ऑगस्ट चा कट्टा

ऑगस्ट चा महिना आला कि आमचा कॉलेज चा कट्टा भरलेला असायचा त्या साठि लोक अगदि भल्या सकाळी सकाळी येयचे... हा महिनाच असा अजब आहे. कॉलेज मधे एकदा कधि नाव घातलेले लोकं हि ऑगस्ट मधे कट्ट्या वर बसायला येयचे. हा कटटा होताच असा.

"ह्यावर्षि पाखरांचे थवे ऍडमीशन फॉर्म घेवुन गेले आहेत रे.. सकाळी लवकर ये कट्टया वर.. " इति दिन्या

हा डायलॉग दिन्या दर वर्षि टाकतो.. त्याचा उत्साह ऑगस्ट च्या महिन्यात नेहमीच असा आशावादि असतो. कट्ट्या वरच्या नेहमीच्या ( ज्याना लाइफ मेंबरस असे हि म्हणतात) लोकांना ह्याचे काहि नवल वाटत नसतं. त्यांचा धर्म कट्ट्या वर बसणे हाच असतो. समोरुन जे काहि किंवा जे कोणी जाइल त्याला ते समान नजरेने बघतात.

दिन्या हा दरवर्षि प्रत्येक "पाखरा" कडे बघुन त्याचा पुर्ण "बायोडेटा" सांगु शकतो.. माहित नसेल तर तो ते लवकरात लवकर शोधुन कट्टावासियांना "खबर" देतो. बहुतेक म्हणुनच दिन्या ला कट्टया वर एक विशेष मान आहे. त्याच्या साठि कटट्या वर मोक्या ची जागा लगेच खाली करुन दिली जाते. हे आता बरेच वर्ष चालु आहे.

कुठलं "बिचारं पाखरु" कुठल्या काटेरी झाडात अडकले आहे... कुणा पाखराची आइ तिच्या पेक्षा "यंग" आहे.. कुठलं पाखरु पुढे "बरणी" होणार... इत्यादि सर्व बातम्या दिन्या २४-७ न्युज चॅनल सारखे सांगत असतो. दर वर्षि ह्याला एक तरी "सोल मेट" सापडते हे नक्की...

दिन्या चे हे उद्दोग वर्षांनुवर्षे चालु आहेत.. कॉलेज मधे असताना मी सुध्दा त्याच्या बरोबर त्याच्या "सोल मेट्स" चा पाठलाग करण्यात घालवला आहे. दिन्या ला हातावरच्या रेषा वाचता येतात हे धक्कादायक वृत्त मला अशाच एका "पाठलागा" नंतर समजले.. नंतर अनेक वर्ष मी हि त्याला सर्व " गुढ शास्त्रां " चा अभ्यासक समजत राहिलो. दिन्या नी अनेकांचे ( अनेकिंचे) हात, कपाळं, पाय, अंगावरचे तिळ हे पुरेपुर "हाताळले" आहेत अगदि भिंग घेवुन भरपुर वेळ निरखले आहेत ! त्याच्या कडे आमच्या कॉलेज मधिल जवळ जवळ प्रत्येक "स्त्री" ची पत्रिका आहे ! अगदि नव्या नव्या आलेल्या लेक्चरर्स पासुन सुन्दर दिसणार्या वयस्कर प्रोफेसरीणी, तिच्या मुली.. ते कॉलेज मधे फक्त अडमीशन फॉर्म घेयला आलेली एखादं "पाखरु" हि वाचलं नाहिये.

दिन्या मधे असे काहितरी आहे कि सगळे पटकन त्याच्या वर भारावुन जातात ... आकर्षक व्यक्तिमत्व पण भुल घालणारा साधे पणा , चातुर्य, मराठि-संस्कृत भाषेवरील प्रभुत्व, गुढ शास्त्रांचा आणि संगित शास्त्राचा बरया पेकि अभ्यास आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक साधी गोष्ट सुध्दा मीठ मिरची लावुन सांगण्याची कसब ! कविता,गाणि, गायक, लेखक यांचे संदर्भ तर इतके.. कि कधी कधी असे वाटायचे कि हा इसम सायन्स च्या एवेजी आर्टस साइड ला जास्त चमकला असता. असं कोधीतरी त्याला मी बोलुन हि दाखवल्याचे मला आठवतं .. तेव्हा त्याने मला जे सांगितल होतं ते मला अजुन आठवतं.... " आय ऍम सर्चिंग माय सोल मेट हियर "

त्याकाळी मला त्याचा अर्थ फारसा कळाला नव्हता.. सोल , सर्च, मेट.. ह्या पेक्षा माझा इन्टरेस्ट प्रोफेशनल कॉलेज, डिग्री आणि नोकरी ह्या कडे जास्त होते ! मी पुढे "फार मोठा होणार" असे ढोबळ भकित दिन्या ने माझ्या हातावरुन, माझ्या अंगावर असलेल्या एका तिळा वरुन आणि पत्रिका बघुन सांगितले होते.. वर एक डिस्केमर हि टाकला होता... "मात्र अभ्यास भरपुर करायला लागणार बरका... यश नक्कि येणार" !!! असं भविष्य सांगितल्या वर काय भिशाद मी हि ह्या "भविष्यकारा" वर विश्वास ठेवणार नाहि ? दिन्या ला हे शास्त्र समजतं कि नाहि ? का हा नुसतं नाटक करत असतो असले क्षुल्लक सवाल मनात चुकुन सुध्दा येवु दिले नाहित मी.

पुढे डिग्री कॉलेज मधे मी गेलो.. आणि दिन्या शी रोजची भेट सुटली... कधी तरी दिसला कि थोडिफार हितगुज.. पुढे पुढे वर्षातुन एकदा.. ऑगस्ट चा कट्टा टाकायला येवढिच भेट ! आसपास चे मित्र त्याची थोडिफार टिंगल-टवाळी हि करत असत.. माझी जरी त्यांना मूकसंमती असायची तरी मला त्याच्या बद्दल एक भीती युक्त आदर होता हे खरं!

दिन्या अजुनहि ऑगस्ट चा कट्टा न चुकता "अटेन्ड" करतो. गेले काहि वर्ष तो मला येण्यासाठि फोन करत नाहिये... त्याचं तसं कारण हि आहे... मी काहि वर्षा पुर्वी त्याच्या "निमंत्रणा चा आदर" केला नव्हता.. हे त्याने बोलुन हि दाखवलं होतं.. मी त्याला टाळतो आहे हे बहुतेक त्याच्या लक्षात येत होतं...

ऑगस्ट आला आहे... ह्या वर्षी मी दिन्या ला सरप्राइज देणार आहे.. एकदम जाउन त्याला कट्टया वर भेटणार आहे.. !

.... क्रमशः