भाषा - आपली सर्वांचीच

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
15 Jan 2014 - 4:45 pm

नुकतंच (म्हणजे दहा मिंटं झाली असतील) अविनाश बिनीवाले यांचं 'भाषा - आपली सर्वांचीच' हे पुस्तक वाचून पूर्ण केलं. (अजून एक लिंक) आणि मराठी भाषेविषयीचा (खरंतर इतरही अनेक भाषांविषयीचा) दृष्टीकोन काही बाबतीतं नव्याने उमगला, काही बाबतींत दृढ झाला, काही बाबतीत तो पूर्णपणे बदलला. अविनाश बिनीवाले यांचे 'लोकसत्ता' मध्ये जुलै १९९८ ते डिसेंबर १९९९ या काळात भाषाविषयक सदरांत ७८ लेख प्रकाशित झाले. त्यातल्या काही (४७) लेखांचं संकलन करून या पुस्तकाची निर्मीती झालेली आहे.

पुस्तकाच्या सुरुवातीला सरोजिनी वैद्य यांचे निवेदन वाचताना हे पुस्तक कदाचित माहितीपूर्ण पण पुढेपुढे कंटाळवाणं आणि क्लिष्ट होत जाणारं असावं, असा उगाचच माझा ग्रह झाला होता. अर्थात, 'आता हातात घेतलंय तर बघूया वाचून... कंटाळा येईस्तोवर जेवढं वाचू तेवढी तरी ज्ञानात भर पडेल' असा विचार करून मी हे पुस्तक जे काल रात्री जेवल्यानंतर वाचायला सुरुवात केली, तो रात्री तीन वाजून गेल्यावर आजीने उठून 'झोप आता' असं बोंबलायला सुरुवात केल्यानंतरही मला ते पुस्तक ठेववेना... शेवटी मी झोपल्याशिवाय आजी झोपायला जाईना म्हणून नाईलाजास्तव ते पुस्तक ठेवलं आणि आज वाचून पूर्ण केलं. १४७ पानांच्या या पुस्तकांत मराठी आणि इतर भाषांविषयीच्या ब-याच गमतीजमती, लोकांचे होणारे गोंधळ, गैरसमज, एखाद्या भाषेच्या स्वरूपावरून त्या समाजाच्या इतिहासाचा अंदाज इ. गोष्टी मस्त (पण थोडक्यात) रंगवून सांगितल्या आहेत.

पुस्तक वाचताना स्वतःवर, स्वतःच्या आत्तापर्यंतच्या कैक गैरसमजांवर हसू आलं. प्रांतानुरूप, देशानुरूप हावभाषेच्या भाषेत कसा फरक असतो यापासून सुरूवात करून, भाषेची व्यक्तिनिष्ठ गोडी, उच्चारांच्या पद्धतींतली (आवश्यक) वैशिष्ट्य, जोडाक्षरं, अनुनासिकं, भाषेची शुद्ध-अशुद्धता (मी/आम्ही चहा/पाणी प्यायलो, किंवा ती चहा/पाणी प्यायली ही वाक्यं व्याकरणदृष्ट्या चुकीची आहेत. योग्य वाक्य 'मी/आम्ही/तिने/त्याने/त्यांनी चहा प्यायला किंवा पाणी प्यायलं' असं आहे. नियम साधा आहे, ही भूतकाळातली कर्मणी प्रयोगाची वाक्यं आहेत, पण हे सगळं माझ्यासारख्यां अनेक गाढवांच्या लक्षात यायला बिनीवालेंना हे पुस्तक लिहावं लागलं याबद्दल स्वतःची लाज आणि हे पुस्तक इतक्या उशीरा वाचनात आल्याबद्दल स्वतःची कीव करावीशी वाटली.)

नामांच्या, क्रियापदांच्या, धातुसाधित क्रियाविशेषणांच्या बाबतीत त्या-त्या प्रांतानुसारच्या भाषेतील गरजा लक्षांत घेऊन ती (नामं किंवा क्रियापदं) तयार होतात हे त्यांनी सोदाहरण मस्त समजावलंय. उदा. आपल्याकडे सख्खा, चुलत, आते, मामे, मावस भाऊ/किंवा बहीण असतात पण इंग्रजीत फक्त ब्रदर, सिस्टर आणि कजीन एवढेच शब्द उपलब्ध आहेत. (आणखीही उदाहरणं आहेत पण तीही मी लिहीली तर त्या पुस्तकातला तो लेखच इथे चोप्य पस्ते करतोय असं मलाच वाटेल म्हणून थांबतो)

भारतीय लिप्या कशा एकमेकांपेक्षा भिन्न आहेत, त्यापेक्षा युरोपात एकात्मता आणणा-या रोमन लिपी कशी उजवी आहे, असं म्हणणा-यांवर बिनीवालेंनी मस्त ताशेरे ओढले आहेत(अर्थात मुद्यांच्या आधारे). तसंच संगणकीय साक्षरतेबाबतीत चीन्यांचं उदाहरण दिलं आहे. (याबाबतीत त्यांनी जे लिहीलं त्यातून चीन्यांबद्दल नवीनच माहिती कळली मला... कमाल वाटली) आपल्या आणि इतरही देशांत भाषा आणि लिपी यातील फरकामुळे होणारे अनावश्यक भेदभाव आणि त्यांना घातलं जाणारं खतपाणी किती व्यर्थ आहे यावरही त्यांनी भाष्य केलेलं आहे(कच्छी ही गुजरातीची बोली नसून सिंधीची बोली आहे हे नव्यानं कळलं.) अरबीची सुरस कथा हा लेख विशेष वाचनीय वाटला मला.

तसंच कोणत्याही दोन भाषांमधल्या थोड्याफार साम्यांमुळे त्यातली एक भाषा आपल्याला येत असली म्हणजे दुसरीही शिकायला सोप्पी होईल असा कैक लोकांच्या होणा-या गैरसमजावर त्यांनी प्रकाश टाकला आहे. ['मी चाइ पिली' या रशियन वाक्याचा अर्थ 'आम्ही चहा प्यायला' असा होतो...]

पुस्तकाच्या शेवटी शेवटी मराठी आणि कन्नड यांचं आणि यांच्या भाषिकांचं नातं इतर भाषा आणि भाषिकांच्या तुलनेने किती जवळचं आहे हे स्पष्ट केलं.

पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कुठल्याही परकीय भाषेचं शिक्षण घेण्यापूर्वी स्वकीय भाषेचा पाया मजबूत का असावा, आणि मातृभाषेतून शिक्षण घेण्याचं महत्त्व हे त्यांनी सुंदररीत्या पटवून दिलं आहे. एकूणच पुस्तकात महत्त्वपूर्ण माहिती आणि दृष्टिकोन गमतीशीर आणि मनोरंजक पद्धतीनं मांडला आहे. हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांनी आवर्जून वाचायला(च) हवं.

भाषासाहित्यिकआस्वाद

प्रतिक्रिया

वडापाव's picture

15 Jan 2014 - 4:55 pm | वडापाव

देशानुरूप हावभाषेच्या भाषेत >>>>> हे 'देशानुरूप हावभावाच्या भाषेत असं वाचावं.

अनिरुद्ध प's picture

15 Jan 2014 - 5:02 pm | अनिरुद्ध प

हा लेख पूस्तक परीक्षण या सदरात लिहायला हवा होता,बाकी परिक्षण आवडले.

'परीक्षण' करणारा मी कोण?? असं वाटलं म्हणून त्या सदरात लिहीला नाही :)

अनिरुद्ध प's picture

15 Jan 2014 - 5:17 pm | अनिरुद्ध प

मग पुस्तक परिचय असे लिहीले तरी चालेल.(बाकी आपण पाडलेल्या जिलब्या मिपाकर खायला आपलं वाचायला आहेतच्,ह घ्या)