जीर्णनगरी मुशाफिरी : प्रसन्नगडाचे प्रसन्न दर्शन.

सुज्ञ माणुस's picture
सुज्ञ माणुस in भटकंती
24 Dec 2013 - 2:57 pm

जीर्णनगरी मुशाफिरी : चावंड किल्ला

बरेच दिवस जुन्नरच्या मुलखात भटकंती झाली नव्हती. नाशिक जिल्हा आता जवळपास संपवून मोर्चा वळवला तो जुन्नर कडे. एकंदर जुन्नर चा इतिहास बघता, सुमारे २००० वर्ष जुना हा प्रदेश म्हणजे 'भौगोलिकदृष्ट्या' आणि 'ऐतिहासिकदृष्ट्या' महाराष्ट्राचा शिरेटोप म्हणता येईल.
सातवाहन राजांच्या कालापासून हा प्रदेश प्रसिद्ध तर आहेच, पण महाराष्ट्रातील प्रदेश नागरी वस्तीखाली यायला, व्यापारदृष्ट्या येथून सुरुवात झाली असे कळते. तेव्हा हा प्रदेश सातवाहनांची उपराजधानी होती.
या परिसरात नाणेघाट व दाऱ्याघाट हे प्राचीन व्यापारी मार्ग, ९ तीर्थक्षेत्रे, भैरवगड, जीवधन, चावंड, हडसर, निमगिरी, ढाकोबा, शिवनेरी, नारायणगड, हरिश्चंद्रगड असे अभेद्य किल्ले, अष्टविनायक गणपती पैकी एक ओझरचा गणपती, लेण्याद्री,मानमोडी डोंगरातील बौद्ध लेणी, ५ धरणे आणि वाघ्र प्रकल्प आहेत. याजोडीला माळशेज घाट म्हणजे पावसाळ्यात स्वर्ग आहे.
यावेळी प्लान ठरला तो माणिकडोह धरणाचा परिसर. दोन दिवसात 'चावंड-कुकडेश्वर-जीवधन-नाणेघाट' आरामात करून दुसऱ्या दिवशी सातच्या आत घरात.

जायचे कसे?
पुण्यापासून : पुणे ते जुन्नर ST ने नवीन जुन्नर स्थानकावर उतरावे. जवळपास अडीच तास लागतात. तिकीट ९८रु. शिवाजीनगर पासून दर अर्ध्या तासाला बस असते. नवीन जुन्नर ST स्थानकापासून १६ किमी अंतरावर असलेल्या ह्या गडाच्या पायथ्याशी चावंड गाव वसलेले आहे. जुन्नर स्थानकापासून अंजानावळ वा घाटघर ST पकडून चावंड फाट्यावर उतरावे.
चावंड फाट्यापासून १५ मिनिटे चालत गेल्यावर चावंड गाव लागते. त्याच्या अलीकडेच किल्ल्याच्या पायऱ्या चालू होतात.

बघायचे काय ?

किल्ल्यावर जाताना लागणारा दगडात खोदलेल्या वाटा, पुष्करणी तलाव, २१ पाण्याची टाकी, सप्ततलाव, प्राचीन असे महादेव मंदिर, चावंडा देवी मंदिर, महादेव मंदिरावरील शिल्पे.,किल्ल्यावरून दिसणारे माणिकडोह धरण व आजूबाजूचा प्रदेश, वऱ्हाडी डोंगर, हडसर किल्ला.
किल्ला चढून पूर्ण फिरायला ४-५ तास पुरतात.

आम्ही दोनच टाळकी ट्रेक ला असल्याने काही ठरवावे लागले नाही. शनिवारी मी पुण्याहून सकाळच्या निवांत गाडीने साडे दहाला जुन्नर पोहोचलो. आणि मित्र कल्याणवरून साडे आठ च्या गाडीने जुन्नरला आला. तिथून लगेच अंजानावळ गाडी पकडून उतरलो चावंड किल्ल्याच्या पायथ्याशी.
.
पायथ्या पासून किल्ला फारच साधा वाटत होता. कॅमेरे बाहेर काढले, सामान तिथल्या एका घरात ठेवले आणी पायपीट चालू झाली.
रस्ता फारच सोपा असल्याने चुकणे झाले नाही. जाताना एक ग्रुप भेटला तो नुकताच वर जाऊन आला होता. त्यांच्याकडून टिप्स घेऊन आम्ही पुढे निघालो.
.
पायथ्यापासूनच काही उंचीपर्यंत सिमेंट च्या पायऱ्या बांधलेल्या आहेत. त्यामुळे रस्ता वैगरे चुकत नाही आणी सरळ जाऊन आपण एका मोठ्या रॉक पॅचला लागतो. पण खरेतर या पायऱ्यांनीच अर्धा जीव जातो.
जसे आपण थोडे वर वर जाऊ लागतो तसे चावंड गाव आणि माणिकडोह धरणाचे विहंगम दृश्य दिसू लागते. या धरणामुळे येथे पीक पाणी चांगले असून हा प्रदेश बऱ्यापैकी सधन आहे. दूरवर पसरलेला माणिकडोह धरणामुळे आजूबाजूचा परिसर अजूनही हिरवा होता. तसेच भर उन्हात हलकी थंडीही वाजत होती.
.
सुमारे अर्धा-पाऊण तासात आपण या रेलिंग पर्यंत येतो. जुन्या रेलिंग काढून येथे नवीन रेलिंग लावलेल्या आहेत. चक्क पर्यटन खात्यातील पैसे या कामासाठी वापरलेले आहेत ( म्हणजे त्यांनी मिळवले आहेत) असे सरपंचांकडून कळले.
एकावेळी एकच माणूस जाऊ शकेल अश्या या पायऱ्या कातळात खोदल्या आहेत. आता नवीन रेलिंग असल्याने त्या पूर्ण सुरक्षित आहेत. लावलेल्या रोपची हि गरज पडत नाही.
.
.
अवघड असा टप्पा ओलांडून गेलो आणि लगेच प्रशस्त अश्या मोठ्या पायऱ्या लागल्या. अत्यंत विचारपूर्वक खोदलेल्या त्या पायऱ्या आपल्याला थेट प्रवेशद्वाराशीच नेऊन ठेवतात.पहिले प्रवेशद्वार त्या पायऱ्यांच्या काटकोनात बांधलेले आहे. त्यामुळे खालून वा अगदी पायऱ्या चढून आले तरीही प्रवेशद्वार दृष्टीस पडत नाही. हा बुरूज प्रवेशद्वाराचे रक्षण करतो.
.
प्रवेशद्वारावर दगडी कमानीतच गणपती कोरलेला आहे. ह्या किल्ल्याच्या सर्वच द्वारांवर कोरलेले गणपती अजूनही तसेच सुबक आहेत. हे काम पेशव्यांचे असावे असे वाटते.
.
इथे मस्त जागा पाहून जरा वेळ निवांत बसलो. मग येथेच समान ठेवून फक्त कॅमेरे घेतले आणी पुढे निघालो.थोडे पुढे येताच घोड्यांसाठी पाण्याची सोय दिसली. याचा अर्थ एखादे तरी पाण्याचे तळे जवळपास असणार असा अंदाज लावताच समोर पुष्करणी तलाव नजरेस पडला.
येथून गडाला प्रदक्षिणा मारत आम्ही निघालो. तलावाच्या मागून बाजूने जाताना अजून दोन मोठी टाकी दिसली. या किल्ल्यावर तब्बल २१ पाण्याची टाकी असल्याने पाण्याचा नो प्रॉब्लेम.
आता इथूनच वरती दिसणाऱ्या छोट्याश्या टेकडीवर आम्ही निघालो. याच टेकडीवर चावंडादेवीचे मंदिर आहे.
.
.
सुमारे पंधरा मिनिटात आम्ही वरती पोहोचलो.देवीचे दर्शन घेऊन जरा वेळ टेकलो. मस्त सावली पडली होती आणि गार वारा वाहत होता. मंदिरासमोरील दगडावर हे महाशय निवांत पडले होते.
.
गडाच्या सर्वोच्च असलेल्या चावंडा देवीच्या मंदिरापासून समोरच हडसर किल्ला दिसत होता. किल्ल्यावरच खाली बघितले तर सप्ततलाव दृष्टीस पडले.
.
ऊन सावलीचा खेळ चालूच होता.
.
आता इथून उतरून खाली आलो. थोडेसे पुढे जाऊन लगेचच महादेव मंदिर लागले. याची पूर्णतः पडझड झाली असली तरी पडलेल्या दगडांच्या आकारावरून त्यावरचे सुरेख कोरीवकाम लक्षात येते. हे मंदिर हि खूप जुने असले पाहिजे. जुन्या काळचे कोरीवकाम आणि दगडांची रचना केवळ अद्भुत.
.
हरिश्चंद्र किल्ल्यावरील मंदिरासमोरील तलाव आणी ह्या महादेव मंदिरासमोरील तलाव जवळपास सारखेच आहेत. दोन्ही मंदिरे ही एकाच 'शिलाहार' राजघराण्याच्या झांजराजाच्या कारकीर्दीत बांधली गेली असल्याने त्यांची सप्त-देवतांची रचना सारखी असावी. खाली फोटोत असल्याप्रमाणेच सप्तदेवता असलेले दगडात आत खोदून केलेली छोटी मंदिरे जुन्नर मधील बऱ्याच किल्ल्यावर आढळतात.
साधारण इस. ७५० च्या आसपास शिलाहारांनी वंशाच्या राजांनी हे मंदिर बांधले असावे. महादेव मंदिरात ही एकाच दगडात कोरून तयार केलेली पिंड दिसते.
.
मंदिरासमोरच एक डोकं नसलेला नंदी आहे त्यावरून हे महादेव मंदिर ओळखता येते.
.
मंदिराची पूर्ण पडझड झाली असली तरी आजूबाजूस पडलेले पुरातन अवशेष आणि दगडावर केलेले नक्षीकाम केवळ पाहत राहावे असे आहे. ते पाहून मनात प्रश्न पडतो की त्या वेळचे कारागीर सुद्धा किती लॉयल, प्रामाणिक असतील राजाशी. एवढ्या उंचावर चढत येऊन असे काही कोरीवकाम करायचे यावरून त्यांची राजावर किती निष्ठा असावी हे कळते.
.
आणखी खोलात जाऊन त्या नक्षीकामाची महानता लक्षात येते. एवढे डिटेल काम करायला किती वेळ लागत असेल? पण "आपल्या राजाचे काम करायचेय" अश्या भावनेनेच अशी कामे होत असावीत. केवळ अद्भुत !
येथे जोडूनच जवळपास १० तळी आहेत. बहुतांश तळ्यात पाणी शेवाळामुळे हिरवट झाले आहे. ( दामले मास्तरांची आठवण झाली. :) )
.
येथून म्हणजे महादेव मंदिरापासून खाली गेले की सप्ततलाव दिसतात. किल्ल्यावर जाऊन हे तलाव अजिबात चुकवू नये असे आहेत.या सप्त-तलावाच्या सुरवातीला पहिल्या तलावास प्रवेशद्वार खोदलेले असून त्यावरही एकदम सुबक असा गणपती कोरला आहे. प्रवेशद्वाराला हडसर किल्ल्याच्या प्रवेशद्वारा सारखीच नक्षीकाम केले आहे. एक मात्र जाणवले की, जुन्नर मधले जवळपास सर्वच किल्ल्यांच्या प्रवेशद्वाराची ठेवण आणि स्थापत्यकला सारखीच आहे.
.
पडक्या कोठाराच्या अवशेष पाहून थोडे पुढे गेल्यास हे एकाला एक जोडलेले सप्ततलाव दिसतात. वर्षभर किल्ल्यावर पाण्याची अजिबात टंचाई होत नसावी. यातले पाणी बरेच चांगले आहे. पिण्यासाठी वापरण्याजोगे आहे.
सप्ततलाव:
.
.
'स्वतःच प्रतिबिंबात माणूस एवढा का रमतो हे काही अजून उलगडले नाहीये.
.
दीड वाजता चढायला सुरुवात करूनही ५ वाजेपर्यंत संपूर्ण किल्ला पाहून झाला. मग किल्ला उतरून कुकडेश्वर मंदिराकडे प्रयाण केले. रस्त्यात ST वा जीप मिळावी म्हणजे पायपीट वाचेल असा विचार आला तेवढ्यात 'जगातील दहावे आश्चर्य' अवतरले. पण आमचा हा खास मित्र नेमकी उलट्या दिशेने चालला होता. त्याने हॉर्न वाजवूनच आम्हाला पुढच्या ट्रेक ला शुभेच्छा दिल्या.
.
मग अजून कोणाची वाट न बघता सरळ कूकडेश्वर मंदिराचा रस्ता धरला आणि चालत सुटलो.

बसच्या वेळा :
चावंड, कुकडेश्वर, नाणेघाट जाण्यासाठी :
१. जुन्नर ते घाटघर/अंजनावळ : सकाळी १०, दुपारी- १२:३०, २, ५, ७:३० (शेवटची गाडी मुक्कामी अंजनावळ)
२. जुन्नर ते कुकडेश्वर : सकाळी ११, दुपारी ३:३०
नाणेघाट ते जुन्नर जाण्यासाठी :
१. अंजनावळ (घाटघर फाटा) ते जुन्नर सकाळी -११, दुपारी -३:३०, ५:३०

पुढचे लेख :
जीर्णनगरी मुशाफिरी : पांडवकालीन कुकडेश्वर मंदिर
जीर्णनगरी मुशाफिरी : जीवधन, नानाचा अंगठा, नाणेघाट

सागर
http://sagarshivade07.blogspot.in/

प्रतिक्रिया

जेपी's picture

24 Dec 2013 - 3:02 pm | जेपी

आवडला.

सुहास..'s picture

24 Dec 2013 - 3:10 pm | सुहास..

मुशाफिरी आवडली ...

पुढच्या भाग ही येवु द्यात

तुम्ही ज्याला नंदी म्हणताय तो मला यज्ञवराहासारखा वाटतोय. मला त्यातलं काही कळत नाही पण नंदीचं फक्त धडच म्हणावं तर त्यावर वशिंड का काय म्हणतात ते दिसत नाही. कॉलिंग वल्ली !!

प्रचेतस's picture

24 Dec 2013 - 3:47 pm | प्रचेतस

नंदीच आहे तो.
यज्ञवराहाच्या संपूर्ण शरीरावर विष्णूमूर्ती कोरलेल्या असतात.

सुज्ञ माणुस's picture

25 Dec 2013 - 4:24 pm | सुज्ञ माणुस

यज्ञवराह कसा असतो? मी कधीच पाहिलेला नाही. एखादा फोटू असेल का ?

प्रचेतस's picture

25 Dec 2013 - 6:08 pm | प्रचेतस

हा बघा पिंपरी दुमाला येथील भग्न यज्ञवराह.

a

आणि हा लोणी भापकर येथील देखणा यज्ञवराह
a

या दोन्ही सहली आपल्या मिपाकरांसोबतच झाल्यात.

सुज्ञ माणुस's picture

26 Dec 2013 - 10:14 am | सुज्ञ माणुस

अरे फारच भारी आहे हे, मी कधीच पहिले नव्हते. हे लोणी भापकर कुठे आहे? जाऊन बघतोच. :)

प्रचेतस's picture

26 Dec 2013 - 10:24 am | प्रचेतस

धन्यवाद.

लोणी भापकर येथील मध्ययुगीन मंदिरांवर मी यापूर्वी येथेच अल्पसे खरडले होते.

लोणी भापकरची मध्ययुगीन मंदिरे

सुज्ञ माणुस's picture

26 Dec 2013 - 11:32 am | सुज्ञ माणुस

भारी लिहिला आहे हा लेख, खरच पुण्याच्या जवळ असून याबद्दल माहिती नव्हते. बाकीचे फोटो पण मस्त! पण त्या यज्ञवराहा साठी जायलाच पाहिजे. :)

सूड's picture

27 Dec 2013 - 3:37 pm | सूड

जरा ही लिंक बघ बरं !! वरच्या नंदीच्या (?) फोटोत पण पाय जिथे सुरु होतात तिथे या लिंकमधल्या मूर्तीत दाखवल्या प्रमाणे विष्णूमूर्तीच कोरल्या सारख्या वाटत आहेत.

हा यज्ञवराह दिसतोय तर खरा पण बहुधा नंदीच असावा. कान बघ त्याचे. यज्ञवराहाचे आणि एकूणच वराहांचे कान लहानच असतात. चाकणच्या चक्रेश्वर मंदिरात यज्ञवराह आहे पण तो हा नाही. त्याच्या शरीरावरच्या झूलीवर विष्णूमूर्ती आहेत.

तो फोटो त्या मूर्तींजवळ झूम करता आला तर त्यांची लक्षणे बघून नक्की काय ते सांगता येईल.

हा माझा मित्र अभिजीत राजाध्यक्ष याने काढलेल्या चक्रेश्वर मंदिर येथील यज्ञवराहाचा फोटू.

a

प्रचेतस's picture

24 Dec 2013 - 3:34 pm | प्रचेतस

वर्णन आवडले.
चावंडच्या ह्या सिमेन्ट पायर्या हल्लीच केलेल्या दिसताहेत. गडाचे सौंदर्य बिघडलेय त्यामुळे.
मानमोडी डोंगरातल्या गुहा ह्या जैन नसून बौद्ध लेणी आहेत. त्यामध्ये एका गुहेत नहपान क्षत्रपाच्या अमात्याचा शिलालेख आहे ज्यात नहपानाला महाक्षत्रप असे संबोधीले आहे.
मंदिराच्या अवशेषांवर शिलाहार किंवा यादवराजांनी बांधलेले असावे हे स्पष्टच आहे. शिलाहारांचीच शक्यता जास्त आहे पण इ.स. ७५० मधले तर नक्कीच नाही. उत्तर कोकणच्या शिलाहारांची कारकिर्द सुरु झाली ते साधारण इ.स. ७९० च्या सुमारास.

सुहास..'s picture

24 Dec 2013 - 5:53 pm | सुहास..

हे क्षत्रप म्हणजे काय ?

सामान्य मिपाकर :)

बॅटमॅन's picture

24 Dec 2013 - 6:00 pm | बॅटमॅन

महाराष्ट्र, गुजरात अन राजस्थान व माळव्याचा काही भाग एवढ्या भागावर या लोकांचे जवळजवळ साडेतीनशे वर्षांपर्यंत राज्य होते. ते स्वतःला क्षत्रप म्हणवीत.

मूळचे मध्य आशिया आन आसपासच्या भागातले. क्षत्रप या शब्दाचा उगम इराणी साम्राज्यात आहे. (तेच ते ३०० वालं पर्शियन साम्राज्य) अर्थ आहे प्रोव्हिन्शिअल गव्हर्नर.

क्षत्रप म्हणजे क्षेत्राधिपती अथवा प्रांताधिपती. हा पर्शियन भाषेतील क्षत्रपन (क्षत्र - राष्ट्र, पन - पालन करणे) यांपासून बनलेला आहे.

अशोकाच्या मृत्युनंतर मध्यपूर्वेकडून शक हूण इत्यादी धर्मविहीन रानटी टोळ्यांची आक्रमणे भारतावर होऊ लागली. कुषाणवंशीय कनिष्काने उत्तर भारतावर कब्जा केल्यावर ह्या शकांना आपलेसे केले व त्याच्या ताब्यातल्या उज्जैन, माळवा आदी प्रांतांवर ह्या विविध शक टोळीप्रमुखांची क्षत्रप म्हणून नेमणूक केली. त्यातलाच हा एक क्षत्रप - नहपान क्षत्रप.

नाशिकच्या पांडवलेणीतील नहपान विहारात (लेणी क्र. १०) नहपानाचा जावई ऋषभदत्त व नहपानाची पुत्री दक्षमित्रा या दोघांचे अनेक लेख आहेत.

हा शके ४२ चा लेख.

सीधं | राञो खखरातस क्षत्रपस नहपानस दीहि-
तु दीनीकपुतस उषवदातस कुडुंबिनिय दखमित्राय देयधमं ओवरको |

सिद्धी असो, क्षहरात क्षत्रप राजा नहपान याची कन्या आणि दिनीकापुत्र ऋषभदत्त याची पत्नी दक्षमित्रा हिने या ओवरीसाठी (लेण्यातील वरांडा) साठी दान दिले आहे.

तर मानमोडी लेणीत नहपानाचा अमात्य अर्यमाचा शके ४६ मधला शिलालेख आहे.

राञो महाखतपस सामिहनपानस
आमतस वछसगोतस अयमस
देयधम च पोढि मटपो पुञथय वसे ४० + ६ कतो

राजा महाक्षत्रप स्वामी नहपानाच्या वत्सगोत्री अर्यम अमात्याने हे टाके व हा मंडप(विहार) पुण्य मिळवण्यासाठी धर्मादाय (दान) दिला आहे. वर्ष ४६.

म्हणजे साधारण ह्या मधल्या कालावधीत नहपानाचे क्षत्रप पद जाऊन त्याला महाक्षत्रप अशी उपाधी मिळालेली दिसते कारण ह्याच काळात त्याचा राज्यविस्तारही झालेला दिसतो. पण हेच वर्ष त्याच्या कारकिर्दीचे शेवटचे वर्ष ठरले. लवकरच सातवाहनांचा सर्वश्रेष्ठ राजा गौतमीपुत्र सातकर्णीने नाशिकजवळ नहपानाचा संपूर्ण पराभव करून 'क्षहरात वंस निर्वंस करस' असे बिरूद मिळविले.

सुज्ञ माणुस's picture

25 Dec 2013 - 4:28 pm | सुज्ञ माणुस

माहिती बद्दल धन्यवाद वल्ली. इ.स. ७५० चा उल्लेख कुठेतरी वाचण्यात आला. पण तुमचे शिलाहार विषयीचे लेख वाचले. फारच मस्त माहिती आहे.

बॅटमॅन's picture

24 Dec 2013 - 3:38 pm | बॅटमॅन

आजवर न पाह्यलेला किल्ला! धन्यवाद.

यशोधरा's picture

24 Dec 2013 - 3:58 pm | यशोधरा

मस्त!

अत्रुप्त आत्मा's picture

24 Dec 2013 - 4:01 pm | अत्रुप्त आत्मा

हा भाग अवडला... पु.भा.प्र. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Dec 2013 - 4:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त !

मुक्त विहारि's picture

25 Dec 2013 - 8:03 pm | मुक्त विहारि

पण....

ह्या मुद्दाम गहन विचार कर्रून मुर्ती फोडलेल्या बघीतले की कसेसेच होते....

असो...

प्यारे१'s picture

26 Dec 2013 - 2:01 pm | प्यारे१

सु रे ख फोटोज!

वल्ली नि इतरांनी दिलेली माहिती देखील अभ्यासपूर्ण.

पैसा's picture

26 Dec 2013 - 6:29 pm | पैसा

लिखाण आणि फोटो फार छान आलेत! शिवाय प्रतिसादातील माहितीमुळे लेख आणखी सुशोभित झाला आहे!

मोठे सुरेख यज्ञवराह अंदाजे चारफूटी मध्यप्रदेशात आहेत .
१ग्वालिअर किल्याच्या पायथ्याला गुजरी महाल संग्राहलयात
२खजुराहो येथे ,कंदेरिआ महादेव मंदिर परिसर .

गणपा's picture

27 Dec 2013 - 3:24 pm | गणपा

सुरेख फोटो.
वर्णन आणि फोटो पाहुन 'विमुक्त'ची आठवण झाल्यावाचुन राहीली नाही.