ड्रेस्डेन - प्राग - २

मधुरा देशपांडे's picture
मधुरा देशपांडे in भटकंती
25 Jun 2014 - 11:43 pm

ड्रेस्डेन - प्राग - १

प्राग ही चेक रिपब्लिक या देशाची राजधानी. ड्रेस्डेन पर्यंत जातोय तर मग प्राग ला जाऊन येऊ शकतो हे खरं तर कारण. चेक हा देश शेंगेन देशांमध्ये येतो त्यामुळे शेंगेन देशांमधील व्हिसा इथे चालतो. परंतु या देशाचे चलन मात्र वेगळे आहे. ड्रेस्डेन मध्ये असतानाच क्रोन घेतले होते. ड्रेस्डेन ते प्राग हा २ तासांचा प्रवास आहे. ट्रेन चे आरक्षण आधीच केले होते. या रेल्वेत केबिन्स होते आणि प्रत्येक केबिन मध्ये ६ जणांसाठी बसण्याची सोय होती. आम्ही एका केबिन मध्ये बसलो तेव्हा तिथे एकच जण बसला होता. थोड्या वेळातच खास सहप्रवासी गप्पा सुरु झाल्या. गेल्या २ वर्षात अनेक प्रवास झाले पण प्रत्येक वेळी सोबतचा तेवढा मनमोकळा असेलच असे नाही हे माहित होते. पण त्यानेच सुरुवात केली. तुम्ही कुठे चालला आहात? फिरायला की काही कामासाठी? प्रागला फिरायला जातोय असे सांगितले. मग जर्मनीत कुठे राहता यावर आदानप्रदान झाले. आणि मग नेहमीचा खास प्रश्न आला. तुम्ही भारतीय का? मग पुढे प्रवासभर भारत हा विषय गप्पांना पुरला. हा बर्लिन चा माणूस होता. त्याच्या ऑफिसमध्ये दोन भारतीय मुली आहेत, त्यांच्या नावांचे उच्चार त्याला कसे कठीण जातात, त्याला भारतात कधीतरी फिरायला यायचे आहे वगैरे झाले. मग इथे जर्मनीत कधीपासून आहोत, काय करतो इत्यादी औपचारिक संवाद झाले. भारतीय अन्न या भारताबाहेर प्रचंड औत्सुक्य असणाऱ्या खास विषयावर चर्चा झाली. एकाच देशात खाद्यपदार्थांमधील असणारे इतके वैविध्य चर्चेचा विषय ठरले नाही तर नवल. गप्पांच्या नादात प्राग पंधरा मिनिटांवर आले आहे असे लक्षात आले. बरेच दिवसांनी सहप्रवाशांसोबत गप्पा मारत झालेला प्रवास छान वाटला. याशिवाय या प्रवासातील अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता हा नदीच्या काठाने जातो. शिवाय रेपसीड ची शेते आणि हिरवेगार डोंगर सोबतीला होतेच. चेक आणि जर्मनीतील घरे, हवामान यावर तुलना सुरु झाली. घरांची पद्धत तीच असली तरीही अगदीच छोटी आणि बरीचशी जुनी/पडकी घरे दिसत होती. रस्त्यावरील पाट्या आणि इतर ठिकाणीही भाषेतले बदल दिसू लागले आणि थोड्याच वेळात प्राग च्या स्थानकावर उतरलो.

https://lh3.googleusercontent.com/-abdTz3DV4Kc/U6sK7w7gtTI/AAAAAAAADHA/t7TRoG-HXo4/w866-h577-no/DSC_0068.JPG

प्राग मधील प्रमुख आकर्षण म्हणजे येथील किल्ला, चार्ल्स ब्रिज, डान्सिंग हाउस आणि जुने शहर (old town).
रस्त्यावरच्या पाट्या आणि दिशादर्शक बघत बघत मुख्य किल्ल्याकडे निघालो. वाहतुकीचे नियम बरेच धाब्यावर बसवलेले वाटत होते. पार्किंग चेही नियम सरळ तोडले होते. आडव्या उभ्या कशाही पद्धतीने गाड्या उभ्या होत्या. पाकीटमार, भुरटे चोर या गर्दीत असतील हे जाणवत होते. तुमच्याकडे डॉलर किंवा युरो असतील तर चलन बदलून मिळेल असे रस्त्यात मधेच येउन कानात कुजबुजणारे देखील अनेक होते. इतर काही शहरांपेक्षा इथे अधिक सतर्क राहायला हवे हे दिसत होते. पुढे एका ठिकाणी गर्दी दिसली म्हणून थांबलो तर हे दिसले. केवळ एका काठीच्या आधाराने अधांतरी मांडी घालून हा मुलगा बसला होता. हे असे प्रकार पुढेही अनेक ठिकाणी दिसले. हे नेमके कसे करतात याविषयी प्रचंड उत्सुकता आहे. पण फारशी माहिती मिळाली नाही. जाणकारांनी प्रकाश टाकल्यास आवडेल.

https://lh4.googleusercontent.com/-Tk9JTiGopWk/U6sLIm83QQI/AAAAAAAADHQ/YlFSs1w6E0E/w360-h540-no/DSC_0074.JPG

लागून सुट्ट्या आणि उन्हाळा यामुळे पर्यटकांची लक्षणीय संख्या दिसत होती. शहरातील इतर काही इमारती.

https://lh4.googleusercontent.com/-L9I9xlLpdKk/U6sK6enuS-I/AAAAAAAADG4/orJ_G5yV_q8/w810-h540-no/DSC_0071.JPG

https://lh4.googleusercontent.com/-ev1ZiCc-K80/U6sLAYdefVI/AAAAAAAADHI/DK7Cq8Hlf8A/w810-h540-no/DSC_0072.JPG

इथून पुढे चालत चालत चार्ल्स ब्रिज वर आलो आणि दिसली ती अजूनच तुफ्फान गर्दी. पाय ठेवायला जागा नाही असे म्हटले तरीही अतिशयोक्ती ठरणार नाही इतकी. धक्का बुक्की करत आणि या एकदम भारतातल्या स्टेशन वर आल्याचा फील घेत ब्रिज वर आलो. गर्दी, हवामान, अस्वच्छता यामुळे थोडे पूर्वग्रह दुषित झाले होते त्यात या पुलावर येउन थोडी भर पडली. पुलाच्या काठावर असणारे अनेक पुतळे आणि शिल्पं सुंदर होती पण सगळी काळी पडलेली. जसे ड्रेस्डेन मध्ये होते, पण इथली परिस्थिती फारच वाईट होती. त्यावर दिसणारी ग्राफिटी, काही इमारतींच्या जवळ दिसणारी डबकी, सगळीकडे दिसणारी घाण हे आनंददायी वाटत नव्हते. दिसणारा नदीचा किंवा इतर आजूबाजूचा देखावा हा देखील किल्ल्याचा अपवाद वगळता फार वेगळा असा नाही. यापेक्षा युरोपातील काही इतर ठिकाणे जी पर्यटनस्थळे म्हणून विकसित झालेली नाहीत ती मागे पडली का असा प्रश्न मनात येत होता.
चार्ल्स ब्रिज वरून दिसणारे प्राग.

https://lh4.googleusercontent.com/-zhWQcx0D16M/U6sLfLJbfZI/AAAAAAAADH4/mdpDcBrutxc/w810-h540-no/DSC_0091.JPG

https://lh5.googleusercontent.com/-vTVohOZVRwg/U6sLiWu3PeI/AAAAAAAADII/AhUnvoX1_ws/w810-h540-no/DSC_0092.JPG

https://lh4.googleusercontent.com/-BW1Ry177zbw/U6sLg3yIeNI/AAAAAAAADIA/OxOPKQ9tdaw/w810-h540-no/DSC_0094.JPG

शहराच्या जुन्या भागात दिसणारे हे खगोलशास्त्रीय घड्याळ. या ठिकाणी देखील गर्दीमुळे फोटो काढता आले नाहीत आणि बारकाईने काही बघताही आले नाही. पण हे कोरीवकाम निश्चितच अवर्णनीय होते.

https://lh4.googleusercontent.com/-z7rSl60zTEM/U6sLRDpN7AI/AAAAAAAADHg/FlWf45rS0ms/w360-h540-no/DSC_0077.JPG

किल्ल्याच्या जवळ असताना दिसलेल्या काही इतर इमारती. काही पडझड झाल्यासारख्या वाटल्या. पण तरीही सगळ्या वास्तू लक्षवेधी आहेत.

https://lh6.googleusercontent.com/-vo860whXSNE/U6sLNWOkxUI/AAAAAAAADHY/S3PPGMFNpts/w810-h540-no/DSC_0078.JPG

https://lh6.googleusercontent.com/-HmsrpemtaRA/U6sLVK6ZfxI/AAAAAAAADHo/fztw2J4NR68/w810-h540-no/DSC_0080.JPG

पुढे चालत राजवाड्यापाशी पोहोचलो. बाहेरून भव्य दिव्य दिसणारा हा किल्ला युनेस्को वर्ल्ड हेरीटेज मध्ये येतो. ऑन लाइन तिकिटे काढता येत नाहीत त्यामुळे आधी आत जाउन तिकीट कुठे काढता येईल हे शोधत होतो. बरीच मोठी रांग दिसत होती. पण तिकिटे कुठे मिळतील याचा एकही बाण दिसत नव्हता. एक दोन लोकांना विचारून पाहिले तर यांना इंग्रजीचा गंधही नव्हता. या रांगेच्या शेवटपर्यंत गेलो तेव्हा लोकांकडे तिकिटे दिसत होती. एक पोलिस किंवा सुरक्षारक्षक फिरत होता त्याला विचारले. साहेबांना इंग्रजी समजेना. एक एक शब्द सांगितला तेव्हा त्याने फक्त 'तिकडे' म्हणून हात केला. आता या 'तिकडे' ला जाण्यासाठी परत आलो त्याच रस्त्याने गेलो आणि अजून शोधाशोध केली तेव्हा तिकीट घर दिसले. एक छोटासा दरवाजा आणि बाहेर पुन्हा शंभर दीडशे लोकांची रांग. तीही विस्कळीत. पुढे सरकत सरकत आत गेलो तेव्हा तिथे ३ खिडक्या होत्या. कुणीही कसेही कुठल्याही रांगेत घुसत होते. कसेबसे तिकीट काढले आणि बाहेर येउन पुन्हा पहिल्या रांगेत लागलो. तीन वेगवेगळ्या प्रकारची तिकिटे उपलब्ध आहेत. २५० क्रोन चे एक सर्किट ए चे तिकीट आणि ३५० क्रोन चे सर्किट बी चे तिकीट आणि ३५० क्रोन चे सर्किट सी चे तिकीट. यापूर्वी रिव्ह्यूज वाचले होते त्यावरून सर्किट बी चे तिकीट बरे पडेल असे वाटले. यात महालातील ४ दालनांमध्ये आणि गार्डन मध्ये प्रवेश मिळतो. ऑडीओ गाईड चे पुन्हा ३५० क्रोन. या तिकीट काढण्याच्या गर्दी आणि त्रासाला वैतागून ऑडीओ गाइड रद्द केले. चारही दालनांमध्ये फिरण्यात अंदाजे २ ते अडीच तास पुरतात. सर्वप्रथम गेलो ते येथील प्रमुख चर्च मध्ये.

https://lh5.googleusercontent.com/-YQ-V9bs_4gg/U6sLq1WBU0I/AAAAAAAADIQ/ZnSG5NL86f4/w810-h540-no/DSC_0118.JPG

https://lh6.googleusercontent.com/-AGbP7g26IK4/U6sL79921fI/AAAAAAAADIo/vwXSDYFxKo0/w810-h540-no/DSC_0127.JPG

https://lh4.googleusercontent.com/-D8_tkId-uo0/U6sMNbWqDoI/AAAAAAAADJA/DwaSkKddA3g/w810-h540-no/DSC_0149.JPG

आतील भितींवर रंगवलेली सुरेख चित्रे.

https://lh4.googleusercontent.com/-xzSQX4s4gpg/U6sMJzv1ptI/AAAAAAAADI4/BGWtjkRN4-o/w822-h548-no/DSC_0147.JPG

https://lh4.googleusercontent.com/-XLN_2NFYMmo/U6sMGVHKCfI/AAAAAAAADIw/TREOj63lBAI/w810-h540-no/DSC_0128.JPG

https://lh5.googleusercontent.com/-m6ZVQnbZ6FI/U6sL1o1_UUI/AAAAAAAADIg/cMb2ZDvp0uc/w866-h577-no/DSC_0123.JPG

प्रत्येक ठिकाणी दिसणारे चित्र हे अधिकच सुंदर आहे असे वाटत होते. प्रत्येक रंगसंगती आकर्षक होती. ख्रिस्ती धर्मातील काही दंतकथा शिल्पांच्या स्वरुपात मांडल्या होत्या. इथे एखाद्या मंदिरात दर्शनाच्या मुख्य गाभाऱ्या जवळ असते तशी सगळीकडे गर्दी होती. पुढे चालण्यापेक्षा आपोआप ढकलणे चालू होते.

चर्च आणि आतला मुख्य पॅलेस बघून नंतर सेंट जॉर्ज बेसिलिका या तिसऱ्या दालनाकडे मोर्चा वळवला. या ठिकाणी मात्र थोडी निराशा झाली. आत फारशा काही वस्तूही नव्हत्या. प्रत्येक संग्रहालयात वस्तू असल्या पाहिजेच असे नाही. पण निदान ती वास्तू बघताना एखादे रिकामे घर बघतोय असे होऊ नये. त्या ठिकाणाची, तेथील इतिहासाची माहिती देणारे, नेमके आपण काय बघतोय याविषयी सांगणारे माहितीपर फलक कुठे दिसले नाहीत. ही माहिती वाचण्यात रस असूनही काही दिसत नव्हते. याविषयी माहिती आंतरजालावर शोधणे सहज शक्य असले तरीही नेमके त्या ठिकाणी बघताना माहिती मिळाली तर ती जास्त चांगली वाटते. ऑडीओ गाईड वरून काही मिळत असेल परंतु फार नाही असे ऐकिवात आले.

किल्ल्यावरून दिसणारे प्राग आणि चार्ल्स ब्रिज

https://lh3.googleusercontent.com/-n2dTI3dzym4/U6sMUJv2jzI/AAAAAAAADJI/TYGC9wvEzFk/w810-h540-no/DSC_0163.JPG

अपेक्षेपेक्षा बराच लवकर हा संपूर्ण परिसर फिरून झाला. थोड्याच वेळात परत खाली उतरलो. आता भूक लागली होती त्यामुळे एक हॉटेल शोधू असा विचार केला. या पंधरा मिनिटात मुसळधार पाउस सुरु झाला. आता समोर जे हॉटेल दिसले, तिथेच बसणे सोयीस्कर होते. वेळ होता पण इतर सगळी भटकंती होणे शक्य नाही हे लक्षात आले. पावसाने थांबायचे नाही असे ठरवले होते आणि त्यामुळे हॉटेल मध्ये बसण्याला पर्याय नव्हता. इथे तरी किती वेळ बसणार म्हणून शेवटी उठून मुख्य स्थानकाकडे निघालो. मेट्रो घेऊन स्टेशन वर आलो आणि थोड्याच वेळात माझ्या पर्स ची चेन उघडी आहे असे लक्षात आले. आतले वॉलेट मारले गेले होते. आधीच सगळा दिवस पाउस आणि गर्दीने 'उत्साहवर्धक' होता म्हणून हे अजून एक नवीन. प्राग किंवा इतरही युरोपातील मोठ्या शहरात पाकीटमारी चालते हे ऐकून असूनही, आजूबाजूला अनुभवले असुनही मेट्रो मध्ये चढताना बहुधा दुर्लक्ष झाले होते. *sad* नशीबाने युरो चालत नाहीत म्हणून त्यात एकही दमडी नव्हती. चिडचिड झाली, त्रागा झाला पण नुकसान झाले नाही हे बरे होते. कार्ड ब्लॉक करण्यासाठी फोनाफोनी झाली. दिवसाचा शेवट अजूनच निराशाजनक ठरला. परतीचा प्रवास सुरु झाला.

इतर जवळच्या देशांच्या तुलनेत थोडा बेशिस्त कारभार, भव्य आणि सुरेख किल्ला, तेवढेच सुंदर चर्च, आकर्षक चित्रे आणि शिल्पं, योग्य माहितीचा अभाव, पाकीटमार, हवामान खात्याचा नेहमीप्रमाणे चुकलेला अंदाज, त्यादिवशी असलेली अतिप्रचंड गर्दी अशा मिश्र भावनांनी हा दिवस संपला. एकुणात एक पर्यटनस्थळ म्हणून व्यक्तीशः प्राग थोडे ओव्हर रेटेड किंवा हाईप्ड (मराठी?) वाटले. एक दिवस घालवायला उत्तम पण मस्ट व्हिजीट च्या यादीत नसले तरी चालणारे.

दुसऱ्या दिवशी ड्रेस्डेन मधील संग्रहालये मात्र भान विसरून पाहण्यासारखी होती. त्याविषयी, पुढील भागात…
क्रमशः

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jun 2014 - 12:07 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर चित्रे आणि प्रवासवर्णन. काचांवरची चित्रे सुरेख आहेत.

प्रागमधली पाकीटमारी वाचून माझे अ‍ॅम्स्टरडॅममध्ये मारले गेलेले पाकीट आठवले !

हुकुमीएक्का's picture

26 Jun 2014 - 12:19 am | हुकुमीएक्का

         फोटो व माहिती आवडली. दुसर्‍या फोटोमधील मुलाने खाली दिलेल्या व्हिडीयोमधील Trick वापरली आहे. फरक इतकाच की व्हिडीयोमध्ये एकच व्यक्ती आहे. आणि वरील फोटोमध्ये अजून एक ट्रिक वापरली असल्याने खाली बसलेल्या मुलाने काठी हातात पकडली आहे.

मधुरा देशपांडे's picture

26 Jun 2014 - 12:23 am | मधुरा देशपांडे

रोचक आहे. धन्यवाद. या रेफ़रन्स ने अजून काही सापडले तर शोधते. :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Jun 2014 - 4:36 am | निनाद मुक्काम प...

प्राग आमच्या शहरापासून काही तासावर असल्याने पाहण्यात आले , मजा आली मात्र पूर्व जर्मनी बद्दल आमच्या कुटुंबाचे प्रतिकूल मत असल्याने ,तेथे काय पाहण्यासारखे आहे ,असा काहीसा भाव असल्याने तेथे जाणे झाले नाही , तुझ्या प्रवास वर्णनावरून आनंद मानून घेतो किंवा एखादा मिपाकर जर्मन दौरा आखत असेल तर त्याच्या सोबत जाण्याचा नक्की बेत आखेल.

यशोधरा's picture

26 Jun 2014 - 4:45 am | यशोधरा

वा सुरेख! हा भागही आवडला.

भाग आवडलाच. त्याचबरोबर एखादे तरी युरोपिअन पर्यटन स्थळ थोडे का होइना खराब केले आहे, हवामान खात्याने अंदाज चुकवणे,गर्दी ,डबकी हे वाचून अंमळ जळजळ शांत झाली !!

एस's picture

26 Jun 2014 - 8:04 am | एस

बाकी हा भागही सुंदरच. पुभाप्र.

प्यारे१'s picture

26 Jun 2014 - 4:54 pm | प्यारे१

+२

मस्तच. पु भा प्र.

चौकटराजा's picture

26 Jun 2014 - 8:34 am | चौकटराजा

प्रागचे चर्च तसे प्रसिद्ध आहे. आपण त्याचे यथार्थ दर्शन घडविले आहे. स्टेन्ड ग्लास विण्डोज हे युरोपियन चर्च मधील खास
दालन आहे. आपण दाखविलेल्या त्या घड्याळातील वरच्या दोन खिडक्या विशिष्ट वेळेस उघडतात.व त्यातून सरदाराच्या वेषातील बाहुल्या डोकावतात.
पुढील लेखासाठी धन्यवाद !

गेल्या अनेक दिवसांपासून मिपा वरील प्रवासवर्णनांमध्ये मानवी स्पर्श जवळजवळ दिसतच नव्हता. आपल्या या प्रवासवर्णनात पहिल्यांदाच तो दिसला. याबद्दल आपले कितीही अभिनंदन केले तरी कमीच आहे....

प्रवास म्हणजे काहितरी प्रेक्षणिय स्थळ बघायला जाणे आणि प्रवासवर्णन म्हणजे त्या स्थळाचे फोटो आणि त्या फोटोंचे वर्णन एवढाच अलिकडे अर्थ उरला असताना, एक बदल आपल्या लेखातून वाचायला मिळाला. त्याबद्दल धन्यवाद, आणि पुढील लेखासाठी शुभेच्छा!

मधुरा देशपांडे's picture

26 Jun 2014 - 10:56 am | मधुरा देशपांडे

इए काका, हुकुमीएक्का, निनाद, यशो, अजया, स्वॅप्स, चौकटराजा, कंफ्युज्ड अकौंटंट सगळ्यांचे आभार.
@ निनाद, अगदी जवळ असल्याने एकदा जायला हरकत नाही असे वाटते. हिवाळ्यात गर्दी कमी असेल तर कदाचित अजून बरे पडेल. ड्रेस्डेन विषयी लिहीनच अजून. तिथे तर मी परत जायला तयार आहे एवढे आवडले. :)
@अजया आणि स्वॅप्स - हो अशी ठिकाणे आहेत युरोपात देखील. कारण तेवढीच बॉलीवूड किंवा इतरही माध्यमातून जास्त दिसली आहेत आणि मग साहजिकच सगळे जग तिथे येतं. इतर काही मात्र मुख्य स्थळांपेक्षा सुंदर असून थोडी मागे पडली आहेत. त्यातल्या काहींविषयी लिहायचा विचार आहे.
@चौकटराजा- चर्च विषयीच्या अधिक माहितीकरिता विशेष धन्यवाद. लेखात म्हटल्याप्रमाणे इथे अजून वेळ घालवायला आवडला असता पण गर्दीमुळे शक्य झाले नाही.

स्वाती दिनेश's picture

26 Jun 2014 - 12:53 pm | स्वाती दिनेश

प्राहाचे वर्णन वाचून जुन्या आठवणी ताज्या झाल्या,
स्वाती

राजेंद्र मेहेंदळे's picture

26 Jun 2014 - 2:30 pm | राजेंद्र मेहेंदळे

अवांतर--हाईप्ड म्हणजे मराठीत अतिरंजित किंवा अतिशयोक्त म्हणता येईल

सूड's picture

26 Jun 2014 - 2:53 pm | सूड

वाचतोय. पुभाप्र.

सस्नेह's picture

26 Jun 2014 - 3:06 pm | सस्नेह

अन फोटो तर भारीच.
चर्चची भव्यता डोळ्यात भरते. चित्रेही सुंदर आहेत.
पर्यटनस्थळांची गैरव्यवस्था हा भारताचाच मक्ता आहे हा गैरसमज दूर झाला ! *sad*

मधुरा देशपांडे's picture

26 Jun 2014 - 10:57 pm | मधुरा देशपांडे

स्वाती ताई, राजेंद्र मेहेंदळे, सूड, स्नेहांकिता ताई, प्रशांत आवले, धन्यवाद.
@राजेंद्र मेहेंदळे - अतिरंजित बराच जवळ जाणारा वाटतोय. धन्यवाद.

दिपक.कुवेत's picture

29 Jun 2014 - 1:39 pm | दिपक.कुवेत

आवडला. लिखाणाची शैली छान आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jun 2014 - 2:57 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/yes/ok-sign-smiley-emoticon.gif

पैसा's picture

30 Jun 2014 - 10:49 am | पैसा

प्रवासवर्णन आवडलं. फिरताना असा एखादा तरी निराशाजनक अनुभव आला तर इतर ठिकाणी चांगल्या व्यवस्थेचं कौतुक करता येतं. फोटो खसच आलेत! पैसे गेले नाहीत हे नशीब. फिरायला जाताना जास्त पैसे जवळ न ठेवणे शहाणपणाचेच!

मधुरा देशपांडे's picture

30 Jun 2014 - 5:32 pm | मधुरा देशपांडे

दीपक, अत्रुप्त आत्मा, पैसाताई, धन्यवाद.

साती's picture

1 Jul 2014 - 2:33 pm | साती

पुढच्याच आठवड्यात 'अहो' प्रागला जाणार आहेत.
त्यामुळे आमच्यासाठी अगदी समयोचित.
तिथे जेवणाखाण्याचे काय ऑप्शन्स?

मधुरा देशपांडे's picture

1 Jul 2014 - 3:01 pm | मधुरा देशपांडे

धन्यवाद. जेवणासाठी - तुमचे अहो शाकाहारी असतील तर खूपच कमी ऑप्शन्स मिळतील. प्राग किंवा चेक चा एखादा खास खाद्यप्रकार माहित नाही. येथील डम्पलिंग्स बद्दल ऐकले आहे पण खाल्ले नाहीत. पण चिकन सहज मिळेल, त्यासोबत उकडलेले बटाटे किंवा सॅलड इ. शाकाहारी असतील तर फ्रेंच फ्राइज, आणि व्हेज पिझ्झा किंवा व्हेज बर्गर तत्सम प्रकार. बटाट्याचे चिप्स, रोल्ड पेस्ट्रीज, इत्यादी प्रकार रस्त्यावर छोट्या गाड्यांवर मिळतील. या रोल्ड पेस्ट्रीज पूर्व युरोपातील वैशिष्ट्य आहे. मस्त लागतात.

मधुरा देशपांडे's picture

1 Jul 2014 - 3:22 pm | मधुरा देशपांडे
साती's picture

2 Jul 2014 - 10:38 am | साती

चिकन मटण खातात त्यामुळे चालून जाईल.
सुवेनियर म्हणून आणण्यासाठी काय खास असेल तर सुचवा.
(तसेही अहो खरेदीत काय प्रकाश पाडणार ते माहितच आहे. :) )

मधुरा देशपांडे's picture

2 Jul 2014 - 1:00 pm | मधुरा देशपांडे

तिथले खगोलशास्त्रीय घड्याळ किंवा किल्ल्याचा देखावा वगैरे. चार्ल्स ब्रिज आणि किल्ल्याची रेखाटने पण छान मिळू शकतात. पण या रस्त्यावर विकणाऱ्या लोकांकडून शक्य तेवढे बार्गेन करण्याचा प्रयत्न करायचा. पर्यटक बघून फसवणूक होऊ शकते.