कहां गये वो लोग?--संज्या

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
7 Jul 2014 - 4:15 pm

कहां गये वो लोग?--बाबूकाका

कहां गये वो लोग?--आजीबाई

कहां गये वो लोग?--नाथा

कहां गये वो लोग?--मंग्या

कॉलेज सुरु होउन काही दिवस झाले होते.पावसाने चांगलाच जोर धरला होता.अशातच एका वीकेंडला ट्रेकला जायची टूम निघाली.ट्रेकिंगविषयी तशी फारशी माहीती कुणालाच नव्हती.कर्जत,पनवेल,कसारा,वांगणी,शहापूर,नेरळ असे अनेक पर्याय समोर आले.पण नक्की कुठला किल्ला एका दिवसात होण्यासारखा आहे,पावसाळयात काय काय तयारी घेउन जावे लागेल, जेवाखायची सोय काय तिथे जायचे कसे,कुठला ट्रेक कमी अवघड आहे असे एक ना अनेक प्रश्न होते.बरे मुले मुले असतो तर येईल त्या प्रसंगाला सामोरे जाऊ या तयारीने गेलोही असतो.पण बरोबरच्या मुली आणि त्यापेक्षा त्यांच्या घरचे लोक या सर्व डिटेल्स शिवाय पाठवायला तयार होईनात.आणि नुसत्या मुलांच्या ट्रेकला काय मजा? :)
मग कोणाच्यातरी ओळखीने संज्याचे नाव कळले अणि आम्ही २-३ मित्र कॉलेजचे पिरीयड बंक करुन संज्याकडे जाउन थडकलो.संज्याचे घर म्हणजे एका चाळीतील १०x१० च्या दोन खोल्या होत्या.घरात समोरच्याच खोलीत आजारी वडील पलंगाला खिळलेले,आई स्वैपाकघरात मग्न.आणि संज्या पुढच्या व्हरांड्यात सेटीवर आडवा फुल स्पीडवर पंखा लावुन मस्त घोरतोय.छातीवर कसलेतरी जाडजुड पुस्तक,बहुधा ते वाचतावाचताच झोपले होते साहेब.आणि सार्‍या खोलीत त्याचे ट्रेकींगचे साहित्य अस्ताव्यस्त पडलेले.त्यात काय नव्हते?मोठी फ्रेम सॅक,त्याला लटकणार्‍या कॅरेबिनर्स्,डीसेंडर्स,२-३ रोप,हंटरशुज,कॅरीमॅटची गुंडाळी,क्लिक्सचा स्टोव्ह वर खुंटीला एक मोठी दुर्बिण आणि पेन्टॅक्सचा कॅमेरा टांगलेला.जातिवंत ट्रेकरची सगळी लक्षणे तिथे नांदत होती.

५-१० मिनीटे आम्ही तसेच दाराबाहेर उभे.शेवटी त्याच्या आईचे लक्ष गेले आणि तिने आम्हाला आत बोलावले " अरे बाहेर उन्हात काय उभे राहीलात?आत या की. आत्ता उठेलच तो जेवायला.काल रात्री उशीरा ट्रेकहुन आलाय ना म्ह्णुन दमुन झोपलाय"असे म्ह्णुन तिने संज्याला उठवले. नमस्कार चमत्कार झाले आणि तोंडबिंड धुवुन संज्या आमच्यासमोर येउन बसला.गाडी लवकरच मूळ मुद्द्यावर आली.एका दिवसात करण्यासारखा सोपा ट्रेक कुठला?या प्रश्नावर गप्पा रंगल्या.आणि हळूहळू या माणसाचे ट्रेकिंग या विषयातले ज्ञान बघुन आमचे डोळे विस्फारायला लागले.त्याने महाराष्ट्रातले किमान ५० गडकिल्ले पालथे घातले होते. त्यातील अनेक तर २-३ वेळा आणि वेगवेगळ्या ऋतूंमध्ये.कुठे पाणी आणि राहण्याची सोय आहे,कुठे नाही ,कोणता ट्रेक कोणत्या ऋतूमध्ये करावा किंवा टाळावा,रॉक क्लायंबिंग कुठे करावे लागेल,सॅक कशी असावी आणि कशी भरावी,बूट कोणते वापरावेत...एक ना दोन.
या सगळ्यात त्याची जेवायची वेळ टळुन गेली होती. पण तोच गप्पांमध्ये ईतका रंगला होता की त्याला भुकेची आठवण करुन देउन आम्हाला निघायला लागले.

आमचा ट्रेक मस्तच झाला आणि कॉलेजमध्ये आमची थोडी वट निर्माण झाली.ट्रेकला न आलेले लोक आमच्यावर जळु लागले.एकुण मजा होती.तेव्हढ्यात एक दिवस अचानक संज्या रस्त्यात भेटला."काय रे?ट्रेक कसा झाला तुमचा" यावरुन गप्पा सुरु झाल्या अणि पुढे १ तास तिकडेच उभे राहुन आम्ही गप्पा हाणत होतो.सोबतच "पुढच्या रविवारी माहुलीला ट्रेक आहे.येतोस का?" असे आमंत्रणही मिळाले. त्या आनंदात तरंगतच घरी आलो.आणि आल्यावर पहीले आईच्य शिव्या खाल्ल्या."भाजी आणायला गेला होतास की पिकवायला?मार्केटमधुन भाजी आणायला एव्हढा वेळ लागतो?ईकडे सगळ्यांचे जेवणे झालीपण" मग तिला समजावता समजावता अजुन एक तास गेला.शिवाय पुढच्या रविवारच्या ट्रेकसाठी तिची परवानगी आणि पैसे मिळवायचे असल्याने पंगा घेउन चालणार नव्हते.

माहुलीच्या ट्रेकमुळे माझ्या जीवनात ट्रेकिंगचा एक नवाच अध्याय सुरु झाला.संज्याचा एक ट्रेकिंग ग्रुप होता.दर महीन्याला त्यांचे ट्रेक असायचे.वर्षातुन एकदा ३-४ दिवसांचा जंबो ट्रेक,शिवाय दर ३ महीन्यात एक फोटो प्रदर्शन,मीटींग,वृक्षारोपण असे काही ना काही उपक्रम असायचेच्.संज्या या सगळ्यात हिरीरीने भाग घ्यायचा.ग्रुपमध्ये एक बेडर पोरगा म्हणुन तो ओळखला जाई.ट्रेकचा लीडर कोणीही असो.संज्याच्या मताला महत्व असे.त्याने आपल्या अनुभवांवरुन काही मार्गदर्शक तत्वे बनवली होती.तो स्वतः ती पाळायचाच,पण नवीन ट्रेकर्सनीसुद्धा ती पाळावीत यासाठी आग्रही असायचा.अर्थात ती कोणी पाळली नाही आणि अडचणीत सापडला तरी त्याला मदत करायला संज्या नेहमीच पुढे असे.थोडक्यात म्हणजे तो जगन्मित्र होता.

अनेक प्रसंग आठवतात.एका ट्रेकमध्ये कोणालातरी साप चावला होता आणि ग्रुप अशा ठिकाणी होता जिथुन त्या मुलाला केवळ कडेवर किंवा पाठुंगळीला घेउनच उअतरणे शक्य होते.संज्या त्याला घेउन २-३ तास कसा उतरला देव जाणे.सपाटीला आल्याआल्या त्याला स्पेशल जीप करुन तालुक्याला सरकारी दवाखान्यात नेले आणि त्याचे प्राण वाचले.रॉक पॅच चढाईला रोप लावायचा असेल तर पहीला फ्री क्लायंबर संज्या,मुक्कामाला पोचल्यावर चुल लावायला किंवा पहीला चहा करायला तोच,रात्री पाणी सम्पले असेल आणि लांबच्या टाक्यावरुन भरुन आणायचे असेल तर संज्याने सांगताच ३-४ जण तयार व्हायचे.जंगलातील झाडांची आणि रात्रा तार्‍यांची माहीती त्यानेच मला करुन दिली.अवघड रानवाटांवर चालायची मजा मला त्याच्यामुळेच समजली.ट्रेकमध्ये पाणी जपुन वापरणे,प्लॅस्टीकचा कचरा न टाकणॅ,आपली बाटली नेहमी पाण्याने भरलेली ठेवणे त्याच्याकडुन शिकलो.उघड्या माळरानावर किंवा गुहेत झोपणे,तीन दगडांची चुल पेटवणे त्याने शिकवले.माझा ट्रेकींगमधला गुरु खर्‍या अर्थाने संज्याच.

पण हे झाले ट्रेकिंगपुरते.ट्रेकबाहेर खर्‍या आयुष्यात त्यालाही अनेक प्रश्न होतेच.शिक्षण अपुरे राहीले होते.घरची आर्थिक परीस्थिती फारशी चांगली नसावी.वडीलांचे आजारपण,अपुरी जागा एक ना अनेक.ट्रेकिंगवर पोट भरते थोडीच?
मधल्या काळात माझे ट्रेकिंग जवळ जवळ बंदच झाले. नोकरी,लग्न,मुले या व्यापात अडकत गेलो.ट्रेकिंग मागे पडत गेले आणि फक्त आठवणी राहील्या.आणि अनेक ड्रीम ट्रेक पूर्ण न झाल्याची खंत.

परवा संज्या अचानक परत भेटला.गप्पा ट्रेकिंगवर आल्या. तो अजुन अविवाहीतच राहीला आहे.ट्रेकिंग मात्र त्याने जीवापाड जपले आहे.आता तो एका मोठ्या संस्थेसाठी प्रशिक्षक म्हणुन काम करतो.कँप घेतो,बेसिक रोप ट्रेनिंग,रॉक क्लायंबिंग,रिव्हर क्रॉसिंगचे ट्रेनिंग देतो.चांगले पैसे मिळवतो.मला त्याचा फार हेवा वाटला.छंदालाच ज्यांनी व्यवसाय बनवला आहे अशा मोजक्याच भाग्यवान लोकांपैकी तो एक आहे.त्याही बाबतीत तो माझा गुरु निघाला तर......

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

ब़जरबट्टू's picture

7 Jul 2014 - 4:32 pm | ब़जरबट्टू

बेस्टच...

तुमचा अभिषेक's picture

7 Jul 2014 - 4:44 pm | तुमचा अभिषेक

छंदालाच ज्यांनी व्यवसाय बनवला आहे

नेहमीच हेवा वाटतो अश्यांचा.. बाकी आपण सारे जीवनाचे गुलाम

आवडलं !

भ ट क्या खे ड वा ला's picture

9 Jul 2014 - 5:54 pm | भ ट क्या खे ड वा ला

आवडला.
अशा अनेक "संज्यानी" हा छंद जीवापाड जपला आहे. अनेकांना भटकायचे वेड लावले आहे.
यातील काहीनी करिअर आणि छंद या दोन्हीतील समन्वय साधला आहे.

भ ट क्या खे ड वा ला's picture

9 Jul 2014 - 5:55 pm | भ ट क्या खे ड वा ला

आवडला.
अशा अनेक "संज्यानी" हा छंद जीवापाड जपला आहे. अनेकांना भटकायचे वेड लावले आहे.
यातील काहीनी करिअर आणि छंद या दोन्हीतील समन्वय साधला आहे.

एस's picture

9 Jul 2014 - 6:43 pm | एस

हेच म्हणतो.

प्रभाकर पेठकर's picture

10 Jul 2014 - 12:09 pm | प्रभाकर पेठकर

मस्तं व्यक्तिचित्रण.