शिद्दत

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
24 Mar 2014 - 8:12 pm

गेल्या महिन्यात सावरकर जयंती होऊन गेली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आपलं आयुष्य समर्पित केलेल्या असंख्य सेनांनीपैकी हा एक सेनानी, विनायक दामोदर सावरकर. एक युगपुरुषच म्हणावा लागेल; एक देवाचा अवतार. असीम देशभक्ती आणि ध्येयाचा पुतळा. अंदमान मधील तुरुंगात असताना त्यांनी जे हाल सोसले, ते वाचतानाही अंगावर काटा येतो. त्यांनी ते प्रत्यक्ष कसे सोसले असतील त्यांनाच ठाऊक. असेच आतोनात हाल भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या प्रत्येक क्रांतिकारकाने कमी अधिक प्रमाणात सोसले होते. तेंव्हा कुठे १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळालं.

या जयंत्या आणि पुण्यतिथ्यांच्या निमित्ताने का होईना, पण त्या लोकांची पुसटशी आठवण आपण काढतो. भिंतीवरच्या बॅनरपुरतेच पण त्यांचे चेहरे आपण बघतो. पण हा प्रश्न आपण स्वत:ला करतो का, की, काय अशी आशा असेल, काय असं उद्दिष्ट्य असेल, की म्हणून या माणसांनी इतके हाल सोसले? त्यांना घरं नव्हती का? त्यांना इतरांप्रमाणे आपलं एक कुटुंब असावं, आपल्याकडे घर, पैसे, सगळी सुखं असावीत अशी अभिलाषा नव्हती का? हे प्रश्न आपण आपल्याला केले पाहिजेत. त्यात कुठेतरी आपल्यालाच आपल्या मनांवर साचलेली धूळ झटकण्याची प्रेरणा मिळेल.

उर्दूमधे एक शब्द आहे, ’शिद्दत’. त्याचा साधारण अर्थ तीवता, किंवा प्रबलता असा होतो. पण आणखी खोलवर जाऊन जर बघितलं तर त्याचा अर्थ आहे आत्मीयता. एखाद्या गोष्टीत जीव ओतणं म्हणजे शिद्दत. मन एकवटून एखादी गोष्ट करणं म्हणजे शिद्दत. ही शिद्दत, किंवा ही आत्मीयता आज आपण हरवून बसलोय, आणि तीच त्या क्रांतिकारकांकडे होती. त्याच आत्मीयतेपोटी, आपल्या ध्येयासाठी जीव ओवाळून टाकणं त्यांना साह्य झालं. जगाचा विसर पडला, आणि ते येईल त्या त्रासाला सामोरे जाऊ शकले.

आज आपण बहुतांश माणसं यंत्रवत झालो आहोत. आपण केवळ करायच्या म्हणून गोष्टी करतो. शिकायचं म्हणून शिकतो, राबायचं म्हणून राबतो, पैशाशिवाय चालत नाही म्हणून पैसे कमवतो, लोकांशी बोलायचं म्हणून बोलतो, खायचं म्हणून खातो, हात जोडायचे म्हणून जोडतो, नाव घ्यायचं म्हणून घेतो. आपल्या बोलण्यात गोडवा नाही, नात्यांत ओलावा नाही, डोळ्यासमोर ध्येय नाहीत, कृतीमागे विचार नाही, विचारांना उंची नाही, भावनांना पाया नाही, तत्वांना महत्व नाही, आहारात सत्व नाही, दुस-याप्रत सद्भावना नाही, स्वत:चा असा चेहरा नाही, एकूणच कशालाच काहीच अर्थ नाही.

हा हरवलेला अर्थ शोधण्याची आज गरज आहे. प्रत्येक जण प्रत्येक गोष्ट मनापासून करतो असं नाही, पण जी गोष्ट आपल्या आवडीची आहे, ती तरी आपण खरोखर मनापासून करतो का? हे तपासलं पाहिजे. आत्मीयता जागवली पाहिजे. डिस्कव्हरी चॅनल वर सुखासुखी जंगलात काट्याकुट्यात फिरणा-या साप, विंचू पकडणा-या, किंवा वाघावर रात्रंदिवस कॅमेरा लावून त्यांच्या हालचाली टिपणा-या माणसांना बघितलं की; कठोर सरावाअंती जगातील सर्वश्रेष्ठ सायकल शर्यत जिंकणा-या प्रत्येकाचा चेहरा बघितला की, भाव एकवटून सूर लावणा-या गायकाकडे बघितलं की, जीवघेण्या थंडीत आपल्या परिवाराची चिंता न करता देशाचं संरक्षण करणा-या सैनिकाकडे बघितलं की, ही आत्मीयता दिसते.

आपण या अशा लोकांकडे बघून फिरून आपल्याकडे बघायला हवं. आपल्या आत्मीयतेचं मापन करायला हवं. खरंच आपण जे वागतो, जे बोलतो, ते आपण आहोत का? हे स्वत:ला विचारायला हवं. केलेल्या कुठल्याही गोष्टीतून आपल्याला वैचारिक समाधान हवं, की आत्मिक समाधान हवं? हे स्वत:ला विचारायला हवं. आपण फक्त आवडणा-याच गोष्टी करतो, की आवडीने सगळ्या गोष्टी करतो? हे स्वत:ला विचारायला हवं. कदाचित नेमकं उत्तर नाही मिळायचं, पण ते शोधण्याचा मार्ग नक्कीच मिळेल. तो शोधण्याची गरज आहे. मनावरची धूळ झटकण्याची गरज आहे. आपली दिशा पुन्हा एकदा पडताळण्याची गरज आहे. मन लागावं म्हणून नव्हे, तर मन लावून गोष्टी करण्याची गरज आहे. हे जर केलं, तर कदाचित आपलाच आपल्याला नव्याने शोध लागेल.

साहित्यिकसमाजजीवनमानविचारमत

प्रतिक्रिया

खेडूत's picture

24 Mar 2014 - 8:26 pm | खेडूत

कालच 'तिकडे' वाचलं. आवडलं!

वेल्लाभट's picture

24 Mar 2014 - 8:28 pm | वेल्लाभट

आभार्स!!!!

रेवती's picture

24 Mar 2014 - 8:33 pm | रेवती

लेखन आवडलं.

नगरीनिरंजन's picture

24 Mar 2014 - 8:46 pm | नगरीनिरंजन

आज आपण बहुतांश माणसं यंत्रवत झालो आहोत. आपण केवळ करायच्या म्हणून गोष्टी करतो. शिकायचं म्हणून शिकतो, राबायचं म्हणून राबतो, पैशाशिवाय चालत नाही म्हणून पैसे कमवतो, लोकांशी बोलायचं म्हणून बोलतो, खायचं म्हणून खातो, हात जोडायचे म्हणून जोडतो, नाव घ्यायचं म्हणून घेतो. आपल्या बोलण्यात गोडवा नाही, नात्यांत ओलावा नाही, डोळ्यासमोर ध्येय नाहीत, कृतीमागे विचार नाही, विचारांना उंची नाही, भावनांना पाया नाही, तत्वांना महत्व नाही, आहारात सत्व नाही, दुस-याप्रत सद्भावना नाही, स्वत:चा असा चेहरा नाही, एकूणच कशालाच काहीच अर्थ नाही.

त्याकाळी लोकांचं बरं होतं, इंग्रजांसारखा दृश्य शत्रू आणि स्वराज्यासारखं उदात्त ध्येय होतं.
आताचा शत्रू आपणच आहोत आणि पुढच्या पिढीसाठी चांगलं जग निर्माण करणे वा राखणे हे ध्येय आहे. पण स्वतःविरुद्ध कोण लढणार?
मंकी ट्रॅपमध्ये अडकलेल्या माकडासारखे आपण फक्त किंचाळत असतो झालं.

स्पंदना's picture

25 Mar 2014 - 4:38 am | स्पंदना

मंकी ट्रॅप.
किंचाळणारे तरी किती आहेत नगरी? सगळे नुसते पिंजर्‍यातच फेर्‍या मारण्यात मश्गुल!!

वेल्लाभट's picture

25 Mar 2014 - 9:13 am | वेल्लाभट

+१ !

आत्मशून्य's picture

24 Mar 2014 - 9:36 pm | आत्मशून्य

नक्की काय म्हणायचे आहे ?