चॉकलेट डे .. खळ्ळं फट्ट्याक !

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
21 May 2014 - 6:47 pm

आयुष्याने दिलेल्या पचपचीत अनुभवांमध्ये मीठमसाला टाकून त्या किस्सेकहाण्या लोकांना सुनवतोय ! हसतोय आणि हसवतोय ! येण्यार्‍या आयुष्यात काही तरी सुरस आणि चमत्कारीक घडेल, बस्स या आशेवर जगतोय ! पण आज मात्र मी जे सांगायला जाणार आहे त्यात असत्याचा अंश कणभर सुद्धा असणार नाही. जेवढे पिळाल तेवढी त्यातून सत्याचीच धार बाहेर निघेल. आयुष्याने दिलेला एक अनुभव जसाच्या तसा मी आज तुमच्याबरोबर शेअर करायला जात आहे... का? ते मला स्वतालाही ठाऊक नाही...

तर हि गोष्ट आहे इसवीसन ..,,.. चला राहूद्या थेट प्रसंगावरच नेतो

**********************************************************
**********************************************************

वालचंद कॉलेज ऑफ ईंजिनीअरींग, सांगली !

वालचंद सांगली म्हटले की मोजून सात आठ च सुंदर मुली.
पुर्ण कॉलजभरात हं.
त्यातही आम्हा मुंबईकरांना आपल्या स्टाईलच्या वाटतील अश्या शोधायला गेले की त्यातल्याही निम्म्या गळाल्या.
‘बेगर्स डोण्ट हॅव चॉईस’ असे म्हटले तरी आम्ही ‘लोफर्स हॅव चॉईस’ कॅटेगरीतले होतो.
असो, तर त्यात ज्या होत्या त्यांची मग खूप चलती असायची. खास करून वॅलेंटाईन डे, फ्रेंडशिप डे, चॉकलेट डे, रोज डे, अश्या स्पेशल दिवशी गुलाब असो वा चॉकलेट, त्यांचा पदर फाटेस्तोवर भरून जायचा.
म्हणून मी त्या गर्दीतला एक होणे टाळायचोच.
निदान तसा आव तरी आणायचो.
तरीही एकदा एका मुलीला चॉकलेट देण्याचा योग आला. तिचाच हा चार ओळींचा किस्सा.

तर मी इतर मुलींसारखे या मुलीकडेही बघायचो, गंमत म्हणजे तिला सुद्धा माझे बघणे आवडायचे.
तर अश्याच एका चॉकलेट डे च्या दिवशी अचानक सामोरी आली.

संध्याकाळची वेळ, कॉलेजचाच एक पॅसेज, मी एकटाच कुठेतरी जात होतो तर ती देखील दिवसभराची धमालमस्ती आटोपून एकटीच कुठूनतरी येत होती.
माझी नजर नेहमीसारखी तिच्या चेहर्‍यावर खिळली अन तिची नजर नेहमीसारखीच माझ्या नजरेत अडकली.
जसे त्या चिंचोळ्या पॅसेजमधून जाताना आम्ही एकमेकांच्या जवळ आणि अगदी सामोरे आलो तेव्हा तिला हॅपी चॉकलेट डे म्हणून विश करणे मला भागच होते.
नव्हे तसे मी करावे अशी इच्छा तिच्या चेहर्‍यावरचे भाव पाहता समजून येत होती.
पोकळ विश कसे करायचे म्हणून मी खिसे चाचपले तर एक छोटेसे इकलेअर चॉकलेट निघाले.
सकाळी रूममेटने फ्रेंडशिप डे विश करत दिलेले एक’च एक रुपयाचे एक्लेअर. अर्थात यारदोस्तांमध्ये हेच बजेट असते. डेरीमिल्क आणि फाईव्हस्टार कॅडबर्‍यांचे बजेट केवळ मुलींसाठीच राखून ठेवलेले असते. पण देण्यामागची भावना महत्वाची नाही का, आणि आता तेच ईक्लेअर वेळेला केळं म्हणत कामाला येत होते.
ते तिच्या समोर धरून हॅपी चॉकलेट डे विश केले.
तसे हसली, आणि म्हणाली, "कसे घेऊ? हात तर फुल पॅक आहेत."
अरेच्च्चा खरेच की, आता कुठे माझी नजर तिच्या हातांवर गेली. दोन्ही हातांची ओंजळ करून उभी होती आणि ती ओंजळ फुल्ल ऑफ चॉकलेट्स होती.
अर्थात त्या ढिगार्‍यावर माझे छोटेसे इक्लेअर बॅलेंस करत ठेवणे काही अवघड नव्हते, पण माझेही या बाबतीतले प्रसंगावधान आणि हुशारी बघा,
मी उत्तरलो, "तू फक्त आ कर, मी टाकतो तोंडात"

गंमत केली हं.... असे मी पुढे बोलणार इ त क्या त तिने ऑं वा स ला सुद्धा..
मी थरथरतच एक्लेअर कसे बसे सोडले आणि टाकले तिच्या तोंडात. तिच्या ओठांना माझ्या बोटांचा स्पर्श होऊ नये ईतपत काळजी घेत बास्केटबॉल सारखेच टाकले, ते थेट तिच्या घशात जाऊन ठसका लागला नाही हेच माझे नशीब !

बस्स मग काय, ती आपल्या रस्त्याला, मी आपल्या रस्त्याला. जाताना पलटून मात्र चुकूनही पाहिले नाही. हि आपली स्टाईलच म्हणा ना. अश्या प्रकरणात घाई नडते हा गुरुमंत्र मी खूप लहानपणीच शिकलो होतो. या गुरुमंत्रानेच माझा कित्येक प्रेमप्रकरणात घात केला ती गोष्ट निराळी.
असो, तर या चॉकलेट डे चा हा किस्सा इथेच संपला...........................
नाही !
इथेच संपायचा असता तर नक्कीच हा लिखाण प्रपंच नसता.

**********************************************************
**********************************************************

दुसर्‍या दिवशी होता रोज’ डे. आता रोज रोज काय नशीब उघडत नाही म्हणतात, तरीही चुकूनमाकून उघडलेच तर कालच्यासारखे पुन्हा खिसे चाचपडून फूल न फुलाची पाकळी शोधावी लागू नये म्हणून मी सकाळीच मालकांच्या बागेतली गुलाबाची कळी खुडून घेतली. कोणाला द्यावे लागेल की नाही याची खात्री नसताना फुललेल्या टवटवीत गुलाबाला ५ रुपये खर्च करण्याऐवजी हे फुकटात पदरी पाडून घेतलेले सोयीचे समजले.
तशीच वेळ आली तर, "सखे, नुकत्याच उमलणार्‍या गुलाबाच्या कळीप्रमाणे आपल्यातील मैत्रीचे नातेही असेच उमलू दे" हि पंचलाईन सोबतीला तयार होतीच. समोरची पार्टी आपल्या फेवरमध्ये असेल तर कितीही पाणचट विनोद का असेना त्यावर हसले जाते वा कितीही दवणीय चारोळी का असेना हाऊ रोमॅंटीक म्हटले जाते हा अनुभव.. स्वत: अनुभवलेला नाही तर इतरांचा पाहिलेला.

दुपारपर्यंत तरी ते कळीचे फूल कोणाला द्यायचा योग आला नाही. हा योग संध्याकाळपर्यंत आला नाही तरी काही बिघडत नाही अशी एक पराभूत मानसिकता वयात आल्यापासूनच अंगी बाणवली होती. दुपारी त्या फूलावरच्या दोनचार सुकलेल्या पाकळ्यांचे आवरण बाजूला सारून आतला टवटवीतपणा शाबूत आहे याची खात्री तेवढी करून घेतली.
कालची माझी चॉकलेट क्वीन आज कुठे दिसली नव्हती. खरे तर हुरहुर याचीच होती की ‘ती’ माझे फूल स्विकारेल का. किंबहुना ते तिला देण्यायोग्य स्थिती वा संधी मला आजच्या दिवसभरात उपलब्ध होईल का आणि झालीच तरी मला ते धाडस जमेल का?

कालचा किस्सा अजून रूममेटला किंवा ईतर कोणा मित्रांना सांगितला नव्हता. मुद्दामहूनच लपवला होता. कारण काही अतिउत्साही मित्र अंड्यातून जीव उमलायच्या आधीच त्याचे पार आमलेट करून टाकतात, म्हणून हि खबरदारी. आज तिने माझे फूल चारचौघांसमोर स्विकारलेच तर मात्र काही लपून राहणार नव्हते ना लपवण्याची गरज असणार होती.

अखेर ती वेळ आली.
विद्यार्थ्यांमध्ये लाडके आणि लोकप्रिय बनायला सारेच शिक्षक अश्या खास दिवशी लवकर सोडतात. खास करून दुपारच्या सत्रात कोणी फारसे ताणून धरत नाही. ज्यांच्यात काहीतरी घडवायची धमक असते अश्या निवडक प्रेमवीरांचे सकाळीच काय ते घडून झालेले असते. पण मुंबई असो वा सांगली, जिथे तिथे आमच्यासारख्या ताटकळलेल्यांचेच प्रमाण जास्त असल्याने दिवसअखेरीस सुद्धा बर्‍याच घडामोडी घडणे बाकी असतात. एकाचे बघून दुसर्‍याची हिंमत वाढते आणि दुसर्‍याचे बघून तिसर्‍याची. या साखळीत आपणही कुठे फिट होतो का हे सारेच चेक करत असतात. मी देखील आपले नशीब आजमवायला म्हणून कॉलेजच्या प्रांगणात जमलेल्या घोळक्याचा एक भाग झालो.

जिथे मी उभा होतो तिथून ती मला दिसत होती, पण जिथे मी उभा होतो तिथून मी तिलाच काय कोणालाही दिसलो नसतो. पण सुरुवातीला हेच योग्य होते. लांबूनच तिचे निरीक्षण चालू होते. मूड तिचा हसरा खेळकर होता. ते पाहून माझा आत्मविश्वास वाढत होता. जणू काही माझ्याच विचारांत हसत होती. हळूहळू दिवस मावळू लागला, उन्हे उतरू लागली, गर्दी पांगू लागली. आता मला लपायला फारशी जागा नव्हती, तशी त्याची गरजही नव्हती. दोनचार मित्रांचे टोळके सोबतीला घेऊन मी तिच्या नजरेस पडेल अश्या जागी येऊन स्थिरावलो. काल तिचे हात चॉकलेटने भरले होते पण आज मात्र तिच्या हातात एकही फूल नव्हते. अर्थात हे चांगलेच होते. अन्यथा आजही ती मला "तुझे फूल कसे स्विकारू राजा, माळ की तूच आपल्या हाताने माझ्या केसांत" असे खचितच बोलणार नव्हती. उलट अजूनपर्यंत तिने कोणाचे फूल स्विकारले नाही याचा अर्थ नक्कीच मला वाव होता. अन ईतक्यात तिची नजर माझ्यावर पडली...

मी तिला पाहिल्यानंतर तब्बल पाऊणएक तासाने ती मला बघत होती, आमची नजरानजर होत होती, अन होताच काय ते ओळखीचे भाव. पहिल्यापेक्षाही दाट आणि गहिरे. माझ्याकडे पाहतच तिने आपल्या मैत्रीणीला खुणवले आणि दोघी जणी माझ्या दिशेने चाल करून येऊ लागल्या. माझी नजर पहिल्यापासूनच तिथे खिळलेली असल्याने माझ्या मित्रांच्याही ते लक्षात आले होते. आणि आता तिचे असे स्वताहूनच माझ्या दिशेने चालत येणे. फूल नक्की मी तिला देणार होतो की तिच्या मनातच मला द्यायचा विचार होता. छे, काहीतरीच काय, कसे शक्य होते. हे असे काही अदभूत घडणे शक्य मानले तरी तिचे हात तर रिकामेच होते. ना तिच्या मैत्रीणीच्या हातात काही होते. सर्व शक्यतांचा विचार करेपर्यंत ती माझ्या समोर येऊन उभी राहिली सुद्धा आणि माझ्या आ वासलेल्या तोंडानेच मी कसेनुसे हसलो. बस्स क्षणभरापुरतेच. कारण दुसर्‍याच क्षणी माझ्या काहीही ध्यानीमनी नसताना एक खाडकन मुस्काटात पडली. हो, तेच कोमल हात ज्यात मी काही काळापूर्वी फूल टेकवायचा विचार करत होतो, ते माझ्या गालफडावर अस्ताव्यस्त पसरले. नाही म्हणायला प्रतिक्षिप्त क्रियेनुसार मी चेहरा थोडा मागे सरकावला, पण परीणामी ती चापट डाव्या डोळ्याच्या कडेला चाटून गेल्याने त्यातून नकळत पाण्याची धार लागली. काही दिर्घ श्वास घेत मी नाकाडोळ्यातून येणारे पाणी थांबवायचा निष्फळ प्रयत्न करू लागलो कारण हाताने पुसायचा पर्याय खचितच नव्हता. तिच्यावर रागवावे, चिडावे, शांत शब्दात तिला याचे कारण विचारावे वा उलटून तिच्याही एक ठेऊन द्यावी. या पैकी काहीही ठरवायच्या आधीच ती माझ्या हातात कसलासा बोळा कोंबून आल्यापावली नाहीशीही झाली.

पुढचा किती तरी वेळ मी त्या हातातल्या चॉकलेट कव्हर कडे बघत होतो. बहुधा मी काल तिला दिलेल्या इक्लेअरचेच असावे. ते तिने असे परतवून जावे. नक्की काय तिला आवडले नव्हते. माझे तिला चॉकलेट भरवणे. तिनेच तर ‘ऑ’ केले होते. कि ती निव्वळ जांभई होती, जी योगायोगाने त्याच वेळी आली होती आणि मी त्याचा चुकीचा अर्थ काढला होता. जेवढी शोभा झाली तेवढी पुरेशी होती. ना मी तिला याबाबत काही विचारायला गेलो, ना ती मला कधी सांगायला आली. पुढे सेमीस्टर गेले, वर्ष सरले, पण त्या थप्पड की गूंज कायम मनात घर करून राहिली. त्यापेक्षाही त्यामागचे कधीच न उलगडलेले कारण.

या प्रकरणानंतर मला त्या वर्षभराच्या वालचंदमधील वास्तव्यात कधीच कुठल्याच मुलीने चारा टाकला नाही. ना कोणत्या मुलीने मी टाकलेले दाणे टिपले. त्याच्या पुढच्याच वर्षाला आम्हा मुंबईकरांना ट्रान्सफर मिळून सारे मुंबईच्या वीजेटीआय आणि सरदार पटेलला परतलो आणि हा वालचंद अध्याय तिथेच संपला. जे एका अर्थी बरेच झाले.

परंतु,
पिक्चर अभीभी खतम नही हुआ मेरे दोस्त ....

**********************************************************
**********************************************************

दोनेक वर्षांत कॉलेज संपले. नोकरीला लागलो. सेटल झालो. नवीन गर्लफ्रेंड मिळाली. मला नव्हे तर प्रत्येकालाच. काही मित्रांची लग्नही झाली. तर कोणाची ठरली. अश्याच एका मित्राचे लग्न ठरल्याची पार्टी करायला म्हणून मग आम्ही बसलो होतो. ईथेही बारचे नाव मुलीच्या नावाप्रमाणेच गुप्त राखतो. लग्नाची पार्टी म्हणून साहजिकच लग्नाचे विषय, पोरींचे विषय, आजवर केलेल्या भानगडींचे विषय. कॉलेजच्या आठवणी उगाळल्या जात होत्या आणि त्या आठवणींचा काटा सरकत सरकत पुन्हा एकदा माझ्या थपडेवर स्थिरावला. मी सोडून सारेच फुटेस्तोवर हसायला लागले. त्या हसण्याहसण्यातच माझ्या तेव्हाच्या रूमपार्टनरला चढलेली दारू बोलायला लागली....

आठवतेय ते चॉकलेट ... जे मी तिला दिलेले ... जे सकाळी माझ्या रूमपार्टनर ने फ्रेंडशिप डे विश करत माझ्या हातात ठेवले होते ... जे मी तेव्हा न खाता खिशात कोंबले होते .. आणि तेच ते चॉकलेट पुढचा मागचा कसलाही विचार न करता तिच्या तोंडात टाकले होते......................... ते नकली होते !
इक्लेअरच्या वेष्टणात गुंडाळलेले, बाहेरून चॉकलेटसारखेच दिसणारे, आतून चवीला मात्र अत्यंत कडवट आणि तोंडात घेताच थुंकून टाकण्याच्या लायकीचे होते. त्याची चव काय असावी याची कल्पना न केलेलीच बरी कारण त्याचा परिणाम मी पुरेपूर भोगला होता.

खाडकन मुस्काटात मारायची पाळी आता माझी होती. तेव्हा माझ्या हातातले गुलाब हलले होते आज मी त्याच्या म्हणजे माझ्या मित्राच्या हातातील नारंगी हलवली होती. काही प्रमाणात उतरवलीही होती.
कित्येक वर्षानी त्या घटनेचा बदला म्हणून मित्राला मारलेली एक पुरेशी सणसणीत चपराक नशेत असल्याने त्याला फारशी जाणवलीही नसावी, पण मला मात्र त्यातून कसलेसे समाधान मिळाले होते. ‘उस’ थप्पड की गूंज आता केवळ माझ्या एकट्याच्याच कानात वाजणार नव्हती. त्यात मी मित्रालाही त्याचा वाटा व्यवस्थित पोहोचवला होता.
पण तरीही ते समाधान अपुर्णच होते.........

आज दोनचार संकेतस्थळांवर मी लिहितो. चारचौदा लेख झालेत माझे. तीसचाळीस लोक ते वाचतात. आणखी शेदोनशे लोकांपर्यत ते लिखाण पोहोचवतात. असेच हा लेखही कधीतरी इच्छित स्थळी पोहोचेल, बस्स याच आशेवर हा लिखाण प्रपंच.
कुठेतरी, कुणालातरी, अरेरे... असे जेव्हा आतून, अगदी मनापासून वाटेल, तेव्हाच मिळेल मला माझे पुर्ण समाधान ..!

- तुमचा अभिषेक

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

प्रसाद प्रसाद's picture

21 May 2014 - 7:02 pm | प्रसाद प्रसाद

अरेरे.........
छान लिखाण. प्रसंगाचे वर्णन करण्याची शैली मस्त. आवडलं.....

राही's picture

21 May 2014 - 7:08 pm | राही

कुणाची गंमत आणि कुणाला शिक्षा !
स्टाइल नेहमीप्रमाणे छान. आवडले.

मुक्त विहारि's picture

21 May 2014 - 7:17 pm | मुक्त विहारि

लेख आवडला....

प्रभाकर पेठकर's picture

21 May 2014 - 8:14 pm | प्रभाकर पेठकर

मित्राने दिलेल्या चॉकलेटवर माझा संशय होताच. असो. पण मी तुमच्या जागी असतो तर त्या अन्याय्य थपडेचे कारण नक्कीच तिला जाऊन विचारले असते. भलेही अजून एक थप्पड खावी लागली असती तरी. तुमच्या निष्कपट मनाचा उद्देश स्वच्छ असताना असा अपमान का बरं सहन करावा? आता इतक्या वर्षांनंतर ब्लॉग आणि लेखांच्या द्वारे तुमचे स्पष्टीकरण आणि निरपराधित्व तिच्या पर्यंत पोहोचविण्यापेक्षा तेंव्हाच्या तेंव्हाच सोक्षमोक्ष लावला असतात तर आज आम्हाला त्यांना वहिनी म्हणायची संधी गवसली असती.

तुमचा अभिषेक's picture

21 May 2014 - 11:36 pm | तुमचा अभिषेक

काश... माझ्याजागी तुम्ही असता ;)
आणि एखाद्याचे नाव कानफाट्या पडले की त्याला एखाददुसरी कानफटात चुपचाप खाऊन घ्यावी लागते हो. :(
बाकी वहिनी मात्र आहेत त्याच योग्य आहेत, जेणेकरून असे धाडसी लिखाण करू शकतो, अशी कानफटवणारी नाहीये तेच बरे :D

आदूबाळ's picture

21 May 2014 - 8:23 pm | आदूबाळ

जहबहर्‍या किस्सा!!

कवितानागेश's picture

21 May 2014 - 8:45 pm | कवितानागेश

मस्त लिहिलय. :)

अनुप ढेरे's picture

21 May 2014 - 9:29 pm | अनुप ढेरे

भारी किस्सा... छान लिहिलाय

टवाळ कार्टा's picture

21 May 2014 - 9:50 pm | टवाळ कार्टा

धमाल किस्सा...पण वेळीच एक गणपती काढायला हवा होता तिच्या...इतना भाव नै देनेका पोट्टी को

लॉरी टांगटूंगकर's picture

21 May 2014 - 10:41 pm | लॉरी टांगटूंगकर

जबरदस्त जमला आहे.

मराठे's picture

21 May 2014 - 11:03 pm | मराठे

खणखणीत किस्सा

आत्मशून्य's picture

21 May 2014 - 11:05 pm | आत्मशून्य

अश्या प्रकरणात घाई
नडते हा गुरुमंत्र मी खूप लहानपणीच शिकलो होतो.
या गुरुमंत्रानेच माझा कित्येक प्रेमप्रकरणात घात
केला ती गोष्ट निराळी.

:) विशेषत: घात झाला हे बघता हां मन्त्र आपण इयत्ता 4.5वी +/- 1.2 वर्षे वयाचे असताना शिकला असावा असा कयास आहे.

त्यातही आम्हा मुंबईकरांना आपल्या स्टाईलच्या वाटतील
अश्या शोधायला गेले की त्यातल्याही निम्म्या गळाल्या.

अतिशयोक्ति होतीय, खरे तर 85% गळाव्यातच.

वालचंद सांगली म्हटले की मोजून सात आठ च सुंदर मुली.
पुर्ण कॉलजभात हं.

इंजीनिअरिंगच्या इमारतिमधिल हां वास्तुदोष अगदी कोम्प्युटर इंजिनीअरिंग/सायन्स/एप्लीकेशन्स वगैरे येउनहि बराच काळ अस्तित्वात होता/आहे. वालचंदला दोष नको.

तुमचा अभिषेक's picture

21 May 2014 - 11:43 pm | तुमचा अभिषेक

आधीच ईंजीनीअरींग त्यात वालचंद असे बोलू शकतो हवे तर ..

बाकी गुरुमंत्र शिकण्याचे वय आठवत नाही, पण माझे वयात येणे म्हणाल तर चौथीत मला एका मुलीच्या नावावरून चिडवले जायचे पण तसे काही नव्हते, मी स्वत: मात्र पहिल्यांदा प्रेमात पाचवीत पडलो होतो. त्यामुळे आपला अंदाज प्लस मायनस कन्सिडर करता बरेपैकी अचूक ..

आत्मशून्य's picture

21 May 2014 - 11:59 pm | आत्मशून्य

इयत्ता साडे चवथी प्लस मायनस चवदा महीनेहा गेस ज्योतिष वगैरे नाही बरका...!

आय जस्ट हेव माय वेज टु पेनिट्रेट द स्टफ लाइक मेनी बडिज माइंड ;) पण आपला प्रांजळपणाच भावतो म्हणुन संस्थळाव्र असे वैयक्तिक लिखाणाचे धाडस करू शकतो. अन्यथा आमच्या प्रकांड पाडित्याच्या लिखाणाचि अकाउण्टिबिलिटि काढनार्यांची इथे कमतरता नाही.

खरोखर मनापासून धन्यवाद.

झंम्प्या's picture

22 May 2014 - 9:13 am | झंम्प्या

आवड्ला किस्सा... लिहीन्याची स्टायील पण लय भारी

मृत्युन्जय's picture

22 May 2014 - 10:28 am | मृत्युन्जय

हाहाहा. मस्तच. एक थप्पड की गुंज :)

पगला गजोधर's picture

22 May 2014 - 11:08 am | पगला गजोधर

अभिषेकभाऊ मस्तंच लिवलय.
अवांतर: मेक ला व्हता काय ? कौलगूड सर वळीखतां का ?

तुमचा अभिषेक's picture

22 May 2014 - 11:37 am | तुमचा अभिषेक

नाही मी सिविल होतो.
२००३-०४ वर्षाला ..

योगी९००'s picture

22 May 2014 - 12:35 pm | योगी९००

मस्त मस्त मस्त .. वाचून मजा आली. कुठेतरी असे वाटले की तुम्ही त्या मुलीला का मारले हे विचारयाला पाहिजे होते ..!!

बाकी मी पण वालचंद सांगलीचाच...(मेक - पण १९९५ पास आऊट). आपले क्लिंटन सुद्दा वालचंदमधूनच शिकले आहेत.

निलेश देसाई's picture

23 May 2014 - 11:54 am | निलेश देसाई

अरे मी पन तेंव्हाच होतो तिथे..
मेक डिप्लोमा.....
आणि रंगपंचमीचा किस्सा त्याचवर्षी केला होता

तुमचा अभिषेक's picture

23 May 2014 - 12:51 pm | तुमचा अभिषेक

शक्यय आपण एकमेकांच्या कधी नजरेसही पडलो असू, बाकी डिप्लोमाची कोणतीही मुले वा ग्रूप तेव्हा फारसा ओळखीचा नव्हता, सिविलचीही फारशी नाहीच त्यामुळे मॅकची शक्यता आणखी कमी. तशीही एक मेंटेलिटी असतेच ना डिग्रीवाले म्हणजे डिप्लोमावाल्यांपेक्षा भारी वगैरे..
तसेच लेखात उल्लेखलेल्या ज्या चार-सहा-आठ मुली तेव्हा निदान माझ्यातरी टॉपलिस्टवर होत्या त्या बहुतांश डिग्रीच्या असल्याने डिप्लोमाचे क्लास धुंडाळणे वा ओळख काढणे असेही प्रकार फार झाले नाही..

निलेश देसाई's picture

23 May 2014 - 11:50 am | निलेश देसाई

रंगपंचमीचा पंगा त्यांच्यासोबतच झाला होता...

तुमचा अभिषेक's picture

22 May 2014 - 12:55 pm | तुमचा अभिषेक

मी वर्षभरासाठीच वालचंदला होतो, बीई पासआउट मात्र २००६ ला वीजेटीआयमधून झालो.
बाकी कॉलेज आणि त्याचा ११४-११५ एकर पसरलेला कॅम्पस भारीच, आयुष्यातले ते एकमेव वर्ष हॉस्टेल लाईफ जगल्याने कित्येक आठवणी आहेत त्या वर्षभराच्या..

बॅटमॅन's picture

22 May 2014 - 1:08 pm | बॅटमॅन

हा हा हा, जबरीच.

निलेश देसाई's picture

22 May 2014 - 1:10 pm | निलेश देसाई

वा वा वा, मस्तच!!
आमच्या वालचंद मधील आठवणी अचानक हिरव्या झाल्या.
कॉलेज मध्ये टेस्ट आणि कँपस इंटरव्हुव असताना रंगपंचमी खेळल्याने व मुलींना रंग लावल्याने (आम्ही तो जबरदस्तीने लावला असा कबुली जबाब आमच्याच मैत्रीणींनी नंतर दिल्याने) ब्लॅकलिस्ट मधे आमचा नंबर वरुन पहिला लागल्याची बातमी वालचंद बरोबरच आजुबाजुच्या ४-५ इंजिनीरींग कॉलेजात पसरली होती.........

तुमचा अभिषेक's picture

22 May 2014 - 1:47 pm | तुमचा अभिषेक

वालचंदची रंगपंचमी .. वाह काय आठवण काढलीत राव.. बेक्कार.. आम्ही बाहेर राहत असल्याने सकाळी मस्त मुंबई स्टाईल रंगपंचमी खेळून झाली, आमच्यासारखेच बाहेर पीजी म्हणून राहणार्‍या एकेकाच्या घरात घुसून रंगवणे वगैरे.. कित्येकांच्या मालकांच्याही नंतर शिव्या खाव्या लागल्या.. अकरा साडेअकरा पर्यंत प्रत्येकाच्या अंगावरील कपडे छिन्नविछिन्न होऊन त्यांची लक्तरे झाली होती, तीच गळ्यात टांगून मग हॉस्टेलकडे मोर्चा वळवला.. तिथे चिखलाचे डबके आणि काय काय सांगू नये असला बेक्कार माहौल होता की लांबून पाहताच पावले थबकली.. इतक्यात काही नागपूरच्या पोट्ट्यांची आमच्यावर नजर पडली, त्यांनी आम्हाला घ्यायचा आवाज दिला तसे जी धूम ठोकली ती .... हातात गावलो नाही त्यांच्या हेच नशीब !

वालचंद.. सुंदर आठवणींचा एक कप्पा,या कप्प्यात असंख्य आठ्वणी अगदी ठासुन भरलेल्या.
२००५ साली मेक.विभागातुन बाहेर पडलो पण मनाने अधुन मधुन जरूर फेर फटका मारतो.

~आसिफ.

चाणक्य's picture

22 May 2014 - 3:24 pm | चाणक्य

जबह-या किस्सा अगदी.

पैसा's picture

22 May 2014 - 5:20 pm | पैसा

सो सॉरी!

शिद's picture

22 May 2014 - 6:45 pm | शिद

मस्त किस्सा.

बाकी इंजिनियरींग कॉलेज आणि हॉस्टेलचे दिवसच साले काही वेगळे होते... आयुष्यातील एकदम जादुई दिवस.

तुमचा अभिषेक's picture

22 May 2014 - 10:17 pm | तुमचा अभिषेक

सर्वच अरेरें चे धन्यवाद :)

किसन शिंदे's picture

23 May 2014 - 12:23 am | किसन शिंदे

झक्कास लिहीलंय. :)

पण तीही तिखट मिरची होती की. थोबाडीत वगैरे दिली :(

आत्मशून्य's picture

23 May 2014 - 9:03 am | आत्मशून्य

हेच म्हणतो. इट्स एसोल्ट.

मला व्यक्तिश: चोकलेट गोड न्हवते या कारणाने मुलीने डायरेक्ट गाल रंगवला पटले नाही पण भाऊ म्हणतात तर विश्वास ठेवलाच पायजे

तुमचा अभिषेक's picture

23 May 2014 - 12:33 pm | तुमचा अभिषेक

ते पण आहेच, कदाचित आमचे इतरही काही किडे याला कारणीभूत असावेत आणि हे तत्कालिक कारण असावेत, बाकी अश्यावेळी मैत्रीणी कान भरण्यात आणि इकडच्या तिकडच्या चार गोष्टी सांगण्यात आणि आपल्याच मैयतर्नीची लाईन कशी होऊ नये हे बघण्यात फार हुशार असतात...

स्पंदना's picture

23 May 2014 - 8:59 am | स्पंदना

मी अय्यो म्हणते ;)
मस्त वाटल वाचुन. एकदम फ्रेश.

अमोल केळकर's picture

23 May 2014 - 12:37 pm | अमोल केळकर

जबरदस्त लेखन

( मुळचा सांगलीकर ) अमोल केळकर

अवांतर : आमचा एक whats up वर ग्रुप आहे, वालचंद मधल्या अनेक मुली तिथे आहेत , टाकू का आपला लेख ;)

तुमचा अभिषेक's picture

23 May 2014 - 12:53 pm | तुमचा अभिषेक

मात्र आता मी विवाहीत असून मला याचे कोणतेही चांगले वाईट परिणाम घडलेले नकोयत आता हे नमूद करायला विसरू नका.. :)

अमोल केळकर's picture

23 May 2014 - 1:56 pm | अमोल केळकर

हा हा हा :)

स्पा's picture

23 May 2014 - 3:00 pm | स्पा

ख्याक

=))

एस's picture

23 May 2014 - 3:22 pm | एस

या दोन्ही घटनांमध्ये एक दिवस कसा गेला याचा विचार करतोय.

......................... ते नकली होते !
इक्लेअरच्या वेष्टणात गुंडाळलेले, बाहेरून चॉकलेटसारखेच दिसणारे, आतून चवीला मात्र अत्यंत कडवट आणि तोंडात घेताच थुंकून टाकण्याच्या लायकीचे होते. त्याची चव काय असावी याची कल्पना न केलेलीच बरी कारण त्याचा परिणाम मी पुरेपूर भोगला होता.

जर ते इतके वाईट होते तर तिथेच तिने थुंकून कसे टाकले नाही? *preved* *lol* *biggrin* *ROFL*

तुमचा अभिषेक's picture

23 May 2014 - 3:29 pm | तुमचा अभिषेक

जर ते इतके वाईट होते तर तिथेच तिने थुंकून कसे टाकले नाही?

ते तिने केलेही असेल पण हे देखील वाचा..

बस्स मग काय, ती आपल्या रस्त्याला, मी आपल्या रस्त्याला. जाताना पलटून मात्र चुकूनही पाहिले नाही. हि आपली स्टाईलच म्हणा ना. अश्या प्रकरणात घाई नडते हा गुरुमंत्र मी खूप लहानपणीच शिकलो होतो. या गुरुमंत्रानेच माझा कित्येक प्रेमप्रकरणात घात केला ती गोष्ट निराळी.

दोस्त, कथा जेव्हा सत्यघटनेवर आधारीत असते तेव्हा त्यात एकही लूप होल नसतो ;)

पाटीलभाऊ's picture

23 May 2014 - 5:03 pm | पाटीलभाऊ

मस्त लिहिलय... *give_rose*

कथनातला प्रांजळपणा भावला.
तुमचा हेतू पूर्ण होवो !

विजुभाऊ's picture

25 May 2014 - 3:36 pm | विजुभाऊ

अभ्या किडे करतो, अभ्या दारू पितो. अभ्या कडू चॉकलेट खाउ घालतो.
पण अभ्या नीच नाहिय्ये.

तुमचा अभिषेक's picture

26 May 2014 - 1:00 am | तुमचा अभिषेक

...पण अभ्या नीच नाहीये.. अगदी अगदी.. बस्स ओळखलेत रे तुम्ही सर्वांनी मला.. सर्वच प्रतिसादांचे आभार :)

ते सांगलीकरांसाठी वालचंद नसून 'वॉलचंद' आहे असं नम्रपणं नमूद करु इच्छितो.
बाकी किस्सा भारी! ज्या मुलीनं वाचायला हवं तिनं वाचावं हीच इच्छा व्यक्त करतो.

आतादेखील गेटसमोरच्या आनंदरावकडं भन्नाट हाफफ्राय नि ऑम्लेट मिळतं का ते बघायला हवं.

तुमचा अभिषेक's picture

28 May 2014 - 2:45 pm | तुमचा अभिषेक

नका हो उगाच सांगलीच्या खादयपदार्थांची आठवण काढू. ते हाल्फफ्राय, ऑमलेट, किंवा ते घालून केलेले बर्गर सारखे सँडवीच, तसेच बेकरीत मिळणारे अंडा पॅटीस, सर्व चवी घोळू लागल्या.

बॅटमॅन's picture

28 May 2014 - 3:07 pm | बॅटमॅन

वॉलचंद बद्दल अगदी सहमत.

यद्यपि आमच्या ब्याचमधील लोक असे फारसे म्हणत नसत कधी. पण आमच्या शीनियर ब्याचमधील लोक, त्यातही पोरी हा उच्चार हमखास करीत-लै हसू येत असे तेव्हा.

निलेश देसाई's picture

30 May 2014 - 11:26 am | निलेश देसाई

आनंदरावांच हाफ फ्राय आणि अंडा सँडविच आहाहाहा....का जळवताय उगाचच!

योगी९००'s picture

30 May 2014 - 11:40 am | योगी९००

ते सांगलीकरांसाठी वालचंद नसून 'वॉलचंद' आहे असं नम्रपणं नमूद करु इच्छितो.
हा हा हा...एकदम पटेश...

या सांगलीकरांनी अशा आंग्लाळलेल्या उच्चारामुळे आमचा पोपट केला होता. कोणा सांगलीकराने सांगीतले की सांगलीचा फेमस टायमपास रोड म्हणजे "हर्बट रोड" जेथे सर्व काही मिळते. कोणी सार्जंंट हर्बट याच्या नावाने ठेवलेला रोड असावा असे वाटले....

आमचाही बराच वेळ याच रोडवर जायचा. एकदा चुकून रोडवरची पाटी वाचली आणि लक्षात आले की 'हर्बट" नाही तर "हरभट" रोड....सॉलिड हसलो होतो त्यावेळी...!! नाव हरभट पण "हर्बट" असाच उच्चार करायचा.

तांबे नावाच्या कोणा व्यवसायीकाने आपला व्यवसाय उत्तम चालावा म्हणून "तांबे" ऐवजी "टॉम अ‍ॅन्ड बे " असे नाव घेतल्याचेही ऐकले आहे.

जातवेद's picture

25 May 2014 - 7:27 pm | जातवेद

मी पण :)

खळ्ळ खट्याक चा रोचक किस्सा ! ;)

श्रीगुरुजी's picture

26 May 2014 - 2:38 pm | श्रीगुरुजी

किस्सा वाचून वाईट वाटले. तुम्ही प्रामाणिकपणे आणि उत्साहाने जे चॉकलेट दिले ते नकली होते हे दुर्दैव व त्याचा परीणाम इतका वाईट झाला हे वाचून हळहळ वाटली. चांगल्या भावनेने केलेल्या कृतीचा असा वाईट शेवट व्हायला नको होता.

तुमचा अभिषेक's picture

28 May 2014 - 2:46 pm | तुमचा अभिषेक

सर्व प्रतिसादांचे धन्यवाद,
श्रीगुरुजी, चलता है ;)

मृगनयनी's picture

29 May 2014 - 7:37 pm | मृगनयनी

हाहा.. छान आहे लेख!!! .. आवडला...

जाऊ द्या हो अभिषेक'जी... प्रत्येक "ऐश्वर्या"चा अभिषेक वेगळा असतो.. शेवटी या गाठी स्वर्गातच ठरत असतात... नाही का?!?

सौंदर्याची आवड प्रत्येकाला असते... आणि प्रत्येकाच्या सौन्दर्याची परिमाणं थोड्याफार फरकानं "दिसण्या"वरच ठरतात... हे आपल्या लेखावरून पटले.!.!.!. :) :) :)

चावटमेला's picture

29 May 2014 - 2:30 pm | चावटमेला

मी ही वालचंदचाच २००६ चा पास आउट. बाकी लेख आवडला.