पहिला दिवस…महाविद्यालयातला!

भाते's picture
भाते in जनातलं, मनातलं
7 Apr 2014 - 2:28 pm

दहावीचा निकाल लागल्यावर चिंता, काळजी आणि ऊत्सुकता होती ती महाविद्यालयाची. मध्यमवर्गीय कुटुंबांतुन आलेला असल्यामुळे तोपर्यंत माझे जग फक्त शाळा आणि घर इतकेच मर्यादित होते. महाविद्यालयात पाऊल टाकेपर्यंत मला त्या बाहेरून गोंडस पण आतुन भयानक असलेल्या जगाची कल्पनाही नव्हती.

बरोबर कोणीही मित्र नसल्याने मी घाबरतच पहिल्यांदा महाविद्यालयात पाऊल ठेवले. माझ्या स्वागतासाठी तिकडे एक चौकडी माझी वाट पहात ऊभी होती. तिन मुलं आणि एक मुलगी. एकाने हसत मला माझे नाव विचारले. घाबरतच मी त्यांना माझे नाव सांगितले. दुसरा, इतरांकडे पहात म्हणाला, "मराठी!" मी काहिही न बोलता फक्त मान डोलावुन होकार दिला. तिसरा बाकीच्यांकडे पहात मला म्हणाला, "टाईमपास सिनेमा पाहिला असशीलच ना तु?" माझ्या ऊत्तराची वाट न पहाता पहिला माझ्याकडे बघुन म्हणाला, "दगडू शाळेत शिपायासमोर प्राजक्ताला म्हणुन दाखवतो तो संवाद म्हणुन दाखवं बघू!" माझ्या डोळ्यात आता पाणी आले होते. रडायला तर येत होतं पण सगळ्यांसमोर मी रडूही शकत नव्हतो. इतकी चेष्टामस्करी करूनही त्यांचे समाधान झाले नसावे. दुसऱ्याने त्या चौकडीतल्या मुलीकडे पहात, आपल्याकडचे पेन माझ्यासमोर धरत मला सांगितले, "आता हे गुलाब तिला देऊन १४३ म्हणुन दाखवं बघु." इतका वेळ डोळ्यांत दाटलेले अश्रु आता माझ्या गालांवरून ओघळू लागले होते. बहुदा त्या मुलीला माझी दया आली असावी. आपल्या मित्रांकडे पहात ती हसुन म्हणाली, "जाऊ द्या रे त्याला. नविन आहे तो." एकाने माझ्या खांद्यावर हात ठेवत मला सांगितले, "आता चांगली तयारी झाल्याशिवाय पुन्हा इथे येऊ नकोस, समजलं! जा आता." दोन्ही हातांनी डोळे पुसत मी तिकडुन निघुन गेलो. थोडया अंतरावर जाऊन मी खिशातुन हातरुमाल काढुन स्वत:ला सावरत होतो. मला माझे रडणे आवरत नव्हते …

इतक्यात समोरून मी एका चश्मिश मुलीला येताना पाहिले. त्या मुलीने सलवार कमिज आणि ओढणी असा साधासाच ड्रेस घातला होता. खांद्यावरची बॅग सांभाळत ती मुलगी आत येत होती. मघाशी मला त्रास देणाऱ्या त्या चौकडीने त्या मुलीला थांबवले. मला त्रास देऊन समाधान न झाल्याने ते आता पुन्हा या मुलीला सुध्दा त्रास देणार या विचाराने मला त्यांचा प्रचंड राग आला. एकाने हसत तिला तिचे नाव विचारले. ती मुलगी शांतपणे म्हणाली, "सीमा." चौकडीतल्या त्या मुलीने तिला विचारले, "सीमा म्हणजे काय?" सीमा त्या चौघांकडे पहात हसुन म्हणाली, "सीमा म्हणजे मर्यादा." चौकडीतल्या त्या मुलीने पुन्हा सीमाला विचारले, "टाईमपास सिनेमा पाहिला असशीलच ना तु?" सीमाने काहिही न बोलता मान डोलावुन होकार दिला. लगेच त्यांच्यापैकी एक म्हणाला, "प्राजक्ता घरी आरश्यासमोर ऊभी राहुन म्हणते तो संवाद म्हणुन दाखवं बघू!" सीमाने मान वरून त्यांच्याकडे पाहिले. काही क्षण थांबुन तिने थोडेसे अडखळत का होईना, पण तो संवाद म्हणुन दाखवला. पाठीमागे ऊभे राहुन मी हे सगळे पहात होतो. त्या मुलीचे मला खरचं खुप आश्चर्य आणि कौतुक वाटत होते. मग आपल्या मित्राकडुन पेन काढुन घेत त्या मुलीने ते पेन सीमाच्या हातात दिले व ती हसुन म्हणाली, "आता हे गुलाब यापैकी कोणालाही देऊन १४३ म्हणुन दाखवं बघु." सीमाने ते पेन आपल्या हातात घेतले आणि मिनिटभर पेन न्याहाळुन झाल्यावर ती पेन समोर करत तिच्या समोर ऊभ्या असलेल्या मुलाला म्हणाली, "मला तु आवडतोस." पाठीमागे ऊभे राहुन हे सर्व पहात असलेल्या मला प्रचंड धक्का बसला होता. हे सगळं इतक्या शांतपणे आणि सहजतेने करायला कसे जमत होते तिला? सीमाचा हात आपल्या हातात घेत त्या चौकडीतली ती मुलगी हसुन म्हणाली, "यापुढे तुला कुठलीही मदत लागली तर मला अवश्य सांग. जा आता." सीमा तिच्याकडे बघुन हसुन म्हणाली, "थॅंक्स." मग आपल्या खांद्यावरची बॅग सांभाळत ती चालु लागली.

हे सगळे न रहावुन मी पटकन तिच्यासमोर जाऊन ऊभा राहिलो आणि तिला विचारले, "कसं जमलं गं तुला हे सगळं करायला?" रडल्यामुळे माझे डोळे लाल झाले होते. सीमाने एकदा माझ्याकडे पाहिले आणि मान पाठीमागे वळवुन त्या चौघांकडे पहिले. मग पुन्हा माझ्याकडे बघत ती शांतपणे हसुन म्हणाली, "आपण इतके कणखर असायला हवं कि जगातली कुठलीही गोष्ट आपले मन विचलित करू शकणार नाही."

तिच्या या वाक्याने माझे आयुष्य बदलले… कायमचेचं!

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

7 Apr 2014 - 2:38 pm | मुक्त विहारि

व्रुत्तांत लिहीता लिहीता लेख पण लिहायला लागलात.

आता लेख वाचतो.

(आता थांबू नका, जमेल तसे लिहीत रहा.)

प्रचेतस's picture

7 Apr 2014 - 3:24 pm | प्रचेतस

अगदी अगदी.
छानच लिहिलंय.

शुचि's picture

7 Apr 2014 - 9:01 pm | शुचि

मुवि, नेहमी आपल्या उत्साह्वर्धक, प्रोत्साहनपर प्रतिक्रिया वाचते. कधी फाफेंना "वा! कधी नव्हे ते फाफेची प्रतिक्रिया वाचायला मिळाली" अशी तर कधी वरील प्रतिक्रिये प्रमाणे.
अशा प्रतिक्रियांनी त्या त्या व्यक्तीचे मॉरल नक्कीच इम्प्रूव्ह होत असणार :)
आपल्या प्रतिक्रिया आवडतात. त्यांचा नकीच फायदा होत असावा. - अर्थात हे माझे वयक्तीक मत झाले.

पेठकर, आपण व अन्य काही जण आहेत ज्यांच्या प्रतिक्रिया वाचाव्याशा वाटतात.

असो कीप इट अप.:)

मुक्त विहारि's picture

7 Apr 2014 - 2:51 pm | मुक्त विहारि

मस्त...

हे वाक्य तर खासच...

"आपण इतके कणखर असायला हवं कि जगातली कुठलीही गोष्ट आपले मन विचलित करू शकणार नाही."

नितिन पाठे's picture

7 Apr 2014 - 3:56 pm | नितिन पाठे

ढासू लिहिलय....पण दोन प्रश्न पडलेत मला
१)दहावीचा निकाल अजून लागला नाही?

२)कथा जुनी म्हणावी तर टाईमपास सिनेमा जानेवारी २०१४ ला लागलाय?

ह..........म्मं

भाते's picture

7 Apr 2014 - 4:10 pm | भाते

मिपावर लेख लिहितानासुध्दा एखाद्या कादंबरीसारखी प्रस्तावना लिहावी लागते हे मला माहित नव्हते.
ही घ्या प्रस्तावना, जी लेखाच्या सुरुवातीला द्यायची राहुन गेली.

सदर कथा, यातिल पात्र व घटना, काल्पनिक असुन वास्तवाशी त्यांचा तिळमात्रही संबंध नाही आणि असल्यास तो केवळ योगायोग समजावा.

ह.घ्या. :)

जेपी's picture

7 Apr 2014 - 5:27 pm | जेपी

विश्रांती मोड ऑफ-
आवडल-विश्रांती मोड ऑन

दिपक.कुवेत's picture

7 Apr 2014 - 6:35 pm | दिपक.कुवेत

भात्यातुन असे वाचनभेदि बाणहि निघतात हे माहित नव्हतं.....आता मुवि म्हणत आहेत त्या प्रमाणे "लिहायचा थांबु नकोस!"

सुबोध खरे's picture

7 Apr 2014 - 6:42 pm | सुबोध खरे

वा भाते साहेब,
बोलता कमी पण लिहिता सुरेख. सुंदर लेख
लिहिते रहा

नया है वह ?