गरोदर निवडणूक

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
23 Apr 2014 - 4:20 pm

अजून मे महिना आणि त्याची १६ तारीख लई लांब आहेत. आणि आता कधी एकदाचं हे पोटुशा निवडणुकीचं बाळांतपण उरकून नव्या सरकारचा जन्म, त्याचं बारसं, आणि 'आईवर गेलाय अगदी...' चे नवलाईचे दिवस संपतायेत एकदाचे असं झालंय. अहो जिकडे बघावं तिकडे निवडणुकीशिवाय चर्चाच नाहीत! मागे काही दिवसांपूर्वी आमचे दुग्धदमित्र महिन्याचं बिल घ्यायला घरी आले होते. दुग्धदमित्र म्हणजे घरी दूध आणून देणारे हो; लंगोटीयार अशी मैत्रीची एक व्याख्या असू शकते तर दुग्धदमित्र का नाही? जसं जलद म्हणजे जल देणारे तसे दुग्धद म्हणजे दूध आणून देणारे. ते तसे कधीही उगवतात. महिना संपल्यावरच येतात असं नाही. कधी-कधी दोन महिने उलटून गेल्यावर ७-८ दिवसांनी अचानक रात्री १० वाजता उगवतात. तसेच ते परवा रात्री ९-१० वाजता आले. मी असह्य उकाड्यामुळे जास्तीत जास्त नैसर्गिक अवस्थेकडे नेणारी वस्त्रप्रावरणे परिधान करून टीव्हीसमोर फरशीवरच पहुडलो होतो. एवढ्या रात्री कुणी सहसा येत नाही म्हणून माझं धूड अस्ताव्यस्त पसरलेलं होतं. मी बायकोला सवयीप्रमाणे 'कटव' म्हणून खूण केली (मी दरवेळी खूण करतो पण बायकोला अजून तितकसं चांगलं जमत नाही) पण हे कम्युनिकेशन पूर्ण होण्याआधीच आमचे दुग्धदमित्र आत आले. मी कसेबसे सगळे अवयव गोळा केले आणि दात काढत "या" म्हटले. पटकन उठून आत गेलो आणि थोडेफार कपडे घालून बाहेर आलो. आमच्या या मित्राशी काय बोलायचं हा प्रश्न मला नेहमी पडतो. एरवी आमचं संभाषण फार साधं, सोपं असतं. अगदी त्या नवीन जाहिरातीतल्या बाप आणि पोरासारखं. बाप पोराला म्हणतो, "यू आर अल्मोस्ट १६ नॉऊ. लेट्स टॉक अबाऊट गर्ल्स." मुलगा बापाचा बाप असतो, म्हणतो, "या शुअर, व्हॉट डू यू वॉण्ट टू नो?". बाप खल्लास! आमचं संभाषणदेखील असंच बिलाचे पैसे त्यांच्या हातात देईपर्यंत चालतं.

"काय म्हणताय?"
"काय नाय, चाललंय नेहमीचंच..नेहमीची धावपळ..."
"हम्म्म...झालं जेवण?"
"नाही अजून, घरी जायला तासभर तरी लागेल, मग जेवण..."
"अरे बाप रे, खूपच उशीर होणार म्हणजे"
"मग काय तर...बरं, येऊ का?"
"या या"

गेली आठ वर्षे आमचं एवढंच बोलणं होतंय. अगदी हेच. काहीच फरक नाही. बाकी काय बोलावं असा प्रश्न पडत असेल तर "झालं का जेवण?" सारखा आईसब्रेकर नाही. एकदम हृदयाला जरी नाही तरी पोटाला हात घालून बोलणं सुरू करता येतं. आमच्या वॉचमनला हाच प्रश्न मी सकाळ-दुपार-संध्याकाळ विचारतो. आणि तो ही मला हाच प्रश्न विचारतो. असो. यावेळेस आमचे दुग्धदमित्र आले. स्थानापन्न झाले. त्यांना पाणी दिलं. नेहमीचे प्रश्न विचारून झाले. मनात आलं की आता हे जातील, पण नाही.

"हजार हजार रुपये" दोन्ही हाताचे पंजे उंचावत ते म्हटले.
"कसले?" मी बावळटपणे विचारले.
"रेट चाललाय. तुम्ही म्हनताल हा काय बोलतो. एक एक मत हजार हजार रुपये!"
"काय बोलता?"
"मंग, तुम्ही म्हनताल हा काय बोलतो. दोनशे कोट खर्च केले. तुम्ही काम बी करत नाई आनि सगळंच खायला बघता हे नाही पटत आपल्याला. नाही, म्हनजे, तुम्ही म्हनताल हा काय बोलतो"
"नाही, असेल हो. ऐकलं आहे असं काहीतरी"
"अवो, हायेच तर! कपबशीचा प्रचारच नाही. बशिवला घरी त्याला त्याच्याच बशीत. दिले आसतील दोन-पाच कोट. काय? तुम्ही म्हनताल हा काय बोलतो. बरं हाये का हे? शोबतं का? तुम्ही हजारो कोट खाल्ले, अजून किती वडताल? आरं काय लिमीट हाय का नाय?"
"बरोबर आहे"
"मंग, देशाचा बी विचार करताल की नाई? काई खरं नाई हे..."

आमच्या या दुग्धदमित्राने बरीच माहिती पुरवली. मी अधून-मधून "हो का?", "अररर..हे बरोबर नाही", "काय बोलता?" सारखी आश्चर्यदर्शक वाक्ये टाकत होतो. पण त्यामुळे संभाषण हळूच पोटावरून हृदयाकडे जाण्याची चिन्हे दिसत होती. नंतर नंतर "तुम्हाला म्हनून सांगतो..." अशी गुपिते ते मला सांगू लागले. अधून-मधून "तुम्ही म्हनताल हा काय बोलतो" चालूच होते. "तुम्ही म्हनताल हा काय बोलतो" हा त्यांचा तकियाकलाम होता. खरं म्हणजे मी काहीच म्हणत नव्हतो. सगळं म्हणण्याचं काम तेच करत होते.

तर असं या निवडणुकीनं सगळ्यांना पार भंजाळून सोडलंय. काही जणांना सतत टीव्हीचे सगळे न्यूज चॅनल्स सतत बघत राहण्याचा छंद असतो. निवडणुकीचा सगळा भार जणून यांच्याच खांद्यावर असतो. आणि मग तावातावाने चर्चा करायला अशी माणसं सावज हेरत असतात.

"यावेळेस नक्की बदल घडणार. या हरामखोर नेत्यांना त्यांची जागा दाखवून देईल तो. काय म्हणता?"

संध्याकाळी कार्यालयातून आल्यानंतर (झिजलेले) जोडे कढत असतांना कानावर प्रश्न आदळला. आयला, बायकोचा आवाज कसा काय बदलला? आणि तिच्याकडून प्रश्न आणि तोदेखील डायरेक्ट राजकारणावर? म्हणजे "भात हवाय का आज जेवणात?" किंवा "त्या (मैत्रिणी)ने काय सुंदर पाटल्या घेतल्या आहेत. मला नकोयत; पण काय सुंदर आहेत...जास्त महाग नाहीयेत, मला नकोयत, फक्त सांगतेय...पण काय सुंदर आहेत..." असं काही कानावर आलं असतं तर मला आश्चर्य नसतं वाटलं पण डायरेक्ट राजकारण? ज्युनियर केजीमधून डायरेक्ट आयआयटी? मी चमकून वर पाहिले. आमच्या वरचे काका कुठल्याशा मराठी चॅनलवर सुरू असणारी बाष्कळ चर्चा ऐकत बसले होते. काळवेळ बघता ते नक्कीच तहान-भूक विसरून आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत होते. कार्टून बघतांना लहान मुलांना जसा उत्साह येतो तशी त्यांची अवस्था झालेली होती. मी बायकोकडे एक कटाक्ष टाकला. बरोबर ओळखलंत, 'कटव' असाच त्या कटाक्षाचा अर्थ होता.

"हा बरोब्बर बोलतो. ऐकलं का? तो म्हणतो कोळसाप्रकरणी काळा झालेला पैसा गेला कुठे. आता उत्तर नाही यांच्याकडे. अहो, मघाशी अगदी मारामारी होते की काय अशी तुंबळ चर्चा सुरू होती. किती हा भ्रष्टाचार? आणि हे म्हणतात विकास केला. नाही, ते काही नाही. 'आप'ले सरकार सगळं स्वच्छ करणारच..."

मी टेकलो (आणि हात ही टेकले). म्हणालो, "अहो काका, 'आप' सत्तेत येईल असं वाटतं का तुम्हाला? आणि कुणीही आलं तरी एका रात्रीत सगळं बदलणार आहे का? या चर्चा तशा काही फार महत्वाच्या नसतात. चर्चा संपली की हे सगळे भांडणारे नेते एकत्र बसून मजा करतात. आणि अशी मजा जी तुमच्या-आमच्या सारख्यांच्या फक्त स्वप्नांतच येते. ते जाऊ द्या, काही चहा वगैरे घेतलात की नाही? अगं, चहा दे ना काकांना."

"नाही नाही, चहा काय पिताय आता, बघाच तुम्ही. सगळे राजकारणी भ्रष्ट आहेत. त्यांना धडा मिळेलच."

"अहो, हा भाबडेपणा झाला. दुसर्‍यांना दोष देत बसायचा आणि कृतीच्या वेळेस दुसर्‍यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवायची याला काही अर्थ नाही. सगळी जनताच भ्रष्ट आहे; नुसतं पुढार्‍यांना दोष देऊन काय उपयोग? घ्या चहा. पाणी हवंय?"

"नाही नाही, बघाच तुम्ही आता." असं म्हणून काका आधी चहात आणि पुन्हा चर्चेत मग्न झाले. मी अगदीच लिंबूटिंबू आहे हे त्यांच्या लक्षात आलं. समोरचा माणूसही तावातावाने बोलून त्यांच्या मताला दुजोरा देत असला म्हणजे मग हे काका भयंकर खुश होतात. मग अशा माणसाविषयीचं त्यांचं मत एकदम बदलतं आणि 'हुशार आहे तो!' असा त्याच्याबद्दलचा आदरदेखील तात्काळ व्यक्त केला जातो. चहा पिऊन झाला. आणि शेवटी मीच तिथून उठून आत गेलो. इतकं साधं राजकारण जमत नाही तो देशावरच्या राजकारणावर काय बोलणार? पात्रताच नाही ना!

बाकी न्यूज चॅनल्सना तर निवडणूक अक्षरशः 'चढली' आहे. केव्हही कुठलेही चॅनल लावा "बघूया, रावेर मतदारसंघात कशी लढत असेल ते..." किंवा "विकास भव्य असतो..." किंवा "रामनगर चुनावी क्षेत्र में जो मुकाबला देखने को मिलेगा वो कुछ इस प्रकार होगा..." असल्या बातम्या किंवा तावातावाने चाललेल्या चर्चा किंवा मुलाखती याशिवाय दुसरं काहीच नाही.

कार्यालयाच्या बसमध्ये मी आजकाल मुद्दाम सगळ्यात मागच्या जागेवर एकटा बसतो. शेजारी कुणी आलं की मिनिटा-दोन मिनिटात विषय निवडणुकींवर येतो.

"अरे, काही प्रचारच माहीये या वर्षी. स्लिपा पण नाही आल्या. एक लाख मतदार गायब? काय झोल आहे हा? सगळं साल्यांनी मॅनेज केलं आहे. असं कसं शक्य आहे? नाही, तू सांग ना. कसं शक्य आहे?"

"हो ना, काही कळतच नाही..."

"अरे, असं कसं कळत नाही? दहा वर्षांपासून मतदान करतायेत ना ते? मग?"

"खरंच, कसं..."

"बरं, एवढंच नाही, काही लोकांची नावं मृतांच्या यादीत? तूच सांग, काय आहे हे?"

आता मी काय कप्पाळ सांगणार, पण हा माझ्या खनपटीलाच बसला होता. अरे बाबा मी कुठून सांगू? मी तुझ्यासारखाच नोकरीवर जगतो. मिळेल ते अन्न खातो. सगळे नेते काय माझ्या कानात येऊन सांगतात की काय की आम्ही कसे एक लाख मतदार गायब केले म्हणून! पण आपला पठ्ठ्या ऐकायलाच तयार नाही. रोजच असाच त्रास व्हायला लागला. कुणी दमदाटी करून प्रश्न विचारून भंडावून सोडायचा तर कुणी 'माझ्याइतकं राजकारणातलं कुणालाच कळत नाही' असे भाव चेहर्‍यावर आणून नवनवीन थिअरीज मला सांगत बसायचा. "आसाममध्ये असं होईल, त्रिपुराचा पाठिंबा आणि आंध्रातल्या मतांचं पोलरायजेशन याचा फायदा होऊन मग ते असं होईल...." असे तार्किक अंदाज बांधून कुणी मला त्यावर प्रश्न विचारत बसायचा. शेवटी मला उबग आला आणि मी सगळ्यात शेवटच्या जागेवर बसायला सुरुवात केली. अजून तरी कुणाची वक्रदृष्टी माझ्याकडे पडलेली नाही. मे महिना संपेपर्यंत मागची जागा सोडायची नाही असे मी सध्या ठरवलेले आहे.

कुठेही चार टाळकी गोळा झाली की निवडणुकांचा विषय हमखास निघतोच. मग पुन्हा तेच दळण दळलं जातं. तेच प्रश्न, तेच सखेद आश्चर्याचे उद्गार, तेच उसासे, तीच नेहमीची आशा, मग तोच आवेश आणि शेवटी 'काही सांगता येत नाही...तो असं म्हटला, इथे त्यांची एकगठ्ठा मते आहेत...' वगैरे समारोपाचं भाषण झाल्यानंतर आपापल्या घरी निघून जायचं.

त्यामुळे 'काय म्हणते निवडणुक?' असा प्रश्न आला किंवा असा प्रश्न गरगरत येण्याची चिन्हे दिसली की मी धास्तावतो. त्यापेक्षा 'झालं का जेवण?' हा प्रश्न किती निरुपद्रवी, चिरकालीन, आणि सगळ्यांना एका पातळीवर आणणारा आहे, नाही? म्हणून आता हे बाळंतपण केव्हा एकदा आटोपतेय असं झालंय.

काल अचानक आमच्या वरच्या काकांच्या घरी काही कामानिमित्त जावे लागले. दरवाजा लोटलेलाच होता. मनात म्हटलं की बेटा, अब तो तू गया काम से. एक-दोन तास तुला आता निवडणूक पुराण ऐकूनच घ्यावं लागेल. आणि अर्धा कप सरबतामध्ये एवढी चर्चा परवडत नाही. पण काय करणार? इलाज नव्हता. मी जीव मुठीत धरून दार ढकलले आणि थोडासा आत आलो. आणि माझ्या हातापायाची सगळी बोटे एकदम तोंडात गेली. काका मंद मंद हसत टीव्हीकडे बघत होते आणि टीव्हीवर "बेबी डॉल मैं सोने दी...ये दुनिया, ये दुनिया पित्तल दी...ये दुनिया पित्तल दी" म्हणत सनी लिओन हृदयविकारक, दिलखेचक, रक्तदाबवर्धक, मधुमेहनिवारक असे नृत्य करत होती. काका तल्लीन झाले होते. काकू अर्थातच खालच्या देवळात आरतीमध्ये तल्लीन असाव्यात.

"काका?"

माझ्या तोंडून अचानक 'काका' निघाले. खरं म्हणजे मी त्यांना डिस्टर्ब करणार नव्हतो पण धक्का तीव्र होता.

"अरे, या या...ब्रेक चालू होता आणि मध्येच हे लागलं...काकू खाली गेलीये...पण खरंच आहे ना रे...ये दुनिया पित्तल दी..हेच खरं? काय?" असं म्हणून काका मस्त हसले. मी काय करणार? मी पण हसलो. अजून काय?

राजकारणविरंगुळा

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

23 Apr 2014 - 4:29 pm | मदनबाण

हा.हा.हा... :)
सनी लिऑणी णे काकांचे मणोरंजन उत्तम केले असणार ! ;)

प्यारे१'s picture

23 Apr 2014 - 4:52 pm | प्यारे१

खा स च!

नै नै म्हणत तुम्ही पण निवड्णुकीचाच विषय काढलात की हो... काय म्हणता? ;)

समीरसूर's picture

25 Apr 2014 - 11:18 am | समीरसूर

खरंच! लक्षातच नाही आलं. :-) बाकी इंटरेस्टिंग आहे तो विषय हे मान्य करायलाच हवे.

टीपः माझा खालचा प्रतिसाद "खरंच" हा पेठकरकाकांच्या प्रतिसादावर होता. खाली कसा काय उमटला माहित नाही.

आनन्दा's picture

23 Apr 2014 - 4:56 pm | आनन्दा

शेवट एकदम भारी! ये दुनिया पित्तलदी.हेच खर.

पैसा's picture

23 Apr 2014 - 5:31 pm | पैसा

मस्त आहे! खुसखुशीत निवडणुका चर्चा!

माहितगार's picture

23 Apr 2014 - 5:46 pm | माहितगार

मस्त लिहिलयत वाचताना मजा आली. वातावरण हलकं करण्या बद्दल धन्यवाद

सुहास झेले's picture

23 Apr 2014 - 7:16 pm | सुहास झेले

एकदम खुसखुशीत :)

पाषाणभेद's picture

24 Apr 2014 - 2:17 am | पाषाणभेद

एकदम खुसखुशीत!

शुचि's picture

23 Apr 2014 - 7:23 pm | शुचि

अतिशय खुसखुशीत! फुल्ल टू धमाल.

प्रभाकर पेठकर's picture

23 Apr 2014 - 7:43 pm | प्रभाकर पेठकर

अगदी मनातलं बोल्लात. मलाही ह्या निवडणूकीपेक्षा 'अंदाजांचा', आरोपप्रत्यारोपांचा, जनतेला गृहीत धरण्याचा आणि मतदारांच्या अनास्थेचा उबग आला आहे.

भाते's picture

23 Apr 2014 - 7:55 pm | भाते

मजा आली वाचायला!

समीरसूर's picture

25 Apr 2014 - 11:15 am | समीरसूर

सकाळी चहाला पितांना मोदी, केजरीवाल, राहुल हेच विषय असतात. इकडे केवढे मोठी सभा झाली; तिकडे कसा पचका झाला, तो असं म्हटला, त्याने असं केलं...अरारारारा...भुगा झालाय पार डोस्क्याचा. :-) अबकी बार, माफ भी कर दो यार...