समुद्र समुद्र !!!!

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
23 Nov 2013 - 11:52 pm

बरेचदा नशीबवान समजतो मी स्वताला जे भाऊच्या धक्क्याजवळ राहतो. मर्जी आली की बाईकला किक मारताच पाचच मिनिटांत त्या थंडगार लालगुलाबी सुकट खार्‍या मतलई सुरमई वार्‍यांना थेट आरपार जाऊन भिडू शकतो. कधी मूड बदलायचा झालाच, तर गेटवे ऑफ ईंडियापासून मरीनलाईन्स, तर वरळी सीफेस पासून बॅंडस्टॅंड तर कधी दादर, गिरगाव अन जुहू चौपाट्या, सार्‍या जणू आपल्याच बापाच्या. रोजच्या प्रवासात वाशीच्या खाडीवरील एक पुर्णांक आठ किलोमीटर लांबीच्या पूलावरून सकाळ-संध्याकाळ जाणे म्हणजे निसर्गासोबत केलेली एक राइडच असते. जेमतेम दोन ट्रॅकचा ब्रिज आणि त्या भोवताली दोन्ही बाजूने गोलाकार पसरलेला अथांग समुद्र अन थैमान वारा. भरीस भर म्हणून माझ्या वेळी ट्रेनही अशी रिकामी असते की दारात उभे राहून बाह्या फडफडवून त्या निसर्गाच्या रौद्र पण तितकेच आपलेसे वाटणार्‍या रुपात मिसळून जावे आणि त्यालाही आपल्यात सामाऊन घ्यावे, म्हटलं तर स्सालं सुख सुख म्हणजे आणखी काय असते !

पण समुद्र म्हटले की पहिला आठवते ते लहानपणी आईबरोबर दादर चौपाटीला खाल्लेली ओली भेळ. देवाचे हार विसर्जित करायला म्हणून दोनतीन महिन्यातून एकदा जाणे व्हायचे. पुढची भेळ पुन्हा दोनतीन महिन्यांनीच नशिबी आहे हे माहीत असल्याने कागदाला चिकटलेले शेव कुरमुरेही नाही सुटायचे. पुढे भाऊच्या धक्क्यालाच हार विसर्जित करायला सुरुवात केली आणि सुटली ती भेळ. पण विस्मरणात नाही गेली. तीच भेळ पुढे एकदा त्याच चौपाटीवर अन त्याच समुद्राच्या साक्षीने प्रेयसीबरोबर खाउन पाहिली. पण लहानपणीची मजा नाही आली. कदाचित ठरवून केल्याने तसे झाले असावे, वा त्याक्षणी माझ्या मजेची परिमाणे वेगळी असावीत. आता त्या प्रेयसीची बायको झाली आहे, पण त्या भेळेची मजा अजूनही येत नाहीच. आता वाट पाहतोय ती मला मुले झाल्यावर त्यांना कधीतरी घेऊन जावे आणि बापाच्या भुमिकेतून ती मजा अनुभवून बघावी.

समुद्र आला की किनारा आला आणि किनारा आला की वाळू आलीच. पण मला त्या वाळूचे किल्ले करणे कधीच आवडायचे नाही, कदाचित काही बांधणे वगैरे मला जमत नाही, हे देखील कारण असावे. पण मी त्या वाळूत खड्डा करायचो. करताना नखांच्या फटी वाळूने बुजायच्या मात्र मी त्याकडे दुर्लक्ष करून अगदी चार वीत खोल आणि दोन पाय जवळ घेऊन उभा राहू शकेन किमान इतक्या क्षेत्रफळाची वाळू उकरून काढायचो. किनार्‍याच्या शक्य तितक्या जवळच. अन मग एका मोठ्या लाटेची वाट बघत बसायचो. ती आपल्या मर्जीने यायची आणि परत जायची. मात्र माझा खड्डा पाण्याने भरून जायची. त्या खड्ड्यावर फेस जमा व्हायचा, जो विरायच्या आधी मी धावत जाऊन त्यात उभा राहायचो. विठ्ठलासारखा कंबरेवर हात ठेऊन, एका छोटेखानी समुद्राचा मालक असल्याच्या थाटात. पुढे आणखी दोनचार लाटा आल्या की त्या आपल्याबरोबर वाळू घेऊन यायच्या आणि खड्डा भरून टाकायच्या. मग पुन्हा ती वाळू उपसण्याचा खेळ सुरू व्हायचा, पुढची लाट यायच्या आधी वाळू जास्तीत जास्त उपसायची असायची. काही काळाने लाटा तिथवर येऊन भिडण्याची वारंवारता वाढायची आणि बघताबघता माझ्या खड्ड्याला समुद्र आपल्या पोटात सामावून घ्यायचा.

अकरावी-बारावीला किर्ती कॉलेजला होतो, दोन वर्षे. खरे तर एक फुकट गेल्याने दोनाची तीन वर्षे झाली. फुकट जाणारे वर्ष शैक्षणिक कारकिर्दीतले असावे, आयुष्यातले गेले असे कधीच वाटले नाही. किर्ती कॉलेज म्हणजे दादर चौपाटीला अगदी लागूनच. दिवसभर समुद्राचा वारा कानात घोंघावत असला तरीही रोज संध्याकाळी तो मला भुरळ घालायाचा. घरी पाय लवकर उचलला जायचा नाही. माझेच नाही तर असे कित्येकांचे व्हायचे. लहर आली की कंपांऊंडवरून मारलेली उडी थेट वाळूत पडायची. पण मला मात्र बाहेरून वळसा घालून जायला आवडायचे. समुद्राला शॉर्टकटने जाऊन भेटण्यापेक्षा दुरहून त्याच्या जवळ जाताना त्याचे हळूहळू वाढणारे विशाल रूप पाहण्यात मजा वाटायची. समुद्राकडे जाणार्‍या रस्त्यावर पसरलेले वाळूचे कण हळूहळू आपली घनता वाढवत रस्ता कसे व्यापत जातात, वार्‍याचा वाढता वेग आणि तो आपल्या सोबतीला घेऊन येणारा खारा गंध कसा दाट होत जातो, हे अनुभवणे म्हणजे समुद्राला जाऊन भेटणे. मग पाण्यात उतरले नाही तरी चालायचे. लाटांशी नजरेनेच खेळून झालेले असायचे. वाळूने माखलेले सुके पाय घरी घेऊन जातानाही मन चिंब भिजल्यासारखे वाटायचे. पण हे नेहमीच व्हायचे असे नाही. कधीतरी तो बोलवायचा, साद घालायचा. तेव्हा कपडे काढण्याची वेळही जीवावर यायची. हे असे व्हायचे जेव्हा आम्ही मित्र सहलीला जायचो..

कधी अलिबाग तर कधी केळवा. मुद्दाम आठवड्याचा असा वार पकडून जायचो जेव्हा गर्दी कमी असेल, त्यातही असाच एखादा किनारा पकडायचो जिथे कोणीच नसेल. सुरुवात क्रिकेट वा फूटबॉलने व्हायची. अगदी शिस्तीत. जोपर्यंत एखादा चेंडू लाटांवर तटवला जात नाही तोपर्यंत. पण एकदा का तसे झाले आणि पाण्याचा स्पर्श पायाला झाला की लागलीच सारे तूफान वेगाने समुद्राच्या ओढीने पळत सुटायचे. गल्ली क्रिकेटमध्ये ज्याची बॅटींग चालू असते त्याची अश्यावेळेस दिसणारी ओरड इथे कधीच नसायची, कारण त्यालाही समुद्राचे वेध लागलेले असायचे. बरेचदा मग पाण्यातच खेळ चालायचे, पण त्यात खेळाचे स्थान दुय्यमच असायचे.

पावसावर कित्येक कविता बनतात, कारण पावसाकडे पाहून त्या सुचतात. पण समुद्र हा बरेचदा तत्वज्ञान शिकवून जातो. एक असेच कायमचे मनावर कोरले गेलेले तत्वज्ञान म्हणजे निसर्ग हा आपला मित्र असतो, पण जोपर्यंत आपण त्याचा मान ठेऊ तोपर्यंतच. पट्टीचे पोहणारेच कित्येकदा बुडतात, कारण ते पोहायला एखादया तलावात शिकतात आणि नाद समुद्राशी करायला जातात. एक जवळचा मित्र असाच गेला. जेवढे मी त्याच्या पोहण्याबद्दल जाणून होतो, माझा या बातमीवर विश्वासच बसत नव्हता. एका सहलीचेच निमित्त झाले, पण तो समुद्र आमच्या ओळखीचा नव्हता. मागाहून कळले चूक त्याचीच होती, तेव्हा समुद्रावर धरलेला राग सोडला. मी त्यावेळी तिथे नसणे हे चांगले झाले कि वाईट आजवर समजू शकलो नाही. तिथे असूनही त्याला वाचवता आले नसते तर ती खंत मनावर जास्त आघात करून गेली असती. पण आजही खवळलेला समुद्र पाहताना कित्येकदा त्याची आठवण दाटून येते. अश्यावेळी दूर किनार्‍यावरच उभे राहणे पसंद करतो. आपला किनारा काय असावा हे देखील त्या समुद्रालाच ठरवू देतो. यातच जास्त सुरक्षित वाटते. पण म्हणून कायम तिथेच उभा राहत नाही. जेव्हा तो समुद्र शांत होऊन मला साद घालतो तेव्हा मात्र त्याच्याकडे जातो. त्याच्या हाकेला ओ द्यायला.. त्याच्या अस्तित्वाला मान द्यायला.. !

- तुमचा अभिषेक

मुक्तकलेख

प्रतिक्रिया

अमेय६३७७'s picture

24 Nov 2013 - 12:34 am | अमेय६३७७

सुंदर लिखाण.

वडापाव's picture

24 Nov 2013 - 12:36 am | वडापाव

बरेचदा नशीबवान समजतो मी स्वताला जे भाऊच्या धक्क्याजवळ राहतो. मर्जी आली की बाईकला किक मारताच पाचच मिनिटांत त्या थंडगार लालगुलाबी सुकट खार्‍या मतलई सुरमई वार्‍यांना थेट आरपार जाऊन भिडू शकतो.

प्रचंड जळफळाट!!

समुद्र हा बरेचदा तत्वज्ञान शिकवून जातो

मूड खराब असला, टेन्शन असलं किंवा कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह विचार मनात असले, की मरीन लाईन्सला समुद्राजवळ जाऊन बसणे हा रामबाण उपाय!!!
लेख आवडला!! :)

तुमचा अभिषेक's picture

24 Nov 2013 - 12:26 pm | तुमचा अभिषेक

प्रत्येकाकडे आपल्या वाटणीचा निसर्ग असतो, कुठे पाच मिनिट अंतरावर तर कुठे पंधरा मिनिटे तर कुठे तासभर.
बस्स तो वेळ आपल्याला काढावा लागतो अन्यथा त्याचे जवळ असणेही व्यर्थ आहे.

बाकी मरीनलाईन्सला जे जाऊन बसतात त्यांच्या तोंडून जळफळाट हा शब्द शोभत नाही :)

मरीन लाईन्सवर तरी रोज कुठे जायला मिळतंय!! दोन-चार महिन्यातून एकदा. पण तिथे गेलं की मस्त वाटतं.... राहतो दहिसरला. तिथल्या नदीचा नाला केलाय लोकांनी. ब्रिजवरून जाताना रिक्षा/गाडी मुद्दामून थांबवून पिशवीत भरलेला कचरा नदीत फेकतात. त्यामुळे इथल्या आमच्या वाटणीच्या पाच-दहा मिनिटांवरच्या निसर्गाचा आनंद हवा तेवढा उपभोगता येत नाही. म्हणून जळफळाट झाला म्हटलं. बाकी तुम्ही म्हणता तसं मुद्दाम कधीतरी वेळ काढून मरीन लाईन्सला जातो. :)

सानिकास्वप्निल's picture

24 Nov 2013 - 2:38 pm | सानिकास्वप्निल

दहिसरची नदी आता नाला म्हणूनच ओळखली जाते...पावसाळ्यात तर बघायलाच नको. लग्न ठरल्यावर जेव्हा मी पहिल्यांदा सासरी गेले होते आणी खडकीतून ती नदी बघीतली तेव्हा मला समजले की ती नदी आहे नाला नव्हे. पावसाळ्यात तिच्या प्रवाहाबरोबर वाहणारा कचरा बघीतला तर चीड येते....असो

@ तुमचा अभिषेक लेख आवडला, समुद्राच्या अनेक आठवणी मनात जपून ठेवल्या आहेत :)

प्रभाकर पेठकर's picture

26 Nov 2013 - 10:31 am | प्रभाकर पेठकर

तुळशी तलावातून निघणारी ती दहिसरची तुळशी नदी. तशी बारमाही नदी नव्हे. पावसाळी नदी. माझ्या लहानपणी जेंव्हा नदीचे पात्र स्वच्छ होते तेंव्हा पावसाळ्यात नदीतील पाणी छान निळसर असायचे. आम्ही पोहायला जायचो. दहिसर गावातील गरीब जनता नदीचे पाणी पिण्यासाठीही वापरायची. दहिसर पुलाजवळ एक धरण बांधून पाणी अडविले होते. ते धरण १९५३च्या महापुरात वाहून गेले. (म्हणजे माझ्या जन्मा आधी. घरच्यांकडून ऐकले आहे). अर्धवट (दिड-दोन मिटर उंचीची) भिंत उरली होती. भिंतीच्या अलिकडे जलतरण तलावाचे स्वरूप असायचे. नदीला लागून घाटाच्या ४-६ पायर्‍या होत्या. त्यांचा उपयोग धुणी धुण्यासाठी आणि गणपती विसर्जनासाठी व्हायचा. पलीकडच्या किनार्‍याला लागून पारशाची वाडी होती. तिथे निलगिरीची झाडे होती. त्याची सुगंधी पाने नदीपात्रात पडायची. उन्हाळ्यात नदी कोरडी पडली की पात्रातून चालत जाऊन ती निलगिरीची पाने उचलून हातात चुरडायची. मस्त सुगंध यायचा. धरणापलीकडे चारफुटी हौद होता. धरणातून पाणी ओसंडून ह्या हौदात पडायचे. हौद खोल नसल्याकारणाने ज्यांना पोहता यायचे नाही असे नवशिके (माझ्या सारखे) त्या हौदात डुंबायचे (घरून साबण वगैरे आणून). हौदाला दोन फुट रुंद काठ होता. त्यावर बसूनही बायका धुणी धुवायच्या. उन्हाळ्यात नदी आटायची. अगदी कोरडी ठाक व्हायची. त्याकाळी दहिसरात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष होते. नळ आले नव्हते. विहिरी होत्या. विहिरीवरून पाणी भरायला लागायचे. उन्हाळ्यात विहिरींचे पाणी मचूळ (खारट) व्हायचे. अशा वेळी कोरड्या पडलेल्या नदीत दिड-दोन फुट खड्डा खणल्यावर गोडे पाणी मिळायचे. ते वाटी-वाटीने बादलीत भरून दोन-चार बादल्या पिण्याचे पाणी घरी आणावे लागायचे. मी ते काम केले आहे.

पुढे दहिसर आणि बोरीवली दरम्यानच्या रेल्वे पुलापासून घोडबंदर रस्त्यापर्यंत झोपडपट्टी झाली. तिथे हातभट्ट्या सुरू झाल्या. त्या हातभट्ट्यांची मळी (दारू गाळून उरलेला साका) नदीत टाकण्यास सुरुवात झाली आणि दहिसरची नदी अमंगल झाली. राजकारणी आणि पोलीसांच्या आशिर्वादाने सुरू असणार्‍या गलिच्छ आणि समाज विघातक कृत्यास विरोध करण्याची ताकद आणि धाडस आमच्यात नव्हते आणि वाट्याला आली हतबलता. आधी नदी प्रदुषित झाली. प्रदुषित झाल्यामुळे नदीकाठी मानवी मल-मुत्र विसर्जन, गोठ्यांमधून शेण-मुत्रादी विसर्जन, गॅरेजेसचे वापरलेले काळे तेल आदी त्या नदीत हक्काने मिसळवून, मुख्यतः परप्रांतियांनी (भय्ये आणि दाक्षिण भारतिय) त्या सुंदर आणि स्वच्छ नदीचे सांडपाण्याच्या नाल्यात रुपांतर केले आहे. जोडीने आले डांस-मच्छर आणि दुर्गंधी.

आजच्या घडीला 'तुळशी नदी' असे पवित्र नांव असणार्‍या ओढ्याला जी अवकळा आली आहे ती पाहता तिचे गतवैभव आठवून मनांत दु:खाचे कढ येतात. कालाय तस्मैनमः असे म्हणत काय काय विसरण्याचा प्रयत्न करायचा? त्या नदीला कोणी नाला म्हंटले की वाईट वाटते पण.... दुर्दैवाने ती वस्तुस्थिती आहे.

राही's picture

26 Nov 2013 - 2:22 pm | राही

ह्या नदीने मध्यंतरी आपले नावही बदलले होते. लोक हिलाच मिठी नदी म्हणू लागले होते. कारण वर्तमानपत्रांतून अधून मधून मिठी नदी आणि त्या काठच्या धारावीवर लिहून येई. पण मुंबईत तर नदीसदृश असे काही दिसत नसे. दहिसरची नदी त्यातल्यात्यात नदी वाटे. म्हणून मुंबईत नव्याने आलेल्या आणि दहिसरच्या झोपडपट्ट्यांत वसलेल्या लोकांनी हिलाच मिठी म्हणणे सुरू केले होते. हे इतपत वाढले की टाइम्समध्ये सुद्धा मिठीकाठ्सुधारयोजनेच्या वार्तांकनाखाली ह्या नदीचा फोटो प्रसिद्ध झाला होता. शेवटी कडेलोट झाला २००५च्या प्रलयात. त्यावेली खर्‍या मिठीने तर थैमान घातलेच पण ह्या तथाकथित मिठीनेही मोठाच हाहा:कार माजवला. श्रीकृष्णनगर, दौलतनगर,स्टेट बँक कॉलनी आदि सर्व वसाहती दीड-दोन मजले पाण्याखाली गेल्या. त्या वेळी दहिसरचा विद्ध्वंसही मिठीच्या नावाने टी.वी. वाहिन्यांवर झळकू लागला. त्यामुळे खर्‍या मिठीच्या परिसरात घबराट पसरू लागली कारण तोपावेतो मुंबईतला पूर ओसरला होता पण पुढे विरार पालघरपर्यंत (वैतरणेमुळे) भीषण परिस्थिती होती. आणि मुख्य मुंबईमध्ये टी.वी. व्यतिरिक्त अन्य संपर्कसाधने अनियमित होती. शेवटी टी.वी. वाहिन्यांना आम्ही काही जणांनी सतत फोन करून (जो धड चालत नव्हता) चूक सुधारायला लावली. मुंबईमध्ये टी.वी. वार्ताहर हे (ह्या) अननुभवी असतात आणि स्थानिक इतिहास-भूगोलाशी त्यांना काहीही देणेघेणे नसते हे अनेकवार दिसते.
मात्र दहिसर-बोरिवली हा परिसर एकेकाळी निसर्गरम्य होता हे नि:संशय. इथे प्रामुख्याने सोमवंशी क्षत्रियांच्या वाडया होत्या. त्यातही म्हात्रे आडनावाचे लोक बहुसंख्य होते. त्यांपैकी एक नंतर आमच्या शेजारी रहायला आले. त्यांच्या तोंडून पुष्कळ गोष्टी ऐकायला मिळत. दहिसर नदीकाठी अनेक हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण होई असे ते सांगत. त्यातले उडनखटोला हे नाव आज आठवते. शिवाय डॉक्टर जिराड या नामवंत स्त्रीरोगतज्ञ बाईंचा नदीकाठी सुंदर बंगला होता, त्याचा प्रत्येक दहिसरकराला अभिमान असे. मीही तो नंतर जाऊन पाहिला पण तोपर्यंत त्याला अवकळा आली होती. नदीकाठच्या कांदरपाड्याच्या टेकडीवरून पलीकडच्या गोराई खाडीचे विहंगम दृश्य दिसे. तिथूनच एक बैलगाडीरस्ता डोंगराला वळसा घालीत खाली उतरत असे. तो डोंगर हिरवागार होता. तिथले काही फोटो अजूनही आहेत. घोडबंदर रस्ताही चेण्याच्या खाडीपर्यंत (आणि पुढेही) निसर्गरम्य होता. सत्यकाम नावाच्या एका चित्रपटाचे चित्रीकरण तिथे झाले होते असे सांगत. काशी-मिरे गावात बंगल्यांसाठी भूखंडविक्रीची योजना निघाली होती तेव्हा त्या निमित्ताने तिथे जाणेयेणे झाले होते. पुढे ते (ती योजना नव्हे, आमचा सहभाग) बारगळले. असो. आता दहिसर पश्चिमेचा बराचसा भाग गणपत पाटील नगर या आशियातल्या सर्वात मोठ्या झोपडपट्टीने व्यापला आहे. तिकडे धारावी मात्र शींव-माहीम-वान्दरे अशा सध्याच्या मोक्याच्या परिसरात असल्यामुळे क्लस्टर डेवलप्मेंट किंवा अशाच कुठल्या योजनेखाली नव्या रूपात अवतरण्याच्या उंबरठ्यावर आहे. आणखी वीसपंचवीस वर्षांनंतर गणपत पाटील नगराच्या नशिबीही असे भाग्य येऊ शकेल, कोणी सांगावे!

प्रभाकर पेठकर's picture

26 Nov 2013 - 3:01 pm | प्रभाकर पेठकर

क्या बात है। तुम्ही तर माझे बालपण पुन्हा एकवार माझ्यासमोर उलगडलेत.

दहिसरातील अनेक हिन्दी आणि एका इंग्रजी चित्रिकरणाचा मी जिवंत साक्षीदार आहे. महाभारत, शोर, माता महाकाली, महल (देवानंद), आन मिलो सजना, दोस्त, सावन भादो, राजासाब वगैरे वगैरे मला नांवं आठवतात. बाकी नांवे माहित नसलेले अनेक आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीत कधी कधी ४-५ चित्रिकरणे वेगवेगळ्या ठिकाणी चाललेली असायची. तिथे कोण कोण आले आहे ह्याची बातमी मिळवून कुठले चित्रिकरण पाहायला जायचे हे ठरविले जायचे. दारासिंग-मुमताझ जोडीचे चित्रिकरण असले तर त्याला प्राधान्य असायचे. आम्ही तेंव्हा 'दारासिंग'ला बघायला जायचो. सावनभादो चित्रिकरणाच्या सुमारास हिरॉईन हा क्रायटेरिआ होता. रेखाचा हा पहिला हिन्दी चित्रपट. रेखा ह्या सिनेमात बरीच 'ढब्बी' होती दिसायला. असो.

डॉक्टर झिराड ह्या भारतातील ज्यू समाजाच्या पहिल्या डॉक्टर. त्यांचा बंगला माझ्या घरापासून जवळच होता. एवढ्या मोठ्या घरात त्या एकट्याच राहात होत्या. पांढर्‍या शुभ्र रंगाचा, नदी काठावरचा, तो सुंदर बंगला ब्रिटिशकालीन पुलासमोर आहे/होता. आहे/होता अशा करीता की आता तिथे इमारत झाली आहे की काय असा मला संशय आहे. बर्‍याच वर्षात तिथे गेलो नाहिए.

परिंदा's picture

26 Nov 2013 - 4:16 pm | परिंदा

या लेखाच्या निमित्ताने दहिसरविषयी इतकी सुंदर माहिती कळली.

दहिसर म्हटलं की दादरकरांची बोबडी का वळते कळत नाही. 'तू दहिसर वरून येतोस?? एवढ्या लांबून??'
दहिसर ते दादर ट्रेनने फक्त अडतीस मिंटं लागतात(स्टँ.टा.). बाईकवरून सुद्धा गर्दी विशेष नसली तर अर्ध्या पाऊण तासांत दादरला पोचता येतं. दहिसर हे मुंबईत आहे, हे सुद्धा कित्येकांना ठाऊक नसतं. काहीजणांनी दहिसर हे नाव ऐकलेलं सुद्धा नसतं. मग त्यांना दहिसरला चेकनाका आहे याची आठवण करून दिल्यावर 'हां बरोबर रे...' असं म्हणतात.

अनेकांच्या मते माहिमच्या पुढे मुंबई संपते.

तुमचा अभिषेक's picture

26 Nov 2013 - 8:59 pm | तुमचा अभिषेक

आताशे जग जवळ आलेय, दिवसेंदिवस येतेय, पण लोकांचे संदर्भ बरेचदा जुनेच असतात.
एकेकाळी माझगाव ते अंधेरी माझ्या काकांकडे जाताना दोन बस बदलत तब्बल दोन तासाने पोहोचायचो. सुट्टीत काकाकडे जायचे म्हणजे घरापासून अगदी दूरवर जातोय असा फील यायचा तेव्हाच्या बालमनाला. हल्ली पुण्याची वारी देखील एकदिवसीय प्लॅनिंगमध्ये मोडते.

सानिकास्वप्निल's picture

26 Nov 2013 - 10:01 pm | सानिकास्वप्निल

माझ्या सासूबाईंकडून ही बरेच ऐकले आहे ह्या नदीबद्दल. त्यांच्यासुध्दा बर्‍याच आठवणी आहेत :)

हरिप्रिया_'s picture

24 Nov 2013 - 10:14 am | हरिप्रिया_

आवडला तुमच्या भावविश्वातला समुद्र!!

माझा तर जिवलग मित्र आहे समुद्र

राही's picture

24 Nov 2013 - 5:24 pm | राही

लेख सुंदरच आहे. समुद्र ही मुंबईची आणि मुंबईकरांची एक मोठी जमेची बाजू आहे. समुद्र खरोखरच आयुष्याचे तत्त्वज्ञान शिकवतो. भरत्या ओहोट्या कितीही येवोत, किनारा सुटता नये. पाय जमिनीवर रहातील इतपतच पाण्यात शिरावे आणि अनोळखी पाण्यात तर कधीच उतरू नये. हिंदी चित्रपटगीतांत दरिया,माझी,साहिल्,मौज्,लहरें,मंज़िल अशा सुंदर शब्दांद्वारे मानवाचे आणि सागराचे नाते रेखाटले जाई. 'कोई तूफानोंसे कह दे, मिल गया साहिल मुझे' या सारख्या ओळी मनात कोरून राहिल्या आहेत. सांप्रत मात्र हिंदी चित्रपटगीतांतून हे कोमल शब्द हद्दपार झाले आहेत. या बाबतीत हिंदी ही मराठीशी स्पर्धा करते आहे की काय असे वाटू लागते. मराठीत मुळातच ह्या कोमल संकल्पना नाहीत. या मागे कदाचित मराठी मुख्यभूमीला समुद्राचे सान्निध्यच नाही हे कारण असावे. लाटा काय, नावाडी काय सगळा कठोर कारभार.

बॅटमॅन's picture

24 Nov 2013 - 6:07 pm | बॅटमॅन

जर मराठी मुख्यभूमीशी समुद्राचे सान्निध्य नसेल तर हिंदी मुख्यभूमीशी त्याहूनही नसेल. मग हिंदीतल्या सागरसंबंधित ओळी आल्या कुठून?

आणि मराठीतही सागराशी संबंधित गीते आहेतच की - ने मजसी ने परत मातृभूमीला सारखी गीते पाहिल्यास कोमल भाव कळून येतोच. कोकणातल्या कवींची कविता पाहिल्यास तसे दिसून येईल असे वाटते. मला आठवते त्यानुसार वासुदेवशास्त्री खर्‍यांनी कोकणावर कविता लिहिली त्यातही सागराचे उत्तम वर्णन आहे. कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या कोलंबसाच्या गर्वगीतात तर विजिगीषेचे अफाट वर्णन आहे.

हिंदीतले शब्द सुंदर नसून ती चाल सुंदर आहे, भाषेचा लहेजा सुंदर आहे. मराठीचा लहेजा सुंदर वैग्रे कोणी क्वचितच म्हणते. ज्ञानेश्वरांनी मराठीला अमृतातेही पैजा जिंकवल्या, एकनाथांनी मराठीला इलेव्हेट केले, पण मराठीचा भाषाव्यवहार अंमळ कोरडा राहिला. म्हणजे एक तर शिवाजीप्रणीत शुद्ध वीररस नाही तर संतप्रणीत शुद्ध भक्ति-शांत-रस. शृंगाररस लावणीप्रणीत राहिला, क्वचित काही पंडित कविता सोडल्यास तो असा मंदमधुर वगैरे राहिला नाही. त्यामुळे तसा डिस्कनेक्ट जाणवतो. मराठीत अशा पोएटिक रजिस्टरचे आगमन साधारणपणे रविकिरण मंडळाच्या आसपास झाले असावे असे वाटते. पण त्यालाही इतके ग्लॅमर मिळाले नाही. ते 'भटी'च राहिले. तुलनेने हिंदी गाणी मात्र उर्दू रचनाप्रकार, शब्दावली, इ. वापरून मधला ब्यालन्स साधण्यात जास्त यशस्वी झाली म्हणून मराठीत काही असे नाही असे वाटणे साहजिक आहे. पण हा प्रश्न मूलतः कुठले पोएटिको-लिंग्विस्टिक रजिस्टर वापरतो याच्याशी निगडित आहे. याचे उत्तर सामाजिक निवडप्रक्रियेतूनच देता येईल, मूलतः असणार्‍या अभावातून नाही.

राही's picture

25 Nov 2013 - 8:18 am | राही

मला वाटलेच होते की समुद्रसान्निध्याचा मुद्दा निघेल आणि तो तुमच्याकडूनच निघेल. खरे तर हिंदी-उर्दूतले हे शब्द आणि संकल्पना ह्या पार्सी-अरबीची देणगी आहेत. इराणला स्वतःचा समुद्रकिनारा तर आहेच शिवाय पंचसामुद्रिक प्रदेश असल्यामुळे कास्पियन्, भूमध्य वगैरे सलग नसले तरी सन्निध आहेत. अरब लोक तर इस्लाम-पूर्व काळापासूनच पट्टीचे दर्यावर्दी. त्यांच्याकडे समुद्रपर्यटनाला बंदी नव्हती. आणखी म्हणजे पर्शिअन साहित्यावर सूफी तत्त्वज्ञानाचा गाढ प्रभाव आहे. त्यामुळे प्रियकर-प्रेयसी, मंज़िल-माझी, साहिल ही रूपके तिथे अत्यत हळुवार रूपात प्रकटतात. मौसमी पावसाच्या आपल्या प्रदेशात आषाढातल्या पहिल्या दिवशी मेघाकडून प्रियेला निरोप जाणे हे जितके नैसर्गिक, तितकेच हेही. आपल्या पुराणांमध्ये क्षीरसागर आहे, समुद्रमंथन आहे. 'यथा काष्ठं च काष्ठं च' असे समुद्राचे उल्लेख आहेत. ज्ञानेश्वरांचा उल्लेख होईल हीही अटकळ होतीच. ज्ञानेश्वरांच्या विराण्या आहेत, 'पीयूषाचे अर्णव' आहेत. पण या सर्वांमध्ये समुद्रप्रवासाचा प्रत्यक्ष अनुभव मांडलेला नाही. अर्थात ज्ञानेश्वरांना आत्मज्ञानामुळे सर्व अनुभव कल्पनेने घेणे शक्य होते हे मान्य. पण त्यांच्यासारखा आत्मज्ञानी असे अनुभव लिहिण्याच्या फंदात पडला नसता. त्यांनी हाती घेतलेले कार्य याहून कितीतरी अधिक मोठे होते.
रविकिरण मंडळाचे योगदान आहेच. त्यांच्या गूढगुंजनपर कवितांनी नवा पायंडा पाडला.(खरं तर भारतीय साहित्यात गीतांजली हाच मिस्टिक कवितेचा उदय मानायला हवा. गीतांजलीचा प्रभाव सर्वच साहित्यावर पडला.) याच दरम्यान माधवराव पटवर्धनांनी फार्सी-मराठी शब्दकोश लिहिला. फार्सीतला विरह मराठीत आणण्याचा प्रयत्न केला. पण एकंदरीत रांगड्या मराठीला ते मानवले नाहीच. नंतर तर पार्सी शब्दांच्या हकालपट्टीचीच चळवळ सुरू झाली. शिवाय एक समांतर असे सामाजिक वास्तव लक्ष्यात घेतले पाहिजे. याच दरम्यान मुंबई हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र बनत होते आणि साने गुरुजी,खांडेकरादींचे आदर्शवादी लिखाण लोकप्रिय होते. फडक्यांच्या किंवा रेनॉल्ड्सच्या कादंबर्‍या हा चोरून वाचायचा विषय होता. या झंजावातात प्रियकर-प्रेयसीचा नर्म शृंगार कुठल्याकुठे उडून गेला. गजानन वाटवे यांची 'वारा फोफावला, माझं ग तारू कसं हाकारू सजणे समिंदराला' किंवा दोन ध्रुवांवर दोघे आपण' ही भावगीतं नंतरची, स्वातंत्र्याच्या सुमाराची, जेव्हा चळवळीचं वारं शांत होत होतं आणि उत्कटतेने अथवा निवांतपणे तरल-सूक्ष्म शृंगाराचा आस्वाद घेता येणं शक्य झालं होतं.
असो.

बॅटमॅन's picture

26 Nov 2013 - 2:37 pm | बॅटमॅन

फार्सी-अरबीचा प्रभाव खरे तर डोक्यात आला नव्हता. पश्चाद्दृष्टीमध्ये ते सरळ वाटतेय पण तेव्हा लक्षात आले नव्हते ते सांगितल्याबद्दल धन्यवाद.

महाराष्ट्रावर मध्ययुगात उत्तरेचे सांस्कृतिक आक्रमण फारसे झाले नव्हते, शिवाय मॉडर्न साहित्यातले गूढगुंजन किंवा रोम्यांटिकपण आपल्याकडे तितकेसे न रुजण्याचे कारण म्हणजे ब्रिटिश काळात "ब्रिटिश गुणांना" देशी साच्यात ओवण्यात आपण यशस्वी ठरलो त्या भानगडीत स्टिफ अपर लिप, राकट देशा कणखर देशा इ. प्रवृत्ती आणि मध्यमवर्गीय कोंझेपणाला धीरोदात्ततेच्या चौकटीत वाढवल्यामुळे हा रस म्हणावा तितका रुजलाच नाही. आदर्शवाद, इंपॉसिबल स्टँडर्ड्स यांच्या चढाओढीत ते बाकीचं चटकन जळून गेलं. पुढे भावगीतांच्या जमान्यात जरा त्याने मूळ धरले इतकेच. पण इट इज टू लिटल अँड टू लेट.

राही's picture

26 Nov 2013 - 8:12 pm | राही

आपल्याकडे आदर्शवादाचा जरा अतिरेकच झाला असे मलाही वाटते. हिंदी भाषा आणि आठवीपासून इंग्लिश हे आपण हिरिरीने आणि नको तितक्या घाईने स्वीकारले. आपली सर्व ग्रामनामे, रेल वे स्टेशन्सची नावे हिंदी देवनागरीत लिहिली जाऊ लागली आणि आपण ळ या अक्षराला मुकलो. नेरुळ, परळ, मुळुंद, भायखळा, टिळक ही नावे मराठी न रहाता आंतरराष्ट्रीयरीत्या बदलली. असो.
भाषेच्या कोमलपणाविषयी आणखी थोडे : हिंदीतल्या अंगडाई, तन्हाई, कलाई, मद्धम-मद्धम, बाँकपन, गेंसुए, वादियाँ, नज़ारे, राह,राही (पथ, पथिक थोडे उच्चभ्रू वाटतात.) या व अशा अनेक शब्दांना चपखल मराठी शब्द दिसत नाहीत. अर्थात दुसर्‍या भाषेतली प्रत्येक संकल्पना आपल्या भाषेत तशीच्यातशी आलीच पाहिजे असे नव्हे. तसे तर मराठीतही काही खास शब्द आहेत. उदा. झुंजुमुंजू, शिवार, गाज, पाणंद, कल वगैरे.

बॅटमॅन's picture

26 Nov 2013 - 8:20 pm | बॅटमॅन

ळ हे अक्षर हिंदीच का इंग्लिशमध्येही नाही. त्यामुळे ळ चा लॉस फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर दक्षिणेतही बघायला मिळतो.

मराठीची खास वैशिष्ट्ये तशी अनेक सांगता येतील. तुम्ही सांगितलेल्या उदाहरणांसोबतच काही विशेषणे जरा युनिक आहेत असे वाटते, उदा. गुळगुळीत, पिळपिळीत, झणझणीत, इ.इ. यालाही चपखल शब्द अन्य भाषांत सांगता येणार नाहीत.

हिंदीतल्या उदाहरणांबद्दलही सहमत. तिची ती स्पेशॅलिटी आहेच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Nov 2013 - 9:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> मराठीचा लहेजा सुंदर वैग्रे कोणी क्वचितच म्हणते.

प्रत्येक भाषेची आपापली काही वैशिष्ट्ये आहेत. मराठीतले काही शब्द इतर भाषा पकडू शकत नाही, तसेच इतर भाषेतील काही शब्द मराठी भाषा पकडू शकत नाही....असे होऊ शकते, इतकेच.

-दिलीप बिरुटे

बॅटमॅन's picture

26 Nov 2013 - 2:30 pm | बॅटमॅन

अर्थातच, सहमत आहेच. फक्त मराठी भाषकांकडूनही हा मुद्दा म्हणावा तितका उचलून धरला जात नाही असे वाटते भाषेचा अभिमान असतोच, फक्त आपण लहेजा अन कोमलता या अ‍ॅस्पेक्टवर जास्त लक्ष केंद्रित करीत नाही असे वाटते. चूभू अर्थातच द्याघ्या.

अनिरुद्ध प's picture

26 Nov 2013 - 3:26 pm | अनिरुद्ध प

लेखन्,तसेच प्रतिसाद सुद्धा,माझेही किर्ति कॉलेज मधील दिवस आठवले,पण आपल्या सारखा समुद्राच्या जवळ जास्त वेळ घालवता आला नाही ही खंत आहे.

प्यारे१'s picture

24 Nov 2013 - 5:32 pm | प्यारे१

>>>आपला किनारा काय असावा हे देखील त्या समुद्रालाच ठरवू देतो. यातच जास्त सुरक्षित वाटते. पण म्हणून कायम तिथेच उभा राहत नाही. जेव्हा तो समुद्र शांत होऊन मला साद घालतो तेव्हा मात्र त्याच्याकडे जातो. त्याच्या हाकेला ओ द्यायला.. त्याच्या अस्तित्वाला मान द्यायला.. !

क्लास्स्स!
वरळी सी फेस ही अशीच एक ठाव घेणारी जागा आहे.
वरळी कोळीवाड्यापासून तिकडे हाजीअली म्हटलं तरी चालेल असा आक्खा पॅच वेड लावतो!

तुमचा अभिषेक's picture

26 Nov 2013 - 9:54 am | तुमचा अभिषेक

एक मात्र खरंय, मुंबईच्या समुद्राची अन समुद्र किनार्‍याची बरीच वेगवेगळी रुपे आहेत, अगदी आर्थिक निकषावर देखील त्याचे वर्गीकरण होऊ शकते, आणि हिच खासियत आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

26 Nov 2013 - 3:47 pm | राजेंद्र मेहेंदळे

एकदम मस्त जागा..आमच्या कॉलेजसमोरची छोटी गल्ली ओलांडली की वरळी सी फेस होता.एक दोन वर्गातुन तर सरळ समोर भरती ओहोटीच्या लाटांचे तांडव दिसायचे...खारा वारा सगळीकडे घुमायचा. "ते" दिवस आठवले

स्पंदना's picture

25 Nov 2013 - 5:03 am | स्पंदना

कधी गेट वे च्या खाली पर्यंतच्या पायर्‍या पाहिलेत का? आम्ही दोघे एकदा एका दुपारी तेथे जाउन बसलो होतो. मग त्या लाटा हळु हळु एक एक पायरी चढायला लागल्या. मग आम्हीही एक एक पायरी वर बसत शेवटी गेटवेच्या वरच्या पायरीपर्यंत पोहोचलो. वरच टळतळीत उन्ह जाणवल सुद्धा नाही तेंव्हा. आठवल तरी पुन्हा तोक्षण पकडावासा वाटतो.
देवजाणे कधी जमेल.

तुमचा अभिषेक's picture

26 Nov 2013 - 9:52 am | तुमचा अभिषेक

गेट वे मला वैयक्तिकरीत्या कधी फारसा नाही आवडला. कदाचित तेथील गर्दीमुळे वा गर्दीच्या वेळीच जाणे होत असल्याने असेल. बरेचदा कोणाला मुंबईदर्शनला घेऊन जातानाच तिथे जाणे होते, स्वतासाठी म्हणून नाही, हे देखील कारण असावे. तिथे फोटो काढायला आणि काढून घ्यायला मात्र आवडतात.

गवि's picture

26 Nov 2013 - 12:16 pm | गवि

कधी गेट वे च्या खाली पर्यंतच्या पायर्‍या पाहिलेत का?

हो हो.. अगदी.. मी आणि एकदोन मित्र दिल्ली दरबारला बिर्याणी चापून त्या खालच्या पायर्‍यांवर रात्री गप्पा मारत बसलो होतो. समुद्राच्या लाटा खळाळत होत्या.. काळेभोर गूढरम्य वातावरण.. आणि वरुन प्रखर टॉर्च पडला.. "ओ हिरो.. मरायचंय का? चला वरती.."

मुंबई पोलीस फारच तत्पर बुवा..

...

बाकी समुद्रावरचा लेख छानच.. मुंबईत नुसता समुद्रच नव्हे तर भरपूर निसर्गही आहे हे मनाने बाहेरच राहिलेल्या लोकांना पटतच नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Nov 2013 - 9:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडला.

-दिलीप बिरुटे

नानबा's picture

26 Nov 2013 - 10:58 am | नानबा

समुद्र म्हटला की आठवतो तो पुरीच्या किनार्‍यावर उभा राहून पाहिलेला समुद्रातला सूर्योदय. आपल्याला सूर्यास्त पहायला मिळतो, पण सूर्योदय पाहण्यातली मजा अविस्मरणीय.
मुंबईतले किनारे कधी आवडलेच नाहीत. गर्दी, कचरा आणि अस्वच्छ पाण्यामुळे कधी फारसं जावसं वाटलं नाही. किनार्‍यावर बसून अथांग समुद्राकडे बघत स्वतःला विसरण्याची अविरत ओढ लागली की थेट गोवा गाठतो. तिथला समुद्रही भन्नाट.
अगदी या लेखासारखाच. :)

गजानन५९'s picture

26 Nov 2013 - 11:10 am | गजानन५९

अप्रतिम लेख मित्रा (नेहमीप्रमाणेच :) )

कीर्ती कॉलेजचा उल्लेख करुनही अशोकच्या वडापावचा उल्लेख न केल्याबद्दल निषेध.. "अशोक.. एक दे ना.. अशोक.. लवकर तीन दे मला.. " इ.इ.इ कावकाव करणार्‍या गर्दीतून हा अस्सल आणि ब्येष्ट वडापाव कसाबसा एकदाचा मिळवून बाजूला चौपाटीच्या वाळूत नेऊन खावा..

तुमचा अभिषेक's picture

26 Nov 2013 - 1:17 pm | तुमचा अभिषेक

खरेय, पण त्याचा उल्लेख आला नाही कारण मी तो समुद्रावर घेऊन न जाता घरी जाताना किंबहुना तिथून प्लाझाला क्लासला जाताना खात खात जायचो. किर्तीचे कँटीन आमच्यावेळी तरी फारसे खास नसल्याने आधीच चविष्ठ असलेला तो वडापाव म्हणजे बरेच काही होता.

अवांतर - आपणही किर्तीवंतच का?

पैसा's picture

26 Nov 2013 - 1:28 pm | पैसा

सुरेख लिहिलंय. आवडलं.

दिपक.कुवेत's picture

26 Nov 2013 - 2:58 pm | दिपक.कुवेत

आवडलं. समुद्र मग तो कुठलाहि असो.....कोणत्याहि स्वरुपात तो पहायला आवडतो.

एस's picture

26 Nov 2013 - 4:11 pm | एस

आपला किनारा काय असावा हे देखील त्या समुद्रालाच ठरवू देतो.

कल्ल्लास्स्स्स्

भावना कल्लोळ's picture

26 Nov 2013 - 4:33 pm | भावना कल्लोळ

आज हि मन उदास असेल कि यांना सांगते कट्ट्यावर जाऊया. हो आमच्या दोघांचा कट्टा. मरिन लाईन्सला पोलिस जिम खान्याचा समोर असलेले बाकडे. पलीकडे असलेला अथांग समुद्र, गड्याची रेलचेल, बाकड्यावर बसलेले आपल्या सारखेच दोन जीव रोजच्या दगदगीतून दोन क्षण काढुन येउन बसतात रातीच्या वेळेला. मग तिथे जाऊन काही न बोलता डोळे मिटुन फक्त ते आवाज अनुभवायचे. मला तर खूप छान वाटते तिथे. सकाळच्या वेळेस समुद्राच्या कुशीतून येणारा सूर्य …… आज हि तो क्षण डोळ्यात विसावला आहे. लेख खुपच सुंदर झाला आहे अभिषेक.

प्रभाकर पेठकर's picture

26 Nov 2013 - 7:05 pm | प्रभाकर पेठकर

सकाळच्या वेळेस समुद्राच्या कुशीतून येणारा सूर्य …… आज हि तो क्षण डोळ्यात विसावला आहे.

मुंबईला समुद्रातून सूर्य उगवतो? असेलही.... जग बदलंय म्हणतात.

राही's picture

26 Nov 2013 - 7:32 pm | राही

मुंबईला सूर्य पश्चिमेला उगवतो की काय? खरंच जग उलटंपालटं झालंय की काय?
(मुंबईला पश्चिमेलाच खरा समुद्रकिनारा आहे. पूर्व किनारा बंदराच्या वर्दळीने झाकोळलेलाच असतो. शिवाय पूर्व किनार्‍यापल्याड भारताची मेन-लँड येते. क्षितिजरेषा फारशी स्पष्ट दिसत नाही.)

भावना कल्लोळ's picture

26 Nov 2013 - 7:32 pm | भावना कल्लोळ

चुक लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यु हा काका, संध्याकाळच्या वेळेस समुद्राच्या कुशीत मावणारा सुर्य कृपया असे वाचावे. काकानु, माणुस हय, चुकता है कधी कधी, असे लगेच चिडवायचे नाही बाबा …. :'( :'-(

प्रभाकर पेठकर's picture

26 Nov 2013 - 7:38 pm | प्रभाकर पेठकर

>>>> संध्याकाळच्या वेळेस समुद्राच्या कुशीत मावणारा सुर्य कृपया असे वाचावे.

धन्यवाद. बाकी लगेच चिडायला आणि रडायला काय झालं? होते कधी कधी चुक.

उपास's picture

26 Nov 2013 - 7:58 pm | उपास

जिथे रीक्ष नाही ती मुंबई बाकी सगळी बृहन मुंबई असं ढोबळ मानाने म्हणता येईल!

प्रभाकर पेठकर's picture

26 Nov 2013 - 8:24 pm | प्रभाकर पेठकर

मुंबईचे दोन भाग आहेत. १) बृहन मुंबई २) मुंबई उपनगरे.

जी मुळ ७ बेटं होती, ज्यांची मुंबई बनली ती बृहन मुंबई (फोर्ट, कुलाबा ते वांद्रा पर्यंत) (Greater Bombay) आणि वांद्र्याच्या पुढे दहिसर पर्यंत मुंबई उपनगरे (Bombay Suburban). पश्चिम उपनगरे दहिसरपर्यंत तर पूर्व उपनगरे ठाण्यापर्यंत आहेत.

राही's picture

26 Nov 2013 - 11:33 pm | राही

१)पूर्व उपनगरे मुळुंदपर्यंत आहेत, ठाणे हे मुंबईचे उपनगर नाही. आता तर तेथे स्वतंत्र महानगरपालिका आहे.
२)सध्या बृहन्मुंबई महानगरपालिका (Municipal Corporation of Greater Mumbai-MCGB) हे अधिकृत नाव आहे.
३)मुंबई उपनगर हा आता एक जिल्हा आहे. त्याचेही पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग होऊ घातलेत.

उपास's picture

26 Nov 2013 - 8:01 pm | उपास

गिरगाव चौपाटी आणि बॅड स्टँड आठवलं..
रविवारी संध्याकाळी मस्त फुटबॉल खेळावा मरिन लाईन्सला आणि समुद्रात डुबकी मारावी समोर.. पावसात उधळलेला समिंदर पाहावा नाहीतर पावसाळ्यात खारट पाण्याच्या लाटा झेलाव्यात किंवा थंडीत गार वाळूत पडून राहावं चांदण्या बघत.. नाहीतर मग पार टोकाला दगडात जाऊन पडावं नरिमन पॉईंटला.. रात्रीचा काळाशार समुद्र अगदी गारुड करतो मनावर..
- समुद्राच्या कुशीत वाढलेला गिरगावकर
उपास

सुहास..'s picture

27 Nov 2013 - 11:45 am | सुहास..

म्हणणार होतो की फोटो कुठे आहेत ...पण तु मस्त चित्रमय लिहीले आहे ..त्यामुळे पास :)

तुमचा अभिषेक's picture

27 Nov 2013 - 11:29 pm | तुमचा अभिषेक

फोटो मी मिपावर आजवर कधी टाकले नाहीत, त्यामुळे आधी कसे टाकतात ते बघावे लागेल, पण त्यापेक्षा महत्वाचे भाऊच्या धक्क्यावर काढलेले फोटो काय कसे किती आहेत हे शोधावे लागतील, कारण मला स्वताचे फोटो काढून घ्यायचा शौक जास्त आहे. :)

पण आता विषय काढलाच आहे तर आमच्या भाऊच्या धक्क्याचा एखाद दुसरा फोटो डकवायचा चान्स साधतोच :)

प्रमोद देर्देकर's picture

27 Nov 2013 - 1:29 pm | प्रमोद देर्देकर

लहानपणी मामाच्या गावाला दापोली- मुरुडला गेलो कि पहिले धावत समुद्र किनार्यावर जायचो शक्य झाले तर जाताना माडाच्या झाडावर ज्या खाचा असायच्या त्यावर थोडा वर चढून खूप लांबवर समुद्र बघायचो. मग पुळणीवर जायचो. खर तर मला समुद्रात खूप आत खोलवर जावून तिथला चारी बाजूला पाणी च पाणी हा अथांग पणा अनुभवायचा आहे, समुद्र प्रवास करायचा आहे पण ते शक्य होत नाहीये. कसे जाता येईल कोणी सांगेल काय? तसेच समुद्र/ बोट या विषयावर तयार झालेले हिंदी, इंग्रीजी चित्रपटांची कोणे नावे सुचवीत काय?

तुमचा अभिषेक's picture

27 Nov 2013 - 11:34 pm | तुमचा अभिषेक

लांबवरचा प्रवास आजवर मी देखील केला नाही, मात्र छोट्यामोठ्या प्रवासी बोटीने (लाँचने) भाऊच्या धक्क्यापासून अलिबाग आणि ऊरण तसेच गेटवे पासून एलिफंटा वगैरे प्रवास केलेत, असेच काही प्रवास कोकणात देखील झालेत, गोव्याला क्रूजचा अनुभव घेतलाय, तर यापैकी काही जमवा..

हा लेख वाचायचा राहूनच गेला होता की काय!

गेटवेचा समुद्र म्हणजे नवं वर्ष साजरी करण्याची आमची आवडती जागा. दरवर्षी १ जानेवारीला पहाटे सूर्योदयापूर्वी गेटवेला पोचायचं. सगळी मुंबई रात्रभर दंगा करून घरी परतलेली असते, त्यामुळे गेटवेवर बहुधा शुकशुकाट.. त्यावेळी तरी असायचा.

तिथल्या पाय-यांवर, किंवा कट्ट्यावर बसून वर्षाचा पहिला सूर्योदय पाहायचा! हो, गेटवेला सूर्योदय समुद्रातून होत असल्यासारखा दिसतो.

मग तिथून एखाद्या इराण्याकडे ब्रुन मस्का आणि चहा, तर कधी केक. मस्त सुरुवात असायची नव्या वर्षाची.