वाचनातून नजरेत आणि मनात उतरलेला "रारंग ढांग"

कोमल's picture
कोमल in जनातलं, मनातलं
23 Apr 2013 - 11:21 pm

नुकतचं रारंग ढांग वाचनात आलं. आणि प्रभाकर पेंढारकरांची कथा मनाला भिडली, नुसती भिडलीच नाही तर खूप दिवस मनात घर करून होती.

लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे, याच्या भोवती फिरणारी हि कथा मानवी भावभावना, निसर्गाचा स्वच्छंदीपणा , आणि आर्मी असे अनेक पैलू उलगड नेते आणि शेवटपर्यंत वाचकाला गुंतवून ठेवते.

मुंबईला असणारी अति आरामशीर नोकरी सोडून विश्वनाथ बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन अर्थात हिमालयात रस्ते बांधणारे आर्मी इंजिनीअरींग कडे वळतो. हिमालयात रस्ते बांधणे हे अत्यंत जिकरीच काम. येथील लहरी निसर्गाचं वर्णन, त्याने मांडलेला उच्छाद इथून कथेला सुरुवात होते. विश्वनाथ च्या मनातील हिमालय आणि त्यानी अनुभवलेला हिमालय यांचं सुरेख वर्णन अधे मध्ये भेटत जात.

आणि मग ओळख होते अवाढव्य अशा "रारंग ढांगाशी". आकाशाला गवसणी घालणाऱ्या उंचच उंच कड्यांना हिमालायात ढांग म्हटलं जात. असा हा रारंग ढांग सतलज नदीच्या दोन्हीबाजूंनी आकाशाला भिडलेला. या रारंग ढांगा तून रस्ता करायचं काम विश्वनाथ वर सोपवलं जात, आणि मग विश्वनाथ चा संघर्ष सुरु होतो हिमालयाशी, मुळातच "ब्लडी सिव्हिलियन्स" चा तिरस्कार करणाऱ्या मेजर बंबांशी, त्याच्या हाताखालील असणाऱ्या लेबर लोकांशी आणि नकळत स्वतःशीच.

विश्वनाथची रारंग ढांगाशी झालेल्या पहिल्या भेटीत त्याच्या मनातील एक वाक्य मला फारच अवडल आणि पटलं देखील - "आपल्या देशात माणसाच्या वेळेला किंमत नाही. आणि त्या पलीकड त्याच्या जीवनाला !"

कथेसोबत पुढे सरकतांना आपली वेगळ्याविध लोकांशी ओळख होत जाते. कॅप्ट्न नायर, मेजर अमर, कॅप्टन मिनू खंबाटा, सर्जेराव गायकवाड, विश्वनाथची मैत्रिण उमा. यातील विशेष भावतो तो मिनू.त्याचं स्वच्छंदी वागण, रसिक मन, बिनधास्त बोलण, वाचकावर तो एक वेगळाच ठसा उमटवून जातो.
अश्या या मिनुच एक वाक्य-"दोस्त, आता खरोखरच चढली. आता ओठांवर शब्द येतात ते डोक्यातून नाही. इथून, हृदयातून ! विशू, जीवन हे जगण्यासाठी आहे. खऱ्या अर्थाने जग. लुटता येईल तेवढा आनंद लूट. देता येईल तेवढ दोन्ही हातानी दे,आजच! उद्दाचं कुणाला माहित? ह्या रंगमंचावर प्रत्येकालाच एक दिवस पडद्याआड जायचं आहे! आणि ह्या बॉर्डर रोडवर तो दिवस कोणत्याही क्षणी उगवण्याची शक्यता असते… "

विश्वनाथ आणि उमाचं फुलत गेलेलं नात सुद्धा कथेला गुलाबी रंग लाउन जात. कथेमध्ये अनेक वळणावर मिळणारे अनपेक्षित धक्के, प्रत्येक प्रसंगाचं, माणसाच्या स्वभावाचं केलेलं अप्रतिम वर्णन, आणि उत्कृष्ट वाक्यासंपदा पुस्तक संपेपर्यंत आपल्याला खिळवून ठेवते.

पण पुस्तक संपल्यावर सुद्धा एक वाक्य जीवनात कायमचं घर करून जात - "जब आदमी मर जाता है, तो उसका क्या रहता है ?"

Rarang Dhang

रारंग ढांग
लेखक- प्रभाकर पेंढारकर
मौज प्रकाशन

वाचलं नसल्यास जरूर वाचा दोस्त हो…

वाङ्मयकथासाहित्यिकसमीक्षामाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

23 Apr 2013 - 11:43 pm | मुक्त विहारि

नक्की वाचीन..

पैसा's picture

23 Apr 2013 - 11:45 pm | पैसा

पूर्वी एकदा वाचलेलं आहे. आता विकत घेऊन वाचेन.

कवितानागेश's picture

23 Apr 2013 - 11:53 pm | कवितानागेश

अगदी भिडणारं कथानक आहे. पुढे कितीतरी दिवस मनात घोळत राहतं....
ज्यांच्या जवळच्या लोकांचा किंवा स्वतःचा सैन्याशी संबंध आला असेल त्यांना तर त्यातल्या नियमांचा ताण खूप स्पष्ट्पणे कळू शकेल.

माझीही शॅम्पेन's picture

23 Apr 2013 - 11:53 pm | माझीही शॅम्पेन

परीक्षण छानच आहे !

अवांतर :- मागे मिपा वरच ह्या कादांबरीची कोणी तरी पीस काढली होती (दुवा सापडत नाही)

विमेच्या सविस्तर प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

24 Apr 2013 - 1:14 am | विश्वनाथ मेहेंदळे

अवांतर :- मागे मिपा वरच ह्या कादांबरीची कोणी तरी पीस काढली होती (दुवा सापडत नाही)

यकुने काढला होता तो धागा. तो यकु असल्याने त्याला आवडले नव्हते म्हणा :-)

विमेच्या सविस्तर प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत

सविस्तर देईन का ते माहिती नाही, पण देईन प्रतिक्रया. जरा वेळ लागेल.

कोमल's picture

25 Apr 2013 - 9:36 am | कोमल

यकुने काढला होता तो धागा

आता सापडू शकेल का?? वाचायचा राहून गेला होता..

तो यकु असल्याने

वाचायचा आहे.

हरिप्रिया_'s picture

25 Apr 2013 - 11:16 am | हरिप्रिया_

हे घ्या
रारंग ढांग - एक सो सो पुस्तक !

पण व्यक्तिश: मला अतिशय आवडलेले पुस्तक आहे.

वाचतांना आपण रारंग ढांगेत जाऊन पोहचले आहे असच वाटत.
अन मस्त परिचय. आता परत एकदा वाचते रारंग ढांग :)

लाल टोपी's picture

24 Apr 2013 - 12:47 am | लाल टोपी

चांगला परीचय. वाचायचं राहून गेलं आहे नक्कीच वाचेन.

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Apr 2013 - 1:05 am | बिपिन कार्यकर्ते

आह! रारंग ढांग!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Apr 2013 - 10:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुस्तक परिचयाबद्दल आभार.

-दिलीप बिरुटे

जयनीत's picture

24 Apr 2013 - 7:50 pm | जयनीत

मस्त चित्रण आहे त्यात निसर्गाच अन माणसांचही. लेखन शैली खुपच साधी अन सरळ आणि त्यामुळेच जबरदस्त.

चांगली कादंबरी आहे. मराठीत दोन कादंबर्‍यांवर सिनेमा निघावे असं मला मनापासून वाटतं - त्यातली एक आहे रारंगढांग आणि दुसरी एम. टी. आयवा मारू.

कोमल's picture

25 Apr 2013 - 9:33 am | कोमल

रारंग ढांग वर निघाल्यास उत्तमच.. दूसर्‍या कादंबरी बद्द्ल जरा माहिती कळवाल का??

श्रीरंग_जोशी's picture

25 Apr 2013 - 9:03 pm | श्रीरंग_जोशी

एम टी आयवा मारू - मी माध्यमिक शाळेत असताना ही कादंबरी हातात पडली होती बरीच वाचली पण अर्धवटच राहिली.

एका जहाजावर घडणार्‍या घडामोडींची कहाणी आहे ज्याचे नाव प्रथम सेव्हन सीज नंतर ओरायन अन मग एम टी आयवा मारू असे होते.

स्पा's picture

25 Apr 2013 - 9:37 am | स्पा

इमे काका..............

कोमल's picture

25 Apr 2013 - 9:41 am | कोमल

प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभार.. खूप दिवसांनंतर लिहायला घेतलं होतं.. आणि मिपाकरांचे प्रतिसाद नेहमीच खूप महत्त्वाचे असतात.. :)

ऋषिकेश's picture

25 Apr 2013 - 10:07 am | ऋषिकेश

रारंगढांगचं ऑडियोबुक स्नॉवेलने काढलं आहे.
तेही श्रवणीय आहे

कधी पाहिले नाही हे पुस्तक. चांगलं आहे म्हणता ?
मिळवून वाचेन...

प्रसाद प्रसाद's picture

26 Apr 2013 - 12:40 pm | प्रसाद प्रसाद

रारंग ढांग पुस्तक मलाही आवडले होते.....

चंद्रकांत दिवाळी अंक २०१२ मध्ये रारंग ढांगचा दुसरा भाग प्रसिद्ध केला. रारंग ढांगचा उत्तरार्ध लिहावा म्हणून चंद्रकांतच्या संपादकांनी पेंढारकरांना बऱ्याच वेळा विनंती केली पण त्यांना ते जमले नाही म्हणून रीतसर त्यांची परवानगी घेऊन दुसऱ्या कोणीतरी उत्तरार्ध लिहावा म्हणून स्पर्धा आयोजित केली होती.

बऱ्याच परिश्रमानंतर रारंग ढांगचा इतका सुंदर दुसरा भाग श्रीकृष्ण सवदी यांनी लिहिला म्हणून संपादकांच्या मनोगतात बरीच स्तुती वगैरे होती, मनात म्हटलं चला काही तरी चांगलं वाचायला मिळेल म्हणून अंक विकत घेतला.
अध्यात्मिक गुरु काय, साक्षात्कार काय..... मूळ रारंग ढांग कथेची वाट लावलीये उत्तरार्धात. फक्त दीर्घकथा असणे हाच चांगल्या कादंबरीचा एकमेव निकष असतो असे लेखक आणि संपादकांना कथा लिहिताना आणि छापताना वाटले की काय कुणास ठाऊक ..... इतक्या बाळबोध कथा चंपक, ठकठक, चांदोबा मध्ये पण नसतात. नशीब प्रभाकर पेंढारकर मूळ कथेचे धिंडवडे वाचायला जिवंत नाहीत.

प्रभाकर पेंढारकरांच्या रारंग ढांगला यकुने सो सो म्हटले होते तर या अतिसामान्य दुसऱ्या भागाला यकु असता तर काय म्हटला असता कोणास ठाऊक.....