तालीम

शिवोऽहम्'s picture
शिवोऽहम् in दिवाळी अंक
26 Oct 2013 - 8:48 am

बजरंगा म्हन्त्यात मला. तालमीजवळ खोली हाय आमची. म्हंजी मी आन् थोरली भन रहायलोय न्हवं का! नरसिंगपुरास्नं आलोया हितं कोल्लापुरात. टेशनाजवळ आमचा मावळा सांजंच्या टायमाला भाजी इकाय् येतोय, तेच्या वळकीनं ही खोली धरलिया. भनीला पतकी डाक्टरांच्यात काम मिळालंया म्हून बरं. दीसभर दवाखाना झाडती-पुसती. लऽय मोट्टंमोट्टं लोक येत्यात थितं, पोर व्हईना म्हनताना! गावाकडं आसलं काय आसतं तर समद्यांनी खुळ्यात काढला असता की “मर्दा! आरं नवी बाईल आनशिला का डाक्टराफुडं जाशिला!” पर पोरगं झालं का आयबाप समद्यास्नी बक्षिशीबी देत्यात लऽय कायतर. भनीलाबी मिळतंया कवा-कवा! तसं बरं हाय म्हनायचं हितं. मामाबी भाजी देतोय र्‍ह्यायल्याली, मेथी न्हायतर पोकळा. पर घरला न्हेत न्हाई!

नरसिंगपुरात सम्द्यास्नी लऽय तरास दिला मी. हिरीत मुटके मारायचे नायतर तालमीत रमायचं सम्दा येळ, साळंचं नाव काडाय् नाय! बा वरडु-वरडू ज्याम झाला, पर माजा नाद बघून त्यो जास्त् काय माराय नाय मला. आता हितं कोन जाया बसायलंय साळंत आन् कालेजात? मिसरूड आलिया आन् कोन घेतया आमास्नी साळंत! भन म्हनाय् लागलिती का आता कायतर कर बाबा. तिलाबी झेपंना झालया वो. पन भनीला बोलाय् आपला काय घास नाय. आता तर ती हाय दोन जीवाची, र्‍ह्यायलंच की मग!

आय आन् बा दोगंबी गेल्ते कराडला डाक्टर कराया आन् परतीच्या वाटंवर ट्रकानं उडिवलं की! थितंच ख्येळ खलास. चुलता बळबळं टिपं गाळत हुता, आता काय त्योच उसाला कोल्हा! भन गारव्याला आल्ती. तिला घालवाया गेलो इस्लामपुराकडं. दाजी म्हन्लं का कागुद कवा करू या? म्या म्हनलं बगू या; नंतर चुलत्याला घेउन येतू, यकटा काय कराय् न्हाय मी. तर कानसुलात हानली यक माज्या, आन् म्हनलं का भनीला नांदवायाचं हाय का नाय? दाजी हाईत खुटखुटीत, यका थापडीचा गडी. बाया-मान्सं समोर हुती तवा कमी-ज्यादा व्हाया नाय पायजेल, म्हनून मी गपगुमान बसलोतो. पन भनीचं डोचकं फिरलं आन् म्या उलटं बोलाय् आदुगर तीच तेन्ला शिव्या द्या लागली, तवा तिचं केस धरलं आन् हुंबावानी दनान् हानाय् लागलं की वो! मला कायबी सुधरना झालं, तसं तुज्यायचीऽ दाजीन्ला भिडलो आन् कमरंला पुट्टी मारून खाली घेतला, घोसाळला. मानंवर सांडा हफ्ता भरून डोचकं भुईत दाबलं. कसकरलंच त्ये! उई-उई आवाज कराय लागलं सोड, सोड भाड्या! तवा दोगं गडी माज्या पाठीवं आलं आन व्हलपाटाया लागलं. रांडेच्यांनी मिळून माजं नरडं दाबलं, तवा सुटला दाजी! मी किती येळ मार खाल्ला ठावं न्हाई, पन कवातर सुद्द हारपली. जागा झालो तवा भन शेकत बसल्याली आन् मला इवळताना बगून रडाया लागलीती. बोलली का आता न्हाय र्‍हायाचं हितं! दुसर्‍या दिशी गटुडं बांधून दोगं निगालो. पायात पाय बांधल्यागत झाल्यालं.

चुलत्यानंबी दात दाखिवलं. घर-जिमीन माजीच हाय म्हनायं लागला! सातबार्‍याचा कागूद दाखवाया लागला. मी आईकना, तवा एक दीस पायतानानं केस काडलं माजं. कुनीबी पाठीशी र्‍हायलं न्हाय, तवा तगमग झाल्ती आन् बाची लय आटवन आली, रडाय लागलो. काकी ठसक्यात म्हनल्या, “रडायचं काय काम न्हाई बगा, पावन्यासारकं र्‍हावा आन जावा कुटं जाताय थिकडं. खाली मान घालून चार दीस काडलं, तवा मामा आला आन म्हनला का चला कोल्लापूरला. काम जोडून देतो म्हनताना आलो हितं. शाहुपुरीत कामबी हाय आन् तालीमबी हाय! हितं आल्यावर दाजीचं सुरू झालं की, नांदाय येत न्हाईस खरं बायकू हाईस न्हवं का? थिकडं दुसरी हाय म्हनं आता. पन येत्यात अधी-मधी. मी तालमीत झोपाया जातो मंग.

चार दिस जाऊन, मारोतीला डोस्कं टेकून उगा धा-ईस जोरबैठका कराय् लागलोतो. कोन वळखीचं न्हाईत न्हवं. पोरं समदी घुमत हुती. कोन दोर चढायलाय, कोनाच्या हाती मुद्गल, कोन गळ्यात दगडी गुंडी घालुन बैठका मारायलाय! समोर कोपर्‍यात एका दांडग्यानं घामानं रांगुळी घातल्याली आन अज्जी बाणावानी घुसायलाय हनुमान-जोर. हौद्यात जोड्या झुंजत होत्या. लाल मातीत सम्दे पाऽर रंगल्याले! जरा येळानं दम निगंल, पोरं आन पैलवान गार दगडावं निवांत आडवं हुनार आन् आंग धुऊन बदामथंडाई हाननार, झालंच तर केळी..

लुंगी लावल्यालं हानिफ वस्ताद जवळ आलं तवा दिसलं! कानात सुपारी फोडल्याली, ह्येऽऽ भरल्याला आन् उंच. केस पांढरं व्हाया लागलेतं पन् हातात भाकर घेतली तरीबी हात म्होट्टा म्हनावा आसलं जबरी वस्ताद! हिरवा शेमला डोक्यावर आन् दंडाला काळा ताईत. वस्ताद म्हन्ले, आडव्या आंगाचा हाईस! ह्ये आसलं फुसकं चार जोर कशापाय? येतुस का म्हेनत कराया? मी हारकलो! व्हय म्हनून बसलू, तसं वस्ताद म्हनले का उद्यापन तांबडं फुटायाआधी हज्जर र्‍हायाचं आन म्हेनत करायची, पैलवानास्नी मालिश, कवा हौदा खनायचा! ह्ये झ्याक झालं, हानिफ वस्तादाकडं काम लागलं! पन खुराकाचं काय बा? दुद मिळाया न्हाई हितं आन खारिक-खोबरं कोन देनार! तवा म्हटलं का वस्ताद, खुराक व्हत न्हाई तर निस्ती म्हेनत कशी करू? बगायं लागलं येकटक, बोलंना जरा येळ. मग म्हनलं का सांजच्याला ये कालेजापाशी, थितं गाट घालून देतो कामाची. तसं तेचं पाय धरलं. “आरं पोरा, हो बाजूला: म्हनून त्ये गेलं फुडं!

त्या दिशी गेल्तो सांच्याला कालेजापाशी. म्हस पिळनारं हुबं हुतं. धा-पाच म्हशी, झालंच तर येक-दोन भुर्‍या केसाची रेडकंबी. वस्ताद आलं आन् मला बलावून घेऊन गेलं यकाकडं. म्हनलं का ह्यो पोरगा. गोठा साफ करंल, बाकीबी कामं करंल. तांब्याभर दुद द्याचं हेला नेमानं! वस्तादाचं लऽय उपकार हाईत माज्यावं! तोंडानं तेज हाईत, खरं परत्येकाकडं पोरावानी बगत्यात. सक्काळच्याला जो हज्जर न्हाई, तेला दुसर्‍या दिशी पानी शेंदाया लावत्यात आन् म्हेनत बंद म्हनत्यात, का पोरगं पायावं पडतंय आन वस्ताद माफी करा यकडाव म्हनतंय! मुसुनमान हाईत, पर मारोतीच्या पाया पडल्याबिगर माती आंगा लावीत न्हाईत.

भन सकाळच्याला भाकर्‍या-कालवन करून जाती. दवाखान्यात डाक्टर म्हनलं का व्हईल तितकं दिस कर काम, मग हितंच करू या तुजं बाळतपन. मान्सं येगळी हाईत ही. कोल्लापुरात अंबाबाई उगाच न्हाई र्‍हात! रातच्याला मी येतो तवर भन आल्याली नसती. थकून येती. प्वाट मोटं दिसाया लागलंया, आठवा चाललाय न्हवं? डाक्टर हाईतच काय लागलं तर, खरं आपनबी काळजी घ्याया पायजेल न्हाई का? तालीम संपली सक्काळच्याला का आपन गुमान भाकर घेऊन गोठ्यावर जातो राजारामपुरीत बागंजवळ, आन पडंल ते काम करतो. आब्दुल नाईकवडी मालक हाईत. पैसं येळेवर देत्यात आन् दुदबी. काम आटपलं का आपन सरळ घरला येऊन, आंघुळ करून पुन्हा तालमीत जानार! म्हेनत काय होत न्हाई सोडा दोनडाव, खरं संगट र्‍हायाला बरं असतंया. तीनशेच्या वर जोर आन् बैठका हानतोय आता, चार महिनं झाल्यात. केश्या पैलवान आपल्या मालिशीचा हाय बगा!

सकाळच्याला तालमीत गेलो, तर सम्दी वस्तादाभवती गोळा झाल्याली. काय झालं इचारलं, तर म्हनले, “तुला म्हाईत न्हाई व्हय रं? युवराज पाटलाची आन् सत्पालची कुश्ती व्हनार हाय खासबागेत! ह्ये बग फुडारी काय म्हनायलाय. आयला, यवडी मोट्टी कुस्ती लऽय दिसात झाली न्हाई मर्दा!” मी आईकायलोय..

व्हय, व्हय! युवराज पाटील कसला गडी हाय! जोड न्हाई त्येला कोल्लापुरात. आन् सम्द्या हिंदुस्तानातबी! दादू चौगुल्या यवडा दांडगा पैलवान, खरं युवराज पाटलापरीस त्योबी डावा म्हंत्यात! वस्ताद तर सक्काळच्यान् फुरफुरत हुतं, गोष्टी सांगत हुतं जुन्या पैलवानांच्या. कवठेपिरानच्या मारुती मान्यानं वस्तादाला आस्मान दाखिवल्यालं, त्येची गोष्ट आइकल्याली. पन आज कायकाय येगळ्या दंगलींचं सांगाया लागलं वस्ताद. ज्योतीरामदादाचा पठ्ठ्या विष्णू सावर्डे आन् मान्याची कुस्ती चालल्याली खासबागंत, आडीच तास, काय खाऊ हाय काय! हितं धा मिंटात घामटं निगतया. अवो, मोट्टंमोट्टं पैलवान कुस्ती बगाया आल्तं पन खासबागंत पाय ठेवाया जागा न्हाई घावलीती त्यास्नी! यवडी गर्दी. आन् जे का सावर्ड्याची पाठ टेकली, तवा सम्दे फेटे उडाल्ते आस्मानात! मग त्यो कोन सादिक पंजाबी आन् भोला पंजाबी आल्ता कोल्लापुरात; त्येला, झालंच तर चंदगीराम दिल्लीवाल्याला बेळगावात मारुती मान्यानं चारी मुंड्या चित केलेला का न्हाई! अजूनबी येत्यातच की सत्पाल, कर्तारसिंग! तेबी लई ताकदीचं, दांडगं पैलवान हायेत पन गंगायेसच्या बिराजदारानं पानी पाजलंवतं त्येस्नी! दीनानाथसिंह तर निस्तं नावाचं भय्या उरल्यात, हितलंच झाल्यात जनू.

त्या दिशी म्हेनत काय झाली काय म्हाईत, निस्त्या गपाच हानल्या मी. वस्तादबी काय वरडाय् न्हाई आमास्नी. फुडारी बघिटला तर काय, पाटलाचा फोटो महाराष्ट्र केसरीची गदा घेतल्याला, आकडी मिश्या आन् ह्याऽऽ भक्कम मांड्या राव! नारळ येका मुठीत फोडतोय! दुसर्‍या बाजूला सत्पालचाबी फोटो, खरं त्यो खडाखडी करनारा. गडी मजबूत-उंच हाय, खरं पाटलावानी घप्प न्हाई. सागाच्या तेलपानी दिल्या सोटावानी वाटायलाय. हल्क्या आंगाचा असनार ह्यो. वस्ताद म्हनलेला का हेचा पट कोन काढाया गेला तर नागावानी उसळी घेऊन पलटतोया आन सपाट्याचा घिस्सा भरतोय, का समोरचा गडी खेळन्यागत् पाठीवर आलाच म्हनायचा! मज्जा येनार बगा! युवराजच्या पकडीत घावला तर सुटायचा न्हाई अज्जाबात, आन् युवराजला कवंत घेईल यवडा याचा काय घेर न्हाई.

दीस चाललं. वस्ताद फोक घेऊन बसाया लागला आन् सम्दी मान खाली घालून व्यायाम कराया लागलो. पन जरा येळ घावला का येकच विषय! आठ दीस र्‍हायलं; आता सा दीस र्‍हायलं! फुडारीत फोटो आला वस्ताद गुरू हानुमानाचा. वस्ताद आंदळकर हार घालाया गेल्ते त्यास्नी, आन् सत्पाल गुरूच्या मागनं हुबा हाय. निकाली लढत होनार म्हन्लं हानुमान! म्हातारा सोता अजून हौदा खेळतोय. पैलवानांची पलटन तयार केलिया आन देशभर शड्डू ठोकत हिंडत्यात. पन त्येलाबी ठावं हाय का हितं कोल्लापुरात जिंकलं का मगच कुस्ती मारली म्हनत्यात, न्हाईतर लऽय पैलवान हाईत बेटकुळ्या दाखिवनारं! यकदा का दम तुटला, का मंग कितीबी म्होट्टा पैलवान असला तरी लकडकोटाकडं पळतुया! गुंग्या पैलवानाची गोष्ट सांगिटलेली आमच्या वस्तादानं. का ह्यो पळाय् लागलेला खासबागंतनं आन तेच्या वस्तादानं खानकन् कानाखाली वाजवल्याली, थूत् तुज्या म्हनून! मग अस्सा पेटला गडी, का म्होरच्याला आडवा करूनच दम घेतला मर्दानं!

आता उद्या हाय कुस्ती! सातार, सांगली, बेळगाव, पुन्याकडचं शौकीन आनी पैलवान यायला लागल्यात गावात. युवराज पाटील अंबाबाईला दर्शनाला जाऊन आला म्हनं. तालमीत र्‍हावं वाटंना बगा! मोतीबागकडं गेलो. गर्दी जमल्याली भाईर. पोलीसबी हुतं! आता ह्ये आनी कशापाई? सांबाळत्यात सम्दं वस्ताद मान्सं. उगा हिकडं-तिकडं केलं, कोनबी दिसंना. मग आपलं शाहुपुरीत आलो रमत-गमत. केश्या पैलवान भेटला रस्त्यात, म्हनला का उद्या जायाचं का रं आपुन? मी म्हनलं का तिकीटं असनार की! वस्ताद बघाया ग्येला तर लऽय झालं. केश्या म्हनतो कसा, “आरं तिकटीकडं बोळ हाय! थितनं घुसाया जागा हाय, पन बेगीनं जाया पायजेल. कोन इचारलं तर देऊ या की दोन रुपयं त्येला! हे ब्येस झालं की..”

रातच्याला घरला आलो, भन घरला आल्ती आन् जरा पडल्याली. जेवलो आन आडवा झालो.

सक्काळी च्या घेतला, आंघुळ केली आन् निघालो तालमीकडं. केश्या पैलवान कुठं उलथलेलं समजंना. जरा येळ वाट बघितली, बघितली. दिस वर याया लागला, तसा मग निघालो खासबागंकडं. देवल क्लबापास गर्दी जमाय् लागल्याली. मीरजकर तिकटीकडंबी ज्याम बंदोबस्त हुता म्हनं. आत्ता! घुसाया जागा नको व्हय? प्रायवेट साळंच्या बाजूनं निघालो, मागनं वळून मीरजकर तिकटीकडं आलो. खासबागंकडं जानारा बोळ हुडकाया लागलो. बघितलं तर समोर केश्या पैलवान हुबं हुतं, हान् तेच्यायला! “आरं मर्दा, कुटं गेल्तास?” म्हनलं, तर बाव्हटा धरून मला बोलला का “कवाधरनं हुडकायलोय, फिर मागं!”

“का रं, कशापाई?” “आरं, डाक्टरांच्यातनं सांगावा आल्ता का तुजी भन आडमिट केलिया बग!” थितंच बसकन् मारली मी. हे काय आजच व्हाया पायजेल हुतं व्हय? उद्या झालं तर चाललं नस्तं काय? काय समजंना मला तर..

मग उठलो, पायजमा झाडला आन परतीच्या वाटंला आलो. जरा येळाआधी पाऊल निघत न्हवतं, खरं आता झटपट, धावत दवाखान्याकडं निघालो! काय हुतंय कुनास ठाव? पोचलो यकदाचा. दमगीर झाल्तो. पायरीवर जरा टेकलो आन् आत शिरलो. इच्यारलं. भनीला आत नेल्यालं हुतं. बसाया जागा हुती थितं बसलो आन् वाट बगाया लागलो. चित् थार्‍यावर न्हाई खरं! लऽई धिराची हाय भन, कुठंबी फेकली तरी मूळ धरनार अशी. आय-बाच्या माघारी मला हाय तरी कोन बा? जित्ता हाय तंवर भन आन् मी येकयेका जोडुन र्‍हाया पायजेल की! तिची ही येळ संबाळायला पायजेल. पोरगं झालं तर काय भारीच हाय म्हना, पन पोरगी झाली तर भनीसारकी होऊं दे, भनीच्या नशिबाची नको.

किती येळ थितं बसलोतो, ठावं न्हाई. दुपार उतरल्याली तवा डाक्टर येऊन थांबलं शेजारी आन् बोलाया लागलं, तरीबी मला काय आईकू आलं न्हाई. मग हळूहळू सुधराया लागलं. “पोरगं हाय.. पोरगं हाय!” काय करू आन् काय नको झालं मला तर! डोळ्यात पानी आलं आन् डाक्टरांचं पाय धरलं. मोट्टा मानूस हाय, लऽई उपकार झाल्यात माज्यावं! दीस सम्दा हिकडनं थिकडं करन्यात गेला. भन झोपलीती म्हनताना सोडंनात मला. शेवटला सांजच्याला आत सोडलं आन् भन दिसली. थकल्याली आन् शेजारी यवडं-यवडं बाळ! अजून डोळंबी उघडलं न्हाईत. निस्तं बघत बसलो, झालं.

केश्या पैलवान भाईर थांबल्यालं हुतं. भेटलो त्यास्नी. ते म्हनले का मैदान मारलं पठ्ठ्या पाटलानं, सत्पालची रग जिरली खासबागंत! हल्कं-हल्कं वाटलं मला. युवराज पाटील जिंकलं, कोल्लापुरात आस्मान दाखिवलं सत्पालला.. बास झालं! भनीच्या, पोराच्या गडबडीत कुस्तीचं विसरायला झाल्तं. पन पोरगं आलया, आता मामास्नी हातपाय हालवाया पायजेल का न्हाई? आब्दुलमामुस्नी इचाराया हवं, काय कुठं जुळतंय काय ते. कुस्ती कुठं लांब-लांब जायाली वाटायं लागली.

तालमीकडनं निघालो घराकडं. वस्ताद उघड्या आंगानं बसलं हुतं भाईर. लाईट बंद झाल्याले आतले. मला बघून हाकारले तवा गेलो. म्हनले का “समजलं सम्दं, पोरगं झालं न्हवं? पठ्ठ्या, म्हेनत सोडाय् नाय बग.” माज्या घशात दाटल्यालं, आवाज फुटंना. कसंतर व्हय म्हनलं, तेंचं पाय शिवलं आनी निघालो फुडं. तालीम र्‍हायली मागं. मागं वळून बघितलं, वस्ताद वारं घेत बसल्यालं निवांत. वस्ताद, तालीम बघताना डोळ्यात पानी आलं माज्या.

पन आजचा दीस इसरनार न्हाय मी कवा!

दिवाळी अंक २०१३

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

1 Nov 2013 - 2:40 pm | बॅटमॅन

केवळ नि:शब्द!!!!!!!!!!!! _/\_

फार जब्री. अस्सल दक्षिण महाराष्ट्रीय फ्लेवर आणण्यात तुमचा हात क्वचितच कुणी धरेल. फारच आवडले.

शेवटचं 'मामा' होण्याचं वर्णन लाजवाब! आणि कथेतले युवराज पाटील, सतपाल, वस्ताद आंदळकर, गुरू हनुमान हे सर्व संदर्भ माहितीचे असल्याने कथा आणखी ओळखीची वाटली. फारच सुंदर लिखाण आहे, जियो!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Nov 2013 - 5:31 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्त.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

1 Nov 2013 - 5:35 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

कसलं कसदार लिखाण!! मानल राव!!
भाषेवरची पकड जबरदस्त आहे तुमची..

__/\__!!

कुसुमावती's picture

1 Nov 2013 - 5:45 pm | कुसुमावती

सुरस कथा.कोल्हापूरची आठवण करुन दिलीत.

आतिवास's picture

1 Nov 2013 - 11:41 pm | आतिवास

सुंदर कथा. ओघवत्या शैलीने शेवटपर्यंत खिळवून ठेवलंत तुम्ही.

पैसा's picture

2 Nov 2013 - 8:44 am | पैसा

चटका लावणारी कथा आणि अस्सल गावाची भाषा! खासच!

मुक्त विहारि's picture

2 Nov 2013 - 10:11 pm | मुक्त विहारि

एकदम कोल्लापुरी..

वेल्लाभट's picture

3 Nov 2013 - 9:00 am | वेल्लाभट

विचारात गुंतलो वाचता वाचता.... च्छान लिहिलंयत!

प्रभाकर पेठकर's picture

3 Nov 2013 - 10:21 am | प्रभाकर पेठकर

फार फार सुंदर लेखन. भाषेला पक्का कोल्हापुरी गावरान बाज आणि दादू चौगुले, युवराज पाटील, मारूती माने, सतपाल सिंह, चंदगीराम वगैरे वगैरे अगदी ओळखिची नांवं. एकदा वाचायला सुरुवात केली ते शेवटपर्यंत एका दमात संपविलं. धष्ट्पुष्ट पहिलवानाच्या मनाचा संवेदनशील हळुवार कोपरा शब्दाशब्दातून अनुभवला. बिचार्‍याच्या बहिणीचं काय होतं ह्या काळजीने मन व्यापून राहिलं होतं पण शेवटी पहिलवान 'मामा' बनले आणि जीव भांड्यात पडला.

दर्जेदार लिखाण आहे. अभिनंद्न.

दिपक.कुवेत's picture

4 Nov 2013 - 11:15 am | दिपक.कुवेत

आख्खं कोल्हापुर एका दमात फिरवुन आली. मजा आली वाचताना.

शिवोऽहम्'s picture

4 Nov 2013 - 4:25 pm | शिवोऽहम्

सर्वांना धन्यवाद!

कुस्तीतली मोठमोठी नावं आपल्याला माहिती असतात; त्यांच्याबद्दल थोडं का होईना माहिती असतं. पण यशस्वी पैलवान बोटावर मोजण्याइतकेच. बरेचसे शिकाऊ, उमेदवार पैलवान मेहनत करतात पण त्यांना फार प्रतिकुल परिस्थितीत हा छंद जोपासावा लागतो. शेकडा ९५ गळती निश्चित. आमच्या कंपनीच्या कॅब सर्विस मध्ये असेच एक मामा आहेत, वस्ताद दिनानाथसिंह यांच्या हाताखाली मेहनत केलेले. आता तब्येत उतरली आहे पण मोडलेले कान आणि रुंद मनगटं लपुन रहात नाहित. माझा एक मित्रही असाच हौशी कुस्तीगीर होता, पण वडिलांच्या व्यसनापाई रद्दीच्या दुकानात गठ्ठे उचलु लागला.

अशा या उपेक्षित क्लासवर एक झोत टाकावा म्हटलं.. बाकी कुस्ती, कोल्हापुर, तिथली अरभाट आणि चिल्लर माणसे हा विषय हा बॅकड्रॉप समजावा.

लय भारी लिहलंय. अगदी पहिला पाऊस पडल्यानंतर मातीचा येणारा वास मनसोक्त आणि भरभरून घ्यावा असं वाटलं.
माझे गाव दह्यारी आहे आणि दह्यारी आणि कुस्ती यांचे अतूट बंधन आहे. कारण माझ्या गावाने ह्या महाराष्ट्राला पहिला "महाराष्ट्र केसरी" चा बहुमान मिळवून दिला आहे. श्री. दिनकर (पाटील) दह्यारी हे कुस्तीच्या इतिहासातील पहिले महाराष्ट्र केसरी होते हे तुमच्या कंपनीच्या कॅब वरील ड्राइव्हर मामा सांगतील. श्री. दिनकर दह्यारी यांचे बंधू श्री. काका दह्यारी हे सुद्धा "उपमहाराष्ट्र केसरी" होते. ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे. हे दोघेही भाऊ कोल्हापूरच्या तालमी मध्येच खेळत होते.
तुम्ही या कथेतून पुन्हा गतकाळात घेऊन गेलात तुमचे आभार आणि अभिनंदन !

स्पंदना's picture

11 Nov 2013 - 1:07 pm | स्पंदना

कोल्हापुरी माणस अशीच बघा. वागताना वाटतील आडदांड खर आतन जणु मातीच ढेकूळ. अलगद इरघळत्यात पाण्यात पडल्यावानी मायेन, खर उनाचा तडका बसल तशी जादाच कडक होत जात्यात आमच्या भागाची माणस.

मस्त लिखाण शिवोऽहम! सुरेख!

शैलेन्द्र's picture

11 Nov 2013 - 11:02 pm | शैलेन्द्र

अतिशय छान लेखन.. डॉ पत्कींचा संदर्भही खराय :)

कपिलमुनी's picture

14 Nov 2013 - 1:45 pm | कपिलमुनी

मनाला भिडला !!

भास्कर केन्डे's picture

23 Jan 2018 - 12:48 am | भास्कर केन्डे

अस्सल गावराण कथा. काय फर्डा लेखक आहे. मानलं ब्वॉ. कथेवर पकड ठेवत रंग आणला आहे. सुरुवातीपासून शेवटा पर्यंत खिळवून ठेवलेत.

अमितदादा's picture

23 Jan 2018 - 2:59 am | अमितदादा

भारी...आवडली कथा आणि शैली

निशाचर's picture

23 Jan 2018 - 4:01 am | निशाचर

मस्त!

रुपी's picture

23 Jan 2018 - 11:39 pm | रुपी

एक नंबर!
भारी लिहिलंय.. लेखनशैली आणि भाषेचा बाज अगदी मस्त जमलाय.

ही कथा वर आणणार्‍यांचे आभार!

गामा पैलवान's picture

24 Jan 2018 - 2:22 am | गामा पैलवान

च्यायला, ही कशी हुकली माझ्याकडनं! एव्हढा तोलामोलाचा पैलवान मी, पण हिनी हुलकावणी दिली खरी.

-गा.पै.

अर्धवटराव's picture

24 Jan 2018 - 2:51 pm | अर्धवटराव

भले शाब्बास.

अवांतरः
हे कानात सुपारी फोडणे काय प्रकरण आहे ? खरच कानात सुपारी फोडतात का? आणि कशी? पैलवानी दृष्टीने त्याचा फायदा काय ?

खरंतर कानात सुपारी वगैरे काही फोडत नाहीत, पण तसं म्हणतात. कुस्ती शिकताना, खडाखडी करताना पहिलवान एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेताना प्रतिस्पर्ध्याच्या कानांवर थपडा मारतात त्यामुळे कान हळूहळू निबर होऊन सुजू लागतो आणि असे कान असणे हे पहिलवानांसाठी मोठे भूषण मानले जाते.

नरेश माने's picture

21 Feb 2020 - 3:30 pm | नरेश माने

जबरदस्त कथा! कोल्हापुरी भाषेचा ठसका भारी जमलाय.

अभिरुप's picture

20 Apr 2020 - 7:13 pm | अभिरुप

अगदी मारुती मानेंच्या काळात नेउन ठेवलेत. मारुती माने, युवराज पाटिल, सतपाल, बिराजदार तसेच दादु चौगुलेंचा उल्लेख समर्पक.

वीणा३'s picture

20 Apr 2020 - 11:33 pm | वीणा३

फारच सुरेख लिखाण !!!

जव्हेरगंज's picture

21 Apr 2020 - 12:10 am | जव्हेरगंज

ब्रिलियंट कथा!!!

सिरुसेरि's picture

21 Apr 2020 - 3:41 pm | सिरुसेरि

सुरेख लेखन आणी कुस्ती क्षेत्रातील सखोल माहिती .