कॅलीडोस्कोप

kurlekaar's picture
kurlekaar in जनातलं, मनातलं
12 Mar 2014 - 8:00 pm

कॅलीडोस्कोप
--१--
श्रावणातला सत्यनारायण.
तिची नवी कोरी साडी व माझे बऱ्याच दिवसांत न घातलेले सदरा व सुरवार. चौरंग, केळीचे खुंट; श्रीगणेश व लंगडा बाळकृष्ण मूर्तिमय, पण सुपाऱ्यात मांडलेले नवग्रह आणि कलश व श्रीफल मिळून केलेला प्रतिकात्मक सत्यनारायण. ओळखीचे साधू वाणी व त्याचा जावई, लीलावती व कलावती. पंचामृत, व आमच्या हिचा केवळ शिरा म्हणून करतांना कधीकधी चुकणारा पण प्रसादाच्या रूपांत नेहमीच अचूक व हवाहवासा वाटणारा.

आंतून बाहेरून एक प्रसन्न मूड.
--२--
पाउस
पावसाची रूपं; कांही दृश्य कांही अदृश्य; कांही स्पर्शाच्या अलीकडली तर कांही स्पर्शाच्या पलीकडली; कांही वास्तविक तर कांही काल्पनिक.
डोकावणारा पाउस, रेंगाळणारा पाउस, कोसळणारा पाउस, भुरभुरणारा पाउस, मुसळधार पाउस, कंटाळवाणा पाउस, उन पाउस, दबा धरून बसलेला पाऊस, गारांचा पाउस, मिणमिणणारा पाउस, सरीचा पाउस, संततधार पाउस, बिलगणारा पाउस, बोथट व टोचणारा पाउस, जून-जुलैतला ओळखीचा पाउस व एप्रिल-नव्हेंबर मधला अनोळखी पाउस.

--३--
प्रत्येक पुरुषाला आपली बायको मागच्या शतकातल्या स्त्री सारखी हवी असते. या उलट स्त्रियांना मात्र आपल्या नवऱ्याने आपल्याला आपण पुढच्या शतकातील एक स्त्री असल्यासारखं वागवायला हवं असं वाटत असतं. या परस्पर -विरोधी अपेक्षा एकमेकास neutralize करतात व त्याच शतकांत त्यांचा संसार थोडीफार रस्सीखेच होऊन चालत रहातो.
--४--
पु.ल. देशपांडे
पु लं च 'व्यक्ति आणि वल्ली' हे माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी एक. यातल्या साऱ्या व्यक्तिरेखा लक्ष्यात राहण्याजोग्या; कांही इरसाल (नाम्या परिट), कांही घरंदाज (नंदा प्रधान) तर कांही लग्नासारखे सोहळे सोडल्यास उपेक्षित (नारायण), कांही पूर्णपणे प्रादेशिक (regional )--(अंत्या बर्वा)-- प्रत्येक व्यक्तिमत्व typical, एकमेकापासून भिन्न व स्वतंत्र.
आयुष्याच्या ' समृद्ध अडगळी' (भालचंद्र नेमाडेंच्या शब्दांत) तून पु लंनी ही अस्पष्ट, विस्मृतीची धूळ बसलेली व्यक्तिचित्रे कशी व केंव्हा शोधून काढली व आपल्या शब्द-कौशल्याने त्यात इतके सुंदर रंग भरून त्यांना इतकं जिवंत कसं केलं --सारंच आश्चर्यजनक.

--५--
उत्तरायण
थकलेलं शरीर, मरगळलेलं मन, आळसावलेला उत्साह. आरशात दिसणारा अनोळखी चेहरा. आठवणीना सुद्धा अचूक पत्ता सांपडत नाहीं.
वयोपरत्वे बदलायचं म्हणजे किती बदलायचं? इतकं आमुलाग्र? मग माझा मी उरतो कुठे या साऱ्यात? फक्त ‘नांवा’पुरता?

--६--

निम्मी
कुणीतरी कुणाबद्दल असं कांही अचूक लिहून जातं, किंवा कुणाचा पडद्यावर पाहिलेला भावपूर्ण चेहरा किंवा कितीही सावध असलं तरी आपल्यावर झडप घालुन आपल्याला गारद करणाऱ्या एखाद्या कवितेतील ओळी वाचनांत आल्या की मग ते शब्द, ते चित्र बरीच वर्षे लक्षात राहतात. .
. Eric Maria Remarque एकदा स्त्रीच्या अरुंद खांद्यान्बद्दल असंच कांहीतरी लिहून गेलाय –तिचे अरुंद खांदे हे तिच्या असहायतेचं—तिच्या vulnerabilityचं प्रतिक असतं असं तो म्हणून गेलाय. कवितेतील आवडलेल्या बऱ्याच ओळी आता विसरून गेल्यात. पण नजरेसमोर मात्र अजून आहे निम्मीचा कारुण्यपूर्ण चेहरा. विशेषतः तिचे ते डोळे
निम्मी म्हणजे एकतर्फी प्रेम. मग ते ‘आन’ किंवा ‘दीदार', मधला दिलीपकुमार, ‘बरसात’ मधला प्रेमनाथ किंवा ‘नया दौर’ तील अजित असू देत.

निम्मीचे खांदे देखिल असेच अरुंद.

kurlekaar

साहित्यिकचित्रपटविचार

प्रतिक्रिया

पावसात कोवळा पाऊस राहुन गेलं. चुकार पण राहून गेला. दाटुन आलेला. खोडकर.

अरुंद खांदे..... :(

kurlekaar's picture

13 Mar 2014 - 10:07 am | kurlekaar

For Aparna Akshay. खूप छान.
सुखापेक्षा दुःखच जास्त खोलवर जातं व तिथपर्यंत आपल्याबरोबर दुसरं कोणीहि पोचू शकत नाही. म्हणूनच दुःखाच्या संदर्भात ‘सहानुभुती’ या शब्दाने देखिल मुळचा गर्भित अर्थ –सह-अनुभूती –बदलून घेतलाय. माणसांचच इथं असं मग शब्दाना कां दोष द्यावा? माणसांना जवळ आणण्याचं व तसंच एकमेकापासून दूर नेण्याचं काम हे शब्द अचूक करतात—अगदी अचूक नाहीं कारण याच शब्दांमुळे कधीकधी हव्या असलेल्या व्यक्तीनादेखील आपण दूर ढकलतो. शब्दांबद्दल बरंच कांही लिहिता येईल.
तुमच्या अर्थपूर्ण प्रतिक्रियेसाठी आभार

पहीले दोन (गद्य कि पद्य) खूप आवडले.

kurlekaar's picture

14 Mar 2014 - 10:57 pm | kurlekaar

Thanks for your comments on कॅलीडोस्कोप. कॅलीडोस्कोप २ हि वाचा व आपला अभिप्राय कळवा.

आदूबाळ's picture

14 Mar 2014 - 11:10 pm | आदूबाळ

आवडलं :)

अवांतरः तुमच्या आयडीविषयी उगाचच कुतूहल वाटतंय. "कुर्ले गाव वसवणारे" या अर्थाने कुर्लेकार आहे का?

(शुद्धलेखनाची चूक निश्चित नाही, कारण इतर ठिकाणी बरोबर शुद्धलेखन आहे.)

फारच वैयक्तिक असेल तर सोडून द्या.

मुंबईमधील मुळचे मध्यमवर्गीय म्हणजे सोमवंशीय क्षात्र प्रभू.(S K P). म्हणूनच बहुधा यातल्या कांहींचि आडनावं दादरकर, चेंबुरकर, कुर्लेकर अशी असावीत. आम्ही त्यातले नाहीं पण आमची पांचवी पिढी आज कुर्ल्यात आहे. कोकणात आमच्या मुळगांवी आमच्या कुटुंबाला “कुर्लेकर” व कधीकधी “कुर्लेकार” म्हणून संबोधितात. या पैकी मी दुसरं नांव घेतलं; यांत 'कर' ऎवजी 'कार' असल्याने ते थोडसं जास्त ‘हेल’ काढल्यासारखं वाटतं, म्हणजेच जरा जास्त कोकणातलं वाटतं. शिवाय त्यामुळे कुर्लेकर या typical एस के पी नावाशी होऊ शकणारा mix up देखिल टळला.

पैसा's picture

21 Mar 2014 - 10:55 pm | पैसा

चांगलं लिहिताय!