अश्वत्थामा, व्यासांचा आणि जीएंचा!

Atul Thakur's picture
Atul Thakur in जनातलं, मनातलं
9 Dec 2013 - 9:39 pm

जीएंना महाभारताचे खुप आकर्षण होते हे आता सर्वश्रुत आहे. प्रतिभावंताचा विषय निघाला की जीए हटकुन व्यासांचे नाव घेत. जीएंच्या कथांमध्ये काही ठिकाणी महाभारताचे संदर्भ आलेले आढळतात. त्या उपमांनी, संदर्भांनी जीएंच्या कथांना एक वेगळीच श्रीमंती बहाल केलेली दिसते. त्यादृष्टीने जीएंची पत्रे महत्वाची आहेत. विशेषतः सुनिताबाईंना लिहिलेल्या जीएंच्या पत्रांत त्यांनी महाभारतावर, त्यातील व्यक्तीरेखांवर चर्चा केली आहे. ज्या तर्‍हेने जीए या विषयावर लिहितात त्यावरुन हे जाणवते की महाभारत हा त्यांच्या सततच्या चिंतनाचा विषय असावा. त्यांनी त्यावर स्वतंत्रपणे लिहिले असते तर आमच्यासारख्या जीएप्रेमींना आणखि एक खजिना कायमस्वरुपी प्राप्त झाला असता. आणि तो ही अक्षय असा. कारण जीएंचे लिखाण कितीही काळानंतर पुन्हा पुन्हा वाचले तरी त्यात नवीन काहीतरी मिळतेच. मात्र बारकाईने पाहिले असता हे जाणवते कि जीए त्यातील सर्व व्यक्तीरेखांबद्दल भरभरुन बोलत नाहीत. कर्णाच्या दु:खाने जीए विचलित झाले नाहीत. वेदनेचे वरदान मागणार्‍या कुंतीचे दु:ख जीएंना फारसे आकर्षित करु शकले नाही. फार काय, महाभारतातील तत्वज्ञांचा मेरुमणी जो कृष्ण, त्याच्याबद्दलही जीए फारसे बोलताना आढळत नाहीत. जीए बोलतात ते अश्वत्थाम्याबद्दल. आणि ते बोलत असताना त्यांच्या स्वतंत्र प्रतिभेने त्यावर ते स्वतःचे असे वेगळे भाष्य करतात. ते वाचताना पुनःपुनः हे म्हणावेसे वाटते कि यावर जीएंनी स्वतंत्र लिहायला हवे होते. जीएंना महाभरतात हे व्यक्तीरेखा का भावली? त्या व्यक्तीरेखेला व्यासाने जसे रंगवले आहे त्याहुन वेगळे असे जीएंनी त्यात काय शोधले? जीएंच्या स्वतःच्या तत्वज्ञानाशी जुळणारी अशी ही व्यक्तीरेखा त्यांना वाटली असावी काय? या प्रश्नांचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे.

व्यासांनी जो अश्वत्थामा रंगविला आहे त्याला फारसे कंगोरे नाहीत अशी माझी समजुत आहे. मात्र त्याच्याशी निगडीत जनमानसातील पाण्यात पीठ मिसळुन ते दुध म्हणुन अश्वत्थाम्याला प्यावे लागत असे ही कथा प्रसिद्ध आहे. तेथपासुन अश्वत्थाम्याच्या उल्लेखाला प्रामुख्याने सुरुवात होते. या कथेने अर्थातच द्रोणाचे दारिद्र्य अधोरेखित केले जाते. त्यानंतर पुढे इतर कौरव पांडव यांच्याबरोबर त्याचा पिता द्रोण त्याला शिक्षण देतो. त्यातदेखिल त्याने फारशी चमक दाखवल्याचे दिसत नाही. कपटाने वागुन पोटच्या मुलाला जास्त शिक्षण देण्याचा द्रोणाचा डाव अर्जुन हाणुन पाडतो. मात्र पुढे स्वतः द्रोणाला देखिल आपल्या मुलाच्या पराक्रमावर भरवसा वाटत नसावा, कारण द्रुपदाच्या पराभवासाठी द्रोण सर्वस्वी आपल्या इतर शिष्यांवर, विशेषतः अर्जुनावर अवलंबुन असतो. यानंतर व्यासप्रणित महाभारतात अश्वत्थाम्याचा प्रामुख्याने उल्लेख येतो तो युद्धप्रसंगीच. तेथेही या महाक्रमी चिरंजीव द्रोणपुत्राकडुन डोळे दिपुन जातील असे काहीही घडत नाही. अजुनपर्यंतचा त्याचा प्रवास हा वडीलांसोबत असावे, दुर्योधनाचे मीठ खाल्ले आहे त्यानुसार खाल्ल्या मीठाला जागावे असाच झालेला दिसतो. त्यानंतर अश्वत्थामा प्रामुख्याने दिसतो ते युद्धाच्या शेवटी, रात्री कपटाने धृष्टद्युम्न आणि द्रौपदीच्या पाच पुत्रांना मारताना. तोपर्यंत त्याचा प्रवास सामान्य असाच झाला आहे. त्याच्या नावावर नजरेत भरेल असा पराक्रम नाही आणि त्याच्याबद्दल शिसारी वाटेल असे कृष्णकृत्यही नाही.

पुढे त्याच्या हातुन द्रौपदीचे पुत्र आणि भाऊ धृष्टद्युम्न मारले जातात. त्याच्या मस्तकावरील मण्यासाठी द्रौपदी अडुन बसते. अर्जुन समोर येताच अश्वत्थामा ब्रम्हास्त्र सोडतो. त्याला तोड म्हणुन अर्जुनही ब्रह्मास्त्राचाच प्रयोग करतो आणि जगाच्या अंताची वेळ येते. त्यावेळी व्यास मध्ये पडुन उभयतांना ती शस्त्रे परत घ्यायला सांगतात. अस्त्रांमध्ये निपुण अर्जुनाला ते परत घेण्याचीही विद्या माहीत असते. मात्र अश्वत्थाम्याला ते परत घेता येत नाही. तो ते अस्त्र उत्तरेच्या गर्भावर सोडतो. कृष्ण उत्तरेच्या गर्भाला वाचवतो आणि अनंत काळ पर्यंत ही ओली जखम बाळगत हिंडत राहशील अशा तर्‍हेचा शाप कृष्ण अश्वत्थाम्याला देतो.त्यानंतर कृष्णाला मस्तकावरील मणी देऊन तो तेथुन निघुन जातो. जनमानसात आजदेखिल अश्वत्थामा नर्मदातीरावर फिरत असल्याचा समज आहे. तो जखमेवर लावण्यासाठी तेल मागत हिंडतो. नर्मदा परिक्रमेत अश्वत्थामा दिसल्याच्या कथादेखिल प्रसिद्ध आहेत. खुद्द जीएंनी सुनिताबाईंना लिहिलेल्या पत्रात आपला अश्वत्थाम्याबद्दलचा अनुभव वर्णिलेला आहे. अशा या अश्वत्थाम्याच्या या आयुष्यावर वेगळा प्रकाशझोत पाडला तो सर्वप्रथम “युगान्त” मध्ये इरावती कर्वे यांनी. “परधर्मो भयावहः” या लेखात ईरावती बाईंनी द्रोण-अश्वत्थामा हे पितापुत्र विस्मृतीचे उत्तम उदाहरण असल्याचे म्ह्टले आहे. ब्राह्मण असुन क्षत्रियांचा धर्म पाळणारी आणि तो पाळताना स्वधर्म विसरुन गेलेली ही पराक्रमी माणसे. द्रोणाने क्षत्रिय धर्म पाळताना कुणालाही दयामाया दाखवली नाही. पुत्राने तर रात्री कपटाने माणसे ठार करुन पुढची पायरी गाठली.

जीएंचा अश्वत्थामा मात्र व्यास आणि ईरावतीबाईंच्या अश्वत्थाम्याहुन सर्वस्वी वेगळा आहे. जीएंना सर्वप्रथम या व्यक्तीरेखेतले कारुण्य जाणवले आहे ते पीठ मिसळलेले पाणी दुध म्हणुन आनंदाने पिणार्‍या लहान अश्वत्थाम्याकडे पाहुन. आयुष्यात बराच काळ दारिद्र्य भोगणार्‍या आणि त्याच्या वेदना आपल्या कथेत मांडणार्‍या जीएंना यातील कारुण्य जास्त भेदक वाटल्यास नवल नाही. मात्र वेदनेचा हा प्रवास येथेच संपत नाही. जीए सुनिताबाईंशी चर्चा करताना म्हणतात कि त्यांना कथा या नुसत्या माणसांच्या नको असतात. नुसती माणसे नव्हे तर काही एक विशिष्ठ सिच्युएशनमध्ये सापडलेली माणसे. कुणीतरी काहीतरी बोलतो आणि आमच्यासारख्या सामान्यांच्या मनात आयुष्यभर अंगार धुमसत राहतो असेही एका ठिकाणी जीए म्हणुन जातात. जीएंचे कथानायक घेतले तरी आपल्याला हेच आढळुन येते. “वीज” मधला बळवंत मास्तर हा सर्कशीतल्या मग्रुर सुंदरीकडुन अपमानीत झालेला आहे. “पुरुष” मधील प्राध्यापक निकम तर त्यांच्या अपमानास्पद भुतकाळापासुन सुटण्यासाठी धडपडत आहेत आणि नेमक्या विश्वनाथच्या रुपाने तो भुतकाळ पुन्हा त्यांच्या समोर उभा राहतो. आता त्यातुन त्यांची सुटका नाही. “तळपट” मधील दानय्या आपल्याला देशोधडीला लावणार्‍या रुक्मीणीला शोधत हिंडतो. त्याला ती शेवटपर्यंत मिळतच नाही, ती आग पोटात घेऊनच त्याचा शेवट होतो. सारी विशिष्ठ सिच्युएशनमध्ये सापडलेली माणसे. लेखकाच्या खाजगी जिवनात डोकावण्याचा अगोचरपणा करावासा वाटत नाही त्यामुळे इतकेच म्हणुन थांबतो की जीएंनी स्वतः आपल्या आयुष्यात खुप खुप भोगले आणि त्या दु:खातुन ते शेवटपर्यंत कधीही बाहेर पडु शकले नाहीत. विशिष्ठ सिच्युएशनमध्ये सापडलेला एक माणुस खुद्द जीएंच्यातच होता.

या माणसांची दु:खे शाश्वत आहेत. त्यांची सुटका नाही. मृत्युनंतरच कदाचित सुटका असल्यास असेल. मृत्युनंतर उरणारा सांगाडा, शेवटी तोही विरुन जाईल आणि शेवटी उरणारे शुन्य असा उल्लेख जीएंनी केला आहे. जीएंना मृत्युनंतरच कदाचित या दु:खाची समाप्ती होते असे वाटत असावे त्यामुळे त्यांना मृत्यु आणि आत्महत्या या विषयांचे आकर्षण होते. त्यांची नियती शरणता ही त्यांनी भोगलेल्या आणि कधीही न संपणार्‍या वेदनेतुन आली असावी. या कधीही न संपणार्‍या वेदनेचा दाह सोसणारा चिरंजीव अश्वत्थामा जीएंना महाभरतात भेटला. तो त्यांना जवळचा वाटला. अश्वत्थाम्याच्या वेदनेला क्षमेचे वरदान नाही. कसल्याही सावलीची शीतलता नाही. तात्पुरता विसावा नाही. त्याच्या कपाळी आहे ते सतत हिंडणे. ओली वाहाती, कधीही बरी न होणारी जखम कपाळावर बाळगत फिरत राहणे. जखमेचा दाह असह्य झाल्यास त्यासाठी लोकांकडे तेलाची भीक मागणे. ती झाकण्यासाठी त्यावर कापड गुंडाळणे. पण त्याहीपेक्षा एक महाभयानक शिक्षा त्याच्या कपाळी आहे. ती म्ह्णजे पश्चात्तापाची शिक्षा. “इस्कीलार” मध्ये जीए “प्रत्यक्ष आघातापेक्षाही असह्य अशी पश्चात्तापाची शिक्षा त्याने मागे ठेवली” असे लिहितात. अश्वत्थामा चिरंजीव आहे म्हणुन त्याची वेदनाही चिरंजीव आहे. अशा या अश्वत्थाम्याची व्यक्तीरेखा ही जीएंना महाभारतातील intriguing personality वाटत होती.

मात्र जीए तेथेच थांबले नाहीत. त्यांनी कथेत त्यांच्या अश्वत्थाम्याला राजपुत्र गौतमाजवळ आणले. राजपुत्र आपल्या राज्यातील वृद्ध माणसे, त्यांच्या जरा व्याधी आणि मृत्यु पाहुन उदास, विषण्ण झाला होता. त्यावर उपाय शोधण्याच्या मर्गावर असतानाच त्याला जीएंचा अश्वत्थामा भेटतो. मृत्युवर उपाय शोधणार्‍या गौतमाला चिरंजीव असण्याची वेदना माहीत असण्याचे कारणच नसते. अश्वत्थामा त्याला मृत्युमुळे जिवन किती सुखावह होते ते समजवतो. आणि विस्मयात पडलेल्या गौतमाला “मी अश्वत्थामा आहे” अशी ओळख देऊन निघुन जातो. मानवी जिवनात चिरंतन स्थान असलेली वेदना जिवंतपणी संपली नाही तर दयाळु मृत्यु त्यातुन मानवाची सुटका करतो. मात्र जीएंच्या अश्वत्थाम्याला हाही मार्ग मोकळा नाही. त्याला अनंत काळ जंगलात हिंडतच राहावे लागणार आहे. अशा या अश्वत्थाम्याच्या वेदनेला जीएच सर्वार्थाने जाणु शकले. म्हणुन तर त्यांनी “पिंगळावेळ” मध्ये सुरुवातीलाच Shallow people demand variety — but I have been writing the same story throughout my life, every time trying to cut nearer the aching nerve. – Strindberg हे वाक्य टाकले आहे. जीएंच्या आयुष्यात ही दुखरी नस सतत मनस्ताप देत राहीली. त्या दु:खाला जाणुन घेण्यासाठी त्यांनी त्याच्या मुळाशी, अगदी गाभ्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला, त्यातुन अजरामर साहित्य निर्माण झाले मात्र जीएंच्या वेदनेचा अंत झाला नाही. जीएंचे अश्वत्थाम्याशी वेदनेचे नाते होते असे मला वाटते.

अतुल ठाकुर

साहित्यिकलेख

प्रतिक्रिया

निमिष ध.'s picture

9 Dec 2013 - 10:50 pm | निमिष ध.

लेख अतिशय आवडला. अश्वत्थाम्याबद्दल सतत कुतुहल आणि कणव वाटत आलेली आहे. तुमच्या लेखामुळे एक चिरंतन वेदना असलेल्या चिरन्जीवाचि नविन बाजू कळली.

Atul Thakur's picture

10 Dec 2013 - 10:21 am | Atul Thakur

आभारी आहे :)

राघव's picture

9 Dec 2013 - 11:28 pm | राघव

आवडला. जीएंच्या कथा समजून घेण्यातच माझी ताकद खर्च होते अन् मग मी ते पुस्तक बाजूला ठेवतो असे अनेकदा झालेय हेही खरे. कदाचित माझी तेवढी बुद्धी नसावी. पण जीएंच्या ज्या काही कथा मला कळल्या त्यातली ही अश्वत्थाम्याची कथा माझी फार आवडीची. उजाळा दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! :)

राघव

Atul Thakur's picture

10 Dec 2013 - 10:20 am | Atul Thakur

धन्यवाद :)

अर्धवटराव's picture

10 Dec 2013 - 12:10 am | अर्धवटराव

जीएंचं अश्वत्थाम्याशी दु:खाच्या धाग्याने जोडणं फार सुंदर मांडलं आहे तुम्ही. लेख खुप आवडला.

काहि बाबतीत मला तर्कसंगती लागत नाहि (कदाचीत या गोष्टी तर्काने बघु देखील नये). अश्वत्थाम्याला शाप दिला श्रीकृष्णाने. श्रीकृष्ण म्हणजे निसर्गाच्या स्वभावात सर्वत्र समतोल राखण्याची जी अलिप्त आणि तटस्थ प्रेरणा आहे तिचं प्रतीक. त्याशिवाय कृष्णाकडे असा चिरंतर टिक्णारा शाप देण्याची शक्तीच नसती. मग प्रश्न असा उरतो कि अश्वत्थाम्याला हा अनंतकाळचा शाप का मिळाला? इक्वेशनच्या एका बाजुला अश्वत्थामा आपली भळभळती जखम घेऊन जगतोय, तर दुसर्‍या बाजुला या समीकरणाला कोण आणि काय कंपन्सेट करतय? ख्रीस्त आपल्या भक्तांचं दु:ख भोगायला म्हणुन क्रॉसवर लटकला आहे. आणि ते अनंत काळाचं वचन ख्रिस्ताने देऊन ठेवलं असेल. पण वरवर पाहता अश्वत्थामाचं कृत्य हे अनंत काळ परिणाम साधणारं नव्हतं. महायुद्धात एका राजवंशाचा नि:पात होणं काहि नवीन नाहि. एका ब्राह्मणाने, ब्रह्मास्त्राने हे कृत्य करावे यात काहि नाविन्य असावे काय ? आणि असं काय आहे कि ज्यामुळे अश्वत्थाम्याच्या अपराधाला कधिच क्षमा नाहि? कुठलिही गोष्ट कितीही चांगली किंवा वाईट असो, तिचा परिणाम हळुहळु कमि होत जातो व शेवटी सांगाडा निसर्गात डिकंपोज होतो. महाभारत काव्यात अगदी शेवटी येणारा एक प्रसंग, एक व्यक्ती, असं काय कृत्य करते कि ज्याचे रिपल इफेक्ट्स अनंतकाळ उमटत राहतील? जीएंना अश्वत्थाम्याच्या दु:खाची तीव्रता अधिक जाणवते कि त्यातली अक्षम्यता??

मयुरा गुप्ते's picture

10 Dec 2013 - 2:45 am | मयुरा गुप्ते

उत्तम लेख.

जीएं च्या कथा फारशा वाचल्या नाहीत, पण अश्वत्थामा ही व्यक्ति जाणुन बुजुन कथा स्वरुपात जिवंत ठेवली आहे असंच वाटतं राहतं. कसला एवढा पश्चाताप झालायं कि अखंड वेदनेच्या स्वरुपात जीए अश्वत्थामा विसरु देत नाहीत.

--मयुरा.

देशपांडे विनायक's picture

10 Dec 2013 - 9:45 am | देशपांडे विनायक

'' आणि असं काय आहे कि ज्यामुळे अश्वत्थाम्याच्या अपराधाला कधिच क्षमा नाहि? ''

उत्तरेच्या गर्भाचा नाश करण्याचा प्रयत्न हा अपराध अक्षम्य आहे
श्रीकृष्ण जर निसर्गाचे प्रतिक मानले तर गर्भनाश हे अनैसर्गिक कृत्य अक्षम्य ठरते कारण या मुळे निसर्गाच्या मुळावर घाव पडतो
आणि म्हणूनच त्याला कधिच क्षमा नाही

''पण वरवर पाहता अश्वत्थामाचं कृत्य हे अनंत काळ परिणाम साधणारं नव्हतं.''
गर्भ हे निसर्गाचे पुनरौत्पदानाचे प्रतिक मानले तर[ उत्तरेच्या ]गर्भाचा नाश करण्याचा प्रयत्न हे अनंत काळ परिणाम साधणारे कृत्य मानणे भाग पडते

अर्धवटराव's picture

10 Dec 2013 - 12:53 pm | अर्धवटराव

कंसाला देखील अशीच शिक्षा व्हायला हवी. अमरत्वाचं वरदान मागणार्‍या प्रत्येकाला अशी शिक्षा व्हायला हवी. देवव्रताला इच्छा मरणाचं वरदान देणार्‍या त्याच्या बापाला देखील हाच न्याय लावायला हवा.

चावटमेला's picture

10 Dec 2013 - 10:14 am | चावटमेला

आपले सगळेच लेख सुंदर आणि विवेचनपूर्ण असतात. हा लेखही तसाच.

Atul Thakur's picture

10 Dec 2013 - 10:20 am | Atul Thakur

धन्यवाद :)

काय सुंदर लिहिलंय! वाचनखूण साठवली आहे. असेच लिहीत रहा...

प्रदीप's picture

10 Dec 2013 - 8:04 pm | प्रदीप

आवडला.

जी. एंच्या वैयक्तिक सुखदु:खांशी कुठेतरी त्यांच्या लेखनाची नाळ निगडीत असेल (नव्हे तशी ती होती, असे म्हणणे वावगे ठरू नये), तर त्यांचाही सम्यक उहापोह होणे इष्ट आहे, असे मला वाटते. पाश्चिमात्य कलाकारांच्या, लेखकांच्या जीवनाचा, त्यांच्या कलेच्या संदर्भात, जसा अभ्यास केला जातो, तसा आपल्याकडे केला जातो की नाही, ह्यासंबंधी मला काही विशेष माहिती नाही. जी. एंच्या विषयीतरी असा कुणी केलेला वाचनात आलेला नाही. तसा तो होणे जरूरी आहे.

बॅटमॅन's picture

16 Dec 2013 - 12:07 pm | बॅटमॅन

मस्त लेख.

बाकी, जीएंचा असा अभ्यास कोणी केलेला माहिती नाही पण त्यांच्या कथांमध्ये येणारे परिसराचे वर्णन आणि धारवाडच्या आसपासचा परिसर यांची सांगड घालणारे एक पुस्तक अ.रा.यार्दी यांनी लिहिले आहे असे वाचनात आले. प्रत्यक्ष पुस्तक वाचले नाही, त्याबद्दल ऐकले मात्र आहे.

पैसा's picture

13 Dec 2013 - 9:29 pm | पैसा

अश्वत्थाम्याचा जी एंच्या साहित्यातील संदर्भ आणि त्यानिमित्ताने आलेले अनेक कथांचे उल्लेख वाचून समाधान झालं नाही! लेख सुरेख जमला आहे, पण अजून लिही!!

विवेकपटाईत's picture

14 Dec 2013 - 5:51 pm | विवेकपटाईत

सुन्दर लेख. मला आठवतंय हिस्ट्री चेनल वर एका कार्यक्रमात पंजाब (पाकिस्तानचा) एका गुहेत मानव अवशेष सापडले.त्यांचा मृत्यू एकाच वेळी झाला असे विशेषज्ञांचे मत होते. गुहेत रेडीओ धर्मिता ही जास्त होती. कालखंड महाभारताचा जवळपासचा असावा असे ही एक मत होते. २०-२२ वर्ष आधी आचार्य श्री राम शर्मा यांचा महाभारताचा हिंदी अनुवाद वाचला होता. ब्रह्मास्त्राचा दुष्परिणाम उत्तराचा गर्भ वर नव्हे तर सर्व प्राणीमात्रांवर झाला होता. मानव आणि प्राण्यांमध्ये विकृत संतती जन्माला येऊ लागली. काही ठिकाणी भयंकर दुष्काळ पडला तर कुठे अतिवृष्टी झाली. हिरोशिमात अजूनही 'अणुअस्त्राचा परिणाम लोक भोगत आहे, आज ६५-७० वर्षानंतर ही विकृत संतती जन्माला येत आहे. ब्रह्मस्त्राचे भयंकर परिणाम सदा लोकांच्या लक्षात राहावे म्हणून कदाचित् व्यासांनी अश्वत्थाम्याला चिरंतर वेदनेचा श्राप दिला असावा.

आज भारतात कित्येक जागा अश्या आहेत जिथे अश्वत्थामा भटकतोय. अशीच एक जागा- बृन्दावनात पिसवा गावाजवळच्या जंगलात ही लोकांनी अश्वत्थामा भटकताना बघितला आहे. (माझा सहकारी याच गावातला आहे).

कंजूस's picture

16 Dec 2013 - 3:48 pm | कंजूस

व्वाउ !
जिएंच्या कथा वाचल्यानंतर लक्षात आलं की असा लेखत पुन्हा होणे नाही .
अश्वत्थामाबद्दलचे त्यांचे लेखन अजून वाचनात नाही आले ते आता वाचणार .
तुम्ही छान लेख लिहून माहिती करून दिलीत .अजून लिहा .

दोन वर्षांपूर्वी स्टार माझावर जिएंच्या कथेतल्या संदर्भातल्या बेळगाव धारवाडमधिल जागा ,घरे राहूल कुलकर्णीनी दाखवली होती .
जीए त्यांच्या कथेतून कथाविचार अलगदपणे पणे सरकवतात आणि कथा गूढच ठेवतात .
अजूनही काळे मांजर बाजूने गेले की मला दचकायला होते .कुठल्या मठात गेलोतर ते आपल्याला संसारातून सुटकेचा मार्ग दाखवण्यासाठी कायमचा अडकवून ठेवण्याचा मार्ग दाखवतील अशी भिती वाटते .