महाभारताची वेगळी कथा...

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
27 Jun 2014 - 5:38 pm

आज थोडं वेगळं लिहू का... माझं वाचन नियमीत सुरू असतं. मुख्यत्वे मराठी आणि बऱ्यापैकी इंग्रजी. शिवा ट्रायॉलॉजी वाचल्यानंतर पौराणीक साहित्य वाचायला आवडू लागलं. पुराणातल्या माहिती नसलेल्या अनेक गोष्टी जाणून घ्यायची ओढ लागली आणि हाती लागेल तसं बरंच काही वाचत गेले. अशीच एक कथा. फार कमी लोकांना माहिती असावी, म्हणून इथे लिहावी, असं वाटलं.
ही गोष्ट आहे कौरव-पांडवांची. पंडुच्या मृत्युनंतर पाच पांडवांना घेऊन कुंती हस्तिनापुरात परतलेली. वनात जन्मलेले, लहानाचे मोठे होणारे पाचही पांडव जरासे दांडगटच. युधिष्ठीर त्यातल्या त्यात शांत, सौम्य. साधारण तसेच नकुल-सहदेव. अर्जुन पितामह भिष्मांच्या कौतुकाने स्वत:च्या आणखी कौतुकात रमलेला तर भीम आपल्या अद्वितीय शक्तीच्या अहंकारात बुडालेला.
कौरव-पांडव खरं तर भावंडंच. ती सुद्धा समवयस्क. एकत्र खेळ, वाद विवाद आणि भांडणंही रोजचीच ठरलेली. एके दिवशी खेळताना असंच काही भांडण झालं आणि कौरव रडत-रडत पितामह भिष्मांकडे आले. पितामहांनी मुलांना जवळ घेतलं आणि रडण्याचं कारण विचारलं. कौरवांनी उत्तर देत सांगितलं, त्या पांडवांनी आम्हाला चिडवलं... विधवेचे पुत्र म्हणून...
भिष्म चकित झाले. त्यांनी विचारलं, कोण चिडवत होतं तुम्हाला? कौरव उत्तरले, ते पाचही जण. अगदी युधिष्ठीर सुद्धा...
आता पितामहांच्या भुवया आक्रसल्या. मी बोलतो त्यांच्याशी, असं म्हणून कौरवांना पाठवून दिलं आणि स्वत: विचारात गढले. युधिष्ठीर सत्यच बोलणार, याची खात्री होती. काही वेळ विचार करून पितामहांनी तातडीने गुप्तहेरांना योग्य त्या सूचना देऊन गांधार देशी रवाना केलं.
अल्पावधीत परतलेल्या गुप्तहेरांकडून कळलं, ते अचंबित करणारं होतं. गांधारीच्या जन्म पत्रिकेत पहिल्या पतीच्या मृत्युचा योग होता. त्यावर तोडगा म्हणून गांधारीचा विवाह एका बोकडाशी करायचा आणि नंतर त्या बोकडाचा बळी द्यायचा, असा तोडगा राज ज्योतिषाने सुचवला. अतिशय गुप्त पद्धतीने हा विधी पार पडला. यथावकाश गांधारी धृतराष्ट्राशी विवाहबद्ध झाली. मात्र तिच्या पहिल्या विचित्र विवाहाची कल्पना कुरू कुलात कोणालाही देण्यात आली नाही.
हा वृत्तांत ऐकून पितामह संतापले. त्यांनी गांधारीला बोलावून घेतलं आणि विचारलं. गांधारीने घाबरत संकोचत सारं काही मान्य केलं. क्षमायाचनाही केली. चेहरा शक्यतो निर्वीकार ठेवत पितामहांनी तिला जायला सांगितलं. फसवणुकीने संतापलेल्या पितामहांनी गांधार देशी सैनिकांची तुकडी पाठवली. गांधारीचे वडील आणि तिन्ही भावांना कैद करून हस्तिनापुरात आणलं. झाल्या गोष्टीची शहानिशा केली आणि त्या चौघांनाही तळघरात डांबलं. गांधारीने खूप विनवण्या केल्या, पण पितामहांनी त्यांना मुक्त करण्यास ठाम नकार दिला.
त्या चौघांनाही जेमतेम जिवंत राहता येईल, इतकंच अन्न देण्याचा पितामहांचा आदेश होता. थेट हत्येचं पातक नको होतं. ही बाब काही काळाने गांधारीच्या पित्याच्या लक्षात आली. त्याने खूप विचार केला आणि आपल्या तिन्ही मुलांशी संवाद साधला. आपल्यापैकी किमान एकाला तरी जगवायचा प्रयत्न करू. आपल्यावरच्या अन्यायाचा बदला घेण्याचा शेवटचा प्रयत्न करू.
मुलांनी सहमती दर्शवली आणि सर्वानुमते धाकट्या शकुनीला जास्तीत जास्त अन्न देऊन जगवण्याचं ठरलं. कालांतराने शकुनीच्या दोन्ही भावांचे निधन झालं. प्रत्येक भावाच्या निधनानंतर गांधारीने विलाप केला, पितामहांची करूणा भाकली. पण ते द्रवले नाहीत.
होता-होता गांधारीच्या पित्याचा अंत जवळ आला. त्यांनी शकुनीला जवळ बोलावलं. जवळचा एक ओंडका मागून घेतला आणि सर्व त्राण एकवटून त्या ओंडक्याने शकुनीच्या पायावर वार केला. शकुनी पंगु झाला, चिडला. पित्याने अतिव प्रेमाने पुन्हा त्याला जवळ बोलावलं. म्हणाला, आता माझा शेवट जवळ आलाय. माझ्यानंतर तुला वाचवण्यासाठी गांधारी शर्थीचे प्रयत्न करेल. तू शक्यतो जिवंत राहशील. पण तुझं उरलेलं आयुष्य आमच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी आहे, हे लक्षात असू देत. तुझा हा मोडलेला पाय, प्रत्येक पावलावर तुला या कर्तव्याची आठवण करून देत राहील...
थोड्याच वेळात गांधार नरेशही मरण पावला. दोन भावांच्या मृत्युनंतर पित्याच्याही मृत्युने गांधारी कोसळली. शकुनीला अभय द्या किंवा मलाही त्याच पद्धतीने मरू द्या, असं म्हणत पितामहांच्या पावलांवर कोसळली. पितामहांना तोवर आपल्या वागण्याच्या योग्यायोग्यतेबाबत संदेह वाटू लागला होता. त्यांनी शकुनीला अभय दिलं... शकुनी हस्तिनापुरातच वाढू लागला... आणि पुढे सर्वज्ञात महाभारत घडलं...

** काही महिन्यापूर्वी कुठेशी वाचनात आलेली ही कथा. आठवली तशी लिहून काढलीय.

कथालेख

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

27 Jun 2014 - 5:55 pm | सौंदाळा

ऐकावे ते नवलच
छान आहे कथा

हाडक्या's picture

27 Jun 2014 - 7:22 pm | हाडक्या

काय राव.. दोन इकडच्या तिकडच्या कथांची सरमिसळ आहे इथे. :)

उगोलिनोची कथा आहे त्यात त्याला आणि त्याच्या मुलांना असे कैदेत ठेवलेले असते तेव्हा काही जणाना जगवायला इतर जण मरतात.

आणि हे एक प्रसिध्द चित्र,

Ugolino

मृत्युन्जय's picture

27 Jun 2014 - 5:56 pm | मृत्युन्जय

वेगळी म्हणुन वाचायला चांगली अशी कथा . पण या कथेव्यतिरिक्त आणि चोप्रांच्या महाभारताव्यतिरिक्त शकुनी कुठेही पंगू आहे असे वाचल्याचे ऐकीवात नाही. चूभूद्याघ्या

प्रचेतस's picture

27 Jun 2014 - 6:10 pm | प्रचेतस

सहमत आहे.
उलट भीष्म शकुनीचे वर्णन करताना म्हणतो की

शकुनिर्मातुलस्य ते ऽसौ रथ एकौ नराधिप
परसज्य पाण्डवैर वैरं यॊत्स्यते नात्र संशयः ||

एतस्य सैन्या दुर्धर्षाः समरे ऽपरतियायिनः
विकृतायुध भूयिष्ठा वायुवेगसमा जवे ||

हे नराधिपा, तुझा मातुल शकुनी एक रथी असून त्यानेच पांडवांशी हे वैर योजीले आहे. तो युद्ध करील ह्यात शंका नाही समोरच्या शत्रूंवर चालून जाणारी ह्याची सेना दुर्धर्ष असून ह्याचे विचित्र आयुधांनी युक्त असलेले सैन्य वायुप्रमाणे वेगवान आहे.

बॅटमॅन's picture

27 Jun 2014 - 6:19 pm | बॅटमॅन

शकुनीची सेना कशीही असली तरी त्यामुळे तो पंगू नसेलच असे सांगता येत नाही. उदा. तैमुरलंग लंगडा होताच की.

प्रचेतस's picture

27 Jun 2014 - 6:20 pm | प्रचेतस

पण मग तो रथी असणेही शक्य नाही आणि महाभारतात शकुनी पंगू असल्याचा उल्लेख कुठेही नाही.

चित्रगुप्त's picture

27 Jun 2014 - 9:20 pm | चित्रगुप्त

रथी म्हणिजे काय, , महारथी म्हणिजे काय , अतिरथी म्हणिजे काय, मज निरोपावे.

रथी म्हणजे रथारूढ योद्धा आणि महारथी किंवा अतीरथी म्हणजे एकाच रथात बसून कित्येक रथ्यांशी एकाच वेळी युद्ध करू शकणारे. महारथी आणि अतिरथी मधील अधिक श्रेष्ठ कोण याबद्दल महाभारत मुग्धच आहे पण काहीवेळा श्रेष्ठ योद्ध्यांना एकाचवेळी अतिरथ आणि महारथ असेही संबोधलेले आहे.
उद्योगपर्वातील रथातिरथसंख्यान उपपर्वात कौरव आणि पांडवांतील रथी, महारथी आणि अतिरथी योद्ध्यांची संख्या दिलेली आहे. ह्यात दुर्योधन, दु:शासनादिक कौरवांना रथी, सिंधुराज जयद्रथाला द्वैरथी, शल्याला, द्रोण, भीष्म अतिरथी/महारथी तर कर्णाला परशुरामाच्या शापामुळे अर्धरथी मानले गेले आहे.

मृत्युन्जय's picture

28 Jun 2014 - 10:16 am | मृत्युन्जय

अतिरथी हा महारथींपेक्षा श्रेष्ठ. फार कमी लोकांना अतिरथी म्हणुन संबोधिले गेले आहे. राम, कृष्ण, अर्जुन, कर्ण, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्म, क्रूतवर्मा, सात्यकी, भूरिश्र्वा, बाल्हिक, प्रद्युम्न, अनिरुद्ध, अभिमन्यु, द्रुष्ट्यद्युम्न, श्वेत हे सर्व अतिरथी होते.

दुर्योधन आणि त्याचे १० भाऊ, अश्वत्थामा, घटोत्कच, वृषसेन, विराट, द्रुपद इत्यादी महारथी होते. अश्वत्थामाला काही ठिकाणी अतिरथी म्हटलेले आहे.

भीम ८ रथांच्या योग्यतेचा होता (दुर्योधनापेक्षा कमी).

एकावेळेस एक यौद्धा किती लोकांशी यशस्वीपणे लढु शकतो त्याप्रमाणे त्याला रथी, महारथी अथवा अतिरथीचा दर्जा मिळत असे. माझ्या माहितीनुसार एक अतिरथी एका वेळेस ६०००० सामान्य यौद्ध्यांशी यशस्वीपणे लढु शकत असे. याचा अर्थ असा की ६०००० सामान्य यौद्ध्यांमध्ये त्याला एकट्याला सोडल्यास तो त्याच्या शस्त्रांस्त्रांच्या बळावर त्यांच्यामधुन तरुन जाउ शकत असणार. भीमाला ८ रथांच्या योग्यतेचा अशासाथी म्हटलेले आहे की त्याच्याकडे इतरांच्या मानाने दिव्यास्त्रे कमी होती (माझे अनुमान). त्यामानाने ती दुर्योधनाकडे जास्त होती असे मानावे लागेल. पण भीम एकटा भल्याभल्यांना भारी पडला. आणि भीष्म आणि बाल्हिक सोडल्यास सर्वांना त्याने हरवले. एका युद्धात त्याने ३० कौरव मारले. ते ही कर्णासमोर ते लक्षात घेता त्याच्या ताकदीच्या जोरावर आणि निर्दयी स्वभावामुळे आणि रणमदात तो एकेकट्ञाला कधीही भारी पडत होता असे दिसेल.

तर कर्णाला परशुरामाच्या शापामुळे अर्धरथी मानले गेले आहे.

असे भीष्म म्हणतात. तेही केवळ कर्णाचा तेजोभंग करण्यासाठी आणि त्याला युद्धातुन बाजुला ठेवण्यासाठी. भीष्माच्या पाडावानंतर जेव्हा कर्ण भीष्माला भेटायला जातो तेव्हा भीष्म मान्य करतात की तो अर्जुनाच्या बरोबरीचा आहे. नंतर ते स्वतःच त्याला तो २ महारथ्यांच्या बरोबर असल्याचा निर्वाळा देतात. अर्थात तरीही त्याला अतिरथी मानत नहित. इतर बर्‍याच ठिकाणी मात्र कर्णाचा उल्लेख अतिरथी म्हणुन येतो.

कानडाऊ योगेशु's picture

29 Jun 2014 - 12:03 am | कानडाऊ योगेशु

अर्धरथी म्हणजे ज्याला रथातुन युध्द करता येते पण रथ चालवण्याचे कौशल्य मात्र तितकेसे नसते असा योध्दा.
महाभारतात अर्जुनानेही रथ चालवल्याचे उल्लेख आले आहेत असे वाचल्याचे आठवते पण स्वतः सारथीपूत्र असुनदेखील कर्णाने स्वतः रथ हाकल्याचा उल्लेख महाभारतात नाही.कौरव व पांडवांना शस्त्रास्त्राचे जे शिक्षण मिळाले ते त्याकाळच्या रितिरिवाजानुसार परिपूर्ण असावे त्यामुळे सारथ्यापासुन सर्व शस्त्रे हाताळण्याचे योग्य शास्त्रीय शिक्षण त्यांना मिळाले असण्याची शक्यता असावी. पण कर्ण मात्र शिकला तो केवळ महत्वकांक्षा वा इन्स्टिंक्ट मुळे.त्यामुळे त्याच्या कौशल्यात ती परिपूर्णता कधीही नव्हती.उदाहरणच द्यायचे झाले तर जिम इन्स्ट्रक्टर चा उपयोग करुन शरीरसौष्ठव बनवणे व केवळ शरीर बनवण्याच्या इच्छेखातर स्वतःहुन व्यायाम वगैरे करुन शरीर बनवणे ह्यात जसा फरक आहे तसाच फरक कर्णाच्या व इतर कौरवपांडवांच्या कौशल्यात असावा.(शरीर बनवायला आहार ही तितकाच महत्वाचा असतो व त्याबाबतीत एक निष्णात जिम इन्स्ट्रक्टरच व्यवस्थित मार्गदर्शन करु शकतो.एकुण शरीरसौष्ठव बनवण्यात योग्य डायटचा जो रोल आहे तसाच रोल महारथी बनण्यात सारथ्यकौशल्याचा असावा. त्यामुळे एकुणच सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनण्याच्या कर्णाच्या प्रयत्नांत ह्या सारथ्यकौशल्य शिकण्याच्या गोष्टीकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले असु शकते.किंबहुना योग्य मार्गदर्शकच नसल्यामुळे त्याला ही गोष्ट कधी तशी स्ट्राईक झालीच नसावी. ह्याबाबतीत कर्ण मात्र तसा दुर्दैवीच म्हणावा लागेल.) अर्जुन कर्ण ह्या शेवटच्या निर्वाणीच्या युध्दावेळीही शल्य रथ सोडुन पळुन जातो पण केवळ रथ चालवता येत नसल्याने कर्ण असहाय होतो. व त्याची तिच कमतरता त्याचा बळी घेते.

प्रचेतस's picture

29 Jun 2014 - 11:02 am | प्रचेतस

प्रतिसाद आवडला रे.

महाभारतात शकुनी पंगू असल्याचा उल्लेख कुठेही नाही.

हे महत्त्वाचं.

धन्यवाद वल्ली. :)

विकास's picture

27 Jun 2014 - 6:57 pm | विकास

वर सांगितलेली रोचक कथा ऐकलेली आहे, पण खरे खोटे व्यासांनाच माहीत. :) त्यातच पुढे असे देखील होते की त्याने स्वतःच्या वडलांच्या हाडांचा वापर करून फासे तयार केले म्हणून तो जिंकायचा. (वडील मुलांसाठी हाडाची काडे करतात ते माहीत होते. हाडाचे फासे करणे नवीनच आय मीन फारच जुने!)

Shakuni Temple

विकीवरील माहितीप्रमाणे, महाभारतयुद्धानंतर शकुनी स्वर्गाला व्हाया केरळ गेला. स्थानिक समजुतीप्रमाणे, त्याने तेथे शंकराची पुजा केली आणि नंतर महात्मा (लॉर्ड) शकुनी होऊन तो स्वर्गाला गेला. त्याचे तेथे देऊळ पण आहे! वर दाखवलेले छायाचित्र त्या देवळाचे आहे.

अजून एक लंगडण्यासंदर्भात गोष्ट ऐकलेली: महाभारत सिरीयल मधे निवडल्यानंतर गुफि पेंटलला म्हणे व्यक्तीगत आयुष्यात घोड्यावरून पडला. परीणामी व्यासांसमोर नाही पण चोप्रांसमोर तो लंगडत गेला. त्यांना ते आवडले आणि शेवटपर्यंत लंगडीचे राज्य त्याच्यावर (म्हणजे गुफी पेंटलवर) आले!

आगाऊ कार्टा's picture

27 Jun 2014 - 7:48 pm | आगाऊ कार्टा

शकुनीने वडलांच्या हाडांचा वापर करून फासे तयार केले नव्हते तर ते फासे जरासंधाच्या हाडांपासुन बनवलेले होते. त्यामुळे दान कोणीही मगितले तरी ते कौरवांच्या बजुनेच पडत असे.
परंतु द्युताच्या प्रसंगी फासे फेकत असत तेव्हा भीम मोठ्याने ओरडत असे. भीमाच्या आवाजाने ते फासे थरथरत असत (कारण भीमाने जरासंधाला मारले होते) आणि दान नेमके पांडवांच्या बाजुने पडत असे. हे फक्त शकुनीच्या लक्षात आले तेव्हा त्याने दुर्योधनाला सांगुन भीमाल गप्प केले.
त्यानंतरचे महाभारत सर्वांनाच माहित आहे.

धन्या's picture

27 Jun 2014 - 7:49 pm | धन्या

वाचावे ते नवलंच. :)

प्रचेतस's picture

27 Jun 2014 - 7:52 pm | प्रचेतस

ही पण हरदासी कथाच. ;)

अर्धवटराव's picture

27 Jun 2014 - 7:08 pm | अर्धवटराव

पण पांडवांना गांधारीचं वैधव्य कसं कळलं हे सांगितलं आहे का मूळ कथेत ?

विकास's picture

27 Jun 2014 - 7:10 pm | विकास

खालती गुगलबुक्स मधला संदर्भ आयफ्रेम मधे टाकला आहे, तो वाचता आले नाही तर सांगा. (कधी कधी भारतात वाचता येत नाही म्हणून). देवदत्त पटनाईक यांनी महाभारतावर बराच अभ्यास केला आहे. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यात तथ्य असावे. (थोडक्यात: ह्या नंतरच्या लोककथा आहेत. बोकडाशी लग्न जैनांच्या महाभारतातून आले आहे. काही ठिकाणी शकुनीच्या भावांना आणि वडलांना भिष्माने नाही तर दुर्योधनाने मारले. तेंव्हा एखादा व्हिलन एकापद्धतीने का वागतो हे समजून घेणे पण महत्वाचे आहे... )

मला एक पडलेला प्रश्नः जर शकुनीला कौरवांचा इतका खुन्नस होता, तर तो सरळ पांडवांनाच जाऊन का मिळाला नाही? ;)

प्रसाद१९७१'s picture

30 Jun 2014 - 2:10 pm | प्रसाद१९७१

जर शकुनीला कौरवांचा इतका खुन्नस होता, तर तो सरळ पांडवांनाच जाऊन का मिळाला नाही? >>>>>>> बाहेरुन जितके नुकसान करता येते त्यापेक्षा कीतीतरी पट जास्त नुकसान आत राहुन करता येते.

राजेंद्र मेहेंदळे's picture

30 Jun 2014 - 3:57 pm | राजेंद्र मेहेंदळे

हे म्हणजे ईंटर्नल हॅकर्स सारखे झाले :)

धन्या's picture

27 Jun 2014 - 7:40 pm | धन्या

इथेही जन्म पत्रिका आणि ज्योतिषी आहे. म्हणजे हे खुळ अगदी महाभारत काळापासून आहे तर. :D

कथा अतिशय रोचक आहे. पहिल्यांदाच वाचली.

प्रचेतस's picture

27 Jun 2014 - 7:48 pm | प्रचेतस

उपरोक्त कथेला महाभारतात काडीचाही आधार नाही.

गंमत म्हणून महाभारतातील सगळ्या अकल्पीत आणि असंभव गोष्टी काढून टाकल्या (उदा: वस्त्रहरणाच्या वेळी द्रौपदीची न संपणारी साडी, ब्रह्मास्त्र किंवा पर्जन्यास्त्र सारखी अस्त्र, विश्वरूपदर्शन, संजयाची दिव्यदृष्टी इ.इ.) तर महाभारत कसं असेल?
महाभारत तरीही श्रेष्ठ महाकाव्य असेलच.
श्रीकृष्ण महा"मानव" म्हणून समोर येईल.
महाभारत कालीन राजकारण आणि समाजातील प्रचलीत रुढी आणखी स्पष्ट होतील.
वरवरच्या चमत्कारापेक्षा त्या महाकाव्यातलं खरं मर्म लोकांना नीट समजेल.

या किंवा अशा हरदासी कथांना महाभारतात आधार शोधणे किचकट काम असणार. इथे घेतले गेलेले आक्षेप या गृहीतकावर आधारीत आहेत की महाभारत रचले गेले व नंतर कालौघात मूळ काव्याचा आधार घेऊन लोकसाहित्यात म्हणा किंवा इतर साहित्यात अशा कल्पना/कथा निर्माण होत गेल्या.

समजा आपण हे गृहीतक उलटे करून बघितले, म्हणजे जय हे मूळ काव्य, त्यावर संस्करण-बदल-भर वगैरेंनी झालेले भारत हा विस्तारग्रंथ आणि मग महाभारत या सगळ्यांत ह्या काव्याने लोकसाहित्यातून आणि लोकसाहित्यानेही ह्या महाकाव्यातून संकल्पना उचलल्या असाव्यात, कथाबीजांचे आणि कल्पनाविस्तारांचे आदानप्रदान आणि तेही अतिशय विस्तृत अशा कालखंडात होत राहिले असावे. मग या हरदासी कथांचा अशा साहित्यावर होणारा परिणाम असा छाटून टाकता येत नाही. अशा दृष्टीने विचार करून पाहूया.

कालखंडनिश्चितीच्या बाबतीत पं. जवाहरलाल नेहरूंनी आपल्या 'डिस्कवरी ऑफ् इंडिया' या ग्रंथात महाभारताला रामायणापेक्षा जास्त प्राचीन ठरवले आहे. मूळ महाभारताची खात्रीशीर प्रत उपलब्ध असेल का याविषयी माझ्या मनात किंतु आहे.

इरावती कर्वे यांच्या 'युगांत' मधील प्रस्तावनेत महाभारतावरील जुन्या प्रतींचे तसेच त्याच्या कालखंडाच्या मागोव्याचे उत्कृष्ट विवेचन आहे.
तसेच भांडारकर प्राच्य विद्या संस्थेने महाभारताच्या बहुतांश प्राचीन हस्तप्रतींचा अभ्यास करून संशोधीत प्रत सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे त्यात द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगीचा कृष्णाचा धावा, त्याने वस्त्रे पुरवून पुरवून सोडवणे असे प्रसंग गाळून टाकले आहेत.

डिस्कवरी ऑफ् इंडिया' या ग्रंथात महाभारताला रामायणापेक्षा जास्त प्राचीन ठरवले आहे.

ह्याला मी ह्या लेखनाचा काळ असा मानतो.
रामायणाचा कालखंड हा महाभारतापेक्षा नक्कीच जुना आहे. महाभारतात रामायण अथवा वाल्मिकिचा उल्लेख कुठेही येत नाही पण रामकथेचे उल्लेख मात्र येतात तसेच त्यात रामाला अवतार न मानता एक श्रेष्ठ राजाच मानलेले आहे.
अर्थात रामकथा जरी आधीपासून प्रचलित असली तरी रामायण हे महाभारतानंतर लिहिले गेलेले असावे असे त्याच्या लेखनावरून दिसते.

एस's picture

28 Jun 2014 - 3:01 pm | एस

ह्या विषयाचा माझा अजिबात अभ्यास नाही. तरीपण एक तप आणि दोनेक वर्षांनंतर स्मरणशक्ती जेवढी साथ देईल तेवढे आठवून थोडे खरडतो.

भाग एक - महाभारताच्या संशोधित प्रतींसंदर्भात, लिपीचा शोध महाभारत वगैरे काव्ये रचली गेली तेव्हा लागला नव्हता. मुखोद्गत पद्धतीने इतक्या मोठ्या साहित्याचे जतन शतकानुशतके होत राहिले. पण त्यात कोणताही बदल झाला नाही असे मानणे कठीण आहे. "Unlike the Vedas, which have to be preserved letter-perfect, the epic was a popular work whose reciters would inevitably conform to changes in language and style."

भाग दोन - कालखंडनिश्चिती. इथे मानवाला शेती करण्याची कला माहीत झाली ती साधारणपणे सात हजार वर्षांपूर्वी. तोपर्यंत स्थिर संस्कृतींचा किंवा समाजांचा उदय होणे अशक्य होते. शेतीचा फायदा असा होतो की अन्नोत्पादन आता भुकेपुरते मर्यादित न राहता शिल्लक उरू लागले आणि उत्पादनांची देवाणघेवाण, पुढे वस्तुविनिमयपद्धती (Barter trade) उदयास आली. शेती आणि व्यापार यामुळे स्थिर मनुष्यसमूह व शहरे उदयास आली. त्याआधी अल्पशा मानवी वसाहतींचे एका जागीचे स्थान हे तिथल्या अन्नाच्या उपलब्धतेपुरतेच कायम असे. ही नागरसंस्कृती सिंधू नदीच्या खोर्‍यात उदयास येण्यास आणखी चारेक हजार वर्षे जावी लागली. याच काळात तेव्हाचा द्राविड प्रदेश म्हणजे गंगेच्या खोर्‍यापासून ते दक्षिणेकडे हा घनदाट निबिड अरण्याने व्यापलेला होता. सिंधू संस्कृतीच्या उत्तरकालात नागरसंस्कृती आणखी पूर्वेला आणि दक्षिणेला विकसित झाली. पण अद्यापही आजच्या दख्खनच्या पठारावरील इतर मानवी संस्कृतींशी वायव्येच्या सभ्यतेशी फारसा संबंध आलेला नव्हता.

गंगेच्या उर्ध्वखोर्‍यात मानवी वस्तीचे नागरस्वरूपातील अवशेष सापडले ते इसवी सनाच्या हजार वर्षांपूर्वीनंतर. पण तेव्हा द्राविड टोळ्या मध्य व दक्षिण भारतात स्थिरावल्या होत्या. यात नाग व असुर संस्कृती प्रमुख होत्या.

महाभारत रचले गेल्याचा कालखंड साडेपाचशे ते तीनशे ख्रिस्तपूर्व असा असावा, तर रामायण हे इसवीसनाच्या पहिल्या शतकात रचले गेले असावे. तत्पूर्वी सातशे ख्रिस्तपूर्वपर्यंत उत्तरवेदिक कालखंड आणि बौद्धमताचा उदय होऊन गेला होता. नॉदर्न ब्लॅक पॉलिश्ड वेअरचा कालखंड Early NBPW (800-300 BC) आणि Late NBPW (300-100 BC) यावरूनही त्याकाळची समाजरचना आणि मुख्यत्वे अर्थकारणाची माहिती मिळते. यावरून सिंधू संस्कृतीच्या अस्तानंतरची पहिली गणराज्ये, नदीकाठी शेतीनिगडीत अर्थव्यवस्थेचा झपाट्याने झालेला विकास, संरक्षणासाठीच्या 'पुर' म्हणजेच कोटांची बांधणी करण्याची पद्धत, लवचिकता गमावलेले सामाजिक स्तरीकरण, वर्णसंस्थेचे जातिव्यवस्थेत अवमूल्यन, व्यापाराचा विस्तार व यादवी युद्धांतून साम्राज्ययुद्धांमध्ये झालेले परिवर्तन ही या काळाची काही ठळक वैशिष्ठ्ये होत. याला भारतीय पुरातत्त्वविभागाने केलेल्या उत्खननात आणि कार्बन डेटिंगद्वारे दुजोरा मिळाला आहे.

भाषेबद्दल - ह्या काव्यांचे संस्कृत ही उत्तरवैदिक कालखंडातील वाटते. पाणिनिच्या इसपू. चौथ्या शतकातील व्याकरणाचा प्रभाव या काव्यांच्या भाषेवर आढळतो. दोन्ही काव्ये बुद्धोत्तर असावीत असे सूचित करणारा भाग वाल्मिकीरामायणात येतो. रामाच्या तोंडी अयोध्याकांडात जाबालीला उद्देशून येणारे वाक्य पहा - "यथा ही चोर: स तथा ही बुद्ध स्वथागतं नास्तिक मंत्र विद् तस्मादि य: शक्यतम: प्रजानाम् स नास्तिके नाभि मुखो बुद्ध: स्वातम्।" पूर्ववेदांतमत आणि बौद्ध साहित्यातील पाली-प्राकृत भाषेचा वापर हे दोन्ही समकालीन असावेत. अश्वघोषाच्या बुद्धचरित मध्ये वाल्मिकी त्याच्या समकालीन असल्याचा उल्लेख करतो.

दुसरा भाग मानवइतिहासातील वेगवेगळ्या धातूंचा प्रभाव. सिंधूसंस्कृती ही ख्रिस्तपूर्व दोन हजार वर्षांच्या आसपास क्षीण होऊ लागली. त्याचबरोबर मानवइतिहासातील ताम्रयुग संपुष्टात आले. सिंधूसंस्कृतीच्या अस्तानंतर साधारणतः बाराशे ते हजार वर्षे ख्रिस्तपूर्व पासून लोहयुगाची सुरुवात झाली. भारतीय उपखंडात उत्तर आणि दक्षिणेत जवळजवळ एकाच वेळी पण स्वतंत्रपणे लोहयुग अवतरले. लोहयुगाबरोबर गंगेच्या खोर्‍यात गणपद व महाजनपदरूपी राज्यव्यवस्थांची सुरुवात झाली. लोहयुगातील प्रगत शस्त्रास्त्रांमुळे युद्धांचे स्वरूप बदलले व लहान टोळीयुद्धे अस्तित्वात आली. या युद्धांचे स्वरूप आपापसातील यादवीसारखे केंद्रित होते. संस्कृतींमधील विनाशकारी युद्धे अजून लांब होती.

महाभारतात कर्ण हा कौरवांचे सैन्य घेऊन तत्कालीन संपूर्ण आर्यावर्तावर ताबा मिळवण्यासाठी मोहीम काढतो. यात कर्णाने कंबोज, शाक्य, केकय, अवंत्य, गांधार, मदरक, त्रिगर्त, तंगण, पांचाल, विदेह, सुहमा, अंग, वंग, निशद, कलिंग, वत्स, अश्मक वगैरे राज्यांवर स्वारी केल्याचा उल्लेख येतो. पण कर्ण मरहट्ठांच्या दक्षिण प्रदेशात पाऊल टाकण्याचे टाळतो. याचे कारण म्हणजे इथून पुढचा (दक्षिणेकडचा) प्रदेश आर्यावर्तात मोडत नाही असे देतो. याउलट रामायणात मध्य व दक्षिण भारताच्या लोकसंस्कृतींचे, भौगोलिक परिस्थितीचे आणि राजकारणाचे खोलवर वर्णन येते. रामायणातील संघर्ष हा जातिव्यवस्था पूर्णपणे प्रचलित झालेल्या संस्कृतीचा आणि दक्षिणेतील अरण्यवासीयांचा संघर्ष आहे. येथे आर्यावर्ताची सीमा ओलांडून कथा दक्षिण टोकापर्यंत पोहोचते.

दुसरे म्हणजे महाभारतात असुरांचे वर्णन तितके येत नाही जितके रामायणात येते. रामायण मुळातच सुरासुर संघर्षाची कथा आहे. महाभारतात हा संघर्ष खूपच बाल्यावस्थेत आहे.

रामायणातील अर्थव्यवस्था ही मुख्यत्वे उत्तर भारताच्या पूर्व भागातील प्रगत उत्तरनागरसंस्कृतींचे वर्णन आहे, तर महाभारतात प्रामुख्याने कुरुप्रदेश म्हणजे पश्चिमोत्तर भारतातील वरील प्रदेशाच्या पश्चिमेकडील तितक्या विकसित न झालेल्या संस्कृतींचे वर्णन आहे.

महाभारतातील युद्धाचे वर्णन हे अतिरंजित असावे. इतके मोठे सैन्य पाळण्याइतकी लोकसंख्या, आर्थिक उलाढाल या सर्व बाबी तेव्हा नव्हत्या. नेहरूंनी ते युद्ध हे प्रत्यक्षात लहानसे टोळीयुद्ध असावे असे म्हटले आहे. रामायणात मात्र दक्षिणेकडील तशाच प्रगत राज्यव्यवस्थांचा उत्तरेकडील जनपदांशी आलेला संबंध अधोरेखित झाला आहे.

वरील सर्व बाबी अभ्यासता मला महाभारत हे रामायणापेक्षा जुने असावे, पण बौद्धोत्तर कालखंडातील असावे असे वाटते.

पैसा's picture

28 Jun 2014 - 4:33 pm | पैसा

प्रतिसाद आवडला!

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jun 2014 - 9:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

अभ्यासपूर्ण प्रतिसाद ! विश्लेषण आवडले !!

प्रचेतस's picture

29 Jun 2014 - 11:16 am | प्रचेतस

प्रतिसाद अतिशय आवडला.

अरील सर्व बाबी अभ्यासता मला महाभारत हे रामायणापेक्षा जुने असावे, पण बौद्धोत्तर कालखंडातील असावे असे वाटते.

शंकाच नाही. पण महाभारताचा काळ त्यातही मूळ व्यासप्रणीत 'जय' ग्रंथाचा काळ हा बुद्धपूर्व असावा असे मला वाटते. इ.स. पूर्व १२०० ते ८०० वर्षांच्या आसपास. त्यानंतर बुद्धकाळात व तदनंतरच्या मौर्य, कण्व, सातवाहन, शुंग, गुप्त इत्यादी कालखंडात त्यात सातत्याने भर पडत गेली व आजचे महाभारत तयार झाले. उदा. यवन, शक, हूण अशा परकीय टोळ्यांचा उल्लेख, अहिंसेचा प्रसार करणारी अर्धांग सोनेरी झालेल्या नकुलाची कथा.

स्वॅप्स, प्रतिसाद आवडला. बरेच मुद्दे आहेत, आणि त्यातल्या थोड्यांबद्दलच चर्चा करतो. जय, भारत आणि महाभारत या ३ स्टेजेस आहेत असे खुद्द महाभारतातच नमूद आहे. ते सोडून एम आर यार्दी या संशोधकांनी १९८६ साली
'महाभारत : दि ग्रोथ ऑफ एपिक - अ स्टॅटिस्टिकल स्टडी' हे पुस्तक लिहिले, ज्यात महाभारतातील लेखनपद्धतीचा
सांख्यिकीय अभ्यास करून त्यांनी ५ वेगवेगळे लेयर्स ओळखून दाखवले की कुठल्या पर्वातला कुठला भाग हा कुठल्या लेयरमध्ये आहे इ.इ.

बाकी महाभारत म्ह. ग्लोरिफाईड आणि मॅग्निफाईड दाशराज्ञ युद्ध असे एका जे एन यू मधील प्राध्यापकाचे मत रोचक असले तरी तितके ग्राह्य वाटत नाही. तो पेपर विकीवर पूर्ण डौनलोडसाठी उपलब्ध आहे.

अन रामायण व महाभारत या दोहोंची भाषा पाणिनीय संस्कृतच आहे. त्यामुळे लेखनकालदृष्ट्या बौद्धोत्तर असणे क्रमप्राप्तच आहे. मात्र त्यात वर्णिलेल्या घटना या बौद्धोत्तर असणे संभवत नाही, कारण निव्वळ बुद्ध या शब्दोल्लेखाने लुंबिनीत जन्म झालेला सिद्धार्थ गौतमच अभिप्रेत आहे असे दिसत नाही. अन तसे पाहिले तर गीतेतल्या ११ व्या अध्यायात काही श्लोक आर्ष रूपे , आर्ष वृत्ते वापरून लिहिलेले आहेत त्यावरून त्याचे पाणिनीपूर्वत्व अधोरेखित होते. अन जनरल घटना पाहिल्या तर बौद्ध धर्माचा दूरदूरतक संबंधच नाहीये- रामायणातही अन महाभारतातही.

बाकी महाभारत-रामायणाच्या पौर्वापर्याबद्दलचे मुद्दे ठीक आहेत, पण या काळाबद्दल साहित्यिक सोडून अन्य माहिती खूप कमी ठिकाणी आहे. रेमंड अलचिन नामक पुरातत्त्ववेत्याचे आयर्न एज इंडिया नामक पुस्तक या कालखंडावर प्रकाश टाकते, पण ते तितपतच.

मुख्य अडचण अशी आहे, की आपल्याकडे या महाकाव्यांशी संबंधित ठिकाणे उदा. अयोध्या, द्वारका, इंद्रप्रस्थ, हस्तिनापूर, इ. ठिकाणी व आसपास व्हावे तितके उत्खनन झालेले नाही. कैक ठिकाणी जुन्याच इमारतींवर आजची घरे, देवळे, सर्व काही नांदत आहेत. इतक्या सगळ्या लोकांना अन्यत्र हलवणे केवळ अशक्य आहे. ट्रॉयला हेन्रिख श्लीमानने आणि त्यानंतर ऑल द वे डौन टु नुकतेच वारलेले मान्फ्रेड कॉर्फमन या लोकांनी गेली जवळपास १५० वर्षे उत्खनन केलेय तेव्हा कुठे ट्रोजन युद्धाबद्दल कल्पनातीत नवी माहिती मिळाली. आपल्याकडे काय झालंय?

-हस्तिनापूरः १९५१ सालचे एक उत्खनन, बहुतेक ७३ साली अजूनेक.
-इंद्रप्रस्थः सत्तरच्या दशकात ट्रायल उत्खनन, सध्या जस्ट थांबवलेय सुरू असलेले. पुन्हा पुढच्या वर्षी सुरू होईल.
-द्वारका: पाण्याखाली काहीतरी सापडलेय. पण त्याचा काळ गुप्तकाळापर्यंतच (इ.स. ४००-५००) पर्यंतच जातो. त्याच्या बर्‍यापैकी अगोदर म्ह. इसपू ५०० च्या अगोदरचे फक्त खापरांचे अवशेष बेट द्वारका या ठिकाणी मिळालेले आहेत.
-अहिच्छत्रः उत्खनन ८३ साली झाले बहुधा.

आपल्याकडे काही प्रयत्न झालेत, पण ते खूप कमी आणि खूप एकांगी आहेत. त्यात परत हडप्पा संस्कृतीनंतर म्ह. सुमारे इ.स. २००० पासून ते मौर्यकाळ - इ.स.पू. ३०० या सुमारे १७०० वर्षांच्या काळात अख्ख्या भारतात

एकही - & आय रिपीट एकही

लिपीचा पुरावा सापडलेला नाही. लिपी कसलीही असो, संस्कृत असो नैतर तमिळ असली तरी ठीक, अगदी चिनी असली तरी चालेल, पण कुठली तरी मिळू द्या!!! पण नाही. सापडलेलंच नाही. त्यामुळे एका बाजूला रामायणमहाभारतागत ग्रंथ आणि दुसर्‍या बाजूला तुटक उत्खनने हे इतकेच आपल्यासमोर आहे. या दोहोंची सांगड घालणे हे महाकर्मकठीण काम असून त्याला आत्ता आत्ता कुठे सुरुवात झालेली आहे.

त्यामुळे अजून टनावारी उत्खनने व्हायला हवीत तेव्हा कुठे आपण याबद्दलचा विदा ठीकठाक प्रमाणात आपल्याकडे आहे असे म्हणू शकतो. तूर्त काहीच विदा नाही म्हणण्यासारखा. उत्खनन करून जी मातीची भांडी सापडतात त्यावरून काळ सांगितला की संपलं इतकंच चाललंय. बाकी काही कुणी करत नाहीये.

हडप्पा संस्कृतीच्या लिपीचा उलगडा होणे आणि विशिष्ट ठिकाणी उत्खनने आजवर झालीत त्यापेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणावर होणे हे झाल्याशिवाय, रामायण आणि महाभारत यांना इतिहासात खरेच काही आधार आहे की नाही हे सांगणे अशक्य आहे. माझे वैयक्तिक मत आहे की अशा घटना घडणे अगदी शक्य आहे, फक्त अतिरंजित पार्ट वगळून. पण त्याला पुरावा पाहिजे...

चित्रगुप्त's picture

30 Jun 2014 - 9:53 am | चित्रगुप्त

उत्खनने आजवर झालीत त्यापेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणावर होणे हे झाल्याशिवाय, रामायण आणि महाभारत यांना इतिहासात खरेच काही आधार आहे की नाही हे सांगणे अशक्य आहे.

समजा, पुढे प्रचंड मोठ्या प्रमाणावर उत्खनने झाली, तर रामायण आणि महाभारत यांना इतिहासात खरेच काही आधार आहे, हे सिद्ध होण्यासाठी त्यातून कोणकोणत्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत म्हणता ?

गुड क्वेश्चन चित्रगुप्तजी. तुमच्या प्रश्नाचे एकदम डायरेक्ट उत्तर माझ्याकडे नाही, पण उदाहरण देऊन स्पष्ट करतो. ट्रॉय, मायसीनी, इ. ठिकाणी उत्खनने झाली, तेव्हा होमरने वर्णन केल्याप्रमाणे टनावारी खजिना सापडला. चांदी-सोन्याच्या मुठी असलेल्या तलवारी, वाईन प्यायचा सोन्याचा कप, रानडुकराचे सुळे लावलेले हेल्मेट, ब्राँझचे चिलखत, इ.इ. अनेक गोष्टी ज्या होमरच्या काव्यात वर्णिलेल्या होत्या. त्याशिवाय तत्कालीन शिलालेखांत अलेक्सांद्रॉस ऊर्फ पॅरिस आणि त्याचा बाप पियामारादू ऊर्फ प्रिआम यांची नावे कोरलेली मिळालेली आहेत शिवाय आगामेम्नॉनच्या बापाचा उल्लेख आहे. ग्रीकांचा 'अहियवा' ऊर्फ अखीअन्स म्हणून उल्लेख मिळाला आहे, त्यामुळे होमरचे काव्य खर्‍या घटनांवर आधारित आहे असे म्हणता येईल.

त्याचप्रमाणे अजून उत्खनने झाली, तर काही शस्त्रे म्हणा, काही वसाहतींचे 'रॉयल' छाप अवशेष, काही शिलालेख, थोडाफार खजिना आणि या संस्कृतीचा अन्य समकालीन उल्लेख असे काहीसे सापडले तर ही काव्ये मूलतः खर्‍या घटनांवर आधारलेली असू शकतात असे म्हणता येईल. म्ह. अगदी कृष्ण, युधिष्ठिर , इ. नावेच पाहिजेत असे नाही, पण मुख्य कथाभाग- मोठ्या युद्धवाला- तो तरी झाला याचा पुरावा मिळाला तर प्रूफ झालेच ना.

सर्व प्रतिसाद बारकाईने वाचले. वल्ली जसे म्हणताहेत की किमान 'जय' ह्या ग्रंथाचा कालखंड बुद्धपूर्व असावा, ह्याला काहीपक्षी दुजोरा देणारे विश्लेषण माझ्याच प्रतिसादात आले आहे. कर्णाच्या मोहिमेत महरठ्ठांचा प्रदेश आर्यावर्तात न मोडणे पण बौद्धमताचा प्रसार दक्षिणेतही निदान अशोकाच्या राज्यकालात होणे हे लक्षणीय आहे. या दोन गोष्टींची कालानुयिक तुलना केल्यास 'जय' ग्रन्थातील वर्णन किंवा मूळ महाभारताचे कथाबीज हे अजून आठशे-ते-हजार वर्षे मागे जाऊ शकते.

बॅटमॅनच्या प्रतिसादातील लिपीचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. सिंधूसंस्कृतीनंतर लिपीचा र्‍हास झाला. तो इतका की या संस्कृतीला आणि त्यानंतरच्या प्रागैतिहासिक काळाला जोडणारा दुवाच सापडत नाही. पण लिपीचा शोध लुप्त झाला असतानाही नंतरच्या काळात जी काही ग्रंथनिर्मिती झाली तिची रचना आणि संवाहन केवळ मुखोद्गत पद्धतीने इतक्या मोठ्या कालखंडावर होत राहणे अचंबित करणारे आहे. इथे इतिहास काहीतरी मुग्ध आहे. सिंधूसंस्कृतीच्या लिपीचे वाचन आणि उत्खनन करून मिळवलेले मधल्या कालखंडातील अवशेषरूपी पुरावे ह्या दोनच बाबी हरवलेल्या शृंखलांचे अस्तित्त्व सिद्ध करू शकतील.

बौद्धमताचा संबंध नाहीच. ते केवळ कालखंडाचा संदर्भ घेण्याइतपतच विचारात घेतले आहे.

भारतीय इतिहासाचा मागोवा घेण्यात काय तृटी आहेत हे बॅटमनच्या प्रतिसादात सुरेखपणे समजावले आहे. त्या दृष्टीने अधिक प्रयत्न होणे फार गरजेचे आहे. असा मागोवा घेण्याचे काम लिखित साधनांच्या बाबतीत लिपीच्या पहिल्या धांडोळ्यापर्यंत जाऊन थांबतो. महाभारत-रामायण हे ग्रंथही त्याला अपवाद नाहीत. तोपर्यंत हे ग्रंथ लेखनकालदृष्ट्या बुद्धोत्तर असावेत हा पुराव्यांनी दर्शवलेला निष्कर्ष आणि ग्रंथ किंवा कथाबीज जास्त प्राचीन असावेत हा अंदाज ह्या दोन गोष्टी आज आपल्या हातात आहेत.

चित्रगुप्त's picture

30 Jun 2014 - 3:01 pm | चित्रगुप्त

कुरुक्षेत्र एरियातील उत्खननात समजा एका धष्ट्पुष्ट माणसाचा सांगाडा, त्याच्या मांडीचे हाड मोडलेल्या अवस्थेत असलेला, आणि जवळच एक गदा सापडली, तरी तो दुर्योधनाचाच सांगाडा आहे, हे कसे ठरवणार ? अन्य कलाकृती, शिल्पे, वस्तू, वगैरे अगदी उत्खननातूनच कशाला निघायला हवीत ? ती वरतीच बक्कळ आहेत की? महाभारताच्या युद्धाचा देखावा असलेले दोन हजार वर्षापूर्वीचे शिल्प सापडले, तरी ते महाभारत कथा ऐकून घडवलेले असू शकते, तो ती घटना खरोखर घडली, याचा पुरावा कसाकाय मानायचा?
अगदी उत्खननातून सापडले, तरच तो पुरावा ग्राह्य का मानला जावा?

कुरुक्षेत्र एरियातील उत्खननात समजा एका धष्ट्पुष्ट माणसाचा सांगाडा, त्याच्या मांडीचे हाड मोडलेल्या अवस्थेत असलेला, आणि जवळच एक गदा सापडली, तरी तो दुर्योधनाचाच सांगाडा आहे, हे कसे ठरवणार ?

जोपर्यंत 'दुर्योधन इथे/अन्यत्र गदाप्रहाराने मेला' असे लिहिलेला एखादा शिलालेख इ. सापडत नै तोवर तो सांगाडा दुर्योधनाचाच आहे, असे म्हणणे शक्य नाहीच. पण बर्‍यापैकी जुना, म्ह. बुद्धपूर्वकालीन तसा अवशेष मिळाला, तर महाभारतातली कथा कदाचित खरी असू शकेलही असे सांगता येईल. अर्थात त्यासाठी फक्त हाडमोडका सांगाडा असून चालणार नाही, तो राजाचा/राजकुळातल्या व्यक्तीचा सांगाडा होता असे दर्शवणारा एखादा पुरावा पाहिजे. एकाच गोष्टीवरून असे सिद्ध करता येत नाही, त्याला अन्य बरेच पुरावे लागतात.

अन्य कलाकृती, शिल्पे, वस्तू, वगैरे अगदी उत्खननातूनच कशाला निघायला हवीत ? ती वरतीच बक्कळ आहेत की? महाभारताच्या युद्धाचा देखावा असलेले दोन हजार वर्षापूर्वीचे शिल्प सापडले, तरी ते महाभारत कथा ऐकून घडवलेले असू शकते, तो ती घटना खरोखर घडली, याचा पुरावा कसाकाय मानायचा?

अगदी सहमत आहे. पण असे एखादे शिल्प इ. जितके जुने मिळेल तितक्या वर्षांपासून ती कथा प्रचलित असल्याचा पुरावा मिळतो. एखादी कथा किती वर्षांपासून प्रचलित आहे, याचा तो सर्वांत डायरेक्ट पुरावा आहे.

अगदी उत्खननातून सापडले, तरच तो पुरावा ग्राह्य का मानला जावा?

अगदी योग्य प्रश्न. तर त्याचे उत्तर असे आहे की उत्खननात तुम्हांला प्रत्यक्षपणे बर्‍याच गोष्टी क्लीअरकट कळतात. उत्खननाचा आधार नसेल, तर फक्त ग्रंथ समोर घेऊन बसले की कल्पनेच्या भरार्‍या किती आणि कुठल्या दिशेला मारल्या जातात याला काही सुमार नसतो. आता टिळकांनीही आर्क्टिक होम ऑफ द वेदाज़ इ.इ. लिहिले आहेच की. त्यात कल्पनेच्या भरार्‍या सोडल्या तर काय आहे? त्यांना काही गोष्टी योग्य वाटल्या आणि त्याच्या आधारे त्यांचा सिद्धांत त्यांनी मांडला, पण निव्वळ ग्रंथांवर अवलंबून राहण्यातला तोटा हा आहे की ग्रंथांत अनेक काल्पनिक गोष्टींचे बेमालूम मिश्रण झालेले असते, काही केसेसमध्ये परस्परविरोधी डीटेल्सही असतात. त्यामुळे 'नक्की काय झाले असावे' याचा निर्णय करण्याची प्रक्रिया अधिक सुसूत्र आणि सोपी करण्यासाठी उत्खननाची फार मदत होते.

शेवटी ऐतिहासिक पुराव्याची निश्चिती करण्यासाठी उत्खनन हे ग्रांथिक पुराव्यांसारखेच साधन आहे. उत्खनन हेच सुप्रीम आहे असा माझा दावा नाही. त्याचा व्यर्थपणा एका साध्या उदा.द्वारे सांगतो. १८ व्या शतकात मराठे अख्ख्या भारतभर पसरले. अगदी अटकेपार इ. जाऊन आले. पण आज शनिवारवाड्याकडे पाहून वाटतं तरी का की इथे राहणार्‍या सत्ताधीशांची पॉवर तेवढी होती म्हणून? नुसता पडका आणि कंजस्टेड वाडा वाटतो फक्त. पण तसे सांगणारे असंख्य कागदपत्र आज उपलब्ध आहेत म्हणून आपण सांगतो की मराठ्यांनी खरोखरच उत्तरेपर्यंत स्वार्‍या केल्यात.

मी स्वतःलाच विरोध करतो आहे असे वाटेल, पण तसे नाही. माझा मुद्दा इतकाच आहे, की ऐतिहासिक सत्यनिर्णयनासाठीचे उत्खनन हे एक महत्त्वाचे अंग आहे. ते व्हावे तसे आणि तितके झालेले नाही, त्यामुळे ग्रांथिक पुरावा जो काही आहे, त्यात किती सत्य आणि किती अतिशयोक्ती आहे हे तूर्तास सांगता येत नाही. एकूणच निर्णयप्रक्रियेतले हे अंग आजवर दुर्लक्षित असल्याने आजवरचे प्रयत्न अतिशय एकांगी आणि अपुरे राहिलेले आहेत. तस्मात उत्खनने अजून झाली पाहिजेत. सर्वच गोष्टींचे डायरेक्ट पुरावे नसले तरी इन्डायरेक्ट पुरावे कैक गोष्टींचे मिळू शकतील आणि ते अधिक ठामपणे दर्शवता येतील म्हणून त्याला महत्त्व आहे.

प्रचेतस's picture

30 Jun 2014 - 5:34 pm | प्रचेतस

प्रतिसाद आवडला रे.

पण असे एखादे शिल्प इ. जितके जुने मिळेल तितक्या वर्षांपासून ती कथा प्रचलित असल्याचा पुरावा मिळतो. एखादी कथा किती वर्षांपासून प्रचलित आहे, याचा तो सर्वांत डायरेक्ट पुरावा आहे.

नाणेघाटातल्या इ.स.पू २१० च्या आसपासच्या नागनिकेच्या लेखात वासुदेव आणि संकर्षणाला वंदन केलेले आहे तर इ.स २३० च्या सुमारास कोरल्या गेलेल्या पांडवलेणीतील गौतमी बलश्रीच्या लेखात गौतमीपुत्राचा पराक्रम राम (भार्गवराम), कृष्ण, भीम, अर्जुन यांसमान लेखला आहे तर गौतमीपुत्राचे तेज नाभाग, नहुष, जनमेजय, ययाती, दाशरथी राम, अंबरीष यासमान लेखिले आहे.

ही सर्व नावे महाभारतात आहेतच. साहजिकच महाभारत कथा त्याकाळी (इ.स. पू. २०० पासून) पूर्णपणे प्रचलित असावी हे उघड आहे. आणि ह्या व्यक्तींना (गौतमीपुत्राच्या लेखात) देव मानलेले दिसत नाही.
अशोकाच्या लेखातही पांडवांचे उल्लेख बहुधा असावेत. संदर्भ तपासून पाहिले पाहिजेत.

बॅटमॅन's picture

30 Jun 2014 - 5:41 pm | बॅटमॅन

धन्स रे. :)

बाकी या शिलालेखांतून असे पुरावे निश्चितपणे मिळतातच. फक्त एक शंका: नागनिकेचा शिलालेख इसपू २१० चा आहे की इस २१० चा? सातवाहनांचा इतका जुना पुरावा असेलसे वाटत नाही.

अन दैवतीकरण तोपर्यंत झालेले असावे. शिलालेखात डिरेक्टली लिहिले नसावे कारण त्याचा फोकस गौतमीपुत्र होता. बाकीचे लोक निव्वळ उपमेपुरते होते.

प्रचेतस's picture

30 Jun 2014 - 5:49 pm | प्रचेतस

नागनिकेचा इ.स.पू. २१० च्या आसपासचा.
ती प्रथम सातकर्णीची पत्नी आणि आद्य सातवाहन सिमुकाची सून. सिमुकाआधी सातवाहनांच्या तीन्/चार पिढ्या झाल्या असाव्यात.

दैवतीकरण कृष्णाचे झाले असावेही कदाचित. पण रामाला मात्र इतर राजांसमानच मानलेले दिसते कारण त्याचे नाव इतर राजांबरोबरच आहे. अर्थात ह्या नावांव्यतिरिक्त इतर ठोस पुरावे नसल्याने नक्की काहीच सांगता येत नाही.

धन्यवाद रे. इतका जुना शिलालेख म्ह. जबरीच आहे. बाकी रामपूजेचा सर्वांत जुना उल्लेख कुठे आहे काय माहिती. इ.स. पहिल्या शतकाच्या आसपास तरी भागवत धर्मात बहुधा 'वासुदेव कृष्ण'च जोरात होता असे दिसते.

प्रचेतस's picture

30 Jun 2014 - 6:19 pm | प्रचेतस

अगदी
त्यातही वासुदेव कृष्णासंदर्भात हेलिओडोरसचा गरूडध्वज शिलालेख लै फेमस आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Heliodorus_pillar

अगदी अगदी. एमपीमध्ये अशा काही गोष्टी पाहण्यासाठी जाणेदे मष्ट आहे.

एस's picture

30 Jun 2014 - 6:43 pm | एस

गुप्त काळात बांधल्या गेलेल्या देवगडच्या विष्णू मंदिरात काही राममूर्त्या आहेत. हा राम कथेचा शिल्पस्वरूपातील सर्वात जुना पुरावा आहे. पण त्यातही राम हा मनुष्यरूपात दाखवला आहे. कदाचित इस दुसर्‍या शतकापासून राम दैवी रूपात दर्शविला जाऊ लागला असावा. संदर्भ - ए. एल. बाशाम.

ओह अच्छा, धन्यवाद. देवगड नसून देवगढ़ आहे ते. यूपीमधले दशावतार मंदिर. वन ऑफ द अर्लिएस्ट फ्रीस्टँडिंग टेंपल्स म्हणून त्याचे महत्त्व फार आहे.

http://en.wikipedia.org/wiki/Dashavatara_Temple,_Deogarh

एस's picture

1 Jul 2014 - 11:12 am | एस

मोबाईलवरून नीट टंकता येत नाही. त्याचे 'दशावतार टेंपल' हे नाव अलिकडचे आहे. अलेक्झांडर कनिंगहॅम (1814–1893) - भारतीय पुरातत्त्व विभागाचे तत्कालीन मुख्य संचालक यांनी दिलेलं. मंदिर खूप भारी आहे.

बॅटमॅन's picture

1 Jul 2014 - 12:12 pm | बॅटमॅन

ओह ओक्के. कनिंगहॅमने नाव दिलेलं माहिती नव्हतं, धन्यवाद. बाकी मंदिर प्रत्यक्ष पाहिले नाही, पण फटूंवरून तरी जबरी आहे हे दिसतंच आहे.

चित्रगुप्त's picture

30 Jun 2014 - 7:38 pm | चित्रगुप्त

त्यासाठी फक्त हाडमोडका सांगाडा असून चालणार नाही, तो राजाचा/राजकुळातल्या व्यक्तीचा सांगाडा होता असे दर्शवणारा एखादा पुरावा पाहिजे.

यावरून डिस्कव्हरी का कश्यावर तरी आलेला एक कार्यक्रम आठवला. त्यात इजिप्तचे पिरॅमिड्स बांधणार्‍या मजुरांच्या (जमीनीत गडलेल्या) सांगाड्यांपैकी एकाच्या कवटीत सोन्याचा दात होता. त्यावरून इजिप्तच्या पुरातत्व विभागाचे डायरेक्टर का कोणी हापिसर मोठ्या अभिमानाने सांगत होते, की पिरॅमिड्स बांधण्यासाठी वेठबिगार आणि गुलामांचा वापर केला जायचा, हा सिद्धांत पूर्णपणे चुकीचा असल्याचा हा पुरावा आहे. कारण या पुराव्यावरून हे सिद्ध होते, की त्या मजुरांना त्याकाळचे हेल्थकेयर वगैरे दिले जायचे. एवढे, की चक्क सोन्याचा दात बसवून दिला गेल्याचा पुरावा आहे... वगैरे.
मी असे वाचले आहे, की त्याकाळी इजिप्त मधील भव्य इमारती वगैरे बघायला जे प्रवासी दूरदूरच्या देशातून येत ( हे प्रवासी त्याकाळच्या प्रवासातील त्रास वगैरेंचा विचार करता चांगले सुस्थितीतले असणार), त्यांना गुलाम बनवून बांधकामात मजूरी करायला लावत, आणि ते मेले, की तिथेच गाडून टाकत. हा सोन्याचा दातवाला देखील असाच एकादा सधन प्रवासी असू शकतो, आणि उत्खननातून मिळालेला हाच पुरावा वेठबिगारीच्या सिद्धांताचीसुद्धा पुष्टी करू शकतो....

बॅटमॅन's picture

30 Jun 2014 - 9:38 pm | बॅटमॅन

हा हा हा, अगदी अगदी. उत्खननातले पुरावेही दिशाभूल करू शकतात. म्हणून त्यासाठी दोन्ही पद्धतीचे पुरावे आणि बरेच तारतम्य पाहिजे. जिथे निर्णयन होत नाही तिथे तसे सांगितले पाहिजे. याची काही मजेशीर उदाहरणे ट्रॉय आणि मायसीनीच्या उत्खननात सापडतील ती देणार आहे.

ब़जरबट्टू's picture

28 Jun 2014 - 9:33 am | ब़जरबट्टू

कथा म्हणून फार आवडली..
बाकी एव्हढे काही लाजिक असावे, असे वाटत नाही.. जर शक्कुला बदलाच घ्यायचा होता, तर पांडवांना चांगले फासे टाकूनही घेता आला असताच... :)

लॉरी टांगटूंगकर's picture

28 Jun 2014 - 10:53 am | लॉरी टांगटूंगकर

कथा आवडली, लिहायची पद्धत तर नेहमीच आवडते.
सगळेच प्रतिसाद अपेक्षेप्रमाणे माहीतीपूर्ण.

पैसा's picture

28 Jun 2014 - 11:50 am | पैसा

गोष्ट आवडली. महाभारतावर आधारित गोष्टी वाचायला नेहमीच मजेशीर असतात. तुमची लेखनशैली आवडतेच.

मनमोहनसिंगांनी शीख हत्याकांडाचा बदला खान्ग्रेसला संपवून घेतला अशी एक थिअरी मजा म्हणून लोक मेसेजवरून पाठवत होते त्याची आठवण झाली!

अतिरेकी प्रतिसादै ओ पैसातै.

पैसा's picture

30 Jun 2014 - 7:27 pm | पैसा

तुम्हाला कोणी पाठवला नव्हता? गांधीजींचं स्वप्न पुरं झालं टैप! पिव्वर जोक!!

इशा१२३'s picture

28 Jun 2014 - 9:19 pm | इशा१२३

नविनच कथा कळली.छान लिहिलय.सर्व प्रतिसादही माहितीपुर्ण.

चित्रगुप्त's picture

28 Jun 2014 - 9:49 pm | चित्रगुप्त

ही कथा प्रथमच ऐकली. रोचक वाटली.

महाभारतावरील माझे काही (सचित्र) लेख:

सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १,२ ३ )
http://www.misalpav.com/node/25328

महाभारत (भाग १,२,३):
http://www.misalpav.com/node/26965

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jun 2014 - 10:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

कथा आवडली. पण ही अभ्यासातून पुढे झालेली आहे की कल्पनेतून ?

कानडाऊ योगेशु's picture

28 Jun 2014 - 11:39 pm | कानडाऊ योगेशु

चर्चाविषय व एकुणच चर्चा रोचक आहे.
शकुनि व शल्य दोघेही महाभारत युध्दात एक विशिष्ठ भूमिका घेऊन आले होते. त्याकाळी ज्या राजपुरुषांचा विवाह होण्यात काही अडचणी येत असत त्या पुरुषांची राजघराणी मद्र देशातुन द्र्वय देऊन वधु मिळवित असत थोडक्यात लग्नासाठी मुली विकत घेतल्या जात असत व त्यांच्याशी ह्या पुरुषांचा विवाह लावण्यात येईल. माद्रीचा पांडुशी विवाह हा असाच प्रकार होता. गांधार देशातील राजघराण्यांवर धाकदपटशा/युध्दे लादुन तेथील स्त्रियांशी विवाह लावले जात. भीष्माने लावलेला धृतराष्ट्राचा गांधारीशी विवाह हा ह्याचे उदाहरण आहे. शकुनि कुरूवंशाचे कंबरडे मोडायच्या उद्देशानेच हस्तिनापुरात तळ ठोकुन होता.कोणाचीही बाजु घेतली असती तरी त्याला कौरवपांडवात असलेल्या भाऊबंदकीचा फायदा घेऊन दोघांत महायुध्द व्हायलाच हवे असेच त्याचे राजकारण होते. कारण महायुध्द झाल्यानंतर एकुणच आर्यावर्त इतका दुबळा झाला कि त्यानंतर गांधारांकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत त्यानंतरचा आर्यावर्तातील कोणीही राजा करु शकला नाही.भीष्माला हे राजकारण कळत असुनदेखील केवळ प्रतिज्ञेच्या परिपूर्ततेपायी त्याला हा सर्व प्रकार स्वीकारावा लागला. कृष्णाला ही शकुनिचे राजकारण वेळीच लक्षात आले होते त्याने त्यातल्या त्यात एकुणच यादवांना व यादवसेनेला ह्या युध्दापासुन तशी फारशी झळ पोहोचणार नाही ह्याची काळजी घेतली.

तुमचा अभिषेक's picture

29 Jun 2014 - 11:51 am | तुमचा अभिषेक

खरी असो वा खोटी रोचक कथा,
बरेच प्रतिसाद मात्र अभ्यासपुर्ण !

माधुरी विनायक's picture

30 Jun 2014 - 11:00 am | माधुरी विनायक

सर्व प्रतिसाद आत्ता वाचले. खूप अभ्यासपूर्ण आणि वेगळी माहिती मिळाली. विशेषत: उगोलिनो ची कथा. या व्यक्तिरेखेबद्दल मला काहीच माहिती नाही. हे नावही मी पहिल्यांदाच वाचलं. अधिक जाणून घ्यायला आवडेल.
वल्ली, मृत्युंजय, कानडाऊ योगेशु, विकास, आगाऊ कार्टा, मराठे, स्वॅप्स, बॅटमॅन आणि आपणा सर्वांच्याच प्रतिसादांतून नवीन माहिती मिळाली.
मी ही कथा वाचली, मला अचंबा वाटला. माझ्याच प्रमाणे आणखी काही जणांना ही कथा माहिती नसेल आणि जाणून घ्यायला आवडेल असं वाटलं, म्हणून इथे सादर केली. कथेच्या सत्यासत्यतेबाबत माझा काहीच दावा नाही.
अशाच आणखीही काही कथा वाचनात आल्या आहेत. यापुढे जमेल तशा त्या सुद्धा इथे सादर करीत जाईन. पुन्हा एकदा सर्वांचेच आभार.

ओंडक्याने शकुनीच्या पायावर वार केला. शकुनी पंगु झाला,

हे चुकीचे आहे. चोप्रांच्या महाभारत मालीकेत गुफी पेंटल या कलकाराने तो रोल केला होता. तो एका पायाने अधू असल्यासारखा चालत असे. अन्यतः महाभारता कुठेच शकुनीच्या पंगडेपणाबद्दल उल्लेख आलेला नाही.
महाभारतात प्रमुख पात्रांच्या व्याधीम्बद्दल उल्लेख आलेले आहेत उदा:पंडू हा पंडू रोगी ( अ‍ॅनिमीक , भुर्‍या ) होता. धृतराष्ट्र हा अंध होता. शिखंडी हा तृतीयपम्थी होता. इत्यादी