बॉम्बे डक - आगरकर निवृत्त!

फारएन्ड's picture
फारएन्ड in जनातलं, मनातलं
21 Oct 2013 - 11:41 am

२००३ मधली ब्रिस्बेन कसोटी. भारताचा स्कोर ऑस्ट्रेलियाच्या स्कोरच्या पुढे नेऊन व स्वतः शतक मारून दादा नुकताच आउट झालेला. आगरकर खेळायला आला. मग एक दोन बॉल्स नंतर एक रन काढला आणि जणू शतक मारल्यासारखे बॅट उंचावून सर्वांना दाखवली. स्वतःच्याच अपयशाबद्दल इतक्या सहजतेने सेन्स ऑफ ह्यूमर दाखवणारा खेळाडू क्वचितच कोणी असेल. येथे बॅट दाखवण्याचे कारण म्हणजे त्यापूर्वीच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात अजित आगरकर त्यांच्या विरूद्ध सलग ७ वेळा शून्यावर आउट झाला होता. त्यातील चार वेळा 'गोल्डन डक' म्हणजे पहिल्याच बॉलवर! तेथेच त्याला 'बॉम्बे डक' नाव पडले. त्यामुळे मग जेव्हा त्याने त्यानंतर पहिल्यांदा तेथे रन काढला तेव्हा मोठीच कामगिरी होती ती!

पण त्याला 'डक' समजण्यातला धोका कांगारूंना पुढच्याच अ‍ॅडलेड कसोटीत दिसला. पहिल्या डावांत साधारण बरोबरी झालेली असताना दुसर्‍या डावात त्यांचे सहा लोक उडवून आगरकरने मॅच ओपन केली. मग द्रविड ने दुसर्‍या डावातही शेवटपर्यंत राहून ती जिंकून दिली. पण चौथ्या दिवशी आगरकरने त्या विकेट्स काढल्या नसत्या तर भारताला संधीच मिळाली नसती.

अमेरिकेतील वर्ल्ड सिरीज किंवा इंग्लंड मधली काउंटीची चॅम्पियनशिप आधीच्या सीझन मधे जिंकून देणारा कप्तान जेव्हा निवृत्त होतो तेव्हा मीडियामधले रकाने च्या रकाने त्याला वाहिले जातात. अमेरिकेत पुढे त्यांच्यावर चित्रपट निघतात. आपल्या रणजी ला तेवढी किंमत दिली जात नाही. पूर्वी तेथे धावांचा पाऊस पाडणारे लोक आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकत नसत तेव्हा ठीक होते. पण आता तसे नाही. नाहीतर मागच्या वर्षी अंतिम सामन्यात महत्त्वाच्या वेळेस जबरी बोलिंग करून मुंबईला करंडक जिंकून देणारा खेळाडू इतका दुर्लक्षित राहिला नसता.

मागच्या सीझन च्या आधी आगरकरचे मुंबई व्यवस्थापनाबरोबर काहीतरी वाजले, व तो अचानक संघ सोडून निघून गेला. मग त्याला पटवल्यावर आला, कप्तान झाला व रणजी करंडकच जिंकून दिला. ही खास पाकिस्तानी स्टाईल - आज सर्वसाधारण खेळाडू, उद्या संघाबाहेर्/निवृत्त/बंदी, तर परवा विजयी कप्तान!

आगरकर बद्दल एकदम चपखल कॉमेण्ट एक क्रिकइन्फो वर परवा वाचायला मिळाली - "He would have been the best bowler if an over had only five balls!" :) ओव्हर मधे चार-पाच जबरी भेदक बॉल टाकायचे व त्यातून वाचल्याबद्दल बॅट्समनला बक्षिस दिल्यासारखा एक बॉल द्यायचा ही आगरकरची खासियत. त्यामुळेच तो कधी प्रचंड आवडायचा तर कधी त्याचा प्रचंड राग यायचा.

कौशल्याबद्दल बोलायचे तर फास्ट बोलर चे 'फिजिक' अजिबात नसूनही बर्‍यापैकी चांगला वेग (आणि ९८ साली तो आला तेव्हा असलेल्या आपल्या बोलर्सच्या मानाने तर खूपच चांगला), खतरनाक स्विंग, चांगला यॉर्कर या जमेच्या बाजू. ओव्हर मधे एक 'हिट मी' बॉल देणे हा मेन प्रॉब्लेम. मात्र इतर सर्व बोलर्सच्या तुलनेत अत्यंत चांगली फिल्डिंग, आणि 'ऑल राउंडर' मधे गणना होण्याएवढी नाही, पण अचानक चमक दाखवणारी बॅटिंग. लॉर्ड्स च्या ड्रेसिंग रूम मधे तेथे कसोटी शतके मारणार्‍यांची नावे लिहीलेली आहेत तेथे असलेले त्याचे नाव तेथील टूर गाईड आवर्जून दाखवतो.

त्याच्या स्विंगचे एक खतरनाक उदाहरण. रिप्ले मधे लक्ष देऊन बघितलेत तर अफाट स्विंग लक्षात येइल. कालिसचा ऑफ स्टंप उडवणे इतके सोपे नाही.
http://www.youtube.com/watch?v=010HkflyuI4

स्टीव वॉ ने त्याच्या आत्मचरित्रात लिहीले आहे की त्याच्या करीयर च्या सुरूवातीला रिचर्ड्स ला बोलिंग करताना मुद्दाम खुन्नस उकरायला त्याने त्याला बाउन्सर टाकला होता. ही त्याचीच मात्रा वॉ विरूद्ध, त्याच्याच सेलेब्रेटरी शेवटच्या सिरीज मधे
http://www.youtube.com/watch?v=l4v1e_WgYh4

जयसूर्या ९६-९७ मधे पाटा विकेट्स वर व्यंकटेश प्रसाद ई ना ठोक ठोक ठोकायचा (अर्थात प्रसादही आपण हेडिंग्ले च्या स्विंग वाल्या किंवा पर्थच्या बाउन्स वाल्या पिचवर बोलिंग करत आहोत अशा भ्रमात मुंबई व कोलंबोत त्या लाईन-लेन्थ वर जयसूर्याला बोलिंग करायचा). मात्र माझ्या आठवणीत आगरकरने त्याला कधीच जास्त खेळू दिला नाही.
http://www.youtube.com/watch?v=U6GJjE1a6Tw

भारताकडे 'बोल्ड' घेणारे बोलर्स फारसे नव्हते तेव्हा. त्यामुळे याचा यॉर्कर व त्याने उडवलेले बोल्ड व एलबीडब्ल्यूज उठून दिसत. मग नंतर झहीर, इरफान, आरपी सिंग ई. आले.

आगरकरला मॅन ऑफ द मॅच न दिल्याचे मला सर्वात वाईट वाटले होते ते १९९८ च्या श्री लंकेतील 'इंडिपेण्डन्स कप फायनल' ला. याची थोडी पार्श्वभूमी म्हणजे १९९६ मधे वर्ल्ड कप जिंकल्यावर पुढे दोन वर्षे वन डेज मधे लंका सर्वांनाच भारी पडत होते. जुलै १९९८ मधे तेथे ही एक 'इंडिपेण्डन्स कप' स्पर्धा झाली. त्याच्या फायनलला सचिन व दादा दोघांनीही शतके ठोकून भारताला ३०० च्या पुढे नेऊन ठेवले होते. पण लंकेकडे अजूनही फॉर्मात असलेले वर्ल्ड कपचे हीरो होते. त्यांना घरच्या पिच वर ३०० बनवणे तेवढे अवघड नव्हते. पण गोलंदाजीला इतक्या प्रतिकूल परिस्थितीत आगरकरने जयसूर्या, कालुवितरणा, रणतुंगा व अरविंदा डीसिल्वा या चार सर्वात महत्त्वाच्या विकेट्स प्रत्येक मोक्याच्या वेळी उडवल्या. त्यामुळेच भारत जिंकला. 'मॅन ऑफ द मॅच' नक्कीच आगरकरला मिळायला हवे होते. प्रत्यक्षात सचिनला दिले गेले. तो चांगला खेळला होताच, पण शतके तर गांगुली व डीसिल्वाने ही मारली होती. हे स्कोरकार्ड बघितल्यावर अंदाज येइल.
http://www.espncricinfo.com/ci/engine/match/66157.html

याखेरीज आगरकरच्या बर्‍याच बोलिंग व बॅटिंग मधल्या खेळी लक्षात आहेत. तुमच्याही असतील. अझर, सचिन, गांगुली व द्रविड या चार कप्तानांच्या कारकीर्दीत अनेक वेळा तो संघात आला ते प्रत्येक वेळेस काहीतरी पोटेन्शियल दिसल्यानेच. बर्‍याच संघनिवडींनंतर "अब ये कहाँसे आ गया?" हा माझ्या एका मित्राचा पेटंट प्रश्न असे. सध्याच्या बोलर्स चा फिटनेस पाहता अजूनही कदाचित आला असता. खरे म्हणजे यावर्षीही त्यालाच मुंबईचा कप्तान करणार होते असे वाचले. रणजीची पहिली मॅच सचिनही खेळणार आहे, तर आगरकरलाही का आग्रह केला नाही कळत नाही. त्याने आधीच निवृत्ती जाहीर केल्याने बॉम्बे डक चे स्वॅन साँग आपल्याला बघायला मिळाले नाही.

एकूण एक बर्‍याच वेळा डोक्याला ताप देणारा पण तितक्याच वेळा थक्क करणारा खेळाडू. अजित - आम्हा फॅन्स तर्फे धन्यवाद व शुभेच्छा!

क्रीडाबातमी

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

21 Oct 2013 - 11:53 am | प्रचेतस

सतत दुर्लक्षितच राहिलेल्या खेळाडूवर उत्तम लेख.

प्यारे१'s picture

21 Oct 2013 - 1:00 pm | प्यारे१

आँ?
आगरकर दुर्लक्षित?
आगरकर आवडायचा पण बर्‍याचदा टोणगाच (तोच्च आपला धन्यावाला)असायचा.
बोलिंग मधे नाही चालला तर बॅटींग मध्ये तरी चालेल किंवा उलटं असं करुन...
आधी मेरीटमध्ये आलेला मुलगा नंतर बिघडतो. मध्येच कधीतरी एखादी युनिट टेस्ट गाजवतो नि परत नापास होतो तसं काहीसं आगरकरचं.

कॉमेंट्री करण्यासाठी शुभेच्छा!

अमोल केळकर's picture

21 Oct 2013 - 11:59 am | अमोल केळकर

मस्त आढावा :)

अमोल केळकर

झिम्बाब्वेच्या विरूद्ध त्याने ठोकलेले अर्धशतक. केवळ २१ चेंडूंमध्ये...
भन्नाट...
http://www.youtube.com/watch?v=vGXT6UtFRfo

चावटमेला's picture

21 Oct 2013 - 12:52 pm | चावटमेला

स्वतःकडे असलेल्या प्रचंड पोटेन्शिअल ला न्याय न देवू शकलेला खेळाडू. पल मे तोला पल मे मासा असा खेळ असायचा आगरकर चा. फॉर्मात बॅटिंग करत असेल तर काही काही फटके अगदी दर्जेदार फलंदाजाला लाजवेल असे मारायचा. आणि मला सगळ्यात जास्त आवडायची ती त्याची फील्डींग. आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट फील्डींग करणारा भारतीय बॉलर (नेहरा, बालाजी, इशांत च्या तुलनेत तर आगरकर म्हणजे जॉन्टी र्‍होड्स च). रॉबिन सिंग सुध्दा चांगला फील्डर होता, पण आगरकर चा हात धरू शकेल असा बाऊंडरी लाईन वरचा फील्डर तर भारतात अजून पाहिला नाही, विशेषतः त्याने ज्या काळात क्रिकेट खेळायला सुरूवात केली ते लक्षात घेता..

बेकार तरुण's picture

21 Oct 2013 - 1:01 pm | बेकार तरुण

माझ्या आठवणिप्रमाणे आगरकरनि सगळ्यात जलद ५० विकेट घेतल्या आहेत एकदिवसिय सामन्यात. सुरवातिला त्याचा अखूड टप्प्याचा चेन्डु भल्या भल्याना चकवत असे.

चिगो's picture

23 Oct 2013 - 2:17 pm | चिगो

हेच म्हणायला आलो होतो.. अजित आवडायचा, पण फारएन्डरावांनी लिहीलंय तसंच त्याची "लड्डू" बॉल द्यायची सवय चीड आणायची..

मृत्युन्जय's picture

21 Oct 2013 - 1:10 pm | मृत्युन्जय

मस्त लेख.

आगरकर म्हणजे कधी कधी प्रचंड आवडणारा तर कधी कधी शिव्यांची लाखोली वाहीलेला खेळाडू.
फारेंडा आवडला लेख.
हल्ली क्रिकेट या विषयावर जास्त बोलायला आवडत नाही. गप्प राहुनच लोकांची मज्जा बघण्यात आनंद घेतो.
पण एका आवडत्या खेळाडुबद्दल, आवडत्या लेखकाचं लेखन वाचुन रहावलं नसल्याने हा प्रतिसाद. :)

मेघवेडा's picture

21 Oct 2013 - 3:34 pm | मेघवेडा

उत्तम लेख फारेण्डा. आगरकर बोलिंगकरता आवडायचाच. पण विशेष आवडू लागला तो फील्डींगमुळे. त्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो ऑन-फील्ड अ‍ॅम्बिडेक्स्ट्रस आहे. बाउंडरी लाईनवर आपल्या डावीकडे धावत जात चेंडू उचलून डाव्या हातानंही त्यानं कीपरकडे थ्रो दिलेले पाहिल्याचं आठवतं!

वेताळ's picture

24 Oct 2013 - 7:48 pm | वेताळ

खर आहे एकदम वेगळा माणुस आहे अजित आगरकर.... झपकन स्विंग होणारे बॉल आणि एकादा लडु देणारा... हडकुळा व रन अप एकदम कमी ,हळु हळु धावत शेवटी ताकतीने फास्ट बॉल टाकणारा.....माझा आवडता खेळाडु....बॉड्रीवरुन डायरेक्ट स्ट्म्पवर थ्रो...

सौंदाळा's picture

21 Oct 2013 - 2:01 pm | सौंदाळा

काटकुळ्या बॉडीतुन आणि बेताच्या उंचीतुन भन्नाट स्पीड काढणारा गोलंदाज.
सव्वा सहा फुटी इशांत शर्मा, ६ फुटी वेंकटेशप्रसाद यांना शिकवायला हवे होते याने.

अग्निकोल्हा's picture

21 Oct 2013 - 2:53 pm | अग्निकोल्हा

असुन अडचण, नसुन खोळंबा प्रकारातला...

कपिलमुनी's picture

21 Oct 2013 - 3:12 pm | कपिलमुनी

अजित आगरकरच्या घोट्याच्या दुखापतीमुळे त्याच्या करीयरवर फार फरक पडला..

बाकी इशांत शर्मा पेक्षा चांगला बॉलर नक्कीच होता

मृत्युन्जय's picture

21 Oct 2013 - 3:19 pm | मृत्युन्जय

इशांत शर्मापेक्षा चांगला हा आगरकर साठी सरळ सरळ मानहानीकारक उल्लेख आहे. खरे म्हणजे ही तुलनाच होउ शकत नाही. हे म्हणजे सौरव गांगुली अमेय खुरासिया पेक्षा नक्क्कीच चांगला फलंदाज होता असे म्हणण्यासारखे आहे.

एकदिवसीय सामन्यातला आगरकर हा भारताचा दूसरा सर्वात यशस्वी जलदगती गोलंदाज होता (अनिल कुंबळे जलदगती नसुन फिरकी गोलंदाज होता असे म्हटल्यास)

नानबा's picture

21 Oct 2013 - 3:30 pm | नानबा

इशांत शर्मापेक्षा चांगला हा आगरकर साठी सरळ सरळ मानहानीकारक उल्लेख आहे.

+१

अत्रुप्त आत्मा's picture

22 Oct 2013 - 6:32 am | अत्रुप्त आत्मा

+++१११

एक्दम परफेक्ट टिपलेले डीटेल्स. आगरकर एकेकाळी आवडायचाच.

मदनबाण's picture

21 Oct 2013 - 4:22 pm | मदनबाण

लेखन आवडले,हल्ली क्रिकेट नावालाही पाहत नाही.

तिमा's picture

21 Oct 2013 - 4:28 pm | तिमा

लेख आवडला. आगरकर्चे कधी कौतुक वाटायचे तर कधी प्रचंड राग यायचा. पण बंदेमें दम था.

चौकटराजा's picture

22 Oct 2013 - 9:45 am | चौकटराजा

वेरी आड प्लेर !

जे.पी.मॉर्गन's picture

21 Oct 2013 - 5:25 pm | जे.पी.मॉर्गन

छान आढावा..... आगरकरनी तेव्हा डेनिस लिलीला मागे टाकत एकदिवसीय सामन्यांत वनडेत सर्वांत लवकर ५० विकेट्स घेतल्या होत्या. ते रेकॉर्ड नंतर अजंता मेंडिसने मोडलं.

>>"He would have been the best bowler if an over had only five balls!" << हे मात्र शंभर हिश्शे खरं! खरंच डोक्यात जायचा आगरकर.

छानच झालाय लेख!

जे पी

श्रीगुरुजी's picture

21 Oct 2013 - 5:58 pm | श्रीगुरुजी

अजित आगरकर तसा क्वचितच चांगला खेळला. फक्त २४ एकदिवसीय सामन्यात ५० बळी मिळविणारा तो पहिला गोलंदाज. २००३ च्या कसोटीत त्याने ६ बळी घेऊन विजयाचे दार भारतासाठी सताड उघडले होते. १९९९ मध्ये श्रीलंकेविरूध्द एका एकदिवसीय सामन्यात तो खेळायला आला तेव्हा भारताचे ७ गडी बाद झाले होते, १८ चेंडू बाकी होते व जिंकायला २९ धावा हव्या होत्या. एकंदरीत अवघड परिस्थिती होती. पण आगरकरने पटापट धावा करून केवळ १४ चेंडूत विजय मिळवून दिला होता. त्याच्या अशा मॅचविनिंग खेळी थोड्याच. वयाच्या मानाने जरा लवकरच निवृत्त झाला असे वाटते.

पैसा's picture

21 Oct 2013 - 7:19 pm | पैसा

आगरकर ऑस्ट्रेलियात असता तर कायम खेळला असता असं काहीसं वॉ ने म्हटल्याचं आठवतं. त्याला सतत मानहानी करून टीमबाहेर काढण्यात क्रिकेटबाह्य दुसरीच कारणं असावीत असं वाटतं. विशेषतः नेहरा आणि ईशांतसारखे लोक परत परत टीममधे कसे येतात याचा विचार करायचा प्रयत्न केला तर! आगरकरची मॅच जिंकून देणारी कामगिरी अनेकदा दुर्लक्षित राहिली आहे. त्याच्या कामगिरीचं वर्णन करताना पेपरवाल्यांनीही सतत हात आखडता घेतला. त्याला रणजी टीमबाहेर काढल्यानंतर मुंबईच्या इतर खेळाडूंनी तोच कप्तान पाहिजे म्हणून मॅनेजमेंटबरोबर वाद घातला होता. झहीरखान नेहमी शेवटच्या ओव्ह्र्स टाकायला नकार देत असे, पण निधड्या छातीने त्या ओव्हर्स टाकणारा आगरकरच! २/३ वर्षापूर्वी कर्नाटकविरुद्धच्या रणजी फायनलमधली त्याची कामगिरीही अव्वल. त्या सामन्यात त्याच्यासमोर फिके पडलेले विनयकुमार वगैरे मंडळी आज खेळत आहेत आणि आगरकर मात्र रिटायर्ड!

स्पॉन्सरर कंपन्यांना मॅनेज करणे न जमल्याने एक दुर्लक्षित राहिलेला अत्यंत गुणी खेळाडू असं त्याचं वर्णन मी करीन. एका काळात एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद ५० विकेट्स आणि १७ चेंडूत ५० धावा हे दोन्ही विक्रम त्याच्या नावावर होते. यापेक्षा आणखी काही सांगायची गरज पडू नये!

खेडूत's picture

21 Oct 2013 - 11:21 pm | खेडूत

छान परिचय.
हा गुणी खेळाडू नेहमीच लक्षात राहील.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 Oct 2013 - 5:54 am | निनाद मुक्काम प...

गोलंदाजीला इतक्या प्रतिकूल परिस्थितीत आगरकरने जयसूर्या, कालुवितरणा, रणतुंगा व अरविंदा डीसिल्वा या चार सर्वात महत्त्वाच्या विकेट्स प्रत्येक मोक्याच्या वेळी उडवल्या. त्यामुळेच भारत जिंकला. 'मॅन ऑफ द मॅच' नक्कीच आगरकरला मिळायला हवे होते. प्रत्यक्षात सचिनला दिले गेले. तो चांगला खेळला होताच, पण शतके तर गांगुली व डीसिल्वाने ही मारली होती. हे स्कोरकार्ड बघितल्यावर अंदाज येइल.
नुकताच मी जो क्रिकेट विषयी लेख लिहिला आहे , त्याच्याशी साधर्म्य दाखवणारा हा मजकूर ,
आगरकर सोबत खेळलेला माझा मित्र मला नेहमीच त्यांच्या फलंदाजीचे अफाट कौतुक करायचा व अशी फलंदाजी तो आंतराष्ट्रीय स्तरावर का करत नाही ह्या प्रश्नाला त्याचे उत्तर ठरले असायचे.
त्याला इरफान पठाण व्हायचे नाही आहे .
शेवटची षटक टाकण्यात मागच्या दशकात जंबो , जहीर सोडल्यास भरवशाचा गोलंदाज म्हणून अजित चे नाव घेतले जाइल,
बिचार्याला जाहिराती करता आल्या असत्या , थोडी चमकोगिरी जमली असती , तर निवड समितीवर त्याच्यासाठी चार शब्द हक्काने टाकणारे असते ,
रमाकांत देसाई नंतर मुंबईचा सर्वोत्तम गोलंदाज अजित आगरकर आहे ,

डाव्या बॅट्समनंसाठी आगरकर खास बॉलिंग टाकायचा. जस्टिन लँगर हा एक त्याचा आवडता बकरा होता.

बॅटमॅन's picture

22 Oct 2013 - 1:06 pm | बॅटमॅन

म्हैला वर्गात क्रिकेटची अशी तपशीलवार आवड क्वचितच आढळते. इथे ती व्यक्त झालेली पाहून कौतुक वाटलं.

पैसा's picture

22 Oct 2013 - 3:12 pm | पैसा

पण जसं काही पुरुष लोकांना पाककृतींची आवड असते तशी काही म्हैलांना क्रिकेटची आवड असते. फक्त सगळेच बोलतात असं नाही!

अर्थातच. सगळे बोलत नाहीत. या निमित्ताने इंट्रेस पाहून बरं वाटलं आणि त्याचे प्रत्यक्ष प्रमाण मिळाले. नै तं क्रिकेट आणि म्हैला यांचा संबंध इन जण्रल लैच कमी.

पण जसं काही पुरुष लोकांना पाककृतींची आवड असते तशी काही म्हैलांना क्रिकेटची आवड असते. फक्त सगळेच बोलतात असं नाही!

पै तायशी सहमत. माझी आज्जी, आईची आत्या ज्या आत ८०+ आहेत आजही आवर्जुन आवडीने क्रिकेट पहातात. नुसत्या पहात नाहीत तर बघताना त्यांची कॉमेंट्री/ बॉलर्सना सल्ले चालू असतात.
आमच्या (एके काळच्या) क्रिकेट वेडाचं हे बाळकडू इथुनच मिळालय.

बाकी पै तायचही कौतुक आहेच. :)

बॅटमॅन's picture

22 Oct 2013 - 4:13 pm | बॅटमॅन

ऐला जब्रीच की. अशा आया/आज्ज्या असत्या तं अजूनच भारी. नैतर आम्ही एकदा एक वर्ल्ड कप्प फुटबॉल म्याच आणि सीरियलचा शेवटचा भाग एकाच वेळी असल्याने लै महाभारत जाहलेले पाहिले आहे.

अर्थातच. सगळे बोलत नाहीत. या निमित्ताने इंट्रेस पाहून बरं वाटलं आणि त्याचे प्रत्यक्ष प्रमाण मिळाले. नै तं क्रिकेट आणि म्हैला यांचा संबंध इन जण्रल लैच कमी असेच आम्ही समजत असू. कौंटर उदाहरणे मिळाली तर पाहिजेतच. :)

उपास's picture

22 Oct 2013 - 6:36 am | उपास

त्याची देहयष्टी आणि देहबोली फास्ट बॉलरला साजेशी नसली तरी विकेट हमखास काढणार.. मुंबईत त्याचे कितीतरी सामने पाहिलेत. प्रचंड मेहनती, चपळ आणि दोन्ही हातानी अगदी सीमारेषेवरुन चेंडू फेकू शकणारा (अझर, महानाम, मियांदात.. असे होते पूर्वी)
ऑलराउंडर हा शिक्का इतक्या लवकर बसला की धड बॉलिंगवरही लक्ष देता येत नाही आणि बॅटिंगवरही असं काहीसं वाटलं आगरकरच्या बाबतीत (तेच इरफान पठाणच..)
असो, पण मुंबईचा एक गुणी खेळाडू दिसणार नाही आता, अनेक मोक्याच्या सामन्यात त्याने हात दिलाय.. त्याला बिग थँक्यू!!

चतुरंग's picture

22 Oct 2013 - 10:41 am | चतुरंग

आगरकर चुटपुट लावून गेला हे खरे.

माझी एक बालमयत्रीण ऑफ स्पीन ला ऑक्स स्पीन म्हणायची

चौकटराजा's picture

22 Oct 2013 - 6:24 pm | चौकटराजा

पूर्व जन्मात ती गाय असेल .( लई टुक्कार पी जे ना ?)

नानबा's picture

22 Oct 2013 - 10:12 pm | नानबा

t

नानबा's picture

22 Oct 2013 - 10:12 pm | नानबा

t

बॅटमॅन's picture

23 Oct 2013 - 2:28 pm | बॅटमॅन

और ये लगा चौका!!!!!!! चौराकाका तुम्ही आयडीचे नाव बदलून "चौकार-राजा" असे ठेवा बघू =))

मी-सौरभ's picture

22 Oct 2013 - 11:25 pm | मी-सौरभ

आमचे एक आगरकर नावाचे नातेवाईक आहेत.
'अजित आगरकर' तुमचा कोण? या प्रश्नासाठी त्यांच उत्तर ठरलेलं होतं...

'चांगला खेळेल त्या दिवशी पुतण्या'

मन१'s picture

23 Oct 2013 - 7:32 am | मन१

उत्तम परिचय. वरती इतरांनीही म्हटल्याप्रमाणे ह्या प्राण्याचा खूप रागही यायचा आणि कौतुकही वाटायच.
(जगातल्या पूर्ण बोलर्सपैकी सर्वाधिक इकॉनॉमी रेट होता त्याचा बॉस. चक्क ५.१६! हैट आहे. तरी विकेट्स घ्यायचा हे ही खरच.
१९९९च्या विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध ह्यानं दिलेली धावांची खैरात भारताचं टम्काळं वाजवून गेली.)

टवाळ कार्टा's picture

23 Oct 2013 - 4:09 pm | टवाळ कार्टा

थोडीफार नशीबानेसुध्धा साथ नाही दिली
भारतातल्या एका कसोटीमध्ये सकाळी सकाळी आग ओकणारी बोलिंग करत होता...बाकी सगळे (श्रीनथसकट पुचाट बोलिंग टाकत होते)...पण मग दादा बोलिंगला आला आणि त्याला ४/५ विकेट मिळाल्या :(
दुसरी टीम आता आठवत नाही
असाच एकदा २५ बॉल मधे ६५ ठोकलेले
फक्त गुणवत्ता बघीतली तर भारताचा आजपर्यंतचा सर्वात चांगला अष्टपैलु खेळाडु बनला असता (हो कपिलदेवपेक्शासुध्धा चांगला)

सुमीत भातखंडे's picture

24 Oct 2013 - 5:13 pm | सुमीत भातखंडे

साली शेवटची वन डे खेळलाय तरी भारतात कुंबळे(३३७ बळी) आणि श्रीनाथ(३१५ बळी) यांच्यानंतर याचाच नंबर आहे (२८८ बळी) - विकिपिडीयावरून साभार

त्या अ‍ॅडलेड कसोटीतही आगरकर म्यान ऑफ द म्याच नव्हता बहुतेक...

श्रीगुरुजी's picture

28 Oct 2013 - 6:24 pm | श्रीगुरुजी

>>> त्या अ‍ॅडलेड कसोटीतही आगरकर म्यान ऑफ द म्याच नव्हता बहुतेक...

पहिल्या डावात २७० व दुसर्‍या डावात नाबाद ७२ धावा करणारा राहुल द्रविड हा त्या सामन्यात 'सामनावीर' बहुमानाचा मानकरी होता.

मनोज श्रीनिवास जोशी's picture

28 Oct 2013 - 7:17 pm | मनोज श्रीनिवास जोशी

AB Agarkar has done it not Tendulakr !
नुकतीच लॉर्डस मैदानाची सैर करून आलो. हा लेख वाचताना तेथील टूर गाईड ने उद्गारलेले हे वाक्य आठवले. अजित आगकरने ( आघारकर ? ) लॉर्डस वर शतक ठोकले आहे आणि सचिनला ते जमलेले नाही ह्याचे अत्यंत श्रवणीय वर्णन त्याने केले.
शतक ठोकलेल्या फलंदाजांची नावे तेथील फलकावर लावलेली आहेत. आता त्यामध्ये आगरकरचा समावेश झाला आहे. पुढच्या दौर्याच्या वेळी अजित ने आपले संपूर्ण कुटुंब "आपले कोरलेले नाव" पाहण्यासाठी लॉर्डस वर नेले होते असे सांगून त्या टूर गाईड ने क्षीण विनोद केला आणि लोकांचा हशा मिळवला.
त्याचे झालेले कौतुक क्षणात चेष्टेचा विषय झाला.
त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत असेच होत आले आहे.

हा विनोद जर टूर गाईड च्या "संहितेच"" भाग असेल तर आता निवृत्ती नंतर सुध्दा अजित असाच टपल्या खात राहील की काय ? ह्या विचाराने अंमळ वाईटही वाटले.

श्रीगुरुजी's picture

29 Oct 2013 - 1:03 pm | श्रीगुरुजी

लॉर्ड्स शतक करण्यात असे काय विशेष आहे? लॉर्ड्स म्हणजे पर्थ किंवा जमैकासारखी वेगवान खेळपट्टी असलेले मैदान नाही. किंवा कलकत्ता किंवा मेलबोर्नएवढे मोठेही नाही. जगात कसोटी केंद्र असलेली किमान १०० मैदाने असतील. त्यातल्या प्रत्येक मैदानावर शतक करणे कोणालाच शक्य नाही. त्यामुळे लॉर्ड्स वर शतक करणे किंवा इतर मैदानावर करणे हे सारखेच आहे. 'मी लॉर्ड्सला विशेष मैदान मानत नाही' असे पूर्वी एकदा गावसकर म्हटला होता. त्याच्या दृष्टीने लॉर्ड्स हे इतर मैदानांसारखेच आहे.

बॅटमॅन's picture

29 Oct 2013 - 2:00 pm | बॅटमॅन

उगा बोभाट करतात झालं त्या मैदानाचा. भौतेक एकदा जेफ्री बॉयकॉट आणि हर्षा भोगले कमेंट्री करत होते की कुठल्या शो मध्ये होते तेव्हा जेफ्री म्हणाला की सचिन इतका भारी असूनही लॉर्ड्सवर शतक ठोकता आले नाही त्याला. हर्षा लगेच उत्तरला- "सो हूज़ लॉस इज इट? लॉर्ड्सचा की सचिनचा?" जेफ्री शॉक्स, हर्षा रॉक्स!!!

आदूबाळ's picture

30 Oct 2013 - 2:29 am | आदूबाळ

बरोबर आहे. उगाच स्टॅटगुरू मध्ये खोदकाम केलं.

वाका वर सेंचुरी मारणारे तीनच - गावस्कर, सचिन आणि अमरनाथ.त्यात सचिनचा स्ट्राईक रेट जवळजवळ ७१ आहे - म्हणजे ग्रेटच!

लॉर्ड्सवर सेंचुरी मारणारे आठ गडी. त्यात आगरकर आणि रवी शास्त्री ही जरा आश्चर्यकारक नावं पण आहेत!

श्रीगुरुजी's picture

30 Oct 2013 - 12:01 pm | श्रीगुरुजी

>>> वाका वर सेंचुरी मारणारे तीनच - गावस्कर, सचिन आणि अमरनाथ.त्यात सचिनचा स्ट्राईक रेट जवळजवळ ७१ आहे - म्हणजे ग्रेटच!

कोहलीने सुद्धा २०१२ मध्ये वाकावर शतक केलेले आहे.

सुहास झेले's picture

30 Oct 2013 - 1:31 pm | सुहास झेले

सुंदर आढावा... :) :)