कै. व्यंकटेश माडगुळकारांना साहित्यिक आदरांजली. भाग 1

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
4 Jun 2014 - 5:48 pm

28 ऑगस्ट या कै. व्यंकटेश माडगुळकारांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांना साहित्यिक आदरांजली.
लोणी गावातील सांप्रत (ऑगस्ट २००९ मधील) परिस्थितीचा वृतांत (पुनर्संपादित 27 मे 2014)भाग 1
संकलक - विंग कमांडर शशिकांत ओक

काही काळापुर्वी माझ्या हाती 'चित्रे आणि चरित्रे' या नावाचे कै. व्यंकटेश माडगुळकरांचे पुस्तक हाती आले. (उत्कर्ष प्रकाशन पुणे. पहिली आवृत्ती - जानेवारी १८८३, मूल्य ३० रुपये.) त्यातील ‘नवे गाव’ शीर्षकाचा एक लेख 'साप्ताहिक तेजस्वी'मधे सन १९७०च्या सुमाराला प्रसिद्ध झाला होता. त्याच्या शेवटी त्यांनी टिप्पणी केली होती
‘... खेडी बदलू लागली, देश स्वतंत्र झाला आणि काळाने विलक्षण वेग घेतला. खेड्याचा कायापालट झाला असे आपण म्हणतो. हा कायापालट कसा झाला आहे, काय झाला आहे. ह्याचा नीट तपास घ्यायचा तर कोट्साहेबाने जसे कुठलेतरी एक लोणी गाव घेऊन त्यांचा सांप्रत वृतांत लिहिला, तशी महाराष्ट्रातील दहा-पाच खेडी घेऊन त्यांचा लिहिला पाहिजे. लोकांना भेटून, बोलून, प्रत्यक्ष स्थिती डोळ्यांनी पाहून आजच्या खेड्याचे चित्र रेखाटले पाहिजे....’

मनात आले की आपण जर लोणीकंद गावाजवळ राहतो. तर निदान त्या गावाचा सन १८२० सालानंतरच्या १९० वर्षात काय व कसा कायापालट झाला आहे याची नोंद का करु नये? त्याप्रमाणे माझ्या अन्य कामातून सवड काढून मी दि. ९ ऑगस्ट २००९ ला, दुपारी ३ वाजता स्कूटरवरून एकटाच निघालो. विमाननगरहून १५ -१६ किमी गेल्यावर लोणीकंद ० असा अंतर दर्शक दगड आला. त्याआधी वेकफील्ड फूड प्रॉडक्ट्स कंपनीचा भला मोठा कारखाना बदलत्या काळाची चुणुक देऊन गेला. नंतरच्य़ा दोन तासात गावातील काही स्थळांना, लोकांना भेटलो. मिळवलेली माहिती माडगुळकरांनी मांडलेल्या विचारांचा मान राखत कशी सादर करावी असे विचार परतताना येत होतो. त्याचा हा छोटेखानी वृतांत.

कै. व्यंकटेश माडगुळकांनी एकाबाजूला लोणीकंद या प्रातिनिधिक खेड्यातील सर्जन कोट्ससाहेबाच्या सन १८२० मधील वृतांतामधील काही उतारे देऊन त्यांनी त्यांच्या बालपणातील (सन १९३०-४०) पाहिलेल्या अनुभवलेल्या खेड्यांतील जनजीवनाचा उल्लेख करून तोपर्यंतच्या १००-११० वर्षांत फारसा फरक पडला नसल्याची नोंद केली आहे. शिवाय ते म्हणतात की सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ श्री. धुर्ये ह्यांनी कोट्स नंतर १२५ वर्षांनी ‘लोणीकंद – देन एँड नाऊ’ असा वृतांत प्रसिद्ध केला होता. त्यात त्यावेळी कोट्स साहेबाच्या कथनातील काही गोष्टीत काय व कसा फरक झाला होता यांची नोंद केली होती. थोडक्यात श्री धुर्यें यांच्या नंतर हे काम कमांडरनी हाती घेतले होते. असो.

माडगूळकर आपल्या नवे गाव लेखात म्हणतात, 'ह्या वृतांतात सर्जन कोट्ससाहेबांनी गावची लोकसंख्या, गावचा कारभार, जाती-जमाती, आर्थिक स्थिती, व्यापार उदीम, शेती, लोकांची राहणी, कपडे, जेवणखाण, ह्या संबंधी सर्व लहानसान तपशील दिले आहेत. बाराबलुतेदारांची बरीच कामे कोट्ससाहेबांनी दिली आहेत त्यापैकी काही विशेष निवडक अशी मी घेतली आहेत.'
‘सुतार, लग्नप्रसंगी नवरानवरीला बसवून आंघोळ घालण्यासाठी चौरंग पुरवतो. तंबू ठोकण्यासाठी व घोडे बांधण्यासाठी खुंट्या पुरवतो.’
‘लोहार, बगाडाचे काम करतो. हे काम म्हणजे भैरोबा व हनुमानाच्या मुर्तीसमोर घुमणाऱ्या भक्तांच्या पाठीच्या कातडीतून लोखंडी आकडा घालणे होय.’
‘धोबी, लग्नामधे, मिरवणुकीच्या वेळी नवरानवरींसमोर पायघड्या अंथरतो. ’
‘न्हावी, सुटीच्या दिवशी पाटील आणि कुलकर्णी ह्यांचे मालिश आणि चंपी करतो. लग्नाच्या वेळी वाजंत्री वाजवतो. पेरणीच्या दिवसात बैलाच्या शेपट्या कातरतो. त्याबद्दल त्याला धान्य मिळते.’
‘सोनार, कर भरले जातात तेंव्हा नाणी चांगली आहेत, का नाहीत हे पहातो. त्याच्याकडून सोन्याचांदीचे काम करवून घेतले जाते. तेव्हा त्याला दोन पैशांपासून एक रुपयापर्यंत मजुरी मिळते.’
‘मांग, तरुण बैलांचे वृषण बडवतो. देहांताची शिक्षा झालेल्यांना मारण्याचे काम करतो.’
‘महाराचे, काम म्हणजे गावच्या सीमेवर व एकून गावाच्या कारभारामध्ये आक्रमण न होऊ देणे. त्यांना सीमांचे अगदी बारीक ज्ञान असते. सीमेच्या भांडणात त्याची जबानी निर्णयात्मक समजली जाते. वेशीचे दरवाजे उघडण्याचे व बंद करण्याचे काम त्याच्याकडे असते. ’
‘रामोशी, जमातीबद्दल सांगताना कोट्स लिहितात, त्यांचे डोळे व कान जनावरांप्रमाणे तीक्ष्ण असतात. माणसाचा व जनावरांचा माग ते इतका बरोबर काढतात, की आपला विश्वास बसणार नाही. एकदा शब्द दिल्यावर ते तो पाळतात.’
‘मुसलनामान, उर्मट व दांडगे वाटतात. त्यांची अतिद्वेषार्ह असहिष्णुता आणि हटवादी तत्वामुळे ते त्यांच्या मुर्तीपूजक शेजाऱ्यांच्या धार्मिक विधींचा तिरस्कार व निर्भत्सना करतात. गावामध्ये मुसलमानांची एक मशिद आहे. तिथे ते कुठल्याही अडथळ्याशिवाय सर्व धार्मिक विधि पार पाडतात.’
‘गावात गुलामांची, आठ कुटुंबे असून माणसांची संख्या अठरा आहे. त्यांना शंभर रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत विकतात. विशेषतः चांगल्या नसणाऱ्या मुलींना ब्राह्मण लोक घरातील कामे करण्यासाठी विकत घेतात. ’

‘माडगुळकर आपल्या अनुभवाची त्यात भर घालताना म्हणतात, जवळजवळ लोणी एवढीच लोकसंख्या आणि आकार असलेल्या महाराष्ट्रातील खेड्य़ात माझा जन्म झाला. कोट्स ह्यांनी लिहिलेला सर्व वृतांत वाचल्यावर माझ्या असे लक्षात आले की एकोणिसशे सदतीस साली मी जे खेडे पाहिले आहे, ते विशेष बदललेले नव्हते.
त्यांच्या आठवणी प्रमाणे त्यांच्या गावाला दोन पाटील होते. कुलकर्णी होता. शाळा मराठी चवथ्या इयत्तेपर्यंत होती. मास्तर एकच होते. शाळेत फक्त एकच ब्राह्मणाची मुलगी होती. गावात आठ ब्राह्मणाची घरे होती. दोन मोमिनाची होती. एक मराठ्याचे होते. बाकी सर्व येलमार होते. त्यांची जात फक्त आठ गावात आहे असे ते सांगत. सर्वच यलमार गळ्यात लिंग घालत नसत. रामोशी, महार, मांग, होलार यांची संख्या बरीच होती. सुताराचे व गवंड्याचे काम एक महारच करीत असे. शिवाय एक घर परटाचे होते. दोन न्हाव्यांची होती. एक सोनाराचे होते. एक कासाराचे होते. आमच्या गावाला वाणी नव्हता, पण शेजारच्या गावातील वाण्याने काही वर्षांनी गावात दुकान टाकले. शिंपी नव्हताच.’
गावात वाण्य़ाचे दुकान आले. हा वाणी पैशाबदली काहीही घेई. कोणतेही ध्यान्य, वैरणीची पेंडी, बाभळीचा डिंक, करंजीच्या बिया, असे काहीही त्याला घालून गूळ, तेल, मीठ, जिरे, मिरे, असा माल विकत घेता येत असे.
माडगुळकारांच्या लहानपणी बलुत्याची पद्धत चालू होती. न्हावी हजामत करी. आणि ताजी भाकरी घेऊन जाई. परीट कपडे धूत असे. होलार पायताण सांधण्याचे काम करी. महार जळणाचे लाकूड फोडून, त्याबदली भाकरी-कालवण घेऊन जाई. रामोशी रोज संध्याकाळी भाकरी मागे आणि त्या बदली चोरीस गेलेलेल्या वस्तूंचा तपास लावून देई. ज्याच्याकडे बागाईत जमिनी असत त्याच्याकडे जाऊन बलुतेदार मंडळी रताळे, गाजरे, मिरची, वांगी, कांदे असले 'माळवे' खाण्यासाठी मागून आणत. सुगी संपल्यावर, खळ्याच्या वेळी ह्या सगळ्यांना धान्याची पेंढी मिळे.
शेतीची जमीन, ती कसण्याची पद्धती, अवजारे, शेतकऱ्याजवळ असणारी जनावरे ह्यांविषयी ही बारीकसारीक माहिती देऊन साहेबांच्या मजकुरात त्याकाळी असलेल्या धान्याच्या किंमतीही दिल्या आहेत. गहू रुपयाला बारा शेर, हरभरा रुपयाला सोळा शेर, ज्वारी रुपयास अठरा शेर (स्वस्त झाली तर पंचवीस शेर), नाचणी रुपयास तीस शेर. तांदूळ रुपयास दहा शेर.
धान्य दळण्यासाठी, भरडण्यासाठी दगडी जाती होती. पाण्यासाठी मातीचे रांजण होते. पीठ मळण्यासाठी लाकडी काथवटी म्हणजे पराती होत्या. ( ह्या लाकडी परातीची किंमत कोट्सनी दहा पैसे दिली आहे.) उखळ होते. मुसळ होते. मडकी होती, त्यांच्या उतरंडीही घातल्या जात होत्या. धान्य ठेवण्यासाठी टोपल्या, कणग्या होत्या. लाकडाच्या ठाणवईवर ठेवलेले लोखंडी दिवे होते.
गावोगावी जत्रा आणि होळी, दसरा, दिवाळी आणि पोळा (आमच्याकडे बेंदूर ) हे सण शंभर वर्षापुर्वी साजरे होत, तशाच पद्धतीने साजरे होताना मी पाहिले आहेत. होळीसाठी मिळेल त्या ठिकाणाहून लाकडे चोरणे, होळीला पोळी देण्याचा मान पाटलांचा असणे, नंतर रात्रभर तमाशा होणे, सोंगे निघणे हे सगळे होत होते. धुळवडीला चिखलफेक होत होती. कुस्त्या होत होत्या.
दसऱ्याला नवीन कपडे घालून आणि फेट्यात नव्या धान्याचे तुरे खोवून वाजतगाजत सीमोल्लंघन होई. शस्त्रपुजा, होत होती. आपट्याच्या झाडाची पुजा होत होती. सोने लुटले जात होते. फक्त कोट्सनी लिहिल्यापैकी मेंढ्याचा बळी मात्र नव्हता.
पोळ्याचा सणही दणक्यात होत होता. बैलांची शिंगे बेगडाने रंगवून त्यांच्या टोकाला गोंडे बांधले जात. गळ्यात फुलांच्या माळा घातल्या जात. बैलांना पक्वान्ने चारुन त्यांची पूजा होई. मालक त्याच्या पाया पडत. संध्याकाळी सगळे बैल मिरवणुकीने हनुमानाच्या देवळाकडे निघत. पाटलांचे बैल सर्वात पुढे असत. दुसऱ्या दिवशी गाव शिकारीला जाई., कडक उन्हाच्या वेळी शिकारी रानात दूरदूर विखरत. ससे, हरीण, डुक्कर असे जनावर उठले की त्याचा ताणपट्टा काढत. ते धाऊन थकल्यावर त्याला सोट्याने मारत. ही शिकार वाजत गाजत गावात येई. शिकारीचे मुंडके वेशीत पुरले जाई. शेपुट वेशीतल्या झाडाला टांगले जाई आणि मासांतील वाटा घरोघर पोचता होई.
शेतकऱ्याला होणाऱ्या रोगराईबद्दल ही कोट्सनी लिहिले आहे. त्यात नारु आहे. गावचा न्हावी शस्त्रवैद्यकी करत असे. पायांना झालेली कुरुपे कापून घेणे, रुतलेला काटा काढून घेणे, ही कामे त्याच्याकडून केली जात. बायका अंधाऱ्या खिडकी नसलेल्या जागेत बाळंत होत. आतील, नीट हवा नसलेल्या जागी दिवा जळत असे. शेगड्या धगधगत असत. 'बाळ-बाळंतीण सुखरूप' हे नेहमीच ऐकायला मिळत नसे.
लोणीकंद गावची एकूण लागवडी खालील जमीन दोन हजार आठशे एक्क्यांशी एकर आणि तीस साखळ्या असून जमीन महसूल एक हजार तीनशे एक्कावन्न रुपये आठ आणे आहे. एकूण घरे एकशे शहाऐंशी आणि लोकसंख्या नऊशे चोपन्न आहे अशी माहिती वृत्तान्तात आहे. कोट्स म्हणतात, 'लोणी गावच्या भैरोबा देवाची साप चावलेल्या माणसांना आणि जनावरांना बरे करण्याबद्दल ख्याती आहे. मारुतीचे देऊळ चावडी समोर आहे. त्यापाशी गावसीमा दाखवणारा 'गडधू' गोल दगडीगोटा होता.'

गावसीमेचा दगड गडधू 1

2

ओक आपल्या शोधात म्हणतात, ह्या गडधूचे स्थान शोधायला अनेक तरुणांनी आपणहून मदत केली. शेवटी अर्धा पुरला गेलेला तो गोटा फोटोच्या निमित्ताने बाहेर आला. संपूर्ण शोधकार्यात अशा अनेक शर्टपँटच्या वेशातील तरुणांची मदत झाली.

कोट्सनी पोषाखाचे वर्णन करताना म्हटले होते, कमरेवर नाडीने बांधलेली आणि गुडघ्यापाशी मोकळी असलेली विजार घालणारे लोकही गावात होते. काही जण बाराबंद्याही वापरत. 'कांबळे आणि धोतर' यांचा उपयोग फक्त पांघरण्या-नेसण्यासाठीच करतात असे नाही. त्यांचा उपयोग दगडावर किंवा झाडाच्या सावलीत अंथरुन त्यावर झोपण्यासाठीही करतात. धान्य, भाजीपाला इत्यादि त्यात ते बांधून ते डोक्यावर किंवा खांद्यावर वाहून नेतात. 'ही स्थितीही तशीच शंभर वर्षे चालू होती' असे माडगूळकरांनी आपले मत नोंदवले आहे.पुढे त्यांनी म्हटले, 'माणूस मेल्यानंतर, घरातील सर्वात जवळचा जो नातेवाईक असेल, त्याने पांढरी बारीक भुक्की मयताच्या घरातील जमिनीच्या कोपऱ्यात टाकून ती टोपलीने झाकून टाकणे हे अगदी ठरलेले आहे. काही वेळानंतर ती काढून त्या पांढऱ्या भागावर कोणा प्राण्याचा पाय उठला आहे किंवा नाही, हे पाहतात. तसा जर उठला असेल किंवा एखाद्या जनावराच्या पायासारखे जर काही त्या पांढऱ्या भुक्कीत दिसले, तर मेलेल्या माणसाचा आत्मा त्या योनीत जाऊन पुनर्जन्म घेणार, असे समजतात' हे कोट्सनी कलेले वर्णन तर माझ्या वृद्ध आजीच्या मरणानंतर मी आमच्या घरातच अनुभवले आहे. - इति व्यंकटेश मा़डगूळकर.
पुढे चालू भाग 2...

समाजजीवनमानराहणीमौजमजाप्रकटनआस्वादमाहितीसंदर्भविरंगुळा

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

4 Jun 2014 - 6:10 pm | सुबोध खरे

मी व्यंकटेश माडगूळकरांचा निस्सीम चाहता आहे आणि त्यांच्या समग्र लेखांचा संग्रह मी फ्लिप कार्ट वरून विकत घेतला आहे. तो बहुधा फ्लिप कार्टवर अजून उपलब्ध आहे.
साधी सरळ सुंदर भाषा आणि प्रामाणिक लेखन हा त्यांच्या लेखनाचा स्थायीभाव आहे. यथा तथ्य लेखन आणि स्वतः कोणी थोर माणूस आहे असा कोणताही आव न आणणारे निर्व्याज साहित्य.
तात्यांना एक लवून नमस्कार.

शशिकांत ओक's picture

7 Jun 2014 - 11:52 pm | शशिकांत ओक

सुबोध जी,
नेट वर मला वरील पुस्तक पाहण्यात आले नाही. आपल्या असेल तर लिंक द्यावी. आभारी राहीन.

कवितानागेश's picture

4 Jun 2014 - 7:58 pm | कवितानागेश

छान विषय.

चांगला उपक्रम हाती घेतलात ओककाका .निरनिराळ्या लेखकांविषयी काही वेगळ्या अंगाने मिपाकरांनी लिहून मिपा संमृध्द होत आहे .

ग्रामिण कथा प्रकारात व्यंकटेश माडगूळकरांचे नाव आवर्जून घ्यावे लागते .हा कथाप्रकार लिहिणे हे चित्तूर पकडण्याइतके अवघड आहे आणि तो त्यांनी बऱ्याच वेळा शिताफीने पकडला आहे .इतकेच नाही तर कथांना समर्पक गतिमान रेखाचित्रेही दिली .चित्रकला आणि शिकार हे पण त्यांचे आवडीचे विषय होते .ते लेखक म्हणून मानले गेले ते त्यांच्या काळी या कथेने .पुढे काही काळाने ते म्हटतात की आताशा कथा लिहायला बसतो पण कथा अशी उतरतच नाही ,लेखच होतो .पंढरपुराजवळचे मंगळवेढा गावाने तीन व्यक्ती महाराष्ट्रास दिल्या एक दामाजी आणि दोन माडगूळकर बंधू .

शशिकांत ओक's picture

5 Jun 2014 - 11:36 pm | शशिकांत ओक

मी कोण व का आलोय हे कळताच तरूण गावकरी हळू हळू पुढे आले. गडधू असे काही तरी असते असे ज्यांच्या घरासमोर तो गोल दगडी गोटा अर्धवट जमिनीत रुतला होता त्यांना ही माहिती नव्हते. असो.

व्यंकटेश माद्गुल्कारांच्या पुस्तकांची लिस्ट हवी आहे

शशिकांत ओक's picture

6 Jun 2014 - 12:53 pm | शशिकांत ओक

लोक रंग पुरवणी २२ डिसेंबर २०१३

1

'बनगरवाडी' आणि 'माणदेशी माणसं' यांसारख्या अजरामर कलाकृतींच्या लेखकाचे निवासस्थान असलेला 'अक्षर' हा टुमदार बंगला आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्या जागी उभारल्या जात असलेल्या नव्या वास्तूत 'तात्यां'च्या नित्य वापरातील वस्तूंचे संग्रहालय साकारणार आहे. प्राप्तिकर कार्यालय गल्लीतील हा बंगला १९६१ पासून व्यंकटेश माडगूळकर यांचे निवासस्थान होता. एका लेखकाचे घर कसे असावे हे ध्यानात घेऊन माधव आचवल यांनी त्याची वास्तुरचना केली होती. ज्येष्ठ साहित्यिकांचा सहवास, लेखनाच्या प्रांतामध्ये 'धुळाक्षरे' गिरवू पाहणाऱ्या नवोदित लेखकांना तात्यांनी केलेले मार्गदर्शन, व्यंकटेश माडगूळकर-द. मा. मिरासदार आणि शंकर पाटील या तिघांचे एकत्रित कथाकथन, जंगल भटकंती आणि शिकारीचा छंद या साऱ्या घटनांचा हा बंगला गेली पाच दशके साक्षीदार होता. पंडित-जावेडकर बिल्डर्स नवी वास्तू विकसित करीत आहेत, अशी माहिती माडगूळकर यांच्या कन्या ज्ञानदा नाईक यांनी दिली. त्या म्हणाल्या, या वास्तूत तात्यांची स्मृती जतन व्हावी या आमच्या इच्छेला सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे येथे छोटेखानी संग्रहालय साकारले जाणार आहे.

शशिकांत ओक's picture

23 Jun 2014 - 12:45 am | शशिकांत ओक

ज्ञानदा नाईकांना भेटायची इच्छा आहे. अक्षर बंगल्याचे नवे स्वरूप साकारलेले नाही असे तिथे भेटून आलेल्यानी सांगितले. कोणी नाईक बाईंचा नवा पत्ता, फोन देऊ शकेल काय?

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Jun 2014 - 1:02 pm | llपुण्याचे पेशवेll

लवकर दुसरा भाग लिहा.

शशिकांत ओक's picture

5 May 2020 - 3:03 am | शशिकांत ओक

शि म परांजपे यांच्या पुस्तकातील वर्णनाच्या संदर्भात अन्य लेखन वाचताना मला सर्जन कोट्स साहेब कुठे सापडतात का? यावर शोधक नजर होती...
१८१९-२० च्या सुमारास शिरूर येथे इंग्रजी सेनेचा महत्वपूर्ण तळ होता. तिथे तोफांची, वाहून नेणाऱ्या चाकांच्या गाड्यांची दुरुस्ती, स्फोटके, गनपावडर, शस्त्रे यांचा डेपो असावा. तिथे ब्रिगेडियर जनरल स्मिथ यांच्या सैन्याला मागे फिरून विश्रांतीची, आजारी शिपाई, जनावरे यांच्या शुश्रूषेची सोय असावी. धान्य, मोहिमेत लागणारा पैसा, वाटेत खर्च, दरमहा पगार वाटप वगैरे करायला तो डेपो कार्यरत असावा.
या ठिकाणच्या आसपास सर्जन कोट्स साहेब असावा असे वाटत होते. तसा तो संदर्भ आज सापडला!