वाट ईथे स्वप्नातील...

स्वप्नांची राणी's picture
स्वप्नांची राणी in भटकंती
16 Jul 2014 - 5:55 pm

सुर्य अस्ताला गेला तेव्हा पारा शून्याच्याही खाली गेला, आणि हा म्हणे कॅनडातला 'उन्हाळा' होता. उद्या सक्काळी सक्काळीच उठून एका विलक्षण सफरीला निघायच होतं. पण रात्रीचा हा थंडीचा कहर पाहून ती सहल रद्द करावी की काय असं वाटू लागल. खर म्हणजे टॉरान्तोहून निघालो तेव्हा तिथे स्वच्छ उन पडल होतं. पण आम्ही अल्बर्टा ला पोचलो आणि एकदम गारठलो. त्यातून ते बोचरे गारेगार वारे...! अल्बर्टा ला 'लहरी हवामानाचा प्रदेश' म्हणतात आणि सध्याचं त्याचं हे रूप त्याच नाव सार्थ करत होतं. आता फक्त गाढगुडूप झोपावं अश्या विचारात असतानाच फोन वाजला,

"हाय, झोपला नाहीत ना? तुम्हाला भेटायला शॉन आलाय." आमच्या अल्पाईन व्हिलेज ची स्वागतिका मंजुळ आवाजात पण तितक्याच अगम्य उच्चारात म्हणाली.
अरे, पण कोण हा शॉन? असं म्हणे पर्यंतच तो शॉन आमच्या कुटीच्या दारात येऊन ठेपला देखिल.
"हाय, मी शॉन. तुम्ही उद्या ची जॅस्पर ते बॅन्फ आणि पुन्हा परत जॅस्पर अशी पुर्ण दिवसाची सहल बूक केलीय ना? मी तुमचा उद्याचा गाईड आणि वाहन चालक सुद्धा! म्हटल तुम्हाला भेटावं आणि उद्याच्या सहलीची थोडीफार कल्पनाही द्यावी." ईती शॉन.
"पण थंडी किती आहे!" मी.
"उद्या छान उन असेल, हवामान खात्याचा अंदाज आहे तसा."
"हवामान खात्याचा अंदाज?" मला कळेना तो खरच म्हणतोय की थट्टा करतोय..? "कारण आम्ही तर सहल रद्द करण्याच्या बेतात आहोत"
"छे छे, असं काही मनात पण आणू नका. खरच उद्या अगदी छान दिवस आहे. आणि आपण ज्या सहलीवर जाणार आहोत ना ती जगातल्या एका अप्रतिम निसर्ग सौंदर्यानी नटलेल्या महामार्गाची सहल आहे. खरतर मी आतापर्यंत असंख्य वेळा गेलोय त्या रस्त्यावरून पण तरीही प्रत्येकवेळा ती वाट मला पहिल्यापेक्षाही जास्त जास्त सुंदर भासते , आणि मी परत परत त्याच उत्सुकतेनी तिथे जात राहतो. त्यातून उद्याच्या सहलीमधे फक्त तुम्ही दोघेजण आणि शर्ली एक अमेरिकन स्त्री आणि अर्थात मी ईतकेच लोक आहोत. मस्त खाजगी सहल होईल आपली. तुम्हाला या सहलीत समाविष्ट नसलेलीही काही अतिशय सुंदर आणि माझी खास आवडती ठिकाणही दाखवीन म्हणतो. तयार रहा उद्या ठीक ७.३० वाजता. आणि हो, आपण कोलंबिया आईसफिल्ड ला जाणार आहोत. तिथे मात्र गरम कपड्यांची गरज लागेल हां."

अल्पाईन व्हीलेज..
A

७.३० वाजता छान उजाडल. उन्हाळ्यामधे सूर्य रात्री अगदी ९ वाजेपर्यंत तळपत असतो त्यामुळे जवळ जवळ १४ तासांचा पुर्ण दिवस हाताशी होता. पहिलच ठिकाण आमच्या ठरलेल्या मार्गापासून थोडस हटके होत.

" आपण मलीन लेक ला जातोय", शॉन म्हणाला.

मलिन लेक..
A

मलीन लेक हा जॅस्पर मधला सगळ्यात मोठा जलाशय. खळाळत्या मलीन नदीच्या काठाकाठानी नदीबरोबरच रस्ताही वळणं घेत होता. लेक जवळ आलो आणि समोरच दृष्य बघून अक्षरशः भान हरपलं. बर्फाच्या टोप्या घालून बसलेली तीन उत्तुंग पर्वत शिखरं आणि मधल्या तिन्ही घळीतून अलगद झेपावलेल्या तीन हिमनद्यांच्या कवेत, सकाळच्या त्या कोवळ्या उन्हात लेक मलीन झळाळत होता. जणू हिर्‍यान्च्या कोंदणात जडवलेला पाचूच! पाण्याचा रंग ईतका सुंदर फक्त चित्रातच पाहिला होता. आणि त्या तळ्याच्या मधलं ते एक चिमुकलं बेट! त्या निसर्गचित्राला परिपूर्णता आणण्यासाठीच जणू ते तिथे कुणीतरी ठेवून दिल होतं. 'स्पिरीट आयलंड' अस त्याच नाव.

स्पिरीट आयलंड..
A

"हे जगातल्या फोटो शौकिनांच लाडक ठिकाण आहे हां." शॉननी सांगितल. "आणि मलीन लेक ची गणना जागतिक वारश्यात केली जाते”.

तिथून पाय निघत नव्हता. पण ही तर नुसती चुणूक होती. आजचा दिवस अजून किती आश्चर्य घेऊन सामोरा येणार होता..?

रस्त्याने एक डौलदार वळण घेतलं आणि मलीन नदी नी आमची साथ सोडली. तीनी आम्हाला पुढच्या प्रवासासाठी आथबास्का नदीच्या हवाली केलं. या नावाचा अर्थ 'झाडांनी वेढलेली नदी'. आधी शांत भासणारी ही नदी पुढच्याच वळणावर अगदी वेगळेच रुप घेऊन आली. खडका खडकां मधून उसळ्या घेत, पाण्यात भोवरे खेळत ती अचानक १०० फुट खोल झेपावली. ही उंची फारशी वाटत नसली तरी पाण्याचा जोर ईतका तुफानी की मार्गात आडव्या येणार्या कडे कपारींना कापून काढत प्रचंड घळी निर्माण झाल्यात. पाण्यातल्या भोवर्‍यानी खडकांमधेही भोवरे कोरून काढलेत.

A

A

आणि या नदीच्या काठाकाठानीच जगातल्या सगळ्यात प्रेक्षणीय रस्त्यांमधे गणला जाणारा आईसफिल्ड पार्कवे उलगडत जातो. जॅस्पर आणि बॅन्फ या दोन राष्ट्रीय उद्यानांमधून जाणारी ही सुमारे २३२ किमीची स्वप्नातली वाट! आट्यापाट्या खेळत धावणार्‍या नद्या, डावीकडून अथक सोबत करणारे खडे पर्वत, तर उजवीकडून एका मागोमाग उलगडत जाणारे निळे हिरवे जलाशय! त्या निलवर्णी पाण्यात डोकावून पाहणारी हिम मुकुट घातलेली दुष्प्राप्य शिखरे! घळी घळी मधून अलगद उतरत आलेल्या आरस्पानी हिमनद्या! सौंदर्याचा खजिना नुसता उधळलाय! दोन डोळ्यांमधे किती साठवणार आणि मनामधे किती भरभरून नेणार!

A

हनिमुन लेक या स्वप्नाळू तळयाला ओलांडून पुढे आलो आणि आतापर्यंत संगत करणारी आथबास्का नदी उजवीकडून वळून निघून गेली. ईथून पुढे आमच्या स्वप्निल वाटेची सखी झाली ती सनवाप्ता नदी. नदीच्या विस्तीर्ण खाडी प्रदेशातून लहरत बहरत चाललेल्या वाटेवरून आम्ही निघालो होतो कोलंबिया आईसफिल्ड कडे!

सनवाप्ता नदि...आंतरजालावरुन साभार...!!!
A

क्रमशः....

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

16 Jul 2014 - 5:59 pm | पिलीयन रायडर

नुसते फोटोच परत परत पाहुन घेतलेत..!!!!!!
अवांतर - पाकृ नंतर भटकंती ह्या सदरात देखील लोकांना जळवुन जळवुन त्यांचे हालहाल करायची पद्धत चालु झाली आहे...

अतिअवांतर - मी पयली (?)

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 Jul 2014 - 6:23 pm | राजेंद्र मेहेंदळे

कॅनडामध्ये टोरांटो,नायगारा(ईस्ट कोस्ट) आणि व्हँकुव्हर,व्हिक्टोरिया(वेस्ट कोस्ट) बघुन झाल्यावर राहीलेले ठीकाण कॅलगेरी/बँफ्/जास्पर या लेखात मनसोक्त भटकायला मिळेल अशी अपेक्षा करतो. पुलेशु.
अवांतर-एडमंटनचे शॉपिंग मॉलसुद्धा ऑन द वे बघता येईल काय?

मधुरा देशपांडे's picture

16 Jul 2014 - 6:27 pm | मधुरा देशपांडे

अप्रतिम. वर्णन पण सुरेख. फोटो अजुन टाकले तर आवडेल.

यशोधरा's picture

16 Jul 2014 - 6:38 pm | यशोधरा

वर्णन सुरु होता होता संपल्यासारखे वाटले. फोटो सुरेख.

आतिवास's picture

16 Jul 2014 - 10:11 pm | आतिवास

+१
अधिक विस्ताराने लिहा पुढचा भाग अशी विनंती.

छान लिहीलयं, नावही अगदी समर्पक आहे. फोटो सगळेच आवडले, पहीला तुमच्या कॉटेजचा आहे का?

स्वाती दिनेश's picture

16 Jul 2014 - 7:13 pm | स्वाती दिनेश

सुंदर वर्णन आणि तितकेच छान फोटो..
अवांतर- मलिन लेक ,मलिन नदी... ही नाव काही पटत नाहीत बॉ.. किती निखळ्,निर्मळ आहे नदी.. आणि नाव काय असलं मलिन...
स्वाती

मुक्त विहारि's picture

16 Jul 2014 - 7:27 pm | मुक्त विहारि

मस्त

फोटो आणि वर्णन दोन्हीही छान. एकदा जायलाच पाहिजे असं ठिकाण. बेत जमवला पाहिजे.

मलीन लेक .. मलीन!!?...हुं! हा कसला 'मलीन'.. आमच्या ठाण्याचा कचराळी तलाव बघा म्हणावं एकेकाळी नावाला साजेसाच होता. आता परिस्थिती बदललीये.

स्वप्नांची राणी's picture

16 Jul 2014 - 8:38 pm | स्वप्नांची राणी

आभार पिरा, राजेंद्र, मधुरा, यशोधरा, सखी स्वाती, मुवि मंडळी!! एवढ्यातच आभार प्रदर्शन नव्हत करायच...म्हटल होऊन जाउदेत २००-३०० प्रतिसाद...मग करु आरामात. पण आता विचार करतेय कि ३००व्या प्रतिसादानंतर पुन्हा करु आभार प्रदर्शन..हाकानाका..!!

राजेंद्रजी, एडमंट्न च्या मॉल ऐवजी तिथल्या युनिवर्सिटी ऑफ अल्बर्टा विषयी लिहावं असं मनात आहे. मॉल बाकि मस्तच आहे.
सखी, हो ती आमची कॉटेज.

स्वाती, हो ना, मलाही अगदी तेच वाटलं होतं कि ईतकी सुंदर नदि / तळ आणि नाव काय हे असलं..? पण मग कळल कि मलिन हा फ्रेंच शब्द आहे. या तळ्याला पाणी पुरवठा करणार्‍या नदिच्या विराट खळखळाटी प्रवाहामुळे हे नाव मिळालय.

अजया's picture

16 Jul 2014 - 8:41 pm | अजया

अप्रतिम. ! पु.भा.प्र.

संजय क्षीरसागर's picture

16 Jul 2014 - 8:43 pm | संजय क्षीरसागर

आणि साधे सोपे शब्द. मजा आ गया!

खूप सुंदर ! अप्रतिम फोटोज् !!!!
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत :)

प्रचेतस's picture

16 Jul 2014 - 9:41 pm | प्रचेतस

काय सुरेख आहे हे सर्व...!!!!!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jul 2014 - 10:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर वर्णन. पण मला शेवटचा (सनवाप्ता नदि) सोडून इतर फोटो का दिसत नाहीत ? शेवटचा फोटो मात्र अतिशय सुंदर आहे !

सुरेख चित्रे व छान वर्णन! सध्या खूपच फिरायला मिळतय आम्हाला. मजा येतेय.

खटपट्या's picture

17 Jul 2014 - 4:56 am | खटपट्या

नाव मलीन लेक असले तरी पाणी खूप स्वच्छ आहे. चित्रावरून नजर हटत नाहीये एवढा सुंदर फोटो आहे

इशा१२३'s picture

17 Jul 2014 - 12:51 pm | इशा१२३

सुंदर फोटो..पण शेवटचा दिसत नाहिये..

मनीषा's picture

17 Jul 2014 - 12:55 pm | मनीषा

अप्रतीम छायाचित्रे
आणि सुरेख लेखन

खूपच अप्रतिम फोटो आहेत. आणि तुम्ही खूप छान लिहिलंय.

दिपक.कुवेत's picture

17 Jul 2014 - 3:07 pm | दिपक.कुवेत

विशेषत पहिला आणि शेवटचा आवडलाय. पुफोप्र.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jul 2014 - 12:50 am | अत्रुप्त आत्मा

*i-m_so_happy*

प्यारे१'s picture

18 Jul 2014 - 3:32 am | प्यारे१

भन्नाट फोटो आहेत. जगाला विसरायला लावणारे.

ते क्रमश: जरा उशीरानं येऊ द्या!

प्रभाकर पेठकर's picture

18 Jul 2014 - 3:17 pm | प्रभाकर पेठकर

काव्यातलं आपल्याला कांही समजत नाही ह्या धारणेमुळे, 'वाट इथे स्वप्नातील...' असे काव्यत्म शीर्षक पाहिल्यावर धागा उघडण्याचा विशेष उत्साह नव्हता.
पण आज उघडला आणि बॅन्फचं नांव वाचून जुन्या स्मृती जागृत झाल्या.
छायाचित्र आणि वर्णन वाचून मन पुन्हा त्या ठिकाणची भ्रमंती करून आले. छान लिहीले आहे.

२०११ साली मित्रा बरोबर आयुष्यात पहिल्यांदाच कॅनडाचा दौरा केला होता. तेंव्हा बॅन्फला भेट दिली होती. तो जुलै महिना असूनही चांगलीच थंडी आणि बर्फाच्छादित पर्वतांची विलोभनिय दृष्य असा तो आनंदोत्सव होता. प्रत्यक्ष बॅन्फ तर १० दिवस राहून निवांत उलगडावे असेच आहे. अर्थात मित्राबरोबर नाही पत्नीसह. असो. पुढच्या वेळी तशी योजना करूनच जाईन म्हणतो.
बॅन्फच्या तुमच्या वर्णनाची आणि छायाचित्रांची आतुरतेने वाट पाहात आहे.

आल्हाददायक आहेत सगळे फोटो. *ok*

शेवटचा फोटो तर खासच; लॅपटॉपवर वॉलपेपर म्हणून शोभून दिसेल इतका सुंदर आला आहे.