5. स्कूटरची चोरी ! - हरवले ते गवसले का? व कसे? भाग 2

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
10 Apr 2014 - 8:47 pm

स्कूटरची चोरी! भाग २...

हरवले ते गवसले का? व कसे?

प्रत्येकाच्या जीवनात काही तरी हरवते, सटकते, चोरीला जाते अन आपल्याला त्या गमावलेल्या गोष्टींची चुटपुट लागते की हे कसे व का घडले? सोन्याची चेन व इतर दागदागिने लंपास झाल्याचे ऐकताना आपण त्या पीडित व्यक्तिला वेंधळी व बेसावध या रकान्यात टाकतो. ‘आपण नाही तसे’ असे प्रशस्तिपत्रक उगीचच घेऊन टाकतो.
काही वेळा हरवलेल्या गोष्टी अनपेक्षितपणे परत मिळतात त्याचा आनंद ती गोष्ट विकत घेताना झालेल्या आनंदापेक्षा जास्त असतो असे वाटते. नुकतीच अशी एक घटना माझ्या मुलीच्या बाबतीत मला अनुभवायला मिळाली. त्यावरून आठवले विविध असेच काही किस्से... काही हवाईदलात असताना काही त्या नंतर... एक एक करून लिहावे आणि आपल्या जीवनात असे काही घडले असेल तर आठवून त्याची उजळणी वाचकांनी करावी. ही विनंती.

चिन्मयचे अपहरण टळले.... पण...

पुढे झाले असतील आठ एक दिवस. मी काही कामाकरता पुण्यात गेलेलो होतो आणि परत येताना येरवड्याच्या गुंजन टॉकिजच्या आसपासच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल घ्यावं असं मनात म्हणत निघालो होतो. घरी परतायला जरा उशिरच झाला असं म्हणताना तो पेट्रोल पंप केव्हा गेला कळलं नाही. पुढे लोहगावच्या कँप येण्याच्या आधी नागपुर चाळीच्या भागात येरवडा गार्डरुम लागतं तिथे एक क्षणभर विचार आला की काय करावं? परत जावं मागे आणि पेट्रोल भरून घ्यावं? का जाऊ असंच पुढे? मनात म्हटलं, ‘आहे आपल्याकडे आपण पेट्रोल घेऊन ठेवलेलं आहे एका कॅनमध्ये, क्वॉर्टरपर्यंत पोहोचलो तरी खूप झालं. तिथं भरता येईल.’ आणि तशीच स्कूटर दामटत क्वॉर्टरपर्यंत आलो.
तिथे चित्र वेगळं होतं. तिथे मुलं माझी वाटच पहात होती. ‘बाबा, बाबा, चला. आज इंग्लिश पिक्चर आहे, आम्हाला आवडतो तो. आज सगळ्यांनी जायचं.’ मुलांच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावरून ‘अर्जुन ओपन थिएटर’ असल्यामुळे मुलांना कोणता पिक्चर पहायला मिळणार हे गुपित कळत असे. त्यामुळे मुलांना लगेच स्कूटरवर घालून मी जायला निघालो. पत्नीला विचारलं, ‘काय गं तुझं काय? ‘मला नाही यायचय, मला नाही इंटरेस्ट आणि असं करा मुलांना त्या तिथे ठेवा आणि परत या, मग आपल्याला थोडं बाजारात जायचय. ते घेऊन परत येऊ’ तोपर्यंत सिनेमा सुटायचा वेळ होईल. मग मुलांना घ्यायला थिएटरात जा.’
त्याप्रमाणे ‘बरं’ असं म्हटलं आणि स्कूटरवर मुलांना घेऊन एअरफोर्सच्या क्वॉर्टरच्या कँपमधून एअरफोर्सच्या मेन एरियातील मार्शल ऑफ एयर फोर्स अर्जुनसिंहांच्या नावावरून ठेवलेल्या नावाच्या ओपन एअर थिएटरला गेलो.
मार्शल ऑफ दि एयर फोर्स

तेथे खूप लोकांना लांबपर्यंत बसायची जागा, ऑफिसर्ससाठी वेगळी बसायची सोय, अती गर्दी नाही. प्रत्येकाला बसायला ऐसपैस जागा. स्कूटर पार्क केली. जवळ-जवळ दिड-दोनशे स्कूटर्स तिथे लागलेल्या होत्या. जागा मिळेल तिथे स्कूटर पार्क केली. मुलांनी पटकन धावत जाऊन तिकिटं काढली आणि आम्ही थिएटरात सिनेमा पाहायला बसलो.
सिनेमा चालू झाला होता. मी दहा-पंधरा मिनिटं तो सिनेमा पाहिला. आधी पाहिला असल्यामुळे मला त्यात एवढा रस नव्हता. मी चिन्मयला म्हटलं, ‘बसा रे तुम्ही मी आलो. थोडसं घरातलं काम करून तुम्हाला घ्यायला येईन पुन्हा’ तर तो माझ्याकडे न बघता, ‘बरं, बरं’ असं म्हटला आणि सिनेमा पहाण्यात रंगला. नेहाने ‘बाबा खायला दे ना काहीतरी’ असं म्हटले. त्यांच्याकरता दिलेला डबा तिच्या हातात सोपावला आणि थोडेसे पैसे दिले. मग तिचा चेहरा उजळला. मी घरी आलो. तोपर्यंत पत्नी हातात सामानाची यादी, पैसे आणि पिशव्या घेऊन तयारच होती. आल्या पाऊली आम्ही पुन्हा एअरफोर्सच्या शॉपिंग कॉंप्लेक्समध्ये गेलो. अर्धा पाऊण तासानंतर सगळं संपवून परत घरी आलो. इथं तिथं करेपर्यंत पुन्हा मुलांच्यासाठी त्या ओपन एअर थिएटरमध्ये जायची वेळ आली. मी निघालो, पार्किंग पुन्हा करण्याकरता तेथे बऱ्याच स्कूटरमध्ये जागा शोधली. मध्येच एके ठिकाणी दिसली जागा. त्याठिकाणी स्कूटर पार्क केली. हेल्मेट त्याच्यावरच ठेऊन मी मुलांच्याकडे गेलो. तो सिनेमा नेहमीप्रमाणे संपला आणि त्या थिएटरमधून बाहेर पडण्याकरता म्हणून निघालो आणि तेवढ्यातच लाईट गेले. एकदम अंधार झाला, समोरच काही दिसेना. तरी सुध्दा रस्ता थोडासा पायाखालचा असल्यामुळे प्रत्येकजण हळूहळू त्या गर्दीच्या बरोबरच फाटकाकडे निघाला. असं करत-करत आम्ही स्कूटर पार्किंगच्या एरियामध्ये आलो आणि प्रत्येकजण आपापल्या स्कूटरकडे निघाला. मी स्कूटर शोधायला म्हणून बघायला लागलो, तर मला जरा गोंधळल्यासारखं झालं. स्कूटर नक्की कुठे लावली हे काही आठवेना. त्याकाळी बजाजच्या स्कूटर इतक्या असायच्या अन् सगळ्या एकसारख्या दिसणाऱ्या होत्या. होता-होता मला कोणीतरी म्हटले, ‘अरे इथं हेल्मेट कोणाचं आहे? म्हणून त्याने त्याच्या स्कूटरवर ठेवलेलं हेल्मेट असं वर धरलं आणि नेहा ओरडली, ‘ये तो हमारा है!‘ असं म्हणून ती पटकन तिथे गेली. तिनं बघितलं जाऊन तर ते हेल्मेट माझचं होतं. तिकडे कसं गेलं. ‘पता नही. यहाँ मेरे स्कुटरपर रखा था!‘ असं म्हणून तो त्याची स्कूटर घेऊन निघुन गेला. होता, होता सगळ्या स्कूटर्स गेल्या. मी आणि माझी मुलं आणि हातात हेल्मेट असं उभे राहिलो आणि काय करावं ते सुचेना. अगदी तेवढ्यात लाईट आले. पहातो तो फक्त मी माझ्या स्कूटरविना उभा!
‘पटकन जवळच असलेल्या गार्डरूमपाशी चला’ असं मुलांना म्हटलं. मुलं म्हणत होती, ‘बाबा स्कूटर गई कहाँ? आप को ठिक तरह से याद नही कहा रखी थी आपने?’ मी म्हटलं, ‘अरे आता ते विचारायला वेळ नाहीये. चला पटकन’ म्हणून आम्ही गार्डरूमपाशी पोहोचलो आणि ‘मे आय हेल्प यु’ विंडो समोर ऊभा राहिलो. त्या तेथे कोणीतरी बोलताना ऐकलं. ‘हा हा, एक हरे रंग की स्कूटर थी और पता नही हमने ध्यान नही दिया लेकिन उसपर बडे-बडे अक्षरों में लिखा था नंबर और वो जल्दबाजी में एकदम चले गए। उनके हाथ में और कुछ था’!
मी सहज ते कुठल्या स्कूटरबद्दल बोलतायत ते कान देऊन ऐकलं. त्या फॅमिलीतल्या मॅडमनी मला पाहिलं, ‘अरे स्क्वाड्रन लीडर ओक! तुम्ही? तुम्ही काय करताय इथे? मी त्यांना विचारतोय, ‘तुम्ही काय करताय इथे? ते होते स्क्वाड्रन लीडर रवी महाजन आणि मिसेस महाजन! त्यांची पत्नी अलकाची मैत्रिण. ‘अहो आता आम्ही गावातून परत येत होतो. क्वॉर्टरमध्ये आत यायच्या आधी एक स्कूटर अशी जोरात आमच्या फाटकातून बाहेर आली अन निघून गेली. हे तिकडे दरवाजा उघडाय म्हणून गेले होते. पण मी पाहिलं की, स्कूटर हिरव्या रंगाची असावी आणि नंबर काही लक्षात नाही आला पण ती खूप मोठी-मोठी अशी अक्षरं होती.’
मी म्हटलं, ‘MHT -1240?’
‘हो-हो बरोबर तीच असं त्या म्हणाल्या आणि मला खात्री पटली. मी म्हटलं, ‘अहो माझी स्कूटर चोरीला गेलीय. तिच्या शोधासाठी गार्डरूममध्ये आलोय.’ तोपर्यंत रवि म्हणाले, ‘अरे आमच्या घराचे कुलूप तोडलेले होते. दरवाजा उघडाच होता. आम्ही आत जाऊन लाईट लावून सगळं पाहिलं तर माझं काही काही साहित्य गायब, कॅमेरा, टिव्ही हे सगळं गायब आणि ते आमच्या डोळ्यादेखत चोर पळवून गेला. वेळ काही फार झालेला नाही आणि ते पाहिल्याबरोबर आम्ही तसेच गार्डरूमध्ये येऊन रिपोर्ट करायला आलोय.’ मी माझ्याबाबतची गोष्ट सांगितली आणि एकदम एअरफोर्सचे पोलीस कामाला लागले. त्यांनी ताबडतोब जीप काढली आणि दोन्ही बाजूचे गेट बंद करण्याची आज्ञा दिली. त्यामुळे लोहगाव कारागृहाच्या बाजूचा गेट होते तो बंद केले गेले. लोहगाव गावात जाण्यासाठी म्हणून एक रस्ता होता त्याच्यावर गेट नव्हते पण त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी माणसं धावली. आम्ही एका जीपमधून निघालो. कुठे जावं, कुठल्या बाजूला आधी जावं, हा प्रश्न निर्माण झाला. मी पटकन म्हणालो की यांनी जर माझी स्कूटर पळवली असेल तर मला खात्री आहे की ती स्कूटर आसपासच कुठेतरी असणार. कारण त्या स्कूटरमध्ये इतकं कमी पेट्रोल आहे की इथून जिथे पहिला पेट्रोल पंप आहे त्या गुंजन टॉकिजपर्यंतसुध्दा ते पोहोचू शकणार नाहीत. असं मी म्हणेपर्यंत येरवड्याच्या कारावारासाजवळ असलेल्या गेटपर्यंत पोहोचलो. रस्त्यावर लक्ष होतच परंतु काही दिसलं नाही. गेटवर गार्डींग करणाऱ्या सार्जंटला विचारलं, ‘काय रे अशी काही स्कूटर जाताना दिसली का? तो आपलं नेहमीप्रमाणे ‘नाही माहित सर’, म्हणाला.
तोपर्यंत दरवाजा बंदही झालेला होता आणि प्रत्येक जाणाऱ्या-येणाऱ्याचं चेकिंग चालू होतं. आम्ही तिथे बोलतोय तेवढ्यात एक सतरा-अठरा वर्षांचा तरूण मागून आला आणि मिनिटभर आमचं ते बोलणं ऐकून एकदम पटकन म्हणला, ‘अंकल, कॅन आय हेल्प यू? व्हॉट यू आर सर्चिंग?’ ‘माझे वडील बसमधून खाली उतरले आणि केंद्रीय विद्यालय दोनच्या – (आताच्या ‘सेव्हन टेट्रा’ गेटच्या) आसपासच्या जागेतून पायवाटेवरून जात असताना त्यांना कॉंग्रेस गवताच्या झुडुपात एक स्कूटर आडवी तिडवी टाकून दिलेली आढळली. म्हणून माझे वडील घरी आले आणि त्यांनी मला पिटाळलं गार्डरूममध्ये सांगायला की एक अशी बेवारस स्कूटर त्या पायवाटेवर पडली आहे म्हणून.’
वेळ न घालवता आम्ही तात्काळ गेलो आणि रस्त्यापासून पंधरावीस फुटावर पायवाटेच्या एका भागात स्कूटर अशीच लुडकून पडलेली पाहिली. त्याच्यावरचा नंबर पाहताच ही माझी आहे हे समजायला वेळ लागला नाही. मी स्कूटर ऊभी करून हातात घेतल्यावर मला हायसं वाटलं. परंतु स्क्वाड्रन लीडर महाजनांना त्यांच्या गेलेल्या सामानाविषयी चिंता लागून राहिली. चोर तर सापडले नाहीत परंतु माझी स्कूटर मात्र माझ्या हातात मिळाली. त्यात पटकन कोणीतरी आपल्या स्कूटरमधून पेट्रोल काढून माझ्या स्कूटरमध्ये पेट्रोल भरल्यावर माझी स्कूटर अगदी पहिल्या किकला स्टार्ट झाल्यावर मी घरी परतलो. माझ्या स्कूटरचा हॉर्न खराब झाला होता. वाटेल तशी टाकून दिल्यामुळे 2-3 पोचे आले होते आणि मुख्य म्हणजे त्यादिवशी काहीना काही कारणांनी मी पेट्रोल न भरल्यामुळे पेट्रोल संपले म्हणून चोरांनी ती वाटेत टाकावी लागली, म्हणून वाचली अन मला वापरायला, चालवायला हातात आली होती! असे म्हणून मी समाधानी होतो.
हे काम कोणाचं असेल याचा मी विचार करू लागलो. एकमेकांशी चर्चा करीत असताना मला आमच्या क्वॉर्टरमधून पळून गेलेल्या त्या नोकराची आठवण झाली आणि मी त्यांना त्या व्यक्तीच्या शोधार्थ एअरफोर्सच्या पोलिसांना कामाला लावले. शेवटी सिव्हील कंप्लेट झाली आणि बाहेरचेही पोलीस शोधकार्यासाठी लागले. दोन महिने निघून गेल्यानंतर आमच्या घरात काम करणारी बाई म्हणायला लागली, ‘माझा नवरा रोज रात्री या इथे येतो. मला अगदी पक्की खात्री आहे. दारूच्या बाटल्या आणतो त्या ज्या बायका आहेत त्या बायकांच्याकडे रंगरलिया करतो. त्यांच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे’ असे ती सांगत असे. परंतु त्या सर्वंट क्वॉर्टरमध्ये जाऊन पाहण्याचा प्रसंग आला की तो नेमका निघुन गेलेला असे. असे काही वेळा झालं. त्यावर मी स्वतः लक्ष ठेऊन होतो. एक दिवशी असाच हसण्याचा आवाज आल्याबरोबर मी गार्डरूमला फोन करून पाच-सहा लोकांना आमच्या क्वॉर्टरच्या पळून जाण्याच्या रस्त्यावर दबा धरून बसायला सांगितले आणि त्या मोलकरणीच्या दरवाजावर पोलिसांनी ठक ठक केल्यावर एकदम धावाधाव झाली आणि एक व्यक्ती मागच्या दरवाजाने गेली. तो जो पळून गेला तो दबा धरून बसलेल्या लोकांना आवरता आला नाही. त्यानंतर त्याचे त्या क्वॉर्टरमध्ये येणेसुध्दा बंद झालं.
पुढे झालं असं की एक दिवशी हेअर कट घेऊन स्कूटर चालू करायला गेलो पण लॉक उघडेना. पुन्हा पुन्हा स्कूटरचं लॉक उघडण्याचा प्रयत्न करत होतो. त्या लॉकशी कोणीतरी बळजबरी केल्याने त्यातील लीव्हर तुटून गेलेले असल्यामुळे ती चावी त्यात जात नव्हती. ती वाकड्याने मानेने स्कूटर तशीच ठेऊन मी लोहगावातील किल्ली बनवणाऱ्या माणसाला बोलवून नवी किल्ली बनवली आणि सावध झालो की माझ्या अपरोक्ष त्या नोकर माणसाने पुन्हा एकदा स्कूटर पळवून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या घरातल्या प्रत्येक कुलुपाची चावी, घराची चावी त्याने डुप्लिकेट केली होती म्हणून सगळी कुलुपं बदलेली होती. तरीसुध्दा स्कुटरचं कुलुप बदलले नव्हते. ते बदलायला मला तो दिवस उजाडला! असं झालं अपहरणाचं ....... आणि स्कूटरची चोरी!
स्कुटर परत मिळाल्यामुळे माझं नुकसान झालं नाही परंतु महाजनाचा बऱ्याच हजारांचा ऐवज मात्र गेला. त्यांची बोअरची एक बंदुक, टि.व्ही. आणि कॅमेरा अशा काही मोजक्या वस्तुंची किंमत त्या काळात हजारोंच्या घरात होती. पुढे काही महिन्यानंतर त्या पकडलेल्या माणसाला कोर्टात ऊभे करण्यात आलं. महाजनांनी त्याच्याविरूध्द साक्ष देऊन मोक्कामध्ये त्याला अडकवून तो बरेच काळ कैदेत होता. असं म्हणतात तो इतका चलाख होता की ज्या वेळेला तो साक्ष द्यायचा त्या वेळेला तो स्वतःच्या डोळ्यात मुद्दाम अणकूचीदार शस्त्र खुपसून घेऊन न्यायाधीशांच्या समोर आपल्याला पोलिसांनी किती मोठ्या प्रमाणात मारलेलं आहे, असा आभास निर्माण करे!
त्यानंतर त्या घरकामवाल्या बाईंनी मला सांगितले की, ‘साहेब मी आता इथून निघून जाते. कोणालाही कळू देऊ नका मी कुठे गेलीय.’ मी म्हटलं, ‘तुला कुठे पोहोचवायचं?’ त्यावर ती म्हणाली, ‘ते मी ठरवीन.’ नंतर एक दिवशी तिला गाडीमधे घालून शनिवारवाड्याजवळील एका गल्लीच्या तोंडाशी सोडलं. ती म्हणाली, ‘खूप उपकार केलेत. आता स्वतःची काळजी घ्या. माझं काय बरं वाईट झालं तरी मागे पाहणारं कोण आहे?’ असं म्हणून तिची ती छोटी मूर्ती दिसेनाशी झाली. त्यानंतर पुढे तिचा व त्याचा कधी संबंध आला नाही.
अशी ही चिन्मयच्या अपहरणाची आणि स्कुटरच्या फसलेल्या चोरीची हवाईदलातील पुण्यातील पहिल्या पोस्टींगमधे घडलेली त्या दिवसांची आठवण, धन्यवाद.
भाग 2 समाप्त
...पण मला त्यावेळी कल्पना नव्हती की एक मोठे वादळ घोंगावत येतय. माझ्या दिशेने...

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

शशिकांत ओक's picture

17 Apr 2014 - 12:59 am | शशिकांत ओक

या धाग्यातील कथानकात स्कूटर हरवली पण गवसली. मात्र मिसळपावच्या विविध धाग्यांच्या जंजाळात या धाग्यावर प्रतिसाद गवसत नाही!

दोन्ही स्टोरीज जबराटच आहेत.. शशिकान्त'जी!!!... आत्ता वाचतानाच अंगावर शहारे आले.. तुम्ही तर प्रत्यक्ष अनुभवलंय!!!.. अनपेक्षितपणे मौल्यवान गोष्टींची चोरी वगैरे झाली, की कित्येक दिवस मन उदास असतं....

बाकी तो अणकुचीदार शस्त्राने स्वतःचे डोळे फोडून घेणारा आरोपी महान-विकृतच असला पाहिजे... अर्थात एक "विंग कमांडर" म्हणून तुम्हाला याहीपेक्षा भयानक लोकांना आणि वृतींना तोन्ड द्यावे लागले असेल!!!!......

____________

सध्या अंनिस'ने ज्योतिषांना दिलेले चॅलेंज ... शेवटी फुसका बार ठरले... त्याच पार्श्वभूमीवर सध्या "प्राचार्य अद्वयानंद गळतगे" यांचे "विज्ञान आणि चमत्कार" हे पुस्तक वाचतेय... अतींद्रिय शक्तींचे इतके जिवंत अनुभव येऊन सुद्धा बरेच महमूर्ख सुशिक्षित त्याला अजून अंधश्रद्धाच म्हणतात.. हे पाहून त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते....... :) :)

मृगनयनी, माझाही ज्योतिषावर विश्वास होता अन आहे पण बराचसा डळमळीत झालेला आहे. याचे कारण हेच की जर ज्योतिषावर विश्वास ठेवायचा तर "कालसर्प योग/ अंगठी/ खडे/ गंडे/ नवस" यांवर ठेवायचा का? आपली मर्यादा/ रेघ कुठे आखायची.

बरं ज्योतिषावर विश्वास ठेवणारे बहुसंख्य लोक हे "वास्तुदोष/भूतेखेते" आदिंवर विश्वास ठेवतात. या गोष्टी लहानसा विचार करण्याच्या लायकीच्या देखील आहेत असे आपल्याला वाटते का? अर्थात मला या गोष्टींवर अजिबात विश्वास तर नाहीच पण या अडाणीपणाची चीडच आहे. चीड कारण माझे वैयक्तिक नुकसान या असल्या अंधश्रद्धांनी झालेले आहे.

आपण ही रेघ कुठे अन का आखता ते कळले तर आनंद होईल.

आत्मशून्य's picture

21 Apr 2014 - 9:34 pm | आत्मशून्य

बरं ज्योतिषावर विश्वास ठेवणारे बहुसंख्य लोक हे
"वास्तुदोष/भूतेखेते" आदिंवर विश्वास ठेवतात.

होय. भूतेखेते असतात. त्यांच्या नादी उगाच लागू नका, त्रास होइल भुतांना. वासतुड़ोशाचे तसेच आहे म्हणा.

मृगनयनी's picture

21 Apr 2014 - 11:17 pm | मृगनयनी

मृगनयनी, माझाही ज्योतिषावर विश्वास होता अन आहे पण बराचसा डळमळीत झालेला आहे. याचे कारण हेच की जर ज्योतिषावर विश्वास ठेवायचा तर "कालसर्प योग/ अंगठी/ खडे/ गंडे/ नवस" यांवर ठेवायचा का? आपली मर्यादा/ रेघ कुठे आखायची.

बरं ज्योतिषावर विश्वास ठेवणारे बहुसंख्य लोक हे "वास्तुदोष/भूतेखेते" आदिंवर विश्वास ठेवतात. या गोष्टी लहानसा विचार करण्याच्या लायकीच्या देखील आहेत असे आपल्याला वाटते का? अर्थात मला या गोष्टींवर अजिबात विश्वास तर नाहीच पण या अडाणीपणाची चीडच आहे. चीड कारण माझे वैयक्तिक नुकसान या असल्या अंधश्रद्धांनी झालेले आहे.

आपण ही रेघ कुठे अन का आखता ते कळले तर आनंद होईल.

Live in the Fear of God

शुचि, तुमचा बराच गोन्धळ झालेला दिसतोये. अनेक गोष्टींची सरमिसळ मेन्दूत झाल्यामुळे बर्‍याचदा आपल्या सदसद्विवेकबुद्धीला खरंच त्रास होतो. :)

मुळात ज्योतिष-शास्त्र हे एखाद्या व्यक्तीचे भविष्य बिलकूल बदलवू शकत नाही.. फक्त ज्योतिष-शास्त्रामुळे पुढे घडणार्‍या घटनांची त्या व्यक्तीला थोडीफार कल्पना येते. आणि ज्या काही चांगल्या घटना असतील.. त्यांच्यासाठी ती व्यक्ती मनाने खूप आनंदी होते... व त्या व्यक्तीकडून आनंदी स्थितीमध्ये कॉन्फिडन्टली बरीचशी कामे- दैनंदिन कामातली असो वा इतर काही महत्वाची असोत... ही खूप पॉझिटीव्हली केली जातात. अश्यावेळी "ज्योतिष" हे त्या व्यक्तीला मोटीव्हेशनली खूप सपोर्ट करते.
आणि पुढे घडणार्‍या वाईट घटनांचा जर ज्योतिषाकडून मागमूस लागला, तर ती व्यक्ती मनाची तयारी करू शकते. किंवा त्या व्यक्तीकडून कळत- नकळत घडणार्‍या वाईट गोष्टींच्या होणार्या परिणामांचा अंदाज आल्यावर ती वाईट कृती नक्कीच टाळू शकते.

पर्पजफुली घातलेले- योग्य त्या प्रकारचे अंगठी, खडे, गंडे-दोरे वगैरे गोष्टी थोड्याफार प्रमाणात सुरक्षाकवचाचे काम करतात. "मी अमुक ग्रहाची अंगठी घातलेली आहे".. किंवा "अमुक बाबा-बुवाचा गंडा घातला आहे" .. "त्यामुळे आता माझं खूप छान होणार आहे..." या गोष्टी देखील एकप्रकारचा मोटीव्हेशनल पार्टच असतात. कमकुवत झालेल्या मनाला जेव्हा एका पॉझिटीव सपोर्टची गरज असते. तेव्हा तो सपोर्ट हे अंगठी, खडे, गंडे देतात. फक्त चुकीच्या माहितीआधारे चुकुनही चुकीची रत्ने, धागे वगैरे वापरू नये.. उचित रत्ने वगैरे..या सर्वांचा पॉझिटीव परिणाम हा जर २०% होणारा असेल, तर चुकीच्या स्टोन्स किंवा धाग्यामुळे होणारा वाईट परिणाम हा ८० % असतो.

"कालसर्पयोग" हा एखाद्या व्यक्तीच्या कुन्डलीत असला, तर ज्योतिषी त्र्यंबकेश्वर किंवा गोकर्ण'ला जाऊन पूजा करून घ्यायला सांगतात. अर्थात त्यामुळे कालसर्पयोगाचे काही दुष्परिणाम माईल्ड होऊ शकतात.. किन्वा जे काही भोग असतात.. ते सहन करण्याचे धैर्य त्या व्यक्तीच्या अंगी येते. मुळात "कालसर्पयोग" ज्या व्यक्तीच्या कुन्डलीत असतो.. ती व्यक्ती मागील जन्मी त्याच घराण्यात जन्मलेली असते. पूर्वजन्मी कळत-नकळत घडलेल्या पापांमुळे किंवा पेन्डिन्ग राहिलेल्या काही भोगांमुळे ते कर्म किंवा राहिलेले एखादे सर्कल पूर्ण करण्यासाठी ती व्यक्ती पुन्हा त्याच घराण्यात जन्म घेऊन अर्धे राहिलेले कार्य पूर्ण करते. किंवा मग राहिलेला भोग पूर्ण करते. कारण राहू- केतू या ग्रहांच्या मध्ये जेव्हा कुन्डलीत सर्व ग्रह येतात.. तेव्हा तो "कार्लसर्पयोग" बनतो. असे १२ प्रकारचे आहेत. त्या त्या व्यक्तीच्या कर्माप्रमाणे कालसर्पयोगाची फळे मिळतात.
या योगामुळे बर्‍याचदा अश्या व्यक्तींना इतरांपेक्षा दु:ख जास्त असते.. परन्तु या दु:खाचे कारणही त्या व्यक्ती स्वतःच असतात.

वास्तुशास्त्राला सध्या बरेच पेव फुटल्यामुळे अनेक अर्धवट लोक देखील त्यात स्वतःचे हात पिवळे करताना आढळतात. अर्थात त्यामुळे हे पुरातन शास्त्र बदनाम होते. १०० तज्ज्ञ १०० गोष्टी सांगतात.. त्यामुळे साहजिकच कुणाचीही चिडचिड होणे साहजिकच आहे. त्यातून वास्तुशास्त्राच्या काही चुकीच्या वस्तू वापरल्या गेल्या.. तर मात्र १०० % नुकसान होते....हे खरे... उदा. हात वर केलेला लाफिन्ग बुद्धा जर बेडरूममध्ये असेल.. तर मग डायवोर्स ठरलेला आहे.. :( किंवा ईशान्येला जड लोखंडी वस्तू ठेवल्या... तर कुटुम्बातल्या सर्वांचीच प्रगती थांबते.. शिक्षणात अडथळे येतात.... इत्यादि.....

शुची.. आपण म्हणता.. की आपले वैयक्तिक नुकसान या असल्या अंधश्रद्धांनी झालेले आहे... तर मग बेटरली आपण सध्या कुणाच्याही नादी लागू नका.. (देवावर विश्वास असेल, तर)..
जे कुणी आपले एकच आराध्य दैवत असेल.. त्याची मनापासून उपासना करा. कारण शंभर दगडांवर पाय ठेवला, की त्यामुळे फायदा तर काहीच होत नाही.. अपरंपार नुकसान मात्र होते. त्याचप्रमाणे देवांचे आहे.
शंकराची उपासना केली.. आणि गणपतीची नाही केली.. तर त्याचा मुलगा म्हणून गणपती नाराज होईल. आता गणपतीची प्रार्थना केली.. आणि देवीची नाही केली.. तर गणपतीची आई.. म्हणून ती नाराज होईल...असा विचार करणे मूर्खपणाचे आहे. .सगळ्या देवांची स्तुती करण्यापेक्षा एकाच दैवताची प्रार्थना करा. तुमच्या सगळ्या भावना, इच्छा, आकांक्षा.. फक्त त्याच दैवताच्या चरणी अर्पण करा.. तुम्हाला त्या दैवताचे जे रूप आवडेल.. ते रूप इन्टरनेटवर किंवा मोबाईल मध्ये स्टोअर करा.. आणि त्याचे अखंड ध्यान ठेवून दिवसातली प्रत्येक कृती त्याच्याचरणी अर्पण करा... बघा... तुम्हाला खूप आनन्दित वाटेल...
हाही एक मोटीव्हेशनलच पार्ट आहे... आपल्या आजूबाजूला आसमन्तात असलेल्या दैवी शक्तीला किंवा पॉझिटीव एनर्जीला आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी देवाचे सगुण रूप पाहता पाहता त्याकडे एकाग्र होणे / मन एकाग्र करणे महत्वाचे असते.

अर्थात याचा अर्थ तुमचे काही वाईट भोग असतील..ते संपतील असे नाही... पण जे काही आहे.. ते तुम्ही खूप बॅलन्स्ड राहून आणि आत्मविश्वासाने हॅन्डल करू शकाल.... आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल.... वाईट गोष्टींवर मात करण्यासाठी.. आणि चांगल्या गोष्टी अधिक चांगल्या बनवण्यासाठी :)

सविस्तर उत्तराबद्दल अनेक धन्यवाद मृगनयनी. परवाच एका हौशी अभ्यासकाने माझ्या मुलीच्या कुंडलीत कालसर्प योग आहे असे सांगीतले. त्यामुळे हे सर्व प्रश्न डोक्यात आले.

जे कुणी आपले एकच आराध्य दैवत असेल.. त्याची मनापासून उपासना करा.

सोलह आना सच्ची बात!!

प्रत्येक कृती त्याच्याचरणी अर्पण करा... बघा... तुम्हाला खूप आनन्दित वाटेल...

होय हेच आचहरणात आणू इच्छिते. कायेनवाचा मनसैंद्रियेर्वा ......

कमकुवत झालेल्या मनाला जेव्हा एका पॉझिटीव सपोर्टची गरज असते.

मृगनयनींनी म्हटल्याप्रमाणे याच थीम वर कादंबरी आहे.

मृगनयनी's picture

22 Apr 2014 - 5:36 pm | मृगनयनी

Its my pleasure... शुचि.. :)
Good Luck!!!! :)

मृगनयनी जी, आपल्या प्रतिसादात आपण विविध गोष्टींचा आढावा घेतला आहेत. त्याबाबत धन्यवाद.
१. स्कूटरची चोरी - हवाईदलातील संरक्षित क्षेत्रात असे प्रकार घडतात याची नंतर खूप चर्चा झाली व अनेक सुधारणा केल्या गेल्या. असो.

याहीपेक्षा भयानक लोकांना आणि वृतींना तोन्ड द्यावे लागले असेल!!!!..

२. होय.... पण तो या धाग्याशी संबंधित नाही म्हणून लिहित नाही. झलक म्हणून सांगतो... नवी दिल्लीत सेक्युरिटी ऑफिसर म्हणून असताना एकदा मला एका ऑफिसरने घाईघाईने येऊन म्हटले की माझ्या घरी आज लोक मला जिवे मारायला येणार आहेत म्हणून तुझे रिव्हॉल्हर (मित्र म्हणून) मला दे! ... तसे करणे शक्य नव्हते ... हवाईदलातील काही चलाख पोलिस साध्या वेषात दबा धरून बसून तशी वेळ आली तर तुझ्या मदतीला येतील म्हणून मी धीर दिला. रात्री हवाईदलाचे फाटक व बॅरियर तोडून लोक आले. त्याच्या घरात दरवाजा तोडून घुसले. मुलीला बाहेर काढा. वगैरे बरीच बाचाबाची झाली अन् गोळीबार झाला.... मात्र आमच्या पोलिसांनी त्वरा करून त्या व्यक्तीला पकडले. अन सिव्हील पोलिसांत दिले... काही दिवसांनी मला विवाहाचे निमंत्रण आले. पाहतो तो जो पकडला गेला होता तोच माझ्या मित्राचा जावई झाला होता.... असो.

"विज्ञान आणि चमत्कार" हे पुस्तक वाचतेय... अतींद्रिय शक्तींचे इतके जिवंत अनुभव येऊन सुद्धा

विज्ञान आणि चमत्कार ग्रंथांच्या वाचकांना गंभीर सूचना
३. हा धागा वाचला असाल तर त्यांच्या कडकपणे म्हणण्याचे प्रत्यंतर इथल्या इथे विविध धाग्यातून वाचायला मिळते याचे प्रत्यंतर येते.

अंनिस'ने ज्योतिषांना दिलेले चॅलेंज ... शेवटी फुसका बार ठरले...

४. हमखास विजयी व्हायची खात्री असेल तर ते अशा भानगडीत पडतात. काऱण अशा कसोट्यात उत्तर आधीच ठरलेले असल्याने आपटी खायची भिती नसते. असो. ते महर्षींच्या नादाला लागत नाहीत कारण त्याची तेथे जाहीर नाचक्की होते. मग कोण वाटेला जाईल. द्या सोडून ...

नवी दिल्लीत सेक्युरिटी ऑफिसर म्हणून असताना एकदा मला एका ऑफिसरने घाईघाईने येऊन म्हटले की माझ्या घरी आज लोक मला जिवे मारायला येणार आहेत म्हणून तुझे रिव्हॉल्हर (मित्र म्हणून) मला दे! ... तसे करणे शक्य नव्हते ... हवाईदलातील काही चलाख पोलिस साध्या वेषात दबा धरून बसून तशी वेळ आली तर तुझ्या मदतीला येतील म्हणून मी धीर दिला. रात्री हवाईदलाचे फाटक व बॅरियर तोडून लोक आले. त्याच्या घरात दरवाजा तोडून घुसले. मुलीला बाहेर काढा. वगैरे बरीच बाचाबाची झाली अन् गोळीबार झाला.... मात्र आमच्या पोलिसांनी त्वरा करून त्या व्यक्तीला पकडले. अन सिव्हील पोलिसांत दिले... काही दिवसांनी मला विवाहाचे निमंत्रण आले. पाहतो तो जो पकडला गेला होता तोच माझ्या मित्राचा जावई झाला होता.... असो.

हहा हहा!!!... रहस्यमय जावई आणि छुपे रुस्तुम सासरे बुवा!!!!!! :)

बाकी सर्व म्हणणे पटले!!! ...