गोची...

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
7 Apr 2014 - 5:07 pm

संध्याकाळची वेळ... साधारण साडेसहा-पावणेसातचा सुमार. मी माझ्या नेहमीच्या बस स्टॉप वर उभी होते. काही वेळाने बस आली आणि मी बसमध्ये चढले. चक्क पुढचा स्टॉप येण्यापूर्वी बसायला जागा सुद्धा मिळाली. कंडक्टर साहेबांना पास दाखवून नेहमीप्रमाणे बॅगमधून पुस्तक काढलं आणि वाचू लागले. साधारण एखादा स्टॉप मागे पडला असेल आणि शेजारी उभ्या बाईकडे लक्ष गेलं. ती गर्भवती असल्याचं दिसत होतं. अर्थात राखीव जागेवर ती बसू शकली असती, पण तोवर बसमध्ये चांगलीच गर्दी झाली होती. कदाचित धक्के खात पुढे जाण्याऐवजी इथेच थांबावं, असा विचार तिने केला असावा. तिच्याकडे बघताच मी पुस्तक आत ठेवलं आणि उठून तिला बसायला जागा करून दिली.
मी माझ्या विचारात होते. थोड्या वेळाने त्या बाईने मला विचारलं, कुठे उतरणार? मी स्टॉप सांगितला, तर ती म्हणाली, मी सुद्धा तिथेच उतरणार आहे. अजून बराच वेळ लागेल पोहोचायला. तुम्ही बसा ना. मी म्हटलं, मी ठीक आहे, तुम्ही बसा निवांत. तरी तिचा आग्रह सुरूच, अहो खरंच बसा ना... मी म्हटलं, अहो ऑफीसमध्ये बैठं कामच असतं. आता उभी राहू शकेन मी. तुम्ही खरंच बसा.. पण ती पुन्हा मला बसायची विनंती करू लागली. मी खरं तर वैतागलेच. मनात म्हटलं, सांगतेय ना बसा म्हणून. आता तुम्ही निवांत प्रवास करणं जास्त महत्त्वाचं आहे.. कसं कळत नाही काही बायकांना.. उपकार नाहीत हे... वरकरणी मात्र तिला हातानेच बसा, असं सांगत मी पुढे.. खूप पुढे जाऊन उभी राहिले.
दोन दिवसांनी पुन्हा हाच प्रसंग... हाच क्रम... या वेळी मात्र मी तिला बसायला जागा दिली आणि ती काही बोलण्यापूर्वीच पुढे जाऊन उभी राहिले... चक्क दुर्लक्ष केलं मी...
त्यानंतरचा दिवस.. वेळ... सकाळची.. मी नेहमीप्रमाणे वाचनात दंग... साधारण अर्ध्या तासानंतर माझ्या शेजारी बसणाऱ्या बाईने मला शुक-शुक म्हणून हाक मारली. मी वर पाहिलं, तर तीच बाई... मी हसले आणि विचारलं... मागेच चढलात का तुम्ही... त्यांनी होकार दिला आणि म्हणाल्या, मला ना, तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मी म्हटलं, बोला ना.. मनातून मी ही साशंक.. आता काय आणखी.. तर त्या बाई आणखी खालच्या आवाजात म्हणाल्या, अहो, मी प्रेग्नंट नाही... तुम्हाला तसं वाटलं, म्हणून मला बसायला जागा देत होता का...
बाप रे... माझा चेहरा पडल्याचं त्यांनाही जाणवलं असावं... मी घाईघाईत त्यांना तीन-चारदा सॉरी म्हणाले... त्यावर त्या म्हणाल्या, तुम्हाला कसं सांगावं, तेच कळत नव्हतं.. आणि भरलेल्या बसमध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न करावा, तर तुम्ही दोन्ही वेळा निघुनच गेलात... खरं तर मलाच सॉरी म्हणायचंय... तुम्हाला विनाकारण उभं राहावं लागलं... मला फार ओशाळल्यासारखं झालं हो, तुम्ही प्लीज पुन्हा अशा उठू नका...

इतकं बोलुन त्या बाई उठल्या आणि पुढच्या स्टॉप वर उतरल्या... विचार करता करता माझ्या लक्षात आलं की त्या बाई आज अगदी सुरूवातीपासून माझ्याच बाजूला बसल्या होत्या. बहुतेक त्यांचा स्टॉप जवळ आल्यावर त्यांनी शब्द जुळवत मला सर्व सांगितलं आणि चटकन उतरूनही गेल्या... नकळत माझ्याही ओठावर हसू उमटलं...

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

इरसाल's picture

7 Apr 2014 - 5:39 pm | इरसाल

माफ करा, पण पुढच्या वेळेस प्रेग्नंट असल्याशिवाय भेटु नका म्हणा. ;)

पिलीयन रायडर's picture

7 Apr 2014 - 5:42 pm | पिलीयन रायडर

अरे बापरे.. गोची झाली खरी तुमची..

हल्ली हा एक प्रॉब्लेम होतो खरा माझाही.. नक्की प्रेग्नंट आहे की नाही ते कळत नाही आणि उगाच आपण "कितवा" विचारायला जावं न तिने कसनुसा चेहरा करावा हे बरंही वाटत नाही..

मितान's picture

7 Apr 2014 - 5:44 pm | मितान

होता है होता है ;)

रेवती's picture

7 Apr 2014 - 6:13 pm | रेवती

आईग्ग! खरच गोची!

चौथा कोनाडा's picture

7 Apr 2014 - 6:13 pm | चौथा कोनाडा

छान खुसखुशीत किस्सा ! मी ही असल्या गोचीला सामोरे गेल्याची आठवण झाली !

बॅटमॅन's picture

7 Apr 2014 - 6:15 pm | बॅटमॅन

आयला =))

लैच खंग्री गोची की होऽ म्हणतो मी =))

सहीच किस्सा.

आयुर्हित's picture

7 Apr 2014 - 6:18 pm | आयुर्हित

यापुढे जागा द्यायच्या आधी विचारायलाच हवे "काय ताई/माई/बाई/बाबा, कितवा महिना सुरु आहे?"

काय ताई/माई/बाई/बाबा, कितवा महिना सुरु आहे?

नै म्हंजे आयुर्वेद ही जगातली सर्वश्रेष्ठ उपचारपद्धती असली तरी बाबांना बाळंत करण्याची क्षमता अजून तीत नाही असे वाटते. चूभूद्याघ्या.

विचारलेच तर एक तर बाबा हसेल तरी(किंवा हसून मुद्दा टाळेल) किंवा आपले बोलणे त्याच्या वर्मी तरी लागेल!

आयुर्वेद ही जगातली सर्वश्रेष्ठ उपचारपद्धती आहे हे जाहीर मान्य केल्याबद्दल कोणीतरी संबंधित धन्यवाद देईलच!

पण माझे कुठल्याही उपचारपद्धती बद्दल वाईट मत नाही आहे.
वेळेला जी कोणती उपचारपद्धती उपयोगी येईल तीच खरी उपचारपद्धती!

आयुर्हित म्हणजे आयुष्याचे/जीवनाचे हित या अर्थी हा शब्द आहे.

"पण माझे कुठल्याही उपचारपद्धती बद्दल वाईट मत नाही आहे.
वेळेला जी कोणती उपचारपद्धती उपयोगी येईल तीच खरी उपचारपद्धती!"

हे मात्र अगदी खरे हों.

कवितानागेश's picture

7 Apr 2014 - 7:26 pm | कवितानागेश

गमतीदार. माझी एक मैत्रिण कायम असा गोंधळ घालते. तिला वाचायला देते हे. तिला धीर येइल! ;)

रामदास's picture

7 Apr 2014 - 9:48 pm | रामदास

हा लेख पलीकडच्या कप्प्या ऐवजी या कप्प्यात टाकला असेल का ? असा गमतीदार विचार मनात आला.

बॅटमॅन's picture

8 Apr 2014 - 12:42 am | बॅटमॅन

सहमत.

ह्यु ग्रांट आणि सँड्रा बुलक यांच्या 'टू विक्स नोटिस' मधला हा सीन आठवला.

खटपट्या's picture

8 Apr 2014 - 1:37 am | खटपट्या

मस्त!!!

तर अंमल बजावणी न केल्याबद्दल आभार्स.

आणी हो, मला हे लिखाण अतिशय रद्दड वाटले. (पण हे सार्वजनीक मत न्हवे.)

हाहाहा, जाडी होती का ती बाई? पण गरोदरपणीचा गरगरीत घेर कळतो की. :)

माधुरी विनायक's picture

9 Apr 2014 - 2:43 pm | माधुरी विनायक

सर्व प्रतिक्रियांचे (लिखाण रद्दड वाटले, असे सांगणाऱ्यांचेही) मन:पूर्वक आभार...लेखाचा कप्पा चुकला नाही... चुकवलेलाही नाही... आणि हो, त्यानंतरही त्या बाईंशी हसरी नजरभेट होत असते अधून-मधून..:-)

तुमचा अभिषेक's picture

9 Apr 2014 - 2:50 pm | तुमचा अभिषेक

लोल
फनी आहे खरे

पण बिचारी ती बाई,
जनरली बायका आपल्या फिगरबद्दल कॉन्शिअस असताना अशी एखादी प्रेग्नंट नसतानही वाटत असेल तर बिचारीला ते तसे कबूल करताना कसे वाटले असेल ..

पैसा's picture

9 Apr 2014 - 5:16 pm | पैसा

मस्त किस्सा! तुमच्यापेक्षा त्या बाईंची जास्त गोची झाली वाटतं!

शैलेन्द्र's picture

9 Apr 2014 - 7:33 pm | शैलेन्द्र

छान किस्सा..