एकला चालो ......भाग २

ज्ञानव's picture
ज्ञानव in जनातलं, मनातलं
4 Dec 2013 - 1:25 pm

एकला चालो....

एवढ्यात बस आली.

विनायक "आधी मुलींना चढू द्या मुलींना चढू द्या...बसमध्ये" हे स्वतः बसमधल्या ३ पायर्या चढून इतर मुलांना सांगत होता. मग काय मंजू मागोमाग सगळ्याजणी आणि सगळेजण असे लाईनशीर बसमध्ये चढणे चालू झाले.

आयला मला शाळेतले दिवस आठवतात पहिल्या बाकावर म्हणजे ढापणी, इस्त्रीचा शर्ट, आईने दोन्ही गाल धरून केसांचा भांग पाडलेला असा गोरा गोरा गोमटा, शरीरयष्टीमध्ये यष्टीचाच भाग जास्त आणि वर्गाच्या आत शिरल्या बरोबरच पहिल्या बाकावर बसणारा विनायक आणि कट टू किंचित जाड ढापणी, दोन वेण्या,७२ किलो गटात सहज बसेल असा देह वर्गाच्या दुसर्या टोकाच्या शेवटी खिडकीकडे मंजू असा एकूण सीन. लाईन एकच, पण विनायक म्हणजे कंस ओपन आणि मंजी म्हणजे कंस बंद आणि ह्या कंसात त्याच जात कुळीतली इतर मुले मुली.
मागच्या बाकावरची म्हणजे जरा थोराड, हाफ शर्टाच्या बाह्यासुद्धा वर आवळलेल्या, छातीवर दोन उघडी बटणे, शर्टाच्या खिशात वर कंगवा तो हि लाल किंवा हिरवा असे मुलांमध्ये मुली म्हणजे पुलंच्या बिगरी ते matrik मधील गोदि टाईप (ह्या हून जास्त वर्णन मी करू शकणार नाही मर्यादा पुरुषोत्तम आहे).
आणि ह्या उच्च गुणांकित (७०-७५ %) आणि निम्न गुणांकित (४५ ते नापास प्रवर्ग )ह्यामध्ये आम्ही हायर सेकंड क्लास ते लोवर फर्स्ट क्लास वाले (५०-५८%) पहिल्या बेंच वरचे फळ्याकडे लक्ष लास्ट बेंच पिवळ्या पुस्तकांपासून पण तंबाखू, ठोकाठोकी वगैरे आणि मग आम्ही मधले बेन्चरस "तीला बघ हिला बघ" करत कशी बशी शाळा उरकत पुढे सरकत होतो.
पण मुलींशी फारसा ना बोलणार्या मुलांचा आणि बोलायची प्रचंड इच्छा असलेल्या वयाचा काळ (१९७९-१९८३)तो. त्यात मुलांमध्ये आणि मुलींमध्ये एक कॉमन मैत्रीण आमच्यात होती. "बुटुक" म्हणायचो आम्ही तिला कारण उंची कमी पण हाफ pant घालून कब्बड्डी खेळणारी एकमेव! सगळे जण तिला ओक सर म्हणत कारण तिचे आडनाव ओक होते. इतका निर्मल माणूस( मुलगी बाई सर्व माणसेच शेवटी) मी पहिला नाही. सगळी मुले जेव्हा भ कारात्मक म कारात्मक शिव्या घालायची तेव्हाही ती चु कारात्मक शिव्या घालायची आणि आम्ही तिला ओरडायचो तू मुलगी आहेस हे सांगायचो पण मग ती भड्कायची मी माणूस आहे म्हणायची असो.
चिन्मय माझा एकदम अतरंगी मित्र.....एकदा चुकून उघड्या राहिलेल्या कपाटामध्ये एक चिमणी गेली चीन्याने चटकन कपाट बंद केले. नंतरच्या तासाला असलेल्या सरांनी जसे कपाट उघडले चिमणी अंगावर आल्यागत उडाली आणि सर मागे विनायकच्या मांडीवर...सगळा वर्ग तासभर उभ्याने आणि चिन्या ओणव्याने शिकत होता.
बसमध्ये सगळ्या मुली चालकाच्या मागील सीट्सची जी रांग असते तिथे बसवल्या विनायकाने आणि मुले डाव्या अंगाला.पहिली चालकाच्या मागे मंजू आणि दरवाज्यात चढल्या बरोबर पहिली सीट विनायकला. फुल फिल्डिंग
मी शोधात होतो बुटुकच्या! ती दिसत नव्हती आणि सांगलीकरहि दिसत नव्हत्या. उतरू का बसच्या खाली की बघू वाट, नको उतरतोच खाली अशी घालमेल चालू असतानाच एक जण पाठमोरा उभा दिसला रुंद पाठ, पिळदार का काय ते दंड, सोल्जर कट केस, गर्दन म्हणतात तशी मान आणि मानेवर मागून सोन्याची चमकणारी चेन एवढाच ऐवज दिसला मला वाटले लास्ट बेन्च वरचा भोसले असणार उशिरा पोहचला बहुतेक. हल्ली लष्करात असतो म्हणे, मी चटकन त्याला भोसले म्हणून हाकहि मारली.
मग ते धूड जसे वळले तसे त्याच्या समोर ती उभी असलेली दिसली बाजूला बुटुक ...."कोण भोसले ?ए माझ्याकडे बघ... कुठे बघतोयस?" झाले आमच्या अंगाला घाम "ते...हे...अ... ते समोर आहेत ना भोसले तिथे पलिकडे...तुम्ही ओळखता का ? नाही ना जाऊन देत ना मग....हं भोसले आलोच " आपसूकच हात कानावर गेले. तो बैलाचे कान धरणारा मेव्हणा असेल का हा ? शुभ बोल रे ! मी मनाला समजावलं असू देत तो कुठे येतोय रायगडला? बहिणीला भेटायलाच आलाय येऊ देत असे म्हणून मी शेवटच्या सीट वर जाऊन बसलो तिथून सर्व बस दिसणार होती आणि मग बुटुक,सांगलीकर कुठे कसे बसतात ते पाहून पुढचा प्लान आखू या असे काहीसे विचार करत डोके मागे टेकवून चेहऱ्यावर रुमाल टाकत डोळे मिटले. म्हंटले जरा बस चालू होईल मग सगळे भेंड्या (कंठाळा आला कि वो भेंड्यांचा)सुरु करतील जरा सगळा माहोल जमून आला कि पहिल्या नाश्त्याच्या होल्टला आपली पहिली चाल चालू...

५० सीटर बसमध्ये ३५च जण होते त्यामुळे शेवटची कॉमन सीट रिकामी होती. मी दोन्हीबाजुच्या म्हणजे चालक आणि वाहक सीटसचे जे रो असतात त्याच्या बरोबर मधोमध तंगड्या लांब करून पडलो होतो आणि बस हलली....२ मिनिटे झाली असतील नसतील तेवढ्यात आवाज आला "ओ भोसले जरा सरकून घ्या तिकडे.....!!!!!" मी दचकून तोंडावरचा रुमाल काढला आणि समोर साक्षात .......
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कोण असेल ओळखा पाहू......लगाव बत्ती.,......

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

इरसाल's picture

4 Dec 2013 - 1:31 pm | इरसाल

बुटुक चिंचेच !

शैलेन्द्र's picture

4 Dec 2013 - 2:07 pm | शैलेन्द्र

मस्त लिहीतायं, येवुद्या..

बुटुकच्या सान्गलीच्या मैत्रिणीचा भाउ...

थोड कनफ्युजल्या सारख वाटतय . थोड सावकाश आणी भरपुर लिहा .
पुभाप्र

मुक्त विहारि's picture

4 Dec 2013 - 9:41 pm | मुक्त विहारि

वा आ

अग्निकोल्हा's picture

4 Dec 2013 - 11:38 pm | अग्निकोल्हा

तिचा भाऊ असेल तर मज्यानाय सस्पेंस मधे. फार obvious गोष्ट होइल.