शोध स्वत्वाचा

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
7 Dec 2013 - 4:37 pm

१९६७ ची गोष्ट.
एका वीस वर्षांच्या मुलीचं लग्न. मागणी मुलाने घातलेली. मुलगी मंगलोरची; मुलगा मुंबईचा. टाटा कंपनीतला पगारदार.
मुलीला वडील नाहीत. विधवा आईच्या पदरी पाच मुली. मुलगा “हुंडा नको” म्हणतो – ही आणखीच चांगली गोष्ट. मुलाला आणखी नऊ भावंड आहेत.
लग्न होतं.

पहिल्यांदा जेव्हा नवरा “मी तुला मारेन” म्हणतो, तेव्हा तिला “तो गंमत करतोय” असं वाटतं.
पण नवरा खरंच मारहाण करायला लागतो तिला. अगदी नेहमी.
कारण? काहीही. कारण असो वा नसो – मार ठरलेला. कधीही, कसाही.
कधी हाताने, कधी हाती लागेल त्या वस्तूने – लाकडी हँगर, पट्टा ...

तिचा दम्याचा विकार उफाळून येतो या ताणाने.
तोवर मुलीच्या गर्भात बाळ रुजतं; ते जन्माला येतं.
आपल्या विधवा आईला अजून दोन लहान बहिणींची लग्न करायची आहेत; त्यांची आयुष्यं आपल्यामुळे बिघडायला नकोत म्हणून ही मुंबईला परत येते.

मुलगी विचारांत पडते. मुलगी दैवाला दोष देते. वेदनांना मुरड घालायचा प्रयत्न करते. संसार सुखाचा असल्याची बतावणी पुरेपूर निभावते.

पण मुलगी गोंधळलेली आहे. मारहाण झाली की नव-याचा “प्रेमाचा अंक” चालू होते.
आणखी दोन मुली जन्माला येतात.

घरात कधी खाण्याची चंगळ तर कधी उपासमार. हिच्या हातात पैसा नाही, या शहरात तिला कुणी मैत्रिणी नाहीत. नातेवाईक आहेत काही, पण घराची लाज कुठे उघडी करायची त्यांच्यासमोर?

मुलगी सोसत राहते. तिच्या शरीराला जखमा होतच आहेत, मन मोडून गेलंय तिचं. ती जीव संपवत नाही फक्त मुलांकरता.

घर सोडून जायचं आणि परत यायचं – असं अनेकदा घडतं. कधी मुलांसह घर सोडायचं तर कधी मुलांविना.
अशा परिस्थितीत सुरु होतो एक शोध – स्वत्वाचा शोध ....

*****
२०१३ ...
या आहेत फ्लेविया अग्नेस. ‘मजलिस’च्या संथापिका आणि संचालिका.

काय आहे 'मजलिस'?
शब्दश: बघितलं तर “एकत्र येणं” – सल्लामसलतीसाठी एकत्र येणं.

ही आहे स्त्रियांच्या हक्कासाठी कार्यरत असणारी एक संस्था. स्त्रीविषयक कायद्यांमध्ये सुधारणा घडवून आणणं, कौटुंबिक हिंसाचाराने पीडित स्त्रियांना कायद्याची लढाई लढून त्यांचे अधिकार मिळवून देण्यात मदत करणं, कायदेविषयक साक्षरता वाढवणं..... अशी अनेक कामं! 'मजलिस'कडे वकिलांची एक फौज आहे – आणि या सर्व वकील स्त्रिया कोर्टात पीडित स्त्रियांच्या अधिकाराची लढाई त्यांच्या वतीने लढत आहेत.

‘मजलिस’चं कार्यालय मुंबईत असलं तरी पूर्ण महाराष्ट्रात त्यांच नेटवर्क आहे. जिल्हा न्यायालयांत स्त्रियांच्या बाजूने लढणा-या वकिलांना – ज्यात स्त्रिया जास्त असतात; पण पुरुषही असतात – प्रशिक्षण तर दिलं जातंच; पण त्यातल्या निवडक १५ लोकांना (प्रामुख्याने स्त्रिया) वर्षभराची फेलोशिपही दिली जाते. हा कार्यक्रम २००३ पासून चालू आहे. अशा संवेदनशील आणि जाणकार स्त्रिया वकील जिल्ह्याच्या स्तरावर असण्याचा पीडित स्त्रियांना फायदा होतो. जात –धर्म- वय- शिक्षण अशा भेदांचा विचार न करता स्त्रियांना मदत केली जाते.

“कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा २००५” च्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य शासनासोबत “मोहीम” (Monitoring of Himsa (PWDV Act) in Maharashtra) चालवली जात आहे. लैगिक छळ/शोषण अशा घटनांनी ग्रस्त असणा-या स्त्रियांसाठी सामाजिक आणि कायद्याच्या मदतीचा “राहत” कार्यक्रम “महिला आणि बालक विकास” मंत्रालयाच्या सोबतीने चालू झाला आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई शहरात हा कार्यक्रम सुरु झाला आहे.

१९८० च्या आसपास फ्लेविया अग्नेस ही एक “पीडित महिला” होती. आज फ्लेविया अग्नेस स्त्रियांचे हक्क जपणारी कायदेतज्ञ आणि सामाजिक कार्यक्षेत्रातलं एक सर्वार्थाने मोठं नाव आहे. अकरावीपर्यंत शिक्षण झाल्यावर लग्न झालं होतं फ्लेवियाचं. प्रतिकूल परिस्थितीत, कष्टाने, जिद्दीने त्यांनी कायद्यात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे आणि एम. फिल. देखील केलं आहे.

१९८५ मध्ये फ्लेविया अग्नेस यांचं छोटेखानी आत्मकथन प्रसिद्ध झालं ते इंग्रजी भाषेत. १९८५ मध्येच श्री प्रकाश बुराटे यांनी त्याचा “अंधारातून प्रकाशाकडे” या नावाने केलेला अनुवाद प्रसिद्ध झाला. आठ अन्य भाषांतही हे पुस्तक आता उपलब्ध आहे.

book

“ हे खरंय की या पुस्तकामुळं कौटुंबिक हिंसेमुळे होरपळणा-या स्त्रियांचा संघर्ष कमी तीव्र किंवा कमी वेदनादायक होत नाही. प्रत्येक महिलेला आयुष्याच्या संघर्षाचे परिणाम स्वत:च भोगावे लागतात, स्वत:च वेदनेची ओझी वाहावी लागतात. परंतु या पुस्तकामुळं त्यांना नवीन जीवन उभारणं शक्य कोटीतलं वाटतं, त्यांची जिद्द जिवंत राहते आणि आशेचा किरण दिसत राहतो ...” हे फ्लेविया यांचे प्रस्तावनेतले उद्गार हे आत्मकथनाचा संदर्भ आजही किती महत्त्वाचा आहे हेच सांगून जातात.

*****

मी अनेक वर्षापासून फ्लेविया अग्नेस यांचं नाव ऐकत आले आहे; त्यांचे लेख वाचले आहेत अनेकदा. त्यांची पुस्तकं सगळी नाही; पण दोन वाचली आहेत. स्त्रियांचे अधिकार आणि स्त्रीविषयक कायदे या क्षेत्रातलं त्यांच योगदान नावाजलेलं आणि महत्त्वाचं आहे ते केवळ त्या पीडित स्त्री आहेत म्हणून नाहीत तर पीडित स्त्रियांबाबत त्यांनी केलेल्या कामामुळे. ‘मजलिस’च्या एका कार्यक्रमात सामील झाल्यामुळे मला त्यांची आणि त्यांच्या कामाचीही जवळून ओळख झाली.

‘मजलिस’चे काही मुद्दे मला “अनपेक्षित” होते. उदाहरणार्थ “समान नागरी कायद्या”ला असणारा त्यांचा विरोध. त्यामागची त्यांची भूमिका “भावनिक” नसणार हे माहिती असल्याने मी त्यांचा “विचार” समजून घेण्याचा प्रयत्न करणार हे नक्की. माझे अनेक विचार मी बदलायची गरज कदाचित असेलही!

एका व्यक्तीचा 'स्वत्वाचा शोध' किती अनेकांना उपयोगी पडतो याचा अनुभव फ्लेविया यांना भेटल्यावर मला आला असं म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

समाजमाहितीभाषांतर

प्रतिक्रिया

आतिवास's picture

7 Dec 2013 - 4:46 pm | आतिवास

कृपया "फ्लेविया अ‍ॅग्नेस" हे नाव " फ्लेविया अग्नेस" असं वाचावं - संपादन करायचं राहून गेलं प्रकाशित करण्यापूर्वी!

खटासि खट's picture

7 Dec 2013 - 4:54 pm | खटासि खट

छान ओळख करून दिलीय. सत्यमेव जयते मधे मजलिस बद्दल सांगितलेलं ना ?

मी 'सत्यमेव जयते' कार्यक्रम पाहिला नाही, त्यामुळे खात्री नाही. पण 'मजलिस'चा त्यातला उल्लेख याच 'मजलिस'चा असावा.

पैसा's picture

7 Dec 2013 - 8:45 pm | पैसा

फ्लेविया अ‍ॅग्नेस (हा उच्चार बरोबर आहे) आणि त्यांच्या आत्मकथेची ओळख आवडली. छळाकडून बळाकडे आणि इतर पीडितांना बळ देण्यापर्यंतचा प्रवास आवडला. समान नागरी कायद्याला त्यांचा का विरोध आहे ते वाचायला आवडेल.

आतिवास's picture

9 Dec 2013 - 3:00 pm | आतिवास

मी इतके दिवस 'अ‍ॅग्नेस'च म्हणत-लिहीत होते. पण आता 'मजलिस'ने प्रकाशित केलेल्या पुस्तकावर (ज्याचा फोटो दिलाय लेखात) 'अग्नेस' पाहिल्यावर माझा गोंधळ झालाय :-)

रेवती's picture

7 Dec 2013 - 9:53 pm | रेवती

:)

मजलिस चा वर दिलेला दुवा चालत नसल्याने वृत्तातील दुव्यावरून इथे पोहोचलो. इथेही सगळे दुवे चालत नाहीत, तरीही त्यांचा संपर्कासाठी पत्ता मिळाला.

Majlis Legal Centre
A 2/4 Golden Valley, Kalina, Mumbai 400098 India
Phone: 91-22-26662394 / 26661252
Fax: 91-22-26668539
Email: majlislaw@gmail.com

'मजलिस'(दुसरा दुवा) उघडत नाही हे तुम्ही सांगितल्यावर समजले.
संपादक मंडळास विनंती: तो दुवा असा दुरुस्त करावा ही विनंती.
पहिला दुवा मला उघडता येतो आहे. एका ब्लॉगचा दुवा आहे तो.
आपण शोधून पत्ता दिलात त्याबद्दल आभार.
दुवे कधीकधी उघडत नाहीत, त्यामुळे संपर्काची माहिती धाग्यातच द्यावी हे तुमच्या प्रतिसादातून लक्षात आले आहे आता.

मुक्त विहारि's picture

7 Dec 2013 - 11:42 pm | मुक्त विहारि

छान ओळख करून दिलीय.

बॅटमॅन's picture

8 Dec 2013 - 12:48 am | बॅटमॅन

ओळख तरी मस्त करून दिलीत. कार्य दांडगे दिसते आहे. बाकी समान नागरी कायद्याबद्दलचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.

प्यारे१'s picture

8 Dec 2013 - 1:06 am | प्यारे१

छान ओळख करुन दिलीत.

यशोधरा's picture

8 Dec 2013 - 7:39 pm | यशोधरा

सुरेख ओळख. आवडली.

सस्नेह's picture

9 Dec 2013 - 3:52 pm | सस्नेह

तथापि लेख अर्धवट राहिल्यासारखा वाटला.
पीडित स्त्रियांना कशा प्रकारे मदत केली जाते हे समजू शकेल का ? म्हणजे त्यांचा आत्मसन्मान राखून उपजीविकेसाठी मदत वगैरे केली जाते का ?
(माझ्या माहितीत अश काही दुर्दैवी स्त्रिया आहेत.)

लेख दोन भागांत लिहावा असं एकदा मनात आलं होतं - पण मग पुनर्विचार करुन एकाच भागात लिहिला. त्यातही फक्त 'मजलिस'च्या कार्याची ओळख करुन न देता फ्लेविया मॅडम यांचीही ओळख वाचकांना व्हावी असं वाटलं.

इथं त्यांना संपर्क करण्यासाठीची माहिती आहे. तुम्ही प्रश्न थोडक्यात सांगून आणि त्यात मग त्या स्त्रीला काय हवं आहे (घटस्फोट हवा आहे, पोटगी हवी आहे, घरातचं राहायचं आहे, कायदेशीर सल्ला हवा आहे, कायद्याच्या वाटेला न जाता कुटंबातील लोकांचं समुपदेशन हवं आहे - असं बरंच काही असू शकतं - ही केवळ उदाहरणं)हे लिहिलंत तर 'मजलिस' तुम्हाला स्थानिक जाणकार व्यक्तीशी जोडून देऊ शकेल.

तुम्ही कोणत्या शहरात आहात हे मला मेल (जीमेल तुमच्याकडे आहे माझा) करुन सांगितलंत तर माझ्या ओळखीचं कुणी आहे का ते सांगता येईल मलाही.

सस्नेह's picture

10 Dec 2013 - 12:26 pm | सस्नेह

अवश्य. धन्यवाद.

आतिवास's picture

10 Dec 2013 - 7:16 pm | आतिवास

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.

आतिवास's picture

25 Aug 2014 - 10:49 pm | आतिवास

'झी मराठी' ने २४ ऑगस्ट (२०१४) रोजी फ्लेविया अ‍ॅग्नेस यांना 'उंच माझा झोका' पुरस्कार दिला आहे.
इथं ८.४५ मिनिटाला फ्लेविया अ‍ॅग्नेस यांचं बोलणं ऐकता येईल.

पैसा's picture

25 Aug 2014 - 10:59 pm | पैसा

फ्लेवियांचं अभिनंदन!

आयुर्हित's picture

26 Aug 2014 - 1:25 am | आयुर्हित

उत्तम व महिती पुर्ण लेख दिल्याबद्दल आतिवासताई,धन्यवाद.

फ्लेवियांचं मनापासुन अभिनंदन व कार्याला माझा सलाम!

धन्या's picture

26 Aug 2014 - 1:35 pm | धन्या

माहितीपुर्ण लेख.

लेखात उल्लेख केलेले फ्लेविया अ‍ॅग्नेस यांचे आत्मचरीत्र ऑनलाईन कुठे मिळेल? जालावर शोधले असता याच नावाच्या इतर पुस्तकांची माहिती सापडते. अ‍ॅमॅझॉन इंडीया आणि फ्लिपकार्टवर फ्लेविया अ‍ॅग्नेस यांची कायदेविषयक पुस्तके आहेत. आत्मचरीत्र नाही.

फ्लेविया यांना विचारून सांगते. दुस-या कोणत्या साईट्वर आहे का पुस्तक, हेही त्यांना विचारते.

धन्या's picture

26 Aug 2014 - 2:29 pm | धन्या

मराठी आणि इंग्रजी दोन्ही पुस्तकांबद्दल विचारा.

पुस्तक ऑनलाईन उपलब्ध नसल्याचे 'मजलिस'ने कळवले आहे. त्यांच्या मुंबई कार्यालयातून मागवता येईल.

Majlis Legal Centre
A 2/4 Golden Valley, Kalina, Mumbai 400098 India
Phone: 91-22-26662394 / 26661252
Fax: 91-22-26668539
Email: majlislaw@gmail.com