मतदान न करने हा एक सामाजिक गुन्हा वा अपराध आहे का?

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in काथ्याकूट
24 Apr 2014 - 10:09 pm
गाभा: 

आज शेवटच्या टप्प्यातले मतदान झाल्यावर नेहमीप्रमाणेच कमी मतदान असा आरडाओरडा सुरू झाला. ज्यात भारताची आर्थिक राजधानी आमची मुंबई सुद्धा होती. खरे तर मुंबईत गेल्यावेळी पेक्षा जास्त मतदान झाले. प्रत्येक विभागात ५० टक्के पेक्षा जास्त आणि सरासरी ५३ टक्के. (आकडे कमीजास्त असू शकतात, प्रमाण मानू नका) तरीही इतर राज्यांशी तुलना करत असमाधान आहेच. याचे एक कारण म्हणजे सध्या सत्ताधारी पक्षाविरुद्ध जनमाणसात असलेला प्रचंड असंतोष, मोदी सरकारची आलेली लाट, आपसारख्या नवख्या पक्षाने दाखवलेली आशा, सोशलसाईटवर युवा पिढीने दाखवलेला अवेरनेस पाहता लोकांच्या अपेक्षा देखील यंदा किमान ६०-६५ टक्के मतदान होईल अश्या होत्या. त्यामुळे त्यांना हे मतदान आणखी कमी वाटले.

असो,
तर आता या कमी मतदानाची कारणे कोणी मतदारांमधील उदासीनता देत आहे तर कोणी वोटींग लिस्टमधील नावांची गडबड. तर कोणी निसर्गाला दोष देत प्रचंड गरमीचे कारण पुढे करत आहे. कारण काहीही असले तरी सर्वत्र नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. जणू काही मतदान न करणे हा एक प्रचंड गुन्हा आहे जो काही समाजकंटकांनी केला आहे. इतर वेळी वाहतुकीचे शिस्तीचे नियम तोडणारा, सार्वजनिक जागेत गैरवर्तन करणारा, परीसरात अस्वच्छता वाढवणारा, छोटीमोठी लाचलुचपत देऊन घेऊन भ्रष्टाचारास हातभार लावणारा वगैरे वगैरे फार मोठी लिस्ट होईल, पण हे सारे करताना कुठेही जागरुकता दाखवत नसलेला भारतीय नागरीक आज मात्र हा मतदानाचा हक्क बजावल्याने कॉलर टाइट करून इतर मतदान न करणार्‍यांना चार खडे शब्द सुनवायची संधी सोडत नाहीये.
(यातही काही जणांचा सूर असा की सरकार पलटायचे आहे आणि तुम्ही मतदान न करता घरात बसून आहात. म्हणजे यातही अमुकतमुक पक्षालाच वोट द्या किंवा अमुकतमुक पक्षाला वोट देऊ नका असे आपले मत लादणे)

अर्थात हे ही चालायचेच, चूक की बरोबर ते नंतर बघू,
पण मला प्रश्न पडला आहे की मतदान न करणे हा एखादा प्रचंड गुन्हा किंवा सामाजिक अपराध आहे का? किंबहुना एवढे मोठाले शब्द न वापरताही ते चुकीचे वर्तन आहे का?
कोणालाही मत न देणे हे देखील एक मतच नाही झाले का?
किंबहुना ‘मला कोणीही चालेल, इथून तिथून सारेच सारखे’ असे एखाद्याचे मत असू शकत नाही का?
आणि लोकशाहीत आपण प्रत्येकाच्या मताचा आदर करायला हवा ना.

कुठलेही सरकार आले तरी माझी परिस्थिती काही बदलत नाही असे जर एखाद्याला वाटत असेल तर त्याने मतदानाच्या बाबत उदासीनता दाखवण्यात गैर ते काय?

तसेच याउपर असते ती एक प्रायोरीटी. एखाद्याला ऑफिसला सुट्टी मिळतेय म्हणून तो आरामात मत देऊ शकतो, पण तेच ऑफिसमध्ये एखादे महत्वाचे काम असेल वा किंवा एखादे काम आजच केले नाही तर धंद्यामध्ये आर्थिका फटका बसू शकतो तर मी ते आधी बघणार नाही का. माझ्या एका मताने काय तो फरक पडणार आहे असा विचार करणे, थोडक्यात आपली प्रायोरिटी काय आहे हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येकाला नसावा का? हे त्याचे मतच झाले नाही का?

माझे स्वताबद्दल सांगायचे झाल्यास मी मात्र आज मतदान केले. फेसबूकावर छानपैकी फोटोही अपलोड करून झाले. तसेच आजवर एक वेळ सोडून प्रत्येक वेळी मतदानाचा हक्क बजावला आहेच. पण ती एक वेळ जेव्हा मी मतदान बजावले नाही तेव्हा मी अर्ध्या दिवसाच्या सुट्टीचा फायदा उचलत मैत्रीणीबरोबर फिरणे पसंद केले. त्या वयात, त्या क्षणाला, मला ती संधी मोलाची वाटली. त्यावेळी माझी प्रायोरीटी मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातील मौजमजेला दिली आणि आजही मला त्यात काही चूक वाटत नाही, कारण तेव्हा माझी १८ वर्षे पुर्ण झाली असली तरी मला राजकारणाशी फारसे काही घेणेदेणे नव्हते.

असो, इतरांची मते जाणून घेण्यास उत्सुक.

प्रतिक्रिया

पिवळा डांबिस's picture

24 Apr 2014 - 10:26 pm | पिवळा डांबिस

एकदा लोकशाही मान्य केल्यावर, मतदान न करणे हा माझ्या मते एक नैतिक गुन्हा आहे.

मी अर्ध्या दिवसाच्या सुट्टीचा फायदा उचलत मैत्रीणीबरोबर फिरणे पसंद केले. त्या वयात, त्या क्षणाला, मला ती संधी मोलाची वाटली. त्यावेळी माझी प्रायोरीटी मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातील मौजमजेला दिली आणि आजही मला त्यात काही चूक वाटत नाही, कारण तेव्हा माझी १८ वर्षे पुर्ण झाली असली तरी मला राजकारणाशी फारसे काही घेणेदेणे नव्हते.

तरीही ती चूकच होती. पण लहान वयात अज्ञानापोटी अशा चुका होतात, तेंव्हा ते जाऊदे...

माझे स्वताबद्दल सांगायचे झाल्यास मी मात्र आज मतदान केले.

व्हेरी गुड!

फेसबूकावर छानपैकी फोटोही अपलोड करून झाले.

ह्ये तिच्यायला जास्त महत्वाचं!! आणखी व्हेरी गुड!!!
:)

तुमचा अभिषेक's picture

24 Apr 2014 - 10:46 pm | तुमचा अभिषेक

नैतिक गुन्हा
येस्स, नैतिक गुन्हा बोलू शकतो. तुलनेत सौम्य शब्द वाटतो. पण मग नीतीमत्ताही व्यक्तीसापेक्ष नाही का, वा नैतिकतेचे निकष कोणी ठरवले, तसेच ते निकष लाऊन इतरांना यावरून दुसर्‍याची नैतिकता ठरवायचा अधिकार काय हे प्रश्न येतातच.

लोकशाही
येस्स ती मान्य आहेच, त्यालाच अनुसरून हा प्रश्न विचारला आहे की एखाद्याला या निवडप्रक्रियेत भाग घ्यायचा नसेल तर तो तटस्थ राहू शकत नाही का? :)

पिवळा डांबिस's picture

24 Apr 2014 - 11:22 pm | पिवळा डांबिस

मतदान न करणे हा माझ्या मते एक नैतिक गुन्हा आहे.
लोकशाहीत जगणारा, एरवी लोकशाहीने प्रदान केलेली सगळी स्वातंत्र्य, अधिकार उपभोगणारा माणूस जर एक कर्तव्य म्हणून स्वखुशीने मतदान करत नसेल तर माझ्या मते तो उच्च नीतीमत्तेचा नागरीक नाही.

एखाद्याला या निवडप्रक्रियेत भाग घ्यायचा नसेल तर तो तटस्थ राहू शकत नाही का?

लोकशाही ही व्यवस्था इतर कुठल्याही व्यवस्थेप्रमाणे परिपूर्ण नाही, तिच्यातही त्रुटी आहेत. त्यामुळे तो तसा तटस्थ राहू शकत नाही. आता नोटा वगैरेची सोय केलीये म्हणतात, तेंव्हा तो ऑप्शन वापरता येईल कदाचित!

तुमचा अभिषेक's picture

25 Apr 2014 - 1:04 am | तुमचा अभिषेक

नोटा हा पर्याय माझ्या ऐकण्यानुसार काही फायद्याचा नाहीये.
(माझी माहिती चुकत असेल तर करेक्ट करा)
नोटाला बहुमत मिळाले तरी सर्व उमेदवार बाद असे नसून त्यातूनही ज्याला जास्त मते आहेत तोच विजयी.
मग असे असल्यास काय फायदा त्या नोटाचा? मग मतदान न करून नोटा वापरल्यासारखेच झाले, फक्त त्याची रेकॉर्डला नोंद झाली नाही इतकेच.

जणू काही मतदान न करणे हा एक प्रचंड गुन्हा आहे जो काही समाजकंटकांनी केला आहे. इतर वेळी वाहतुकीचे शिस्तीचे नियम तोडणारा, सार्वजनिक जागेत गैरवर्तन करणारा, परीसरात अस्वच्छता वाढवणारा, छोटीमोठी लाचलुचपत देऊन घेऊन भ्रष्टाचारास हातभार लावणारा वगैरे वगैरे फार मोठी लिस्ट होईल, पण हे सारे करताना कुठेही जागरुकता दाखवत नसलेला भारतीय नागरीक आज मात्र हा मतदानाचा हक्क बजावल्याने कॉलर टाइट करून इतर मतदान न करणार्‍यांना चार खडे शब्द सुनवायची संधी सोडत नाहीये.

हो ना मतदान हे ऐच्छिक असते. असं इमोशनल ब्लॅकमेलींग करायचं असेल तर "ऐच्छिक" या शब्दाला अर्थ काय राहीला? अशी बळजबरी (पॅसिव्ह-अ‍ॅग्रेसिव्ह) करणे हाच लोकशाहीचा पराभव नाही का?

पिवळा डांबिस's picture

24 Apr 2014 - 11:26 pm | पिवळा डांबिस

अशी बळजबरी (पॅसिव्ह-अ‍ॅग्रेसिव्ह) करणे हाच लोकशाहीचा पराभव नाही का?

माझ्या मते अशी इमोशनल, पॅसिव्ह असो वा अग्रेसिव्ह, बळजबरी करायची वेळ येणं हा लोकशाहीचा एका प्रकारे पराभव असू शकेल...

बालगंधर्व's picture

26 Apr 2014 - 1:22 pm | बालगंधर्व

मझ नव एथ्लया मददार यदित नहे. महनुन मे वोत नहे केलए.

प्रचंड गरमीचे कारण पुढे करत आहे.

आमच्या पुण्यात गरमी ला उकाडा म्हणतात ;)

>>आमच्या पुण्यात गरमी ला उकाडा म्हणतात

आमच्या पुण्यात ही बाहेरुन लोकं आली आणि शिंची भाषा ती कशी बदल्लीच गो!! आता ह्या निवडणुकांत पुण्यात यायला व्हिसा वैगरे लागू करा असा वटहुकूमच काढायला लावणार आहे. ;)

-(शृगालनयन)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

26 Apr 2014 - 10:27 pm | विश्वनाथ मेहेंदळे

(शृगालनयन)
=))

तुमचा अभिषेक's picture

25 Apr 2014 - 11:03 pm | तुमचा अभिषेक

आमच्या पुण्यात गरमी ला उकाडा म्हणतात

आमच्या मुंबईत उकाड्याला उकाडाच बोलतात आणि गरमीला गरमीच बोलतात ;)

यसवायजी's picture

25 Apr 2014 - 11:32 pm | यसवायजी

उकाड्याला उकाडाच बोलतात
आमच्या पुण्यात 'बोलतात'ला 'म्हणतात' म्हणतात. आणी 'म्हणतात'ला 'म्हणतात'च म्हणतात. ;)

तुमचा अभिषेक's picture

26 Apr 2014 - 12:22 pm | तुमचा अभिषेक

आमच्या पुण्यात 'बोलतात'ला 'म्हणतात' म्हणतात. आणी 'म्हणतात'ला 'म्हणतात'च म्हणतात.

थोडक्यात पुणेकरांच्या शब्दकोशात "बोलतात" हा शब्दच नाहीये तर .. ;)

बॅटमॅन's picture

26 Apr 2014 - 1:44 pm | बॅटमॅन

बोलणे, म्हणणे, सांगणे ही तीनही क्रियापदे कधी वापरावीत याचे शास्त्र आहे.

हे न सांगतादेखील बोलता येते असेच म्हणेन ;)

चित्रगुप्त's picture

26 Apr 2014 - 1:07 pm | चित्रगुप्त

पुण्यात गरमी ला उकाडा म्हणतात, पण सदाशिवपेठेत 'उष्मा' म्हणतात, असे ऐकून आहे.

उत्तर: हो. वरच्या प्रतिसादात पिडां यांनी म्हटल्याप्रमाणे 'नैतिक' गुन्हा आहे.

पुढचा प्रश्न असा आहे: हा नैतिक गुन्हा माणसं स्वेच्छेने करतात का?(तुम्ही एकदा केला होता तसा!) मतदान 'ऐच्छिक' असल्याने काय करणर या परिस्थितीत? फक्त जागरूकता कार्यक्रम करू शकतो, आवाहन करू शकतो.

पण नेहमी ऐच्छिक असतो हा 'गुन्हा' की परिस्थिती त्यांना हा गुन्हा करायला भाग पाडते? मग ही परिस्थिती जे निर्माण करतात ( यादीतून नावं गायब होणं; वर्षानुवर्ष मतदार ओळखपत्र न मिळणं; वेळेत नावनोंदणी करूनही यादीत नाव नसणं.. इत्यादी) त्यांना गुन्हेगार म्हणायचं का?

पिवळा डांबिस's picture

24 Apr 2014 - 11:33 pm | पिवळा डांबिस

( यादीतून नावं गायब होणं; वर्षानुवर्ष मतदार ओळखपत्र न मिळणं; वेळेत नावनोंदणी करूनही यादीत नाव नसणं.. इत्यादी) त्यांना गुन्हेगार म्हणायचं का?

नाही. मतदान करायची इच्छा आहे पण वरील काही, मतदाराचा कंट्रोल नसलेल्या, कारणांमुळे जर मतदान करता आलं नाही तर मी त्यांना नैतिक गुन्हेगार मानणार नाही.
अशा वेळेस ही परिस्थीती निर्माण होऊ देणार्‍यांच्या पार्श्वभागावर चार बांबू ओढायची गरज आहे असंही माझं मत आहे!!!

बॅटमॅन's picture

24 Apr 2014 - 11:32 pm | बॅटमॅन

नक्कीच नैतिक गुन्हा आहे. त्याहीपेक्षा मोठा गुन्हा म्ह. मद्दान न करूनही मोदी-केजरीवाल-गांधी-करप्शन इ.इ. बद्दल मते ठोकणे हा आहे.

तुमचा अभिषेक's picture

25 Apr 2014 - 12:02 am | तुमचा अभिषेक

त्याहीपेक्षा मोठा गुन्हा म्ह. मद्दान न करूनही मोदी-केजरीवाल-गांधी-करप्शन इ.इ. बद्दल मते ठोकणे हा आहे.

हे नाही पटले. जर त्या राज्यकर्त्यांनी केलेला चुकीचा कारभार कोणाला त्रासदायक वाटत असेल वा एखाद्याचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होत असेल तर तो त्यावर मत व्यक्त करू शकतो. मतच नाही तर रीतसर तक्रार नोंदवणे वा कायदेशीर कारवाई देखील करू शकतो. त्यासाठी त्याने मत दिले होते की नाही हे मॅटर करू नये. अन्यथा एखाद्या सत्ताधार्‍यावर आरोप करताना आधी आपण गेल्या निवडणूक प्रक्रीयेत एक मतदार म्हणून भाग घेतला होता का याचा पुरावा कोर्टात हजर करावा लागेल.

चुकीचा कारभार कोणाला त्रासदायक वाटत असेल तो आपला त्रास मतपेटीतूनदेखील व्यक्त करु शकत नसेल तो तक्रार करणे, त्या तक्रारीचा पाठपुरावा करेल किंवा कायदेशीर कारवाई करेल अशी शक्यता वाटत नाही.
इसके लिए ज्यादा मेहनत लगेगी.
("त्याहीपेक्षा मोठा गुन्हा म्ह. मद्दान न करूनही मोदी-केजरीवाल-गांधी-करप्शन इ.इ. बद्दल मते ठोकणे हा आहे.") अशा प्रव्रुत्तीला आम्ही शेटे शेटे आंबे पाडणे असे म्हणतो.

तुमचा अभिषेक's picture

25 Apr 2014 - 12:32 am | तुमचा अभिषेक

मतपेटीतून मत देऊन तो त्रास दूर करणे हा खूप गैरसोयीचा आणि वेळखाऊ प्रकार नाही का?
आणि एकाला काढून दुसर्‍याला आणने म्हणजे त्या त्रासातून मुक्तता याची शाश्वतीही असते का?

राहीले तक्रारीच्या त्रासाचे तर जर होणारा गलथान कारभाराचा त्रास कोणाला व्यक्तीगत पातळीवर होत असेल तर ती व्यक्ती तक्रार करणारच आणि होणार्‍या त्रासापेक्षा पाठपुराव्याचा त्रास जर कमी असेल तर तक्रारीचा पाठपुरावाही करणारच.

तुमचा अभिषेक's picture

25 Apr 2014 - 12:33 am | तुमचा अभिषेक

असो, आता मला सांगा, याआधी निवडून येणारे सरकारही बहुमतातूनच निवडून आलेले ना, म्हणजे बहुमताची पसंती त्याच पक्षाला होती ना, मग तरीही त्यांनी गलथान कारभार केला, घोटाळे केले, देश बुडवला याचा अर्थ लोकांनी चुकीच्या लोकांना निवडून दिले. म्हणजेच याचा एक अर्थ असाही झाला की या निवडणूक प्रक्रियेतूनही चांगले वा आहे त्या पर्यायातून सर्वोत्तम सरकार मिळेल याची शाश्वती नसतेच. निदान या देशात तरी तसे घडत नाहीये असे बोलू शकतो. आता हे चुकीचे सरकार निवडणारे कोण? ज्यांनी याआधी मतदान केले ते ही जबाबदारी घेतील का? घ्यायला हवी ना, जर मतदान केल्याचा अभिमान आहे तर चुकीचे मतदान केल्याचीही जबाबदारी घ्यायला हवीच.

घेतो ना साहेब. आता बिपाशा बासू ला घेऊन पिक्चर काढला. नाही चाललां. मंग दुसर्‍या डावात सनी लिओनीला घेतलं. कंच बिगडलं ? सबको एक चानस तो बनता है ना ? आता पिक्चर चालत नाही म्हणून आपण डायरेक्ट साबण तर नाय ना विकू शकत ?

तुमचा अभिषेक's picture

25 Apr 2014 - 1:00 am | तुमचा अभिषेक

काही लोकांच्या मते बिपाशा जाऊन सनीच येणार आहे तर तोच चित्रपट बघायला मिळणार काही फरक पडत नाही. तर कित्येक लोकांपर्यंत तर हा चित्रपट पोहोचतही नाही वा कधी बघायला मिळत नाही त्यांनाही मग सनी असो वा बॉबी काही फरक पडत नाही. जर कोणाला हा चित्रपट बघणे त्रासदायक वाटले तर तो आवाज उठवणार पण पुढच्या सिनेमातही आपल्याकडे माधुरी दिक्षितचा पर्याय नसल्याने तो या कास्टींग काऊचच्या भानगडीत पडणारच नाही.

तळटीप - आपण बिपाशा आणि सनी नाव वापरलीत म्हणून ती तशी माझ्या पोस्टमध्ये आली, अन्यथा कोणाची कोणाशी तुलना करायचा हेतू नाही.
नाही सनीबाई पॉर्नस्टार आहेत म्हणून हा खुलासा :)

असेल वा एखाद्याचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होत असेल तर तो त्यावर मत व्यक्त करू शकतो.

सरकार कीती का वाईट असे ना, सरकार बद्दल वाईट मत फक्त टॅक्स देणार्‍यांनी च करावे. बाकी च्यांचा काय संबंध? त्यांना जे फुकटात मिळते आहे त्याबद्दल कसली तक्रार?

चित्रगुप्त's picture

25 Apr 2014 - 12:01 pm | चित्रगुप्त

टॅक्स बद्दल फारशी माहिती नाही म्हणून विचारतो, प्रत्यक्ष आयकर भरण्याखेरीज आपण जी खरेदी करतो, त्यामुळेसुद्धा आपण अप्रत्यक्षपणे सरकारला टॅक्स हा देत असूच ना? हे टॅक्स कोणकोणते असतात, वगैरे माहिती जाणकारांनी द्यावी. ज्यात अगदी अजिबात टॅक्स दिला जात नाही अशी खरेदी असते का?

मी मतदान न केल्याने मोठे नुकसान होणार आहे का? तर मी एका प्रचंड जनशक्तीचा घटक आहे आणि या जनशक्तीच्या निर्णयप्रक्रियेत माझा खारीचा वाटा आहे. पण मी त्या जनशक्तीचा हिस्सा आहे हे ठरविणे माझ्या हातात नाहीच आहे.

मग त्या न्यायाने जेव्हा स्वातंत्र्यलढा चालू होता त्यावेळी स्वातंत्र्यलढ्यात भाग नघेणारे सर्व गुन्हेगार होते?

पिवळा डांबिस's picture

24 Apr 2014 - 11:54 pm | पिवळा डांबिस

मी मतदान न केल्याने मोठे नुकसान होणार आहे का?

होय, होणार आहे!! देशाचे नव्हे, तुमचेच!! तुमचे नैतिक अधःपतन होणारच आहे. तुम्ही इतरांना काही दाखवू नका, पण एक सुशिक्षित माणूस असून तुम्ही तुमचं कर्तव्य करण्यात चुकला आहांत हे तुमचं मन तर तुम्हाला सांगणारच आहे!! आता अभिजीतवर रट्टे ओढायचं म्हणून सांगत नाही पण टीनएजर असतांना एकदा त्याने मतदान न करता इतरत्र गेला हे त्याच्या लक्षात आणि मनात अजूनही आहे!! अभिजीत, हे मी टीका म्हणून लिहित नाहीये कारण मन संवेदनाशील असल्याचं ते एक उदाहरण आहे. कीप इट अप!!!

निवडणूक प्रक्रियेबाबत उदासीन रहाता येणे - हा माझा मूलभूत हक्क आहे.
मला नाही आवडत एकही उमेदवार. मग मी कोणाला मत द्यावे अन का द्यावे?

पिवळा डांबिस's picture

25 Apr 2014 - 12:06 am | पिवळा डांबिस

निवडणूक प्रक्रियेबाबत उदासीन रहाता येणे - हा माझा मूलभूत हक्क आहे.

असं कुठे नमूद केलेलं आहे?

:D .... आता हाय म्हनलं म्हण्जी हाय!!!! बाकीची चर्चा खवत करु =))

हाहाहा नाही हो पिडां, असं मला आपलं वाटलं की "कृतीविहीनता" माझा हक्कच आहे.

पिवळा डांबिस's picture

25 Apr 2014 - 12:14 am | पिवळा डांबिस

ओके
:)

प्रकाश घाटपांडे's picture

25 Apr 2014 - 11:57 am | प्रकाश घाटपांडे

मला नाही आवडत एकही उमेदवार. मग मी कोणाला मत द्यावे अन का द्यावे?

नोटा चा पर्याय आहे ना आता!

प्रसाद१९७१'s picture

25 Apr 2014 - 12:21 pm | प्रसाद१९७१

नोटा च्या पर्याय चा काही तरी उपयोग आहे का?

असला बिन कामाचा पर्याय वापरण्यासाठी लोकांनी कशाला मतदान वापरावे.

खरे तर जितके मतदान होत नाही, ते सर्व नोटा म्हणुन च धरले जावे.

तुमचा अभिषेक's picture

25 Apr 2014 - 12:20 am | तुमचा अभिषेक

टिका तर तुम्ही केली आहेच. एखाद्याचे नाव चुकीचे घेणे या पेक्षा मोठी टिका जगात दुसरी नसावी ;)
मला तर या अभिजीत नावाची एवढी चीड आहे ना की आजवर मला हजारो जणांनी मी त्यांना लाखोवेळा सांगूनही मला करोडोवेळा अभिजीत अशीच हाक मारली आहे. आणि इथे तर "तुमचा अभिषेक" असे ठसठशीत लिहूनही. :(

आता वरच्या मुद्द्यावर,
माझे ते केवळ एक उदाहरण झाले, ते केवळ एक कारण झाले. त्या उदाहरणात जे कारण होते ते टाळण्यासारखे होते हे मला आज वाटतेय त्यामुळे येस आपण म्हणता तसे वाटतेय. पण तेव्हा त्या वयात ते मतदानापेक्षा जास्त महत्वाचे वाटले हे हे तितकेच खरेय. पण या वयाला अनुसरून वेगळे कारण घेतले म्हणजे जसे की नोकरीधंद्यासाठी मला दूरदेशी अगदी परदेशी जावे लागले तर मी कोणता पर्याय स्विकारेल? अर्थातच मतदान वगैरे करायचेय असा विचार न करता स्वताच्या करीअरसाठी निघून जाईलच. यातही आपण चुटपूट लागतेय म्हणजे मन संवेदनशील आहे असा मुद्दा काढालच पण त्याचा फायदा काय. निर्णय तर बहुतांशी जण वैयक्तिक प्रायोरटीनुसारच घेतात ना. मी गर्लफ्रेंडबरोबर फिरायला गेलो तर मी चुकलो आणि जे जास्तीचे पैसे कमवायला कुठे गेले तर त्यांचा तो नाईलाज.

पिवळा डांबिस's picture

25 Apr 2014 - 2:04 am | पिवळा डांबिस

च्यायला, म्हातारपण आलं!!!
अभिजीत नव्हे.
अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक, अभिषेक!!
आमचा!!!!!
:)

प्रकाश घाटपांडे's picture

25 Apr 2014 - 12:24 pm | प्रकाश घाटपांडे

>>टिका तर तुम्ही केली आहेच. एखाद्याचे नाव चुकीचे घेणे या पेक्षा मोठी टिका जगात दुसरी नसावी<<
मानवी मेंदु व त्याचे वर्तन यावर भाष्य करणारे मेंदुच्या मनात हे सुबोध जावडेकरांचे पुस्तक वाचले तर अनेक गोष्टींचा उलगडा होईल.
बुकगंगावर विकार मनाचे हे डॉ. हिमानी चाफेकरांचे पुस्तक आहे. त्या विषयी थोडकयत माहिती लिहिताना त्यांचा उल्लेख चक्क हिमानी सावरकर असा झाला आहे. पहा इथे http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5035230528732846862?BookNa...
एका नाटकात ( बहुतेक चि.वि.जोशींच्या) द्वारकानाथ नावाचे पात्र असते. त्याचा उल्लेख नाटकातील दुसरे पात्र हे द्वाराकाधीश असा करत असते. ते द्वारकानाथ वैतागून दुरुस्ती सुचवतात. पुढच्या वेळी या दुरुस्तीस मान देउन त्यांचा उल्लेख द्वारकापती असा व्हायला लागतो. ते चिडून परत दुरुस्ती चे भान देतात. पुढच्या वेळी त्यांचा उल्लेख चक्क द्वारपाल असा होतो. :)
एकदा इंटॅलिजंट प्रभात अशा एका इंग्रजी नियतकालिकात माझ्या आख्या ब्लॉगवर एक लेख आला. तो परवानगीसाठी मला पाठवला त्यात माझा उल्लेख प्रत्येक ठिकाणी महेश घाटपांडे असा झाला. मी त्यांना दुकीची दुरुस्ती करायला सुचवली. ओके. दुरुस्त करतो असे त्या पत्रकाराने उत्तर दिले. त्यानंतर प्रत्यक्ष प्रकाशित झाला तेव्हा परत महेश घाटपांडे. म्हणजे एवढे करुन रामाची आई सीता! :)

खटपट्या's picture

24 Apr 2014 - 11:45 pm | खटपट्या

मतदार याद्यांमध्ये घोळ घालण्याचा गुन्हा केलेल्या निवडणूक आयोगाला कोण शिक्षा करणार हे आधी क्लिअर व्हायला पायजेलाय !!!

दिव्यश्री's picture

25 Apr 2014 - 1:56 am | दिव्यश्री

.

मतदान हक्कही आहेच कि . केवळ कर्तव्य नाही .
उगीचच निवडून आलेल्या सरकारवर / नेत्यावर दोषारोप करण्यात काहीच अर्थ नाही . ज्यावेळी आपल्याला संधी मिळाली तेंव्हा आपण काय केले ? ५ वर्षांनी येणाऱ्या संधीचा पूर्ण उपयोग केला पाहिजे .
कोणी काय कराव हा वैयक्तिक / खाजगी प्रश्न आहे . पण मग अशा लोकांनी निवडून आलेल्या सरकारवर / नेत्यावर बोलण्यात काय अर्थ राहील ? त्यातल्या त्यात कमी नालायक/कमी वाईट पक्ष/उमेदवार आपण नक्कीच निवडू शकतो , आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या भवितव्यासाठी . :) मतदान मुळात ऐच्छिक असल्यामुळे कोणाला अपराधी किंवा अगदी गुन्हेगार खरच वाटेल का ?

तुमचा अभिषेक's picture

25 Apr 2014 - 9:18 am | तुमचा अभिषेक

म्हणजे बघा हं, जे मतदानाबद्दल उदासीन आहेत किंवा त्याला जास्त प्राथमिकता देत नाहीत जर त्यांनी मतदान केले तर ते चांगले नेते निवडून देऊ शकतात. आणि याउलट ज्यांना मतदानाचे महत्व समजते, जे आवर्जून मतदान करतात ते मात्र चुकीचे नेते निवडून देतात. हे लॉजिक गंडल्यासारखे नाही वाटत का?

थॉर माणूस's picture

25 Apr 2014 - 9:27 am | थॉर माणूस

हॅ हॅ हॅ...

हे बाकी आवडलं आपल्याला. ;)

हुप्प्या's picture

25 Apr 2014 - 10:31 am | हुप्प्या

आज जे लोक मत देतात वा आवर्जून मत देतात ते मतदानाचे महत्त्व जाणून मत देतात हे गृहितक चुकीचे आहे. कित्येक लोक दारूची बाटली, ५०० ची नोट असल्या मोबदल्याच्या बदल्यात मत देतात. गरीब वस्तीत अशा प्रकारे मत देणार लोक खूप असतात. अर्थात ज्यांना रोजच्या जेवणाची भ्रांत असते अशा लोकांनी लोकशाहीच्या भविष्याऐवजी दोन वेळच्या जेवणाला जास्त महत्त्व दिले तर त्यांना चूक कसे ठरवता येईल? कित्येक समाजकंटक लोक (श्यान्या गुर्जींच्या सल्ल्याप्रमाणे शाई पुसून) अनेकदा मत देतात. गैरहजर लोकांच्या जागी उभे राहून मत देतात.
जर सुशिक्षित लोक जास्त प्रमाणात मत देऊ लागले तर अशा विकत घेतलेल्या मतांचे तौलनिक प्रमाण थोडे कमी होऊन जरा जास्त योग्य उमेदवार निवडून येऊ शकतो असा एक विचारप्रवाह आहे.

तुमचा अभिषेक's picture

25 Apr 2014 - 11:03 am | तुमचा अभिषेक

खरे तर वरची पोस्ट लिहिताना हे माझ्याही डोक्यात आलेलेच.
मात्र सुशिक्षित लोक जास्त योग्य उमेदवार निवडून देतात या गृहीतकावरही शंका घेण्यास वाव आहे पण तौलनिक दृष्ट्या नक्कीच येस .

अवांतर - गरीबांना गरीब आणि अशिक्षितांना अशिक्षित ठेवण्यातच काँग्रेसच्या आजवरच्या यशाचे गुपित दडलेय तर.

हा गुन्हा वा अपराध वाटत नाही.
अधिक लोकांनी मतदान केल्याने नक्की काय फरक पडेल?

बॅटमॅन's picture

25 Apr 2014 - 12:06 pm | बॅटमॅन

रोचक!

म्ह. स्वतः मतदानासारखी सोपी प्रोसेसही न करता, शासनव्यवस्थेत कसलेही योगदान न देता वर शासनावर टीका करायची आणि ती ऐकून घ्यायची?

इतकं असेल तर मग राजकारणी लोकांनी स्वतःची वचने सांभाळली नाहीत असे म्हणण्याचा तरी नैतिक हक्क काय राहतो ओ????

चित्रगुप्त's picture

25 Apr 2014 - 9:44 am | चित्रगुप्त

मतदान न करने हा एक सामाजिक गुन्हा वा अपराध आहे का?
नाही !

प्रसाद१९७१'s picture

25 Apr 2014 - 11:49 am | प्रसाद१९७१

अजिबार गुन्हा वगैरे नाही. नैतिक दृष्टया पण काही चुक नाही.
सगळे चोर च उभे असतात, मतदान करणे म्हणजेच गुन्हा आहे अश्यावेळी. नोटा चा खरा उपयोग होईल असा कायदा झाल्याशिवाय मतदान करण्यात अर्थ नाही.

मदनबाण's picture

25 Apr 2014 - 11:19 am | मदनबाण

डांबिस काकांशी सहमत...

कालपर्यंत आमच्या घरात उभी फूट होती. २ मतं एका पक्षाला तर २ मतं दुसर्‍या पक्षाला. आणि खरं म्हणजे लढत अशी त्या दोनच पक्षात असायची. मग आम्ही विचार करायचो की एवी तेवी आमची चार मतं एकमेकांची मतं काटणारच तर आहेत, मग कशाला जा-ये करायची. ह्यावेळी मात्र पक्ष ३ झाले आणि आमच्यातील एकाने पक्ष बदलला आणि मग चकरा मारून मारून नाव नोंदणी करून, त्याची खात्री करून आम्ही मत देत्साते झालो...

पण मग कालपर्यंत आम्ही जात नव्हतो तो गुन्हा होता का?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

26 Apr 2014 - 10:32 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मग त्यातले पण १-१ क्यान्सल करून दोघांनीच जायचे ना ;-)

तुमचा अभिषेक's picture

26 Apr 2014 - 11:27 pm | तुमचा अभिषेक

हा हा भारीये हे पण ..
पण एकाने पक्ष बदलला म्हणजे तो नक्कीच आप'ला मिळाला असणार ;)
आणि तसे असेल तर इतर पक्ष धोक्यात आल्याने त्यांनी एकाला एक कॅन्सल न करता मतदान करणेच सेफ समजले असावे..

प्रसाद१९७१'s picture

25 Apr 2014 - 11:50 am | प्रसाद१९७१

ज्याला समाजासाठी काही करायचे आहे, तो ते करेल च. निवड्णुकींची वाट बघत बसणार नाही. पण कोणी स्वताचे पैसे खर्च करुन मला निवडुन द्या असे सांगत असेल तर त्याचा त्यात फक्त स्वार्थ च आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Apr 2014 - 12:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

मतदानाचा अधिकार / हक्क कायदेशीर आहे पण मतदान न करणे बेकायदेशीर नाही कारण मतदानाचा हक्क ऐच्छिक आहे, मतदान सक्तीचे नाही.

मात्र आपले भविष्य ठरविण्याचे अधिकार स्वखुषिने दुसर्‍यांच्या (मतदान करणार्‍यांच्या) हाती सोपवले असल्याने हा हक्क न बजावणार्‍यांना राजकारणाबद्दल काही बोलण्याचा नैतिक हक्क नाही.... निवडणूकी अगोदर/नंतर फुकाच्या गप्पा मारण्याचा आणि वायफळ टीका करण्याचा कायदेशीर अधिकार मात्र आहे *unknw* :(

ब़जरबट्टू's picture

25 Apr 2014 - 12:03 pm | ब़जरबट्टू

माझ्या मते गुन्हा तर नाही, पण आजकाल ज्या प्रकारे याबद्दल जागरुकता होतेय, त्यावरुन ही गोष्ट मनाला जास्त डाचते एव्हडच.
माझ्या मते जर सुशिक्षित मतदार आले, तर वर सांगितले तसे विकत घेणा-या मतांचे प्रमाण कमी होईल, तसेच असे विकतचे मत जास्त प्रभाव पाडत नाही म्हंटल्यावर यामागे होणारा काळाबाजार आपोआप कमी होणार.
दुसरे म्हणजे माझ्या मताने फरक पडतो का ? तर नक्की पडतो. नेता मंडळी पण त्यांना मिळण्या-या मताचे विश्लेषण करतातच की. निवडून आल्यावर मतांचे अंतर, विरोधी पक्षाला मिळालेली मते, ह्या सर्व बाजू नेते पण बघतात, त्यामुळे नक्की कोणते मुद्दे महत्वाचे हे तरी ध्यानात येणार ना. आज नाही पण पुढील पाच वर्षात टिकण्यासाठी काय करायला हवे, हे तुमचे मत सांगते , आणि म्हणूनच ते महत्वाचे ठरते.

यसवायजी's picture

25 Apr 2014 - 12:50 pm | यसवायजी

माझ्या मताने फरक पडतो का ? तर नक्की पडतो
डिपेंड्स. पडेलच असे नाही.
मी कुठल्या भागात/समाजात राहतो?
माझी/इतरांची जात कोणती आहे?
इतरांची आर्थीक परिस्थीती कशी आहे? ते प्रलोभनाला बळी पडतात का? - शराब्/शबाब/कबाब
उमेदवार काय लायकीचे आहेत? ते गावातला पाणी पुरवठा बंद करु शकतात का?
वगैरे..

एक साधे उदा;-
एका वर्गात २२ मुली आहेत आणी फक्त १३ मुलगे. वर्गप्रमुखाच्या निवडणुकीत दोन्हीबाजुनी १-१ उमेदवार आहेत.
सगळ्या मुलग्यांनी १००% मतदान केले तरी त्यांचा प्रतिनिधी निवडून येणारच नाही अशी त्यांना खात्री आहे. म्हणून बहुतेकांनी मतदानच केलेच नाही. आणी साहजीक एक मुलगी निवडून आली.

चूक कोणाची?
-
लोकशाही जिंदाबाद.
-

ब़जरबट्टू's picture

25 Apr 2014 - 1:21 pm | ब़जरबट्टू

मुळात मी जेव्हा "सुशिक्षित" मतदार म्हणतोय, त्यावेळी त्याने जाती, प्रलोभन, जरब याउपर विचार करावा अशी रास्त अपेक्षा आहे. मुळात बघितले तर, हाच सुशिक्षित मतदार "काय फरक पडतो या गावंढळांना, हे तेच करणार" म्हणून मतादानापासुन दूर राहतो, आणि आपसुक नेत्यासाठी हाच गरीब, जातिवंत, जरबेत वागणारा, मतदार महत्वाचा ठरतो, तुम्ही मतचा देणार नाहीये , किंवा तुमचा टक्काच कमी आहे माहित असल्यावर या नेत्यांनी तुमची कदर तरी का करावी ?

तुमच्या उदाहरणात पण उमेदवाराला महत्व आहेच. अत्यंत मंद वा लोफर मुलीला सर्व मुली मत देतीलच हे कशावरुन ? एका चांगल्या मुलाला पण मुलींची मते मिळु शकतील की. आणि तसाही आपला उमेदवार काही येत नाही हा विचार करुन मुलांनी हात मागे घेतले, तर हिच मंद मुलगी एका मताने पण निवडून येईल, कारण तिथे विरोधच नाहीये, आणि मग हीच मूले ओरडतील . सध्या तरी हेच होतेय ना ? येथे मुलांनी पुर्ण जोर लावणे महत्वाचे आहे, व मुलींनी योग्य उमेदवाराला मते देणे अपेक्षित आहे.

मृत्युन्जय's picture

25 Apr 2014 - 12:25 pm | मृत्युन्जय

माझ्यामते तरी मत न देणार्‍या लोकांना आयुष्यातल्या प्रायोरिटीज अजुन कळालेल्या नाहित. हे तेच लोक असतात जे निवडणुकीनंतर ५ वर्षे सरकारला शिव्या घालतात मग परत मत देत नाहित आणि तेच सरकार निवडुन आल्यावर परत शिव्या घालतात. अयुष्यातला सगळा नैराश्यवाद यांच्यात ओतप्रोत भरलेला असतो. काय फरक पडणार आहे हे यांचे ब्रीदवाक्य असते. मत देउन आलेल्या लोकांची टिंगलटवाळी करण्यात यांना धन्यता वाटते. यांची सगळी शक्ती "काय दिवे लावले तुमच्या सोनियाने?" किंवा " काय असा फरक पाडणार आहे तुमचा मोदी" अश्या वक्तव्यात खर्च होते. एका मताने वाजपेयी सरकार गडगडले पण अजुन या मुर्खांना एका मताची किंमत कळालेलीच नाही तर काय करणार?

आता मुख्य प्रश्नाकडे. हो. हा एक प्रचंड मोठा नैतिक गुन्हा आहे. याला ज्या दिवशी कायदेशीर गुन्ह्याचे स्वरुप देण्यात येइल (अर्थात त्यासाठी आधी संपुर्ण यंत्रणा सुधारली पाहिजे) त्या दिवशी मी खरेच पेढे वाटेन.

प्रकाश घाटपांडे's picture

25 Apr 2014 - 12:30 pm | प्रकाश घाटपांडे

मतदान सक्तीचे करणे घटनाबाह्य आहे. त्यामुळे कायदेशीर रित्या ते तसे करता येणार नाही. एखाद्याला आपला हक्क नसेल बजावायचा? हक्क आहे म्हणुन तो वापरलाच पाहिजे असे थोडे बंधन घालता येते? म्हणुन प्रबोधन हा एकमेव मार्ग शिल्लक राहतो.

पिशी अबोली's picture

25 Apr 2014 - 12:37 pm | पिशी अबोली

आपण मतदान केले नाही, आणि आपल्या नावे बोगस वोटिंग केले गेले तर?

असंका's picture

25 Apr 2014 - 1:00 pm | असंका

माझा मित्र असाच एकदा स्नानशुचिर्भूत वगैरे होउन गंध बिंध लाउन मतदानाला गेला आणि पहातो तो काय्...त्याच्या नावे आधीच कोणीतरी मतदान आटोपले होते...!

तोतया मतदान टाळायचे तर पहाटेपासून रांगेत थांबायला हवे हे आम्ही तेव्हा शिकलो...

१) आपण मतदानाच कर्तव्य इतरांकरता नाही स्वतः करताच नव्हे स्वतःच्या पुढच्या पिढीकरताही बजावतो आहोत

२) अधिकार आणि स्वातंत्र्य खरेतर जन्मसिद्ध नव्हे संस्कृतीसिद्ध असतात तुम्ही वापरल्याने सिद्ध होतात ( न वापरल्याने कळत नकळत गहाळ होण्याची प्रक्रीया होण्याची शक्यता नाकारता येत नाही)

३) जगातली कोणतीही कित्तीही अद्ययावत मतदान पद्धती वापरली तरी ती फेअर राहण्याकरता प्रक्रीयेतील त्रुटी समजून येऊन त्या दुरुस्त आणि सुविहीत राहण्या करता मतदान पद्धतीतला जो लूप पूर्ण व्हावयास हवा तो मतदान न केल्याने पुर्ण होण्याचे राहून जाते तेवढीच तोतया आणि मतदान पद्धतीतील अवैधतांना उत्तेजन मिळते.

"दुख्ख म्हातारी मेल्याचे नसते काळ सोकावतो याचे असते" ह्या म्हणीचा अर्थ ज्यांना कळतो त्यांनी (स्वत:चे मत नोटा किंवा नको असलेल्या अपक्षाला देऊन वाया घालवावे) मतदान करण्यात शहाणपणा आहे.

बाकी आपापल्या प्राधान्यता कुठे ठेवायच्या एवढा विवेक आणि सुज्ञपणा ठेऊन प्रिऑरीटी प्रमाणे वागावे.

बाकी आजच्या सकाळ मध्ये एक विकास सबनिस यांच्या रेषागिरीत एक बोलक कार्टून आल आहे. एक जोडप मतदानाच्या दिवशी बीचवर फिरायला जात, जातात तर जातात गप्पा काय मारतात तर 'एसएमएसवर मतदानाचा अधिकार का नसतो ?' :)

हाडक्या's picture

25 Apr 2014 - 4:02 pm | हाडक्या

हा चर्चा विषय आणि इथल्या प्रतिक्रिया वाचून आमच्या आवडत्या 'दक्षिण बाग ( South Park )' या मालिकेतील निवडणुकीसंदर्भातल्या भागाची आठवण झाली.. त्यातलं एक कार्टं या अभिषेकसारखाच प्रश्न विचारतं आणि आख्ख्या गावात पार हलचल होते.. त्याला गावातून साश्रुनयन तडीपार काय करतात, मग लै ड्रामा होतो.
शेवटी हा एक माणूस त्याला समजवायला जातो,
vote or die
( अश्लील भाषा आणि चित्रे ज्याना बघवत अथवा ऐकवत नाहीत अशा संवेदनशील लोकांनी लिंक उघडू नये )

हे गाणे ऐकून हे कार्टं मद्दान करायला तयार होतं आणि मग परत एकदा गावात आनंदी आनंद होतो..
मग हे गाणं ..

हे खरंतर या भागाचं तात्पर्य आहे आणि अभिषेक राव यांच्या प्रश्नाला दिलेलं उत्तर देखील,

Let's get out and vote!

माहितगार's picture

25 Apr 2014 - 4:29 pm | माहितगार

.....अशा संवेदनशील लोकांनी

इंग्रजी विकिपीडियावरील दुवा सध्यातरी सेन्सीबल आहे. Democracy is founded on one simple rule Get out there and vote हे बरोबर आहे पण मतदात्याला मत देण्यासाठी टेरराईज करण ही लोकशाही नव्हे.

मला वाटते आमेरीकेत आधी मतदात्याला रजीस्ट्रेशन करावे लागते मगच मत देता येते असे काहीसे ऐकुन आहे त्या मुळे रजीस्ट्रेशन करवून घेणे आणि मतदान घडवणे असा दुहेरी त्रास तेथे असावा त्यातून आलेले फ्रस्ट्रेशन या गाण्यात अप्रत्यक्षपणे दिसते पण चुकीच्या गोष्टीचे गाण्यातन समर्थन होतय कथेतन मतदाराला निराशाच येण अधिक संभवत. आमेरीकेत फक्त दोनच पर्याय आहेत भारतात तुम्हाला अगणित पर्यायातून एक निवडता येतो नोटा सारख वरील पैकी कोणताच नको म्हणता येत हे पर्याय आहेत त्या शिवाय बहुतांश नवमतदारांच रजीस्ट्रेश आपोआप होत .

मतदारांच्या अधिकाराच्या दृष्टीने भारतीय लोकशाही त्यातील मर्यादांसहीत मला आमेरीकी लोकशाही पेक्षा अधिक परिपक्व वाटते. Democracy is founded on one simple rule Get out there and vote हे मात्र बाकी खर

रघुपती.राज's picture

25 Apr 2014 - 5:00 pm | रघुपती.राज

मतदानाचा विषय चालु आहे म्हणून हा एक वेगळा लेख वाचा
http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/kahihi/entry/to-vote-or-not...

हाडक्या's picture

25 Apr 2014 - 5:18 pm | हाडक्या

प्रथमतः ही Satire प्रकारची विनोदी मालिका आहे हे लक्षात घ्या. मग इथे कोणी टेरराईज करून मत द्या असे म्हणत नाहीये. तो 'मत द्या नाहीतर तुम्ही गुन्हेगार, तुम्हाला कोणाला काहीही बोलण्याचा अधिकार नाही' वगैरे वगैरे प्रतिक्रियांचे प्रातिनिधिक ( अतिशयोक्त विनोदी ) रूप म्हणु शकाल फार फार तर..( की ज्यांना वैतागून तो इच्छा नसतानाही मतदान करायला गेला इत्यादि )

आपल्याकडे जरी रजीस्ट्रेशन करायची गरज नसली (तुम्ही म्हणताय तशी) तरीही मतदार यादीत नाव आहे का ते आधी पहा, मग नसेल तर धावाधाव करा हे सगळं आहेच की..

लोकशाही संसदीय चांगली की अध्यक्षीय चांगली या बद्दल मत मतांतरे असू शकतात आणि तो इथे अवांतराचा मुद्दा होइल.

प्रसाद गोडबोले's picture

26 Apr 2014 - 12:13 pm | प्रसाद गोडबोले

मतदान न करणे हा गुन्हा नाही , माझा स्वतःचा लोकशाहीवर विश्वास नाही मी जन्माला यायच्या आधी ४०-५० वर्षांपुर्वी काही मोजक्या लोकांनी मिळुन घटना लिहिली , त्यात माझा सहभाग नव्हता , त्यामुळे इतरांनी लादलेली कित्येक मते मला अमान्य आहेत .....

लोकशाही बाबत मी अबोलिशनिस्ट आहे... आपण भाड्याच्या घरात जसे भाडे देवुन राहतो तसे माझे ह्या देषातले नागरिकत्व आहे , मी रीतसर नियमांनुसार टॅक्स भरतो आणि ह्या देशात रहातो . मग हा देश कोण चालवतो कसा चालवतो , ह्याचाशी मला काही घेणे देणे नाही .( हां , जर कोणत्या पक्षाने टॅक्स कमी करु / बंद करु असे आश्वासन दिले असते तर मी नक्कीच त्या पक्षाला मतदान केले असते :P )

माझी आवडती प्रणाली आहे अनार्चिझम ...
पण दुर्दैवाने लोकांना अनाचिझम आणि केऑस मधील फरक लक्षात येत नाही आणि तो समजावुन सांगितला तरी पटत नाही .

आता हे सारे बालीश वाटत असेल बर्‍याच जणांना पण हे विचार तसे खुप जुने आहेत ....

Thoreau is sometimes cited as an anarchist. Though Civil Disobedience seems to call for improving rather than abolishing government — "I ask for, not at once no government, but at once a better government"— the direction of this improvement points toward anarchism: "'That government is best which governs not at all;' and when men are prepared for it, that will be the kind of government which they will have."

--Henry_David_Thoreau

तुमचा अभिषेक's picture

26 Apr 2014 - 12:33 pm | तुमचा अभिषेक

वेगळा आणि चांगला मुद्दा मांडलात.

आपल्याकडे लोकांनी मतदानाबाबत जागरुकता दाखवावी अशी अपेक्षा ठेवली जाते, मात्र मतदान वा निवडणूक प्रक्रिया सुधारीत आणि विश्वासार्ह बनवावी याबाबत कोणाला काही पडले नाहीये. कदाचित हे देशातील सर्वच प्रमुख पक्षांच्या सोयीचे आहे. आज व्हॉट्सअपवर मेसेज फिरत होते, मतदार राजा केलेस ना मतदान, चल मग आता फूट, पाच वर्षे तोंड दाखवायला येऊ नकोस. पाच वर्षांसाठी म्हणून एकदाच आणि एकच मत द्यायला मिळणे यामुळे आपल्या त्या मताची किंमत आपल्याला जास्त वाटते पण यात आपली किंमत नाही का घटत.

प्रसाद गोडबोले's picture

26 Apr 2014 - 12:50 pm | प्रसाद गोडबोले

मी म्हणतोय निवडणुका बिवडणुका असले काही नकोच , प्रतिकात्मक लोकशाहीही नको ....म्युचुअल को-ओपरेशन्ने राहु ... तु मला त्रास देवु नकोस मी तुला त्रास देणार नाही ... हा एकच नियम ! ( ह्याला ग्रीक फिलॉसॉफर्स "गोल्डन रुल" का असे काहीतरी म्हणतात )

अवांतर :

लाईफ ईंटरेस्टींग बनण्यासाठी त्यात रोज काही ईंटरेस्टींग घडले पाहिजे असे गरजेचे नसते. बस्स जे घडतेय ते ईंटरेस्ट घेऊन जगायचे असते.

>>>> ह्यावर खरडवही.तुन चर्चा करुयात :)

तुमचा अभिषेक's picture

26 Apr 2014 - 2:17 pm | तुमचा अभिषेक

हो आपला मुद्दा समजला होता.

माझे पुढचे लिहिलेले त्याला उत्तर वा प्रतिक्रिया म्हणून असे नव्हते तर वेगळ्या पोस्टमध्ये टंकायचा कंटाळा म्हणून त्यातच लिहिले.

सामाजिक गुन्हा किंवा अपराध नाही म्हणता येणार

परंतु आपल्या मतानूसार काही घडावे, या साठी काही प्रयत्नं करण्याची संधी चुकवली, असे म्हणता येईल.
आपण ज्याला मत देऊ तोच उमेदवार निवडून येईल असे नाही, पण तोच निवडून येणारच नाही असेही नाही.

चौथा कोनाडा's picture

9 May 2014 - 8:37 am | चौथा कोनाडा

उदबोधक चर्चा ! काही मते पटली, काही वाचून करमणूक झाली.

मिपा वरील सुप्रसिद्ध लेखकाचा लेख व त्यावरील चर्चा आठवली.

मी मतदान का करावे?

http://www.misalpav.com/node/18987

या धाग्याची आठवण झाली!

पैसा's picture

9 May 2014 - 9:51 am | पैसा

काही मते पटली, काही वाचून करमणूक झाली.

सहमत. बाकी अपराध असता तर काहीतरी शिक्षा दिली असती नाही का? सध्या तरी मत आहे म्हणून कोणाला तरी देऊया. मग ५ वर्षांनी पुन्हा विचार करू.