फिश). एक पिझा हट बघितल्याच मला आठवतं होतं पण नव-याने मला वेड्यात काढलं. म्हणे ७०-८० मैल मागे होतं तु झोपेत बघितलं असशील, दुस-या दिवशी क्रुज कंपनीच्या अर्ध्या मैलावर पिझा हट दिसल्यावर नवरे लोकांवर विश्वास ठेवायचा नाही अशी समज आली. :)
तिस-या दिवशी परत यापण हॉटेलने नाष्टा देऊन सुखद धक्का दिला, कारण त्यांच्या बेवसाईटवर ब्रेकफास्ट्वर काट मारली होती. म्हणून आम्ही बाहेर जाणार होतो पण तिथल्या स्वागतिकेने (receptionist) कल्पना दिल्याने परत वेळ वाचला. इथेही ११ वाजता चेक आऊट होते, म्हणून नऊ वाजता सगळं आवरुन क्रुज कंपनीच्या ऑफीसमध्ये अर्धा तास आधीच पोचलो.

या दिवशी मात्र गेले २ दिवस असलेलं छान ऊन गायब झालं होतं. रिमझिम पाऊस पडत होता, आदल्या दिवशीही पण नुसतेच २-४ थेंब पडुन सुर्याने परत दर्शन दिलं होतं. तर इथं कंपनीच्या ऑफीसात आल्यावर त्यांनी सांगितले की सध्या थंडरस्टॉर्मची सुचना हवामानखात्याने इश्यु केली आहे. थंडरस्टॉर्म म्हणजे मध्यम वादळ म्हणता येण्यासारखे ज्यात ब-यापैकी वारा, पाऊस, विजा यातलं काही किंवा सगळं येऊ शकतं. अर्ध्या तासात ती संपेल तेवढा वेळ थांबुनच बोटीला निघावं लागेल, जर परत दुसरी सुचना आली तर परत थांबाव लागेल. ही राईड चालु असतानाही सुचना आली तर मागे फिरावे लागु शकते कारण असा धोका त्यांना घेता येत नाही. तसे झाले तर प्रो-रेटा करुन सगळया प्रवाश्यांना तितके पैसे परत मिळतील. मग थोडावेळ कारमध्ये, त्यांच्या दुकानात असा वेळ काढला कारण पाऊस ब-यापैकी येत होता. बोटीच्या जवळ लोकांना सोडायला सुरवात केली होती, दुकानातच एका बास्केटमध्ये भरपूर छत्र्या ठेवलेल्या दिसल्या आणि लोक ते घेऊन जात होते. आधी आम्हाला वाटलं ते विकत घेत आहेत, कारण तिथे साधे रेनकोटपण विकायला होतो. पण त्या माणसाने सांगितले की आत्ता घेऊन जा आणि राईड संपल्यावर परत द्या ही एक गोष्ट फार उपयोगी ठरली, कारण पाऊस उघडण्याचे काही चिन्ह दिसत नव्हते.

बोट सुरु व्हायच्या आधी कप्तानाने सांगितले की ज्या कोणाला परत जायचे असेल त्यांनी आत्ताच परत जावे आणि त्यांना तिकीटाचे १०० टक्के पैसे परत मिळतील. अजुन तरी पाऊस आणि वारा आहेच त्यामुळे मी आता तरी वरच्या मजल्यावर आणि मागच्या डेकवर कोणाला सोडु शकत नाही, जर का हवामान सुधारले तर परत नक्की सांगेन तुम्ही कधी बाहेर जाऊन बघु शकता. त्याने लाइफ जॅकेट्स कुठे आहेत तेही सांगितले.

*

पिक्चर्ड रॉक्स (Pictured Rocks) ही क्रुज जवळजवळ ३ तासाची आहे. हे नाव त्याला पडले आहे ते सुपिरीअर तळाच्या काठी १५ मैलांपर्यत असलेल्या मोठमोठ्या खडकांच्या रगांवरुन आणि त्यात दिसणा-या किंवा भास होणा-या चित्रांवरुन. हे खडक नैसर्गिक रीतीने असे झाले आहेत, खडकात असलेल्या जास्त खनिजांमुळे आणि वरुन पडणा-या पाण्यामुळे त्यांचे रंग वेगवेगळे दिसतात. जिथे जास्त लोह होतं तिथले खडक लाल, मॅंगेनिजमुळे काळे-पांढरे, तांब्यामुळे तांबुस-हिरवे. सुपिरीअर तळं हे जगातलं मोठं गोड्या पाण्याचं तळं आहे मागच्या भागातलं हुरॉन तळं ह्याचा तिसरा नंबर लागतो. सुपिरीअर जास्त खोलपण आहे, साधारण खोली ५०० ते १३०० फुटाच्या आसपास आहे, पाणी प्रचंड गार असते. आणि मला बोटीत बसल्यावर पहीले पाच-दहा मिनीटे यावर्षीच झालेला दक्षिण कोरीयातला अपघात आठवत राहीला आणि कप्तानाने सांगितलेल्या गोष्टी गंभीरपणे घ्यायची गरज जाणवली.
बोट अर्ध्या वाटेवर आल्यावर कप्तानाने बाहेर डेकवर आणि वरच्या मजल्यावर जायची परवानगी दिली, पाऊस अजुनही येतच होता, लोक छत्र्या आणि कॅमराची लेन्स सांभाळत फोटो काढुन घेत होते. गंमत म्हणजे येताना पाऊस पूर्ण थांबला आणि परत क्लिकक्लिकाट सुरु झाला. यापुढे वर्णन करणं माझ्या आवाक्याबाहेरच आहे, फोटोवरुन अंदाज यावा.

जाता जाता लागणा-या या छोट्या बेटावर मोजुन ४ घरे आहेत आणि पाचवे हे लाईटहाऊस कम चर्च आहे. हे लाईटहाऊस १८६८-१९१३ पर्यंत दीपस्तंभाचे काम करत होतं.

*.*

याच नाव (American) Indian Head
*

थोडा जवळुन
*

ह्या अधांतरी खडकाच्या मध्यभागी उंच झाड आहे.

*

सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान या घनदाट झाडांचा रंग लाल-पिवळा-केशरी मध्ये बदलत असणार.

*

यामध्ये हत्ती दिसला का?

*

तांबुस आणि हळदी रगांच्या छ्टा आणि उजव्या बाजुला अस्वलासारखे काहीतरी दिसत होते.

*

*

*

या फोटोत वरती काही लोक दिसत आहे तिकडुन चालत वरती जायला वेगळा रस्ता आहे, आम्ही वेळेअभावी आणि पावसामुळेही हे करु शकलो नाही. आणि खाली खडकामध्ये गुहा तयार झाल्यात.
*

*

खरतरं एका सोनेरी संध्याकाळी छान ऊनं पडली असताना हे खडक आणि त्यांचे रंग/आकार बघणं एखाद्या स्वप्नावत वाटावं, त्यातच पानगळतीच्या ॠतुमध्ये (fall season) जर खडकांच्या वरती असणा-या झाडांनी रंगांची उधळण केली असेल तर क्या केहने! पण काही गोष्टींवर आपलं काहीच नियंत्रण नसतं खास करुन निसर्गाच्याबाबतीत. तरी जेवढं पहायला मिळालं त्याने नक्कीच भरुन पावलो, नेहमीच्या रुटीन जगण्याला ह्या विविध रंगांनी आणि मॅकीनॉ आयलंडच्या निळाईने अगदी ताजेतवाने केले.

तळ टीपा:
१. बोटीचा आणि शटलचा फोटो जालावरुन घेतला आहे.
२. या लेखासाठी मधुरा देशपांडेने मला चांगल्या सूचना केल्या, माझ्या अनेक प्रश्नांना न कंटाळता उत्तरं दिली, त्यामुळे औपचारीकता म्हणुन नाही तर कृतज्ञता व्यक्त करायची म्हणुन मी तिची खूप आभारी आहे.
३. शेवटचा फोटो पॅनॉरामीक रितीने घेतला होता, पण इथे कसा वाटतोय कळत नाही, कोणाला काही कल्पनेची आईडीया असल्यास कळवावे, आभारी असेन :)

प्रतिक्रिया

मधुरा देशपांडे's picture

16 Jul 2014 - 8:11 pm | मधुरा देशपांडे

मस्तच. :)

मराठे's picture

16 Jul 2014 - 8:14 pm | मराठे

हा भागही छान.
रच्याकने: टाक्वामेना फॉल्सचं पाणी तिथे असणार्‍या खनिजांमुळे (मुख्यत्वे करून लोखंड) वेगळं दिसतं, पिच्चर्ड रॉक्सवर दिसणारे रंगसुद्धा त्यामुळेच दिसतात. तिथे जमिनीत आणी तलावात मँगेनीज, लोखंड, कॉपर अशी अनेक खनिज असल्यामुळे दगडांवर जांभळा, तांबडा, हिरवा असे रंग बनतात.

मायनर्स कॅसल वर गेला नाही का? तिथून मिळणारा व्ह्यु शब्दातीत आहे.

अनेक खनिज असल्यामुळे दगडांवर जांभळा, तांबडा, हिरवा असे रंग बनतात. - हो खरयं.

मायनर्स कॅसल वर गेला नाही का? तिथून मिळणारा व्ह्यु शब्दातीत आहे. - नाही ना, पाऊस खूपच होता त्यादिवशी, आणि दिवसभर वाढण्याचेच चान्सेस होते त्यामुळे थांबुनही उपयोग नव्हता.

यशोधरा's picture

16 Jul 2014 - 8:21 pm | यशोधरा

मस्त!

स्वप्नांची राणी's picture

16 Jul 2014 - 8:24 pm | स्वप्नांची राणी

ती शटल सही आहे..! आणि मला त्या हत्तीच्या खडकात वर एक चेहेरा पण दिसला..

पहिला भाग पण छान होता. आणि खर तर तो भाग वाचुनच मी पण लिहिण्याचे धाडस केले.

हो गं स्वरा - शटल एकदम एन्जॉय केली. आणि हत्तीच्या फोटोबद्द्ल मी आधी लिहलेलं खोडलं म्हटलं सगळ्यांना तो चेहरा दिसेल की नाही, जवळुन माकडासारखा वाटला. आणि खालुन चौथ्या फोटोत मगर पाणी प्यायला आलीय असं वाटतं होतं.

प्रचेतस's picture

16 Jul 2014 - 9:48 pm | प्रचेतस

खडकात तयार झालेले चित्रविचित्र आकार भारीच.
शेवटचा पॅनारामिक फोटोपण छान आलाय.

मुक्त विहारि's picture

16 Jul 2014 - 11:24 pm | मुक्त विहारि

झक्कास..

स्वाती दिनेश's picture

16 Jul 2014 - 11:25 pm | स्वाती दिनेश

छान फोटो आणि वर्णन..
स्वाती

मला शेवटचा फोटू एकदम मस्त वाटला. लेखनही आवडले.

फोटो आणि वर्णन दोन्हीही सुरेख !!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jul 2014 - 1:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

दोन्ही भाग वाचले. सुंदर फोटो आणि वर्णन !

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Jul 2014 - 2:55 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्त सहल झालेली दिसतेय...फोटोपण सहीच.मिल्वॉकीच्या जवळ आहे का हे?

धन्यवाद मंडळी - मधुरा, मराठे, यशो, स्वरा, वल्ली, मुवि, स्वाती, रेवती, खटपट्या, एक्कासाहेब, राजेंद्र मेहेंदळे.

स्वरा: खर तर तो भाग वाचुनच मी पण लिहिण्याचे धाडस केले. - क्या बात है! मस्तच लिहील आहेस, तिथे प्रतिसाद दिलाच आहे.

वल्ली आणि रेवती: तुम्हाला पॅनारामिक फोटो आवडल्याचे वाचुन बरे वाटले.

राजेंद्र मेहेंदळे: मिल्वॉकीहुन फार दूर नसावे, कारने जाण्यासारखेच असावे, कारण मिल्वॉकी मिशिगनच्या तिस-या लेकच्या पल्याडच आहे.

प्यारे१'s picture

18 Jul 2014 - 2:48 am | प्यारे१

सुंदर मुपीय लेख !
-अधिकृतरित्या तीट लावणारा!

सीरियसली छान आटोपशीर वृत्तांत झालाय. :)

मस्तानी's picture

18 Jul 2014 - 8:21 pm | मस्तानी

मस्त जमलाय हा भाग पण ! फॉल मध्ये अगदी न चुकता पुन्हा जावं अशीच जागा आहे.

मृत्युन्जय's picture

21 Jul 2014 - 5:55 pm | मृत्युन्जय

खुपच सुंदर. आज काहितरी नविन पाहिल्याचा आनंद मिळाला.

अजया's picture

21 Jul 2014 - 8:52 pm | अजया

झक्कास !!