तीर्थरूप

बिपिन६८'s picture
बिपिन६८ in जनातलं, मनातलं
7 Apr 2014 - 4:07 pm

"तीर्थरूप" ८ जून 2012

तीर्थरूप या शब्दाचा अर्थ आहे जन्मदाते म्हणजेच "वडील"

तीर्थरूप म्हणजे जे तीर्था समान आहेत ते ! हिंदू धर्मात तीर्थ हे सर्वात पवित्र आणि अनेक जन्माचा उद्धार करणारे मानले जाते, त्याच प्रमाणे वडील हे आपल्या मुलांचा त्या जन्माचा उद्धार करतात म्हणून वडिलांना तीर्थरूप हा शब्द !
पण आज काल या शब्दाचा उपयोग जेंव्हा विनोद निर्मिती करिता होतो आणि ,आणि जेंव्हा या शब्दावरून झालेले विनोद ऐकतो तेंव्हा खरेच काळजात चर्र..होते, असे विनोद करणाऱ्या लोकांच्या अकलेची कीव येते.
वडिलांबद्दल फार कमीच लिहिले जाते ...घरातले ते एक असे व्यक्तिमत्व ज्यामुळे घराला आधार मिळतो पण असे असून सुद्धा वडील हे नाते आपल्याकडे गृहीत धरलेले आणि दुर्लक्षित...इंग्रजी मध्ये ज्याला "Thankless Job"म्हणतात तसे. याची सुरुवात अगदी पुराण काळात झालेली आणि नंतर इतिहासाने त्याचीच री ओढत पुढे साहित्याने आणि चित्रपट सृष्टीने ती परंपरा पुढे चालू ठेवण्यात धन्यता मानली!!

आई म्हणजे जर दिव्याची ज्योत असेल, जी पूर्ण घराला प्रकाश देते तर वडील म्हणजे समई, त्याची जबाबदारी ज्योती ला आधार देण्याची...समई चे स्वतःला चटके बसवून घेण्याचे दुख: आपल्याला कधीच कळत नाही.

प्रत्येक ठिकाणी वडील या नात्यावर असाच नकळत अन्याय झाला आहे ...

कर्णाला नेहमी हिणविण्या करिता "सूतपुत्र" या शब्दाचा वापर झाला, पण जेंव्हा त्याचे उदात्तीकरण करायची वेळ आली तेंव्हा शब्द आले "कौन्तेय" आणि "राधेय"!! आपल्या पैकी किती लोकांना माहिती आहे वडील सारथी होते आणि ज्यांच्या मुळे कर्णाला सूतपुत्र म्हंटले गेले, त्या सारथ्याचे नाव अधिरथ होते, कर्णाला वाढविण्यात जेवढा राधे चा वाटा आहे कदाचित त्याहून थोडा मोठा वाटा अधीरथा चा कर्णाला धनुर्धारी करण्यात होता...पण दुर्देवा ने अधीरथा च्या वाटेला फक्त उपेक्षा आली.

इतिहास कारांनी श्री कृष्णा च्या बाबतीत देवकी आणि यशोदेला जेवढे महत्व दिले तेवढे वसुदेवाला न देवून त्यांच्यावर अन्यायच केला आहे...श्री कृष्णा ला पाण्यातून डोक्यावर टोपलीत नेणारा वसुदेव , त्या पुढे सामान्य माणसाला वसुदेवाची ओळख नाही..खरे तर "दिलेला शब्द पाळणारा" किंवा " सत्यवचनी " म्हणून धर्मराज अर्थात युधिष्ठर सर्वाना परिचित पण तसा वसुदेव किती जणांना परिचित आहे?

येशू ख्रिस्था च्या बरोबरीने मदर मेरी चे स्थान समाजात आहे पण सेंट जोसेफ जे येशू ख्रीस्था चे वडील ज्यांचा उल्लेख बायबल मध्ये गुणवान , पुण्यवान , सत्वगुण असलेला , सदाचरणी माणूस म्हणून केलेला आहे, त्यांच्या बाबतीत माहिती किती लोकांना आहे?

जिजाई नि शिवाजी महाराजांना घडवले यात वादच नाही, पण त्याच वेळेस शहाजी राजांची विजापूर दरबारात होणारी ओढाताण लक्षात घेवून, शहाजी राजांना शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत किंवा यशात जेवढे द्यायला पाहिजे तेव्हडे स्थान आपण देतो का?

आई घराचे मांगल्य असते तेंव्हा वडील घराचे अस्तित्व असतात? पण दुर्दैवाने अस्तित्व संपल्या नंतरच अस्तिव नसल्याची जाणीव होते, पण त्या वेळेस खरे तर खूप उशीर झालेला असतो.

असे असून सुद्धा या अस्तित्वा बद्दल कधीच आम्ही का बोलत नाही?

पडलो किंवा खरचटले कि लगेच तोंडातून निघत "आई गं!" पण मोठे संकट आले कि " बाप रे!" असे उद्गार तोंडातून निघतात. कारण छोट्या संकटांसाठी आई आठवत असली तरी मोठी वादळे पेलताना बाबांची साथ लागते, हा जगाचा नियम आहे....

मुलांच्या जन्माच्या वेळेस आईनि भोगलेल्या शारीरिक यातनेची आम्ही जाणीव ठेवतो, पण त्याच वेळेस दवाखान्यात अस्वस्थ पणे येर झार्या घालणार्या वडिलांच्या मनस्थिती ची जाणीव आपल्याला नसते, पण आपला समाज हे वडिलांचे दुख: समजूनच घेत नाही.

या सगळ्यात कुठेही आईचे महत्व कमी करायचा प्रयत्न नाही..खरे तर ते कमी होऊ पण शकत नाही...पण त्याच वेळेस वडील या नात्याला थोडासा न्याय मिळायला हवा असे सारखे मनात येते.थोडे आठवून पाहायचा प्रयत्न करा- वडिलांची महती सांगणाऱ्या कविता, गाणी, श्लोक...आठवताहेत नाही ना??

आपल्या साहित्यातील आत्मचरित्रे वाचून बघितले तर लक्षात येईल , बहुतेक ठिकाणी स्वतःचे मोठे पण सांगताना लहान पणी वडिलांनी केलेला अन्याय सांगून नकळत त्यांना खलनायक बनवून स्वतःकडे वाचकांची सहानभूती घेण्याचा प्रयत्न करीत असतात..असे करून आम्हाला काय मिळते? लहान पणी वडील तसे का वागले याचा शोध घेण्याचा प्रयत्न कधी केला का?? खरेच वडिलांना तसे वागण्यात आनद मिळत होता का ? याचा विचार का करीत नाहीत ? हे असे लिहिणारे लोक सोईस्कर पणे Genetics चे नियम विसरतात...

बरेच ठिकाणी वडिलांचे जे चित्र रेखाटले आहेत ते तापट, व्यसनी किंवा मारझोड करणारे...समाजात ५-१०% असे असतीलही, पण बाकी ९०% चांगल्यांचे काय?

साहित्यात याला काही अपवाद आहेत जसे की व पु नि लिहिलेले "व पु सांगे वडिलांची कीर्ती"
किंवा कविते च्या बाबतीत सांगायचे तर " दमलेल्या बाबाची कहाणी" असे मोजकेच अपवाद... पण दुर्दैवाने बाकी सगळ्या ठिकाणी एकवचनी अनादार्थी उल्लेख !!!!
आपल्या बाल पणाच्या कष्टाला किंवा परिस्थिती ला वडिलांना जबाबदार धरताना, आपण कधी त्यांच्या बाल पणाच्या परिस्थिती चा विचार करतो का? आपण हा विचार करीत नाही जरी आपण बाल पणी कष्ट भोगले असले तरी सुदैवाने आपल्या तरुणपणी तरी आपल्याला चांगला काळ पाहायला मिळाला?पण वडिलांचे काय? त्याचा तर उमेदीचा काळच कष्टात गेला ना? बाल पण तर त्याहून वाईट हालाखीतच...
चित्रपटात तरी काय चित्र वेगळे? बहुतेक ठिकाणी वडील हे पात्र विनोद निर्मिती करण्या करिता वापरलेले,नाहीतर लाचार किंवा खलनायकी...असे किती चित्रपट आहेत ज्यात कर्तुत्ववान आणि प्रेमळ पिता दाखवलेला आहे. त्या उलट आई बद्दल - अमिताभ ची आई म्हंटले की लगेच निरुपा रॉय डोळ्या समोर...थोडी आधुनिक आई म्हणजे रीमा लागू?? कर्तुत्ववान आई म्हणजे नर्गिस "मदर इंडिया"
असे किती अभिनेते वडील म्हणून डोळ्यासमोर येतात? वडिलांच्या संदर्भात लक्षात राहणारे चित्रपट म्हणजे, ज्यात वडील आणि मुलात विसंवाद..जसे कि - शक्ती, बागबान किंवा दबंग.हिंदी चित्रपटात "मेरे पास मा है" हा संवाद जसा गाजला तसाच वडिलांच्या बाबतीत "मेरा बाप चोर है" हे दोनही संवाद एकाच चित्रपटातील..पण केवढा हा विरोधाभास...इथे वडिलांबद्दलचा हा संवाद त्यांची लाचार परिस्थिती सांगण्या करिता वापरलेला खरेच का वडील एवढे लाचार असतात ? नक्कीच नाही...आणि कधी परिस्थिती मुळे झाले तरी ते केवळ कुटुंबा च्या भल्या करिता!!! पण दुर्दैवाने पुढील आयुष्यात कुटुंब बहुतेकदा हे सोयीस्कर पणे विसरते.. हा कदाचित एक त्या नात्याला शाप असावा!!!!

का यां चित्रपटसृष्टीला कर्तुत्ववान वडील दाखविता येऊ नयेत?
लहान पणी मुल आजारी पडले किंवा काही त्रास झाला तर बरेचदा आई रडून मोकळी होते , पण वडिलांना परिस्थिती संयमाने हाताळावी लागते ..खरे तर रडणाऱ्या पेक्षा समजावणाऱ्या वरच ताण जास्त पडतो..

पुढे मुलीच्या लग्नात तरी काय वेगळे घडते?

मुला मुलींच्या शिक्षणा करिता झटणे, शाळा, कॉलेजेस चे उंबरठे झिजवणे...वेग वेगळ्या क्लासेस ना मुलांना पाठविणे आणि त्यातच नोकरीची दोरीवराची कसरत करण्यात आयुष्याची उमेदीची वर्षे संपतात, आणि तशात जमा खर्चाचा ताळ मेळ जोडता जोडता आयुष्याची संध्याकाळ होते, मुले पायावर उभी राहिली आणि आता ते आपली जबादारी घेतील या एका आशेवर आयुष्याच्या संध्याकाळ ला सामोरे जायची तयारी करत असतात, पण या स्वप्नाचा सुखद शेवट प्रत्येक वडिलांच्या नशिबी नसतो... पण आपले प्राक्तन म्हणून तशाही परिस्थितीला सामोरे जातात

आपल्या समाजाने पण सतत वडील या नात्याची उपेक्षाच केली आहे...असे किती सण आहेत की जे वडिलान करिता आहेत? कोणी म्हणेल दिवाळी पाडवा...पण खरे तर तो सण त्यांच्या पेक्षा जास्त आई,लेकी आणि बायको करिता महत्वाचा....लग्नात विहिणीची पंगत असते...मान वराच्या आईचा...वडिलांचे काय?

एका वाचलेल्या कवितेची नकळत आठवण झाली, त्यात खरेच हि व्यथा किती थोडक्यात सांगितली आहे

“कळत नाही बापाचं मन स्वतः बाप झाल्याशिवाय,
बापमाणूस असतो तो, बापांशिवाय कळणार कसा ?
असतं न्यारंच रसायन, त्याची फोड उकलत नाही,
म्हणून तर बापावर कविता कोणी करत नाही...”

या नात्याला हे जे सगळे शाप आहेत त्यांना उशा:प देण्याचा आपण सगळ्यांनी थोडा तरी प्रयत्न करावयास हवा..

"कौसल्ये चा राम जरी म्हंटले गेले तरी, दशरथ राजा चा मृत्यू पुत्र वियोगाने झाला हे आपण विसरून चालणार नाही!!!”

बिपीन कुलकर्णी

साहित्यिकविचार

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

7 Apr 2014 - 4:15 pm | आत्मशून्य
बिपिन६८'s picture

8 Apr 2014 - 10:17 am | बिपिन६८

अप्रतिम रचना आहे या गाण्याची … आणि सलिल च्या आवाजाने जादू केली आहे

बिपिन

विनोद१८'s picture

7 Apr 2014 - 5:59 pm | विनोद१८

धन्यवाद बिपीन कुलकर्णी.

एका चांगल्या विषयावर / बहुतांशी दुर्लक्षित वडिलांवर धागा काढल्याबद्दल. तळ्मळ जाणवली, जणु काही आमच्या मनातलेच विचार आपण व्यक्त केलेत असे वाटले. याचे स्वागत व्हायला हवे.

बिपिन६८'s picture

8 Apr 2014 - 10:19 am | बिपिन६८

धन्यवाद

तुमचा अभिषेक's picture

7 Apr 2014 - 6:16 pm | तुमचा अभिषेक

या नात्याला हे जे सगळे शाप आहेत त्यांना उशा:प देण्याचा आपण सगळ्यांनी थोडा तरी प्रयत्न करावयास हवा

पण कुठेतरी हेच या नात्याचे वेगळेपण आहे असेही वाटते.

असे म्हणतात की मुलींना वडिलांचा लळा मुलांच्या तुलनेत जास्त असतो. पण मुलांना स्वता बाप झाल्यावर मात्र आपला बाप काय होता हे सर्वात जास्त चांगले समजते.

तुमचा अभिषेक's picture

7 Apr 2014 - 8:32 pm | तुमचा अभिषेक

हे वरच्या प्रतिसादात नमूद करायचे राहिले होते :)

काल रात्रि तुमचा ब्लोग वाचला..
सुन्दर लिहिले आहे....

अर्धवटराव's picture

7 Apr 2014 - 7:37 pm | अर्धवटराव

हृदयस्पर्षी लेख हो बिपीनदा. खुप आवडला.

बाकी आमचे तिर्थरूप लेखात वर्णन केलेल्या कुठल्याच साच्यात बसत नाहित.
आयला... टायगर एव्हढा म्हातारा झाला..पण टेरर कमि व्हायचं नाव नाहि :) लाचारी-बिचारी तर फार लांब राहिलं...
पण वडिलांनी झाल्लेल्या खस्ता हा युनिव्हर्सल विषय असावा. आमच्या वडिलांनी जे काहि केलं परिवारासाठी..तेव्हढं मी करु शकेन काय शंका वाटते. योग्य कौसिलिंगची गरज पडते तेंव्हा बापासारखा गुरु नाहि. घराबाहेरच्या जगासाठी बाप कसाहि असो, घरात बाप नावाचं रसायन कॉमन कोड ऑफ कंडक्ट फॉलो करतं असं माझं निरिक्षण आहे.

बिपिन६८'s picture

8 Apr 2014 - 10:20 am | बिपिन६८

योग्य कौसिलिंगची गरज पडते तेंव्हा बापासारखा गुरु नाहि. घराबाहेरच्या जगासाठी बाप कसाहि असो, घरात बाप नावाचं रसायन कॉमन कोड ऑफ कंडक्ट फॉलो करतं

-----एक्दम सहि

मस्त लेख... बापाचा महिमा आहेच तसा.

बिपिन६८'s picture

8 Apr 2014 - 10:20 am | बिपिन६८

धन्य्वाद

काही ऋणं ऋणंच रहावीत. फेडता येत नाहीत, येऊच नयेत.

लेख आवडला.

सुबोध खरे's picture

8 Apr 2014 - 9:41 am | सुबोध खरे

सुंदर लेख

वडिलांचे ऋण फेडणे शक्यच नसते…. आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना आनंद आणि आधार देवून…. ऋणातून उतराई करायचा फक्त प्रयत्न आपण करू शकतो

रामदास's picture

7 Apr 2014 - 9:40 pm | रामदास

पण ही कविता वाचताना नेहेमी ते आठवतात.
And you, my father, there on the sad height,
Curse, bless, me now with your fierce tears, I pray.
Do not go gentle into that good night.
Rage, rage against the dying of the light. -

बिपिन६८'s picture

8 Apr 2014 - 10:24 am | बिपिन६८

छान आहे कविता

प्रभाकर पेठकर's picture

8 Apr 2014 - 1:50 am | प्रभाकर पेठकर

वडिल .. एक अव्यक्त भावनांचे भांडार.

फाटका गंजीफ्रॉक, शर्टाच्या विरलेल्या कॉलर्स, झिजलेल्या चपला, अंगावर काढलेली बारीकसारीक आजारपणं, आईला आणलेली गजरा/वेणी, शालेय जीवनातील वह्यांचा कोरा वास, दिवाळीतील सुगंधी तेल, मोती साबणाचा सुगंध आणि पहिली सदनिका (फ्लॅट) घेतली तेंव्हा कौतुकाने पाठीवर फिरलेला त्यांचा हात........ ह्या सर्वांत वडीलांच्या आठवणी दडलेल्या आहेत.

बिपिन६८'s picture

8 Apr 2014 - 10:26 am | बिपिन६८

अगदि खरे आहे

स्मिता चौगुले's picture

8 Apr 2014 - 10:00 am | स्मिता चौगुले

वर म्हणल्या प्रमाणे, <<"असे म्हणतात की मुलींना वडिलांचा लळा मुलांच्या तुलनेत जास्त असतो" >> हे मात्र अगदी खरं..

<<<फाटका गंजीफ्रॉक, शर्टाच्या विरलेल्या कॉलर्स, झिजलेल्या चपला, अंगावर काढलेली बारीकसारीक आजारपणं, आईला आणलेली गजरा/वेणी, शालेय जीवनातील वह्यांचा कोरा वास, दिवाळीतील सुगंधी तेल, मोती साबणाचा सुगंध>>> +++१११

हे अगदि सगळ्यांसोबत सारखेच घडते..:)

स्मिता चौगुले's picture

8 Apr 2014 - 10:03 am | स्मिता चौगुले

वर म्हणल्या प्रमाणे .."असे म्हणतात की मुलींना वडिलांचा लळा मुलांच्या तुलनेत जास्त असतो" हे मात्र अगदी खरं..

"फाटका गंजीफ्रॉक, शर्टाच्या विरलेल्या कॉलर्स, झिजलेल्या चपला, अंगावर काढलेली बारीकसारीक आजारपणं, आईला आणलेली गजरा/वेणी, शालेय जीवनातील वह्यांचा कोरा वास, दिवाळीतील सुगंधी तेल, मोती साबणाचा सुगंध" +++१११

हे अगदि सगळ्यांसोबत सारखेच घडते..:)

आमच्या नानांइतका निर्व्याज माणूस मी उभा जन्मात पाहिला नाही. रागीट माणूस मनाने अधिक नितळ असतो असा माझा आपला एक आडाखा आहे. त्याची सुरूवात माझ्या वडिलांच्या उदाहरणापासून होते. वयात आलेल्या मुलाना मित्राप्रमाणे मानताना देखील उगीच त्यांचे बरोबर पोरकट मात्र व्हायचे नाही याचा समतोल त्यानी खास प्रयत्न करावे न लागता साधला. माझ्या तरी आयुष्यात मला सर्वात प्रिय तेच होते इतके की त्यांच्या निर्गमनानंतर ही स्वप्नात त्यांची अनेक वेळा भेट झाली आहे.
( मी वर गेल्यावर माझ्या मुलींचा ही हाच अभिप्राय माझ्या संबंधी यावा म्हणजे मानव जन्माचे सार्थक झाले असे म्हणेन)

प्रभाकर पेठकर's picture

8 Apr 2014 - 2:25 pm | प्रभाकर पेठकर

'देहदान' करा. ह्याहून उदात्त आणि अभिमानास्पद प्रतिसाद मुलींचे येतील.

अत्रन्गि पाउस's picture

8 Apr 2014 - 4:02 pm | अत्रन्गि पाउस

रागीट माणूस मनाने अधिक नितळ असतो

अत्यंत अंतर्मुख झालोय हे वाचून....बर्याच गोष्टींचा पुन:विचार करायला लावणारा पोइंट

ओल्द मोन्क's picture

8 Apr 2014 - 3:45 pm | ओल्द मोन्क

उत्तम लेख !!!