ड्रेस्डेन - प्राग - ३

मधुरा देशपांडे's picture
मधुरा देशपांडे in भटकंती
30 Jun 2014 - 5:04 pm

ड्रेस्डेन - प्राग - १
ड्रेस्डेन - प्राग - २

सकाळी उठून पुन्हा ड्रेस्डेन च्या मुख्य स्थानकावर नाश्ता करून पुढे निघालो. फ्राउएनकिर्श (Frauenkirche) म्हणजेच येथील प्रमुख चर्च. जर्मन भाषेत फ़्राउ म्हणजे स्त्री. इंग्रजीत चर्च ऑफ अव्हर लेडी म्हणजेच मदर मेरी चे चर्च. ड्रेस्डेन मधील इतर इमारतींप्रमाणेच या चर्चला महायुद्धाचे परिणाम भोगावे लागले. दुसरे महायुद्ध संपण्यापूर्वी ड्रेस्डेन वर जे बॉम्बिंग झाले, त्यात आजूबाजूच्या इमारतींना लागलेल्या आगीच्या झळा चर्च पर्यंत पोहोचून येथील लाकडी बाक आणि इतर अनेक वस्तू जळून खाक झाल्या. शिवाय अनेक ठिकाणी पडझड झाली. महायुद्ध, त्यातून झालेले नुकसान आणि अजूनही जतन करून ठेवलेले काही अवशेष यांचे एक संग्रहालय तळमजल्यावर आहे. हे अवशेष जतन करण्यामागे असे कधीही पुन्हा घडू नये, शांतता नांदावी हा हेतू आहे. वरच्या मजल्यापर्यंत देखील जाता येतं. वरून संपूर्ण ड्रेस्डेन शहराचा सुरेख देखावा दिसतो. आम्ही गेलो त्यावेळी प्रार्थना सुरु होणार होती आणि त्यामुळे बहुधा तेवढा वेळ वर जाण्यास प्रवेश बंद केला होता. प्रार्थनेसाठी गर्दी वाढली होती आणि काही भाग बंद होता. नंतर दुपारहून परत येऊ असा विचार करून इथे फारसे न थांबता परत आलो. नंतर वेळ मिळालाच नाही याचे वाईट वाटले. फोटोग्राफी ला परवानगी नव्हती. त्यामुळे जेवढे पहिले तिथे फोटो काढता आले नाहीत. बाहेरून दिसणारे फ्राउएनकिर्श.

https://lh5.googleusercontent.com/-_QxChEj1m0U/U7FHLisQWQI/AAAAAAAADLc/vL5w1aSCgyE/w356-h534-no/DSC_0170.JPG

इथून पुढे ड्रेस्डेन च्या मुख्य महालाकडे जाताना लागते ती ही भिंत म्हणजेच फ्युर्स्टेनवेग (Fuerstenweg).

https://lh5.googleusercontent.com/-OhB5bj2jLAo/U7FHObJ-XHI/AAAAAAAADLs/I2m5PrBrK3c/w801-h534-no/DSC_0174.JPG

https://lh5.googleusercontent.com/-hpge4G32C_o/U7FHQesi_II/AAAAAAAADME/I2I78vRAi1s/w801-h534-no/DSC_0177.JPG

१०० मीटर लांब आणि १० मीटर उंच असलेली ही संपूर्ण भिंत म्हणजेच ड्रेस्डेन महालाचाच एक भाग आहे. १८७१ ते १८७६ च्या काळात या राज्याच्या राज्यकर्त्यांची ८०० वर्षांची परंपरा साजरी करण्यासाठी ही रंगवली गेली. पुढे हवामानाचे विपरीत परिणाम जेव्हा जाणवू लागले, तेव्हा ड्रेस्डेन मध्येच तयार केलेल्या माइसेन पोर्सीलेनच्या (Maissen Porcelain) टाइल्स ने ही पुन्हा बांधण्यात आली. ड्रेस्डेन चे राज्यकर्ते, त्यांच्या अनेक पिढ्या, शिवाय ड्रेस्डेन मधील काही प्रसिद्ध शास्त्रज्ञ, कारागीर यांची ही चित्रे इथे काढली आहेत. जगातील सगळ्यात मोठे पोर्सीलेन चे काम म्हणून ही भिंत ओळखली जाते.

याच मार्गाने पुढे जाउन ड्रेस्डेन महालात पोहोचलो. संपूर्ण युरोपात प्रसिद्ध असा ड्रेस्डेन महाल म्हणजेच फार पूर्वीच्या काळापासून सॅक्सोनी राज्याच्या राजघराण्याचा महाल. येथील राजघराणे हे युरोपातील सधन
राजघराण्यांपैकी एक. घराण्याच्या ऑगस्ट द स्ट्राँग आणि त्याचा मुलगा ऑगस्ट तिसरा यांनी खास आवडीने जगभरातील उत्तमोत्तम आणि कलात्मक वस्तू आपल्या दालनात जमवल्या. ग्रीन व्होल्ट हे येथील पहिले संग्रहालय या राजाने स्वतः लक्ष देऊन बनविले. पुढे त्यानेच या दालनाचा विस्तार केला. फार पूर्वीच्या काळात हे संग्रहालय त्याने आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करण्याच्या हेतूने मर्यादित लोकांसाठी खुले केले. त्याच्या शत्रुंसाठी देखील हे एक अप्रूप होते. महायुद्धाच्या काळात महालाचे बरेच नुकसान झाले. परंतु असे काही होऊ शकते याचा अंदाज घेऊन येथील सर्व प्रमुख वस्तू दुसरीकडे हलविण्यात आल्या. त्यामुळे त्या वाचल्या आणि आता महालाचे नुतनीकरण केल्यानंतर परत आणल्या गेल्या. आता येथे विविध संग्रहालये आहेत. ऐतिहासिक ग्रीन व्होल्ट आणि नवीन ग्रीन व्होल्ट संग्रहालय ही प्रमुख. याशिवाय ऱ्यूस्टकामर (शस्त्रालय), कॉईन कॅबीनेट आणि फोटो आणि चित्रांचे संग्रहालय. यापैकी ऐतिहासिक दालनासाठी ऑन लाइन तिकीट आरक्षण करणे अत्यावश्यक आहे. दिवसभरात काही ठराविक वेळांचे स्लॉट असतात. त्या त्या वेळेलाच आत सोडले जाते. इतर दालनांमधील प्रवेश कुठल्याही वेळी चालतो. फोटोग्राफीला कुठल्याच दालनात परवानगी नाही. त्यामुळे येथील सगळे फोटो आंतरजालावरून घेतले आहेत. हे योग्य आहे असेही वाटले कारण बरेचदा अशा काही ठिकाणी मग फोटो काढण्यालाच महत्व येतं आणि मूळ आनंद हरवून बसतो. तिकिटा सोबत ऑडीओ गाईड मिळते. शिवाय प्रत्येक दालनात संक्षिप्त स्वरुपात माहिती दिलेली आहे. आमचे ऐतिहासिक दालनाचे तिकीट दुपारी २ वाजता साठी होते. त्यामुळे नवीन ग्रीन व्होल्ट कडे पहिला मोर्चा वळवला.

या दालनातील प्रमुख कलाकृती म्हणजेच औरंगजेबाच्या वाढदिवसाचा सोहळा. भारत आणि तेथील औरंगजेब हा राजा, त्याचा राजदरबार, त्याची संपत्ती, हे सगळे भारताबाहेरही नावाजले होते. याविषयी येथील राजाने वाचलेल्या पुस्तकात जे काही लिहिले होते त्यावरून राजाने स्वतः हे कारागीरांकडून बनवून घेतले होते. यात ४९०९ हिरे, १६० रुबी, १६ मोती, १६४ पाचू आणि १ इंद्रनील वापरला गेला आहे. कितीही वेळ पहिले तरी समाधान होत नाही अशी ही अजरामर कलाकृती आहे.

https://lh4.googleusercontent.com/-RZTkp-wEtjY/U7FHPOyLtyI/AAAAAAAADL4/vhSMTPkxb3E/w802-h534-no/aurang.jpg

यात इतर राजे त्याच्यासाठी भेटवस्तू आणत आहेत, अनेक प्रकारची वाद्ये आहेत आणि इतर अनेक बारकावे सुरेख साकारले आहेत.
याशिवाय देश विदेशातून आयात केलेल्या अनेक रत्नजडीत वस्तू आहेत. यात गुजरात मधून आयात केल्या गेलेल्या अनेक मोत्याच्या वस्तू आहेत. प्रत्येक कलाकृती ही वेगळी आहे. स्त्रियांचे दागिन्यांचे प्रकार, दागिन्यांच्या पेट्या, रत्नजडीत तलवारी, अनेकविध आरसे, चहा कॉफी चे कप, वाइन ग्लासेस, पोर्सीलेन ची भांडी, मेणबत्त्यांच चे स्टँड, विविध पद्धतीची घड्याळे आणि अजून बरेच काही. प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. काही खोल्या या केवळ कुणा राजपुत्राच्या हट्टापायी नवीन केल्या गेल्या तर काही मोडल्या गेल्या. नवीन येणाऱ्या प्रत्येक पिढीने आपल्या परीने यात बदल केले.

इथे कितीही थांबलो तरीही मन भरणार नव्हते. ऐतिहासिक दालनातील प्रवेश २ वाजता म्हणून आता बाहेर पडणे आवश्यक होते. पोटपूजा करून २ वाजता ऐतिहासिक दालनात गेलो. इथे प्रवेशाची संख्या मर्यादित आहे. पुन्हा प्रत्येक वस्तू ही अवर्णनीय होती. आत अंबर, चांदी, हस्तिदंत इत्यादी चे एकेक दालन आहे. काही निवडक दालने आणि वस्तू. (सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार.)

https://lh4.googleusercontent.com/-PatzScjjn60/U7FHoIpt86I/AAAAAAAADNE/WpjqoLHUfwo/w605-h478-no/Gr3.jpg

https://lh6.googleusercontent.com/-vLhcu3m-z5o/U7FHh39JAYI/AAAAAAAADMg/t78FJgN8XBs/w610-h479-no/Gr2.jpg

https://lh4.googleusercontent.com/-8S8Yq2WMgfo/U7FHhxLu2dI/AAAAAAAADMs/P_vm9wiNr5c/w619-h480-no/Gr4.jpg

https://lh5.googleusercontent.com/-gsyI6i9e8t8/U7FHiEQWewI/AAAAAAAADMk/7Biz6msC5O8/w347-h482-no/Gr6.jpg

https://lh4.googleusercontent.com/-Gb7NRlqN_-o/U7FHid9RO5I/AAAAAAAADM0/o2KTsa3V2gw/w611-h449-no/Gr7.jpg

https://lh4.googleusercontent.com/-LF_EaHjy9xA/U7FHPma0IMI/AAAAAAAADL8/f_FN2_Rj3zg/w801-h534-no/green4.jpg

रत्नजडीत तलवारी, दागदागिने आणि शोभिवंत वस्तू या सगळ्या बघता बघता पाय थकले होते पण बाहेर पडायची इच्छा होत नव्हती. भिंतींचे रंगकाम, त्यावर कोरलेली नक्षी, युद्धात वापरण्याचे पेहराव, भिंतींवरील कोरीवकाम, सुंदर कमानी असलेले दरवाजे, सुंदर रंगवलेली छत, बघत रहावीत अशी झुंबरे, सुरेख शोभिवंत वस्तू आणि तेवढीच कलात्मक मांडणी, प्रत्येकाविषयी दिलेली योग्य माहिती या सगळ्यामुळे ही भेट अविस्मरणीय ठरली. कुठलाही फोटो काढता आला नाही परंतु एक अजरामर संग्रहालय पाहिल्याचे समाधान घेऊन बाहेर पडलो. इथलीच इतर २ दालने पाहिली आणि परत हॉटेल वर परतलो.

ड्रेस्डेन शहरातील भटकंती संपली होती. सगळ्या इमारतींचे महायुद्धात त्यातही विशेष करून १९४५ सालच्या बॉम्बिंग दरम्यान अतीव नुकसान झाले. परंतु युद्धोत्तर काळात या सगळ्या गोष्टी शक्य तेवढ्या प्रमाणात पुन्हा बांधण्यात आल्या. एवढेच नव्हे, ऐतिहासिक वारसा म्हणून उत्तम संग्रहालायांच्या रुपात जगासमोर आणल्या गेल्या आणि आजही तेवढ्याच आत्मीयेतेने जतन केल्या जात आहेत. या सगळ्यासाठी या लोकांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. इतिहास, संग्रहालय बघणे यात रस असेल आणि ड्रेस्डेन च्या जवळपास कधीही येणे झाले तर आवर्जून भेट द्यावीच असे हे शहर आणि संग्रहालय. शेवटचा आणि परतीचा दिवस होता येथून जवळच असलेल्या बास्टाय च्या परिसराचा. त्याविषयी पुढील आणि अंतिम भागात...
क्रमशः

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

30 Jun 2014 - 5:22 pm | यशोधरा

आला का पुढचा भाग! मस्त! आता वाचते निवांत. :)

सुरेख चित्रे आणि माहिती आहे. मस्तच!

बॅटमॅन's picture

30 Jun 2014 - 6:08 pm | बॅटमॅन

जबरदस्त. निव्वळ अप्रतीम. 'औरंग्या पापी' पूर्व युरोपातही फेमस असल्याचे पाहून आश्चर्याचा सुखद धक्का बसला.

एस's picture

30 Jun 2014 - 6:20 pm | एस

खूप छान वर्णन.

स्वाती दिनेश's picture

30 Jun 2014 - 7:23 pm | स्वाती दिनेश

सुंदर !
छान लिहिले आहेस,
स्वाती

मस्तच गं मधुरा ,छान लिहलं आहेस.ती औरंगझेबाची कलाकृती तर निव्वळ अप्रतिम.पु.भा.प्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jun 2014 - 10:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम ! वर्णन आणि चित्रे बघून तिथे जाण्याची उत्सुकता अजूनच वाढली !

खटपट्या's picture

30 Jun 2014 - 10:27 pm | खटपट्या

खूप छान फोटो
औरंगजेबाच्या दरबाराबद्दल मागे लोकप्रभा मध्ये सुंदर लेख छापून आला होता. त्याकाळी अख्या जगात औरंगजेबाचे नाव होते. आणि अशा बादशाहाला महाराजांनी टक्कर दिली….

मधुरा देशपांडे's picture

30 Jun 2014 - 11:04 pm | मधुरा देशपांडे

यशो, रेवाक्का, बॅटमॅन, स्वॅप्स, स्वातीताई, अजया, इए काका, खटपट्या, धन्यवाद.
औरंगजेबाविषयी आणि भारताविषयी इकडच्या लोकांमध्ये तेव्हाही प्रचंड उत्सुकता असावी असे वाटले. ज्या पुस्तकावरून हा देखावा साकारला गेला त्या लेखकाला आणि कारागिरांना मानावे लागेल. गुजरात मधून आणलेल्या वस्तूंचे वर्णन सुद्धा संपन्न, वैभवशाली भारतातून आयात केले गेलेले असे होते. भारताबाहेर हे सगळे अनुभवणे विशेष आनंददायी होते. :)

आणि अशा बादशाहाला महाराजांनी टक्कर दिली….

अगदी असेच आले होते मनात.

सस्नेह's picture

1 Jul 2014 - 3:19 pm | सस्नेह

त्या वस्तू पाहून सालारजंग म्युझियमची आठवण आली.

मस्त माहिती आणि सुरेख लेखन. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रिमझिम गिरे सावन... :- मंझिल

नंदन's picture

2 Jul 2014 - 11:23 am | नंदन

लेख आवडला. ड्रेस्डेन बॉम्बिंगच्या पार्श्वभूमीवरचं एक क्लासिक पुस्तक (स्लॉटरहाऊस-फाय) अलीकडेच वाचलं, त्यामुळे या शहराबद्दल विशेष उत्सुकता होती. या प्रवासवर्णनाने आणि फोटोंनी ती थोडीफार शमली असली तरी प्रत्यक्ष जायला कधी मिळेल अशी रूखरूखही लागून राहिली आहे.

चौकटराजा's picture

2 Jul 2014 - 8:18 pm | चौकटराजा

तुम्हाला युरोपात राहायला मिळत आहे व पाहायलाही मिळत आहे याचा हेवा आनंद सर्व आहे. युरोप ही सर्वच गोष्टींची खाण आहे पार तेथील ऑटम पासून गुन्हेगारी पर्यंत. हा लेख उत्तम. त्यातील दालनांचे फोटो सुरेख आलेयत.

मधुरा देशपांडे's picture

2 Jul 2014 - 8:33 pm | मधुरा देशपांडे

स्नेहाताई, मदनबाण, धन्यवाद.
@नंदन, पुस्तकाच्या माहितीसाठी धन्यवाद. वाचायला आवडेल.
@चौकटराजा, सगळे फोटो आंतरजालावरून घेतलेत. फक्त प्रत्यक्ष पाहिल्याचं समाधान आहे. :) युरोप ही खाण आहे खरी. फक्त जगासमोर युरोप म्हणजे स्विस आणि बॉलीवूड हेच जास्त आलंय हे इथे राहिल्यानंतर जास्त जाणवलं. त्यामानाने काही तेवढी प्रसिद्ध नसलेली ठिकाणे देखील सुंदर आहेत. अनुभवण्यासारखी आहेत. ही लेखमाला लिहिताना तोच उद्देश होता की अशा स्थळांविषयी माहिती व्हावी. प्रोत्साहनासाठी आभार.

सखी's picture

2 Jul 2014 - 11:05 pm | सखी

छान माहीती आणि चांगले लेखन, कलाकृती/फोटोही सगळे आवडले.

उल्का's picture

19 May 2016 - 5:38 pm | उल्का

अप्रतिम लेख.
फोटोज मस्त आले आहेत.
बाकीचे भाग पण वाचते आहे.