कार्पोरेट

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
2 Apr 2014 - 10:58 am

कॉलेज चे सोनेरी दिवस सरत असतानाच आम्हाला भविष्याचे वेध लागले होते. आता आपण कार्पोरेट विश्वात पदार्पण करणार ही जाणीव आम्हाला सुखावून जायची . बघता बघता कॉलेज संपल .पण कॉलेज मधून बाहेर पडताच मनात आलेला पहिला विचार म्हणजे , " आता डोक्यावर कॉलेजच छप्पर नाही " असा होता .त्या छपराखाली आम्ही किती सुरक्षित होतो हे कार्पोरेट विश्वाचे चटके बसल्यावर कळलं .

मग तो सोनियाचा दिन आला आणि आम्ही कंपनीत रुजू झालो . ‘Induction programme, Traning session’ असे करत करत भरभर दिवस पुढे जात होते . त्याकाळात कंपनीच्या भव्य इमारतीपासून ते मशीनमधल्या बेचव कॉफी पर्यन्त सगळ्या गोष्टींच कौतुक वाटत. पण नवलाईचे नउ दिवस संपले कि त्याच गोष्टींचा कंटाळा यायला लागतो . कारण त्या भव्य इमारती च्या आतमध्ये सगळं यंत्रवत सुरु असतं. आणि तिथे कॉफी मशिनलाच काय तर खुद्द माणसाला सुद्धा "Resourse" म्हणून संबोधण्यात येते.

हळूहळू कामाला सुरुवात होते. " बॉस " नावाच्या एका व्यक्तिमत्वाशी आपली ओळख करून देण्यात येते . मग हळुहळू ते व्यक्तिमत्व उलगडायला लागतं. किंबहुना हे व्यक्तिमत्व आपल्याला कधीच उलगडणार नाही हे आधी कळतं . कारण बॉस हे एक नसून अनेक व्यक्तिमत्व असतात. पुढे आपल्या करियर मध्ये कितीतरी बॉस भेटतात. कोणी मित्रासारखं वागवतं, कोणी अक्षरश : मुलासारखं वागवतं, कोणी फक्त कामाशी काम ठेऊन म्हणजे ज्याला कार्पोरेट भाषेत " प्रोफ़ेशनल " असा म्हणतात तसं वागवतं , तर कोणी अगदी जन्मोजन्मीचा शत्रू असल्यासारखं वागवतं. कधी कधी तर असा प्रश्न पडतो कि जेंव्हा आपल्यावर बॉस होण्याची वेळ येईल तेंव्हा आपण कसे असू ? त्यात आपला स्वभाव जर सगळ्यांशी मिळुन मिसळून राहण्याचा असेल तर हे उसंन प्रोफेशनलीझम आणायचं तरी कूठुन ? त्यात प्रोफेशनलीझमचा खरा अर्थ आणि कार्पोरेट विश्वातला अर्थ ह्यात खूप फरक आहे.
आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक असणं आणि त्यासाठी झोकून काम करणं म्हणजे प्रोफेशनलीझम !! पण कार्पोरेट विश्वात माझ्या व्यवसायाशी फक्त मीच प्रामाणिक आहे असं दाखवण्यासाठी झोकून काम करणं म्हणजे प्रोफेशनलीझम !!

कार्पोरेट विश्वात काही परवलीचे शब्द असतात .
Performance ---- जो नाही दाखवला तेंव्हाच आपण सगळ्यांच्या नजरेत येतो
Productivity ---- जी नेमकी किती आहे हे कोणीच सांगु शकत नाही
Project ---- " आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी " अश्या प्रकारामुळे जो नेहमीच पेटलेला असतो.
Process ---- जी ठरवे पर्यन्त प्रोजेक्ट ची वेळ संपते
Increment ---- मालकाने अगदी ५१% शेयर्स जरी आपल्या नावे केले तरी जी आपल्याला कमीचं वाटते .
Team ----- ज्यांत सगळेच कप्तान असतात.

तश्या कार्पोरेट विश्वात गमतीजमती भरपूर असतात . व्यक्ती निरीक्षणाचा छंद असणारयासाठी तर ते "विरंगुळा केंद्र " ठरू शकतं. उदाहरणार्थ , समोरची व्यक्ती कोणत्या विभागातली आहे हे त्याच्या बोलण्यावरून ओळखता येतं. एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर " दुपारी चारनंतर या " असं मिळालं तर आपण ‘Account Department’ ला आहोत हे ओळखावं . आणि त्यानंतरही तुम्ही प्रश्न विचारण्याचा मूर्खपणा केलाच तर, "तुम्हाला कळत नाहीये का मी काय बोलतोय ?" असं उत्तर मिळेल . आपण समजदार असलो तर दुपारी चारनंतर सुद्धा तिथे जाणार नाही
किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर, ‘as per company policy’ असं मिळालं तर समोरची व्यक्ती ही HR चं असु शकते . HR लोकांसाठी कंपनी पॉलिसी हे पुस्तकं बायबल पेक्षा महत्वाचं असतं. गंमत म्हणजे त्यांनी कधी बायबलही वाचलेलं नसतं आणि कंपनी पॉलिसी पण वाचलेली नसते . पण कोणत्याही गोष्टीला अडवणं हीच आपल्या कंपनीची पॉलीसी आहे अशी त्यांची ठाम समजूत असते .

आपलं एखादं महत्वाचं काम घेऊन आपण कोणाकडे गेलो आणि ते काम झालं असं तर कधीचं होत नाही . अशावेळी , " मी आत्ता खूप बिझी आहे. मी आत्ता काहीच करू शकत नाही " असं उत्तर मिळाल्यास आपण ‘ Design Department (Technical cell)’ ला आहोत हे ओळखावं . पण थोडं लक्ष देऊन तो बिझी असणारा माणूस नेमकं काय करतोय हे बघितल्यास कळेल की काल केलेलं चुकीचं काम तो आत्ता परत करतोय . कारण त्यासाठी आत्ताच त्याच्या बॉसनी त्याला झापं झाप झापलाय !!
मग आपलं अपूर्ण राहिलेलं काम घेऊन आपण दुसऱ्या कोणाजवळ गेलो की , "तू मला काय विचारतोय ? माझा काय संबंध ?" असं उत्तरं मिळेल . हे उत्तर देणारा माणूस हा कंपनीतला सगळ्यात दु:खी माणूस असतो . कारण त्याचा नेमक्या कोणत्या कामाशी संबंध आहे हे त्यालाही माहिती नसते.

आपल्या एखाद्या समस्येचं उत्तर जर , "मी हे आधीच सांगितलं होतं . त्यावेळी माझं कोणी ऐकलं नाही " असं मिळालं तर आपण ‘Quality Control’ मध्ये आहोत . या लोकांना सगळ्या गोष्टींची पुर्वकल्पना असते. पण यांची भुमिका ही नेहमीच भारताच्या परराष्ट्र धोरणा सारखी तटस्थ असते .

मग हळुहळू सगळे विभाग फिरून आपण Project Manager कडे येतो. आपली समस्या ऐकून तो कुत्सित पणे हसतो . आणि , "अरे १८५७ च्या उठावात आम्ही….." अश्या सूरात सुरवात करून सगळा इतिहास - भूगोल आपल्यासमोर मांडतो . पण नेमका आपला प्रश्न अन्नुतरितच राहतो . या व्यक्तीला भूतकाळ आणि भविष्य काळातच राहायला आवडतं. वर्तमानकाळ त्याच्या गावीच नसतो .

बिचारे आपण !! समस्या अजूनही सुटलेली नसल्यामुळे शेवटी आपल्या बॉस समोर सगळी कैफियत मांडतो . मग बॉस आपण काय करायला हवं होतं हे सांगतो . अचानक आपल्याला श्रीकृष्णाचं विश्वरूप दर्शन घडतंय असं जाणवायला लागतं. आणि त्या विश्वरूपापुढे आपलं अस्तित्व,आपलं ज्ञान किती नगण्य आहे ह्याची जाणीव होऊन निराश मनस्थितीत आपण घरी जातो .

अश्या कितीतरी वल्ली इथे रोज भेटतात . स्वत : विषयी कितीतरी गैरसमज घेऊन लोकं इथे वावरतात . काही लोकांना कंपनीची जबाबदारी आपल्याच खांद्यावर आहे असं वाटतं . जणूकाही यांनी काम करणं बंद केल्यावर दुसऱ्याच दिवशी कंपनीला टाळं लागणार आहे . काही लोक तर सतत ," सध्या मार्केट मध्ये मंदी आहे म्हणून नाहीतर केंव्हाच लाथ मारली असती या कंपनीला !!" अश्या अविर्भावात असतात .जणूकाही मार्केट तेजीत आल्यावर मुकेश अंबानी स्वत : यांच्यासाठी पायघड्या घालणार आहे . आणि अझीम प्रेमजी ह्यांचासाठी देवाला साकडं घालणार आहे !!! काही लोकं सतत आपल्यावरती होणाऱ्या अन्यायाची कैफियत मांडत असतात . कंपनीची प्रत्येक गोष्ट ही आपल्याला त्रास देण्यासाठीच आहे अशी त्यांची समजूत असते . म्हणजे अगदी ह्यांच्या डोक्यावरचे पंखे जरी बंद झाले तरी आपल्याला गरमी व्हावी म्हणून मुद्दाम असं केलंय असं त्यांना वाटतं . तर काही लोकांना कंपनीतल्या आतल्या बातम्या आपल्यालाच कश्या माहिती असतात हे सांगण्यात अभिमान वाटतो . जणूकाही कंपनीचा मालक आणि हे रोज एकाच कपातून चहा पितात !!

या सगळ्यात आणखी एक जमात असते . ती म्हणजे प्रामाणिकपणे आपलं काम करणाऱ्यांची . पण ह्या बिचाऱ्यांची परिस्थिती नेहमीच इकडे आड अन तिकडे विहीर अशी असते . कारण कधीतरी पाणी लागेल या आशेने ते विहीर खोदत राहतात . आणि पाणी लागल्यावर इतर लोकं त्यात हात धुवून घेतात . पण या बिचारयांच्या हाताला कोणी पाणीही लागू देत नाही आणि त्या खोल विहिरीतून बाहेर पडायला त्यांना कोणी हातसुद्धा देत नाही . शिवाय विहिरीतून बाहेर पडलेच तर पुढे काय हा प्रश्न तर कायम असतोच !!

तसं पाहता खरं विश्व आणि कॉर्पोरेट विश्व सारखंच असतं . फरक असला तर तो एव्हढाच की खऱ्या विश्वातली Entry आणि Exit आपल्या हातात नसते . आणि कॉर्पोरेट विश्वातली Entry आणि Exit बऱ्याच अंशी आपल्या हातात असली तरी त्याचा काही उपयोग नसतो . हे वाक्य लिहिताना कुठेतरी वाचलेल्या २ ओळी मला आठवतायेत .
“ जहर दे के वो फ़रमाते हैं के पीना होगा,
जहर पीता हुं तो केहते हैं के जीना होगा !!! “

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

Prajakta२१'s picture

2 Apr 2014 - 11:04 am | Prajakta२१

एकदम perfect वर्णन :-०

स्मिता चौगुले's picture

2 Apr 2014 - 2:49 pm | स्मिता चौगुले

सही लिहिलयं एकदम..

michmadhura's picture

2 Apr 2014 - 3:33 pm | michmadhura

छान लिहलंय

मस्त लिहीलेय...बरेसचे रीलेट करु शकलो म्हणून वाचायला आणखी मजा आली.

मृत्युन्जय's picture

2 Apr 2014 - 3:48 pm | मृत्युन्जय

खल्लास. सहीच.

त्यात परत खालच्या सिंहासाठी तर डब्बल अभिनंदनः

जहर दे के वो फ़रमाते हैं के पीना होगा,
जहर पीता हुं तो केहते हैं के जीना होगा !!! “

प्यारे१'s picture

2 Apr 2014 - 4:45 pm | प्यारे१

+ (सिंहासाठी ऐवजी सहीसाठी एवढा बदल करुन)१११

आवडलं.

लॉरी टांगटूंगकर's picture

2 Apr 2014 - 4:56 pm | लॉरी टांगटूंगकर

+११११

स्पंदना's picture

4 Apr 2014 - 4:16 pm | स्पंदना

त्यांना शेर म्हणायच आहे. मराठीत त्यांनी सिंह म्हंटलय.

सविता००१'s picture

2 Apr 2014 - 3:56 pm | सविता००१

ऑफिसमधे बसून कोण कस आहे याचा विचार करत करत पुन्हा पुन्हा वाचतेय. भन्नाट. आणि एकदम चपखल. मस्तच. मझ्या ऑफिसवरच लिहिलय अस वाटतंय!

आदूबाळ's picture

2 Apr 2014 - 4:10 pm | आदूबाळ

लेखन आवडलं!

डिपार्टमेंटांची वर्णनं जरा स्टीरिओटिपिकल / घाऊक झाली आहेत.

आत्मशून्य's picture

2 Apr 2014 - 4:27 pm | आत्मशून्य

जहर दे के वो फ़रमाते हैं के पीना होगा,
जहर पीता हुं तो केहते हैं के जीना होगा !!! “

मस्तच.

मृगनयनी's picture

18 Jul 2014 - 9:56 am | मृगनयनी

चिनार'जी... एकदम Peeeeeeerrrrrrrfecttttt.... :)

तुषार काळभोर's picture

2 Apr 2014 - 5:05 pm | तुषार काळभोर

हे वर्णन आयटी कंपनीतलं आहे का?
आमच्याकडे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पण सेम असंच असतं!!

हे प्रातिनिधिक वर्णन आहे. कदाचित सगळीकडे लागू पडेल

चिनार's picture

2 Apr 2014 - 5:09 pm | चिनार

प्रतिक्रियेसाठी मनापासुन आभार !!

--चिनार

सस्नेह's picture

2 Apr 2014 - 6:51 pm | सस्नेह

मजेदार निरिक्षण !

वाटाड्या...'s picture

2 Apr 2014 - 7:02 pm | वाटाड्या...

एकुण परिस्थीती तशीच दिसते. ७-८ वर्षापुर्वी अशीच असायची. शहाण्याने असल्या क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करुन लवकरात लवकर आपले पाय परदेशी जाणार्‍या विमानाला लावावेत हेच खरं. तसही परदेशी काय म्हणा, देशी बॉस मिळाला तर हाल कुत्रं खात नाही पण बाहेर पडुन जाता येतं. असो..

उत्तम लिखाण...मजा आली.

-वाट्या..

पैसा's picture

2 Apr 2014 - 11:00 pm | पैसा

एकदम खुसखुशीत!

खटपट्या's picture

2 Apr 2014 - 11:31 pm | खटपट्या

एकदम पटलं

>> या व्यक्तीला भूतकाळ आणि भविष्य काळातच राहायला आवडतं. वर्तमानकाळ त्याच्या गावीच नसतो .

आपण आपलं मस्त मिपा वर येतो. मज्जा!
बरोब्बर वर्तमानात रहातो. :)

बाकी हे बिझिनेस मॉडेल आहे, ते समजून घेतले आणि आपण त्यात कुठे आणि का आहोत, हे ओळखून चाललं की काही त्रास होत नाही!

जोशी 'ले''s picture

2 Apr 2014 - 11:56 pm | जोशी 'ले'

एकदम आवडेश
बाकि आमच्या डिपार्टमेंट बद्दलच्या मतां बद्दल निषेध ;-)

चिनार's picture

3 Apr 2014 - 8:51 am | चिनार

तुमचं डिपार्टमेंट कोणतं ?

जोशी 'ले''s picture

3 Apr 2014 - 9:02 am | जोशी 'ले'

आता मी बिझि आहे,मी काहि प्रतिसाद देउ शकत नाहि :-D

फारएन्ड's picture

3 Apr 2014 - 5:28 am | फारएन्ड

जहर दे के वो फ़रमाते हैं के पीना होगा,
जहर पीता हुं तो केहते हैं के जीना होगा !!! “

>>> बहुधा 'ये इश्क इश्क है' कव्वालीतील आहे. साहिरच्या आहेत हे नक्की.

पैसा's picture

3 Apr 2014 - 8:52 am | पैसा

त्यातल्याच आहेत! पण इथे थोडा फरक करून वापरल्या आहेत.

नाजो अंदाज से कहते हैं क़ि जीना होगा
जहर भी देते हैं तो कहते हैं क़ि पीना होगा
जब मैं पीता हूँ तो कहते हैं क़ि मरता भी नहीं
जब मैं मरता हूँ तो कहते हैं क़ि जीना होगा

रुपकुमार राठोड यांचा एक गझल संग्रह माझ्याजवळ आहे . त्यात मी वापरलेल्या दोनचं ओळी आहेत

पैसा's picture

3 Apr 2014 - 9:15 am | पैसा

मला वाटतं, साहिरची जास्त जुनी असणार. त्यावरून प्रेरणा घेऊन लिहिलेलं असू शकेल.

तुमचा अभिषेक's picture

3 Apr 2014 - 9:22 am | तुमचा अभिषेक

मस्तच !

कंपनोकंपनी मशीनचीच कॉफी.
याबाबत आम्ही तेवढे सुदैवी, म्हणजे दोन-तीन वेळा मस्त बनवलेली चहा येते बाहेरून, इतरवेळी तल्ल्लफ लागल्यास मग मशीनला पर्याय नाही.

चिनार's picture

18 Jul 2014 - 9:48 am | चिनार

प्रस्तुत लेख १८ जुलै च्या लोकप्रभा अंकात प्रकाशित झाला आहे.

चिनार's picture

10 Sep 2014 - 10:02 am | चिनार

प्रस्तूत लेख "उत्तमकथा " मासिकाच्या September अंकात प्रकाशित झाला आहे

काळा पहाड's picture

10 Sep 2014 - 1:04 pm | काळा पहाड

मी हे आधीच सांगितलं होतं . त्यावेळी माझं कोणी ऐकलं नाही.